विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हैदरअल्ली- म्हैसूरच्या गादीवर बसणारा हा उपरी राजा इ. स. १७२२ च्या सुमारास दक्षिणेंत जन्मला. हा १७४०च्या सुमारास म्हैसूर लष्करांत चांगला उदयास आला . त्यानें म्हैसूरचा राजा व दिवाण यांनां आपल्य ताब्यांत आणलें होतें. इ. स. १७५७ त हैदरअलीनें म्हैसूर सरकारास सल्ला दिला कीं, मार्च महिन्यांत पेशव्यांनीं श्रीरंगपट्टणवर स्वारी केली तेव्हां त्यांनां देऊं केलेल्या ३२ लक्षांच्या खंडणीपैकीं जी रक्कम द्यावयाची राहिली आहे, ती त्यांस न देतां. या रकमेच्या फेडीकरितां वसूल गोळा करण्यासाठीं त्यांनीं आपल्या जिल्ह्यांत जे कारकून ठेविले आहेत त्यांस हांकून लावावें. तसें झाल्यावर १७५९ चा पावसाळा संपतांच म्हैसूरकरांचें पारिपत्य करण्याकरितां पेशव्यांनी गोपाळ गोविंद पटवर्धन यास कर्नाटकांत पाठविलें. तेव्हां गोपाळरावाशीं लढण्याकरितां म्हैसूरकरांनी हैदरअलीचीच योजना केली. सर्व सैन्यांचे अधिपत्य स्वीकारण्याचा हा हैदरअलीला पहिलाच प्रसंग होता. १७६१ त हैदरानें म्हैसूरचें राज्य आपल्या स्वत:च्या देखरेखीखाली घेऊन तें वाढविण्यास सुरुवात केली पेशवे आपल्या घरातील भांडणें मोडण्यांत व निजामअल्लीशीं लढण्यांत गुंतले आहेत, असें पाहून, हैदरअल्लीनें इसवी सन १७६१ पासून १७६४ पर्यत तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील मराठ्यांचा बहुतेक मुलूख पादाक्रांत करून उत्तरेस कृष्णा नदीपर्यंत आपली ठाणीं बसविलीं. तेव्हां इ.स. १७६४ त पेशव्यांनीं हैदरावर स्वारी करून वर्धा नदीच्या उत्तरेकडील सर्व मुलूख त्याजपासून सोडविला. व त्याचा कित्येक लढायांत पराभ करून त्यास दांती तृण धरावयास लाविलें (१७६५) हैदरअली मराठयांस शरण आला, व त्यानें ३२ लाख रुपये खंडणी देऊन त्यांना परतवून लाविलें. पण मलबार पादाक्रांत करून त्यानें हें नुकसान ताबडतोब भरून काढलें. इ. स. १७६७ त थोरल्या माधवराव पेशव्यांनें याच्यावर दुसऱ्यांदा स्वारी केली व शिरें. होसंकोटें व मद्दगिरी हीं स्थळे हस्तगत करून त्याच्याकडून ३० लाख रुपये खंडणी घेतली. मराठ्यांची मोहिम संपते न संपते तोंच हैदराला निजामअल्ली व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याशीं युद्ध करण्याचा प्रसंग आला. प्रथम प्रथम ब्रिटिश सैन्याचा जय होत गेला व हैदरहि तह करण्यास विनंति करूं लागला. परंतु त्याची मागणी नाकारल्याबरोबर त्यानें सर्व बल एकत्र करून अचानक मद्रासेस जाऊन तेथील इंग्रज गव्हर्नरास आपण सांगू त्या अटीवर आपल्याशीं तह करावयास लाविलें (३ एप्रिल १७६९). या तहांत परस्परांनीं परस्परांचा घेतलेला मुलूख परत करून पुढें दोस्तीनें व एकमेकांच्या मदतीनें असावें असें ठरलें. इंग्रजांशीं केलेल्या तहामुळें यास जोर येऊन हा मराठ्यांची मागील थकलेली खंडणी देण्याची टाळाटाळ करूं लागला व मराठ्यांच्या अंकित असलेल्या पाळेगारांपासून यानें खंडण्या वसूल करण्यास आरंभ केला. तेव्हां माधवराव पेशव्यांनें यावर तिसऱ्यांदा (१७७०) स्वारी करून त्याजपासून शहाजी राजाची सर्व जहागीर परत घेतली व यास मद्दगिरी व गुर्रमकोंडा द्यावयास लावून, मागील खंडणीच्या बाकीबद्दल व स्वारीखर्चाबद्दल ३६ लाख रुपये, आणि पुढें दरसाल खंडणीप्रीत्यर्थ १४ लाख रुपये देण्याचें कबूल करावयास लाविलें (१७७२). या युद्धांत हैदराला इंग्रजांनीं मुळींच मदत दिली नाहीं म्हणून हैदर त्यांचा सूड घेण्यासाठीं चडफडत होता. नारायणरावाच्या खुनामुळें पुणें दरबारीं घोटाळा उडलेला पाहून यानें गेल्या स्वारींत मराठ्यांनीं घेतलेला आपला मुलूख परत घेण्यास सुरवात गेली हें ऐकून राघोबा यावर स्वारी करून आला. परंतु त्यास इतकी अडचण होती कीं, त्यानें २५ लाख रुपयें देण्याचें कबूल केल्याबरोबर तीन जिल्ह्यांवरील आपला हक्क सोडला. पुढें बारभाईच्या कारस्थानाचें वर्तमान ऐकून पुण्यास परत जातांना राघोबानें कल्याणदुर्ग येथें याशीं तह केला व त्यांत यानें दरसाल ६ लक्ष रुपयें राघोबास खंडणी म्हणून देण्याचें मंजूर केलें (१७७४). राघोबा उत्तरेकडे गेल्यावर पेशव्यांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन, हैदरानें शिरें गुर्रमकोंडा काबीज केला, व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील मुलूख आपल्या ताब्यांत घेतला (१७७४). इ. स. १७७६ मध्यें यानें बल्लारी व गुत्ती विश्वासघातानें काबीज केली व मुराररावास रोगट हवेच्या एका डोंगरी किल्ल्यावर कैदेंत टाकलें. राघोबा पुणें दरबाराशीं झगडण्यांत गुंतला असतां यानें त्यास मदत म्हणून २४००० होन पाठविलें होते. राघोबानें सांगितल्यावरून कृष्णेच्या दक्षिणेकडील मराठयांचा सर्व मुलूख आपण कबजात घेणार आहों असें डोंग करनू १७७५ सालच्या पावसाळ्यास आरंभ होण्यापूर्वी त्यानें साबनूरच्या नबाबाच्या सरहद्दीपर्यंत सर्व मुलूख जिंकून घेतला. पुणें दरबारनें याजवर कोन्हेरराव व पांडुरंगपंत पटवर्धन याची रवानगी केली होती. परंतु त्याचा पराभव होऊन पाडुरंगपंत हैदराच्या हाती सापडला. यावेळी हैदराकडे राघोबाच्या वतीनें बाजीपंत बर्वे लढत होता. पावसाळा संपल्यावर पुण्याहून परशुरामभाऊ पटवर्धन याची याजवर रवानगी झाली. परंतु हैदरानें परशुरामभाऊच्या बरोबर आलेला निजाबाचा सरदार जो घौशा त्यास लाच दिल्यामुळें परशुरामभाऊ न लढतांच परत गेला. इ. स. १७७७ च्या पावसाळ्यानंतर हरिपंत फडक्याची याजवर रवानगी झाली होती. परंतु बाजीपंत बर्वे यानें याच्या सैन्यांत फितूर केल्यामुळें त्यास म्हणण्यासारखें यश आलें नाहीं. इकडे यानें तर कोपळ व बहादुरबेंडा घेऊन १७७८ च्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस धारवाडासहि वेढा दिला होता. हरिपंतास याच वेळीं पुण्याला जाणें अवश्य झाल्यामुळें त्यानें याला चकविण्यासाठीं एक युक्ति योजिली; कोल्हापूराकडे महादजी शिंदे होता त्याच्या सैन्यास मिळण्याकरिता आपण जात आहों असें दाखवून हा मिरजेस आला. तेव्हां आतां हे आपणावर स्वारी करून येणार अशी हैदरास भीति पडून त्यानें युद्ध थांबविण्याविषयीं बोलणें लाविलें. यावेळीं हरिपंतानें बरेंच ओढून धरून याजपासून पुष्कळ पैसा उकळला. इ.स. १७७८ च्या मे महिन्यांत महादजी शिंदे व हरिपंत फडके उत्तरेस निघून गेल्यावर मराठ्यांचा मुलूख घशाखालीं घालण्यास याला पुन्हां संधि सांपडली. त्यानें धारवाड घेऊन उत्तरेस घटप्रभा व कृष्णा या दोन नद्यांपर्यंतचा मुलूख आपल्या अंकित करून त्यानें चित्रदुर्गहि काबीज केलें व कडप्पा जिंकून पूर्वेस आपल्या राज्याची मर्यादा वाढविली (१७७९). हैदर कडाप्पाच्या आसमंतांत असतां लाली नांवाचा फ्रेंच सरदार त्यास येऊन मिळाला. तो येण्यापूर्वीच हैदराच्या मनांत इंग्रजाविषयी द्वेष उत्पन्न झाला होता. त्यानें फ्रेंच लोकांशी कित्येक दिवसांपासून मित्रत्वाचा व्यवहार ठेवला होता. मॉरिशस बेटांतून माही बंदराच्या मागे आतांपावेतो त्याला फ्रेंचांकडून युद्धोपयोगी सामुग्रीची व कधी कधी शिपायांचीहि मदत मिळाली होती. इ.स. १७७८ त इंग्रजांनी फ्रेंचांची पाँडेचरी हस्तगत केली, तेव्हां हैदरास अर्थातच वाईट वाटलें पुढें इंग्रजांनी त्याचें माही बंदरहि काबीज करण्याचा बेत केला. तेव्हा, ही वसाहत माझ्या राज्यांत असल्याकारणानें ती माझ्या आश्रयाखाली आहे. असें जाहीर करुन त्या ठिकाणाचे रक्षण करण्याची त्यानें पुष्कळ धडपड केली, व इंग्रजांनी त्या ठिकाणास वेडा दिला असता त्यानें फ्रेंच निशाणाशेजारी आपलें निशाणहि उभारलें. परंतु इंग्रजांनी तिकडे लक्ष न देतां इ. स. १७७९ च्या मे महिन्यांत तें स्थळ हस्तगत केलें आणि पुढें त्याची तटबंदी पाडून टाकाली. इ. स. १७७९ च्या एप्रिल महिन्यांत मद्रासकर इंग्रजांनी वसालतजंगाशीं तह करून त्याजपासून त्याचा गंतूर प्रांत खंडानें आपल्याकडे घेतला. परंतु हैदरास ही गोष्ट रुचली नाहीं. कारण यामुळें त्यानें नुकताच पादाक्रांत केलेला मुलूख त्याच्या राज्यापासून तोडला जात होता. म्हणून इंग्रज जेव्हां तो प्रांत आपल्या कबजांत घ्यावयास निघाले. तेव्हा हैदरानें लागलीच त्यांनां मार्गात अडथळा करण्याकरितां आपलें सैन्य पाठविलें. त्याच्या सैन्यानें कर्नल बेली याचा पराभव केला (१७८०) असतां वारन हेस्टिंग्जनें कलकत्त्याहून सर अय्यर कूट याला त्याच्यावर पाठविलें. कूटनें त्याचा पोटों नोव्हो, पॉलिलूर, व शोलिंगड या तिन्ही लढायांत पराभव केला. ब्रिटिश आरमारानें नेगापट्टम् काबीज केलें. तेव्हां त्यानें आपला मुलगा टिप्पू याला फ्रेंच आरमाराची मदत मिळविण्याकरितां पश्र्चिम किनाऱ्याकडे धाडलें . पण इतक्यांत चित्तूर येथें त्याचा अंत झाला (१७८२). १८ व्या शतकांत उत्तरेस रणजितसिंग व दक्षिणेंत हैदर असे दोघे शूर व राज्यसंस्थापक उदयास आले. दोघेहि निरक्षर व उलट्या काळजाचे होते. हैदरच्या ठिकाणीं नीति, धर्म किंवा दया काहीं नव्हतें. तो स्वत: सर्व काम पहात असून फार कडक रीतीनें अंमल चालवी. त्यामुळें त्याच्या राज्यांत सर्व एकतंत्री चाललें, होतें. त्याला पाच भाषा चांगल्या बोलतां येत होत्या. व तो सर्व काम झटपट उरकी. त्याची स्मरणशक्ति फार दांडगी असून अवघड आंकडेमोडींतहि तो वाकबगार असे. तो लोकांचा स्वभाव व गुण ओळखण्यांत तरबेज असल्यानें त्याला आपल्या भोंवतीं कार्यक्षम माणसें गोळा करतां आलीं. हा एक अलौकिक पुरुष होऊन गेला यांत शंका नाहीं.