विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हाम्बर्ग, जर्मनी.- हाम्बर्ग संस्थानाची राजधानी. हें एल्ब नदीवर वसलेलें आहे. लोकसंख्या (१९१९) ९८५७७९. जगांतील सर्वांत मोठ्या बंदारांत याची गणना होत असून त्याचा नंबर लंडन व न्यूयार्कच्या खालोखाल येतो. शहरामधून बरेच लहान लहान कालवे काढले आहेत व त्यांच्या किनाऱ्यावर वखारी, तळघरें व हलक्या दर्जाच्या लोकांचीं घरें आहेत. या कालव्यांतून लहान लहान नावा चालतात व त्यांमुळें ते कालवे कसब्याच्या एका भागांतून दुसऱ्या भागांत मालाची ने आण करण्यास उपयोगी पडतात. शहरांतील उंच भागावर बांधलेलें एक देऊळ आहे, त्याचें शिखर ४२८ फूट उंच आहे. याशिवाय ६ लाख पुस्तकें व ५००० हस्तलिखितें असलेलें एक जंगी ग्रंथसंग्रहालय, पुरातनवस्तुसंग्रहालय, बिस्मार्कचा भव्य पुतळा, कलाकौशल्याचा व उद्योगधंद्यांचा अजबखाना, प्राणिसंग्रहालय, वनस्पतिशास्त्रचा अजबखाना व प्रयोगशाळा, संगीतकला, नौकायनशास्त्र, व्यापारी शिक्षण इत्यादिकांच्या शाळा, जहाजें बांधण्याचे शिक्षण देण्याकरितां एक वरिष्ठ दर्जाची शाळा आणि दुसऱ्या शास्त्रीय कलाकौशल्याच्या संस्था येथें पुष्कळ आहेत इतर बंदरांशीं जलमार्गानें फार दांडगा व्यापार चालतो. कारण बाहेरील माल मध्ययुरोपांत या मार्गानें येतो, इतकेच नव्हे, तर जर्मनी, ऑस्ट्रिया व कांहीअंशी रशियाचा माल परदेशांत या बंदरांतूनच जातो. येथील मुख्य उद्योगधंदा म्हटला म्हणजे खाद्यपेयाच्या वस्तू तयार करणें हा होय. याशिवाय इतर महत्त्वाच्या कारखान्यांत, हस्तिदंत, कृत्रिमखतें, तेलें, साबू, इंडियारबर, चामड्याचें सामान इत्यादिकांचे कारखाने मोडतात. येथें जहाजें बांधण्याचें बरेच कारखाने आहेत. १७८३ मध्ये पॅरिसच्या तहानें अमेरिका स्वतंत्र झाली तेव्हांपासून हें शहर व्यापारांत पुढें येऊं लागलें. नेपोलियनशीं झालेल्या युद्धांत ह्या शहरावर जबर खंडणी बसविली गेल्यामुळें हें पुन्हां खालावू लागलें होतें. परंतु १८१६ पासून वाफेनें चालणाऱ्या बोटी उपयोगांत आणून ह्या शहरानें इंग्लंड व अमेरिकेशी आपला व्यापार वाढविला. हें १८५६ त उत्तरजर्मनसंघास मिळालें व १८७१ त हें जर्मनसाम्राज्यांतील एक स्वंतंत्र शहर बनलें.