प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
                    
ज्ञानेश्वरी- मराठी भाषेंतील 'काव्यारावो' म्हणून प्रसिद्ध असलेला हा ग्रंथ ग्रंथकर्ते श्रीज्ञानदेव यांनीं आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिला (ज्ञानकोश भाग २० यामध्यें वारकरी पंथ या माझ्या लेखांत 'एकोणिसाव्या ' वर्षी असें चुकून पडलें आहे).

ग्रं था च्या र च ने चें स्थ ळ, का ळ व ग्रं थ क र्त्यां चें  नां व.- आपल्याकडील जुन्या ग्रंथांचे काल निश्चित करणें हें काम किती कठिण आहे हें त्या बाबतींत प्रयत्न करणाऱ्या मंडळीस पूर्ण परिचयाचें आहे. पुष्कळ वेळां तर ग्रंथकर्त्यांच्या नांवाबद्दलहि निश्चितता होत नाहीं. या ग्रंथांच्या बाबतींत मात्र एक गोष्ट आनंद मानण्याजोगीं आहे. ती ही कीं, ग्रंथकर्त्यानें ग्रंथाचें स्थळ व ग्रंथकर्त्याचें नांव या बाबतींत ग्रंथाच्या सरतेशेवटी स्वत:च स्पष्ट खुलासा केला आहे. त्याचप्रमाणें ग्रंथाच्या कालासंबंधीहि अडचण पडण्याचें कारण नाहीं. कारण याच ग्रंथांच्या सरतेशेवटी एक  ओवीं आहे. त्यामध्ये हा ग्रंथ शके १२१२ त ज्ञानेश्वरांनी लिहिला व सच्चिदानंद बाबा मोठ्या आदरानें तिचा लेखक बनला असा उल्लेख आहे. ही ओवी ज्ञानदेवांचीच आहे कां सच्चिदानंदबाबांची आहे अथवा सच्चिदानंदबाबानें लिहून पहिली प्रत तयार केल्यावर तिच्या ज्या दुसऱ्या प्रती झाल्या त्यापैकीं एखादीच्या लेखकानें घातली आहे. ह्याबद्दल पंडितांत अनिश्चितता आहे. नुकतेच कैलासवासी झालेले राजवाडे यांच्या मतें ही ओवी ज्ञानदेव अथवा सच्चिदानंदाबाबा यांपैकीं कोणाचीच नाहीं तर ती सच्चिदानंदबाबा यांचा काल झाल्यावर त्यांच्या कोण चहात्यानें तत्समरणार्थ रचलेली असावी पण ज्याअर्थी ती राजवाडयांच्या मतें मुकुंदराजी म्हणून असलेल्या प्रतींतहि सांपडते. त्याअर्थी त्यांतील कालाचे बाबतींत केलेलें विधान चुकीचे असण्याचा संभव नाहीं. तात्पर्य ज्ञानेश्वरीचा काल या दृष्टीनें विचार करतां ही ओवी तिचा काल सर्वानुमतें निश्चित करतें हें स्पष्ट आहे. व म्हणून ज्ञानेश्वरी शके १२१२ त लिहिली गेली याबाबतींत शंका घेण्याचें कारण नाही. खुद्द ज्ञानेश्वरीच्या शेवटी स्थळ, ग्रंथकर्त्याचें नांव, ग्रंथाचा काळ यांचा उल्लेख करणाऱ्या ओंव्या आहेत म्हणून म्हटलें त्या पुढीलप्रमाणें:-

ऐसें युगीं वरि कली। आणि महाराष्ट्रमंडळी।
श्री गोदावरीचा कुलीं। दक्षिणिली॥
तेथे भुवनैकपवित्र । अनादिपंवकोश क्षेत्र ।
जगाचें जीवनसूत्र । जेथ श्रीमहालसा॥
तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकलानिवासु।
न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु॥
तैं माहेशान्वयसंभुतं । श्रीनिवृत्तिनाथसुतें।
केलें ज्ञानदेवें गीतें । देशीकारलेणें॥
शके बारा शत बारोत्तरें । तै टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें ॥ लेखक झाला॥

यावरून ग्रंथ शके १२१२ त जेव्हां यादवकुलांतील राजे रामदेवराव हे देवगिरी अथवा दौलताबाद येथें राज्य करीत होते तेव्हां श्रीक्षेत्र नेवासें (हल्लीं जिल्हा अहमदनगर) येथे ज्ञानदेवांनीं लिहिला ही गोष्ट निर्विवाद आहे. या बाबतींत जातां जातां एवढाच खुलासा करणें अवश्य आहे कीं, वर उध्दृत केलेल्या 'तै' माहेशान्वयसंभूतें' या ओंवीवरून ज्ञानदेवांचें आडनांव कदाचित 'म्हैसे' असण्याचा संभव आहे, अशा तऱ्हेचा उल्लेख महाराष्ट्रा सारस्वतकार भावे यांनी आपल्या सारस्वताच्या एका आवृत्तींत केला होता. परंतु त्यासंबंधी आता येथें विशेष चर्चा करण्याचें कारण नाहीं. कारण त्यांच्या ह्यातींतील शेवटच्या आवृत्तींत ही गोष्ट त्यांनी काढून टाकली आहे. ज्या प्रकरणांत ही ओवीं आहे त्याचा विचार करतां ज्ञानदेव या ठिकाणीं मांसवंश सांगत नसून विद्यावंश (गुरुपरंपरा) सांगत आहेत, ही गोष्ट स्पष्ट आहे. वरच्या ओवींतील नाथपरंपरोंतील ज्ञानदेव यांनीं ही टीका केली येवढाच अर्थ अभिप्रेत आहे.

ग्रं था चें नां व.- हा विषय चर्चेकरितां पाहिला म्हणजे कोणी म्हणेल कीं यांत काय आहे, ग्रंथांचें नांव तर अगदीं उघड आहे, त्यांत चर्चा ती काय करावयाची आहे आणि त्याला महत्त्व तें काय आहे? पण सूक्ष्म विचाराअंतर ही गोष्ट कळून येईल कीं, ही गोष्ट दिसते इतकी साधी नाहीं. अर्वाचीन अगदी प्राचीन बहुतेक लेखक ज्याप्रमाणें आपल्या ग्रंथांस कांहीं विशिष्ट नांवे देतात (उदाहरणार्थ गीतेवरील आपल्या टीकेस वामन पंडित 'यथार्थदीपिका' म्हणतात. अगर कै. लो. टिळक आपल्या टीकेस गीतारहस्य म्हणतात)  त्याप्रमाणे ज्ञानदेवांनी आपल्या टीकेस काहींच नांव दिलें नाहीं. ते आपल्या ग्रंथाच्या शेवटी ''केलें ज्ञानदेवें गीतें। देशीकारलेणें''येवढेंच म्हणतात. ज्ञानदेवी अगर ज्ञानेश्वरी ही जी नांवें आहेत ती ज्ञानदेव अथवा ज्ञानेश्वर यांनीं तो ग्रंथ केल्यामुळें ती या ग्रंथास पडली आहेत. नामदेवराय यांच्या अभंगांत आपणांस ही दोन्हीं नांवे मिळतात.

सोहंकुसुताच्या सोडोनियां गांठीं। केलीसें मराठी
गीता देवी॥ (९०९ स. सं. गाथा आवटेकृत)
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी; ब्रह्मानंदलहरी प्रकट केली॥
नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एकतरी ओंवी अनुभवावी॥
(९१२ स सं. गा. आवटेकृत)

भावार्थदीपिका हें नांव आपणांस ज्ञानेश्वरीतं अगर नामदेव यांच्या अभंगात आढळून येत नाही. 'इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायाम्' हा अथवा अशाच अर्थाचा जो मंत्र ज्ञानेश्वरीच्या सरतेशेवटीं दिलेला असतो तो नामदेवराय यांच्या कालानंतरचा आहे. येवढेंच नव्हें तर पैठणकर एकनाथ महाराज यांच्या कालीन अगर त्यानंतरच्याहि शेंदीडशें वर्षांतील हस्तलिखित प्रतींत हा मंत्र सांपडत नाहीं. तात्पर्यं या ग्रंथांस 'भावार्थदीपिका' हें नांव अलीकडील आहे ही गोष्ट निर्विवाद आहे.

कदाचित हें नांव, ग्रंथाच्या अंतरंगारून हा ग्रंथ शब्दश: टीका नसून भावार्थ दर्शविणारा आहे यावरून अथवा वामनी यथार्थदीपिकेशीं तुलना करूनहि पडलेले असेल. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न  म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्ध प्रतिसंबंधी चर्चेकरितां याचे दोन भाग करतां येतील. एक हस्तलिखित पोथ्यांचा वर्ग व दुसरा छापील पोथ्यांचा वर्ग. यांतील प्रथम वर्गासंबंधानें लिहावयाचें म्हटलें तर एक गोष्ट निर्विवाद आहे ती ही कीं, खुद्द सच्चिदानंदबाबा यांनीं लिहिलेली प्रत तूर्त तरी कोणास मिळाली नाहीं. बाकी राहिलेल्या हस्तलिखित प्रतीचें आपणास दोन वर्ग करणें अवश्य आहे. एक एक नाथांच्या पूर्वकालीन व दुसरा एकनाथांच्या उत्तरकालीन असा भेद करण्याचें कारण, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर नाथांच्या पर्यंत तीनशें वर्षांत लेखकांच्या हस्तदोष, बुद्धिमांद्य वगैरे दोषांमुळें मूळप्रतींत पुष्कळच अशुद्धता उत्पन्न झाली व एकनाथांनीं ती अशुद्धता काढण्याचा मोठा पहिला प्रयत्न केला नाथ हेच ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक होत. नाथ श्रीक्षेत्र आळंदी येथें जाऊन श्रीज्ञानदेवांच्या गळ्यास लागलेली मुळी काढून शुद्ध ज्ञानेश्वरी प्रचलित करण्याची आज्ञा घेऊन आले, वगैरे कथा याच गोष्टींची द्योतक आहे. नाथांच्या नंतरच्या प्रतीत, आपणांस ज्ञानेश्वरींतील ओंव्या पूर्ण झाल्यावर स्वतंत्र खालीं आणखी पांच ओंव्या आढळतात. त्यांत खालील दोन कालच्या दृष्टीनें व नाथांच्या कार्याच्या दृष्टीनें महत्त्वाच्या आहेत, त्या खालीलप्रमाणें:-

श्री शके पंधराशे साहोत्तरीं। तारणनाम संवत्सरी। येकाजनार्दनें अत्यादरी । गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली॥ ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध । तरी पाठांतरी शुद्ध अबद्ध । तो शोधुनियां एवंविध । प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी॥

एकनाथ महाराजांनां ज्ञानेश्वरीचें संशोधन करतांना किती प्रयास पडले असतील याची कल्पना आजहि नाथांच्या पूर्वीच्या ज्या प्रती मिळतात. त्यांवरून स्पष्ट होणारी आहे. छापखाने निघाल्यामुळें मूळांत फरक होऊन अगर वाढ होऊन ग्रंथ शुद्धबद्ध होण्याची फारशी भीति राहिली नाहीं. परंतु ज्यावेळेस लोक आपल्या हातानें अगर लेखकद्वारां ग्रंथ उतरवून घेत असतात. त्यावेळीं अशा चुका होण्याचा अतिशयच संभय असतो. मूळ पोथीच्या समासांत स्पष्टीकरणार्थ एखादा शब्द लिहिला असल्यास, जर त्या प्रती करून नक्कल करणारा हा मूळांतील शब्दाचा प्रतिशब्द आहे, हें कळलें नाहीं तर तो नक्कल करतांना तो शब्द मूळांतच घालून आपल्याकरितां आपल्या समजुतीची अशी शुद्ध प्रत तयार करतो. पण वास्तविक ती प्रत अशुद्ध तयार होत असते. उदाहरणार्थ,

दशा ही ते निमालिया। येणें जें उवाया।
तें केवळ नाशावया । दीपाचेपरीं॥

अशी अनुभवामृताच्या चौथ्या प्रकरणांत सातवी ओंवी आहे. तिचा प्रचलित पाठ

वातदशा ही ते निमालिया।

असा होऊन बसला आहे. वास्तविक 'दशा' या शब्दाचा अर्थ समासांत 'वात' असा लिहिलेला पण तो पुढच्या प्रतींत मूळांत शिरून हा नवीन पाठ तयार झालेला आहे हें उघड आहे अशाच रीतीनें नवीननवीन पाठ तयार होत असतात. फार काय, स्पष्टीकरणार्थ केलेल्या ओव्यांहि मूळांत घुसडून जातात व त्याचा परिणाम म्हणजे एकाच पोथीच्या विकृत अशा निरनिराळ्या पोथ्या निर्माण होणें हा होय. नाथांनी मेहनत घेऊन हें कार्य केलें व शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली नाथांनीं स्वत: ज्ञानेश्वरीत ओंव्या घातल्या नाहींत ही गोष्ट त्यांनींच म्हटल्यावरून सिद्ध आहे.

''ज्ञानेश्वरी पाठी। जो ओंवी करील मऱ्हाठी।
तेणे अमृताचे ताटी । जाण नरोटी ठेवली॥

आतां राजवाडेप्रभृति यांचें म्हणणें असें आहे कीं, मूळ खरी प्रत नाथांनां मिळालीच नाहीं. येवढेंच नव्हे तर मूळच्या अगदीं जवळ असणारी, मूळप्रत तयार होऊन तीस चाळीस वर्षे झाली  नाहींत तोंच झालेली मुकुंराजी प्रत जी त्यांस मिळाली आहे तितकीहि शुद्धप्रत नाथांस मिळाली नव्हती. कारण मुकुंदराजी प्रतीशीं तुलना करतां नाथांच्या प्रतींत जवळजवळ १०० ओव्यां प्रक्षिप्त आहेत आतां येवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, राजवाडे यांस नांथांच्या शुद्धीकरणाच्या पूर्वीची प्रत मिळाली आहे. व त्याचें खरें गमक म्हणजे त्यांत साडेचार चरणी नाथांच्या म्हणून गणल्या गेलेल्या ओंव्या नाहींत हें नसून ज्ञानेश्वरींतील जी शब्दांची रूपें आहेत. तीं अत्यंत जुनी व नाथपूर्वकालीन आहेत पण यावरून नाथांस ही प्रत पहावयास मिळाली नाहीं अगर यापेक्षां जुनी मिळाली नाहीं ही गोष्ट कशी सिद्ध होते हें कोणास ठाऊक! राजवाडे यांस मिळालेली प्रत बीड जिल्ह्यांतील व नाथ स्वत: मोंगलाईंतील पैठणचेच, व शुद्धीकरणार्थ प्रवृत्त झालेल्या नाथांनीं शक्य तितकी जुनी प्रत मिळवण्याचा प्रयत्न केला नसेल हेंहि संभवत नाहीं. तेव्हां नाथांस कदाचित या मुकुंदराजी पोथीपेक्षां मूळ प्रतीशी अधिक जवळ येणारी प्रत मिळाली असेलहि. आपणांस मिळालेल्या पोथींत कमी ओंव्या आहेत येवढ्याकरतांच ती अधिक जुनी असें म्हणतां येत नाहीं आमचेजवळहि नाथपूर्वकालीन पोथी आहे व ती तशी आहे ही गोष्ट कै. राजवाडे यांनीहि कबूल केलेली होती.  त्या प्रतींतील पाठ व ओंव्या यांचा विचार केला तर ती प्रतहि नाथांच्या पूर्वीची आहे असेंच दिसून येतें व त्यांत राजवाडे ज्ञानेश्वरींत नसलेल्या ओंव्या आहेत. पण नाथांच्या म्हणून समजलेल्या ओंव्या नाहींत. ओंव्यांची जशी वाढ होते, त्याप्रमाणें दृष्टीदोषानें त्यास गळतीहि लागते. व एखादे वेळी एखादे पत्र गमावलें असल्यास कदाचित त्यास मिळेल असा सांधा करून पोथी लिहिली जाण्याचा संभवहि असतो. अशा स्थितींत नाथांच्या अस्सल जवळ जवळ येणारीहि पोथी मिळाली नव्हती. हें म्हणणें थोडें धाडसाचें आहे. तूर्त एवढी गोष्ट खरी कीं, राजवाडयांची प्रत नाथपूर्वकालीन असून तींतील रूपें अत्यंत जुनाट आहेत. नाथानंतरच्या प्रती जर आपण पाहूं गेलो तर आपणांस असें आढळून येईल कीं प्रत्येक लेखकाकडून आपल्या पूर्वीच्या भाषेंतींल रूपें आपल्या वेळच्या भाषेंत उत्तरण्याचा बुद्धया अगरा न समजून प्रयत्न झालेला आहे. व त्यामुळें ज्ञानेश्वरमहाराजांनीं ज्या रूपांत ज्ञानेश्वरी लिहिली त्या रूपांत जशीच्या तशी आपणांस मिळत नाहीं तूर्त येवढीच गोष्ट निश्चित दिसते कीं, या बाबतींत अजून संशोधन पुष्कळ होणें अवश्य आहे. आतां छापील प्रतींकडे वळूं. छापील प्रती सुमारें चौदा निरनिराळ्या आजवर प्रसिद्ध आहेत. त्या कलानुक्रमाप्रमाणें पुढें दिल्या आहेत. (१) रा. रा. गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यांत छापलेली; हिजबरोबर वे. शा. सं. शं. ग. देवस्थळी यांनी दुर्बोध शब्दांचा कोश प्रथम छापला. (२) रा. रा. रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी जगद्धितेच्छु छापखान्यांत, परिभाषेसह छापली. (३) रा. रा. नारायण रामचंद्र सोहनी, जगदीश्वर छापखान्याचे मालक यांची पुस्तकाच्या आकाराची, कठिण शब्दांच्या कोशासह छा. (४) रा. रा. जावजी दादाजी, निर्णयसागर छापखान्याचे मालक, यांनी डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे यांजकडून टिप्पणी तयार करून प्रत्येक पानावर टिप्पणी देऊन प्रत तयार केली. (५) कोल्हापुरातील रा. रा. भावे यांनीं 'भावार्थचंद्रिका' नांव देऊन संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी छापली. (६) रा. रा. नारायण हरि भागवत यांनीं सार्थ ज्ञानेश्वरीरहस्य छापलें. (७) तत्त्वविवेचक छापखान्याकरितां रा. रा. तुकाराम तात्या यांची टिप्पणीसह छाप (८) 'केरळकोकिळचे' प्रोप्रायटर रा. रा. जनार्दन महादेव गुर्जर यांनीं रा. रा. कृ. ना. आठल्ये यांजकडून सार्थ संपूर्ण छाप (९) 'साखरे' ज्ञानेश्वरी रा. रा. भिडे यांनीं रा.रा. त्रिं. ह. आवटे यांचे छापखान्यांत संपूर्ण सार्थ छापली. (१०) रा. रा. माडगांवकरांची निरनिराळ्या पाठांसह, सकोश. (११) रा. रा. वि. का. राजवाडे, कठिण शब्दांच्या कोशासह (१२) रा. रा. गोविंद रामचंद्र मोघे, सुबोधिनी नामक ओवीबद्ध छायेसहित (१३) रा. रा. ग. कृ. आगाशे, ९ अध्याय प्रसिद्ध, कठिण शब्दांवर टीपा व चर्चा. (१४) वै. विष्णुबुवा जोग यांचे शिष्य ह. भ. प. वंकटस्वामी, संपूर्ण सार्थ व सकोश (छापत आहे). या मुख्य आवृत्ती प्रसिद्ध आहेत. याहूनहि एकदोन ज्यांचा उल्लेख येथें केला नाहीं अशा असण्याचा संभव आहे. वर दिलेल्या या प्रतींतील प्रत्येकीचें एक एक वैशिष्ट्य आहे. पाठांच्या दृष्टीनें नं. १०-११ या पोथ्या फारच महत्त्वाच्या आहेत. राजवाडे प्रतीचे पाठ जुने आहेत हें वर दर्शविलेंच आहे. माडगांवरकृत 'ज्ञानदेवी' यांत एकंदर अकरा पोथ्यांतील निरनिराळे पाठ दिले आहेत त्या पोथीची किंमत आहे यापेक्षाहि अधिक झाली असती परतुं मूळ पोथींतील पाठ कित्येक ठिकाणीं जरा साधारण पडलेले आहेत. या प्रतीची किंमत निरनिराळे जे भरपूर पाठ दिले आहेत त्याकरितां आहेच. पण दुसरी एक गोष्ट त्या पोथीचें महत्त्व वाढवितें; व ती म्हणजे सरतेशेवटीं दिलेला कोश. हा कोश जरी अपुरा आहे व वे. शा. सं. देवस्थळी यांच्या कोशावरून व त्यांच्या मदतीनें केलेला आहे. तरी पण आहे त्या स्थितींतहि रा. रा. माडगांवकर यांचाच कोश चांगला आहे. निर्णयसागरच्या प्रतीनें ज्ञानेश्वरी अतिशय सुलभ केली. पण तिच्या मूळच्या रूपांत इतका फारक झालेला दिसतो कीं, जुन्या लिखाणाशीं ताडून पाहिली तर 'ज्ञानेश्वरी' ती हीच काय? असा क्षणभर मनास विस्मय वाटण्याचाहि संभव नं. ५-८-९-१४ या पोथ्या सार्थ आहेत. त्या सर्वांत ह. भ. प. बंकटस्वामी यांची प्रत अर्थाच्या दृष्टीनें सर्वांत चांगली आहे. व तीस कोशहि जोडलेला आहे. तसेंच या प्रतींत पहिल्यांदां ज्ञानेश्वरांच्या ओंव्यांच्या आधारें गीतेच्या श्र्लोकांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. मोघे यांनी ज्ञानेशीय ओंवीस ओंवी दिली आहे. रा. रा. आगाशे यांनी समातार्थाची वचनें देऊन चर्चा करून इंग्रजी ग्रंथांच्या जशा आवृत्त्या असतात तशी आवृत्ति काढली आहे. ज्ञानेश्वरीचें अनुष्टुपछंदांत संपूर्ण गीर्वाण भाषांतर रा. अनंत विष्णु खासनीस न्यायाधीश जत यांनीं केलें आहे. तें लवकरच छापून प्रसिद्ध होईल.

आपण या छापील व हस्तलिखित पोथ्यांकडे पाहिले म्हणजे एक गोष्ट प्रामुख्यानें दिसते ती अशी कीं, या सर्वांमध्ये ओंव्या सारख्याच नाहींत. रा. रा. राजवाडे यांनीं जमा केलेल्या प्रतींपैकीं काहीतरी ओव्यांचें आंकडे देऊन ओंवीच्या बाबतींत या सर्वांचा मेळ बसणें कसें कठिण आहे हें दाखविलें आहे. (१) मुकुंदराजप्रत (राजवाडेप्रत) ओंवीसंख्या ८८९२; (२) भारदेप्रत ओं. शं. ९००९; (३) साखरेंप्रत ओं. शं. ९०३३; (४) मांडगावकर प्रत ९०३४; (५) वाईप्रत ९०३४; (६) कुंटेप्रत ९०३७; (७) तंजावर येथील प्रत ९०४७; (८) चिड्घस्वामीच्या मतानें ९०५०; (९) भरड्यांची प्रत ९७३४; (१०) सोनारप्रत ९८५१ व (११) निळोबाप्रत १०००० भाषा या दृष्टीनें या ग्रंथाची सेवा रा. रा. वि. का. राजवाडे यांनीं अत्यंत केली आहे. त्यांनी लिहिलेली प्रस्तावना व ज्ञानेश्वरीचें व्याकरण हे त्या बाबतींतील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. रा. रा. माडगावकर यांनीं ज्ञानदेवींत कांहीं विभक्त्यांचीं रूपें दिलीं आहेत. पण मोठ्या प्रमाणावर विस्तृत असा प्रयत्न म्हणजे रा. राजवाडे यांचाच. येथपर्यंत बाह्यांगासंबंधी विचार झाला. आतां गीतेवरील टीका या दृष्टीनें थोडक्यांत विचार करूं. अंतरंगाचा अगदींच विचार न करणें म्हणजे 'बोला आदि झोंबिजे। प्रमेयासी॥' या ज्ञानेशांच्या उक्तीच्या अगदीं उलट होणार आहे. म्हणून या अंतरंगाचा जातां जातां थोडक्यांत विचार करूं. मराठी भाषेंतील श्रीमद्भगवद्गीतेवरील पहिली टीका म्हणजे ज्ञानेश्वरीच. तिच्या पाठीमागून मग बाकीच्या निरनिराळ्या टीका झाल्या आहेत. व त्यांपैकीं बहुतेकांनी दृष्टान्त वगैरे ज्ञानेश्वरांचेंच उचलले आहेत. ज्ञानेश्वरीचा विशेष हा आहे कीं, ज्ञानेश्वर हे प्रत्येक शब्दास प्रतिशब्द देऊन टीका करीत नाहींत. गीतेंतील श्र्लोकांचें अर्थ लक्ष्यांत आणून किंबहुना अर्थरूप बनून, तो अर्थ जगाच्या कल्याणाकरितां जगाला ज्ञानेश्वरीच्या द्वारें ज्ञानेश्वर देत आहेत. ज्ञानेश्वरी व गीता हे इतके एकार्थावर आरूढ होऊन लिहिलेले ग्रंथ आहेत कीं, ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात,

'मूळ ग्रंथींचिया संस्कृता। वरि मऱ्हाटी नीट पाहातां।

अभिप्राय मानलिया चित्ता । कवण भूमि हें न चोजवे ॥४०।१० येथें प्रश्न  असा उद्भवतो कीं, ज्ञानेश्वरांच्या मतें गीतेंत काय सांगितलें आहे? ज्ञानेशांनीं सहाव्या अध्यायांत 'अष्टांग' योगास 'पंथराज' म्हटलें येवढ्यावरूनच ज्ञानेश्वरांच्या मतें गीता 'अष्टांगयोगप्रधान' आहे असा कित्येक तर्क काढतात. पण तो तर्क चुकीचा आहे ज्ञानेश्वर गीता ही ज्ञानप्रधान मानतात.

'येथ श्रीविद्याविनाश हें स्थळ' । तेणें मोक्षोपादान फळ।
या दोहीं केवळ साधन ज्ञान । हें इतुलेचि नानापरी ॥
निरुपलें ग्रंथ विस्तारी ॥ (१८, १२४३-४४)

गीतेच्या अध्यायांची संगति ही त्यांनीं स्वतंत्र रीतीनें लावली आहे. 'सर्व धर्मान् परित्यज्य' या गीतेच्या आठराव्या अध्यायांतील ६६ व्या श्र्लोकांवर त्यांनी ही अध्याय संगति दिली आहे.

ज्ञानेश्वरी ही टीका इतर टीकांसारखी नव्हे. ज्ञानेश्वर हे (तेराव्या अध्यायांतील अहिंसाप्रकरण सोडून दिल्यास फारच क्वचित) पूर्वपक्ष उत्तरपक्ष करितात. त्यांस सरळ गीतारहस्य सांगावयाचें होतें. व ते त्या रहस्याशीं इतके तन्मय झाले होतें कीं, तें अनुभवलेलें देतां देतांच अनावर होत असे. भाषा या दृष्टीनें तर ग्रंथ निरुपम आहे. हें नव्यानें लिहावयास पाहिजे असें नाहीं. ज्ञानेश्वरांच्या तात्विक मताशीं पटो वा न पटो, पण  जो जो ग्रंथ वाचतो अथवा वाचील त्यास मार्तंडमामा नांवाच्या साधूंनीं म्हटल्याप्रमाणें,ज्ञानेश्वरांनीच पुन: ज्ञानेश्वरी लिहिली तर अशीं साधणार नाहीं असेंच वाटेल. केवळ वाकचर्तुय या दृष्टीनें पाहूं गेल्यास, निरुपम उपमा अथवा उपमाच्या श्रेणी, बिनतोड दृष्टान्त, रुपकें याची ग्रंथात गर्दी झालेली दिसून येते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ज्ञानेश्वरी परिभाषेवर अभिप्राय देतांना असें म्हटलें आहे कीं, 'आम्ही आमच्या वाचकांसहि आनंदानें कळवतों कीं, कवित्वाच्या तरंगात मौजेनें लोटत जाऊन, उपमा दृष्टांन्तादि कमळें ज्यास लीलेनें खुडावयाचीं असतील,त्यांनीं प्रस्तुत 'परिभाषा' रूप तुंबीफलाचा आश्रय करून, महाराष्ट्र भाषेच्या आद्यकवींच्या वाकतरंगिणीत उडी घालावी. '' ज्ञानेश्वरीचा विशेष म्हणजे तींतील मार्दव हें होय. तींतील बोल डोळयांलाहि खुपणार नाहींत इतकें मृदु आहेत. असो, अध्यात्मशास्त्र व वाकचातुर्य या दोन्ही दृष्टीनें 'रावो' असलेल्या या ग्रंथांसंबंधी पुष्कळच लिहतां येण्यासारखें आहे. या ग्रंथाचें श्रेष्ठत्व दाखविण्याकरतां एकच गोष्ट लिहिली असतां पुरे होईल. ज्ञानेश्वरानंतर झालेल्या प्रत्येक साधूनें ज्ञानेश्वर कर्त्यास 'ज्ञानराज' या एकाच पदवीनें संबोधिलें आहे. तिची मराठींत भाषांतरे  झाली आहेतच. पण हल्ली गुजराथीं, व हिंदींतहि भाषांतरें झाली आहेत. व संस्कृतींत व इंग्रजींत भाषांतरें होऊं घालून निम्मी अधिक पुरीं झाली आहेत. हीं भाषांतरें बाहेर पडल्यास ज्ञानेश्वरीच्या इतिहासांत क्रांति घडून येणारी आहे. कारण संस्कृतांतील गीता मराठींत आणण्याकरतां मराठींत ज्ञानेश्वरी लिहली. पण त्यामुळें तिचा प्रसार मराठी बोलणाऱ्या प्रांताबाहेर झाला नाहीं. व आतां तिचा प्रसार बाहेरच्या भागांत होऊन ज्ञानेश्वरांनीं आपल्या ग्रंथांच्या सरतेंशेवटी आपल्या गरुजीजवळ

'चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ॥
ते सर्वांहि सदा सज्जन । सोयरे होतू॥
किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होऊन तिही लोकीं।
भजि जो आदि पुरुषीं । अखंडित'॥

मागितल्याप्रमाणें होण्याचीं सुचिन्हें दिसूं लागली आहेत. (लेखक. प्रो. शं. वा. दांडेकर.)

ज्ञा ने श्व र का ली न स मा ज.- भगवद्गगीतेवरील ही प्रसिद्ध टीका 'भावार्थदीपिका' उर्फ 'ज्ञानेश्वरी' ज्यास ऐकून ठाऊक नाहीं असा मनुष्य निदान महाराष्ट्रांत तरी सांपडेलसें वाटत नाहीं.  महाराष्ट्राच्या राष्ट्रीय ग्रंथांत ज्ञानेश्वरीनें अग्रपूजेचा मान मिळविला आहे. शके १२१२ सालीं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तयार केल्यानंतर ती जी एकदां लोकप्रिय होऊन बसली ती बसली. तिच्यांत पुढें घुसडून दिलेले अपपाठ एकनाथ स्वामींनी १५०६ सालीं काढून टाकून ज्ञानेश्वरीचें शुद्धीकरण केलें. त्यानंतर तुकारामानें ''मालिय जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें। तेया पाणिया ऐसें आलें। नाठवे हें॥ (ज्ञाने. १२-१२०) ही ज्ञानेश्वरीतील ओंवी सर्व ओव्यांचें सार म्हणून आपल्या अभंगांत नमूद केली आहे. त्याच्या मागून कविवर्र्य मोरोपंतांनींहि ज्ञानेश्वरीला 'मोहमहिषमर्दिनी भवानी' हा किताब दिला. त्यापुढेंहि ज्ञानेश्वरीची लोकप्रियता अनेक कवींच्या उद्गारातून दिसून आली आहे. वेदान्स हा विषय आपणास कलण्याजोगा नाहीं अशा समजुतीनें पुष्कळ लोक ज्ञानेश्वरी न वाचतांत तिची तारीफ करीत असतात. ज्ञानेश्वरीसंबंधी एक गैरसमज  कसा आहे कीं, तिची भाषा अवघड आहे, व या कारणामुळें पुष्कळ लोक ज्ञानेश्वरी वाचण्याचा कंटाळा करीत असतात. पण ज्ञानेश्वरीइतकी सोपी व सरळ भाषा दुसऱ्या कोणत्याहि मराठी काव्यग्रंथाची नाहीं. दुरान्वय अगर क्लिष्टतेसारखां दोष ज्ञानेश्वरीत औषधाला देखील मिळणार नाहीं. ज्ञानेश्वरीची भाषा जुनी आहे आणि हल्लींच्या रूढ मराठीहून तिचे प्रयोग अंमळ वेगळे आहेत. पण एवढ्यावरून तिला अवघड म्हणतां येणार नाहीं, हें उघड आहे. एकदोन पारायणें झाल्यावर वाचकांस तिच्या भाषेची मोडणी थोडथोडी कळूं लागते व आणखी एकदोन पारायणें झाल्यावर तर तिची भाषा वाचकांस पूर्ण परिचित होऊन तिच्या दुर्बोधपणाबद्दलचा त्याचा ग्रह साफ बदलून जातो. महाराष्ट्रीयांच्या इतर राष्ट्रीय ग्रंथांपेक्षा ज्ञानेश्वरीचा विशेष हाच आहे कीं, तिचें सौंदर्य अष्टपैलू आहे. भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ या दृष्टीनें विचार केला तर ज्ञानेश्वरीसारखी बिनमोल टीका भगवद्गगीतेवर दुसरी झाली नाहीं हें जितकें खरें आहे, तितकेंच अध्यात्मज्ञानाचें प्रतिपादन करणारा शास्त्रग्रंथ ज्ञानेश्वरीच्या पंक्तीस बसविण्याजोगा मराठी भाषेंत दुसरा नाहीं हेंहि खरें आहे. स्वतंत्र काव्यग्रंथ या दृष्टीनें पाहिलें तरीहि ज्ञानेश्वरी ही मराठी काव्यग्रंथांचें शिरोभूषच आहे. भा षा.-ज्ञानेश्वरकालीं महाराष्ट्रांत मुसुलमानांचा प्रवेश बिलकुल झाला नव्हता. अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मलिक काफूर याच्या स्वाऱ्या ज्ञानेश्वराच्या पश्चात पुष्कळ वर्षांनीं दक्षिणेंत झाल्या.  त्यामुळें ज्ञानेश्वरीच्या मराठी भाषेला उर्दू अगर फारशी भाषेचा उपसर्ग मुळींच झालेला नाहीं. ज्ञानेश्वरींत म्लेंछ व कैकाडी यांचा उल्लेख आहे. पण त्यावरून दूर कोठें तरी त्या लोकांची वस्ती आहे हें ज्ञानेश्वरांस ऐकून ठाऊक होतें एवढेंच दिसतें. ज्ञानेश्वरींत वैदिक धर्मापुढें फिका पडलेल्या बौद्धधर्माचा व जैनधर्माचा उल्लेख आहे. पण त्या लोकांच्या स्वत:च्या म्हणून कांहीं भाषा असल्यास त्या भाषांतील शब्द ज्ञानेश्वरींत आले नाहींत हें निश्चित आहे. तेव्हां ज्ञानेश्वरींतील भाषा अन्य भाषेंतील शब्दांनी दूषित न होतां निर्भेळ मराठी उतरली आहे. पा ठ भे द.-इतर प्रसिद्ध ग्रंथांप्रमाणें ज्ञानेश्वरीलाहि पाठभेदांची आणि अपपाठांची बाधा पुष्कळच झाली आहे. तेव्हां आज विद्यमान असलेल्या आवृत्त्यांतून कोणची तरी पसंत करून तीवरच वाचकांनी  आपला निर्वाह करून घेणें भाग आहे. प्रसिद्ध इतिहाससंशोधक कै. राजवाडे यांनी छापलेलीं ज्ञानेश्वर कालदृष्टया सर्वांत जुनी, अतएव ग्राह्य आहे. ज्ञानेश्वराचें सृष्टिनिरीक्षण अत्यंत दांडगें होतें. ज्ञानेश्वरींत सृष्टि विषयक दाखले पावलोपावली आढळतात. कल्पनासृष्टींतले चिंतामणि, चकोर (१-२४), (१-५६), परिस (१-७७, ७-३४); कामधेनू (१-७९), (३-२२) सोमकांत,  कल्पवृक्ष (८-८,१८.७५६) चातक (१०-१६७); सूर्यकांत (१३-२९४) वगैरे पदार्थ आणि प्रत्यक्ष सृष्टींतले कोकिळ (१-२३०), राजहंस (२-१२७), कावळा (४-२३) पाण्यांतील मोठीं जलचरें (१८-१६९७), आरसा (४-७३). मोर (६-१७८),सापाची कात (८-६५), शेराचें झाड (९-१५४), आकाशांतले सप्तर्षी (१८-८७०), काजवा (९-३७५), पांच नांग्यांची इंगळी (१३-१०६४), सात नांग्यांची इंगळी (१६-२५७), घुबड (१३-२४८), शेंडे नक्षत्र (१६-३१५) वगैरे अनेक सृष्टवस्तूंचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. कासवीच्या दृष्टीनें होणारें तिच्या पिलांचें पोषण (१३-१४०), दिव्यावर झडप घेणारा पतंग (३-१९६),नाव वेगानें जात असतां तीरावरील वृक्षांच्या चालण्याचा भास  (४-९६), कापूर देणारी कापूरवेल (११-२४६), सूर्याच्या स्थित्यनुरोधानें आपलें तोंड फिरविणारें सूर्यकमळ(१८-८६२), वगैरे अनेक निसर्गाचे सूक्ष्म विषय ज्ञानेश्वरांच्या नजरेतून सुटलेले नाहींत. सृष्टीला शोघा आणणारा वसंत (३-१००), खच्ची केलेल्या झाडांचा आडवा विस्तार (२-३०६), शरदॠतूंतले पांढरे मेघ व ग्रीष्मांतील काळे मेघ (८-१६०),  शरदॠतूंतल्या चांदण्याची बहार (१-५६), वगैरे गोष्टी ज्ञानेश्वरांनी बारकाईंने पाहिल्या होत्या. थोडक्यात सांगायचें म्हणजे ज्ञानेश्वरीचे निसर्गावलोकन अत्यंत व्यापक व मार्मिक आहे हें ज्ञानेश्वरीत सर्वत्र दिसून येतें. शा स्त्री य गो ष्टी.-ज्ञानेश्वरीत शास्त्रीय कल्पनाहि पुष्कळच आलेल्या आहेत. सूर्याची स्थिरता (४-९८), त्यांचें स्वयंप्रकाशित्व (२-३६०) त्याच्या किरणामुळें उत्पन्न होणारें मृगजळ (३-२६५), त्याच्या प्रकाशाची तीव्र गति (५-८६) त्याच्या भोंवतीं फिरणारे ग्रह, त्याच्या किरणांनी हाणारी पाण्याची वाफ (१३-४८७) , समुद्राचें पाणी एकच आहे ही कल्पना (३-३९), त्यांतील मोठीं जलचरं (१८-१६९७), चंद्राच्या आकर्षणानें त्याला येणारी भरती (१३-१३८), आकाशाच्या ठिकाणीं निळ्या रंगाचा भास (१३-१०५) त्यात स्थिर असणारा ध्रुव (१-६२०), बाकींचें असंख्य तारे (१०-२४०) , मंगळादि ग्रह (५.११५), केव्हां तरी दिसणारे धूमकेतू (१६-३१५),चंद्रसूर्याचीं ग्रहणें (१८-१०९), अमावस्येच्या दिवशींहि चंद्रसूर्याची आकाशांत असणारीं बिंबें (११-३), चंद्राच्या कलांचीं बिनचूक कल्पना  (१८-११२१), त्याच्यावरच डाग (१८-२७१), मेघांची उपपत्ति (१८-३०६), त्यांचा हलकेपणा (१३-२१३), त्यांच्या घर्षणानें उत्पन्न होणारीं वीज (७-५७), वनस्पतींचे सजीवत्व (१३-२२६), झाडांच्या घर्षणानें उत्पन्न होणाराअग्नि (१-२४२), लोहचुंबक (१३-२३९), ध्वनीलहरी (६-१५), प्रतिध्वनीची कल्पना (४-७४), गतीची कल्पना (१८-४२४), स्वप्नांची उपपत्ति (५-५३), दृष्टीची मीमांसा (२-५६), श्वासोच्छ्वास म्हणजे दहनक्रिया आहे ही कल्पना (१५-३७६), कफवातपित्तांची कल्पना (१४-१९५), वगैरे अनेक शास्त्रीय गोष्टींचे उल्लेख ज्ञानेश्वरीत आढळतात. ज्ञानेश्वरकालीं चातुर्वर्ण्य बऱ्याच शुद्ध स्थितींत असावें असें वाटतें; कारण, पोटजातींचा उल्लेख ज्ञानेश्वरींत विशेष कोठे आढळत नाहीं. द्विजांचे रोटीव्यवहार शूद्राशीं निषिद्ध मानले होते. (३-२१६). मात्र येथें ब्राह्मण असा शब्द न घालतां ज्ञानेश्वरांनीं द्विज असा मोघम शब्द घातला आहे, त्यावरून ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांत परस्पर रोटीव्यवहार होत होते कीं, काय अशी शंका येते. ज्ञानेश्वरकालीं सतीची चाल जोरांत होतीसें दिसतें (१६-१८५). एखादी स्त्री विधवा राहिल्यास तिची समाजांत विटंबना होत असे (२-१९९). लोकसमाज सामान्यत: श्रद्धळु होता यामुळें नवस (१३-८९९), मुहूर्त, भुतेंखतें (१-१९०), मंत्रतंत्र (१६-३५८), किमया (६-३४), वगैरे गोष्टींवर लोकांचा बराच विश्वास होतो.  प्रवासाची व्यवस्था बैलगाडयांनीच होत असे (१४-२३८), मार्गांत ठकांचा उपद्रव असे (३-२०६), शिकार करुन व संधि साधल्यास लुटालूट करुन उदरनिर्वाह करणा-या पारधी लोकांच्या टोळ्या या गांवाहून त्या गांवास जात असत (१६-२८५). व्यापारी लोके तांडे करुन परगांवी व्यापारास जात असत (१३-२३०). प्रवासांत सुरक्षितपणासंबंधी धोका असें; तथापि बांधलेले तलाव (१७-८९), अन्नसत्रें (१३-२३०) धर्मशाळा, पाणपोया वगैरे सोयी प्रवासी लोकांकरितां असत त्याकाळचीं शहरें बरींच सुधारलेलीं होती व लोकांनां नागरिकत्वाची कल्पनाहि होती. राजें लोकांनीं मोठमोठीं नगें वसविलेलीं होती(९-१०९) अशा नगरांतून तीन मजल्यापर्यंत घरें (५-११०), होतीं. श्रीमंत लोकांची घरें विशेष शृंगारलेलीं असत (२-३६२) लोखंडी खांब (१६-३७७), उत्कृष्ट प्रकारचीं चित्रें, (१८-५२९) पंखे, चवऱ्या, तांटें , खुंट्या वगैरे वस्तू (१३-४१५) पोपट (११-१७), हरणें (११-१७०), खालीं वर वाट दाखविणारें शिपाई, प्यादें, देवडीवाले इत्यादि सर्व सुखसोयी श्रीमातांच्या घरांतून असत (१८-१४०). अगदीं गरीब स्थितींत असलेल्या लोकांच्या झोंपड्या गवताच्या अगर पाल्याच्या असत. (२-३६२). गांवांतून अगदीं हल्लींच्याप्रमाणें खाणावळीचीच सोय नसली तरी पैसे घेऊन जेवावयास घालीत असत (२-२५४) तथापि तें एकंदरीत गौण मानीत असत. अतिथींचा सत्कार चांगल्या प्रकारें होत असे, आणि अतिथि रागावून गेला तर आपल्या पुण्याची हानि होईल असें लोकांनां वाटे (१५-३३२). गावांतील पाणी गटारानें नदीत नेऊन सोडीत (५-१५३), राज्यव्यवस्था हल्ली इतकी निर्भय नसल्यामुळें पैसा घरांत पुरून ठेवीत असत (९-५८) कापड हातमागावर तयार होत असें (९-७५), मालाची कोठारें तळघरांत असत (१६-३९३). कपडे धुणारें धोबी सौदणीचा उपयोग करीत असत (१८-१४०). मोठ्या गांवांतून सार्वजनिक दिवे असत (१५-३८१), व कांहीं ठिकाणी लोक  धर्मार्थ दिवे ठेवीत असत (१६-३३८), त्या काळी नाटको होत असावीत असें वाटतें. कारण  नटाचा अभिनय (१६-३७४), पडदे (५४१) वगैरेंचा उल्लेख ज्ञानेश्वरींत आढळतो. राजाराणीची सोंगें घेणाऱ्या बहुरुप्याचा उल्लेख एके ठिकाणीं केला आहे. त्यावरूनहि वरील कल्पना दृढ होते. नायकिणी, वेश्या (१३-२०४), जुगाराचे अड्डे (१८-६७०), वगैरे अनीतिप्रवर्तक संस्थाहि मोठमोठ्या शहरांतून होत्या असें दिसतें. धं दें:-ज्ञानेश्वरकालीं लोकांच्या निर्वाहाचे मुख्य साधन शेतकी हें होतें. शेत (४-७३) , शेताचे कुंपण (११-५३२), मळे व बागा (१२-१२०), पेरणी (६-४८७), मळणी (१३--३९), वगैरे शेतकीसंबंधी उल्लेख ठिकठिकाणीं आले आहेत. शेतकीला बैलांचा उपयोग करीत असत. धान्याचीं पेवें असत (१७-२८४) दुभत्याचें मुख्य साधन गाई होत्या. म्हशींचा उल्लेख ज्ञानेश्वरींत कोठेंहि आढळत नाहीं. घोडयांचा उपयोग हल्लींप्रमाणेंच बसण्याकडे व रथाकडे करीत असत. व्यापाराला हल्लीप्रमाणें शिस्त नव्हती, व तो शेतकीहून कमा दर्जाचा मानला जात असे. कर्जाची देवघेव बहुतेक तोंडीं होत असे. धनको हा ॠणकोला मोठा बागुलबावा वाटत असे १८-२५०). व्याज देत घेत असत व त्याचा कमाल दर एकोत्रा असे. उत्कृष्ट सोन्याचा दर पंधरा, साडेपंधरा असे (६-८२) (८३७) फिरस्ते व्यापारी मालाचे विशेषत: कापडाचे गठ्ठे घेऊन हिंडत असत. (११-६४१). रा ज की य बा बी.-त्यावेळच्या राजांचा अधिकार  अनियंत्रित असे. तथापि हे राजे चांगल्या मंत्र्यांना बहुमनापुरा:-सर वागवीत असस. अमंत्रिक राज्य निश्चयानें धुळीला मिळतें असा आपला अभिप्राय ज्ञानेश्वरांनीं व्यक्त केला आहे (१३-५५५). गावागांवीं असणाऱ्या राजाच्या अधिकाऱ्यांचा दरारा मोठा असे. (१८-८४६) राजाचीं उपवनें, बागा (१८-९३) वगैरे असत परचक्राची भीति नेहमीं असल्यामुळें प्रत्येक राजाचीं कांहीं खडी फौज म्हणून असें. (१८-१६-१५) राजाच्या टांकसाळी असत (७-२२). व प्रत्येक राजा आपल्या नांवाची नाणीं पाडीत असे. पुष्कळ वेळां या नाण्यांतून लोकांनीं केलेलीं बनावट नाणीं मिसळत असत. व ती इतकीं बेमालूम केलेलीं असत कीं, चांगल्या नामांकित पोतदाराला देखील ती ओळखून काढण्यास पंचाईत पडे (४-८५) नाण्यांचा तुटवडा विशेष भासूं लागल्यास कातड्याच्या चलनी नोटा राजे लोक प्रचारांत आणीत असत (९-४५०) एकंदरींत तत्कालीन राजकीय परिस्थिती आजच्या स्थितीच्या मानानें मागासलेली होती, तथापि ती लोकांनां सुखदायक होत असावी असें वाटतें (लोकशिक्षण, वर्ष ७ अं. ६)

ज्ञा ने श्व री चें व्या क र ण.- ज्ञानेश्वरीच्या भाषेच्या व्याकरणाविषयीं राजवाडे यांनीं जें संशोधन केलें आहे त्याचें स्थूल स्वरूप येणेंप्रमाणें--

एकंदर भाषेविषयीं राजवाडे असें म्हणतात कीं, वैदिक भाषेंतील भाषावैशिष्ट्याचीं कित्येक अंगे संस्कृतांतून गळालीं कित्येक संस्कृत बाबी महाराष्ट्रांत व अपभ्रंशांत नाहींशा झाल्या व कित्येक महाराष्ट्रीय बाबी ज्ञानेश्वरी मराठींत लुप्त झाल्या हेमचंद्र ज्या अपभ्रंशाचें व्याकरण देतो त्याहून निराळ्या अपभ्रंशापासून मराठी निघाली असें म्हणण्याकडे प्रवृत्ति होते, इतकेंच नव्हें तर मराठी ज्या अपभ्रंशापासून निघाली तो अपभ्रंश महाराष्ट्रीपासून फारसा भिन्न नसावा असेंहि म्हणणें प्रशस्त वाटतें. '' वर्ण, शब्द व क्रिया यांचे विभक्तीप्रत्यय व निपांत या सर्वांचा आपणांस पूर्ण इतिहास लागला आहे. आणि या सर्वांचें ऐतिहासिक स्पष्टीकरण आपण केलें आहे असें राजवाडयांचें म्हणणें  आहे. वर्णाविषयीं राजवाडे जें म्हणतात, त्यांतील मुख्य गोष्टी येणेंप्रमाणें:- उदात्त-अनुदात्तादि स्वर मराठी भाषेंत आले आहेत अशी राजवाडे आपली समजूत करून (हें मत आम्हांस मान्य नाहीं. विज्ञानेतिहास पृ. १७५ पहा.) घेतात. दीर्घ ॠ ज्ञानेश्वरींत नाहीं व ॠ, ॠृ, लृ, ऐ, औ हें पांच स्वर अपभ्रंशांत नव्हते परंतु यांतील चार स्वर ज्ञानेश्वरींत आले आहेत. याचें कारण संस्कृत शब्दांचा मराठीनें स्वीकार केला हें होय. व्यंजनाकडे पाहिलें असतां ज्ञानेश्वरींतल्या मराठींतील कांहीं वैशिष्टयें राजवाडयांनी नोंदिली आहेत, व त्याचें कारण संस्कृत भाषेचा प्रचलित अपभ्रंशावर परिणाम होऊन ज्ञानेश्वरीची भाषा तयार झाली हें होय असें सांगतात. व यास उदाहरणें म्हणून ळ् वर्णाचा अभाव व महाराष्ट्रांत नसलेल्या श् आणि ष् यांचा पुनरुद्भव ही प्रमाणें देतात.

नामविभक्तिप्रत्ययाविषयीं राजवाडे सांगतात कीं, ज्ञानेश्वरींत द्विवचन नाहीं व या बाबतींत संस्कृत भाषेकडे पुन्हा वळतांना ज्ञानेश्वरीनें द्विवचन घेतलें नाहीं. ज्ञानेश्वरींत त्यांनी आठ विभक्त्या कबूल केल्या आहेत परंतु हें त्याचें मत त्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत टिकलें कीं नाहीं हें सांगतां येत नाहीं. आठ विभक्त्या काढून मराठींत एकच विभक्ती आहे आणि ती द्वितीया होय  असें त्यांचें पुढें पुढें मत होऊं लागलें होतें. षष्ठीचा 'च' हा 'ईय' प्रत्ययापासून निघाला असावा असें कृष्णशास्त्री चिपळोणकर म्हणत परंतु 'त्य' या प्रत्ययापासून तो निघाला असें राजवाडे यांचें मत आहे व राजवाड्यांनी सामान्यरूपी षष्ठी देखील शोधून काढिली आहे. 'पिशाच्या हातीं', 'रामा करीं' हीं त्यांचीं उदाहरणें देतात. ''च'' वर राजवाड्यांचें व्याख्यान महत्त्वाचें आहे. अनेकवचनविषयक अनुनासिक राजवाडे दाखवितात व तें जुन्या संशोधकांनीं शोधिले नाहीं. म्हणून त्यास दूषण देतात. हेमचंद्रानें दिलेला अपभ्रंश मराठीशीं जुळत नाहीं. महाराष्ट्री व मराठी या दोहोंत साम्य अधिक आहे. हें राजवाडे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या  रूपांवरून दाखवितात. अपभ्रंशामधील प्रथमेचें रूप होऊं असें होते आणि महाराष्ट्रींत अहमि, अम्मि, म्मि असे होतें.  यावरुन महाराष्ट्रीपासून मराठी झाली असावी आणि हेमचंद्रोल्लेखित अपभ्रंशापासून गुजराथी हुं झालें असावें असें दिसतें. अनेकवचनी रुपामध्यें मात्र मराठीचीं रूपें अपभ्रंशाशीं बरीच जुळतात हे राजवाडयांनी कबूल केले आहे.  अपभ्रंशापैकीं ''काह'' व ''कणव'' शब्दांचीं रूपे ज्ञानेश्वरींत आहेत हें राजवाड्यास मान्य आहे. मराठींतील अनेक क्रियापदांच्या स्वरुपाचें पृथक्करण अगदीं स्वतंत्रपणें केलें आहे आणि तें देखील इतकें स्वतंत्र झालें आहे कीं, क्रियापदांच्या स्वरुपाच्या बाबतींत मराठी भाषेचा संस्कृत भाषेशीं धागा लावण्याची जी अत्यंत अडचण पडत होती ती अडचण बऱ्याच अंशी दूर झाली आहे.

राजवाडे यांचें ज्ञानेश्वरीचें व्याकरण त्यांनीं आपल्या मृत्यूपूर्वी पुन्हां तपासलें असतें तर बरें होतें. कां कीं, त्यांच्या भाषाविषयक इतिहासाच्या कल्पना या पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर पालटल्या होत्या. वैदिक भाषेपासून किंवा संस्कृतपासून महाराष्ट्री व मराठी या भाषा  निघाल्या नसून वेदकालीन महाराष्ट्रिक भाषेंपासून मराठी भाषा निघाली असावी आणि महाराष्ट्रिक भाषा वेदभाषेची सख्खी किंवा चुलत बहीण असावी असें राजवाडयांचें मत झालें होतें पण या मताचा त्यांच्या या व्याकरणांत मागमूसहि नाहीं. अकरा या शब्दाच्या व्युत्पादनासंबंधानें त्यांनां या पुस्तकांत अडचण उत्पन्न झालेली दिसत नाही. तथापि त्यांच्या मनांत विकल्प उत्पन्न झाला असावा हें मात्र दिसतें. कां कीं, दहा शब्दापर्यंत संख्यावाचक शब्दांचीं समीकरणें मांडतांनां त्यांनीं महाराष्ट्रीबरोबर संस्कृत शब्दांसहि स्थान दिलें आहे. पण तसें अकरा, बारा, तेरा वगैरेंच्या स्पष्टीकरणास दिलें नाहीं. मराठीचा संबंध महाराष्ट्री व अपभ्रंश यांशीं दाखविला आहे पण तो संस्कृत भाषेशीं दाखवावयाचा वगळला आहे. संधीविषयीं सांगतांना मराठी समासांत संधि विकल्पानें होतो असें मराठी भाषेचें मर्म सांगितलें आहे आणि महाराष्ट्रीपासून ज्ञानेश्वरीच्या कालापर्यंत या नियमाचें अस्तित्व दाखविलें आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजें आपल्या ज्ञानेश्वरीच्या व्याकरणाच्या पूर्णतेविषयीं राजवाड्यानीं जितकें आश्वासनपूर्वक विधान केलें आहे. तितकें आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत केलें नसतें असें वाटतें. तथापि त्यांच्या या व्याकरणानें ज्ञानेश्वरीच्या व त्याचप्रमाणें अर्वाचीन मराठीच्या व्याकरणाचें स्पष्टीकरण बरेंच झालें आहे यांत शंका नाहीं.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .