प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सातवा : अर्थशास्त्र ते आफ्रिका

अहिंसा
- कोणत्याहि सजीव वस्तूला इजा न करण्याचें हें तत्त्व फार प्राचीन आहे. छान्दोग्योपनिषदांत (३.१७, ४) ''अथयत्तपो दानमार्जवमहि सा सत्यवचनमिति ताअस्य दक्षिणा''। या वाक्यांत पुरुषरुपी यज्ञार्च अहिंसा ही एक दक्षिणा असल्याचें म्हटलें आहे. या उपनिषदाचा काल इ. स. पू. ७ वें शतक धरतात व हाच काल अहिंसातत्त्व उच्चतम कोटीला नेणार्‍या जैनसंप्रदायाच्या उदयाचा आहे. मनुस्मृतींत जरी धमर्विहित हिंसा अहिंसा मानिली आहे तरी मांसभक्षणाकरितांच केवळ केलेली हिंसा त्याज्य ठरविली आहे. (मनुस्मृति ५.४४,४८). हें तत्त्व निरनिराळ्या भारतीय संप्रदायांतून सर्वसाधारणपणें आढळतें पण प्रत्येक संप्रदाय याकडे निराळ्या दृष्टीनें पाहातो व आपल्या मताप्रमाणें आचरण ठेवितो.

प्रथम ज्या संप्रदायांत हें तत्व अगदीं परा कोटीला जाऊन पोंचलें आहे त्या जैनसंप्रदायाकडे वळूं. जैन सांधूंच्या पंचमहाव्रतांमध्यें अहिंसाव्रत हें आद्य आहे, व तें तंतोतंत आचरण्यासाठीं ते.-विशेषेकरून स्थानवासी पंथाचे लोक,-नेहमीं बरोबर एक सुतांचा कुंचा (वाट झाडण्यासाठीं) वागवितात, तोंडाला फडक्याची पट्टी (तोंडांत जीवजंतू जांऊ नयेत यासाठीं) बांधतात व अंगावरील किंवा कपड्यावरील किडे वगैरेहि झाडीत नाहींत. कधीं कधीं जैन लोक या जंतूंच्या हत्या टाळण्यासाठीं मनुष्यहत्येकडे दुर्लक्ष करितात. उदा. सर्पादि घातक प्राणी हातीं सांपडले असतां त्यांनां मुक्त करण्याचा प्रयत्‍न करितात. असें ऐकण्यांत येतें कीं, ढेंकूणपिसा यांचा पांजरपोळ करून, त्यांत लठ्ठशा माणसास पैसे देऊं करून निजावयास पाठवितात. ही चाल अजून नष्ट झाली नाहीं. सुरतच्या ''बनियन हॉस्पिटल'' मध्यें उपद्रवी जीवजंतूकरितां इतर वार्डांबरोबर एक वार्ड असे, असें हॅमिलटनच्या हिंदुस्थानवर्णनांत लिहिलें आहे. (मुखोपाध्याय-सर्जिकल इन्स्टुमेंटस् ऑफ दि हिंदूज. भा. २ पा. ५०)

