डॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम (Timeline)
तारीख/महिना/वर्ष | घटना/टप्पा |
२ फेब्रुवारी १८८४ | मध्य प्रदेशात रायपूर येथे जन्म |
१८८९ | वडिल व्यंकटेशपंत केतकर यांना जलोदराचा आजार जडला. दोन-अडीच वर्षे अंथरूणाला खिळले. आजारामुळे मुंबईत विधूर भाऊ विठ्ठलपंत यांच्याकडे कुटुंब रहायला आले. तिथेच जलोदराच्या विकाराने निधन. विधूर दिराकडे राहणे बरे दिसणार नाही म्हणून आई लक्ष्मीबाईंनी मुलांसह बिऱ्हाड उमरावतीला हलविले. तिथे व्यंकटेशपंतांचे दुसरे विवाहित भाऊ नारायणराव वकिली करीत. त्यांची सांपत्तिक स्थिती बरी होती. वडिलोपार्जित उत्पन्नातून नारायणरावांनी भावजयीसाठी उमरावतीत जागा घेऊन दिली. मोठा भाऊ दामोदर, बहीण भिकूताई व आईबरोबर श्रीधर उमरावतीत रमू लागला. कविता, वाचन, साहित्यात रमू लागला |
१८८९ | व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप परिक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण |
१८९९ | वऱ्हाड समाचार वृत्तपत्रात पहिला लेख छापून आला. |
१९०० | उमरावतीस आल्यानंतर काही महिने गेले आणि अचानक कॉलराच्या साथीत मातोश्री लक्ष्मीबाई व थोरली बहीण भिकूताई यांचा एका मागोमाग मृत्यू. |
१९०० | मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण. आईच्या निधनाने चुलत्याच्या घरी राहणे. |
१९०१ | पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी इच्छा मनात होती, पण चुलत्याच्या आग्रहामुळे मनाविरूद्ध मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला. |
१९०१ ते १९०५ | विल्सन कॉलेजात मन रमले नाही. बी.ए. च्या परिक्षेत अपयश. |
१९०५ | मनात देशभक्तीचे वारे. लष्करी शिक्षण घेण्याचाही मनात विचार. हे शिक्षण विल्सनमध्ये मिळणार नाही, अमेरिकेत मिळेल अशी माहिती मिळाली. अमेरिकेत जाण्याचे वेध लागले. लोकमान्य टिळकांना जाऊन भेटले. अमेरिकेत जाण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आणि द्रव्यसाह्यही मिळाले. केतकरांचे चुलते व अन्य कुटुंबियांचा अमेरिकेत जाण्यास विरोध होता. त्यामुळे टिळकांवर त्यांनी राग धरला. |
जानेवारी १९०६ | दरम्यान, बालमित्र बा.सं. गडकरी (हे पुढे कादंबरीकार म्हणून प्रसिद्धीस आले) यांच्या साथीने ‘महाराष्ट्र वाग्विलास’ हे मासिक सुरू केले. गडकरी आणि केतकर दोघांच्या नावामागे प्रथमच संपादकपद लागले. पण अमेरिकेत जायचे मनात होतेच. |
१५ एप्रिल १९०६ | वकील चुलते नारायणराव यांना कोर्टात जाण्याची धमकी देऊन वडिलार्जित उत्पन्नातील काही पैसे मिळविले. तेवढ्या पैशाच्या आधाराने विल्सन कॉलेज सोडून शिक्षणासाठी तडकाफडकी अमेरिकेला प्रयाण. वय २२. |