विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
होलिया- किंवा होलर. म्हैसूर संस्थानांतील एक जात. यांची त्या संस्थानांत एकंदर लोकसंख्या (१९११) ६१३२४८ आहे. यांचा वडिलोपर्जित धंदा खेडयांतील राखणीचा किंवा शेतीचा आहे; पण हल्लीं सुमारें एकपंचमांश लोक हा धंदा करतात; बाकीचे सर्व लोक खाणींत अगर इतर ठिकाणीं मजुरी करतात. 'होलिया' या शब्दाचा 'देशाचा मनुष्य' असा अर्थ होतो. यावरून हे लोक येथील मूळचे रहिवासी असावे असें अनुमान निघतें. यांच्यानंतर आलेल्या लोकांनीं यांनां आपल्या वर्चस्वाखालीं ठेवून त्यांनां शेतकी व मजुरी करावयास भाग पाडलें असावें. हे लोक तामिळ, तेलगू, कानडी,आणि मराठी या भाषा बोलतात. या जातीत अनेक पोटभेद असून ते भाषा, धंदा व वसतिस्थानावरून पडले असावे. या लोकांपैकीं मराठी बोलणारे लोक मुंबई इलाख्याच्या सरहद्दीवर आढळतात. यांची गणिते तेथें महारांत करण्यांत येते. मुलीस योग्य वर न मिळाल्यास तिचें झाडाबरोमर लग्न लावतात; मग तिनें आपल्या जातीच्या कोणाहि पुरुषाबरोबर रहावें. हिला होणारी संतति औरस म्हणून समजली जाते. त्याचप्रमाणें एखाद नवस केला असल्यास त्या नवसाप्रमाणें मुलीस देवतेस अर्पण करतात. याच्यांत घटस्फोटाची चाल रूढ आहे. हे लोक श्राद्ध करती नाहींत. याची वस्ती गावाबाहेर असते. इतर जातीतील लोकांस काहीं विधीनंतर हे लाके आपल्या जातीत घेतात. यांच्यात मुलें आपल्या बापाच्या मालमत्तेचें सारखे विभाग करतात. त्यापैकीं सर्वांत धाकट्यास वाटेल तो हिस्सा मागतां येतो. जावई आपल्या सासरच्यांच्या घरीं रहात असल्यास त्यालाहि बरोबरींने हिस्सा मागतां येतो. हे लोक गावांत अस्पृश्य समजले जातात. हे लोक शैव अगर वैष्णव असतात. तसेचं रुचि प्रिय देवतांचे ते भक्त आहेत; व अशा देवतांच्या मूर्तीसच ते भजतात. दास, जोगी वगैरे त्यांच्यातील भिक्षुक होत. हे लोक हलक्या प्रतीचें कापड तयार करतात. यापैकी 'अळेमन' नांवाच्या पोटजातीचे लोक सैन्यात शिरतात. (से. रि. (१९११) २१.)