प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

इतिहासाचीं भौगोलिक कारणें - हिंदुस्थानच्या इतिहासास आलें तसें स्वरूप येण्यास कांहीं भौगोलिक कारणें आहेत त्यांच्याकडे दृष्टि फेंकली पाहिजे. तो फेंकतांना उत्तर हिंदुस्थान व दक्षिण याचे इतिहास व त्यांची भौगोलिक स्थिति यांची परस्पर संगति लक्षांत घेतली पाहिजे, आणि त्याप्रमाणें हिंदुस्थानीय इतिहासाचीं वैशिष्टयें लक्षांत घेतली पाहिजेत. त्या वैशिष्टयांत हिंदुस्थानचा तुटकपणा विचारास घेतला पाहिजे.

हिंदुस्थानचे साधारण तीन ठोकळ भाग पडतात. एक सिंधु गंगथडीचा हिमालय व विन्ध्य यांमधील आर्यावर्त, दुसरा नर्मदा-कृष्णा यांमधील दक्षिणदेश आणि तिसरा त्याच्या पलीकडील दक्षिणापथ देश. आर्यावर्तालाच पुढें हिंदुस्थान म्हणूं लागले आणि दंडकारण्य धरून दक्षिणापथ या जुन्या प्रदेशाला थोड्या बहुत फरकानें दक्षिण व कर्नाटक हीं नांवें मिळालीं. आर्याचा प्रवेश दक्षिणापथांत होण्यापूर्वी त्यांची वसति बरींच शतकें उत्तरेकडे म्हणजे आर्यावर्तात असल्यानें त्या प्रांताचा इतिहास दक्षिणच्या इतिहासापेक्षां जास्त जुना आहे. पुढेंहि त्या प्रांतांत बाह्यांच्या स्वार्‍या होऊन त्यांचीं राज्यें स्थापन झाल्यानें त्या प्रांतास दक्षिणपेक्षां जास्त महत्त्व आलें व त्यामुळें एका अर्थानें उत्तर हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे सर्व हिंदुस्थानचा इतिहास होय अशी समजूत पसरली.

परकीय किंवा बाह्यांच्या स्वार्‍या फार प्राचीनकाळापासून हिंदुस्थानावर होत आल्या. याला कारण तिकडील पंजाब, अंतर्वेदी व संयुक्तप्रांत यांसारखे सुपीक व सपाट आणि मोठमोठ्या नद्यांनीं सजल असलेले प्रदेश होत. खैबर किंवा बोलन घाटंतून एकदां आंत घुसलें, व सिंधु आणि पंजाबांतील चार मोठ्या नद्या ओलांडण्याची व्यवस्था केली कीं, परकीय शत्रूची दौड थेट हस्तिनापुरापर्यंत येऊन थकडे. त्यापुढें गंगायमुनांचे उतार ताब्यांत घेतल्यास, त्याची स्वारी पाटलीपुत्राच्या तटापर्यंत बिनधोक जाण्यास हरकत पडत नसे. हरकत यावयाची ती या प्रांतांत स्थाईक झालेल्या राजेरजवाडयांची. त्यांचा अडथळा हे बाह्य शत्रू आपल्या वकुबाप्रमाणें साम-दाम-दंड-भेद या साधनचतुष्टयाच्या जोरावर दूर करीत. ही पध्दत प्राचीन आर्यापासून अर्वाचीन मुसुलमानांपर्यंत सर्वांनीच थोड्या फार फरकानें अंमलांत आणली. आर्यावर्तप्रमाणें दक्षिणापथ मात्र बाह्यांकडून सहजासहजीं जिंकला गेला नाहीं व जात नाहीं. कारण, भौगोलिकदृष्टया हा देश पर्वत- नद्या आदिकरून अनेक अडचणींनी युक्त आहे. ज्याला हिंदुस्थानांत साम्राज्य स्थापावयाचें असेल, त्यानें प्रथम उत्तर हिंदुस्थान हाताखालीं घालावें व मग दक्षिणेंत प्रवेश करावा. उत्तरेकडील सम्राटांचीं राज्यें दक्षिणेंत पसरलीं व टिकलीं परंतु दक्षिणेंतील सम्राटांचीं साम्राज्यें उत्तरेकडे फार काळ टिकाव धरूं शकलीं नाहींत. उदाहरणार्थ पांडव, अशोक, अकबर, इंग्रज, वगैरे; याच्या उलट भोज, पाण्ड्य, बहामी, विजयानगर, मराठे वगैरे. डुप्ले यानें दक्षिणेंत या कार्यास प्रारंभ केला म्हणून तो फसला व इंग्रजांनीं कलकत्त्यास केला म्हणून तो सिध्दीस गेला असें व्हिन्सेंट स्मिथ यांचें मत आहे.

हिंदुस्थानाच्या तिन्ही बाजूस उंच उंच पर्वतश्रेणी व चवथ्या बाजूस महासागर असल्यानें आणि चरितार्थास अत्यंतावश्य लागणारी साधनसंपत्ति देशांतच उपलब्ध असल्यानें देश्य लोकांनां परदेशांशीं संबंध ठेवण्याची विशेष आवश्यकता भासत नसे व त्यामळेंच प्रथम प्रथम बाह्यांनांहि या देशाची फारशी माहिती नसे. त्याकाळीं मोठमोठ्या नद्यांच्या थडींचा प्रांत सुपीक होता व भूमींत खनिज संपत्तीहि मुबलक होती. उत्तरेकडील या नद्यांचे प्रवाह नेहमीं बदलत असत. सतलजचा जुना प्रवाह सांप्रतच्या प्रवाहापासून जवळजवळ ८५ मैलांवर असलेला आढळतो. अलेक्झांडरच्या वेळी सिंधूचें पात्र नक्की कोठें होतें, तें आज कोणासच सांगतां येत नाहीं. अर्थात श्रृतिस्मृतिकालीन नद्यांचें स्थान स्पष्टपणें ठरविणें आज पुष्कळ कठीण झालें आहे. फार काय परंतु बाराव्या, तेराव्या शतकंतील मुसुलमानी अंमलांत या नद्यांचीं जीं पात्रें होतीं, तीं सुद्धा आज राहिलीं नाहींत; पण ही स्थिती बहुशः उत्तर हिंदुस्थानांतील नद्यांची आहे; कारण, तो प्रदेश बहुतेक सपाट आहे. दक्षिणेंत अशी परिस्थिति फारशी आढळत नाहीं; कारण, या भागांत उंचसखलपणा जास्त आहे. वरील कारणांमळेंच उत्तर हिंदुस्थानांत अत्यंत प्राचीन किंवा मध्यकालीन अनेक मोठमोठ्या नदीकांठच्या शहरांच्या जागा बदललेल्या आहेत.

प्राचीन कालच्या राजधान्या बहुधां अशा मोठमोठ्या नद्यांच्या कांठीं, किंबहुना दोन नद्यांच्या संगमावर बसविल्या जात; त्यामुळें त्यांनां सहजच सुरक्षितता लाभे. अशा राजधान्या पुष्कळ होत्या. उदाहरणार्थ प्रयाग; मध्यकालीन उदाहरण म्हणजे पाटलीपुत्राचें- ही राजधानी शोण व गंगा यांच्या संगमावर होती त्यामुळें ती शत्रूस बरीच अगम्य होती (सांपर्त शोणचा प्रवाह पाटण्याहून ६।७ कोस मागें पश्चिमेस हटला असून तेथें त्याचा गंगेशीं संगम झाला आहे). नद्यांप्रमाणें समुद्रकिनार्‍यांतहि वेळोवेळीं बदल होत जातो. त्यामुळें पूर्वीचीं बंदरें आतां देशाच्या पोटांतील गांवें झालीं आहेत. तर कांही त्यावेळचीं आंतलीं गांवें आज बंदरें बनलीं आहेत. ग्रीक प्रवाशांनीं वर्णिलेलीं दक्षिणेकडील अत्यंत श्रीमान बंदरें कोरकई व कायल हीं आज किनार्‍यापासून (तिनवेल्ली भागांत) बर्‍याच मैलांवर आंतल्या प्रांतांत आलीं आहेत; एवढेंच नव्हे तर तीं, आज वाळूंत गडपहि होऊन गेलीं आहेत.

या मोठमोठ्या नद्यां, पर्वत, अरण्यें, घांट व किल्ले यांचा संरक्षणदृष्टया उपयोग परवांपरवांपर्यंत हिंदुस्थानास फार होत असे. या अडचणीचा परिहार केल्याशिवाय कोणांसहि आपलें साम्राज्य टिकवितां येत नसे. पण, आगगाड्या व विमानें यांचा शोध लागून सांपर्त त्यांचा विशेष प्रसार झाल्यानें, यांचें लष्करी दृष्टया महत्त्व पार नाहींसें झालें. ज्या अशीरगडास दख्खनची वेस म्हणत व जो फितुरीशिवाय कोणाहि राजाला घेतां आला नाहीं, त्या किल्ल्यावर आज एकहि शिपाई दिसत नाहीं; त्याच्या पायथ्याखालून आज इंग्रज सरकारच्या लष्करानें भरलेल्या अनेक आगगाड्या बिनधोक जातात. आणि जो बोरघांट चढावयास एकेकाळीं (१७८१) इंग्रजांनां १०।१२ दिवस लागले, तो आज तासांत ओलांडतां येतो. याच न्यायानें वायव्येकडील खैबर व बोलन घाटांचेहि महत्त्व बरेंच कमी झालें आहे. कारण १९२५ सालीं खैबरघाटांत ब्रिटिश रेल्वे सुरू झाली. आज, ज्याला आरमार व आकाशयान यांच्यांच जोरावर तें ठेवतां येईल.

आपल्या हिंदुस्थानांत विविधता ही अनेक प्रकारांनीं पसरलेली आढळते. हवेंत अत्युष्ण, उष्ण व थंड व अतिथंड असे प्रकार आहेत; म्हणजे एका दृष्टीनें जगांतील सर्व प्रकारची हवा येथें आहे. त्यामुळें त्या त्या हवामानांत उत्पन्न होणारे पदार्थ, जगणारे पशुपक्षी, वाढणारीं फुलंफळं, पिकणारीं धनधान्यें व फोंफावणार्‍या वृक्षलता इत्यादि अनेक चमत्कार या देशांत दृष्टीस पडतात. जमीनीत सुद्धा अनेक प्रकारच्या धातू व जडजवाहीर आढळतें. या सर्व कारणांमुळेंच एके काळीं या देशास सुवर्णभूमि हें अन्वर्थक नांव प्राप्त झालें होतें. निरनिराळ्या मानववंशांचा तर हिंदुस्थान हा एक अजबखानाच होय. येथें अत्यंत रानटी माणसापासून, उच्च ज्ञान होऊन पराकोटीस गेलेल्या जीवन्मुक्त तत्त्वज्ञांपर्यंत सर्व तर्‍हेचीं माणसें दृष्टीस पडतात. हा देश म्हणजे एक खंडच असल्यानें त्यांत नानाविध जातींप्रमाणें, पूर्वी अनेकविध राज्येंहि असत; पुरणांतून असल्या छोट्या राज्यांची संख्या पुष्कळ दिसून येते. तीच परंपरा अद्यापपर्यंत चालू आहे. मेग्यास्थेनीसनें (ख्रिस्तपूर्व ४ तें शतक) ११८ राज्यें होतीं असें म्हटलें आहे, तर आज लहान मोठ्या एकंदर संस्थानांची संख्या ७०० आहे! यांचें परस्पर भांडण हेंच बाह्यांनां हिंदुस्थानांत प्रवेश करण्याचें आतांपर्यंतचें एक सुलभ साधन होऊन बसलें आहे.

याप्रमाणें हा देश खंडवजा असल्यानें त्याचा साग्र इतिहास एकस्यूत असा देणें हें कठिण काम आहे. सर्व हिंदुस्थान जेव्हां एकाच साम्राज्यांत अंतर्भूत होतो तेव्हां त्याचा एकस्यूत इतिहास लिहितां येतो व त्याचीं साधनेंहि उपलब्ध होतात. असे प्रसंग अशोक, समुद्रगुप्त, हर्षवर्धन, अकबर, औरंगझेब, देवगिरीकर यादव, विजयानगकर, श्री. नानासाहेब पेशवे व सांप्रतचे इंग्रसरकार यांच्या कारकिर्दीत आले आहेत. यांपैकीं कांहींचें साम्राज्य कदाचित जास्त असेल व कांहींचें त्या मानानें कमी असेलहि; मात्र, वर म्हटल्याप्रमाणें या काळांतील हिंदुस्थानची ऐतिहासिक साधनें इतर काळांतील साधनांपेक्षां पुष्कळ आढळतात.

हिंदुस्थानांत जरी नाना मतें, नाना पंथ, नाना जाती, नाना प्रांत असले (म्हणजे इतकें विविधत्व असलें), तरी एकत्वांत समावेश करण्याची कला, आवड किंवा इच्छा हिंदुस्थानांत पूर्वीपासून आजतागाईत आढळून येते. साम्राज्याची व सम्राटची कल्पना वेदनाकालापासून आहे. चातुर्वर्ण्यात अनेक जातींनां स्थान मिळालें आहे. हिंदूंची ही चातुर्वर्ण्यसंस्था जगांत इतरत्र कोठेंहि नाहीं. या संस्थेमुळें हिंदूंनीं मुसुलमानांच्या धार्मिक जुलुमापासून आपली संस्कृति कायम राखली असें पाश्चात्त्य विद्वानांचेहि म्हणणें आहे. वेद, ब्राह्मण, गाय, विष्णु, शिव, तीर्थक्षेत्रें, रामायणभारत, साधुसंत इत्यादिकांबद्दल सामान्यतः हिंदूंची पूज्यबुध्दि असते. याप्रमाणें हिंदुधर्मानें अफाट हिंदुस्थानास एवजीव करण्याचा प्रयत्न पूर्वीचा केलेला आहे. चातुर्वर्ण्यसंस्थेपासून हिंदुस्थानास फायदे झाले कां तोटे झाले हा प्रश्न अलाहिदा आहे, म्हणून त्याबद्दल येथें विवेचन करण्याची जरूरी नाहीं. हा सनातन ब्राह्मणीधर्म जसा उत्तरेंत पूर्णपणें पसरला तसा दक्षिणेंत पसरला नाहीं. कारण, तेथें आर्यसंस्कृतीच्या पूर्वीपासूनची द्राविड संस्कृति नांदत होती. या द्राविडवंशोद्भवांनीं आर्यसंस्कृति जरी ग्रहण केली तरी आपली मूळची संस्कृति कायमची टाकली नाहीं. ह्यामुळें, अद्यापि, दक्षिण हिंदुस्थानांत या दोन्ही संस्कृतीचें मनोरंजक मिश्रण दृष्टीस पडतें. या द्राविडी लोकांच्या कांहीं धार्मिक समजुती व चालीरीती अजून द्राविडसंस्कृतींत आढळतात. या संस्कृतीच्या माहितीचीं साधनें अत्यंत अल्प असल्यानें, आर्यसंस्कृतीपेक्षां ती जुनी असतांहि, तिचा प्राचीन इतिहास लिहिला जात नाहीं.

हिंदुस्थानांत प्रातिनिधिक राज्यसंस्थेची आवड प्राचीन काळीं फारशी नव्हती गणराज्यें, स्वराज्यें, वैराज्यें. इत्यादि कांहीं प्रकार त्याकाळीं होतें. राजे कधीं लोकांच्या पसंतीस आल्यास मग सिंहासनावर बसत. पण ही रीत मध्ययुगापर्यंतच दिसते. पुढें राजा हें पद वंशपरंपरायुक्त झालें, मात्र त्याच्या अधिकारास मंत्रीसभेचें कांही आकलन असे. मुसुलमानांच्या आगमनापासून तर राजा ही व्यक्ति एकतंत्री बनली; तरी पण जुलमी हिंदु राजे अत्यंत विरळा होत अशी पाश्चात्त्य स्मिथसारखा इतिहासकारहि कबूली देतो. फार प्राचीन काळापासून येथें ग्रामपंचायतीं सर्वत्र प्रचारांत असल्यामुळें राज्ययंत्राशीं प्रजेचा संबंध फार थोडा येई. या ग्रामपंचायती तेव्हांपासून इंग्रजी अंमल सुरू होईपर्यंत चांगल्या तर्‍हेनें चालल्या होत्या. इंग्रजी अंमलांतच त्या नाहींशा झाल्या; हल्लीं सरकार त्यांच्याबद्दल नुक्ताच विचार करूं लागलें आहे. (स्मिथ- अर्लिहिस्टरी ऑफ इंडिया; ऑक्सफर्ड हि. इं; पॅटर्सन- जिआग्रफी ऑफ इंडिया; राधाकुमुद मुकर्जी- फंडामेंटल युनिटि ऑफ इंडिया; कौटिल्य- अर्थशास्त्र)

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .