प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

वेदपूर्व संस्कृतीचे अवशेष व त्या संस्कृतीचें स्वरूप

नुक्तेंच पंजाबांत हाराप्पा व सिंध प्रांतांत मोहेनजोदरो येथें पुराणवस्तावशेष खोदण्याचें काम सुरू झालें असून आतांपर्यंत आढळलेल्या अवशेषांत सोनें व तांबें या धातू सांपडल्या आहेत. त्याखेरीज येथें अनेक प्रकारच्या वस्तू सांपडल्या आहेत. मातीचे लहानमोठे रांजण, शाडूसारख्या पांढर्‍या मातीवर उमटविलेले बैलांचे व शिक्कयांचे ठसे, गळ्यांतील पोंवळ्याचे व निरनिराळ्या मूल्यवान दगडांचे हार, सोन्याचीं कर्णभूषणें व निरनिराळे अलंकार, मातीचे लहानमोठे बैल, हार ज्यांत ओंवले गेले होते असे सुताचे दोरे इ.इ. वस्तू त्यांत मुख्य आहे. याशिवाय त्यावेळचीं विटकरीं घरें, त्यांत केलेल्या सर्व सोई, सांडपाण्याच्या मोर्‍या, रस्ते, विहिरी, शस्त्रें वगैरे गोष्टींहि तेथें आढळल्या आहेत. हे संबंध शहर अजून (१९२६) खोदण्याचें काम चालूच आहे. तज्ज्ञाचें मत असें आहे कीं; आजपर्यंत जगांत जेवढीं जुनी शहरें खोदून काढलीं आहेत त्या सर्वांत हें प्राचीनतम असून आर्याचा प्रवेश हिंदुस्थानांत होण्याच्या पूर्वीचें म्हणजे द्राविडसंस्कृतीच्या वेळचें म्हणजें ख्रिस्तपूर्व ७।८ हजार वर्षामागचें (सुमेरियनकालीन) असावें. कांहींच्या मतें असुर व सुमेर यांच्या संस्कृतींच्याहि पूर्वीची ही संस्कृति असावी. शिक्क्यांतील अक्षरें व लिपी अद्यापि (१९२६) कोणास लागली नाहीं. सारांश उत्तर हिंदुस्थानांत ८००० वर्षापूर्वीच सोनें व तांबें यांची उपकरणीं व रत्नांचे सुंदर अलंकार होत असत हें स्पष्ट ठरतें; म्हणजे त्या पूर्वी ५०० वर्षे तरी निदान या धातूंचा शोध तेथील रहिवाशांनां लागला होता असे समजण्यास हरकत नाहीं. तसेंच कुंभारकाम, नगररचना वगैरे कामें त्या वेळीं प्रचारांत होतीं असें सिध्द होतें. एकंदरीत या गांवाच्या खननामुळें प्राचीनतम हिंदुस्थानच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा शोध लागेल; असो. दख्खनमध्यें मात्र लोखंडाचा शोध बराच मागून लागला असावा. यूरोपमध्यें अश्म व लोह या दोन युगांमध्यें एक ब्राँझयुग मानतात; तसें उत्तर हिंदुस्थानच्या ऐतिहासिक कालखंडात मानीत नाहींत; कारण, ब्राँझ ही धातु उत्तर हिंदुस्थानांत त्यावेळीं करीत नसत. मात्र करण्याचा प्रयत्न झाला होता असें या धातूंचीं आतांपर्यंत जीं ४।५ च उपकरणें आढळलीं त्यावरून वाटतें. तिनेवेल्लीकडील प्राचीन थडग्यांत मात्र ब्राँझची पुष्कळशीं घरगुती भांडीं व वस्तू आढळतात, पण हत्यारें आढळत नाहींत.

हिंदुस्थानाचे जें अगदीं सामान्यतः दोन भाग पडतात ते उत्तरहिंदुस्थान व दख्खन हे होत. पैकीं दख्खनमधील पर्वत व भूमि ही उत्तरेकडील भूमीपेक्षां लाखों वर्षाच्या पूर्वीच वसतीला योग्य अशी झाली होती. उत्तरेकडील हिमविन्ध्य या भागांत त्या काळीं समुद्र होता. तो नाहींसा होऊन तेथें वसतीला योग्य अशी जमीन तयार होण्यास दख्खनपेक्षां फार काळ लागला. या दोन्ही भागांचें परस्पर दळणवळण अनेक अडचणीमुळें त्या प्राचीनतम काळीं होण्यास सवड नव्हती. त्यामुळें तेथील निरनिराळ्या दोन्हीं मानवी समाजांचीं परस्परांस फारशी ओळख नव्हती व त्यांचें व्यवहार स्वतंत्र चालत होते असें दिसतें. एकंदरींत हिंदुस्थानांत सर्वांत प्रथम मनुष्यवसति कोठें झाली असेल तर ती दख्खनमध्यें झाली असावी असा विद्वानांचा तर्क आहे. अद्यापीहि मूळचे निरनिराळे रानटी लोक जितके दख्खनमधील पहाडी प्रदेशांत सांपडतात, तितके उत्तरहिंदुस्थानांत सांपडत नाहींत. कांहीं विद्वानांच्या मतें उत्तरहिंदुस्थानांतील अरवली व मिठाचे डोंगर या पर्वतश्रेणी दख्खनमधील सह्याद्री, निलगिरी वगैरे पर्वतश्रेणींच्या इतपतच प्राचीन आहेत, व म्हणून तेथें सुद्धा दख्खनमधील प्राचीनतम वस्तीबरोबरच वसति झाली होती असें त्यांचें म्हणणें आहे. या सर्व गोष्टी प्रागैतिहासिककालीन आहेत. या उत्तर- दक्षिण मनुष्यसमाजाचा परस्परसंबंध घडवून आणणारी पहिली व्यक्ति आपल्या पुराणकारांच्यामतें अगस्त्यॠषि ही होय. हा वैदिक ॠषि असून तो काशी सोडून दख्खनमध्यें उतरला होता.

उत्तर हिंदुस्थानांत अथवा दख्खनमध्यें अत्यंत प्राचीनतम जे लोक राहत होते ते कोणत्या जातीचे व कसल्या बांध्याचे होते, हें कोणांसहि नक्की सांगतां येणें अशक्य आहे. पुढें पुढें तर आर्यन् व द्रविड हे दोन भिन्न मानवसमाज परस्परांत मिसळून गेले. तरी पण आजहि त्यांत दोन ठोकळ भेद दृष्टीस पडतात. गोर्‍या रंगाचे, लांब डोक्याचे, उंच, सदृढ, सुंदर व लांब नाकाचे असे लोक उत्तर हिदुस्थानांत जास्त असून ते आर्यनवंशीय आहेत. उलट काळ्या रंगाचे, ठेंगणें, साधारण रूपाचे, चपट्या नाकाचे व बसकट डोक्याचे असे लोक दख्खनमध्यें जास्त असून ते द्रविडवंशाचे अथवा आर्य -द्रविड मिश्र रक्ताचे आहेत. यांच्या खेरीज जे रानटी लोक आहेत, ते प्राचीनतम अश्मायुधकालीन लोकांचे वंशज असावे असें दिसतें. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशांत तिबेटी व हिंदुस्थान यांचा संबंध जास्त येत असावा. सोमवंशी आर्याची (पांडवांची) टोळी त्या भागांतूनच हिंदुस्थानांत घुसली असें रा. चिंतामणराव वैद्य यांचें मत आहे. द्रौपदीनें पांच पांडवांशीं लग्न लाविलें होतें. ही एका स्त्रीनें भावांशीं लग्न लावण्याची चाल अद्यापि तिबेट व हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेश यांत चालू आहे. ही वैदिक आर्याच्या चालीशीं अगदी विरुध्द आहे. सीलोनमध्यें हीं चाल १८५९ पर्यंत होती.

आर्यलोक हे अगदीं प्रथम उत्तर ध्रुवप्रदेशांत राहत होते. तो प्रदेश त्यांचें मूलगृह होय. मनुष्यप्राणीं हा चतुर्थयुगांत म्हणजे हिमोत्तर कालापूर्वी म्हणजे २४०००० वर्षापूर्वी पृथ्वीवर उत्पन्न झाला. व त्याचेंहि मूलस्थान हाच प्रदेश होता असें कित्येक म्हणतात. वेदांतील अत्यंत प्राचीनतम उल्लेखावरून लो. टिळकांनीं आर्याचें मूलगृह उत्तरध्रुवप्रदेश ठरविलें आहे. आपल्याकडे मनूची प्रलयविषयक कथा प्रसिध्द आहे (शत. ब्राह्मण). शेवटचा हिमकाल (प्रलय) ख्रिस्तपूर्व ८००० वर्षापूर्वी झाला. त्याच्या अगोदर आर्यन् लोक उत्तरध्रुवप्रदेशांत राहत होते. प्रलयानंतर हे लोक मध्यआशियांत दक्षिणेकडे उतरले. उत्तर ध्रुवप्रदेशांत ॠग्वेदांतील अत्यंत प्राचीनतम ॠचा निर्माण झाल्या असाव्यात, असें टिळकांचें मत आहे. हें मत आम्हांस मान्य नाही कां कीं ॠग्वेदांतील प्रत्येक ॠचेवर दाशराज्ञ युद्धानंतरच्या कालाची छाय पडली आहे. उत्तरध्रुवप्रदेशीं वसति होती त्या काळांत ज्या कल्पना तयार झाल्या त्यांचा उत्तरकालच्या वाङ्मयांत या शिल्लक असतील एवढेंच टिळकांच्या लेखांवरून सिध्द होईल. मध्यआशियांत आर्य हे ख्रिस्तपूर्व ६०००-५००० च्या सुमारास स्थायिक झालेले होते. या आर्यानीं प्रलयपूर्वकालीन आपली सुधारणा व धर्म मध्यआशियांतील स्थानांतहि राखून ठेवला होता. येथें भारतीय आर्य व इराणी आर्य एकत्र राहत होते. यावेळीं सूत काढणें, कापड विणणें, धातूकाम, नावा बांधणें, रथ, गाड्या करणें इत्यादि कला, शहरें, त्यांत राहण्याची रीत, क्रयविक्रय व्यवहार, कृषि इत्यादि गोष्टींची माहिती या आर्यांनां चांगली होती. विवाहादि धार्मिक व सामाजिक संस्था त्यांच्यांत असून मालमत्तेचे नियमहि ठरविलेले होते. तांब्यांचें व पितळेचे नाणेंहि त्यांनां माहीत होतें. सारांश आर्यधर्म व यज्ञपध्दति ही हिमप्रलयोत्तरकालीन असून प्राचीनतम वैदिक धर्म व विधि हे हिमप्रलयपूर्वकालीन होते. पुढें हें आर्य लोक मध्यआशियांतून निघून हिंदुस्थानच्या वायव्येकडून पंजाबांत हळूहळू घुसले. पुढें ते तेथून गंगेपर्यंत व इकडे सिंधूनदीपर्यंत पसरले. अशा तर्‍हेची आर्यन् लोकांच्या प्रवेशांची मांडणी झाली आहे. आर्यन् लोकांच्या हिंदुस्थानांतील प्रवेशाचा कालहि नक्की ठरत नाहीं. पाश्चात्त्य विद्वान हा काळ जितका जवळ आणवेल तितका आणतात व पौर्वात्य विद्वान तो जास्तीत जास्त लांबवितात. पहिल्यांचें म्हणणें ख्रि. पू. २४००० त १५०० पर्यंतचा तो काळ होय; तर दुसर्‍यांनीं हा काळ ख्रि. पू. ५००० ते ३००० पर्यंत धरला आहे. लोक. टिळकांच्या मृगशीर्ष- संपाताच्या मतावरून हा काल ख्रि. पू. ४००० च्या अलीकडे ओढतां येत नाहीं, असें म्हटलें आहे. आमच्या मतें वेदवाङ्मयाच्या उद्भवापूर्वीच आर्यन् लोकांची, व शकमगादींची वस्ती हिंदुस्थानांत झाली होती आणि सर्व उत्तर- हिंदुस्थान आर्यन् लोकांनीं व्यापल्यानंतर वैदिक संस्कृतीचे लोक देशांत आले व त्यांनीं देश्य आर्यन् लोकांच्या संस्कृतीस नवसंस्कार दिला व नंतर हळूहळू आपली नवसंस्कृति हिमालयापासून रामेश्वरापर्यंत पसरविली. ही संस्कृति तेव्हांपासून हिंदुस्थानांतील हिंदू लोकांच्या इतकी हाडीमासीं खिळली आहे कीं, परकीयांचे विशेषतः मुसुलमानांसारख्या धर्मवेड्या लोकांचे हल्ले झाले तरी तिला अद्याप विशेषसा धक्का बसला नाहीं. आर्याच्यानंतर हिंदुस्थानांत अनेक शतकांनीं यवन, शक, म्लेंच्छ वगैरे लोक आले. मात्र यांपैकीं प्रथम सुरुवात कधीं व कोणीं केली हें अनिश्चित आहे. दरायसच्या स्वारीचा उल्लेख आहेच त्यानंतर अलेक्झांडरची स्वारी ख्रि. पू. ३२६ त झाली; त्यानंतर बॅक्ट्रियनसत्ता वायव्येकडील प्रांतांत ख्रि. पू. २४६ च्या सुमारास कांही काळ होती; त्यापुढें शक आले (ख्रि., पू. २ रे शतक). मोंगलवंशीय व तुर्कवंशीय अशा सर्वच परकीयांनां आपल्या ग्रंथांतून शक हें नांव दिलेलें आढळतें. या शकांनीं पंजाब, मथुरा व काठेवाड या भागांत लहान लहान राज्यें स्थापिलीं. यांच्या मागून मध्य आशियांतील भटके यूएची हे हिंदुस्थानांत आले. त्यांच्यांतील कुशान या टोळींनें थोडेसे मोठें राज्य स्थापन केलें. कांहीं विद्वानांच्या मतें कुशान हे तुर्कस्तानचे होते. पाश्चात्त्य विद्वानांनीं असा एक तर्क बसविला आहे कीं, या परकी शक-यूएची वगैरे लोकांच्या रक्ताची भेसळ उत्तर हिंदुस्थानांतील आर्यरक्तांत झाली व सांप्रतचे रजपूतलोक हे असल्यास मिश्रणाचे असावेत. इ.स. ५ व्या ६ व्या शतकांत मध्य आशियांतून रानटी हूण लोकांची टोळधाड इराण व हिंदुस्थान या देशांवर आली. यूरोपांत जे हुण जास्त सुधारलेले व रंगानें उजळ असल्यानें त्यांनां श्वेतहूण म्हणतात. व्हिन्सेन्ट स्मिथ म्हणतो कीं, पुष्कळ रजपूत जाती किंवा घराणीं, तसेंच जाट, गुजर व आणखीहि कांही जाती या, ह्या हूण किंवा त्यावेळीं आलेल्या तत्सदृश भटक्या जातीपासून निर्माण झालेल्या आहेत. (अर्ली. हि. इ. ९). या मताचा अनुवाद कांहीं पौंर्वात्य विद्वानांनींहि (रा. दे.रा. भांडारकर) केला आहे. रा. चिंतामणराव वैद्य हे याच्या विरुध्द असून, यांच्यामतें हिंदुस्थानांतील रजपूत, जाट, गुजर वगैरे जाती या मूळच्या आर्यक्षत्रिय जातीच आहेत (म. यु. भा.१). या हूणानंतर बर्‍याच काळानें मुसुलमान लोक हिंदुस्थानांत घुसले. त्यापैकीं अरबांनीं आठव्या शतकांत प्रारंभ केल्यानंतर मागून आशियांतील निरनिराळ्या वंशांच्या मुसुलमानांनी मोंगल, अरब, इराणी, तुर्क, अफगाण इत्यादि अनेक रक्तांचें मिश्रण होतें. या मिश्रमाचे मुसुलमान सांप्रत दख्खनपेक्षां उत्तर हिंदुस्थानांत अतिशय आहेत. अरबांची छाप सिंधप्रांतांत विशेष पडल्याचें दिसतें. महमूद गझनीकराच्या वेळीं पंजाबांत व मुहम्मद घोरकराच्या वेळीं संयुक्तप्रांतापर्यंत मुसुलमानांची आवक वाढत होती. तिला १३४०- १५२६ पर्यंत उतरती कळा लागून, ती पुन्हां बाबरच्या आगमनापासून वाढली; पण, ती पहिल्या वेळेइतकी नसून आतां देशांतल्या हिंदूंनांच मुसुलमान करून ती वाढविण्यांत येऊं लागली. शक, हूण यासारखे हे मुसुलमान लोक हिंदूच्या चातुर्वण्यांत दाखल झाले नाहींत, तर उलट हिंदूंनांच आपल्यांत ओढूं लागले; याचें कारण ते आपल्या संस्कृतीस हिंदूसंस्कृतीपेक्षां उच्च समजत असत. तसेंच उलट हिंदूंनींहि बाह्मम्लेच्छांनां चातुर्वर्ण्यात दाखल करून घेण्याची रीत बंद करून आपल्या जाती लख्खोटबंद केल्या व मुसुलमान झालेल्या लोकांनां शुध्द करून पुन्हां हिंदुधर्मात आणण्याचें दार बंद करून टाकलें. यामुळें साहजिक धर्मांतरित मुसुलमानांची संख्या वाढत चालली. शकहूणांनां वास्तविक धर्म असा कांही नव्हताच, म्हणून त्यांनां हिंदूधर्मानें प्रलोभन दाखवून आपल्या पंखाखालीं ओढलें; तसें मुसुलमानांचें नव्हतें. त्यांनां त्यांच्या समजुतीनें उत्कृष्ट असा एक धर्म होता व त्याचा प्रसार करण्यासाठीं त्या धर्मानं त्यांनां आज्ञा दिली होती आणि ती पाळल्यास स्वर्गातील मोठमोठीं सुखें प्राप्त होतील असें आमीष त्यांनां दाखविलें होतें. असो. पंधराव्या शतकानंतर पोर्तुगीज, फ्रेंच इंग्रज वगैरे यूरोपियन लोकांचा कोंकण, मुंबई व हिमालयाच्या उतरणीवरील प्रदेश या भागांतील हिंदी लोकांशीं संबंध येऊन मिश्रप्रजा उत्पन्न होऊं लागली, तीच ऍंग्लोइंडियन या जाती हिंदुस्थानांत फार थोड्या आहेत व त्यांनीं आपल्या जाती अद्यापि लखोटबंद ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

भाषा- हिंदुस्थानांत अनेक भाषा प्रचलित असून, त्यांपैकीं हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती या मुख्य भाषा व माळवी, सिंधी, पंजाबी, गौडी, बहारी वगैरे गौण भाषा, मूळच्या प्राकृतभाषांपैसून झालेल्या आहेत. व मुख्य तीन (मागधी, शौरसेनी व महाराष्ट्रीय) प्राकृत भाषा तर संस्कृतभाषेपासून उत्पन्न झाल्या आहेत. दख्खनमधील मूळच्या द्राविडभाषेपासून तामीळ, तेलगु, मलयालम्, कानडी, व तुळु वगैरे हल्लीं प्रचलित असलेल्या भाषा निघाल्या. तामीळ-तेलगू वाङ्मय पुष्कळ असून, त्यांत तामीळ भाषा या सर्व द्राविडी उपभाषेंत मुख्य व जुनी आहे. आर्यन् भाषांपेक्षां द्राविडभाषांचें स्वरूप व व्याकरण अगदीं स्वतंत्र आहे; त्यामुळें, अत्यंत जुनें. (खि. श. च्या प्रारंभकालाच्या सुमारचें) तामीळ वाङ्मय संस्कृत वाङ्मयापेक्षां अगदीं निराळ्या धर्तीचें आहे. तामीळ देशांचें प्राचीन नांव द्रविडदेश होतें म्हणून द्राविड या विशेषणाऐवजीं तामीळ हा शब्द रूढ झाला असावा. याखेरीज मुंड, मोनख्मेर व तिबेटी- चिनी या भाषावंशांतील कांही उपभाषा हिंदुस्थानांत चालतात, पण त्यांचें महत्त्व फारसें दिसत नाहीं व त्यांत वाङ्मयहि विशेषसें नाहीं.

आर्यलोक पंजाब- पंचनद- देशांत (अथवा सप्तसिंधु देशांत) पुष्कळ काळ राहिल्यानंतर हळू हळू ते पूर्वेकडे व दक्षिणेकडे वळले (ख्रिस्तपूर्व ३०००- १४००). पूर्वेकडील टोळी गंगायमुना, अंतर्वेदी, मिथिला, तिरहूत वगैरे भागांत काशीप्रयागपर्यंत पसरलेली व दक्षिणकडील टोळी सिंधूनदीच्या कांठाकांठानें पसरली. सरस्वती- दृषद्वती- कांठचा प्रदेश, ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षिदेश, कुरुक्षेत्र, मत्स्य, पांचाल, शूरसेन व मथुरा वगैरे देश यापुढें हळूहळू निर्माण होऊन तेथें आर्यांनीं आपली वसाहत व राज्यें स्थापिलीं. यानंतर आर्यांच्या वसाहती सावकाश होत होत मनुस्मृतीच्या कालीं (डॉ. केतकर- इ.स. २२७) हिमविन्ध्य या मधल्या प्रदेशाला आर्यावर्त हें नांव मिळालें. या काळांत आर्यानीं ज्या एतद्देशीय मूळच्या भौम लोकांस जिंकलें त्यांनां त्यांनीं ‘दस्यु’ हें नांव दिलें. आजच्या रानटी जाती, या दस्यूंचेच वंशज होत. अगस्त्याने दख्खनमध्यें केव्हां प्रवेश केला तें समजत नाहीं, पण ख्रिस्तपूर्व अनेक शतकांच्या आधीं ही गोष्ट घडली होती. त्याच्यानंतर उपाध्याय व तपस्वी ब्राह्मणवर्गानें हें वसाहतकर्म पूर्वकिनार्‍याने धीरें धीरें चालविलें होतें असें दिसतें.
या वसाहतीकरणाच्या काळीं दख्खनमध्यें आंध्र, चेर, चोल, पाण्ड्य इत्यादि द्रविडजातीचे व संस्कृतीचे सुधारलेले लोकसमाज व राज्यें अस्तित्वांत होतीं. यांची द्राविडसंस्कृति ही आर्यसंस्कृतिपेक्षां अत्यंत भिन्न होती. त्यांच्यांत चातुर्वर्ण्यासारखी कल्पना नव्हती, व भूतपिशाच्यादि निसर्गपूजा सुरू होती. आर्यांनीं या भूतपिशाच्यांनां निरनिराळीं नांवे देऊन आपल्या देवांत त्यांचा समावेश करून घेतला व द्रविड समाजास चातुर्वर्ण्याची दीक्षा दिली. तरीपण, अद्यापि या द्राविडी लोकांत मूळच्या बर्‍याच कल्पना व चालीरीती प्रचारांत आहेत. स्मिथ म्हणतो कीं, या लोकांत सांप्रत क्षत्रिय व वैश्य हे वर्ण अस्तित्वांत नाहींत आणि सांप्रतच्या कांही जातींच्या, आपण क्षत्रिय आहोंत, हें ठरविण्याच्या हास्यकारक प्रयत्नांनींहि या दोन वर्णांचें अस्तित्व सिध्द होत नाहीं (अ.हिं. इ. १४). पण हें लिहितांना स्मिथ असंशोधक ब्राह्मणी कल्पनांस बळी पडला आहे. खरें पाहिलें असतां यांच्यांत लग्नाच्या व वारसांच्या कांही चाली, इतर हिंदु लोकांच्या चालींपेक्षां भिन्न आहेत. यांची लेखलिपी (वत्तेलुत्तु) ही ब्राह्मी लिपीपेक्षां व्हिन्सेंट स्मिथ यांस निराळी दिसते. तथापि पं.टी. गोपीनाथराव यांनीं त्रावणकोर आर्किआलाजिकल सीरींजमध्यें ग्रंथलिपीचा व अर्वाचीन तामील, तेलगू लिपींचा उद्भव ब्राह्मीपासूनच दाखविला आहे. मि. चोकलिंगम् पिल्ले यांनीं (इंडियन रिव्ह्यू, जुलै १९११) असें म्हटलें आहे कीं, तामीळ देशांत सव्य जातीमध्यें समाजांतील बर्‍याच जातींचा म्हणजे ब्राह्मणापासून परियासारख्या अस्पृश्य जातींपर्यंत सर्व जातींचा समावेश होतो आणि वाम जातींत फक्त धंदेवाईक जातींचा समावेश होतो. या धंदेवाईक ब्राह्मणेतर जातींनीं बहुजनसमाजाच्या समजुतीविरुध्द बंड केल्यामुळें त्या अलग झाल्या आहेत. या जातींची एकंदर संख्या सुमारें १० आहे. असो. प्राचीनकाळापासून तामील देशांत (तामीलकम्, तामीळनाडू), सोनें, मोतीं, मोत्यांचे शिंपले, शंख, मिरीं, गोमेदरत्न, हिरे व कापसाचें तलम कापड इत्यादि किफायतशीर पदार्थ उत्पन्न होत असत व त्यासाठीं परदेशच्या व्यापार्‍यांची ये-जा या देशांत तेव्हापासून सुरू होती. त्याचा परिणाम असा झाला कीं, दख्खनच्या या भागांतील व्यापारी बंदरें व उतारपेठा या फार श्रीमंत बनल्या व त्यामुळें द्रविडी लोकांची संस्कृति बरीच सुधारली. शिवाय, द्रविडलोक हे समुद्रगमनाचा अडथळा मानीत नसून स्वतः परदेशीं व्यापारासाठीं जातहि असत. तथापि, या काळचीं ऐतिहासिक साधनें अत्यंत अल्प आढळल्यानें जगांतील एका मानववंशाचा खरा इतिहास अद्यापि लिहिला गेला नाहीं आणि दख्खनमधील या लोकांच्या व राष्ट्राच्या इतिहासाशिवाय सबंध हिंदुस्थानचा इतिहास लिहिला जाणें शक्य नाही. (स्मिथ; इंपे., ग्याझे. २ व ४; प्रहिस्टॉरिक ऍंटिक्विटीज; फूट- कॅटलॉग ऑफ प्री. हिस्टॉ. ऍंटि. मद्रास; आर्किआलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया रिपोर्टस्; लोगन- ओल्ड सर्व्हे चिप्ड स्टोन्स ऑफ इंडिया; ग्रिअर्सन- लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया सेन्सस रिपोर्टस् १९०१-११-२१; एल मोअर- द्रवीडियन इन मॉडर्न हिंदुइझम; लो. टिळक- ओरायन- व आर्क्टिक होम इन दि वेदाज).

सांप्रतच्या जाती अन्न व लग्नव्यवहारांत लखोट बंद झालेल्या आहेत. त्याविरुध्द वर्तन घडल्यास जातिबहिष्काराची शिक्षा जातगंगेकडून मिळत असे. आज चोहोंकडे नियम शिथिल झाले आहेत.

जातिभेद ही समाजाची अव्यवस्थित स्थिति होय. चातुर्वर्ण्य हें समाजाकडे कांहीं नियमानें स्पष्टीकरण करण्यासाठीं काढलेलें तत्त्व होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या प्रकारच्या ४ वर्गांनीं समाज पूर्णत्वास जातो. ही भारतीयांची कल्पना फारच प्राचीन म्हणजे मूलगृहकालीन असावी (पुरुषसूक्त पहा.) हिचा अवशेष प्राचीन ग्रीक- इराण्यांतहि आढळतो. वर्ण याचा मूळ अर्थ जाती नसून वर्ग होता तसेंच मूळच्या चार वर्णाचा (म्हणजे त्यांच्या कपड्यांचा अथवा अंगांचा) रंग पांढरा, तांबडा, पिवळा व काळा असून त्यावेळीं त्यांनांच अनुक्रमें ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र म्हणत, असें राजवाड्यांसारख्या कांही विद्वानांचें म्हणणें आहे. पण स्पष्टीकरण करण्याकरतां कांही तरी काढलेली शक्कल या पलीकडे त्या म्हणण्यास महत्त्व देतां येत नाहीं. ॠग्वेदकालीं ब्राह्मणादि चार वर्गास वर्ण हा शब्द लागतच नव्हता. वर्ण हा शब्द आर्य व दास यांसच लावला जाई. परंतु कातडीचा रंग हा अर्थ ॠग्वेदांतील वर्ण शब्दाचा नसून वर्ण याचा अर्थ मत किंवा आचार किंवा संप्रदाय यांच्याजवळ जवळ होतो. तत्कालीन आर्यवर्ण आणि दासवर्ण हें वर्णाभिन्नत्वहि कातडीच्या रंगभिन्नत्वावर उभारलें गेलें नसावें असें ज्ञानकोश वि. ३ मध्यें मांडलें आहे. बौध्द धर्मामुळें जातीं मोडण्याऐवजीं त्या जास्त बळकट झाल्या. मनुस्मृति वर्ण व जाती यांत भेद मानते. हा स्मृतिकार वर्ण मानतो, पण जाती मात्र ५० मानतो; तसेंच या चार वर्णांत जन्मल्यानेंच आपापल्या वर्णाचा अधिकार ज्याला त्याला मिळतो, इतरांनां मिळत नाहीं, असें तो दिग्दर्शित करतो. या जाती वाढतां वाढतां ३००० पर्यंत वाढल्या आहेत. सुप्रसिध्द इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो कीं, हिंदुस्थानांत विद्यमान असलेल्या जातींचें वर्गीकरण करतांना हल्ली क्षत्रिय, वैश्य व शूद्र या नांवांनां कांही विशिष्ट अर्थ राहिलेला नाहीं. उत्तर हिंदुस्थानांत जातीविषयक तंटेभांडणांत व पुस्तकांत मात्र वैश्य व शूद्र हीं नांवे आढळतात. दख्खनमध्यें ब्राह्मणांशिवाय बाकीचे सर्व हिंदू हे शूद्र या नामाभिधानाखालीं येतात; कारण क्षत्रिय व वैश्य हीं नांवें तिकडे प्रचारांत नाहींत. स. १९०१ च्या मद्रास इलाख्याच्या सेन्सस रिपोर्टात, ब्राह्मण ३.४ टक्के व शूद्र ९४. ३ मिळून एकंदर लोकसंख्येंत हे दोनच वर्ग शेंकडां ९७. ७ प्रमाणांत दाखविले आहेत. बाकीची क्षुल्लक संख्या कांहीं तेलंगी व कानडी लोकांची असून, ते मात्र स्वतःस क्षत्रिय व वैश्य म्हणवितात. (अ.हि. इ. ३५). ॠग्वेद-मंत्रकालीं या चार वर्गांनां पडलेली वर्ण ही संज्ञा यजनवैशिष्टयामुळें पडलेली असावी. वर्ण हा शब्द पर्शुभारतीय असून त्याचा अर्थ प्रांतिक वैशिष्ट्य व संप्रदाय असा असावा. चातुर्वर्ण्याची मुख्य इमारत, समाजांत, याजनशिक्षण, रक्षण, व्यापार व दास्य या क्रिया आहेत आणि त्यांच्या अन्योन्याश्रयावर समाज रचला गेला आहे, या कल्पनेवर उभारलेली आहे. प्रथण हे ४ वर्ण वर्गस्वरूपाचे होते. ब्राह्मणवर्ग हा भारतीय युद्धाच्या सुमारास जातिरूप पावला आणि पुढें ब्राह्मणांतहि हजारों जाती लोकांस दिसू लागल्या. त्यामुळें वर्ण व जाती या एकच असाव्यात आणि मूळ चार जाती असून मिश्रणानें किंवा संस्काररूपानें त्यांच्या शेंकडों जाती उत्पन्न झाल्या असाव्यात अशा कल्पना उत्पन्न झाल्या. मूळचे ४ वर्ण हे ४ क्रियांच्या स्वरूपांत होते. पुढें त्या ४ वर्णांनां भिन्नभिन्न संस्कार चालू झाले; त्यामुळें चातुर्वर्ण्य भिन्नकर्मांकित व भिन्नसंस्कारांकित झालें; मात्र त्यामुळें त्या वर्णात असंगति उत्पन्न झाली. म्हणजे संस्कार ब्राह्मणाचें व कर्म शूद्राचें होऊं लागलें. त्यासाठीं आपध्दर्म निर्माण झाला. बौध्द, जैन, चार्वाक इत्याहि पाखंडे सूत्रकालांत उत्पन्न झाल्यानें क्षत्रियवैश्यादिकांत वैदिक परंपरेचा फारसा प्रसार न होतां उलट लोप झाला व त्यामुळें ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण देशांत आहेत अशी कल्पना पसरली. चातुर्वर्ण्याचा शासनशास्त्रावर काय परिणाम झाला तें नक्की कोठें आढळत नाहीं. चातुर्वर्ण्याच्या तत्त्वाच्या दृष्टीनें अस्पृश्य वर्गाचें निराळें अस्तित्व संभवत नाहीं. त्यामुळें त्यांची गणना शूद्रांतच झाली पाहिजे. (ज्ञा. को. चातुर्वर्ण्य विभाग १३). बौध्द व जैनधर्मातील अहिंसा तत्त्वाचा समाजावर परिणाम झाला व त्यामुळें मांसाहार करणारे ब्राह्मण आणि मांसाहार करणारे ब्राह्मणेतर यांत अंतर उत्पन्न झालें. सामाजिक संबंध कमी कमी होत गेला व जातिभेद वाढला. मुसुलमानांच्या संबंधामुळेंहि हिंदुसमाजावर जातिभेद पक्का करण्याचा अनिष्ट परिणाम झाला. हल्लीं आढळणारें त्याचें जातिभेदामुळें स्थाणुस्वरूप त्याला आलें. पूर्वी पर्शु, दरद, शक वगैरे बाह्य म्लेंच्छांनां व्रात्यक्षत्रिय समजून त्यांना व्रात्यस्तोमानें चातुर्वर्ण्यात जागा मिळे. तसें पुढें होईनासें झालें. जातिभेदाचे गुणदोष पुष्कळांनीं वर्णिलेले आहेत पण अद्यापि त्याचें अविकृत स्वतंत्र व साग्र विवरण कोणी केलें नाहीं. कर्ममीमांसा, पुनर्जन्म व त्रैगुण्य या धार्मिक तत्त्वज्ञ नामक चातुर्वर्ण्याचें व त्याच्या अनुषंगानें जातिभेदाचें समर्थन जुन्या हिंदु ग्रंथकारांनीं केलें आहे हें डॉ. केतकर यांनी दाखविलें आहे व ते केतकरांचें मत समजून व्हिन्सेंटास्मॅथनें त्यांस संमति दाखविली आहे. यासंबंधांत स्मिथचें म्हणणें असेंहि आहे कीं, हिंदुस्थानांतील सांप्रतच्या आणि भावी सुधारकांनां हिंदुस्थानांतील जाती कधींहि व केव्हांहि समूळ नामशेष करतां येणार नाहींत; कारण हिंदुस्थानाला त्यांचा उपयोग होणारा आहे. त्यामुळें फक्त चालू परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांत योग्य ते फेरफार करावेत म्हणजे झालें (इ. हि. इ. ४२)
[मॅकडोनेल- हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर; वेबर- हि. अ.सं. लि; व्हिटने, लॅनमन- अथर्ववेद; मॅक्स मुल्लर-चिप्स फ्रॉम ए जर्मन वर्कशॉप; कोलब्रुक- मिसेले-निअस एसेज्; मॅनिंग- एन्शन्ट ऍंड मिडिव्हल इंडिया; फ्रेझर- लिटररी हिस्टरी ऑफ इंडिया; लो. टिळक- ओरायन व आर्क्टिक होम इन दि वेदाज; पार्गीटर- डिनॅस्टीज ऑफ दि कली एज; डॉ. केतर- हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया; रामशास्त्री- दि इव्होल्यूशन ऑफ कास्ट; ज्ञानकोश विभाग २, ३ व १३].

सूतसंस्कृतिकाल (ख्रिस्तपूर्वी ३५००- ते २१००)- पुराणांनां निव्वळ काल्पनिक कथा मानणार्‍यांचा काल आंता गेला. त्यांत ऐतिहासिक माहिती असते, मात्र ती तिचें निष्कर्षण करण्यासाठीं संशोधनशास्त्रांमध्यें बरीच गति झाली पाहिजे असें आतां विद्वान पंडितांचें म्हणणें आहे. पुराण म्हणजे पुरातन घडलेला इतिहास. आज उपलब्ध असलेल्या पौराणिक कथांपैंकी कांही भाग दाशराज्ञ युद्धापूर्वीच म्हणजे ॠग्वेदांतील अत्यंत प्राचीन सूक्तांपूर्वीचा आहे. पुराणें सांगणें हा धंदा सूतजातीचा असून तो वेदपूर्वकालीन आहे आणि यजुर्वेदीय संहिता व ब्राह्मणें या कालापासून ब्राह्मणी संस्कृतीचा संस्कार पावून चालत आला आहे. हे सूत म्हणजे अर्वाचीन भाटंसारखे असून त्यांच्याजवळ राजवंशावळी व राजवंशकथासंग्रह असे. निरनिराळ्या दीर्घकालीन सत्रांत या कथांचें ते संकीर्तन करीत; म्हणजे अशी कथासंग्रहरूपी पुराणें एक प्रकारें सूतसंस्कृतीचें वाङ्मयच होय. ही संस्कृति बहुधां गंगेच्या पूर्वेकडील प्रदेशांत जास्त फैलावली होती त्यावेळीं हिचा प्रसार इतका झाला होता आणि त्या संस्कृतीचें समाविष्टीकरण वैदिक लोकांस इतकें अवश्य वाटलें होतें कीं, त्यामुळें इतिहासपुराणांनां पांचवा वेद हें नांव मिळालें. या इतिहासपुराणांचा मांत्र वाङ्मयांत व्रात्यस्तोमकांडाशिवाय इतरत्र थोडाच उल्लेख आढळतो.

पौराणिक वंशावळ्यांत पुढच्या वंशावळींचें मागच्यांशीं संबंध दाखविलेला सांपडत नाहीं. निरनिराळ्या वंशावळींचा संबंध परस्परांशीं दाखविण्यासाठीं प्रथम कालैक्य काढावें लागतें. कधीं कधीं एकच नांव अनेक व्यक्तीचें आढळतें त्यामुळें जास्त अडचण उद्भवते. साधारण प्रख्यात असे सूर्य व चंद्र हे दोन वंश राजे लोकांचे आढळतात व ब्राह्मणांत सप्तॠषीचे संप्रदाय प्रमुख मानले जातात. ॠग्वेदीय राजांनां सूर्यचंद्रवंशांचें लोढणें नाहीं. तें सूतसंस्कृतींतील देश्यराजांच्या गळीं अडकवलेलें दिसतें.

सर्व राजघराण्याची दैवी उत्पत्ति या भाटांनीं वर्णिली आहे. वैवस्तमनूच्या इक्ष्वाकु या मुलापासून सूर्यवंश व विदेहवंश व त्याची कन्या इला हिच्या पुरूरवा या मुलापासून चंद्रवंश निघाला. मनूपासून निघालेल्या यादव, पौरव, काशी, सूर्य, दिष्ट, अनु या वंशांपैकी यादव, सूर्य व विदेहघराण्यांच्या वंशावळी बर्‍याच मोठ्या व स्मृतिपरंपरेनें बहुतेक जशाच्या तशा चालत आलेल्या आहेत. पौरव, अनु या वंशांत मध्यंतरी खंड पडलेला दिसतो तर काशी व दिष्ट हे वंश दाशरथी रामाच्या वेळीं लोपलेले दिसतात. बाकीचे वंश कमी महत्त्वाचे असून ते उत्तरकालीं निघाले असावेत. सूर्यवंशाची वंशावल दैवी उत्पत्ति वर्णन करण्यासाठीं आणलेले पहिले काल्पनिक पुरुष सोडून दिले असतां बहुतेक खरी आहे असें वाटतें, व तिच्यांतील राजांशीं इतर वशावंळींतील कांहीं कांहीं राजांचें कालैक्य आढळतें. या कालैक्यावरून इतिहासाचे धागे गुंतविण्यांत आले आहेत ते पुन्हां पुन्हां तपासून इतिहासाचि गति अधिक निश्चित केली पाहिजे.

चंद्र ऊर्फ सोमवंशी मतिनारराजा हा सूर्यवंशी प्रसेनजिताचा समकालीन असावा.

(१) प्रसेनजित हा इक्ष्वाकूपासून १८ वा वंशज होता. इक्ष्वाकूचा काल पुढें ठरविला आहे. यादववंशी शशबिन्दु याचा बाप हा मतिनाराचा समकालीन असावा.

(२) विश्वामित्र, त्रिशंखु, हरिश्चन्द्र व जमदग्नि हे सर्व समकालीन असून जामदग्न्य (परसु) राम हे एका वेळचे असावेत.

(३) काशीराज, प्रतर्दन व सूर्यवंशी सगर हे समकालीन असून त्यांनीं तालजंघ हैहय यांचें वर्चस्व मोडलें होतें.

(४) दिष्ठवंशी चक्रवर्ती मरुत्त या जामदग्न्यरामाचा समकालीन असावा.

(५) पौरववंशी भरत व दुष्यन्त हे सूर्यवंशी दिलीप, अंशुमान यांच्या वेळचे होते.

(६) उत्तरपंचाल अजमीढ हा सूर्यवंशी ॠतुपर्णकालीन असावा व पंचाल सृंजय हा दाशरथीरामकालीन असावा.

(७) यादववंशी भीम हाहि रामकालीन होता. पौरववंशी कुरु हा पंचाल सोमकाच्या वेळीं झाला.

(८) चेदी व मगध हीं घराणीं स्थापणारा चैद्य उपरिचर वसु हा परिक्षिति पुत्र (दुसरा) जनमेजयानंतर झाला.

सारांश इक्ष्वाकूपासून भारतीय युद्धापर्यंत झालेल्या या निरनिराळ्या राजवंशांनीं ठोकळ मानानें १८६० (९३ पिढ्या) वर्षाचा काल व्यापलेला असावा. इक्ष्वाकूचा ९३ वा वंशज भारतीययुद्धांत हजर होता. यावरून हें अनुमान साधारणतः देश्यराजांचें केलेलें आहे.
दाशराज्ञ ऊर्फ वैदिककाळ (ख्रिस्तपूर्वी २१०० ते १५००) दौष्यन्ती भरतावरून हिंदुस्थानास भरतखंड हें नांव मिळालें अशी सर्वसामान्य समजूत चूकीची असून, ॠग्वेदांत आलेल्या भरत या जातीवरून हें नांव मिळालें असें दिसतें (विभाग ३ प्र. ३ पहा). दाशराज्ञ युद्धांत या भरतांबरोबर यदु, अनु, पुरु वगैरे वंश लढत होते व भरत हे सुदास राजाचे मदतनीस होते असें म्हटलें आहे. सुदास हा भरतवंशीयच होता. याच भरतांनीं विपाट व शुतुद्री यांच्या संगमांमधून पुढें भरतखंडांत मार्ग आक्रमण केला होता. हा काल भारतीय युद्धापूर्वी अजमासें ६००/७०० वर्षे असावा.

महाभारतांतील कथांपैकीं अनेक कथा प्राचीन आहेत. नैषध, हरिश्चंद्र, दाशरथीराम, सत्यवान- सावित्री, मांधाता इ. ही मंडळी (दाशरथीरामहि) वेदपूर्वकालीन असावी. श्रीरामाचा काल दाशराज्ञीय सुदासाच्यापूर्वी २०० वर्षापूर्वी येतो. रामकथेची मांडणी तीन भिन्न भिन्न प्रकारची आढळते. जैनांनीं सीतेला रावणाची मुलगी म्हटलें आहे, व बौद्धांनीं तर तिला रामाची बहीण बनविलें आहे.

सूतसंस्कृतीकाळीं जवळ जवळ आजच्यासारखी शिवविष्णुपूजा असावी. ॠग्वेदीय विष्णु व सूतसंस्कृतीय विष्णु हे थोडेसे भिन्न दिसतात. यावेळी महादेवाचें पूजन लिंगस्वरूपांतहि होत असावें; या संस्कृतीच्या लोकांत मगानुयायी शकहि असावेत. इंद्राचें महत्त्व यावेळीं प्रजापतीस मिळालें. तसेंच स्थानिक दैवतांनां प्राधान्य देऊन मंत्रांस व क्रियांसहि महत्त्व दिलें आणि याप्रमाणें आपला श्रौतधर्म स्थानिकांस प्रिय होईल असें केलें. यावेळी अग्नियजनधर्म कमी होत चालला होता आणि आरण्यकीयधर्म वाढून त्यानें देश्यसंस्कृतीचें पुनरुज्जीवन व मांत्रसंस्कृतीचा विनाश चालविला होता. या आरण्यकीय धर्मातूनच जैन व बौध्द धर्माचीं मुळें उत्पन्न झालीं.

भरतखंडांत प्राचीनकाळीं राजे व ब्राह्मण असे दोन श्रेष्ठ वर्ग होते. राजांचा जीवनक्रम म्हणजे त्यांचीं कुटुंबे व राज्यें यांचा प्रपंच करणें. त्यांना कुलमहत्त्व असून ते पूर्वजांचा अभिमान बाळगीत व कुळांचा आणि राज्यांचा विस्तार करीत. ब्राह्मणांमध्यें ॠषींची संप्रदाय परंपरा असे, तर राजांची परंपरा पुत्र (अगर कुल) परंपरा असे. या कारणामुळें राजांच्या वंशावळींनां ब्राह्मणवंशावळीपेक्षां जास्त महत्त्व आलें. सूर्य-चंद्र यादव इ. वंशावळींत ५०।५० पिढ्या आढळतात पण वसिष्ठ जमदग्नि- अत्रि इत्यादि ॠषींच्या लागोपाठ १५।२० पिढ्याहि आढळत नाहींत (गुरुशिष्यपरंपरा मात्र आढळतात), याचें कारण हेंच आहे. राजवंशाची नोंद दरबारी भाटांकडे किंवा पुरोहितांकडे असावी.

पुराणांत पंजाबाकडील खळबळी फारशा येत नाहींत; गंगेच्या पूर्वेकडील विशेष येतात. पांडवांचे पैतृक देश जे उत्तरकुरु व उत्तरमद्र, त्यांवरून असें वाटतें कीं, मंत्रकालीन आर्याचें आगमन जसें खैबरघाटांतून झालें असावें, तसें देश्य संस्कृतीच्या आर्याचें आगमन उत्तर कुरुमार्गानें झालें असावें. रामायण, महाभारत व पुराणें यांत, उत्तर- पूर्व- पश्चिम हिंदुस्थानांतील प्रख्यात राजांच्या वंशावळी व कथा दिलेल्या आढळतात. या कथांचें मूळस्वरूप पुढीलप्रमाणें मांडलें गेलें आहे. मूळ दोन राजवंश होते; सूर्यवंश आणि चंद्रवंश. सूर्याचा उर्फ विवस्वताचा पुत्र मनु हा सूर्यवंशाचा मूळपुरुष व चंद्र उर्फ सोम याचा पुत्र ऐल पुरूरवस् हा चंद्रवंशाचा मूळ पुरुष होता. सूर्यवंशीय राजांचीं अयोध्या, विदेब व वैशाली येथें तीन पृथक् राज्यें होतीं; पैकीं अयोध्येचें घराणें श्रेष्ठ होते. चंद्रवंशांत पुढें पौरव, यादव, अनु, द्रुह्यु व तुर्वस हीं पांच घराणीं निघालीं. पैकीं पौरवांनीं उत्तर हिंदुस्थान, यादवांनीं पश्चिम हिंदुस्थान व दक्षिण, अनुराजांनीं पंजाब व पूर्वहिंदुस्थान व द्रुह्यूनीं वायव्य सरहद्दीकडील प्रदेश या ठिकाणीं राज्यें स्थापिलीं. या सर्वांत हस्तिनापूरच्या पौरव राजघराण्यास श्रेष्ठ मानीत. उत्तरेकडची सर्व राजघराणीं सूर्यवंशांत आणि चंद्रवंशांत बसविणें आणि तीं दोन्हीं वैबस्वतापासूनच उपजविणें हा अर्थात् भाटविद्येचा भाग होय. सर्व राजघराण्यांचा गौरव करण्याची ही युक्ति असली पाहिजे असें वाटतें. निरनिराळ्या राजघराणयांचा आपापसांत लग्न संबंध असे व अशा कालीं हीं घराणीं एका वंशांतलीं आहेत असें मत सहज प्रसृत झालें असावें. सूर्य आणि चंद्र यांस पूर्वत्व कसें मिळालें याविषयीं देखील कल्पना करतां येते. जपानचा मिक्याडो आपणांस सूर्यवंशी म्हणवितो व आपल्या निशाणावर सूर्य ठेवतो. वाल्मीकीनें रामायणांत ज्या लोकांस केवळ वानर म्हटलें आहे त्या किष्किंधा राष्ट्राच्या निशाणावर वानराचें चित्र होतें एवढेंच जैन रामायण सांगतें. एवंच चंद्र, सूर्य हीं ध्वजचिन्हें असावींत आणि त्यांवरून वंश निघालें असावेत अशी कल्पना करण्यास हरकत वाटत नाहीं.

कोसल( अयोध्या) येथील सूर्यवंशाला सर्व पुराणांत अत्यंत श्रेष्ठ मानतात याचें कारण हा वंश पुष्कळ शतकें टिकला होता. परकीय (शक, पल्बव, कांबोज) बाह्यांनीं भरतखंडांत येऊन प्राचीनकाळींहि त्यांचा उत्तरभाग व्यापला होता. त्यावेळीं त्यांनीं या कोसल राज्याखेरीज बाकींच्या राज्यांनां बरेंच खिळखिळें करून टाकलें होतें. कोसल देश हा पूर्वेकडे असल्यानें तो कायम टिकला व त्या राजवंशाची वंशावळी अखंड राहिली. पौरव वसूनें मगधापर्यंत सर्व देश जिंकून आपल्या पांच मुलांत वांटून दिले. या पांच मुलांपासून पुढें मोठमोठीं पांच घराणीं निघालीं. अयोध्येच्या सूर्यवंशांतील निरनिराळ्या पुराणांतील उल्लेखांत अंतर पडतें. भागवत- गरुडादि पुराणांत विदेहवंश हा इक्ष्वाकूच्या निमिपुत्रापासून निघाल्याचें सांगितलें आहे. या वंशांतील जनक हें नांव व्यक्तिनाम नसून गोत्रनाम असावें. सीतेच्या बापाचें नांव सीरध्वज होतें. पुष्कळ ठिकाणीं एकच नांव अनेक व्यक्तींचेंहि आढळतें; त्यामुळें पुष्कळ वेळां त्या त्या व्यक्तींच्या कथा या एका व्यक्तीवर लादल्या जातात. सर्व वंशजांनां मूळपुरुषाच्या नांवानेंहि संबोधण्यांत येतें. सूर्यवंशाचा उपाध्याय नेहमीं वसिष्ठच आढळतो, त्यावरून वसिष्ठ हें नांव त्या कुलाची पंरपरा दाखवितें. यादव वंशाविषयीं सर्व आधारांची एकवाक्यता आहे. याच कुलांत हैहय व तालजंघ या दोन शाखा प्रसिध्द झाल्या. पौरव वंशांतील पिढ्यांबद्दल महाभारताखेरीज बाकींच्या पुराणांत एकवाक्यता आढळते. अहिच्छत्र येथील उत्तरपंचालवंश ॠग्वेदांत येतो. त्याच्या दोन शाखा सृंजय व सोमक ह्या ब्राह्मणांत येतात. कांपिल्य येथें दक्षिणपंचालवंश होता. कान्यकुब्ज येथील वंशांत गाधि व विश्वामित्र झाले. काशी येथें काशीवंश होता. ययातीपुत्र अनु याचे वंशज पंजाब, मद्र, वृषदर्भ, केकय, शिबि या देशांत व पूर्वेकडे अंग देशांत होते. जयद्रथ हा या (वडील) अंगशाखेचाच होता व कर्णहि त्याच (धाकट्या) शाखेचा होता. मनूच्या दिष्ट (नेदिष्ट) पुत्राच्या वंशाला वैशाली म्हणूं लागले. व वैशाली ही त्याची राजधानीहि होती.

विश्वामित्राची कथा लक्ष्यांत घेतांना प्रथम या नांवाचे पुष्कळ पुरुष झाल्याचें ध्यानांत ठेविलें पाहिजे. उ. हरिश्चंद्रकालीन विश्वामित्र व शकुंतलेचा पिता विश्वामित्र. प्रख्यात विश्वामित्र हा या विश्वामित्रगोत्राचा मूळ पुरुष असून कान्यकुब्ज देशच्या गाधीराजाचा पुत्र होता व त्याचें क्षत्रिय नांव विश्वरथ होतें. त्याचा सूर्यवंशाशीं निकट संबंध होता. त्याची आई सूर्यवंशांतीलच होती. याची बहीण सत्यवती ही प्रख्यात जमदग्नि ॠषीची आई होय व याच जमदग्नीचा पुत्र परशुराम होय. जमदग्नि व विश्वामित्र हे एकाच वेळी जन्मले होते. विस्वामित्राच्या मामाच्या घराण्यांतीलच त्रिशंकु राजा होता म्हणून वरिष्ठाविरुध्द विश्वामित्रानें त्याचा पक्ष धरला. या त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद् व विश्वामित्र यांची कथा प्रसिध्दच आहे; तींतच शुनःशेप हा येतो व त्याला विश्वामित्र आणि शुनःशेप यांच्या कथेची कृत्रिम जुळणी ही उत्तरकालीन श्रौतधर्मसंपादकांची कामगिरी आहे असें वाटल्याशिवाय राहत नाहीं. जामदग्न्य (परशु)राम हा हैहयर्कातवीर्यार्जुनाचा समकालीन होता. याची कारकीर्द हरिश्चंद्र व जमदग्नि यांच्या वेळेपासून सुरू झाली. हैहयकुल व जमदग्नीचें भार्गवकुल यांत वैर होतें. त्यामुळें या धांदलींत पल्हव, पारद, कांबजो, पर्शु(पारशी) इत्यादी बाह्यांनीं भारतवर्षांत प्रवेश करून धुमाकूळ घातला असावा व त्यांचा निःपात पर्शुरामानें केला असावा आणि त्यामुळें त्यानें २१ वेळां पृथ्वी निःक्षत्रिय केल्याची कथा उद्भूत झाली असावी.

श्रीराम व त्याचा बाऊ शत्रुघ्न यांचा यादव घराण्याशीं संबंध जोडणारी एक कथा आहे. इतर पुराव्यावरून तींत थोडेसें तथ्य आढळतें. शत्रुघ्नानें मधुवन तोडून तेथें मथुरा राजधानी स्थापिली. यादव वंशांत शत्रुघ्नाचा समकालीन राजा भीम म्हणून होता; या भीमाचा पूर्वज एक मधु याच नांवाचा होता. श्रीरामाच्या मृत्यूनंतर या भीमानें मथुरा काबीज केली.

पंचाल हें नंव पंच अलम् या शब्दांवरून निघालें अशी कित्येक व्युत्पत्ति देतात. सृंजय राजास पांच मुलें होतीं; त्यांच्याबद्दल त्यानें माझीं पाच (पंच) मुलें पांच राज्याचें रक्षण करण्यास समर्थ (अलम) आहेत, असे उद्गार काढल्यामुळें हें नांव पुढें आलें. तत्पूर्वीचें क्रिवि हें नाव होतें. हें घराणें पृषताच्या काळीं नामशेष झालें.

पुरूंचें राज्य मध्यदेशाच्या मध्यभागीं असल्यानें व तो प्रदेश नेहमी युध्दमान राष्ट्रांची रणभूमि बनत असल्यानें, त्यांत अंदाधुंदी माजून पुरूरव्यापासून मतिनारायपर्यंत चालत आलेली या पौरववंशीयांची सत्ता मतिनाराचे पश्चात नष्ट झाली असावी. ही सत्ता चक्रवर्ती यादववंशीय शशबिन्दूनें बुडविली. ती सरासरी २० पिढ्या नष्ट झाली होती. ती पुन्हां शकुंतलापति प्रख्यात दुष्यन्तानें स्थापन केली म्हणून त्याला पौरववंशकर म्हणत. याचाच पुत्र चक्रवर्ती भरत होय. याच्यामुळें भरतखंड हें नांव पडलें अशी चुकीची समजूत रूढ आहे. पुन्हां अजमीढ, ॠक्ष व संवर्ण या तीन निरनिराळ्या पिढ्यांत या वंशांत खंड पडलेला दिसतो व त्यावेळींहि या पौरवांची साम्राज्यसत्ता नष्ट झाल्याचें दिसतें. त्यानंतर कुरु यानें पुन्हां आपलें राज्य स्वतंत्र केलें. तें मात्र थेट जनमेजापर्यंत टिकलें. कुरूची प्रजा पुष्कळ होती, त्यानें कुरुक्षेत्रास आपलें नांव देऊन प्रयागापर्यंत राज्याविस्तार केला व पंचालांनां जिंकलें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .