विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हिरे- फार प्राचीन काळापासून हिरे हिंदुस्थानांतच सांपडत होते. सर्व इतिहासप्रसिद्ध हिरे हिंदुस्थानांतच सांपडलेले आहेत. पण हल्लीं हिंदुस्थानांत फार थोडे हिरे सांपडतात. प्राचीन काळीं ज्या ठिकाणीं हिरे सांपडत होते त्यांचे तीन स्थानविभाग करतां येतात; पहिल्या दक्षिणेकडील विभागांत कडाप्पा, बेल्लारि, कर्नूळ, कृष्णा व गोदावरी जिल्हे येतात. या ठिकाणीं गाळांत सांपडणारे हिरे गोळा केले जात व खणूनहि काढण्यांत येत असत. दुसरा विभाग महानदीच्या कांठचा प्रदेश; यांतील संबळपूर व चांदा जिल्ह्यांत मळीच्या जमीनींत हिरे सांपडत. तिसऱ्या विभागांत ६० मैल लांब व १० मैल रुंद असा पट्टा येतो व पन्ना हें त्याचें केंद्र आहे. या ठिकाणीं अद्याप हिरे सांपडतात.
सुप्रसिद्ध कोनिनूर हा कृष्णागोदावरीच्या प्रदेशांत कोलूर येथें सांपडला. हल्लीं जगांत सुमात्रा, बोर्नीओ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका, युरलपर्वत, ऑस्ट्रेलिया इत्यादि प्रदेशांत हिरे सांपडतात. पण यापैकीं दक्षिण आफ्रिकेंत सर्वांत जास्त हिरे निघतात. सर्वांत मोठा हिरा म्हणजे १९०५ सालीं प्रिटोरियाजवळ प्रीमियर खाणींत सांपडलेला कुलिनन होय. त्याचें वजन ३०३० कॅरट असून किंमत सुमारें १॥ कोटी पौंड आहे. यापूर्वी सांपडलेले मोठें हिरे पुढें दिले आहेत.
नांव | सांपडण्यांचें ठिकाण | वजन कॅरट |
एक्सेलसियर | दक्षिण आफ्रिका | ९७१ (न कापलेल) |
ग्रेट मोगल | हिंदुस्थान | २८० (कापलेला) |
रीजेंट | '' | ४१० (न कापलेला) |
१३७ (कापलेला) | ||
ओर्लोफ | '' | ९०० (न कापलेला) |
कोहिनूर | '' | १३० (कापलेला) |
या सर्व हिऱ्यांसंबंधीं कथा विद्यासेवकाच्या एका अंकांत (वर्ष ३ रें, अंक ८ वा ''अपयशी हिरे'' या लेखांत) दिली आहे. हिरा हा शुद्ध कर्ब आहे. तो जाळण्यास अत्यंत उष्णता लागते. तो सर्व पदार्थांत अत्यंत कठिण आहे. त्याच्या काठिण्याशीं इतर वस्तूंच्या कठिण्याची तुलना करण्यांत येत असते. याचें विशिष्टगुरुत्व ३ ते ३.५ असतें. सर्वोत्तम हिरा रंगहीन असतो. इतर पिंवळे, निळे, हिरवट, तांबूस रंगांचेहि हिरे असतात. पण ते कमी प्रतीचें होत. काळा हिराहि असतो. पैलू पाडलेल्या हिऱ्यांतून प्रकाशाचें बरेंच वक्रीभवन व परावर्तनहि होतें. त्यामुळें तो इंद्रधनुषी रंगाप्रमाणें दिसतो. हिरा फार तेजस्वी असतो. त्याचा प्रकाश प्रकाशांतून अंधारांत नेल्यावरहि पडतो. हिऱ्याचा बहुधा उपयोग अलंकारांकडे करतात. त्याला अनेक तऱ्हेचे पैलू पाडतात व या पैलूंवर त्याची किंमत चढत असते. पैलू पाडण्याची कला हॉलंडमध्यें ॲमस्टरडॅम येथें परमावधीस पोंचली आहे. व तेथें हा धंदा ज्यू लोकांच्या हातीं आहे. विलायतेंत इतर शहरींहि पैलू पाडतात. हिंदूस्थानांत सराफ लोक हिरे रतीच्या वजनानें तोलतात. पण परदेशांत कॅरटनें तोलतात. (१ कॅरट = २ रती = ४ ग्रेन). कांच व हिरे कांपणें, नक्षीकाम, घड्याळांत घालणें वगैरे करताहि हिरे लागतात. हिऱ्याचा जास्त खप अमेरिकेंत होतो. जगांतील हिऱ्यांच्या पैदाशींपैकी शें. ९८ दक्षिणआफ्रिकेंत होते व यापैकी शें. ५० ते ६० पर्यंत हिरे अमेरिकेंत जातात. मूळ हिरा हा विष नाहीं पण त्याची टोकें पोटांत आंतडयांत काचेंप्रमाणें चिरत जातात म्हणून मृत्यु येतो. गोल मण्यासारखा हिरा गिळल्यास मनुष्य मरणार नाहीं.