कित्येक जैन लोक अहिंसा आचरण्यासाठीं किती दूरदृष्टि ठेवितात व भावी हिंसा टाळण्यासाठीं तात्कालिक हिंसेस कसे अजाणत: प्रवृत्त होतात याचें एक मासलेवाईक उदा-हरण म्हणजे असें:-उन्हाळ्यांत गाई म्हशी वगैरे जनावरें आरामशीर झाडाच्या सावलींल बसलेली एखाद्या कर्मठ जैनानें पाहिलीं तर तो त्यांना तात्कळ तेथून हुसकून लावितो; कारण, जर हीं गुरें अशी आरामशीर जागेंत बसतील तर त्याठिकाणीं त्यांचें शेणमूत पडेल, मग त्यांत किडे होतील व इतस्वत: ते पसरतील; व सरतेशेवटीं उन्हाच्या तापानें बिचारे मरतील. त्यापेक्षां या गुरांनाच छायेंत बसूं दिलें नाहीं म्हणजे इतक्या जीवांची हानि टळेल! तसेंच ढुंढये जैन मलोत्सर्गाच्या वेळीं या तत्त्वासाठींच एक घाणेरडा प्रकार करीत असतात; तो अत्यंत किळसवाणा आहे. हे ढुंढये थंडपाणी, त्यांत अनेक सजीव प्राणी असतात म्हणून न पितां केवळ भाताची पेज किंवा भाजीचें पाणी पिऊन राहतात. पण पाणी तापवितांना होणारी जीवहत्या यांच्या अहिंसेच्या आड कशी येत नाहीं? जैनशास्त्रांत मध व लोणी निषिद्ध मानिलें आहे तें या तत्त्वाला अनुसरूनच. (वा. गो. आपटे विविधज्ञानविस्तार ३५ अ. १) स्नान करणें, दांत घांसणें या सारखीं देहशुद्धीचीं कर्मेंहि जैनयतींनां निषिद्ध मानिलीं आहेत व या सर्वांचें एकच कारण हिंसाभय हें होय.

बौद्ध धर्मांत हे तत्त्व मानव धर्माला अनुसरून योजिलें आहे. अष्टमार्गांत हे तत्त्व दोन ठिकाणीं, एकदां योग्य आकांक्षांच्या यादींत व दुसर्‍यांदा सद्वर्तनांमध्ये आलेलें आढळतें (मझ्झिम निकाय ३. २५१ = संयुक्त ५.९) तसेंच संप्रदायाच्या दहा नियमां (शिखापदां) पैकीं व पंचशिलांपैकीं हें पहिलें आहे. (विनय १.८३. अंगुत्तर ३. २०३). सांप्रत उपलब्ध असणार्‍या जुन्यांत जुन्या बौद्ध ग्रंथांतील शीलांसंबंधींच्या जुन्या बाडांत अहिंसेवर प्रथमच विवेचन केलें आहे. व तें अनेक सुत्तांतून जसेंच्या तसेंच घेतलेलें आढळतें (र्‍हाईस डेव्हिडस-डायलॉग्स ऑफ दि बुद्ध १, ३, ४). अशोकाच्या पहिल्या शिलालेखांत (काल इ. स. पू. २५६) पुढील मजकूर आढळतो.

 

ही धर्मानुशासन पत्रिका देवांचा प्रिय प्रियदर्शी राजानें लिहविली-येथें कोणत्याहि जीवाची हत्या होऊं नये, किंवा जलसे होऊं नयेत. कारण असल्या जलशांत बहुत दोष आहेत असें प्रियदर्शी राजास दिसून आलें. पण देवांचा प्रियदर्शी राजा यास कांहीं जलसे योग्य आहेत असें वाटतें. पूर्वीं प्रियदर्शीं राजाच्या पाकशाळेंत दररोज कित्येक शतसहस्त्र प्राणी आमटीभाजी करण्याकरितां मारले जात; पण हल्लीं म्हणजे ही धर्माज्ञा लिहिली जात आहे. त्या काळीं-दररोज फक्त तीनच प्राणी मारले जात, ते म्हणजे दोन मोर व एक सांबर-सांबर नेहमीं असतेंच असें नाहीं. हे तीन सजीव प्राणी देखील पुढें मारले जाणार नाहींत.'' (स्मिथ दि ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया. पा. ३९).

अशोकाच्या पांचव्या स्तंभावरील लेखांत या सम्राटाची अहिंसेंत किती प्रगति झाली हें दिसून येतें. जनावरांनां खच्ची करण्याच्या तो विरुद्ध असे. पण यापूर्वीं ७५ वर्षे त्याच्या राज्यांत काय स्थिति होती याची कल्पना येण्यास तक्षशिलेचें उदाहरण पुरेसें होईल.

इ. स. पू. ३२६त अलेक्झांडर तक्षशिला येथें आला तेव्हां आंभी राजानें त्याला सागोतीकरितां ३००० लठ्ठ बैल व १०००० किंवा त्यांहून जास्त बकरीं भेट म्हणून पाठविलीं. यावरून वेदकालाप्रमाणें या वेळींहि लोक खाण्याकरितां गुरें माजवून ठेवीत व अतिथिसत्काराच्या प्रसंगीं त्यांची मेजवानी देत. गोमांसासंबंधीं हिंदूंची प्रचलित भावना त्या काळीं समाजांत मुळींच नव्हती म्हटलें असतां चालले. अशोककालीं ती थोडथोडी अहिंसेच्या सरसहा उपदेशानें अदभूत होऊं लागली व पुढें ती जातिभेदाला व तन्मूलक कलहाला कारणीभूत झाली. असो. हा अशोकाच्या स्तंभावरील ५ वा लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्राशीं जुळतो; उदा. दोन्हीतहि शुक, सारिका, आणि ब्राह्मणी कलहंस यांची हत्या निषिद्ध मानिली आहे. भिक्षापर्यटणांत कोणतीहि भिक्षा स्वीकारावी असा बौद्धसंप्रदायांतील एक नियम आहे; जेव्हां देवदत्तानें बुद्धाजवळ हा नियम कमी व्यापक करण्याकरितां विनंति केली, तेव्हां बुद्धानें तसें करण्याचें साफ नाकारिलें (विनय. २.११७; ३.२५३). बुद्धाच्या तोंडीं घातलेल्या सर्वश्रुत आमगंध सुत्तांत असें स्पष्ट म्हटलें आहे कीं, मांसाशनानें मनुष्य बिघडत नसून तो दुष्कृत्यांनीं बिघडतो; स्वत: बुद्धानें चंड नांवाच्या घिसाड्याच्या घरीं डुकराचें मांस यथेच्छ सेवन केलें, व त्यामुळें त्याला अतिसार होऊन मृत्यु आला. तेव्हां वरील गोष्टींवरून या अहिंसेसंबंधांतल्या बौद्ध व जैन विचारांत किती फरक आहे हें दिसून येईल. हर्षकालीं गोवधनिषेध तीव्र झाला होता तरी इतर प्राण्यांचें मांस ब्राह्मणांनांहि निषिद्ध नसे. (वाटर्स, पु. १).

या बौद्ध व जैन अहिंसा तत्त्वामुळें प्राचीन पशुयज्ञ बंद पडले व' ''अहिंसा परमो धर्म:'' यासारखी शिकवण हिंदूंमध्यें सुरू झाली. महाभारतांत हिंसा व अहिंसा या दोन्ही गोष्टींना पोषक अशीं विधानें सापडतात (वनपर्व-धर्म-व्याध संवाद; अ.२०८; शांति. २६४-२६५) बौद्ध धर्म लुप्त होऊन गेला तरी व जैनधर्म निर्बल व अल्पसंख्यांक बनला असतांहि ब्राह्मणी धर्माच्या पुनरुत्थापकांनां मांसाशन शास्त्रोक्त करून घेतां आलें नाहीं. यावरून हें अहिंसा तत्त्व हिंदु समाजांत किती खोल रुजलें असावें याची कल्पना होईल.

ब्राह्मणांत सुद्धां सर्वच निवृत्तमांस आहेत असें नाहीं. बंगाल, पंजाब वगैरे प्रांतांतील ब्राह्मण जरी मटन खात नसले तरी मासे खातातच. त्यामुळें समाजांत. निवृत्तमांस, मासेखाऊ व मटनखाऊ असे तीन मोठे भेद पडून एकमेकांच्या सोंवळेपणाच्या कल्पनांमुळें त्यांच्यांत उघड नसलें तरी आंतून वैर असतच. मांसाहार चांगला कीं शाकाहार चांगला हा मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. तेव्हां त्यांत न पडतां समाजहिताच्या दृष्टीनें पाहिलें तरी निवृत्तमांस लोकांनी मांसाहाराविषयीं निदान तिटकारा तरी बाळगूं नये. ज्याला रुचेल तो त्यानें आहार पसंत करावा, तो आपल्या पसंतीचा नाहीं  म्हणून त्याबद्दल पूर्ण तिटकारा व द्वेष ठेवूं नये म्हणजे परकेपणा वाटण्याचें बंद होऊन जातीजातींत एकीं होऊं शकेल; निदान या कारणामुळें तरी तेढ पडणार नाहीं.

भूतदयेच्या दृष्टीनें अहिंसा चांगली हें खरें, पण तिला अवास्तव किंमत देऊन आपल्या गरजा मारून टाकणें व अप्रगत किंबहुना मूढ बनणें हें केव्हांहि हिताचें होणार नाहीं. मोठा जीव वांचविण्याकरितां लहान जीव नेहमीं बळी पडणारच. सृष्टीचा हा सनातन नियम आहे हें आपण प्राणिसृष्टींत बघतोंच. पायाखालीं मुंग्या मरतात म्हणून चालणें सोडतां यावयाचें नाहीं, किंवा हत्या होईल या भीतीनें क्रूर व घातकी जनावरांनां मोकळें ठेवून भागावयाचें नाहीं. हल्लीं सर्व रोग हे जंतूंपासून उत्पन्न होतात म्हणून या जंतूंनां मारण्याकरितां ज्या लसी टोंचून घ्याव्या लागतात त्या जीव हत्त्येच्या कल्पनेमुळें न घेतल्यास, रोग निवारण होणार नाहीं व लहान जंतूंनां वांचविण्याचें काल्पनिक समाधान मानून स्वत:ची हत्या मात्र करावी लागेल. तसेंच हिंसा होईल म्हणून जैनांप्रमाणें रात्रीं कांहीं न खाणें वेडगळ पणाचें दिसेल; कारण आधुनिक काळांत रात्रींसुद्धां दिवसा इतकाच उजेड करून शक्य ती हिंसा टाळतां येईल. ढुंढिये जैनांप्रमाणें सार्‍या जन्मांत अहिंसातत्त्वानुसार स्नान न करणें हें कोणत्या कोटींत जाईल तें सांगवत नाहीं. असो. तेव्हां अहिंसेच्या नांवाखालीं या सुधारलेल्या जगांत रानटी लोकांप्रमाणें वागणें केव्हांहि शहाणपणाचें होणार नाहीं. अहिंसातत्त्वानें हिंदु धर्माला अध्यात्मिक वैभवाच्या उन्नत शिखरावर बसविलें आहे खरें, पण अध्यात्मदृष्टया उच्च पदवी प्राप्त करून देणार्‍या या तत्त्वामुळें हिंदुस्थान देशास राजकीय दृष्टया मृत्यु पंथांस जावें लागलें असें जें मॅक्समुल्लरनें विधान केलें आहे तें रा. वैद्य निमूटपणें मान्य करितात (मध्य युगीन भारत भाग १. पान १६६). पण तेच महाभारताच्या उपसंहारांत अहिंसातत्त्व आम्ही बौद्ध-जैनांपासून घेतलेलें नसून तें आमच्यांत फार प्राचीन काळापासून होतें असें सिद्ध करितात.

(सं द र्भ ग्रं थ.-वा. गो. आपटे-विविज्ञानविस्तार पु. ३५. एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स (अहिंसा). स्मिथ-ऑक्सफोर्ड हिस्टरी ऑफ इंडिया. ज्ञानकोश विभाग ४ था. छांदोग्योपनिषत्. मनुस्मृति. कौटिलीय अर्थशास्त्र. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका-जैनिझम. विनयग्रंथ. वैद्य-मध्ययुगीन भारत १; महाभारत-उपसंहार.)

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .