विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हानोव्हर- प्रशियाच्या हानोव्हर प्रांताची राजधानी हें शहर लीने नदीच्या कांठी वसलेलें आहे. लोकसंख्या (१९१९) ३९२८०५; बर्लिनहून कोलोनकडे जाणारा व हॅम्बर्गहून फ्रँकफोर्ट-ऑन मेनकडे जाणारा असे दोन्हीहि आगगाडीचें रस्ते या शहरावरून जातात. या शहराच्या उत्तरेस व पूर्वेस अरण्य आहे. या अरण्याचा सार्वजनिक उद्यानासारखा उपयोग केला जातो. शहराच्या दक्षिणेस १५४ फूट उंचीचा एक वाटर्लूचा जयस्तंभ आहे. यावर त्या लढाईंत पडलेल्या, ८०० हॅनेव्हरिअन शिपायांची नांवें खोदलेलीं आहेत. येथें शाळा व कॉलेजे पुष्कळ आहेत. शिक्षणाच्या सोयी येथें बऱ्याच असल्यामुळें व येथील लोकांची बोलण्याची जर्मन भाषा शुद्ध असल्यामुळें, परदेशांतून आणि विशेषत: इंग्लंडहून, येथें पुष्कळ विद्यार्थी येतात. येथील लष्करी शिक्षणाची शाळा नांवाजलेली आहे. व्यापार व उद्योगधंदे यांमुळें उर्जितावस्थेस आलेलें हें एक प्रमुख शहर आहे. येथें बहुतेक सर्व प्रकारचे उद्योगधंदे आहेत. कापड, लोखंडी सामान, रासायनिक द्रव्यें, यंत्रें, तंबाखू, पिआनो करणें. तयार हे धंदे मुख्य आहेत. येथील व्यापाराच्या मुख्य जिनसा म्हटल्या म्हणजे घोडे, कोळसा, धान्य, लांकडें, दारू व कातडी या होत प्रसिद्ध ज्योतिर्विद विल्यम हर्शल याचा जन्म येथेंच झाला. या शहराचा उल्लेख प्रथम १२ व्या शतकांत केलेला आढळतो. ''इलेक्टर ऑफ हॅनोव्हर'' म्हणून जी डयूक घराण्याची शाखा आहे तिचें पुढें हें राहण्याचें ठिकाण झालें. या डयूकापैकीं पहिला जॉर्ज हा इंग्लंडच्या गादीवर बसला. १८१० ते १८१३ पर्यंत हें वेस्टफालिना राज्यांत होतें, पण पुढें १८६६ त प्रशियाला जोडलें गेलें.