पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ९ वें
आरोग्य

इंडियन रेडक्रॉस सोसायटी -  गेलें महायुद्ध सुरू झालें त्यावेळीं रेडक्रॉस सोसायटीतर्फे जें काम होतें तें हिंदुस्थानांत व मेसापोटेमियांत सेंट जॉन अ‍ॅब्युलन्स असोसिएशननें व इतर प्रांतिक संस्थांनीं हातीं घेतलें. १९१६ च्या आगस्ट पासून ऑर्डर ऑफ स्टेट जॉन ऑफ जेरूसलेमच्या आणि ब्रिटिश रेडक्रॉस सोसायटीच्या जाइंट वॉर कमिटीच्या एका शाखेनें हें काम हातीं घेतलें.

या कमिटीच्या अखेरच्या रिपोर्टात असें दिलें आहे कीं, १९२० जून पर्यंत एकंदर फंड १७७८५७१६ रुपये जमला, त्यापैकीं १७ लक्ष रुपये रेडक्रॉस सोसायटीनें दिले. रेडक्रॉसच्या कामाकरितां हिंदुस्थान व मेसापोटेमिया मिळून ११७ लक्ष रुपये खर्च झाले. १९१९ मध्यें रेडक्रॉस सोसायटीच्या इंटर नॅशनल लीगला सामील होण्याचें निमंत्रण केलें. १९२० सालीं वरिष्ठ कायदे कौन्सिलनें ठराव पास करून इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थापून तिला प्रांतिक शाखा जोडून घेण्याची योजना केली.

रेडक्रॉस सोसायटीचे उद्देश येणेंप्रमाणें- (१) आजारी व जखमी शिपायांची शुश्रूषा, (२) क्षयरोग्यांची शुश्रूषा (शिपाई व खलाशी यांची सोय प्रथम करणें), (३) बालसगोपन, (४) इस्पितळें व आरोग्यवर्धक अशा संस्थांनां कपडे पुरविणें, (५) इतर मदत, (६) होम सर्व्हिस अम्ब्युलन्स वर्क (७) सैन्यांतील कामावरील व कामावर नसलेल्या शिपायांनां मदत करणें. या सोसायटीचा अध्यक्ष व्हाईसरॉय असून २५ सभासदांची एक मॅनेजिंग बॉडी असते. त्यापैकीं १२ सभासद प्रांतिक शाखांचे व्हाईस प्रेसिडेंट असतात, ८ सभासद सोसायटीच्या वार्षिक जनरल मीटिंगनें निवडलेले व ५ सभासद अध्यक्षनियुक्त असतात. १९२६ सालीं या सोसायटीच्या ताब्यांत निरनिराळ्या बँकांचे ६७,५३,००० रुपये किंमतीचे रोखे होते.

सेंट जॉन अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशनः- ही संस्था १८७७ मध्यें इंग्लंडांत स्थापन झाली. तिचे उद्देश (१) अपघात किंवा अकस्मात आजारी झालेल्यांनां तात्कालिक मदत (फर्स्ट एड) करण्याचें ज्ञान देणें, (२) आरोग्य व स्वच्छतेसंबंधी ज्ञान देणें, (३) अ‍ॅम्ब्युलन्सचे सामान तयार करून पुरविणें, (४) अ‍ॅम्ब्युलन्स कार, इनव्हॅलिड ट्रान्सपोर्ट कोअर व नर्सिंग कोअर तयार करणें व (५) रोग्यांनां इतर मदत करणें. १९१० मध्यें असोसिएशनचें इंडियन कौन्सिल स्थापन झालें. १९२५ साली या कौन्सिलचें प्रेसिडेंट व्हाइसरॉय आणि मुख्य सेनापति असून सभासद १७ होते.

वेडे व वेड्यांची इस्पितळें- रोग्यांप्रमाणें वेड्यांकरितांहि हिंदुस्थानांत अद्याप भरपूर इस्पितळें नाहींत. हिंदी संस्थानांत तर ही उणीव फारच आहे. त्यामुळें कैद्यांच्या तुरुंगांतच वेड्यांनां ठेवण्यांत येतें. १९२१ च्या खाने सुमारीवरून पाहतां दर दहा हजार माणसांत तीन वेडे असें प्रमाण पडतें. तर युनायटेड किंगडममध्यें वेड्यांचें प्रमाण १० हजार लोकसंख्येंत ४० पडतें. युनायटेड किंग्डममध्यें दुबळ्या मनाचे लोकहि वेड्यांत गणले जातात इकडे तसेंच केलें तर ही संख्या फार फुगेल. हिंदुस्थानांतील वेड्यां संख्येचे कोष्टक पुढें दिलें आहे (आंकडे हजारांचे आहेत)

हिंदुस्थानांतील वेड्यांची प्रांतवार संख्या 

एकंदर सुमारें ८८ हजार वेड्यांपैकीं फक्त ९७१२ वेडे इसम राहण्यापुरतींच इस्पितळें आहेत म्हणजे १० वेड्यांपैकीं फक्त एक इसमाची सोय इस्पितळांत होते. इस्पितळांची संख्या आणि त्यांतील वेड्यांची स्थिति दर्शविणारें प्रांतवार कोष्टक पुढील पानावर दिलें आहे.

वेड्यांच्या इस्पितळांची व्यवस्था प्रांतिक मेडिकल आफिसरांच्या देखरेखीखालीं चालते. मद्रास, येरवडा (मुंबई), लाहोर, आग्रा, बर्‍हाणपूर (बंगाल), व रंगून येथील सेंट्रल जेलनां जोडून वेड्यांकरितां एक स्वतंत्र सुपरिटेंडेंट नेमलेला असतो. बाकीचीं इस्पितळें स्थानिक सिव्हिल सर्जनच्या देखरेखीखालीं असतात. वेड्यांचा बंदोबस्त या दृष्टीनें इस्पितळांच्या इमारती चांगल्या आहेत; पण औषधोपचारांच्या योजना फारशा चांगल्या नाहींत. सायकिएट्रीकडे फारसें कोणी लक्ष देत नसल्यामुळें हिंदुस्थानांतील वेड्यांच्या वर्गीकरणाकरितांज पारिभाषिक शब्द वापरतात ते निरुपयोगी असतात. हिंदुस्थानांतील वेड्यांची वर्गवारी दर्शविणार्‍या कोष्टकांत खूळ (इंडियसी); नाद (मॅनिआ); उद्विग्नता (मेलंकोलिया); फेंपरें = वेड वेडाचे इतर प्रकार; विचारशक्तिहीनता हीं सदरें असतात. बहुतेक वेडे उद्विगता (मेलंकोलिया) आणि नाद (मॅनिआ) या सदरांत पडतात.

 हिंदुस्थानांतील वेड्यांचीं इस्पितळें व वेड्यांची संख्या

प्रांत इस्पितळांची संख्या दाखल झालेल्या वेड्यांची संख्या वेड्यांची एकंदर संख्या बरे होऊन बाहेर पाठविलेले मेलेले दररोजचें सरासरी प्रमाण दररोजचें आजारी पणाचें प्रमाण गुन्हेगार वेडे 

आरोग्याच्या बाबतींत स्त्रियांची कामगिरीः- रुग्णालयांत व दवाखान्यांत रोग्यांच्या सुश्रूषेसाठीं स्त्रिया असल्यास फार उपयोग होतो हें आतां सर्वाच्या अनुभवास आलेंच आहे. तेव्हां वैद्यकींत स्त्रियांचा शिरकाव करण्याकरितां ज्या संस्थांचा प्रयत्‍न चालला आहे त्यांची माहिती पुढें दिली आहे-

हिंदुस्थानांतील वैद्यकीय स्त्रीनोकर (वुइमेन्स मेडिकल सर्व्हिस)- कौटेस डफरिन फंड नावाची एक संस्था असून त्याची व्यवस्था एक एक्झीक्यूटिव्ह कमिटी व एक कौन्सिल यांच्याकडे असते. या फंडाला हिंदुस्थानसरकार दरसाल २५००० पौंड मदत देतें. वैद्यकीय स्त्रीनोकर नेमण्याचें काम या संस्थेमार्फत होतें. या नोकरींत हल्लीं ४४ फर्स्टक्लास स्त्रीवैद्य आणि आठ हिंदुस्थानांतील युनिव्हर्सिटीच्या मेडिकल स्त्री ग्रॅज्युएट नेमल्या जातात. त्यांची निवड हिंदुस्थानांत वरील संस्थेच्या कौन्सिलची मेडिकल सबकमिटी करते व इंग्लंडमध्यें निराळी सबकमिटी करते. या सबकमिट्या शारीरिक लायकीचा (फिजिकल फिटनेस) दाखला देण्याचें काम करतात. नोकरीला लायकीच्या अटी (१) ब्रिटिश किंवा संस्थानी प्रजा, (२) वय २४ ते ३० च्या दरम्यान, (३) फर्स्टक्लास मेडिकल ग्रॅज्युएट, (४) आरोग्य व आचरणाविषयक सर्टिफिकेट या आहेत. पगार नोकरीच्या मुदतीच्या मानानें दरमहा रु. ४५० पासून ८५० पर्यंत असतो. शिवाय नोकरीच्या कामांत व्यत्यय येत नसेल तर खाजगी धंदा करण्यास मोकळीक असते.

लेडी हार्डिज मेडिकल कॉलेजः- हें कॉलेज व हॉस्पिटल व नर्सेस आणि कांपौंडर तयार करण्याकरितां ट्रेनिंग स्कूल हीं १९११ मध्यें ब्रिटिश बादशहांनीं हिंदुस्थानला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ काढण्यांत आलीं. इमारतीच्या पायाचा दगड लेडी हार्डिज यांनीं १९१४ सालीं बसविला व पुढें लवकरच त्यांनां मृत्यू आल्यामुळें ही संस्था त्यांच्या स्मारकार्थ त्यांच्या नांवानें चालण्याचें ठरलें. कॉलेज १९१५ सालीं व हास्पिटल १९१७ सालीं सुरू झालें. कॉलेजची व्यवस्था पाहणारी एक गव्हर्निंग बॉडी असून तिचा अध्यक्ष इंडियन मेडिकल सर्व्हिसचा डायरेक्टर जनरल असतो. या संस्थेचा उद्देश स्त्रियांनां युनिव्हर्सिट्यांच्या मेडिकल डिग्रीचें शिक्षण देण्याचा असून हॉस्पिटलमध्यें रोगी स्त्री ठेवण्याची सोय आहे. नर्सेसकरितां ट्रेनिंगस्कूल असून त्यामध्यें नर्सिंग व मिडवाइफ्री यांचें पूर्ण शिक्षण दिलें जातें; आणि कांपौडरांकरितां ट्रेनिंगस्कूल असून त्यांमध्यें या धंद्यांचे शिक्षण दिलें जातें.

कौंटेस ऑफ डफरिन फंडः- स्त्री रोग्यांनां स्त्री डॉक्टरांकडून औषधोपचार व्हावे या हेतूनें १८८६ मध्यें नॅशनल असोसिएशन स्थापली गेली. तिचा उद्देश स्त्रियांकरितां निराळीं हॉस्पिटलें स्थापणें, अस्तित्वांत असलेल्या हॉस्पिटलांनां स्त्रियांकरितां स्वतंत्र वॉर्ड जोडावें, स्त्रियांना डाक्टरणी, नर्स, मिड- वाईफ होण्याचे शिक्षण द्यावें. या कार्याच्या फंडाला सार्वजनिक देणग्यांचे ६ लक्ष रुपये मिळाले. संस्थेच्या प्रांतिक शाखा निघाल्या. या फंडांतून मुंबई, मद्रास कलकत्ता व दिल्ली येथील मेडिकल स्कूलमध्यें शिकणार्‍या स्त्रियांनां स्कॉलरशिप मिळतात; आणि युनायटेड किंग्डममध्यें अभ्यास करण्याकरितां पोस्ट- ग्रॅज्युएट स्कॉलरशिपहि मिळतात.

१९०३ सालीं व्हिक्टोरिया मेमोरियल स्कॉलरशिप्स फंड उभारण्यांत आला, त्याला ६ लाख रुपये मिळाले. यांतून मिडवाइफ्रीचें शिक्षण देण्याची व्यवस्था प्रत्येक शाखेमार्फत करण्यांत आली आहे. आतांपर्यंत २००० हून अधिक स्त्रिया मिडवाइफ्रीचें शिक्षण घेऊन तयार झाल्या आहेत.

लेडी रीडिंग ऑफ इंडिया फंड- १९२२ सालीं हा फंड जमविण्यांत आला. त्याचा उद्देश पूर्वीच्या फंडांनां जरूर तर मदत आणि इंडियन नर्सिंग असोसिएशन स्थापणें हा आहे. या फंडांतून इंग्लडांत पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंगचें शिक्षण घेण्याकरितां हिंदी नर्सेसनां पाठवितात. शिवाय सिमल्यास हिंदी स्त्रिया व मुलांकरिता हॉस्पिटल आणि दिल्लीस नर्सेस करितां होस्टेल या इमारती बांधण्याकरितां खर्च या फंडांतून झाला आहे.

वरील तिन्ही फंड आणि लेडी चेम्सफर्ड ऑल इंडिया मॅटर्निटी लीग या सर्व संस्था एकत्र करून एक संयुक्त कमिटीच्या ताब्यांत १९२३ सालीं देण्यांत आल्या.

नर्सिंग नर्सिंगचें शिक्षण देणार्‍या संस्था मुंबई, पुणें, मद्रास, कलकत्ता, दिल्ली वगैरे ठिकाणीं आहेत. मुख्य हॉस्पिटलांमध्येंच हें शिक्षण दिलें जातें. हें शिक्षण कार्य चालू करण्याकरितां कलकत्ता, मद्रास, मुंबई, पंजाब वगैरे ठिकाणीं नर्सिंग असोसिएशनन्स स्थापन झाल्या आहेत. मुंबईस या कार्याला १८६० पूर्वीच सुरुवात झाली. सेंट जार्ज हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाळ हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, या मुंबईतील हास्पिटलांची प्रत्येक स्वतंत्र नर्सिंग असोसिएशन असून शिवाय पुणें, कराची, नाशिक, अहमदाबाद, धारवाड, एडन कारवार, माथेरान, अहमदनगर वगैरे ठिकाणीं अशा संस्था स्थापन झाल्या. १९१० मध्यें ह्या सर्व एकत्र होऊन बाम्बे प्रेसिडेन्सी नर्सिंग असोसिएशनं स्थापन झाली. या संस्थेतर्फें परीक्षा घेऊन सर्टिफिकेटें दिली जातात. रिटायरिंग अलावन्स ( काम सोडल्यावर वेतन) मिळावा म्हणून प्रॉव्हिडंड फंडच्या पद्धतीवर योजना करण्यांत आली आहे. युद्ध, रोगाची सांथ, वगैरे प्रसंगी जादा संख्या उभारतां यावी म्हणून राखीव नर्सेसची योजना (नर्सिंग रिझर्व) करण्यांत आली आहे.

उत्तर हिंदुस्थानांतील अनेक नर्सिंग असोसिएशन्स एकत्र करून १९०६ साली लेडी मिंटो इंडियन नर्सिंग असोसिएशन सुरू करण्यांत आली. हिंदुस्थानांतील नर्सिंग सुपरिटेंड्सची असोसिएशन (स्थापना १९०६) असून ती हल्ली हिंदुस्थानच्या ट्रेंट नर्सेस असोसिएशनला (स्थापना १९०८) जोडण्यांत आली. या संयुक्त संस्थेचें काम नर्सिंग शिक्षण देणें हें नसून या धंद्यांत पडलेल्या स्त्रियांची परस्पर ओळख करून या धंद्याचा दर्जा व लौकिक वाढविणें आहे, हें आहे.

देशाचें आरोग्य सुधारण्यास लोकांचीं मनें या बाबतींत प्रथम तयार झालीं पाहिजेत. इकडे सामाजिक व धार्मिक कल्पनामुळें आरोग्याच्या प्रश्नांनां वाव मिळत नाहीं. कारण हे प्रश्न रूढी व धर्म यांच्या विरुद्ध गोष्टी करावयास सांगतात. याखेरीज लोकांची अवाढव्य संख्या, दारिद्य्र व विरक्त मन:स्थिति यांमुळें आरोग्याच्या बाबतींत सुधारणा होणें फारच दुर्घट होऊन बसतें. तथापि शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार अधिकाधिक होत गेल्यास आशेला मोठीच जागा आहे.

सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी, सेवासदन यांच्या सारख्या समाजसुधारक संस्था देशांत आरोग्य वाढविण्यास फारच उयोगी पडतात असा अनुभव आलेला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षात शहरांतून बर्‍याच इष्ट सुधारणा घडून आलेल्या आहेत पण ९/१० जनता खेड्यांतून राहत असल्यानें खेड्यांत प्रथम आरोग्य नेलें पाहिजे. खेड्यांतील शिक्षकांनां सामान्य वैद्यकीय उपायांची माहिती करून देण्याची योजना मुंबई सरकानें केलेली आहे. तसेंच खाजगी डॉक्टरांनां कांहीं सरकारी मदत देऊन ज्या भागांत वैद्य- डॉक्टर नसतील तेथें त्यांस स्थायिक होण्यास उत्तेजन देत आहे. मद्रास सरकारनेंहि अशीच एक योजना केलेली आहे. आरोग्यविषयक सिनेमा चित्रपट खेड्यांतून दाखविण्याबद्दल सहकारी संस्थांचा प्रयत्‍न चालू आहेच. अँटि- मलेरिया संस्थाहि स्थापन झाल्या असून त्यांचें विशेष यश बंगाल्यांत दृष्टीस पडतें.

हिंदुस्थानच्या आरोग्यविषयक प्रश्नाला चालना देण्यासाठीं वैद्यकीय संशोधनाची फार जरूरी आहे. या बाबतींतहि पैशाची टंचाई आडवी येत आहे. इंडियन रिसर्च फंड असोसिएशनचा प्रयत्‍न हिंदुस्थानांत उद्‍भवणार्‍या साथीसंबंधी विशेष शोध व उपाय करण्याचा असतो. याकरितां वैद्यकीय संशोधकांच्या परिषदा भरत असतात. राष्ट्रसंघाच्या आरोग्यकमिटींत ठरल्याप्रमाणें हिंदुस्थानसरकार सिंगापूर येथें एपिडेमिऑलॉजिकल इंटेलिजिन्स ब्यूरो काढीत आहे. कलकत्त्यास स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजिन या संस्थेचें उष्णकटिसंघांतील मुख्य रोगांचें संशोधन करण्याचें कार्य बरें चाललें आहे. इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन्स या संस्थेचें सातवें अधिवेशन नुकतेंच कलकत्त्यास भरलें होत. सार्वजनिक आरोग्यविषयक कारभाराची सुव्यवस्था लावण्यास असल्या संस्थांची फार जरूरी असते.