प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण २ रें.
भरतखंड वर्णन.

ब्रिटिश सत्तात्मक सांप्रतचें भारतखंड - राजकीयदृष्टया हिंदुस्थानचे हल्लीं मुख्य दोन भाग आहेत. एक ब्रिटिश मुलुख व दुसरा संस्थानी मुलुख. पैकीं ब्रिटिश मुलुखाच्या मर्यादा कशा बदलत गेल्या त्याचा इतिहास पुढीलप्रमाणें आहे. १७६५ मध्यें ईस्ट इंडिया कंपनीचें रूपांत व्यापारी कंपनींतून राज्यकारभार करणार्‍या संस्थेत झालें. १७७३ च्या रेग्युलेटिंग ऍक्टनें मुंबई, मद्रास व बंगाल ह्या तीन प्रेसिडेन्सी निर्माण करण्यांत आल्या. १७७५ मध्यें बनारस जिल्हा आणि १८०१ मध्यें दिल्ली आग्रा, मथुरा व १८०३ मध्यें सांप्रतचा ओरिसा प्रांत बंगाल प्रेसिडेन्सींत सामील करण्यांत आला. १७९२ व १७९९ मध्यें म्हैसूरचा भाग, १७९९ मध्यें तंजावरचा मुलुख, १८०० मध्यें निजामानें दिलेला मुलूख व १८०१ मध्यें कर्नाटकच्या नबाबचा मुलूख मद्रास प्रेसिडेंसीत सामील होऊन सांप्रतचा मद्रास इलाखा बहुतेक पूर्ण तयार झाला. १८०० ते १८०५ पर्यंत सुरत, भडोच व खेडा जिल्हे, १८१७ च्या सुमारास अहमदाबाद, १८१८ मध्यें बहुतेक महाराष्ट्र व मध्यप्रांतांतील कांही जिल्हे, आणि १८२७ पर्यंत उरलेला महाराष्ट्र व मध्यप्रांतांतील बाकीचे जिल्हे मुंबई इलाख्यांत सामील होऊन सिंधखेरीज सर्व मुंबई इलाखा तयार झाला.

अजमीरः- मारवाड शिंद्यापासून सन १८१८ त मिळाला व तो प्रांत राजपुतान्यांतील हिंदुस्थान सरकारच्या एजंटाच्या ताब्यांत दिला. पहिल्या ब्रह्मीयुद्धानंतर आसाम व आराकान बंगालला जोडले गेले. व तेनासेरीम एका स्वतंत्र कमिशनरच्या ताब्यांत दिला. स. १८३८ त कोल बंडानंतर छोटानागपूर नैर्ॠत्यसरहद्द- एजन्सीकडे दिला होता परंतु स. १८५४ त तो बंगालला जोडण्यांत आला. कुर्गप्रांत स. १८३४ त म्हैसूर रेसिडेन्टाच्या ताब्यांत दिला. स. १८२९ ते ३५ पर्यंत शिलांगचा डोंगराळ मुलुख जिंकून बंगालला जोडण्यांत आला.

स. १८३६ त बिहारच्या पश्चिमेचा सर्व मुलूख बंगालपासून वेगळा करून त्यावर एक लेफ्टनंट गर्व्हनर नेमण्यांत आला. स. १८३७ त सातारा मुंबई इलाख्यास जोडलें. स. १८४३ त सिंधप्रांतहि मुंबई इलाख्यास जोडला गेला. स. १८५९ त पंजाब, दिल्ली वगैरे प्रांत मिळून एका लेफ्टनंट गव्हर्नरच्या ताब्यांत देण्यात आले. स. १८५४ मध्यें नागपूर प्रांतांस त्यावेळच्या वायव्यप्रांतांतील २ जिल्हे जोडून एक स्वतंत्र प्रांत केला व त्यास मध्यप्रांत हें नांव ठेविलें. स. १८५४ त पोर्टब्लेअर, अंदमान आणि निकोबार अशीं तिन्हीं मिळून एका अधिकार्‍याच्या ताब्यांत दिलीं. स. १८५६ त अयोध्या हे चीफ कमिशनरच्या ताब्यांत दिलें गेलें. दार्जिलिंग व जलपैगुरी हे भूतानपासून मिळविलेले प्रांत बंगालला जोडण्यांत आले. स. १८६१ त पंचमहाल जिल्हा मुंबई इलाख्यास जोडला. स. १८६९ त दक्षिण ब्रह्मदेश एका चीफकमिशनरच्या ताब्यांत दिला. त्याचप्रमाणें उत्तर ब्रह्मदेशाची व्यवस्था केली. व पुढें स. १८९२ त ते दोन्ही प्रांत एका लेफ्टनंट गव्हर्नरच्या हाताखालीं देण्यांत आले. स. १८८७ त बलुचिस्तानवर एक चीफकमिशनर नेमला.

स. १९०१ मध्यें पंजाब मधील वायव्येकडचा कांही मुलुख वेगळा करून त्यास वायव्यसरहद्दप्रांत असें नांव दिलें. सन १९०३ मध्यें वर्‍हाड मध्यप्रांतास जोडण्यांत आला. स. १९१८ त बिहार, छोटानागपूर व ओरिसा प्रांत एकत्र करून त्यांवर एक लेफ्टनंट गव्हर्नर नेमला. याच वर्षी पंजाबपासून दिल्ली प्रांत वेगळा केला व तो वरिष्ठ सरकारच्या ताब्यांत दिला.

सन १९१९ चा सुधारणा कायदा- या कायद्यानें एकंदर ब्रिटिश हिंदुस्थानचे १५ प्रांत करण्यांत आले असून त्यांपैकीं ९ मोठे (मेजर) प्रांतः (१) मद्रास, (२) मुंबई, (३) बंगाल, (४) संयुक्तप्रांत, (५) पंजाब, (६) बिहार ओरिसा, (७) मध्यप्रांत, (८) ब्रह्मदेश आणि (९) आसाम- आहेत. त्यांनां गव्हर्नरचे प्रांत म्हणतात; कारण त्यांपैकी प्रत्येक प्रांताचा कारभार गव्हर्नर एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलर, दिवाण आणि कायदेकौन्सिल यांच्या मदतीनें चालवितो. बाकीचे ६ लहान (मायनर) प्रांतः (१) वायव्यसरहद्दप्रांत, (२) बलुचिस्तान, (३) कुर्ग, (४) अजमीरमेवाड, (५) अंदमान व (६) दिल्ली आहेत व त्यांनां चीफ कमिशनरचे प्रांत म्हणतात, कारण त्या प्रत्येक प्रांताचा कारभार चीफ कमिशनर पाहतो. हे चीफ कमिशनर मध्यवर्ती सरकारचे एजंट असतात. या लहान प्रांतांच्या कारभारांत १९१९ च्या कायद्यानें कांही एक फरक झालेला नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .