प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ४ थें
लोकसमाज

हिंदुस्थानी वाङ्‌मय, हिंदी वाङ्‌मयाचें सिंहावलोकन - बाराव्या शतकापासून मुसुलमानांचा हिंदुस्थानावर अधिकाधिक अंमल बसूं लागला असतां हिंदूंचीं राज्यें भराभर बुडूं लागलीं व जीं कांहीं थोडींबहुत जीव धरून राहिलीं होतीं त्यांमध्यें रजपूत घराण्यांचा प्रामुख्यानें निर्देश केला पाहिजे. त्यांनीं मुसुलमान राज्यकर्त्यांनांहि आपलें जाचक अस्तित्व सिद्ध करून दाखवून त्यांनां आपल्याशीं नाखुषीनें कां होईना पण स्नेहभाव पाडण्यास भाग पाडिलें होतें. याच काळांत हिंदुस्थानांतील अर्वाचीन भाषांनां कांहीं आकार येऊं पहात होता; व हिंदुस्थानी वाङ्‌मयाचा भाट किंवा शाहिरी काव्य म्हणून उदय होत होता. त्या धामधुमीच्या काळांत राजभाटांनां काव्यस्फूर्तीला बरेच चांगले विषय होते व उदार अंतःकरणाच्या राजामहाराजंकडून त्यांच्या श्रमाचें व प्रतिभेचें उत्कृष्ट चीजहि होई. त्यांच्या त्यावेळच्या उत्कृष्ट सफाईदार व राजस्तुतिपर पोवाड्यांतून हिंदुमुसुलमानांमधील विलक्षण तेढ व तत्कालीन परिस्थितींतील अनुरूप वीरांचे शौर्यदाक्षिण्यादि गुण एकदम श्रोत्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहतात. अशा भाटांचा नायक व त्या काळच्या हिंदी वाङ्‌मयाचा अलंकार म्हणजे पृथ्वीराजाच्या पदरचा चंदभाट होय. चंदाचा समकालीन जगनायक व १४ व्या शतकांतील शारंगधर हेहि प्रसिद्ध हिंदी भाट कवी होते.

या शाहिरी वाङ्‌मयानंतर १५ व्या शतकाच्या आरंभी रामोपासनावाङ्‌मय आलें व त्यानें सर्व देशी वाङ्‌मयांनां बरीच चालना दिली. याच रामवाङ्‌मयाला कबीरानें निरीश्वरी भक्तीचें वळण दिलें. या काळापासून वाङ्‌मयावर निरनिराळ्या धार्मिक मतांचा पगडा बसूं लागून निरनिराळें संप्रदायी वाङ्‌मय तयार होऊं लागलें. नामदेव, कबीर, विद्यापति, मिराबाई आणि मलिक महमद हे या काळांतील मोठे कवी होत. पहिल्या काळांतील शाहिरी वाङ्‌मयभाषेपेक्षां या दुसर्‍या काळांतील भाषा आज लोकांना जास्त समजण्यासारखी आहे. या दुसर्‍या कालास हिंदी वाङ्‌मयाचें तारुण्ययुग म्हणतां येईल.

हिंदी वाह्मयाच्या सुवर्णयुगाला सुमारें १५५० पासून सुरुवात होते. अकबर, जहांगीर यांनीं केवळ राज्याचा विस्तार करूनच सुराज्य स्थापिलें असे नव्हें तर त्यांनीं देशी वाङ्‌मयांनांहि चांगलें उत्तेजन दिलें. हिंदी वाङ्‌मयाचा सुवर्णकाल यांच्या अमदानींतला असून तो आंग्ल वाङ्‌मयांतील एलिझाबेथ सुवर्णकालाशीं जुळतो. या काळांत हिंदी वाङ्‌मयाचें कला म्हणून संवर्धन होऊं लागलें व त्याची ठाकठिकी करून ते सुंदर व कलायुक्त करण्याकडे लेखकांची प्रवृत्ति असे. केशवदासादींनीं काव्यकलेला व्यवस्थित स्वरूप देण्याचा प्रथमच प्रयत्‍न केलेला आढळतो. तुलसीदास, सूरदास, बिहारीलाल, त्रिपाठीबंधू, देवकवि व सेनापति ही हिंदी वाङ्‌मयाच्या या युगांतील रत्‍नें होत. मोंगल सत्तेच्या र्‍हासाबरोबरच या वाङ्‌मयांतील उत्कृष्ट गुणांचा र्‍हास होत जाऊन पहिल्या दर्जाचे ग्रंथकार दुर्मिळ होऊं लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून हिंदी वाङ्‌मयावर यूरोपियन संस्कृतीचा पगडा बसूं लागला. इंग्रजी अंमल हिंदुस्थानांत जिकडे तिकडे होऊन पाश्चात्य वाङ्‌मय संस्कृति-सुधारणा यांचा लोकांच्या मनावर फार परिणाम झाला. देशी वाङ्‌मयाला नवीन चालना मिळाली व नवीन वाङ्‌मययुग सुरू झालें. हें वाङ्‌मयपुनरुज्जीवनाचें युग अद्याप चालू आहे. या युगाच्या आरंभी अर्वाचीन हिंदी गद्याचा पाया लल्लुजीलालनें घातला व त्याकरितां नवीन वाङ्‌मयीन भाषा निर्माण केली. छापखाने सुरू होऊन त्यांनीं वाङ्‌मयाचा सररहा प्रसार चालविला. हरिश्चंद्रानें हिंदी काव्याचा जीर्णोद्धार केला. याच काळांत हिंदी नाट्याचाहि उदय झाला.

हिंदीभाषा, उगमः- यूरोप आणि दक्षिण आणि पश्चिम आशियांतील बराचसा भाग या ठिकाणीं प्रचलित असणार्‍या इंडो-यूरोपियन भाषासमूहाची एक शाखा म्हणजे इंडो-आर्यन् भाषा होय. यूरोप आणि आशिया यांच्या सरहद्दीवरील भूप्रदेशावर राहणारे लोक मूळ भाषा बोलत असत. या लोकांपैकीं आर्यन् नांवाचा एक मोठा वर्ग पूर्व दिशेनें ऑक्ससकडे सरकत सरकत आला; पण पुढें सरकतां सरकतां त्याच्यामध्यें दोन पोटवर्ग पडून त्या दोन वर्गांच्या भाषाहि निरनिराळ्या झाल्या. यापैकीं एका वर्गाच्या भाषेपासून पुढें मेदिक, पहलवी, फारसी, इत्यादि 'इराणी' या सामान्यवाचक नांवानें संबोधिल्या जाणार्‍या भाषा निघाल्या. दुसरा वर्ग काबूलच्या दर्‍याखोर्‍यांतून उत्तरहिंदुस्थानांत आला. या वर्गाला उत्तर हिंदुस्थानामध्यें येण्याला बराच काळ लागला. येथें जे लोक आले त्यांनां इंडो-आर्यन् असें नांव मिळालें. इंडो-आर्यन् भाषा ही प्राचीनकाळापासूनच वाङ्‌मयभाषा बनली व या भाषेस संस्कृत भाषा म्हणूं लागले. ही जी वाङ्‌मयभाषा ती स्थिर झाली परंतु व्यवहारांत बोलली जाणारी जी प्राकृत बाषा ती हळूहळू बदलत चालली. निरनिराळ्या टापूंतील भाषांमध्येंच परस्परांत थोडा फार फरक पडूं लागला. या काळामध्यें प्राकृत भाषेमधील कांही प्रकार (उदाहरणार्थ पाली) हे वाङ्‌मयाच्या योग्य झाले. हल्लींच्या इंडो-आर्यन् भाषांच्या वाढीपूर्वीच्या प्राकृत भाषेच्या शेवटल्या स्थितींत या प्राकृत भाषा अपभ्रंश या नांवानें संबोधिल्या जात असत व या अपभ्रंश भाषांपासूनच पुढें हिंदी, पंजाबी, मराठी या भाषा उदयास आल्या व या उदयास येण्याचा काल स्थूलमानानें (१००० वर्ष) म्हणजे दहावें अगर अकरावें शतक होय.

विस्तारः- यानंतर आपणाला 'हिंदी' या शब्दाचा अर्थ नीटपणें ठरविला पाहिजे. कारण पुष्कळ वेळां याचा अर्थ निरनिराळ्या तर्‍हेनें केला जातो. उदाहरणार्थ, कांहीं वेळां पश्चिमेला पंजाब आणि सिंध, व पूर्वेला बंगाल यामधील टापूला 'हिंदी' हा शब्द उपयोजिला जातो. कांहीं वेळां हिंदी या पदानें विदग्ध हिंदीचा निर्देश केला जातो. या वरील टापूला कोणी हिंदुस्थान असें म्हणतात; सर जॉर्ज ग्रियरसनप्रभृति विद्वानांनीं परिश्रमान्तीं असें ठरविलें आहे कीं या टापूंत, राजस्तानी, पूर्वहिंदी, पश्चिम हिंदी आणि बिहारी या चार प्रमुख भाषा प्रचलित असून त्यांचा उगमहि स्वतंत्र आहे. याठिकाणी खरोखर जेवढ्या टापूला हिंदुस्थान अशी संज्ञा देतां येईल तेवढ्याच भागांतील वाङ्‌मयाच्या इतिहासाचा येथें उल्लेख करण्यांत येणार आहे. गंगायमुनांच्या खोर्‍यापासून तों पूर्वेकडेस कोशी नदीपर्यंत, राजपुताना, मध्यहिंदुस्थान आणि नर्मदेच्या दर्‍यांपासून तों पश्चिमेकडे खांडवा व मध्यप्रांताच्या उत्तरभागापर्यंतचा टापू हिंदुस्थान या नांवांत घेतलेला आहे. जरी पंजाबमध्यें हिंदुस्थानी भाषा बोलतात तरी तो देश अगर खालचा बंगाल यांत समाविष्ट केलेला नाहीं.

या टापूमध्यें अनेक भाषा प्रचलित आहेत. नागरिक लोक बहुधां ऊर्दू भाषा वापरतात. पण सर्वसाधारण लोक अनेक प्रकारच्या हिंदी भाषा वापरतात. यांतील शब्द बहुतेक प्राकृत आणि संस्कृत भाषेपासून आलेले आहेत व ह्या भाषा देवनागरी अगर कैथी लिपीतं लिहिल्या जातात. यांपैकी प्रमुख बाषा म्हणजे मारवाडी, जयपुरी, व्रजभाषा, कनोजी, अवधी, वैखारी आणि बिहारी होत. ज्याला आपण विदग्ध हिंदी म्हणतों ती वाङ्‌मयाच्याच उपयोगी आहे. दिल्लीच्या आसपास व उत्तरेस हिमालयापर्यंत वापरल्या जाणार्‍या भाषेचा पाया असणार्‍या पश्चिम हिंदी भाषेचेंच विदग्ध हिंदी हें विकसन आहे.

इतर प्राचीन वाङ्‌मयाप्रमाणेंच प्राचीन हिंदुस्थानी वाङ्‌मय हें बहुतेक पद्यांतच आहे, व गद्य वाङ्‌मय हें अगदीं अलीकडील आहे. संस्कृत व फारशी भाषांबरोबर स्पर्धा करणार्‍या दोन भाषा म्हणजे अनुक्रमें हिंदी व ऊर्दू या होत. पण या दोहोंमध्यें अंतर हें कीं हिंदी भाषेनें ब्राह्मणांचीच होऊन बसलेल्या संस्कृत भाषेला प्रतिकार करण्याच्या निमित्तानें, आपली उन्नति साधून घेतली तर ऊर्दू भाषेनें आपली आई जी फारसी भाषा तिच्याशीं गोडीगुलाबीनें वागूनच आपला शिरकाव करून घेतला. संस्कृत व फारशी भाषा हल्लीं फक्त लेखनाच्या दृष्टीनें महत्त्वाच्या आहेत. हल्लीं त्यांचा व्यवहारांत कांहीच उपयोग होत नाहीं.

या विषयाचे चार भाग पाडतां येतील ते खालीलप्रमाणें :- (१) वैष्णव आचार्यांनीं अगर राजपुतान्यांतील प्राचीन भाटांनी उपयोगांत आणलेली व प्राकृत भाषांतील शब्दांच्या योगानें बनलेली अशी जुन्या काळची हिंदी भाषा (सन ११००-१५५०) (२) हिंदी काव्याच्या ऐन उत्कर्षाच्या कालची मध्ययुगीन हिंदी (१५५० ते अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत). (३) वाङ्‌मयोपयोगी ऊर्दू भाषेचा उदय व वाढ (सोळाव्या शतकाच्या अखेरपासून तो अठराव्या शतकांतील उत्कर्षकालापर्यंत). व (४) १९ व्या शतकाच्या आरंभापासून दोन्ही भाषांतील गद्य वाङ्‌मयाच्या उत्कर्षाचा अर्वाचीन काल.

प्राचीन हिंदी- राजपुतान्यांतील प्राचीन ऐतिहासिक काव्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाहीं व जी अपूर्ण माहिती उपलब्ध आहे ती टॉडच्या 'राजस्तानच्या गोष्टी' या प्रमाणग्रंथावरून घेतलेली आहे. काव्यांचें स्वरूपच अशा प्रकारचें असतें कीं त्यांत नेहमीं फेरफार होत असतो व भर पत जाते. हीं काव्यें त्या त्या घराण्यांतील भाटांकडून वेळोंवेळीं रचलीं गेलीं असतात. एका गोष्टीभोवतीं कालांतरानें अनेक काल्पनिक गोष्टींचा जमाव जमतो. ह्या सर्व गोष्टींची संगति पुढील एखादा भाट लावण्याचा प्रयत्‍न करतो; ती संगीत व्हावी तितकी खात्रीलायक होत नाहीं. यांत ऐतिहासिक सत्यतेपेक्षां काव्यकल्पनांचीच अधिक रेलचेल असते.

चंद कवि-सर्वांत प्राचीन उपलब्ध हिंदी काव्यग्रंथ पृथ्वीराजाच्या पदरीं असलेल्या चंद भाटाचा होय. या ग्रंथाचें नांव 'पृथ्वीराज रासो' हें असून त्याच्या ६९ सर्गांमध्यें त्यावेळची सर्व हकीकत दिलेली आहे. ह्यापैकीं कांही भाग बंगाल एशियाटिक सोसायटीनें छापलेला आहे. चंद हा लाहोरचा रहाणारा होता. चंद्राच्या वेळीं तेथें मुसलमानी अंमल असल्याकारणानें, त्याच्या काव्यांत फारशी शब्दांचा भरणा बराच दिसून येतो. आज ज्या स्थितींत ग्रंथ उपलब्ध आहे ती स्थिति मूळची नसून १७ व्या शतकाच्या सुरवातीस मेवाडच्या अमरसिंहानें त्यांत बराच फेरफार केलेला आहे. यामुळें त्यांत वर्णन केलेल्या गोष्टींबद्दल संशय वाटतो. कविराज शामळदास यानें म्हटल्याप्रमाणें या ग्रंथांतील प्रत्येक तारखेंत ९० वर्षांची चूक आढळून येते. या ग्रंथांत वारंवार पृथ्वीराज व महंमद घोरी यांच्यामधील युद्धांचीं वर्णनें आलीं असून त्यांत शेवटच्या लढाईखेरीज बाकीं सर्व लढायांत महंमद घोरीचा पराजय होतो, त्याला पकडण्यांत येतें व नंतर खंडणी घेऊन सोडण्यांत येतें असें लिहिलेलें आहे. अर्थात पर्शियन इतिहासकारांच्या माहितीशीं ताडून पाहतां या गोष्टींत ऐतिहासिक सत्यता नाही असें दिसून येतें. कारण वास्तविक महंमद घोरीचा एकदांच पराजय झालेला असून तो न सांपडतांच पळून गेला आहे. मोंगलांनीं हिंदुस्थानांत पाऊल ठेवण्याच्या अगोदर तीस वर्षे त्यांनां हिंदुस्थानांत आणून पृथ्वीराजानें त्यांचा पराजय केला, असें यांत लिहिलेलें आहे. तथापि जरी ऐतिहासिक गोष्टीचा यांत बराच अभाव असला तरी त्याचें काव्य हें शुद्ध, अपभ्रंश, शौरसेनी आणि प्राकृत शब्दांनीं पूर्ण अशा गौडीवाङ्‌मयाचा प्राचीन मासला आहे असें म्हणावयास मुळींच हरकत नाहीं. यांतील भाषा हल्लीं प्रचारांत नसल्यानें अर्थ समजण्यास कठिण वाटतो. पण भाषा फार उमदी व वीररसपूर्ण आहे.

चंद्रसंप्रदाय :- चंद कवि हा त्याच्यानंतर त्याचें अनुकरण करणारी जी लांबच्यालांब कविमालिका झाली तिचा प्रतिनिधि आहे असें म्हणावयास हरकत नाहीं; या कवींनीं केलेलीं अनेक काव्यें फार लोकप्रिय आहेत. त्यापैकीं सर्वात प्रसिद्ध असें काव्य म्हणजे अल्हाखंड होय. हें चंदाचा समकालीन असणारा बुंदेलखंडांतील महोबाचा जग्निक (जगनायक) यानें परमाल राजाच्या कृत्याचें वर्णन करण्यासाठीं लिहिलेलें आहे. या काव्यांतील नायक अल्हा आणि उदल असून त्या पौराणिक व्यक्ती आहेत. काव्याच्या दोन प्रती अशिक्षित भाटांच्या म्हणण्यावरून तयार झालेल्या आहेत. यानंतर तिसरा प्रसिद्ध भाट म्हणजे रतनभोरचा शारगंधर होय. यानें १३६३ मध्यें रतनभोरचा चव्हाणाधिपति हम्मीरदेव याच्या पराक्रमाच्या वर्णनपर काव्य केलें आहे. त्यानें संस्कृतमध्येंहि 'शार्गंधरपद्धति' नांवाचा काव्यग्रंथ लिहिला आहे. यानंतर लालकवि ह्यानें 'छत्रप्रकाश' हा ग्रथ लिहिला. यांत बुंदेलखंडाचा इतिहास असून याचें १८२८ मध्यें पॉग्सननें केलेलें भाषांतर कलकत्ता येथें छापलेलें आहे.

प्राचीन हिंदी भाषेच्या महत्त्वाच्या अंगाकडे वळण्यापूर्वी आणखी एका महत्त्वाच्या ग्रंथाचा उल्लेख करणें जरूर आहे. व तो म्हणजे 'पद्यावली' ग्रंथ होय. हा ग्रंथ एखाद्या हिंदु भाटानें लिहिलेला नसून अयोध्येचा मलीक महंमद जायसी नांवाच्या मुसलमान साधूनें स. १५४० त लिहिला आहे. या साधूचा व अमेथीचा हिंदु राजा याचा फार स्नेह होता. हा ग्रंथ १८४० सालीं प्रसिद्ध झाला. काव्य अवधी भाषेंत असून फारशी लिपींत लिहिलें आहे. यामध्यें मेवाडमधील चितोडच्या रतनसेन चव्हाण राजाची सुप्रसिद्ध बायको पद्मिनी हिची गोष्ट दिलेली आहे. इतिहासांत पद्मिनीचा नवरा भीमदेव असून मलिकमहंमद यानें त्याला रतनदेव असें नांव दिलें आहे. याबद्दलची सर्व हकीकत सुप्रसिद्धच आहे. पण मलिकमंहमदानें ही गोष्ट रुपक म्हणून सांगितली असून त्यांतील पात्रांच्या मागें, आत्मा (रतनसेन), बुद्धि (पद्मिनी), माया (अल्लाउद्दीन) इत्यादिकांचें अधिष्ठान आहे असें म्हटलें आहे. हा ग्रंथ फार महत्त्वाचा असून त्याचें भाषांतर संस्कृतमध्येंहि झालेलें आहे. या ग्रंथाची भाष्य व टीपा यांसहित प्रत डॉ. ग्रियरसन व पंडित सुधाकर द्विवेदी यांनीं तयार केली असून त्याचें भाषांतरहि बिब्ली. इंडिकांत प्रसिद्ध केलें आहे. (न्यू सीरिज, नं. ८७७, पु. १.१५, १६).

वर महत्त्वाचें अंग म्हणून ज्याचा नुकताच उल्लेख केला तें अंग म्हणजे भागवत (भक्तियुक्त) वाङ्‌मय हें होय. या वाङ्‌मयानें केलेल्या भक्तिमार्गाच्या प्रसाराबद्दल फार प्रसिद्धि आहे. याचा त्या काळावर व भाषेवर फार मोठा परिणाम घडून आला यांत शंका नाहीं. वाङ्‌मयदृष्ट्या देखील याचें स्वरूप व विषय फार महत्त्वाचा आहे. यानंतर झालेल्या सर्व हिंदी वाङ्‌मयावर या वैष्णव तत्त्वांपैकी कोणत्या तरी तत्त्वाचें प्रतिबिंब उमटलेलें दिसून येतें. हें वैष्णवतत्त्व अगर भक्तिमार्ग हा मूळ ब्राह्मणांच्या सत्तेचा मोड करण्यासाठींच अस्तित्वांत आला होता. या वैष्णव ग्रंथकारांपैकी पुष्कळ ग्रंथकार ब्राह्मणेतर व हीन जातीचे देखील होते. वैष्णव वाङ्‌मय मुख्यतः हिंदी भाषेमध्येंच आहे.

ह्या वैष्णव तत्त्वाचा उगम रामानुजापासून झाला असें मानण्यांत येतें. रामानुज ११ व्या शतकाच्या अखेरीस उदयास आला. त्यानें वेदांतसूत्रावर व इतर विषयांवर लिहिलेले ग्रंथ संस्कृतमध्यें असून, त्या ग्रंथांत मुख्य तत्त्व असें आहे कीं, परमेश्वर हा सगुण व सर्व चांगल्या गुणांची मूर्ति आहे व त्याची भक्ति केली असतां कितीहि पापी मनुष्य असला तरी तो उद्धरून जातो. परमेश्वर अत्यंत दयामय असल्यामुळें तो नेहमीं अवतार धारण करीत असतो; व या अवतारांत देखील राम व कृष्ण हे अवतार अतिशय महत्त्वाचे असून त्याचें आपण पूजन केलें पाहिजे. विशेषतः रामानुजानें समभक्तीचें महत्त्व फार वाढविले. रामानुजाचे भक्त बहुतेक सर्व ब्राह्मणच होते.

रामानुजानें जरी रामभक्तीचें महत्त्व वाढविलें तरी तो कृष्णाचीहि उपासना करीत असे. व या कृष्णाबरोबरच रुक्मिणीला तो आदिशक्ति मानीत असे. परंतु त्याच्या नंतरचे ग्रंथकार राधेला फार मान देतात. हे राधा-कृष्ण भक्तीचे प्रकार विशेषतः रामानुजानंतर अधिक उदयास आले. पण जयदेवाच्या वेळेपासून (१२५०) 'कृष्ण व राधा' हा विषय पूर्ण रीतीनें प्रस्थापित झाला होता व यामध्यें 'जीवाची ब्रह्म होण्याची धडपड' हें तत्त्व प्रमुख आहे असें सांगितलें जात होतें व त्यामुळें वरील राम व कृष्ण या दोन प्रकारांत अधिकाधिकच भिन्नता होऊं लागली होती.

रामचरित्राची शिकवण कौटुंबिक पद्धतीवर उभारलेली असून परमेश्वराचा व भक्ताचा संबंध हा पितापुत्रसंबंध आहे असें त्यांत दर्शविलें आहे. कृष्णावतारांत भूतदयेचा भाग पार कमी दिसत असून थिल्लरपणा व कामुकता फार आहे. त्यांतील भक्तीहि जवळजवळ विषयविकारापर्यंत पोहोंचते. या भक्तितत्त्वाचें पुरस्कर्ते फार शुद्ध व अलौकिक पुरुष होते; पण पुढें या तत्त्वाचा फार दुरुपयोग केला गेला असें आढळून येईल.

कृष्णाचीं बालपणांतील कृत्यें, विशेषतः बायकांनां फार प्रिय असल्यामुळें कृष्ण ज्या ठिकाणीं बालपणीं राहिला तेथें म्हणजे व्रचांच्या राजधानीच्या-मथुरेच्या आसपास कृष्णभक्ति फार प्रचलित आहे; व त्यांतील वाङ्‌मय व्रजभाषेमध्यें आहे. रामवाङ्‌मय जरी सर्वत्र प्रचलित असलें तरी तुलसीदासानंतर अवधी अगर बैश्वरी भाषेमध्यें तें फार प्रसृत झालें. अशा रीतीनें या दोन भाषा, काव्यभाषा होऊन बसल्या.

रामानुजानंतर १२५० च्या सुमारास, बंगालमधील बीरभूम तालुक्यांत झालेल्या 'गीतगोविंद' (कर्त्यानें जय-देवानें) व महाराष्ट्रांतील नामा शिंप्यानें याचा प्रसार केला. यांच्या कविता शिखांच्या आदिग्रंथांतहि घेतलेल्या आहेत पण १५ व्या शतकामध्यें रामानंद नांवाच्या रामानुजपंथी साधूनें, कांही भांडण झाल्यामुळें, उत्तर हिंदुस्थानांत येऊन वैष्णव तत्त्वाचा ब्राह्मणेतर वर्गांत खरा प्रसार केला. त्याच्या बारा शिष्यांमध्यें एक रजपूत, एक जाट, एक चांभार, एक न्हावी, व एक मुसुलमान होता. मुसुलमान शिष्य म्हणजे कबीर हा होय. रामानंदानें केलेली एक छोटी कविता आदिग्रंथामध्यें आढळून येते. डॉ. ग्रियरसननें मिथिलेंत प्रचलित असलेलीं त्याचीं अनेक भजनें गोळा केलीं आहेत. रामानंद व कबीर हे दोघेहि रामोपासक होते. रामानंदाचा समकालीन कवि विद्यापति ठाकूर यानें बिहारमधील मिथिली भाषेंत अनेक वीणाकाव्यें केलीं असून, कृष्णभक्तीचा प्रसार केल्याबद्दल त्याची फार प्रसिद्धि आहे. या विद्यापतीलाच, सर्व बंगाली वैष्णव वाङ्‌मयाचा जनक मानतात. पण या वैष्णव तत्त्वाचा चैतन्यानें फार प्रसार केला व त्यानंतर मिराबाईनें केला. मिराबाईचीं अनेक पद्ये उत्तरहिंदस्थानांत फार प्रसिद्ध आहेत. प्राचीन वैष्णव भक्तांची काव्यें शिखांच्या आदिग्रंथांत आढळून येतात. पण हा ग्रंथ गुरुमुखी भाषेंत असल्यामुळें त्याचा आपणांस सध्या विचार कर्तव्य नाहीं.

मध्ययुगीन हिंदी— मध्ययुगीन हिंदी वाङ्‌मयाचा आरंभ अकबराच्या कारकीर्दीपासून होतो. अकबराचें सर्व बाबतींतील धोरण उदार असल्यामुळें व त्याच्या अमदानींत हिंदुस्थानांत शांतता असल्यामुळें, वाङ्‌मयाचा बराच उत्कर्ष झाल्यास नवल नाहीं. अकबराच्या दरबारी कविमंडळच होते. प्रख्यात गवई तानसेन, याच्या कविता अद्यापि लोक म्हणतात. अकबराचा प्रधान बिरबल हा गवई, कवि आणि राजकारणी पुरुष होता; व त्याला कविराज ही पदवी मिळाली होती. त्याची फुटकळ कविता व गाणीं फार लोकप्रिय आहेत. यांशिवाय दुसरे कवी म्हणजे, खानखानान, अबुदररहिम, आणि फैजी हे होत.

यावेळीं वल्लभाचार्यानें राधावल्लभ (कृष्ण) भक्ति या पंथाची स्थापना केली होती. वल्लभाचें लेखन मुख्यतः संस्कृतमध्यें चालत असे. पण त्याच्या व त्याचा मुलगा विठ्ठलनाथ याच्या शिष्यसमुदायांत पुष्कळ जाडे हिंदी कवी होऊन गेले. वल्लभाचार्याचे चार व विठ्ठलनाथाचे चार शिष्य मिळून आठ कवी १५५०-७० च्या दरम्यान उदयास आले व ते 'अष्टछाप' या नांवनें प्रसिद्ध आहेत. त्यांचा व्रजभाषेवर मोठा अधिकार दिसून येतो. यांचीं नांवें कृष्णदास पे अहारी, सूरदार, परमानंददास, कुभानदास, चतुर्भुजदास, चित्रस्वामी, नंददास आणि गोविंददास होत. यांत सूरदास हा फार प्रसिद्ध होता. सूरदास हा चंदघराण्यांतील होता. तो आंधळा असून महा कृष्णभक्त होता. त्याचीं भजनें एकत्र केलीं असून त्यांनां सूरसागर असें नांव आहे, व यांत ६००० गाणीं आहेत. व्रजभाषेंतील भक्तिकाव्यांची ही परमकोटी आहे असें मानण्यांत येतें. याशिवाय सूरदासानें भागवतपुराणाचें पद्यात्मक काव्य हिंदीमध्यें केलेले आहे; व नलदमयन्ती काव्यहि केलें आहे.

पण तुलसीदास म्हणजे मध्ययुगाचा अलंकार आहे. यानें व सूरदासानें काव्यांच्या सर्व अंगांत कौशल्य दाखविलें आहे. हें वाङ्‌मयोत्कर्षाचें युग एलिझाबेझ कालीं असावें हें साधर्म्य आश्चर्यकारक नव्हे कां ?

या दोन कविश्रेष्ठानंतर तत्त्वज्ञान व साहित्यशास्त्रावर बरेंच वाङ्‌मय तयार झालें. काव्य कसें असावें, कोणत्या काव्यांत कोणता रस असावा वगैरेबद्दल नियम ठरूं लागले. या ग्रंथकारांपैकीं केशवदास ब्राह्मण हा प्रसिद्ध होता. हा अकबराच्या कारकीर्दीच्या शेवटीं उदयास आला. याचे ग्रंथ रसिकप्रिया, कविप्रिया, (ओरछाची प्रसिद्ध वेश्या परबीनराय पातुरि हिला अर्पण केलेली) रामचंद्रिका, विग्यानगीता, हे होत. साहित्यशास्त्राचा नमुनेदार, व अप्रतिम मासला बिहारीलालाच्या 'सत्-सई' या काव्यांत पहावयास सांपडतो.

राम आणि कृष्णविषयक भक्तिवाङ्‌मयाबरोबरच संतचरित्रविषयक वाङ्‌मयहि अस्तित्त्वांत येऊं लागलें. यामध्यें सर्वात प्रसिदध वाङ्‌मय म्हणजे नारायणदासाची भक्त माला ही होय. नारायणदासालाच नाभाजी असें म्हणतात. हा दक्षिणेंत राहाणारा डोंब होता. यानें तुळसीदासाला पाहिलें होतें. व हा स्वतः १७१० मध्यें उदयास आला. छप्पाई छंदांत त्याचें १०८ श्लोकी काव्य आहे; व प्रत्येक पद्यांत एका संताचें चरित्र आहे. याची भाषा कठीण आहे. हे कांव्य बहुतेक १५८५-१६२३ मध्यें लिहिलें गेलें असावें. त्याच्यावर टीकात्मक काव्य, प्रियदासानें १७१३ मध्यें लिहिलेलें आहे. याच्यांत भर घालून लछमन नांवाच्या एका अर्वाचीन साधूनें भक्तसिंधु नांवाचा टीकाग्रंथ लिहिला. यावरून आपणाला संतांची माहिती मुख्यत्त्वेंकरून मिळते. या भक्तमालेच्या अगोदरचा 'चौरासी वार्ता' नांवाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांत फक्त वल्लभाचार्यांच्या अनुयायांचीं चरित्रें दिलीं आहेत. हा ग्रंथ १५५१ सालीं वल्लभाचार्यांचा नातु गोकुलनाथ यानें लिहिला असें म्हणतात.

अकबराच्या कारकीर्दीपासून शहाजहानच्या कारकीर्दीपर्यंतच्या अवधींत जे अनेक ग्रंथकार होऊन गेले त्यांची नांवनिशी देणें कंटाळवाणें काम होईल. यांपैकीं कोणीहि सूरदार, बिहारीलाल अगर तुळसीदास यांच्या योग्यतेचे झाले नाहींत. त्यांच्या ग्रंथांत नाविन्य आढळून येत नाहीं. ग्रंथांची व ग्रंथकारांची यादी १८८९ सालच्या जर्नल ऑफ धी रॉयल एशियाटिक सोसायटीमध्यें छापलेली आहे. छत्रसाल व बांदाचे राजे हे कवीचें आश्रयदाते होते; व मोंगल लोक देखील अनेक कवी आपल्या दरबारीं ठेवीत असत.

अशा रीतीनें थोडक्यांत हिंदी वाङ्‌मयाची माहिती देतां येईल. लोकप्रियतेच्या व धर्माच्या पायावर हें वाङ्‌मय उभारलें आहे. हें पद्यमय आहे. यामध्ये निरनिराळे भाषावैचित्र्याचे मासले दिसून येतात व विविध मनोभावनांचेहि प्रतिबिंब नजरेस येतें. याचा अभ्यास अधिक व्हावयास पाहिजे. ज्या थोड्या लोकांनीं या हिंदी वाङ्‌मयाचा अभ्यास केला आहे ते सर्व याला नंदनवनाची उपमा देतात. हें वाङ्‌मय अगदीं अज्ञान जातींत सुद्धां पसरलेलें आहे. रजपूत शौर्याच्या स्तुतिपर पोवाडे, कबीराचे दोहरे, तुलशीदासाचें रामायण, सूरदासाचीं भजनें हीं यात्रेकरू भक्तांमार्फत जिकडे तिकडे पसरलीं गेलीं व जात आहेत.

ऊर्दू वाङ्‌मय :ं- ऊर्दू वाङ्‌मय भाषा केव्हां अस्तित्वांत आली हें अनिश्चित आहे. १३९८ सालीं तैमूरच्या स्वारीमुळें ही भाषा हिंदुस्थानांत आली असें एक मत आहे. कांहींच्या मतें याच्यापूर्वी ही भाषा इकडे आली असावी. ११ व्या शतकाच्या अखेरीस मसूद यानें रेख्ता वृत्तांमध्यें दिवाण अथवा कवितासंग्रह प्रसिद्ध केला होता व १३ व्या शतकाच्या पूर्वार्धात अमीर खुश्रु व सिराजच्या सादीनें कांही कविता केल्या होत्या. असे या विधानास आधार देतां येतील. परंतु हीं कारणें बरोबर नाहींत. मुसुलमानांच्या प्राचीन अंमलांत महंमदी ग्रंथकारांनीं हिंदी भाषेचाच उपयोग केला. हिंदी भाषेंत फारसी शब्दांचा भरणा दिसून येतो. व तो चंद व कबीर यांच्या काव्यांतहि दिसून येतो अशा रीतीनें या ऊर्दू भाषेचें वाङ्‌मयदृष्ट्या मूल शोधून काढणें थोडें कठिण आहे.

भाषाशास्त्राच्या दृष्टीनें ऊर्दू भाषेमध्यें व हिंदी भाषेमध्यें नुसत्या प्रकारांत भिन्नता आहे. व्याकरण व पुष्कळसा शब्दसमूह सारखाच आहे. पण मुख्य भेद छंदांत दिसून येतो. कोणतेंहि एक हिंदी वृत्त ऊर्दु वृत्ताशीं जुळत नाहीं. हिंदी वृत्तांत मात्रापद्धति अनुसरली जाते पण ऊर्दूत र्‍हस्व व दीर्घ अक्षरावरून वृत्त बनतें.

तर मग हा प्रश्न असा आहे कीं, हिंदी वाङ्‌मय ऊर्दू वृत्तांतून केव्हां लिहिलें जाऊं लागलें? कारण ज्यावेळेस ऊर्दू वृत्तें प्रचारांत आलीं त्यावेळींच ऊर्दू काव्याला आरंभ झाला. अशा रीतीनें ऊर्दू वृत्तांत लिहिण्याची पद्धत १६ व्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सुरू झाली असावी. एवढ्या अवधींत हिंदी भाषेंत पुष्कळसे ऊर्दू शब्द व म्हणी आलेल्या होत्या. अकबरानें संस्कृत ग्रंथांचे फारसींत भाषांतर करण्यास उत्तेजन दिल्यामुळें ह्या दोन्ही वाङ्‌मयांचा संपर्क होऊं लागला. मुसुलमानांच्या राजधानीच्या आसपासच्या हिंदी भाषेवर फारसी भाषेचा परिणाम होऊं लागला आणि अकबराच्या दक्षिणेकडील विजयामुळें तिकडेहि मुसुलमानी राज्यें स्थापलीं जाऊंन तेथील दरबारी भाषा फारशीच होऊं लागली.

ऊर्दू वाङ्‌मयाला उत्तेजन, मुसुलमानांच्या राजधानींतून मिळालें. हें वाङ्‌मय इराणांतील काव्यवाङ्‌मयाचें अनुकरण होतें. कासिडा अथवा स्तोत्र (ओड), गझल अथवा प्रणयगीत, मार्सिया अथवा शोकगीत, मसनवी अथवा ऐतिहासिक काव्य, हिजा अथवा औपरोधिक काव्य, रुबाई अथवा निंदाकाव्य, हे सर्व प्रकार इराणांतूनच घेतले. इराणी लोकांनीं, तेच तेच विषय पुनःपुन्हां घेतल्यामुळें त्यांच्या काव्यांत विषयवैचित्र्य दिसून येत नाहीं. यामुळें जातिवैचित्र्य, शब्दवैचित्र्य, भाषावैचित्र्य यांच्यावर काव्याची योग्यता ठरूं लागली. ऊर्दूची तशीच स्थिति झाली. अर्वाचीन ऊर्दू वाङ्‌मयांतच थोडें थोडें नावीन्य दिसून येतें. पण पूर्वीच्या ऊर्दू वाङ्‌मयांत प्रास, यमक, कल्पना याशिवाय दुसरें कांहीच दिसून येत नाहीं. कांहीं विद्वानांनीं ऊर्दू वाङ्‌मयाचे वर्ग पाडले आहेत पण ऊर्दू वाङ्‌मयांत वर्ग पाडण्याइतकें विषयवैचित्र्य दिसून येत नाहीं.

अमीर खुश्रू नंतरचा कवि म्हणजे शुजाउद्दिन न्यूरी हा होय. हा गुजराथचा राहणारा होता. गोवळकोंड्याचा सुलतान अबुलहसन कुतुबशहा याच्या मुलाचा हा गुरू होता. कुलीकुतुबशहा व त्याच्यानंतर गादीवर बसणारा अबदुल्ला कुतुबशहा यांनीं प्रणयकाव्यें, शोकगीतें इत्यादि बर्‍याच कविता केलेल्या आहेत. तसेंच अबदुल्ला कुतुबशहाच्या कारकीर्दीत इब्न निशाती यानें 'तुतीनाम' व 'फुलबन' नांवाचे दोन प्रसिद्ध काव्यग्रंथ लिहिले आहेत. यानें पहिलें काव्य १६३९ मध्यें लिहिलें. हें इराणी कवि नक्षाबी याच्या काव्याचें रूपांतर असून त्यांत शुकसप्‍तति नावांच्या संस्कृत काव्यांतून बराचसा भाग उचलला आहे. या 'तुतीनाम' काव्यावरून त्याच्यांतील भाग घेऊन अनेक काव्यें झालेलीं आहेत. महमद हैदर बक्ष हैदरीनें १८०१ साली जो 'तोता कहानी' म्हणून एक उत्कृष्ट ग्रंथ लिहिला तो याच्यावरूनच होय. फुलबन हें पर्शियन 'बसातीन' या काव्याचें भाषांतर आहे. आणखी एक प्रसिद्ध काव्य याच वेळीं लिहिलें गेलें, तें म्हणजे तहसिनुद्दिनचें 'कामरूप आणि कला' हें होय. याचा लेखक मुसलमान असून यांतील पात्रें हिंदी आहेत हें यांत विशेष होय. कामरूप हा अयोध्येच्या राजाचा मुलगा आहे व कला ही सिलोनच्या राजाची मुलगी आहे. या काव्यांतील संविधानक 'एक हजार एक रात्री' (अरेबियन नाइट) यामधील संविधानकाप्रमाणेंच आहे. अनेक धाडसानंतर शेवटीं नायक-नायिकेचें लग्न होतें.

विजापुरचा दरबारदेखील कवींबद्दल प्रसिद्ध होता. इब्राहीम आदिलशहानें (१५७९-१६२६) संगीतावर 'नवर' या नांवाचा काव्यग्रंथ हिंदीत लिहिला व या ग्रंथाच्या तीन प्रस्तावना मौला झुहूरीनें ऊर्दूंत भाषांतरिल्या असून त्या भाषेबद्दल फार प्रसिद्ध आहेत. यानंतर अल्ली आदिलशहाच्या पदरीं नस्रती नांवाच्या एका ब्राह्मणानें 'गुलशन् इ-इष्क' नांवाचें एक अद्‍भुत काव्य लिहिलें. यानेंच 'अलिनामा' नांवाचें त्या वेळच्या बादशहाच्या स्तुतिपर असें मोठें ऐतिहासिक काव्य लिहिलें.

या वरील कवींनीं ही काव्याची चळवळ सुरू केली. पण काव्याला निश्चित स्वरूप देण्याचें काम औरंगाबादचा वली व त्याचा समकालीन आणि त्याच गांवांत रहाणारा सिराज यांनीं केलें. वलीला 'बाबा-इ-रेख्ता' म्हणजे रेख्ताचा जनक असें म्हणतात व त्याच्याच प्रयत्‍नामुळें व उत्तेजनामुळें १८ व्या शतकांतील ऊर्दू वाङ्‌मयाची वाढ झाली याबद्दल सर्वाचें ऐकमत्य आहे. याचें चरित्र फारसें उपलब्ध नाहीं. औरंगझेबाच्या कारकीर्दीच्या शेवटीं हा दिल्लीस गेला असावा असें दिसतें व शहागुलशानपासून त्याला काव्याचें ज्ञान मिळालें होतें असें म्हणतात. याचे समग्र ग्रंथ गार्सिन डी टासीनें भाषांतरिलेलें आहेत.

दिल्ली येथें झालेल्या कविमालेंतील पहिला कवि झुहबुद्दिन हातीम (१६९९-१७९२) हा होय. महमदशहाच्या कारकीर्दीच्या दुसर्‍या वर्षात वलीचें 'दिवाण' दिल्लींत मिळूं लागलें व तेथें मोठी खळबळ उडून गेली. त्याचें उत्तरेकडे ऊर्दू भाषेंत अनुकरण करणारा पहिला कवि हातीम हा होय, व त्याचेंच पुढें नाझी महमूद व अब्रू यांनीं अनुकरण केलें. हातीमनें केलेले दोन दिवाण उपलब्ध आहेत. त्यानें आपली एक शाखाच स्थापिली व त्याचा एक शिष्य रफियस सौदा हा उत्तर हिंदुस्थानचा प्रसिद्ध कवि होऊन गेला. खान अर्झु (१६८९-१७५६) हा उत्तरेकडील ऊर्दू वाङ्‌मयाच्या जनकापैकीं एक मानला गेला. याचा फारसी भाषेचा व्यासंग दाडगा असून त्यानें फारशी शब्दकोश तयार केला. पण त्याचीं ऊर्दू काव्येंहि बरींच प्रसिद्ध आहेत. सौदाच्या खालोखाल अतिशय प्रख्यात असणार्‍या कवींचा हा गुरू होता. अर्झु हा लखनौ येथें नादिरशहाच्या जाळपोळीनंतर राहिला असतां वारला. दुसरा प्रख्यात कवि म्हणजे इन आम उल्लाखान हा होय. हा २५ वर्षांचा असतांनाच मेला. तसेच शहागुलशानचा शिष्य मीर दार्द हाहि प्रसिद्ध होऊन गेला. याचे दिवाण फार मोठाले लांब नसले तरी लोकप्रिय आहेत. म्हातारपणी हा दरवेशी झाला होता. १७९३ सालीं हा मेला.

सौदा आणि मीरताकी हे सर्वात मोठे कवी होऊन गेले. सौदा हा अठराव्या शतकाच्या आरंभी जन्मला. यानें हातीमच्या देखरेखीखालीं अभ्यास केला. दिल्लीची जाळपोळ झाल्यानंतर त्यानें दिल्ली सोडली व तो लखनौ येथें आला; व तेथें नबाबा असफउद्दवला यानें त्याला ६००० रुपयांची वार्षिक जहागीर करून दिली. येथेंच तो १६८० त मेला. त्यानें अनेक कविता केल्या असून त्यांत ऊर्दू भाषेचे सर्व प्रकार आले आहेत. तरी पण त्यांतल्या त्यांत औपरोधिक काव्याबद्दल त्याची फार प्रसिद्धि आहे. मीरताकी हा आग्रा येथें जन्मला आणि नंतर दिल्ली येथें अर्झूच्याजवळ त्यानें अभ्यास केला. १७८२ मध्यें तो लखनौ येथें आला; व त्याला देखील सौदाप्रमाणेंच पेन्शन मिळत असे. त्यानें प्रचंड ग्रंथ लिहिले. त्याचे सहा दिवाण आहेत. प्रणयगीतात व ऐतिहासिक काव्यामध्यें मीर यास सौदापेक्षां श्रेष्ठ मानतात. अर्वाचीन प्रसिद्ध लेखक सय्यद अहमद यानें मीरविषयीं असे उद्‍गार काढले आहेत कीं ''मीरची भाषा इतकी शुद्ध आहे आणि मीरचे शब्दप्रयोग इतके मार्मिक व उचित आहेत कीं सर्वत्रांनीं त्याची एकमुखानें स्तुति केली आहे. मीर हा इतर बाबतींत सौदापेक्षां थोडा कमी असला तरी भाषापद्धतींत तो फार श्रेष्ठ आहे.''

नादीरशहानें (१७३९), अहमदशहा दुराणीनें (१७५६) आणि मराठ्यांनीं (१७५९) दिल्लीवर जीं विलक्षण संकटें आणलीं त्या संकटांमुळें दिल्ली हें वाङ्‌मयाचें केंद्र न राहतां लखनौ हें वाङ्‌मयाचें केंद्र बनलें. अर्झू, सौदा आणि मीर यांसारखे कविवर्य तेथें येऊन राहिले हें वर सांगितलेंच आहे. त्यांच्या इतकेच प्रसिद्ध कवी तेथें त्यांना मिळाले. मीरहसन, मीरसाझ आणि कालंदर बक्ष जुरत कवी हेहि प्रथम दिल्लीहूनच इकडे आले होते. मीरहसन हा मीरदर्दचा मित्र होता. तो प्रथम फैजाबाद येथें राहिला व नंतर लखनौस आला. ह्याला सौदाच्या व मीरच्या खालोखाल मान देतात. 'सिर्‍हुल बयान' नांवाची त्याने जी अद्‍भुत आणि प्रणयकविता लिहिली आहे त्यामुळें तो फार प्रसिद्ध आहे. तसेंच त्याची दुसरी एक कविता 'गुलझार-इ-इराम' हीहि फार प्रसिद्ध आहे. मीरमहंमद सॉझ हा रेख्ता वृत्तांत सुंदर काव्यें केल्याबद्दल फार प्रसिद्ध होता. तो पुढें दरवेशी झाला. जूरात हाहि पुष्कळ कवितांचा कर्ता होता. पण सौदाप्रमाणेच तो थोडासा अश्लील व कोट्या करणारा कवि होता. औरोधिकपणामध्यें त्यानें सौदाचें अनुकरण केलें होतें. हिंदी भाषेचाहि त्यानें अभ्यास केला होता. त्यानें दोहरे व कांही कविता केल्या आहेत. मस्किन हा शोकगीतांबद्दल फार प्रसिद्ध आहे. एक मुसलमान व त्याचे दोन मुलगे यांच्या मृत्यूवर त्यानें लिहिलेलें शोक गीत फार प्रसिद्ध आहे. लखनौ येथील कवींची शाखा १८५६ पर्यंत म्हणजे वझीदअल्ली हा शेवटचा राजा पदच्युत होईतों भरभराट पावत होती. प्रणयगीतें लिहिण्यांत अर्वाचीन ऊर्दू कवि अताश आणि नाशिख हे फार प्रसिद्ध होते. मीरहसनचा नातू मीरअनीस आणि त्याचाच समकालीन असणारा डबीर हे शोकगीतांबद्दल फार प्रसिद्ध आहेत. रजब अली बेग सुरूर (मृ. १८६८) हा 'फिसाना ए अजाइब' हें गद्यकाव्य लिहिल्याबद्दल फार प्रसिद्ध आहे. पदच्युत झालेला वजीरअल्ली हा स्वतः कवि होता. त्यानें तीन दिवाण प्रसिद्ध केले व त्यांतील पुष्कळ कविता अयोध्येच्या खेडवळ भाषेंत आहेत.

अशा रीतीनें सुप्रसिद्ध कवींनीं जरी दिल्ली सोडली होती तरी तेथें अगदींच काव्यें होत नव्हतीं असें नाहीं. शेवटच्या मोगल राजांमध्ये कित्येक राजे स्वतःच कवी होते. शहाअलम यानें 'आफताब' या टोपण नांवाखालीं आपली कविता लिहिली. 'मनझूम-इ-अकदास हें अद्भूत काव्य व दिवाण लिहिल्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. त्याचा मुलगा सुलैमान शुको हा इतर कवीप्रमाणें लखनौ येथें गेला होता. पण १८१५ सालीं तो परत दिल्ली येथें आला. त्यानेंहि एक दिवाण लिहिलें आहे. तसेंच बहादुरशहानें 'झाफर' या नांवाखालीं पुष्कळ कविता केल्या तो कवितेमध्यें शेख इब्राहीम झक या प्रसिद्ध लेखकाचा शिष्य होता. यानें पुष्कळ कविता लिहिलेल्या आहेत. नवीन स्थापित झालेल्या पंथाचा मशफी हा आद्य चालक होता. हा मूळचा लखनौ येथील राहणारा असून हा १७७७ मध्यें दिल्लीला आला व याने कविसंमेलनें भरवलीं. त्यानें ५ दिवाण लिहिलेले आहेत; 'ताझकिरा' अथवा ऊर्दू कवींचीं चरित्रें, 'शहानामा' अथवा शहाअलम राजाच्या कारकीर्दीपर्यंतच्या सर्व राजांचा इतिहास इत्यादि ग्रंथ त्यानें लिहिले आहेत. या कविमंडळांत केम नांवाचा एक कवि होता. हा १७९२ त मेला. याचींहि बरींच सुंदर काव्यें आहेत. शेवटच्या मोगल राजाचा राजकवि घालिब हा अर्वाचीन कवींत श्रेष्ठ होता. हा १८६९ सालीं मेला. हा नेहमीं फारसी भाषेंत लिहीत असे; तरी पण याचे ऊर्दू दिवाण लहान असूनहि त्यामुळें त्याची कीर्ति चोहोंकडे पसरली. याच कालचा मीरवली महमद नाझीर यानें काव्यावर कीर्ति मिळवलीं. जोगीनामा, कौडिनामा, बंजारेनामा आणि बुढापेनामा आणि शिवाय त्याचे दिवाण हे फार लोकप्रिय आहेत. त्याची भाषा इतर ऊर्दू कवींप्रमाणें बोजड नाहीं. त्याच्या कींही कविता नागरीमध्यें छापल्या असून त्याहि लोकप्रिय झाल्या आहेत.

अर्वाचीनकाल- वरीलप्रमाणें, दिल्ली, लखनौ व दक्षिणेकडील हिंदी वाङ्‌मयाच्या शाखांचा इतिहास आहे. पण याच वेळेस कलकत्त्यास फोर्ट विल्यम कॉलेजमध्यें चवथी शाखा निर्माण झाली होती; व या शाखेनें ऊर्दू गद्य वाङ्‌मयाला चांगलें चालन दिलें. १९ व्या शतकाच्या सुरवातीला या कॉलेजचा डॉ. गिल ख्राईस्ट हा मुख्य होता; व यूरोपियन लोकांनां व अधिकार्‍यांना ऊर्दू शिकण्याला सोपी व उत्तम टेक्स्टबुकें काढण्यासाठीं त्यानें फार प्रयत्‍न केले. त्यानें कलकत्त्याला त्यावेळचे सर्व ऊर्दू विद्वान जमविले व त्या विद्वानांनीं त्याच्या उत्तेजनानें जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते भाषेच्या दृष्टीनें व इतर बाजूंनींहि सुंदर व नमुनेदार आहेत. या शाखेचे मुख्य जनक हैदरी, हुसेनी, मीरअलदफ, हाफीझुद्दिन अहमद, शेरअल्ली अफसोस, निहालचंद, कॉझीम अल्ली जवान, लल्लूलाल कवि, मझार अल्ली, आणि इत्तम अल्ली हे होत.

हैदरी हा १८२८ त मरण पावला. त्यानें तोता खनानी (१८०१) नांवाचा एक गद्यग्रंथ लिहिला. तसेच हातीमताईच्या साहसासंबंधी अरैश हि महमल; मुसलमानी साधूंचीं चरित्रें अथवा दहमन्लिस, स्त्रियांच्या चातुर्यासंबंधीचा एक फारसी ग्रंथ आहे त्याच्यावरून लिहिलेला गुलजार-इ-दानिश, नादीरशहाच्या फारसी भाषेंतील इतिहासाचें भाषांतर तारीख- इ-नादिरी इत्यादि ग्रंथ त्यानें लिहिले. हुसेनीनें नस्त्र-इ-वेनाझीर व 'अखलख-इ-हिंदी' हे ग्रंथ लिहिलेले आहेत. हितोपदशाचें फारसी भाषेंत जें भाषांतर झालेलें आहे त्या भाषांतराचें पुनः 'अखलक-इ-हिंदी' हें ऊर्दूत रूपांतर आहे. मीर अमीन हा दिल्लीचा मूळ राहणारा पण पुढें तो पाटण्यास गेला व नंतर पुनः तो कलकत्त्यास आला. त्यानें फारसी भाषेंतील 'चहार दरवेशी' या ग्रंथाच्या आधारें 'बाग ओ बहार' (१८०१-२) हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांतील भाषेची फार स्तुति केली जाते; आणि याच्या असंख्य प्रती निघालेल्या आहेत. अमाननें हुसेन वय्यद काशिफीच्या अखलाख-इ-मुशिनी या ग्रंथाचें भाषांतर केलें. प्रो. हाफीजुद्दिन अहमद यानें १८०३ सालीं अबूल फजलच्या 'इयारी दानिश' चें 'खिराद अफ्रोज' या नांवाखालीं भाषांतर प्रसिद्ध केलें. अफ्सास हाहि फोर्ट विल्यम कॉलेजचा एक विद्वान प्रोफेसर होता. हा दिल्लीचा मूळचा रहाणारा असून यानें बंगालचा नबाब कासीम अल्लीखान याच्या पदरीं नोकरी धरली होती. नंतर तो हैद्राबादेस व नंतर लखनौस आला. तो लखनौस मीर हसन, मीर सॉझ, व मीर हैद्दर अल्ली हैराण यांचा शिष्य होता. तो १८०० मध्यें फोर्ट विल्यम कॉलेज येथें आला. त्यानें एक प्रसिद्ध दिवाण लिहिलें आहे. पण त्याची कीर्ति, सुजनरायच्या खुलाशतु-त तवारीख या ग्रंथाच्या भाषांतरामुळें व तसेंच सादीच्या गुलिस्तानचें भाषांतर बाग-इ-ऊर्दू या ग्रंथामुळें आहे. निहालचंद यानें गुल-इ-बकावली या ग्रंथाच्या आधारें मझाब-इ-इष्क हा ग्रंथ गद्यांत व पद्यांत लिहिला. जवान हा प्रथम दिल्लीचा रहाणारा असून नंतर तो लखनौस गेला व नंतर तो कलकत्त्यास १८०० त आला. त्यानें ऊर्दूत शकुंतला नाटक लिहिलें. त्यानें 'बारा मास' व दस्तुर-इ-हिंद या नांवाचें ग्रंथ लिहिले. रसैक् इखवानीस साफा या पुस्तकांतील तिसरा भाग इखवान् स-साफा या नांवाखालीं इत्तमअल्लीनें भाषांतर केला. यांतील ऊर्दू भाषा फारच सुंदर आहे.

श्री. लल्लूलाल हा गुजराथेंतील ब्राह्मण असून तो उत्तरहिंदुस्थानांत गेला होता. इतर वरील विद्वानांनीं मिळून जेवढें ऊर्दू भाषेचें कार्य केलें तेवढें या एकट्यानें हिंदी भाषेसाठीं केलें असें म्हटलें असतां अतिशयोक्ति होणार नाहीं. त्याला श्रेष्ठ हिंदीचा जनक असें म्हणणें योग्य आहे. त्याचे प्रेमसागर हें भागवतपुराणाचें १० व्या भागाचें भाषांतर आहे व राजनीति हा हितोपदेश व पंचतंत्रांतील कांही भाग यावरून रचलेला आहे. याशिवाय त्यानें 'लताइफ-इ- हिंद्', 'सभाविलास', काव्यगुच्छ, 'सप्‍तशतिका', व इतर ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यानें व जवाननें मिळून सिंहासनबत्तिशी लिहिली; व त्यानें शकुन्तलानाटकाच्या कामीं जवानला मदत केली. वेताळपंचविशी या ग्रंथामध्यें माझर अल्लीनिस्ला यानें याला मदत केली. आणि उलट यानें विलाला 'माधोनलची गोष्ट' या ग्रंथलेखनांत साहाय्य केलें.

हे वरील ग्रंथ जरी डॉ. गिल (ख्राईस्ट) व इतर यूरोपीयनांच्या नजरेखालीं प्रकाशिले जात होते व जरी प्रथम हे यूरोपियनांनां ऊर्दू शिकण्यासाठींच म्हणून लिहिलेले होते तरी हे ग्रंथ जिकडे तिकडे प्रसिद्ध होऊन यांची कीर्ति १९ व्या शतकाच्या मध्यभागापर्यंत अबाधित राहिली. पण याच वेळीं आणखी एक लाट उसळली व ती लाट म्हणजे धार्मिक पुनरुज्जीवनाची होय. व यावर जे अनेक वादविवाद झाले त्यामुळें ऊर्दू वाङ्‌मयाचा जिकडे तिकडे फैलाव झाला. हें काम सय्यदअहमद व त्याच्या अनुयाय्यांनी केलें.

सय्यद अहमद हा १७८२ मध्यें जन्मला, आणि त्याचें शिक्षण दिल्ली येथें झालें. कुराणावर सुप्रसिद्ध टीका लिहिणारा शहाअबदुल अझीझ व ऊर्दूमध्यें कुराणाचा पहिला भाषांतरकार अबदुल कादीर हे त्याचे गुरू होते. त्यानें वहाबी पंथाचा अंगीकार करून आपल्या भोवतीं इस्माइल हाजीसारखे अनेक उत्साही शिष्य जमविले व त्यांनां उत्तम प्रकारची धर्माची माहिती करून देऊन, तो १८२० सालीं कलकत्त्यास आला. १८२२ मध्यें तो मक्केच्या यात्रेला गेला व तेथून तो कॉन्स्टांटिनोपल येथें गेला. तेथें त्याला बरेच शिष्य मिळाले. सहा वर्षेपर्यंत तो तुर्कस्तान, अरबस्तान इत्यादि ठिकाणीं हिंडला. त्याठिकाणीं त्याला धर्मांतील चैतन्य दृष्टीस पडलें व हिंदुस्थानांत चैतन्य नाहीं असें वाटून त्यानें हिंदुस्थानांत येऊन बरीच चळवळ सुरू केली. त्यानें मुसुलमानी धर्मांतील भोळ्या समजुतींचा तिरस्कार केला व शिखांच्याविरुद्ध जिदाह (धर्मयुद्ध) करण्याचा उपदेश केला. १८२८ मध्यें पेशावर येथें येण्यास निघाला त्यावेळीं त्याच्या बरोबर एक लाख लोक होते. १८२९ सालीं त्यांनीं शिखांच्या विरुद्ध बंड केलें आणि पेशावर काबीज केलें. पण त्याच्या बाजूचे अफगाण लवकरच त्याच्या पासून फुटले. तो सिंधूच्या पलीकडे पळाला व पखली व घमतोलच्या डोंगरांचा त्यानें आश्रय घेतला; पण तेथेंहि त्याला एक शीख लोकांची तुकडी भेटली व तिच्याशी झालेल्या लढाईत तो व हाजी इस्माइल हे मारले गेले. पण या त्याच्या मरणानें त्याचा पंथ मात्र नामशेष झाला नाहीं. सध्या वहाबी पंथाचीं तत्त्वें दृढमूळ होऊ लागलीं आहेत.

अबदुल कादरनें केलेलें कुराणाचें भाषांतर १८२९ सालीं हुगळी येथे सय्यद अहमदच्या शिष्यानें प्रसिद्ध केलें. १८३० मध्यें अबदुलनें सय्यद अहमदचा 'तम्बिदुल इगाफिलिन' हा फारसी ग्रंथ प्रसिद्ध केला. 'तक्रियातुल अमीन' या नांवाचा ऊर्दू टीकाग्रंथ हाजी इस्लायल यानें लिहिला. तारीख-इ-मंहमदीया या नवीन पंथांच्या (सय्यद अहमदाच्या पंथांचें नांव) अनुयायानीं तरघिब-इ-जिहार, हिदायतुल मुम्मिम, मुझीदुल कबैर व लबिदाल नशीहातु-ल-मुस्लीमिन आणि मियात मसेल हे ग्रंथ लिहिले.

१८ व्या शतकाच्या अखेरीपासून फोर्टविल्यम कॉलेज मधून देशी पुस्तकें बाहेर पडत होतीं. पण तीं छापविण्याला फार खर्च येत असल्याकारणानें जितका या ग्रंथांचा प्रसार व्हावा तितका झाला नाहीं. १८३७ सालीं एक शिलाप्रेस दिल्लीमध्यें स्थापन झाला; व त्यामुळें निरनिराळी पुस्तकें लिहिलीं जाऊं लागलीं व जुनीं पुस्तकेंहि भराभर छापलीं जाऊं लागलीं. १८३२ मध्यें फारसी भाषेऐवजी ऊर्दू भाषा दरबारांत प्रविष्ट झाल्यापासून, उर्दू फारच लोकप्रिय झाली. तसेंच पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळें ऊर्दू भाषेचा शब्दकोश वाढूं लागला. शिवाय वर्तमानपत्रांचा धंदा अस्तित्वांत आल्यापासून नव्या नव्या कल्पना आपल्या देशी भाषेंतून जोरदार रीतीनें मांडण्याचीहि कला लेखकांच्या अंगी येऊं लागली.

हे सर्व फेरफार १८५७ सालच्या सुमारास घडून येत होते. १८६० पासून हे फेरफार जलद होऊं लागलेले दिसतात. दरवर्षी या शिळाप्रेसमुळें शेकडों हिंदी व ऊर्दू पुस्तकें बाहेर पडत आहेत. क्रमिक पुस्तकें खंडोगणती निघत आहेत. आणि अनेक पुस्तकांची भाषांतरें होत आहेत. हिंदी व ऊर्दू वर्तमानपत्रें २०० वर आहेत. त्यापैकी पुष्कळ संयुक्तसंस्थानांत व आग्रा, अयोध्या, पंजाब या ठिकाणीं निघत असून कांही मद्रास, हैद्राबाद, बंगलोर इत्यादि ठिकाणीं निघत आहेत. यामध्यें अनेक प्रकारचे विषय येत असतात. बहुतेक लेख, वाङ्‌मयाच्या अगर भाषेच्या दृष्टीनें वाखाणण्यासारखे नसतात हें खरें पण पुढेंमागें ते तसें होण्याचा संभव आहे.

ही नवीन वाङ्‌मयस्फूर्ति देशामध्यें उत्पन्न झाल्यापासून तिचे परिणामहि दिसूं लागलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा परिणाम म्हटला म्हणजे काव्याचा अस्त होय. नवीन युग भावनात्मक अगर काल्पनिक भरार्‍या मारणारें नसून निव्वळ व्यावहारिक आहे. आधिभौतिक अगर राजकीय सुधारणेकडे या युगाचें लक्ष आहे. या युगांत इतर युगाप्रमाणें राजेरजवाड्यांकडून आश्रय मिळत नाहीं. झाक, गालीब, अनीस आणि दाबीर यांच्या मृत्यूनंतर काव्याचें प्रस्थ वाढण्यास सुरुवात झाली. हैद्राबादमध्ये मात्र परवां परवांपर्यंत कवि पदरीं ठेवण्याची चाल होती; व मिरझाखान डागा (१८३१-१९०५) याची कीर्ति काव्यकौशल्याबद्दल फार होती.

पण गद्य वाङ्‌मय व भौतिक सुधारणा एवढ्यावरच लोकांचें लक्ष खिळून राहिलें नाहीं. इस्लाममधील कल्पनांचें खूळ मोडून टाकून त्यामध्यें सुधारणा करण्याचा सय्यद अहमदनें जो प्रयत्‍न केला त्याचेंच कार्य पानिपतचा सय्यद अलतफ हुसेन यानें केलें. याला हाली असें नांव असे. हाली हा तरुणपणीं गालिबाचा चेला होता. व आपल्या गुरूचें चरित्र व त्याच्या ग्रंथावर टीकाहि त्यानें लिहिलेली आहे. वयाच्या ४० व्या वर्षी तो सय्यद अहमदखान या सुधारकाच्या वर्चस्वाखालीं आला व त्या वेळेपासून आपली काव्यस्फूर्ति त्यानें आपल्या धर्मासाठीं खर्च केली. यानें पुष्कळ कविता केली आहे, व त्यांतील एक नमुना रूबेरीच्या प्रतीत इंग्लिश भाषांतरासहित सांपडेल. यामध्यें कवितेला उद्देशूनच एक कविता लिहिलेली आढळून येते. तो एका नवीन शाखेचा प्रवर्तक झाला आहे यांत शंका नाहीं. त्याच्या लेखांत, उत्साह व आशावादित्व दिसून येतें.

हालींचें सर्वात प्रसिद्ध काव्य म्हणजे 'इस्लाम धर्माची उन्नति व अवनति' हें होय, व याचा परिणाम मुसुलमानांमधील धर्मजागृतींत झाला. या काव्यामध्यें सुंदर, सरळ आणि मार्मिक भाषेमध्यें इस्लामनें पूर्वी मिळवलेले जय व इस्लमी धर्माचीं तत्त्वें प्रामुख्यानें मांडली आहेत आणि नंतर धर्माची अवनति कशी झाली याचेंहि सुंदर वर्णन दिलें आहे. आपल्याच जातभाईवर त्यांच्या दुर्गुणाबद्दल स्पष्ट शब्दांत हालीइतका निषेध क्वचितच इतरांनीं दाखविला असेल. त्यानेंच आपल्या प्रस्तावनेंत आपण बराच काळ कांहीहि न करतां उगाच भटकत राहिल्यावर सय्यद महमदखानाच्या स्फूर्तीनें ही कविता लिहिली असें सांगितलें आहे. हालीनें नुकतेच सय्यद अहमदखानाचें चरित्र केलें आहे.

काव्यासंबंधी व काव्यपद्धतीसंबंधी गद्यांत लिहिणारा दुसरा ग्रंथकार म्हणजे मौलवी हुसेन महमद अझाद हा होय. यानें स्वतः फारशी कविता लिहिलेल्या नाहींत पण ऊर्दू कविचरित्रपर जो ग्रंथ लिहिला आहे तो फार नांवाजलेला आहे. हा झाकचा शिष्य असून हा लाहोरमधील सरकारी कॉलेजमध्यें अरबी भाषेचा प्रोफेसर होता. त्याचे दुसरे ग्रंथ म्हणजे किसास इ हिंद, नैरंग-इ-खयाल आणि दरबार-इ-अकबरी, हे होत.

सर सय्यद अहमदखान याचें चरित्र व कामगिरी येथें समग्र देणें अशक्य आहे. 'आसारस सनादीद' नांवाचा त्याचा ग्रंथ फार प्रसिद्ध असून त्याच्या अनेक प्रती निघाल्या आहेत. त्याशिवाय त्यानें अनेक विषयावर लेख व निबंध लिहिलेले आहेत. त्याचा कुराणावरील मोठा टीकाग्रंथ अर्धाच झाला आहे. यानें ऊर्दू भाषेला अत्यंत जोरदार व मार्मिक वळण दिलें.

दुसरा एक चांगला लेखक म्हणजे दिल्लीचा शमसुल उलमा मौलवी नाझीर अहमद हा होय. यानें सामाजिक, नीतिपर अशा अनेक कादंबर्‍या लिहिलेल्या आहेत व त्याच्या प्रती अनेक खपत आहेत. विशेषतः बायकांमध्यें या कादंबर्‍यांचा खप विशेष आहे. या कादंबर्‍यांची नांवे मीर आतुल अरुरु (वधूंचा आदर्श), तौबातुन नसुह (नसुहाचा पश्चात्ताप), बनातुन नाश(सप्‍तर्षि), इब्नल वक्स (युगपुत्र), अयामा (विधवा) वगैरे होत. पण नाझीर हा फक्त कादंबरीकार होता असें नव्हे तर तो अनेकांगी होता. कादंबर्‍या लिहिण्याच्या अगोदरल त्यानें इंडियन पीनल कोडाचें फारच सुंदर भाषांतर केलें होतें; आणि त्यानें कुराणचें सुंदर भाषांतर केलें आहे. सामाजिक विषयावर तो सुंदर व्याख्यानें देत असे. म्हातारपणीं त्यानें कविता लिहिल्या. म्हातारपणीं सय्यद महमदखानाशीं त्याचा फार स्नेह होता.

आधुनिक ऊर्दू वाङ्‌मयामध्ये कादंबरी ही एक नवीन चीज आहे. हिंदुस्थानांत अद्‍भुत व प्रणयी कथांचा सुकाळ नाहीं. पण सत्य स्थितीचें वर्णन, सामाजिक परिस्थिति वगैरे वर्णन करणार्‍या कादंबर्‍या आपल्याकडे नाहींत. ऊर्दू कादंबरींत उत्तम कादंबरी पंडित रतननाथ सरशार याची फिसान ए आसाद ही होय. ही कथा फार मोठी असून मोठ्या कौशल्यानें लिहिलेली आहे; आणि त्यांत लखनौ येथील समाजस्थितीचें फारच सुंदर वर्णन दिलेलें आहे. दुसरा मोठा कादंबरीकर म्हणजे मौलवी अबदुल हलीम शारर हा होय. हा दिल गुदाझ या पत्राचा संपादक होता. यानें यांत यूरोपियन पद्धतीवर अनेक विषयांवर निबंध लिहिलेले आहेत व याच पत्रांत स्कॉटच्या धर्तीवरच्या त्याच्या कादंबर्‍या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अझीझ आणि नूर्जीना, मन्सूर आणि मोहिना या उत्कृष्ट कादंबर्‍या आहेत.

ऊर्दू ही जरी मुख्यत्वेंकरून मुसुलमानांची भाषा आहे तरी तिचा उपयोग हिंदी लोकांनींहि केला आहे. अतिशय लोकप्रिय कादंबरीकार लल्लूलाल हा हिंदु होता. तसेंच ८० ऊर्दू वर्तमानपत्रापैकीं २९ पत्रें हिंदूंनीं चालविलीं आहेत व पंजाबमद्यें ४८ पैकीं २० पत्रें हिंदूनीं चालविली आहेत. ऊर्दू नाट्याचा उदय व वृद्धि यांचा इतिहास 'नाट्यशास्त्र' लेखांत दिला आहे.

ऊर्दूनें ज्याप्रमाणें सर्व विषयाच्या बाबतींत नवीन पेहराव चढविला आहे त्याप्रमाणें 'श्रेष्ठ हिंदी' भाषेचें नाहीं. ही भाषा मुख्यत्वेंकरून हिंदी शाळांतून शिकविली जाते. पण निरनिराळ्या शास्त्रांतील शब्दांनां हिंदी भाषेंत संस्कृत शब्द योजले आहेत व ते पंडितांशिवाय इतर लोकांनां कळथ नाहींत. संयुक्तप्रांतमध्यें ३७ हिंदी व ४ हिंदी ऊर्दू वर्तमानपत्रें आहेत पण त्यापैकीं बहुतेक धर्मपरच आहेत. अवधी आणि वज्रभाषा या काव्याशिवाय उपयोगांत आणीत नाहींत.

१९ व्या शतकाच्या मध्यभागानंतरचे प्रसिद्ध ग्रंथकार म्हणजे काशीचे बाबू हरिश्चंद्र आणि राजा शिवप्रसाद हे होत. बाबू हरिश्चंद्र हे लहानपणीच मरण पावले तरी ते जुन्या काव्यकलेचे उद्धारक होते. सुंदरीतिलक पत्रामध्यें त्यांनीं उत्तर हिंदी कविता व कविवचनसुधा प्रसिद्ध केल्या, आणि हरिश्चंद्रिका मासिकांत जुने ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यांनीं यूरोपीय हिंदू व इतर कित्येक मोठमोठ्या पुरुषांचीं चरित्रें प्रसिद्ध केलीं; व वाङ्‌मयात्मक आणि व ऐतिहासिक निबंध लिहिले. इतिहासांतील गूढ प्रश्न त्यांनीं सोडवून ऐतिहासिक संशोधनाची दिशा आंखून दिली. काश्मीरकुसुम या ग्रंथांत त्यांनीं आपल्या शेकडों ग्रंथांची यादी दिली आहे. हिंदी नाटकांचे जे जनक होते. राजा शिवप्रसाद (१८२३-९५) हे शिक्षण खात्यांत काम करीत होते व त्यांनीं शालोपयोगी कित्येक पुस्तकें लिहून हिंदी भाषा सुंदर करण्याचें काम केलें आहे. हरिश्चंद्रांच्या मृत्यूपासून काशीच्या नागरीप्रचारिणी सभेनें हिंदी पुस्तकें छापण्याचें स्तुत्य काम चालू ठेवलें आहे.

हिंदी वाङ्‌मयाचे कांही विशेषः- प्राचीन काळापासून तों अर्वाचीन काळापर्यंतच्या हिंदी वाङ्‌मयाचें स्थूल परीक्षण केल्यानंतर पुनरुक्तीचा दोष पत्करूनसुद्धां या वाङ्‌मयांतील मुख्य विशेष कोणते आढळून येतात याचें पर्यालोचन करणे जरूरीचें आहे.

(१) हिंदी वाङ्‌मयाच्या स्वतंत्र रीतीनें विकास व भरभराट पावलेल्या काळांत जो पहिला विशेष आढळून येतो तो म्हणजे त्या काळचें वाङ्‌मय मुख्यत्वेंकरून धर्मविशिष्ट होतें. जवळ जवळ अर्ध्याहून अधिक अशा वाङ्‌मयाचें मूळ तत्कालीन भक्तिमार्गाच्या चळवळींत होतें. उरलेलें अर्धे वाङ्‌मय साहित्यविषयक होतें तरी पण त्यांत सुद्धां उदाहरणादाखल जे श्लोक घेण्यांत येत असत ते या भक्तिमार्गाच्या चळवळीशीं संलग्न असणारे असत. तसेंच भाटांच्या काव्यावर देखील या धर्माची छटा पडलेली होती.

(२) १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत जवळ जवळ सर्व वाङ्‌मय पद्यमय होतें. याला अपवादात्मक असे थोडे ग्रंथ आहेत. गोरखनाथानें एक गद्य ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर सोळाव्या शतकांत विठ्ठलनाथाचा 'मंडन' ग्रंथ आणि गोकुळनाथाचा 'चौरासी वार्ता' हा ग्रंथ, तसेच १७ व्या शतकांत दामोदरदासकृत मार्कंडेय पुराणाचें भाषांतर इत्यादि ग्रंथ गद्यांत होते. याशिवाय जे टीकाग्रंथ निर्माण झाले त्यांतील कांही ग्रंथ गद्यात्मक होते. बाकी सर्व वाङ्‌मय पद्यात्मक होतें. ही पद्यरचना फार क्लिष्ट असे तरी पण पुष्कळांनां पद्यांत लिहिणें सोईचें वाटत असे. ज्यावेळीं प्रथमतः ग्रंथकार गद्यांत लिहूं लागले त्यावेळीं त्यांनां देखील प्रथम प्रथम फार जड गेलें. त्यावेळचे शालिहोत्र, ज्योतिःशास्त्र इत्यादि विषयावरील शास्त्रीय ग्रंथ देखील पद्यात्मकच असत.

(३) सोळाव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे केशवदासाच्या काळापासून साहित्यशास्त्र व छंदःशास्त्रविवेचक असे पुष्कळ ग्रंथ निर्माण झाले. पद्यरचनेच्या खालोखाल ग्रंथकारांचा आवडता विषय साहित्य आणि छंदःशास्त्राचा होता. द्व्यर्थी शब्द अथवा कूट आणि अन्योक्तिवाचक श्लोक जितके अधिक एखादा ग्रंथकार वापरील त्या मानानें तो ग्रंथकार अधिक कुशल असें मानण्यांत येत असे; म्हणजे अंतरंगापेक्षां बहिरंगाकडेच पहाण्याची त्यावेळची दृष्टि असे आणि अद्यापिहि थोड्या फार प्रमाणांत ती आढळून येते. पण या साहित्यशास्त्र विवेचकांमध्यें देखील कांहीं ग्रंथकारांनीं फार सुंदर कविता केला आहे व त्यामुळें हिंदी काव्याची शोभा व योग्यता वृध्दिंगत झाली आहे यांत शंका नाहीं.

(४) हिंदी वाङ्‌मयांतील उपमा अगर रूपकें जीं आढळून येतात तीं अगदीं रूढ अशीं असतात. पण त्याच त्याच उपमा व तींच तींच रुपकें काव्यांतून वारंवार आढळून येतात. उदाहरणार्थ, चक्रवाक वियोग, चातकाचें मेघाविषयीं औत्सुक्य, चकोराला वाटणारे चंद्रापासून सौख्य इत्यादि ठरीव दृष्टान्त पदोपदीं आढळून येतात. तथापि तुळसीदास व इतर कांहीं कवींच्या काव्यांमध्यें सृष्टिनिरीक्षणविषयक उपमाहि आढळून येतात.

(५) हिंदी वाङ्‌मयामधील आणखी एक विशेष म्हणजे 'ठरीव कथानकें' हा होय. राम व कृष्ण यांचीं कथानकें घेऊन त्यावर अनेक कवींनीं काव्यें केलीं आहेत. त्याच त्याच हकीकती थोड्या फार भेदाने आढळून येतात. या व्यतिरिक्त जीं कथानकें आढळून येतात ती देखील कांही ठराविक कथानकांतलींच असतात. ती कथानकें म्हणजे गुरूचा महिमा; भक्तिचें माहात्म्य, पुनर्जन्मापासून तोटक; मायामोह; जगाची नश्वरता; इत्यादि होत. या काव्यांत मानवी प्रेमाचीं कथानकें फारच थोडीं आढळतात. कांहीं कांही काव्यांत शृंगारिक कथानकें असतात, पण तीं सुद्धां शुद्ध मानवी प्रेमासंबंधीचीं नसतात. याचीं कारणें बालविवाह, स्त्रीवर्गाची मागसलेली स्थिति इत्यादि होत आणि ज्या वेळेस प्रेमासंबंधीचें कथानक असतें त्या वेळीं वेश्याप्रेमासंबंधीचीं वर्णनेंहि आढळून येतात. पण यालाहि अपवादात्मक आणि शुद्धप्रेमदर्शक अशीं कथानकेंहि कांही कांहीं आढळतात आणि तीं म्हणजे पद्मावतीची पतिनिष्ठा; सीतेचें रामावरील प्रेम इत्यादि होत. अशा रीतीनें अगदीं ठराविक व संकुचित क्षेत्रांतच कवींनीं आपलें काव्य रचलेलें आहे.

(६) तरी पण विषयामध्यें संकुचितपणा असून सुद्धां हिंदी काव्यानें आपल्या अलौकिक गुणामुळें कायमचें स्थान पटकावलें आहे. हिंदी वाङ्‌मय हें खरोखरचें 'नंदनवन' आहे. काव्यामध्यें इतकें रचनाचातुर्य छंदोनैपुण्य, विकारांची उत्कटता, उमदेपणा, विचारमाधुर्य व शुद्ध सौंदर्य आढळतें की तितकें जगांतील इतर भाषांतील काव्यांमधून क्वचितच आढळून येतें. शिवाय तें काव्य फारच लोकप्रिय होतें. तें प्रचारांतील भाषेंत लिहिलेलें होतें. व त्यामुळें लोकांचें लक्ष त्यानें आपल्याकडे वेधून घेतलें. त्यांतील विचार, म्हणी ह्या पुष्कळांच्या कायमच्या परिचयाच्या बनल्या आहेत; व हिंदी लोकांचे खरे आचारविचार काय आहेत हें पहावयाचें असल्यास या काव्यांचा व वाङ्‌मयाचा फार उपयोग होईल यांत शंकाच नाहीं.

हिंदी वाङ्‌मयाची सद्यःस्थिति व भविष्यत् काल- अशा रीतीनें हिंदी वाङ्‌मयांत आढळून येणार्‍या विशेषांचें पर्यालोचन केल्यावर आपण हिंदी वाङ्‌मयाची सद्यःस्थिति काय आहे तें पाहूं. तसेंच भविष्यत्कालीन वाङ्‌मयाची वाढ कोणत्या दिशेनें होईल तेंहि आपण पाहूं.

प्रथमतः आपल्याला ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे इतर वाङ्‌मयाप्रमाणेंच हिंदी वाङ्मयापुढें कांहीं विघ्नें आहेत. आज जिकडे तिकडे इंग्रजी भाषेचें वर्चस्व असल्याकारणानें देशी भाषेचा जितका उपयोग व्हावा तितका होत नाहीं; मोठमोठे ग्रंथकार आपले विचार इंग्रजींतून मांडतात; अशी स्थिति आहे. त्याचप्रमाणें हिंदी गद्यवाङ्‌मयाचे नियम अद्यापि ठरलेले नाहींत हीहि एक मोठी अडचण आहे. हिंदी गद्यवाङ्‌मय अगदीं अलीकडे निर्माण झालें व तन्निमित्त उपयोगांत आणली जाणारी भाषा देखील नुकतीच बनत चालली आहे. मागील, आदर्शभूत असे गद्य ग्रंथहि नाहीं. व हल्लींच्या वाङ्‌मयाची स्थिति दररोज पालटत आहे. कांहीं ग्रंथकार संस्कृतप्रचुर नवीन हिंदी भाषा वापरतात तर दुसरे ग्रंथकार अरबी अगर फारसी शब्द प्रचुर भाषा वापरतात; कांही ग्रंथकार आंग्ल भाषेंतून भाषांतरिलेले शब्द वाङ्‌मयांत गोवतात. अशी स्थिति असल्याकारणानें कांहीं तरी नियम असणें जरूरीचें झालें आहे.

अशा रीतीनें हल्लींच्या हिंदी गद्यवाङ्‌मयाची कृत्रिम भाषा असल्यानें काव्यासाठीं तिचा उपयोग केला जात नाहीं. अशा प्रकारें गद्यवाङ्‌मयाच्या व पद्यवाङ्‌मयाच्या भाषेंत अंतर असणें हें हानिकारक आहे. पण आजकालच्या कवींमध्यें या कृत्रिम भाषेचा काव्यामध्यें उपयोग करण्याची प्रवृत्ति दिसून येत आहे.

अशा प्रकारच्या अडचणी हिंदी वाङ्‌मयापुढें असल्यातरी कांही फायदेहि हिंदी वाङ्‌मयाला होत आहेत, सक्तीचें शिक्षण झाल्यामुळें वाङ्‌मयाचा व ज्ञानाचा प्रसार झपाट्यानें होण्याचा चांगला संभव आहे. तसेंच मतदारीचे हक्क पुष्कळांनां देण्यांत येणार असल्यामुळें त्या मतदारांनां सर्व तर्‍हेची सामाजिक, राजकीय व औद्योगिक विषयासंबंधाची माहिती असणें जरूर आहे. आणि यामुळें अर्वाचीन नूतन वाङ्‌मयाचा झपाट्यानें विकास होईल यांत शंका नाहीं.

हिंदी वाङ्‌मयाच्या प्रसारार्थ ज्या संस्था निघालेल्या आहेत त्यांचाहि या वाङ्‌मयाच्या वाढीच्या कामीं फार उपयोग होण्यासारखा आहे. काशी येथील नागरी प्रचारिणी सभा या कामीं फार मेहनत घेत आहे. जुन्या हस्तलिखित प्रती शोधून काढण्याकरितां ही संस्था जारीनें प्रयत्‍न करीत आहे. शिवाय उत्तम प्रकारचे नवीन ग्रंथ तिच्यामार्फत बाहेर पडत आहेत. सुंदर आंग्ल ग्रंथांचें भाषांतर या संस्थेमार्फत होत असतें. तसेंच या सभेमार्फत हिंदी कोशाचेंहि काम चालू आहे. अशाच प्रकारच्या इतर संस्थांमार्फतहि चांगलें चांगले इतर ग्रंथ बाहेर पडत आहेत. पाश्चात्य ज्ञानाचा फायदा हिंदी लोकांनां मिळण्यासाठीं निरनिराळ्या विषयांवरील ग्रंथ निघत आहेत. साहित्यसंमेलन नांवाची अलाहाबाद येथें स्थापन झालेली संस्था हिंदी वाङ्‌मयांतील परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांनां पदव्या देत असते व तिचा उद्देश उत्तर व मध्य हिंदुस्थानांत हिंदी शाळा उघडण्याचा आहे.

या संस्थाप्रमाणेंच 'नार्थ इंडिया ट्रॅक्ट सोसायटी सारख्या इतर ख्रिश्चन संस्था देखील उत्तम कार्य करीत आहेत. या संस्थेमधून धार्मिक, चरित्रात्मक, कथामय असें वाङ्‌मय बाहेर पडत आहे. जुन्या जुन्या विषयांवर निरनिराळीं काव्यें लिहिण्याचा पूर्वीचा प्रघात कमी होत चालला आहे; व व्यापक क्षेत्रांत वाङ्‌मयाचें पाऊल पडलेलें आहे. अर्थातच या कामांत हिंदी वाङ्‌मयावर मोठाच बोजा पडणार आहे व तो यथायोग्य रीतीनें उचलण्यास वाङ्‌मयाच्या भक्तांनीं तयार झालें पाहिजे.

हिंदी छंदःशास्त्र- इतर कोणत्याहि भाषेपेक्षां हिंदी भाषेंतील छंदःशास्त्राची वाढ कमी नाहीं. संस्कृतमधील छंदःशास्त्रापासूनच या भाषेंतील छंदःशास्त्राचा उगम झालेला आहे. सर्व भाषांतील कविताप्रमाणेंच यांतहि यमक साधलेला असतो. पण हिंदी भाषेमध्यें प्रत्येक चरणांत नुसत्या एका शेवटच्या अक्षराचा यमक साधल्यानें भागत नाहीं तर निदान दोन अक्षरांचा तरी यमक साधला पाहिजे. हिंदींत शुद्धलेखन व व्याकरण या बाबतींत कदाचित दुर्लक्ष केलेलें आढळेल पण छंदःशास्त्रांतील गुंतागुंतीचे नियम पाळण्यांत तसें नाहीं. कुशल कवीच्या कौशल्यामुळें जो यमक साधला जातो तो फारच मनोहर वाटतो. हिंदी छंदःशास्त्रामधील वृत्तांची संख्या पुष्कळच आहे. त्यांतील अगदीं थोड्या प्रमुख वृत्तांचा येथें उल्लेख केला पाहिजे. दोहा किंवा दोहरा नांवाचें एक वृत्त असून त्याचे दोन चरण असतात व प्रत्येक चरणांत २४ मात्रा असतात व या मात्रा ठराविक रीतीनें विभागिल्या जातात. दोहर्‍याचा उपयोग हिंदी पद्य वाङ्‌मयांत फारच केला जातो. दोहरा उलट केला असता सोरठा होतो. चौपाई देखील दोहर्‍याप्रमाणेंच लोकप्रिय आहे. चौपाईचे चार चरण असून प्रत्येक चरणांत १६ मात्रा असतात. याशिवाय इतर वृत्तें म्हणजें कुण्डलीय, छप्पाई, काव्य, सनह्य आणि कविता हीं होत. कांही गाण्याचीं वृत्तेहि आहेत व त्यांचाहि पुष्कळ वेळां उपयोग केला जातो. [संदर्भग्रंथ -George A Grerson-The Modern verneculer litereture or Hindostan; मिश्रबंधू-मिश्रबंधूविनोद (हिंदी); मिश्रबंधू-हिंदी नवरत्‍न (हिंदी); रामनरेश त्रिपाठी (साहित्यसंमेलन, अलाहाबाद)- कविताकौमुदी; बेल्व्हेडीयर स्टीम प्रिंटिंग प्रेस, अलाहाबाद- संतवाणिसंग्रह; ए. ब्रिटानिका; इं. गॅझेटीयर ऑफ इंडिया, पु. २; ग्रीयरसन- लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया; एसनयक्लो. रिलिजन अँड एथिक्स].

याप्रमाणें हिंदुस्थानी वाङ्‌मयाचें थोडक्यांत निरीक्षण केलें. याठिकाणीं फक्त हिंदुस्थानी वाङ्‌मय घेतलें याचें कारण हिंदुस्थानी ही अखिल भारतीय भाषा होऊं पहात आहे व ती बोलणारांची संख्या सर्वांत मोठी (सुमारें ९॥ कोटी) आहे. हिंदुस्थानांतील गुजराथी, कानडी, बंगाली वगैरे भाषा व त्यांतील वाङ्‌मय याचें वर्णन मुख्य ज्ञानकोशांत शरीरखंडांत त्या त्या नांवाखालीं केलेलेचं आहे. फक्त हिंदुस्थानी या विभागाकरितां ठेवलें होतें त्याचा येथें परामर्ष घेतला. मराठी भाषावाङ्‌मयाचें असेंच विवेचन महाराष्ट्रखंडांत येईल.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .