प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

बौध्दकालीन हिंदुस्थान.
(ख्रि. पू. ५००- ५२३)

भारतीय युद्धानंतर व बुध्दजन्मापर्यंत हिंदुस्थानांत जो इतिहास घडला त्याची माहिती देणारीं उपलब्ध साधनें अत्यंत अल्प आहेत. जुनाट शहरें उकरून काढण्याचें काम हल्लींपेक्षां जास्त प्रमाणांत झाल्यास हीं साधनें जास्त उपलब्ध होतील. पाटलीपुत्र व तक्षशिला यांच्या जोडीला उज्जनी, काशी, दिल्ली, मथुरा, द्वारका, अयोध्या, कांची, प्रयाग, पैठण इत्यादि प्राचीन राजधान्यांचे अवशेष उकरून काढले पाहिजेत. या राजधान्यांत प्राचीन काळापासून पुष्कळ शतकें निरनिराळे राजवंश राज्य करीत होते.

कीकटांतील इंद्रास पायस न देणार्‍या मगंद चा उल्लेख ॠग्वेदांतच आहे. मग हे कीकटांमध्यें यजुर्वेद कालाच्या इतक्या अगोदर स्थापन झाले होते कीं देशास मग हें नांव स्थापन झालें होतें आणि तेथील लोकांस मागध हे नांव पडलें होतें? सध्यां देखील मग ब्राह्मण गयेस आहेत. मागध हे परकीय लोक आहेत ही भावना यजुर्वेदांत दृष्टीस पडते पुरुष यज्ञांत त्यांनां बळी देण्यासाठीं शिफारस केलेली आहे आणि व्रात्यस्तोम हा त्यांच्यासाठींच तयार झाला. मगध या लोकांचें मगध (दक्षिण बिहार) राष्ट्र हें प्राचीन काळापासूनच पुढें आलेलें असून जैन व बौध्दधर्माचाहि त्याच्याशीं निकट संबंध येतो. या देशांत गिरिव्रज (गया जिल्हा) येथें शिशुनाग (नाक) नांवाच्या एका सरदारानें ख्रि. पू. ६४२ व्या वर्षी राज्य स्थापिलें. त्याचा पांचवा वंशज बिंबिसार श्रेणिक (ख्रिस्तपूर्व ५८२-५५४) यानें अग (भागलपूर व मोंगीर जिल्हे) देश जिंकून राज्य वाढविलें. हा जैनधर्मीय असावा. याच्या वेळीं इराणचा राजा दराअस यानें ख्रिस्तपूर्व ५१६ च्या सुमारास सिंधुथडीचा प्रांत जिंकल्याचें आढळतें. हा प्रांत त्याच्या राज्याचा २० वा व अतिसमृध्द (१ कोटी रु. उत्पन्नाचा) असा सुभा होता. हा सुभा अलेक्झांडरच्या स्वारीच्या पूर्वीच इराणी राज्यांतून निसटून हिंदुस्थानच्या साम्राज्यांत आला. इ.स. च्या ४ थ्या शतकापर्यंत वायव्येकडील प्रांतांत आढळणारी खरोष्ठी लिपी ही बहुधां या इराण्यांनींच तिकडे पसरविली असावी. ती लिहिण्यांत ब्राह्मीच्या उलट आहे तरी पण वळण ब्राह्मीसारखें आहे. या इराणी असुरांचा व शिशुनागराजवंशाचा स्नेहसंबंध असावा. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रु (ख्रि.पू. ५५४- ५२७) उर्फ कुणिक यानें शोणगंगा संगमीं पाटलीपुत्र (पाटणा) शहर स्थापून कोसल व लिच्छिवी राज्यावर स्वार्‍या केल्या व त्यांनां मांडलिक बनविलें. त्याची आई लिच्छिवीराजकन्या व त्याची राणी कोसलराजकन्या होती. लिच्छिवी वंश हा फार जुना असून त्यानें जवळजवळ एक हजार वर्षे आयुष्य काढलें. पाटण्याहून उत्तरेस १४ कोसांवरील वैशाली ही लिच्छिव्यांची राजधानी होती. लोकांनीं निवडलेल्या नायकानें राज्य चालवावें असा या जातीचा नियम होता. प्रेतें टाकण्याच्या फौजदारी कायद्याच्या व इतर गोष्टींवरून हे लोक मूळचे मोंगोलियन धर्तीचे डोंगरी होते असें म्हणतात. गौतमबुध्द ज्या शाक्यकुळांत जन्मला तें कुळ या लिच्छिवी जातीपैकींच एक होय. स्मिथच्या मतें हा गौतमबुध्द जन्मानें मोंगोलियन असावा व हल्लीच्या गुरख्याप्रमाणें मोंगोलियन चेहर्‍यामोहर्‍याचा व तिबेटी ठेवणीचा असावा. बील व फर्ग्युसन बुद्धाला शक किंवा तुराणी वंशीय म्हणतात. पहिल्या चंद्रगुप्ताची राणी ही लिच्छिवि राजकन्या होती व सातव्या शतकांतहि नेपाळचें राज्य या घराण्यांत नांदत होतें. स्मिथच्या मतें जैनधर्मसंस्थापक महावीर हा सुद्धा मांगोलियन डोंगरी मनुष्य होता. अजातशत्रूनंतर त्याचा पुत्र दर्शक (ख्रि. पू. ५२७- ५०३) व त्याचा पुत्र उदय हे गादीवर आले. उदयानेंच पाटलीपुत्राजवळ कुसुमपूर शहर बसविलें. अजातशत्रूच्या काळी बौध्द व जैन हे दोन्ही धर्म विशेष पसरल्यानें त्यानें दोन्ही धर्मांनां मदत केली होती. बौद्धांनीं अजातशत्रू हा पितृघ्न होता म्हणून मत्सरानें उठविलेली कथा गप्प असावी. बिंबिसार हा महावीर वर्ध्दर्मान तीर्थंकर आणि गौतमबुध्द या दोघांचाहि समकालीन होता. अजातशत्रूनेंहि या दोघां धर्मसंस्थापकांची गांठ घातली होती. त्याच्याच राजवटींत गौतम मेला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .