प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

साधनसामुग्री - हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास राजवंशावळींवरून समजण्यास साधारण ख्रिस्तपूर्व ६५०पासून प्रारंभ होतो. कोणत्याहि देशाचा इतिहास बनविण्यास वंशावळीचा फार उपयोग होतो. ग्रीस देशाचा प्राचीन इतिहास असल्याच वंशावळींवरून बनलेला आहे. हिंदुस्थानांत असल्या प्राचीन वंशावळी उपलब्ध असून, त्यांनां पुष्टी देणारी संदर्भात्मक साधनसामुग्रीहि पुष्कळ आढळते. ही सामुग्री संस्कृत, पाली, तामिळ या भाषांत खच्चून भरलेली असून आतांपर्यंत तिच्यांतील थोडासा भाग हिंदी, यूरोपियन व अमेरिकन विद्वानांनीं उजेडांत आणला आहे.

ख्रिस्तपूर्व ६५० पासून ख्रिस्तपूर्व ३२५ पर्यंत म्हणजे अलेक्झांडरच्या मोहिमेपर्यंत, हिंदुस्थानची जी ऐतिहासिक माहिती मिळते, ती साधारण त्रोटकच मिळते. तसेंच निरनिराळ्या राजकालांबदलहि आपल्याला नक्की बोलतां येत नहीं. त्यावेळचे कांही काल(शक) आढळतात; पण ते नक्की केव्हां सुरू झाले याबद्दल अद्यापि विद्वानांत वादविवाद चालू आहेत व पुढेंहि (एखाद्या निश्चित गमकाखेरीज) ते मिटतील असें वाटत नाहीं. उदाहरणार्थ कलिवर्ष, नंदकाल, युधिष्ठिरवर्ष इत्यादि. गुप्तकालाबद्दल सुद्धा अशीच स्थिति होती. परंतु फ्लीट यानें त्याची निश्चिति अलीकडे ठरविली आहे. त्याच्या मतें गुप्तशतक हा इ.स. ३१९- २० या वर्षी सुरू झाला (ज्ञानकोश विभाग, ५ पृ. ११२). या निश्चितीमुळें मात्र गुप्तकालाच्या मागच्या अनेक प्रसंगांचें काल ठरविण्यास मदत झाली. बाह्यांचं (कुशान, शक इ.) शिलालेख आपल्या देशांत बरेच आढळतात; त्यांत नुसतीं वर्षें दिलेलीं असतात, पण त्यांवरून अमुक एका शकाचा काल स्वच्छ होत नाहीं. हिंदुस्थानांत एकंदर निरनिराळे ३० शक चालू होते. कनिंगह्यामनें ही संख्या २७ दिली आहे (बुक ऑफ इं. ईराज). सारांश, या कालविषयक अनिश्चितीमुळें हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाचें बरेंच नुकसान झालें आहे.
कालैक्यसंशोधनाच्या युक्तीनें हा प्रश्न थोडा फार सोडविला जातो. उदाहरणार्थ, अलेक्झांडरच्या वेळीं चंद्रगुप्त मौर्य झाला; समुद्रगुप्ताचा समकालीन मेघवर्ण हा सीलोनचा राजा होता; इत्यादि. हिंदुस्थानचा इतिहास लिहितांना परकीय लोकांनीं लिहिलेले हिंदुस्थानविषयक ग्रंथ लक्ष्यांत घेणें जरूर आहे. चिनी, सिलोनी, ग्रीक, अरबी व मुसुलमानी ग्रंथकारांनीं आपापल्या ग्रंथांत कालांचा उल्लेख केलेला असतो. मात्र, त्यांची परस्परांशीं व हिंदुस्थानांतील तत्कालीन चालू शकांशीं एकवाक्यता करण्याचें अवघड काम करावें लागतें; ही गोष्ट लक्ष्यांत ठेवून मग त्यांचा उपयोग करावा.

हिंदुस्थानच्या ऐतिहासिक साधनसामुग्रीचे ठोकळ भाग पुढीलप्रमाणें करितां येतील. (१) शिलालेख, ताम्रपटादि अंकित लेख. (२) नाणीं, पदकें, मुद्रा. (३) पुराणवस्त्वावशेष. (४) पुराणें, दंतकथा. (५) ऐतिहासिक लिखाण, व (६) तत्कालीन परकीय लोकांनीं लिहून ठेवलेले वृत्तांत. शिलालेखांतील अत्यंत प्राचीन शिलालेख ख्रिस्तपूर्व३ र्‍या शतकापासूनचेच आढळतात. त्यांत महत्त्वाचे असे अशोकाचे शिलालेख होत. ते त्यानें कोरलेल्या धर्मविषयक आज्ञा होत. अजमेर व धार येथें ज्यांवर नाटकांतील कांही प्रसंग कोरलेले आहेत अशा लेखशिला आहेत; तर चितोडास वास्तुशास्त्रावरील एक टीका एका शिलेवर खोदली आहे; आणि पुदुकोट्टाई संस्थानांत एका शिलेवर वीणा कशी वाजवावयाची यासंबंधीं कांही सूचना व खुणा आढळल्या आहेत; धातूंच्या पत्र्यावरचे लेख (विशेषतः ताम्रपट) बहुधां दानविषयक असतात. त्यांत सर्वांत प्राचीन (ख्रिस्तपूर्व अजमासें २००) असा सोहगौर ताम्रपट असून, तो सरकारी धान्यागारविषयक आहे. हिंदुस्थानांत हीं (शिलालेख- ताम्रपत्रें) साधनें हजारों आहेत. नाणकशास्त्राचा अभ्यास करण्यास विशेष ज्ञान लागतें. नाण्यामुळें कालाचा बोध फार स्पष्ट रीतीनें होतो. इंडो- ग्रीक व इंडो- पार्थियन या राजवंशांचा इतिहास नाण्यांमुळेंच उजेडांत आला, व भीतरी येथें सांपडलेल्या चांदीच्या मोठ्या मुद्रेवरून दुसर्‍या कुमारगुप्ताची माहिती मिळाली. पुराणवस्तावशेषशास्त्रांत यांचीच माहिती बहुधां असते. वेगवेगळ्या अवशेषांवरून अमका राजवंश अमक्याच्या नंतर किंवा पूर्वी झाला हें सांगतां येतें. तक्षशिला शहर उकरून काढल्यानें कुशान राजवंशाचें कोडें बरेंचसें सुटलें. स्तूप, राजवाडे, देवळें, खाजगी घरें, सांडपाण्याच्या मोर्‍या इत्यादि अवशेषांवरून तत्कालीन परिस्थितीवर बराच उजेड पडतो. तसेंच मूर्ती, भित्तीलेपचित्रें, कोरलेली चित्रें, लेणीं वगैरेंच्या अभ्यासानें हिंदी ललितकलेतींल अनेक अंगांची माहिती मिळते आणि जुन्या दंतकथा व पुराणें यांतून आलेले एतद्विषयक उल्लेख ताडून पहातां येतात. आपला धार्मिक इतिहास खराखुरा जाणावयाचा असल्यास वरील गोष्टींचा अभ्यास (धार्मिक ग्रंथांच्या जोडीला) अवश्य आहे. जेथें इतर कांहीच साधनें नाहींत तेथें दंतकथांचा उपयोग होतो. पुराणांतून व व्याकरण ग्रंथांतून (फार थोड्या) अशा अत्यंत प्राचीन दंतकथा सांठविलेल्या असतात. सर्वच पुराणें म्हणजे निव्वळ दंतकथा होत असें नाहीं, तरी पण त्यांत आलेला इतिहास बर्‍याच काळजीनें निवडून घ्यावा लागतो. पुराणांप्रमाणेंच निरनिराळ्या वंशावळी (राजावलींचीं बाडें) पासूनहि ऐतिहासिक माहिती थोडीशी निघते. आपल्याकडे इतिहास लिहून ठेवण्याची पध्दत नव्हती असें कांहीं विद्वानांचें म्हणणें आहे, तें बरोबर नाहीं. बहुतेक राज्यांत राजाचें एक वंशपरंपरा भाटा (बंदी) चें घराणें असे व त्याच्याजवळ त्या राजवंशाची वंशावळी व महत्त्वाच्या गोष्टींचें टांचण असे. नामांकित कवी किंवा भाट या वंशावळींवरून त्या राजवंशाचा इतिहास लिहित. स्वतःच्या आश्रयदात्या राजवंशाप्रमाणेंच त्या देशावर आलेल्या अनेक राजवंशांचा किंवा व्यक्तिशः एखाद्या राजाचा इतिहास हे बंदीजन लिहीत असत व केव्हां केव्हांतर त्या इतिहासांत पुढें वेळोवेळीं भरहि पडत असे. असलीं प्रमुख उदाहरणें म्हणजें पृथ्वीराजरासा, राजतरंगिणी, हर्षचरित्र, व्द्याश्रय वगैरे होत. ही परिस्थिति मुसुलमान इकडे येण्यापूर्वी कायम होती. त्यांचा प्रवेश इकडे झाल्यावर त्यांनीं हे (व इतर अनेक) ग्रंथसंग्रह जाळून टाकले. तत्कालीन मुसुलमानांनां प्राचीन ग्रंथसंग्रह जाळण्याची विशेष वाईट खोड होती हें प्रसिध्दच आहे. प्राचीन परकीय इतिहासकारांपैकी हिरोडोटसटेसिअस (ख्रिस्तपूर्व ५ वें शतक) या ग्रीक इतिहासकारांनीं व मेग्यास्थिनीसनेंहि हिंदुस्थानची त्यावेळची त्रुटित माहिती दिली आहे. मात्र उलट अलेक्झांडरची माहिती कोणाहि ग्रंथकारानें स्पष्टपणें कोठेंहि दिलेली आढळत नाहीं. इ.स. ४०० ते ७०० या दरम्यान अनेक (६३) चिनी प्रवाशी आपल्या देशांत यात्रेसाठीं व बौध्दधर्माच्या अभ्यासासाठी येऊन गेले; त्यांनीं सुद्धा बरीच माहिती लिहून ठेविली आहे. फाहिआन हा पहिला प्रवासी होता (३९९-४१४), त्यानें चंद्रगुप्त विक्रमादित्याची हकीकत दिली आहे. ह्युएनत्संग (युएनच्वंग) यानें ७ व्या शतकांत इकडे येऊन हर्षवर्धनाची हकीकत व इतर अनेकविध उपयुक्त माहिती लिहिली आहे. मुसुलमानी इतिहासकारांत इतिहासलेखनाची दृष्टि ज्याला होती असा अल्बेरूणी हा एक होय. तो स्वतः विद्वान असून त्यानें संस्कृत भाषेचा अभ्यास करून तहकीक-ई-हिंद (हिंदुस्थानची माहिती) हा ग्रंथ लिहिला. हा अकराव्या शतकांत महमूद गझनीकर याच्याबरोबर इकडे आला होता. ऐने- इ- अकबरी, फेरिस्ता (याचाच आधार एलफिन्स्टनच्या हिंदुस्थानाच्या इतिहासास आहे), इलियन व डॉसन यांनीं प्रसिध्द केलेल्या निरनिराळ्या फारशी बखरी, तबकात - इ- नासीरी वगैरे परकीय भाषेंतील इतिहासग्रंथांत हिंदुस्थानची माहिती पुष्कळच आढळते. मात्र ही माहिती मुसुलमानांचा प्रवेश झाल्यानंतरची आहे; व तीहि बहुतेक त्यांनींच लिहून ठेवलेली आहे. तींत ठळक दोष म्हणजे स्वजातिगौरव व हिंदुजातीविषयीं व व्यक्तींविषयीं बराचसा विपर्यस्त मजकूर देणें हा होय. त्यामुळें असल्या ग्रंथांतील माहिती काळजीपूर्वक तपासून घेतली पाहिजे. पंधराव्या शतकापासून यूरोपियन प्रवासी इकडे येऊं लागले, त्यामुळें त्यांच्याहि प्रवासवृत्तांत हिंदुस्थानची माहिती आढळते. महाराष्ट्रांतील प्राचीन व अर्वाचीन ग्रंथकारांच्या आणि बखरकारांच्या लेखांत विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आढळतो. मोंगलदरबारांत आलेल्या जेसुइट पाद्रयांनीं मिळविलेली माहिती बरीच उपयोगाची होईल. पोर्तुगीज, फ्रेंच, डच व इंग्लिश यांच्या व्यापारी कंपन्या येथें असल्यानें त्यांच्या सरकारी दफ्तरखान्यांत तत्कालीन माहिती पुष्कळ आढळेल. मराठी साम्राज्याचें (रायगड व सातारा येथील) दप्तर बहुतेक नामशेष होऊन जें (पेशव्यांचें )थोडेफार उरलें आहे (पूनादप्तर) त्यांत ऐतिहासिक माहिती फार थोडी आहे असे कै. पारसनीस यांचें म्हणणें होतें. त्याखेरीज मराठी साम्राज्यांतील जीं कांहीं संस्थानें आज जीव धरून आहेत, त्यांच्या दफ्तरखान्यांत तत्कालीन ऐतिहासिक माहिती सांपडण्याचा पुष्कळसा संभव आहे तर इतिहाससंशोधकांनीं इकडे लक्ष पुरवावें.

[कनिंगह्याम- बुक ऑफ इंडियन ईराज; माबेल डफ- क्रॉनॉलॉजी ऑफ इंडिया; बर्जेस- क्रॉनॉलॉजी ऑफ मॉडर्न इंडिया; एपि. इंडिका. १२. २२६; आर्किऑलिजकल सर्व्हे रिपोर्टस्; आय्ंगार- एन्शन्ट इंडिया].

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .