प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
             
स्थापत्यशास्त्र— (भाग १) (सिव्हिल इंजिनिअरिंग)

प्रा स्ता वि क

ह्या लेखांत स्थापत्यशास्त्र हा शब्द सिव्हिल इंजिनिअरिंग या अर्थानें वापरला आहे. फक्त तत्संबंधींचेंच विवेचन यांत येणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे सर्व प्रकारचीं लोकोपयोगीं बांधकामें. यांत, रहाण्याच्या इमारती, रस्ते, पूल, आगगाड्यांचे रस्ते, कालवे, बंधारे, शहराचा पाणीपुरवठा, गटारें वगैरें सर्व कामें येतात.

हें लिहितांना सध्यां इंजिनिअरिंग कॉलेजांमध्यें ज्या पुस्तकांवरून स्थापत्यशास्त्र शिकवितात त्या र्यांकीनचें सिव्हिल इंजिनिअरिंग आणि रुलकीट्रीटाईल ऑन सिव्हिल इंजिनिअरिंग या पुस्तकांचा मुख्यतः आधार घेतलेला आहे. तसेंच सरकारी इंजिनिअरिंग खात्यांत ज्या पद्धतीनें सर्व प्रकारचीं स्थापत्यशास्त्रीय कामें करण्यांत येतात ती पद्धति वर्णन करणारीं कॅप्टन म्यारीएट स्पेसीफिकेशन्स व त्याचें मराठी भाषांतर आणि वरील पुस्तक प्रो. एन्. नरसिंह अय्यंगार यांनी सुधारून व वाढवून केलेलें पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हँडबुक (सन १९२५ सालांत तयार झालेलें), तसेंच मूर सॅनिटरी इंजिनिअरिंग याचा मुख्यतः आधार घेऊन हा लेख लिहिला आहे.

स्थापत्यशास्त्र (इंजिनिअरिंग).— स्थापत्यशास्त्र हें इंग्रजी भाषेंत ज्याला इंजिनिअरिंग असें म्हणतात त्याचा एक पोटविभाग आहे. इंजिनिअरिंग याचा अर्थ नैसर्गिक शक्तींचा व पदार्थांचा उपयोग करून घेण्याची कला अथवा शास्त्र होय. या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला म्हणजे त्यांत सर्व प्रकारचीं बांधकामें येतात. त्यांत पुढें दिलेलीं निरनिराळीं कामें जरी येतात. तथापि ती 'स्थापत्य' (सिव्हिल इंजि.) शास्त्रांत गणिलीं जात नाहींत.

लष्करी (मिलिटरी) स्थापत्यशास्त्र.— यांत देशाच्या किंवा राज्याच्या रक्षणार्थ लागणारें किल्ले, रस्ते, पूल, खंदक खणणें, तोफासाठीं मार्याच्या जागा शोधून काढणें व त्या जागीं तटबंदी करणें, वगैरे आणि मारक किंवा संहारक, व विध्वंसक शस्त्रास्त्रें व स्फोटक द्रव्यें तयार करून ती वाटेल त्या ठिकाणीं नेतां येण्याची व्यवस्था करणें हीं कामें येतात.

यंत्रशास्त्र (मेकॅनिक इंजिनिअरिंग)— म्हणजे यांत सर्व प्रकारचीं एंजिन्स, कोळसे जाळून त्यापासून पाण्याची वाफ करून त्यापासून उत्पन्न होणार्या शक्तीचा उपयोग करणारी यंत्रें किंवा राकेलतेल, पेट्रोल यांपासून उत्पन्न होणार्या वायुरूप द्रव्यांच्या शक्तीचा विनियोग करणारीं यंत्रें बनविणें व चालविणें यांचा समावेश होतो.

विद्युच्छक्त्युपयोग शास्त्र (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग).— सध्यांच्या काळीं जलपतनोद्भूत शक्तीनें अथवा कोळसे किंवा राकेल जाळून त्यांपासून उत्पन्न होणार्या शक्तीचें रूपांतरित विद्युच्छक्तीचा उपयोग, आगगाड्या, ट्राम्बे, गिरण्या व यंत्रे फिरविण्यास लागणार्या शक्तीचा जेथें जेथें उपयोग लागेल अशा सर्व ठिकाणीं विजेचा उपयोग अथवा उष्णता उत्पन करण्यास लागणार्या भट्ट्या किंवा चुली यांत अथवा विजेचे दिवे लावणें, पंखे चालविणें वगैरे कामांत विजेचा उपयोग करून घेणें याचें आज एक स्वतंत्र विद्युच्छक्त्युपयोगशास्त्र म्हणून तयार झालें आहे व दरएक वर्षास त्याची झपाट्यानें प्रगति होत आहे.

समुद्रीय स्थापत्यशास्त्र (मरीन इंजिनिअरिंग).— समुद्राच्या लाटांपासून किनार्याचें रक्षण करण्यासाठीं तट किंवा धक्के बांधणें व जहाजांचें तुफानी वार्यापासून रक्षण करण्यासाठीं बंदराच्या बाजूनें मोठमोठ्या-वजनांत कित्येक खंडी भरणारे दगड किंवा कांक्रोटचे ठोकळे रचून, रूंद व मजबूत भिंती बांधणें व आगबोटीतील माल उतरण्यासाठीं रुंद भिंती खोल पाण्यापर्यंत बांधणें, तसेंच ज्या बाजूनें नेहमी सोसाट्याचा वारा येऊन मोठ्या लाटा उसळतात त्यांचा जोर कमी होण्यासाठीं रुंद जलोर्मिशक्तिभंजक भिंती बांधणें व बंदरावर येणारा माल उतरण्यास व उतारूंच्या सोईसाठीं गोद्या बांधणें, तसेंच, दीपगृहें बांधणें वगैरें कामेंहि येतात. यांपैकीं बांधकामें स्थापत्यशास्त्रांत येऊ शकतात. परंतु मोठमोठीं जहाजें व आगबोटी बांधणें हें काम यांत येत नाहीं; तसेंच पाण्यावरून चालणारी चिलखती जहाजें व बेडर जहाजें व विनाशिका बोटी; तसेंच पाण्यांत बुडून चालणार्या पाणबुड्या बोटी, तसेंच पाण्यावर चालणारीं व वाटेल तेव्हां आकाशांत उडणारीं आकाशयानें, हीं सर्व यंत्रकलेंत येतात. तसेंच जमिनीवरून चालणार्या स्वयंशक्तिप्रेरित पेट्रोलनें अथवा विद्युच्छक्तीनें चालणार्या गाड्या व इतर वाहनें हीं सर्व यांत्रिक विषयांतील आहेत.

खनिखोदनशास्त्र (मायनिंग)— यांत दगडी किंवा इतर अशुद्ध धातूंचे दगड किंवा सोनें काढण्यासाठीं ज्या विहिरी पाडाव्या लागतात, व आडवे बोगदे व दुसरीं विवरें पाडणें, तसेंच भूमिगत रॉकेल तेल किंवा पाणी शोधून काढण्यासाठीं उमा घळ किंवा भोंक पाडणें व त्यांत जलोच्चालन यंत्र बसवून हे प्रवाही पदार्थ वर काढणें किंवा खाणींत झिरपणारें पाणी बाहेर काढून टाकणें; तसेंच खाणींतून उकरून काढलेली खनिज द्रव्यें व आंत काम करणारीं माणसें यांनीं भरलेले पाळणे वर जमिनीच्या पृष्ठभागावर आणणे; तसेंच खाणीतून पाडलेली विवरें व बोगदे तुटून खालीं पडून माणसें चेंगरून जाऊं नयेंत म्हणून धिरे किंवा ठेपे व त्यांवरील बहालें बसविणें वगैरे कामें खनिखोदनशास्त्रीय म्हणून गणिली जातात. ('खनिखोदन' वि. १२ वा पहा).

प्रस्तुतच्या स्थापत्यशास्त्र या प्रकरणांत त्याच्या नांवाप्रमाणें-''स्थ''-सर्व प्रकारचीं बांधकामें येतील. परंतु यंत्रशास्त्रांतील स्वयंशक्तिप्रेरित व इतर इंजिनें वगैरे चरवस्तू येणार नाहींत.

पहाणी—मापणी (सर्व्हेइंग), चितारणी

(प्लाटिंग), आंखणी (सेटिंग औट).

इंजिनिअरिंगचें कोणतेंहि काम (रस्ते, कालवे, वगैरे) करणें झाल्यास पहिल्यानें तें स्थूलमानानें कोणकोणत्या दिशेनें केलें असतां खर्च कमी लागेल व दुसर्याहि सोयी साधाव्या अशा दृष्टीनें ज्या प्रदेशांतून तो रस्ता जावयाचा असेल, त्या प्रदेशांत एखादी मोठी नदी असल्यास तिच्यावर पूल बांधण्याला कोणती जागा पायाच्या दृष्टीनें सोईची (खडक वगैरे कोठें आहे) तसेंच नदीच्या प्रवाहाचा पाट लांबपासून पुलाच्या काटकोनांत वाहात येऊन पुलास कोणत्याहि प्रकारची इजा न करतां पाणी खळकन् वाहून जाईल अशी व दोन्ही कांठांस उंच दरडी असलेली अशी जागा शोधावी लागतें. तसेंच वाटेनें टेंकड्यांची रांग ओलांडावी लागत असेल तर त्या रांगेत कमींतकमी उंचीचें लवण कोठें आहे तें पाहून त्या ठिकाणाहूनच तो रस्ता नेणें इष्ट असतें. त्याचप्रमाणें वाटेनें मोठमोठीं गांवें कोणकोणतीं लागतात त्या सर्व गोष्टी नजरेच्या पाहणीनें (रेकनॉयटरिंग) आणि अनार्द्रभारमापक यंत्राच्या साहाय्यानें त्या प्रदेशांत हिंडून ठरवाव्या लागतात. हें (अनेराईड बॅरॉमिटर) यंत्र सुमारें पांच इंच व्यासाचें व दोन अडीच इंज जाडीचें पितळेच्या डब्याच्या आकाराचें असतें. व त्यांत निर्वात केलेलीं अतिशय पातळ पत्र्याची डबी बसविलेली असते. आणि त्या डबीवर हवेचा दाब जसजसा कमीजास्ती होईल. त्याप्रमाणें ती कमीजास्ती दबते व ती किती दबली यावरून हवेचा दाब किती वाढला हे सूक्ष्म रीतीनें मापतां येतें. व हें माप डबीच्या तोंडाला जी कांच बसविलेली असते त्या कांचेंतून आंतील डबीला सूक्ष्म सांखळीनें जोडलेली सूचि असतें व ती वरील तबकडीवर वर्तुळाकृति फिरतांना दिसते. त्या तबकडीवर उछ्रय (लेव्हल) दर्शक आंकडे मांडलेले असतात. व त्यावरून कोणतेंहि स्थल किती उछ्रित आहे हें पाहिल्याबरोबर समजतें. हे उछ्रयदर्शक आंकडे समुद्रसपाटीपासून अमूक फूट उंच असें माप दर्शवितात. त्यांत हजार हजार फुटांवर आंकडे मांडून प्रत्येक हजार फुटाचे दहा भाग करून शतकें केलेली असतात व त्या शतकांचे दहा भाग पाडून फुटांचे दशक दाखवितात. जर अशा डबीनें मुंबईस माप घेतलें व तीच डबी पुण्यास आणली तर दोन्ही ठिकाणच्या उछ्रयांमध्यें सुमारें १८०० फुटांचा फरक आढळून येईल. ही डबी हवेचा दाब मापीत असल्याकारणानें जर दोन ठिकाणांत पारदाच्या एक इंचाइतका फरक असेल म्हणजे २९ इंचांचें २८ इंच झाले तर दोन स्थळांतील उछ्रितांमध्यें सुमारें ९०० फुटांचा फरक पडेल. ह्याच हिशोबानें मुंबईस जेव्हां हवेचा दाब पारदाचें २९॥ इंच असेल तेव्हां निलगिरीसारख्या आठ हजार फूट उंचीच्या पर्वतावर हवेचा दाब फक्त पारदाचे २१॥ इंचच असेल. हवेच्या दाबानें जितक्या उंचीपर्यंत नेहमींच्या भारमापक पारद यंत्रांत पारा चढतो तितकें इंच हवेचा दाब आहे असें म्हणण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ अमक्या वेळीं पारदाचें एकोणतीस इंच इतका हवेचा दाब आहे असें म्हटलें म्हणजे तितक्या उंचीपर्यंत यंत्राच्या नलिकेंत पारद चढलेला आढळून येईल. जितके इंच त्यांच्या निम्मे पौंडांचा चौरस इंचावर भार आहे असें समजावयाचें व यामुळेंच ३० इंचांचा भार म्हणजेच प्रत्येक चौरस इंच क्षेत्रावर १५ पौंडांचा भार असा त्याचा अर्थ होतो. अनार्द्रभारमापक यंत्र हें नेण्याआणण्याला अतिशय सोईचें व पाहिल्याबरोबर उछ्रय दाखविणारें असल्यामुळें पहिल्या स्थूल पाहणीमध्यें त्याचा फार उपयोग होतो. अशा रीतीनें स्थूल मापणी केल्यानंतर मुख्य मुख्य आवश्यक बिंदूंचे (ऑब्लिगेटरी पॉईंट्स) सापेक्षा उच्चनीचत्व व पाणसळीच्या दुर्बिणीनें (लेव्हलिंग इन्स्ट्रुमेंट) लांब लांब अंतरावर अंकित दंड (स्टॉफ) ठेवून काढावें लागतें. येवढ्या पाहणीनें रस्त्याची रेषा साधारणतः कसकशी जाईल हें ठरवितां येतें व नंतर सांखळीच्या व कोनमापक (अँग्यूलरइन्स्ट्रूमेंट) यंत्राच्या साहाय्यानें त्या प्रदेशाची नक्की पहाणी व मोजणी करून पाणसळीच्या दुर्बिणीनें पथच्छेद (लाँजीट्यूडीनल सेक्शन) काढण्यास लागणार्या प्रत्येक बिंदूची उंची मोजून त्याप्रमाणें रस्त्याच्या मध्यरेषेचें चित्रित (प्लॅन) व पथच्छेद तयार करतात आणि हे पथच्छेद कागदावर काढून व त्यावरून रस्त्याची रेषा नक्की करून नंतर जमीनीवर त्याप्रमाणें आंखणी करून आणि मेखा मारून नक्की केलेल्या रेषवरून शेवटची मापणी करतात आणि पथच्छेद व आडवे छेद (क्रॉस सेक्शन) पुन्हां सूक्ष्म रीतीनें घेतात. आणि हे छेद घेतल्यानंतर नकाशावर मापाप्रमाणें रेघ ओढून त्यावरून अंदाजपत्रकें तयार करतात. हें केल्यानंतर भराव किंवा खोदाई किती करावी लागेल त्या मानानें रस्त्यासाठीं प्रत्येक ठिकाणीं किती रुंदीची जमीन घ्यावी लागेल हे चित्रितावर आणि छेदावर रुंदीच्या रेघा दाखवून त्याप्रमाणें जमिनीवरील आंखणी करतात. अशा रीतीनें प्रत्येक नंबरातील जमीन किती घ्यावी लागेल हें जागेच्या मापणीवरून नक्की ठरवितां येतें.

स्थापत्यशास्त्रासंबंधानें कोणतेंहि काम करावयाचें झाल्यास पहिल्यानें त्याची आंखणी करण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणीं तें काम करावयाचें असेल त्या क्षेत्राची मापणी करून नकाशा तयार करावा लागतो व त्या नकाशांत त्या क्षेत्राचा आकार कसा आहे व त्याची जमीन कशी उंचसखल आहे हें दाखवावें लागतें. ह्यापैकीं आकार दाखविण्याचें काम शंकुसांखळी किंवा कोनमापक यंत्रें यांच्या साहाय्यानें पहाणी व मापणी (सर्व्हेइंग) करून होतें. व त्या क्षेत्राचें उच्चनीचत्व शोधून काढणें हें पाणसळीच्या दुर्बिणीनें करतात. व अशा रीतीनें त्या क्षेत्रांतील वेगवेगळ्या बिंदूचें सापेक्ष स्थान व उच्चनीचत्व समजतें. आणि हें सर्व एकदम लक्षांत यावें म्हणून केलेल्या पहाणी व मापणीचें, कागदावर चित्रण (प्लॅन) करतात. व छेद घेतला असतां ती जमीन छेदनपातळींत कशी उंच-नीच आहे हें कागदावर काढलेल्या छेदाच्या योगानें स्पष्ट होतें.

नकाशा करण्यासाठी मापणी करणें ती विस्तृत प्रदेशाची करणें असल्यास ती कोनमापक दुर्बिणीच्या (थीओडोलाईट) साहाय्यानें करावी लागते. अशा कार्यासाठी विस्तृत अशी मोकळी माळ जमीन पाहून तिच्यावर अतिशय सूक्ष्मरीतीने सरळ रेषा मोजून ती अधिकरणरेषा (बेस लाईन) म्हणून वापरण्याची पद्धति आहे. अशी एक रेषा मापली व तिचे दिगंश (बेअरिंग किंवा अॅझीमत) बरोबर काढून तिच्या दोन्ही टोंकाशीं दुर्बिण ठेवून कोणत्याहि बिंदूचा त्या अधिकरणरेषेशीं किती अंशकलाविकलात्मक कोन होतो हें कोनमापक यंत्रानें काढावयाचें व ह्याप्रमाणें एक त्रिकोण तयार झाला म्हणजे भूपृष्ठावर सांखळीनें माप न घेतां नुसतें त्रिकोण बनविल्यानें व त्याचे कोन मापल्यानें वाटेल तेवढ्या क्षेत्राचा बरोबर नकाशा करतां येतो. ह्या कामांत फक्त अधिकरणरेषेचीच तेवढी लांबी मोजण्याची जरुरी पडते. बाकीचें सर्व काम कोनमापनानेंच होऊं शकतें. भूपृष्ठाकडे पाहिलें असतां शास्त्रीय सूक्ष्मतेनें लांबी मोजणें किती अवघड आहे हें ज्यानें पाव मैलाची किंवा अर्ध्या मैलाची सुद्धां रेषा मापण्याचें काम केलें असेल त्याला तें किती अवघड आहे हें आढळून येतें. कारण भूपृष्ठाचा कोणताहि भाग इतका उंच-सखल असतो कीं, मध्येंच ओढे, नाले, झाडें वगैरे येतातच. खेरीज उंचनीच भाग हे तर प्रत्येक ठिकाणीं असतातच. यामुळें भूगर्भापासून शास्त्रीयदृष्ट्या जिला समांतर म्हणतां येईल अशा रेषेचें माप काढणें हें किती दुस्तर आहे हें तात्काल लक्षांत येतें. आणि म्हणून भूपृष्ठाची मोठ्या प्रदेशाची मापणी सांखळीनें मोजून काढण्याची खटपट कोणीहि करीत नाहींत. ह्यापेक्षां कोनमापन जास्ती सुलभ रीतीनें करतां येतें. कारण त्रिकोणमापनांत त्याचे तिनहि बिंदु एकमेकांपासून दिसले पाहिजेत एवढीच कायती अट असते. व ह्या बिंदूंवर उभीं केललीं निशाणें टेंकड्यांच्या माथ्यावरून दहा बारा मैलांच्या अंतरावरून सुद्ध कोनमापक दुर्बिणीच्या साहय्यानें दिसूंहि शकतात व त्यांमधील कोनहि मापतां येतो. यामुळें ह्या प्रत्येक बिंदूवर दुर्बिण ठेवून त्यांतील कोन विकलापर्यंत शुद्ध, असे मोजतां येतात. ते मोजण्यांत कांहीं चूक झाली आहे कीं काय हे गोलीय त्रिकोणमितीच्या साहाय्यानें काढतां येतें. असे लहान त्रिकोण म्हणजे साधारणतः स्थूलमानानें एका पातळींतील त्रिकोण समजण्यास हरकत नाहीं. या अशा त्रिकोणांचे तीनहि कोन मिळून १८० अंश झाले पाहिजेत. त्रिकोण मोठे असल्यास ते गोलीय त्रिकोणमितीच्या साहाय्यानें ह्या तीनहि कोनांच्या बेरजेंत १८० अंशांपेक्षां किती अंशांची वृद्धि होईल हें काढता येतें. वर सांगितलेली अधिकरणरेषा, हिंदुस्थानांत सिरोंज या ठिकाणीं मोजून बाकींचें सर्व काम कोनमापनानें केलें आहे. अशा रीतीनें मोठाले त्रिकोण तयार झालें म्हणजे मग त्या त्रिकोणांतील तपशीलवार माहिती कोनमापक दुर्बिणीनें (थिओडोलाइट) व त्रिपार्श्वकांचयुक्त दिगंशमापक यंत्रानें (प्रिझमॅटिक कांपस) किंवा फलकयंत्रानें (प्लेन टेबल) आणि शंकु-सांखळीच्या योगानें करतात. देशाच्या मापणींत मोठमोठ्या कोनमापक दुर्बिणींच्या साहाय्यानें त्रिकोणबिंदूंचे सापेक्ष अंतर आणि उच्चनीचत्व ठरवितात. ह्या दुर्बिणीनें एक विकलाइतका सूक्ष्म कोनहि मापतां येतो. अशा भौगोलिक पाहणींत (जिओडेटिक सर्व्हे) मुख्य त्रिकोणबिंदूचें भौगोलिक स्थान अक्षांश व रेखांश काढूनहि ठरवितां येतें. ह्या कामाला दक्षिणोत्तर रेषा किंवा याम्योत्तर वृत्त नक्की करावें लागतें. याम्योत्तरवृत्त नक्की करण्याची स्थूल रीत म्हणजे कोणत्याहि दिवशीं दिनमध्याच्या अगोदर चार, तीन, दोन तास आणि तसेंच दिनमध्यानंतर तितकेच तास कोणत्याहि शंकूची (वरच्या टोंकांस निमुळती असलेली ५/५ फूट उंचीची कांठीं किंवा सळई जमिनींत ओळंब्यांत रोंवून त्या निमुळत्या टोंकाची) सावली कोठें पडतें हें दाखविण्याकरितां जमिनींत बारीक तारेच्या चुका मारून ठेवतात. आणि सकाळच्या सावलीच्या चुका आणि तितक्याच तासाच्या दुपारच्या सावलीच्या चुका ह्यांमधील मध्यबिंदू बारीक चुका मारून जमीनीवर दाखवितात. हे वेगवेगळे तीन बिंदू ज्या सरळ रेषेंत येतात ती याम्योत्तर रेषा होय. कारण दिनमध्याच्या आधीं चार तास सूर्याचे जितके उन्नतांश असतात तितकेच उन्नतांश मध्यान्हानंतर चार तासांनीं असतात व असेच मध्यान्हाच्या अगोदर तीन तास व नंतर तीन किंवा अगोदर दोन तास व नंतर दोन तास या वेळीं असतात. ही रीत सूर्य वसंतसंपाताजवळ किंवा शरत्संपाताजवळ असतां म्हणजे २१ मार्च किंवा २३ सप्टेंबरच्या सुमारास सूर्याची क्रांति २४ तासांत २४ कला म्हणजे तासास एक कला याप्रमाणें वाढत किंवा कमी होत असल्यामुळें किंचित स्थूल आहे हें लक्षांत ठेवावे. परंतु २२ जून किंवा २२ सप्टेंबरच्या सुमारास म्हणजे अयनबिंदूच्या सन्निध सूर्य असतांना ८ तासांत समजण्यांत येण्याजोगा क्रांतींत फरक पडत नसल्यामुळें फारच सूक्ष्मतेनें याम्योत्तर रेषा अशा पद्धतीनें काढतां येते. अशा रीतीनें याम्योत्तर वृत्त नक्की केल्यावर त्या याम्योत्तर वृत्तावरून जाणार्या वेगवेगळ्या मोठ्या तार्यांचा लंघन काल बरोबर लावलेल्या घड्याळाप्रमाणें टिपून ठेवल्यास त्यावरून ह्या स्थळाचे रेखांश ठरवितां येतात. कारण नविन पंचांगांत वेगवेगळ्या तार्यांचे विषुवकाळ व मध्यान्हीच्या सूर्याचा रोजचा विषुवकाल दिलेला असतो व त्यावरून त्या रात्रीं किती वाजून किती मिनिटांनीं प्रत्येक तारा जाईल हें सांगतां येतें हें नाविक पंचांगाचे काल शून्य रेखांशाचे म्हणजे ग्रीनिचचें दिलेले असतात व ज्यावेळीं ग्रनिच येथें सूर्य मध्यान्हीं असतो त्यावेळेस आपल्या हिंदुस्थानांतील स्टँडर्ड टाईमप्रमाणें म्हणजेच ८२।। अंश इतक्या रेखांशाच्या कालाप्रमाणें सध्याकाळचें ५॥ वाजलेले असतात. व अशा लावलेल्या घड्याळावरून व ह्या घड्याळाप्रमाणें कोणत्याहि तार्याच्या लंघनकालावरून आपल्याला ज्या स्थळाचे रेखांश काढावयाचें असतील त्या ठिकाणचे, किती मिनिटें व किती सेकंदाचा फरक असेल त्याप्रमाणें चार मिनिटांस एक अंश याप्रमाणें किती अंश-कलाविकला ती जागा हिंदुस्थानच्या मध्यरेषेच्या म्हणजे ८२॥ अंश रेखांशांच्या किती पूर्वेस किंवा पश्चिमेस आहे तें कळतें. तें स्थळ या मध्य रेषेच्या पश्चिमेस असल्यास हें अंशकलात्मक अंतर वजा करावें व पूर्वेकडे असल्यास मिळवावे. म्हणजे इष्ट स्थळाचें अंश कलाविकलात्मक रेखांश निघतील. ह्या रेखांशांच्या बाबतींत हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, विषुववृत्तावरील दोन स्थळांत पूर्व-पश्चिम अंतर जर ६९ मैल असेल तर त्यांच्या रेखांशांत एक अंशाचा फरक पडेल व कन्याकुमारी म्हणजे सुमारें ८ अक्षांशावर, रेखांशांत एक अंशाचें अंतर पडण्यास पूर्वेकडे अगर पश्चिमेकडे ६८ मैल गेलें पाहिजे. व पुण्याजवळ म्हणजे १८॥ अक्षांशावर, पुण्याच्या पूर्वेस ६६ मैल जें स्थळ असेल त्या स्थळाचे रेखांश पुण्यापेक्षां एक अंश जास्ती असणारच. व दिल्लीजवळ म्हणजे २८ अक्षांशांवर, दिल्लीच्या पूर्वेस ६० मैल जें स्थळ असेल त्याचे रेखांश दिल्लीपेक्षां एक अंशानें जास्ती भरतील. आणि लंडनजवळ म्हणजे ५२ अक्षांशांवर, दोन स्थळातींल अंतर जर ४२॥ मैल असेल तर ह्या दोन स्थळांतील रेखांशांचें अंतर एक अंश होईल. व ६० अक्षांशांवर म्हणजे नॉर्वे देशाच्या दक्षिण भागीं पूर्वपश्चिम अंतर ३४॥ मैल असतांनाच रेखांशांत एक अंशाचें अंतर पडेल. हें सांगण्याचें प्रयोजन हें कीं रेखांशांत एक अंशांचें अंतर पडलें कीं, त्या दोन स्थळांच्या मध्यान्हकालांत चार मिनिटांचें अंतर पडतें. तसेंच कोणत्याहि स्थलाचे अक्षांश काढणें झाल्यास परिध्रुव तारकांपैकीं ज्यांचें ध्रुवांतर ३० किंवा ४० अंशांपर्यंत असेल अशा कोणत्याहि तेजस्वी तार्याचें याम्योत्तरवृत्तलंघनाच्या वेळचे उन्नतांश ऊर्ध्वकोनमापक यंत्रानें मोजावें. आणि त्यांतून नाविक पंचांगांत दिलेलें त्या तार्याचें ध्रुवांतर वजा केलें असतां जी बाकी राहते तेच त्या स्थळाचें अक्षांश होत. परंतु सध्यां सर्व हिंदुस्थान देशाची भूपृष्ठाकृतिदर्शक मापणी (ट्रिग्नामेट्रीकल सर्व्हे) बरोबर झाल्याकारणानें कोणत्याहि ठिकाणचें अक्षांश व रेखांश त्रिकोणमितिमापक पाहणी खात्यानें तयार केलेल्या नकाशावरून अंश, कला, विकलापर्यंत समजतात. उदा. पुण्याजवळ कोठेंहि मापणी करणें असेल तर १८ अक्षांशापासून १९ अक्षांशापर्यंत म्हणजे एक अक्षांश इतक्या उंचीच्या आणि ७४ रेखांशापासून ७५ रेखांशांपर्यंत म्हणजे एक रेखांश इतक्या रुंदीच्या एका इंचास एक मैल ह्या प्रमाणांत काढलेला नकाशा मागविला म्हणजे त्यावर सुमारे ६६ मैल पूर्वपश्चिम रुंदीचा आणि ६९ मैल दक्षिणोत्तर उंचीचा प्रदेश दाखविणारा पट मिळूं शकतो व ह्यांत गांवे, रस्ते, डोंगर, नाले, ओढे व प्रत्येक गांवची शीव, किंवा हद्द दाखविणार्या रेषा असतात. हा नकाशा त्रिकोणमितिमाफक खात्याकडून मागविला तर मिळतो. व असे एक अंश लांब व एक अंश रुंदीचें वाटेल त्या भागाचे नकाशे तयार मिळतात. यामुळें आतां अक्षांश व रेखांश कोनमापक यंत्राच्या साहाय्यानें काढण्याची केव्हांहि जरूरीच पडत नाहीं. खेरीज हेहि ध्यानांत ठेवावे की कोणत्याहि स्थळाचे अक्षांश माहीत असले पाहिजे त्या स्थळाच्या उत्तरेस ६९ मैलांवर असणारें जें स्थळ त्याचे अक्षांश एक अंशानें जास्ती असतात. आणि अक्षांश म्हणजेच ध्रुवबिंदूचे उन्नतांश होत. मुंबई व अहमदाबाद यांमधील अंतर सुमारें ३०० मैल आहे. व ह्यांचें अक्षांशांतील अंतर सुमारें चार अंश आहे. तसेंच पुणें शहर मुंबईच्या पूर्वेस सरळ रेषेंत सुमारें ७५ मैल आहे. म्हणून ह्या दोहोंच्या रेखांशांत सुमारें एक अंशाच्या थोडेसें वर अंतर आहे.

ही वरील रीत ज्याप्रमाणें जमीनीवरील कोणत्याहि भागास लागू पडते त्याप्रमाणेंच ती समुद्रांतून जाणार्या जहाजांनां व आगबोटीनांहि उपयोगी पडते. समुद्राचा पृष्ठभाग हा नेहमीं भूमध्यापासून सारख्याच अंतरावर असतो. व यामुळेंच जहाज किंवा आगबोट कोणत्याहि दिशेस जात असली तरी ती भूगोलाच्या परिघावरूनच चालत असते आणि ह्या गोलाचा व्यास विषुववृत्ताच्या पातळीत ७९२५ मैल आहे. आणि दक्षिणध्रुवापासून उत्तरध्रुवापर्यंतचा व्यास २६ मैल लांबीत कमी आहे. म्हणजे मध्यम व्यास सुमारें ७९१२ मैल आहे. अशा व्यासाचा परिघ म्हणजेच भूपरिघ होय. परिघाच्या एका पादाचे अर्थात चवथ्या भागाचे म्हणजेच ध्रुवापासून विषुववृत्तापर्यंतच्या अंतराचे, फ्रेंच लोक एक कोटी विभाग करतात आणि त्या विभागालाच 'मीटर' (मानदंड) म्हणून मानतात. व अशा मीटरची लांबी ३९.३७ इंच असते. व हेंच त्यांचें व यूरोपियन शास्त्रज्ञांचें लांबी मोजण्याचें माप (युनिट) आहे. व हाच व्यास भास्कराचार्यांनीं (शके ११०० च्या सुमारास) सिद्धांतशिरोमणींत १५८१ योजनें दिला आहे. यावरून त्यांचें योजन ५ मैलांचेंच आहे असें दिसते. गुजराथेंत गाऊ म्हणजे सव्वा मैल व असे दोन गाऊ म्हणजे गव्यूति व अशा दोन गव्यूती म्हणजे एक योजन होतें. ह्या भूपरिघाचे ३६० भाग केले असतां प्रत्येक अंशाची लांबी सुमारें ६९ मैल होते. व एका अंशाचे ६० भाग केले म्हणजे एक कलेचा कोन होतो व ह्या कलात्मक परिघाची लांबी ६०७६ फूट भरते. व ह्या लांबीलाच नाविक मैल (नॉट) असें म्हणतात. असा नाविक मैलच आगबोटींचा किंवा गलबतांचा वेग मोजण्याचें परिमाण असतें. अर्थांत असे २१६०० नाविक मैल म्हणजेच भूपरिघ होय. ह्या नाविक मैलांच्या भाषेंतच आगबोटींचा वेग सांगण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ, दर तासीं २० नाविक मैलांच्या वेगानें आगबोट जात आहे असें म्हटलें म्हणजे ती दर तासीं १२१७२० फूट म्हणजे जमीनीवरील सुमारें २३ मैल समजावयाचे. हे नाविक मैल वापरण्यांत उपयोग असा आहे की, जितके नाविक मैल तितक्याच कला भूपरिघावर प्रवास झाला असें समजावयाचें. व आगबोटी ह्या, पाण्यांत नेहमीं सरळ रेषेंत जात असल्याकारणानें जेथून ती आगबोट निघाली तेथून ज्या स्थळीं जावयाचें असेल त्या स्थळाला पोंचण्यास किती दिवस व किती तास लागतील हें आगबोट किती वेगानें जात आहे ह्यावरून काढतां येतें. कारण दोन स्थळांत अंतर जर दोन हजार नाविक मैल असलें आणि आगबोटीचा वेग २० नाविक मैलांचा आढळून आला तर त्या बोटीला बरोबर १०० तास लागतील असें नक्की सांगतां येतें व अशा प्रकारेंच एडन आणि मुंबई ह्यांमधील अंतर सुमारें २००० मैल आहे. व एडनहून बोट अमक्या तारखेस इतके वाजतां निघाली तर ती मुंबईला अमक्या तारखेस अमुक वाजतां येईल असें नक्की सांगतां येतें, कारण समुद्रपृष्ठाचा व्यास हा नेहमीं सारखाच असल्याकारणानें कोणतीहि दिशा असली तरी अंशात्मक अंतर तितकेंच येतें.

स्थापत्याचें कोणतेंहि काम करणें झाल्यास ज्या क्षेत्रावर तें करावयाचें असेल त्यांतील भूभाग कसा काय आहे याची पहाणी व मापणी करावी लागते असें वर सांगितलेंच आहे. हें क्षेत्र मोठें असल्यास कोनमापक यंत्रानें कोन मोजतात व वेगवेगल्या रेषांची लांबी सांखळीनें मोजतात. क्षेत्र लहान असल्यास तेंच काम नुसत्या शंकुसांखळीनें करतां येतें. कारण त्रिकोण ही आकृति कोणत्याहि पातळींत कोठेंहि आंखतां येतें आणि अशा त्रिकोणाच्या तीन कोपर्यांवर तीन खुंट्या मारून या प्रत्येक बाजूची लांबी साखळीनें मोजली व त्याप्रमाणें प्रमाणपट्टीनें (स्केल) कागदावर मापाप्रमाणें रेषा काढल्या असतां कागदावर जो त्रिकोण वठेल त्याचे जे कोन ते जमिनीवरील त्रिकोणाच्या कोनाबरोबर होतात. व त्यामुळें दोघांचें पूर्ण आकारसादृश्य होतें. अशा रीतीनें सर्व क्षेत्राचे त्रिकोणात्मक विभाग पाडले व त्या वेगवेगळ्या त्रिकोणांच्या बाजूंचीं मापे बरोबर मोजलीं आणि त्याप्रमाणें सर्व त्रिकोण कागदावर चित्रित केले म्हणजे जो नकाशा तयार होतो तो कोनमापक यंत्रानें कोन मापले असतां जितका बरोबर येतो तितकाच किंवा त्यापेक्षांहि थोडासा जास्तीच बरोबर येतो. कारण रानांत कोनमापक यंत्रानें जितक्या बिनचूकपणें कोन मापतां येतो तितक्या बिनचूक रीतीनें तो कागदावर वठवितां येत नाहीं. परंतु रेषांची मापें मात्र कागदावर बरोबर आंखतां येतात. त्यामुळें नकाशा करण्याला रेषांच्या लांबीवरून तो केला असतां जितका बरोबर येतो तितका तो कागदावरील कोनाच्या चित्रणानें येत नाहीं. यास कारण असें कीं, कागदावर नकाशा काढण्याचें प्रमाण (स्केल) इतकें सूक्ष्म असतें कीं, लांबीत कांहीं इंचांचा फरक पडला तरी तो दिसून येत नाहीं. याच्या उलट कोनमापक यंत्रानें पाव कलेइतका सूक्ष्म कोनहि मापतां येतो, परंतु तोच कागदावर काढणें झाल्यास पाव अंशापर्यंतहि फरक पडलेला दिसून येत नाहीं. परंतु अशा पाव अंशाच्या फरकामुळें त्रिकोणाच्या बाजूची लांबी ५०० फूट असली तर समोरील रेषेची लांबी दोन तीन फूट सुद्धां चुकते व या कारणामुळेंच लांबी मोजून किंवा ती त्रिकोणमितीनें काढून त्यावरून नकाशा काढला असतां बरोबर येतो. लांब अंतरापर्यंत जमीनीवर सरळ रेषा मापणें हें मोठें अवघड काम असतें. कारण मध्यें कुंपणें, ओढे, नाले वगैरे येतात. आणि अशा ठिकाणीं मात्र कोनमापक यंत्रानेंच वेध घेणें सोपें पडतें. अशा रीतीनें सर्व क्षेत्राचे त्रिकोणात्मक विभाग मापून कागदावर चित्रित केले आणि या त्रिकोणांच्या वेगवेगळ्या बाजूपासून कोणत्याहि इमारतीचा अगर शेताचा कोपरा उजव्या किंवा डाव्या बाजूस इतक्या फुटावर आहे अशीं मापें घेऊन त्या मापाप्रमाणें चित्रण केलें म्हणजे त्या क्षेत्राचा प्रतिकृतिरूप पट तयार होतो. अशा मापणीला शंकु-साखळीची मापणी असें म्हणतात. अशा मापणीसाठी पैमाषखात्यांत ६६ फुटांची सांखळी किंवा ३३ फुटांची सांखळी वापरतात आणि रस्ते, कालवे वगैरेंच्या मापणीत १०० फुटांची सांखळी वापरतात. याला कारण असें आहे कीं, पैमाषखात्यांत कोणत्याहि क्षेत्राचें माप किती एकर-गुंठे आहे हें काढावयाचें असतें. आणि तसें करण्यास ते ६६ फुटी सांखळी वापरतात. कारण ६६ फुटांच्या अशा १० सांखळ्या लांब आणि ६६ फुटाची एक सांखळी रुंद एवढें क्षेत्रे असलें म्हणजे तें बरोबर एक एकर भरतें. आणि अशी एक सांखळी लांब आणि एक सांखळी रुंद अशा क्षेत्रविभागाचें माप बरोबर ४ गुंठे भरतें आणि एखादा तुकडा ३३ फूट लांब व ३३ फूट रुंद असला म्हणजे तो बरोबर १ गुंठा भरतो. या पैमाषमापणींत सर्व मापन त्रिकोणात्मक पद्धतीनेंच होत असतें आणि त्रिकोणाच्या धर्माप्रमाणें त्रिकोणाची रुंदी, म्हणजे कोणत्याहि एका बाजूची लांबी ६६ फूट असली आणि त्या त्रिकोणाच्या समोरील टोंकापासून शंकूच्या साहाय्यानें या रेषेवर लंब काढला व त्या लंबाची लांबी ३३ फूट असली तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ६६×३३÷२=१ गुंठा भरतें. वर जो शंकु सांगितला त्याला खालीं जमीनीवर टेकण्यासाठीं दांडा असतो. एखाद्या वेळीं काटकोन मोजणारा शंकु जवळ नसल्यास नुसत्या फितीनें (टेप) वाटेल त्या ठिकाणीं लंब रेषा काढतां येते ती अशी:- ज्या ठिकाणापासून सांखळीच्या रेषेंतच चार फूट मोजून तेथून पांच फूट अंतरावर आणि जेथून लंब काढावयाचा तेथून तीन फूट अंतरावर जो बिंदू असेल तो साखळीच्या लंब रेषेंतच असतो. कारण ३+४=५ असतो. व म्हणून तीन फूट, चार फूट व पांच फूट अशा वाजवा असलेल्या त्रिकोणांतील पांच फुटांसमोरचा जो कोन तो काटकोनच असतो. ३:४:५ हा त्रिकोण जसा उपयोगी पडतो तसाच ७:२४:२५ आणि २०:२१:२९ हे त्रिकोणहि लंब काढण्याला उपयोगी पडतात. पैमाषी ३३ फूट सांखळीच्या बरोबर एका मापाच्या १६ कड्या असतात. व प्रत्येक कडी २ फूट पाऊण इंच लांबीची असते. म्हणून प्रत्येक कडीला एक आणा असें म्हणतात. व माप लिहितांना इतक्या सांखळ्या व इतके आणे असें लिहितात. आणि एक सांखळीभर म्हणजे ३३ फूट लांब आणि एक आणा म्हणजे दोन फूट पाऊण इंच रुंद म्हणजे ६८१/१८ चौरस फूट एवढें क्षेत्र झालें; म्हणजेच एक आणा जमीन झाली असें म्हणतात. व असे १६ आणे म्हणजेच एक गुंठा व असे ४० गुंठे म्हणजे १ एकर जमीन होते. गुजराथेंत १ बिघाभर जमीन म्हणजे १६० फूट लांब व १६० फूट रुंद क्षेत्र झालें म्हणजे १ बिघा व असे १॥। बिघे म्हणजे सुमरें एक एकर होतो. इंजिनिअरिंगच्या कामाच्या मापणीसाठीं १०० फुटी सांखळीचा उपयोग करतात. या सांखळीला एकएक फूटाच्या १०० कड्या असतात व माप लिहितांना इतक्या साखळ्या व इतक्या कड्या असें लिहिण्याचा प्रघात आहे. यात जितक्या कड्या तितकेच फूट हें उघड आहे. ज्या ठिकाणापासून मापणी करावयाची त्या ठिकाणीं जमिनींत खुंटी मारून त्या खुंटीच्या माथ्यावर मधोमध तारेची चूक ठोकून किंवा पेन्सिलीची निशाणी करून तेथून माप घेण्याचे सुरू करतात. व खुंटीवर जी निशाणी केली असेल तेथें साखळीचा हातात धरावयाच्या कडीचा बाहेरील भाग टेकेल असा ठेवतात. आणि सांखळी बरोबर ओढून ज्या ठिकाणीं तिची शेवटली कडी येईल त्या ठिकाणीं सांखळीच्या बरोबर असणार्या १० तीरांपैकीं एक तीर कडीच्या शेवटीं रोंवतात. अशा रीतीनें तीर रोंवीत रोंवीत इष्ट दिशेनें जेथें निशाण उभें केलें असेल तेथपर्यंत मापीत जातात. या शंभर फुटांच्या सांखळीस दर दहा फुटांवर वेगवेगळ्या जातीच्या पितळी खुणा बसविलेल्या असतात. त्यांपैकीं दहा फूट व ९० फुटावर जी खूण असते तिला एकच टोंक असतें, २० व ८० फुटांवर असते तिला दोन टोकें असतात, ३० व ७० फुटांवर असते तिला तीन टोकें असतात व ४० आणि ६० फुटांवर असते तिला चार टोकें असतात आणि पन्नासावर वाटोळी चकती बसविलेली असते व अशा रीतीनें कोणत्याहि वेळी किती सांखळ्या व किती फुटांवर आपण आहों हें मापणी करणारास बिनचूक कळतें. कारण साखळीं ओढणारा मनुष्य तीर रोंवीत जातो आणि सांखळीचें टोंक धरून तिच्या मागून जाणारा मनुष्य रोंवलेले तीर उपटून हातांत घेत असतो व यामुळें मागून येणार्या मनुष्याच्या हातांत जितके तीर असतील तितक्या सांखळ्या (१०० फुटांच्या) आणि आपण उभें असूं तेथपर्यंत पितळेची कोणत्या प्रकारची खूण आहे हें पाहून जितक्या टोकांची खूण असेल तितके दहा फूट व वर जितक्या कड्या असतील तितके फूट असें समजावयाचें. सांखळीचा मध्य म्हणजे वाटोळी चकती ओलांडून आलों असल्यास चार टोकांची खूण म्हणजे ६० फूट, तीन टोंकांची खूण म्हणजे ७० फूट असते हें मात्र लक्षांत ठेवलें पाहिजे. ही सांखळीची मापणी चालली असतां उजव्या किंवा डाव्या बाजूला कांहीं अंतरावर जर नकाशांत दाखविण्याजोगीं किंवा जें काम पुढें करावयाचें असेल त्याला अडवणूक करणारें घर, विहीर अथवा झाड असें असेल तर त्या ठिकाणीं ती साखळीपासून लंब रेषेंत किती अंतरावर आहेत हें टिपून ठेवतात व ही लंब रेषा सांखळीच्या किती फुटांवर येऊन मिळतें हेंहि मापणीपुस्तकांत (फील्डबुक) नमूद करतात, व त्याप्रमाणें नकाशावर दाखवितात याच्या योगानें रस्त्याच्या दोन्ही बाजूंला काम काय आहे व इमारती असल्यास केवढ्या मोठ्या व रस्त्याशीं केवढा कोन करून स्थित आहेत हें नकाशा पाहिल्याबरोबर कळून येते. अशी मापणी करतांना व कामाची मध्यरेषा ठरविताना करावयाच्या कामाच्या हद्दींत कोणतीहि अडचण येऊं नये व बांधलेलीं कामें पाडण्याचा प्रसंग येऊ नये आणि मोठाली किंमतवान झाडें तोडावी लागूं नयेत अशी खबरदारी घेऊनच रस्त्याची किंवा कालव्याची मध्यरेषा कायम करतात. आणि होतांहोईलतों आड येणार्या इमल्याला वगैरे वळसा घालून किंवा मध्यरेषेची दिशा थोडीफार बदलून काम भागवितात. कधीं कधीं थोडा वळसा घेतल्यानें उत्तम सुपीक जमीन किंवा विहीर टाळतां येते. परंतु रस्त्याला व मुख्यतः रेल्वेला वळसे देण्यानें गाडीचा वेग कमी होतो आणि गाडी फार वेगानें येत असतां ती उलटण्याची भीति असते. यास्तव मध्यरेषा सरळ ठेवण्याचाच प्रयत्न करतात. आणि वळसा न देतां सबंध मध्यरेषाच कांहीं अंतरावर सरकवितात.

ही वर सांगितलेली शंकु- सांखळीची मापनपद्धति शेतांचे नकाशे करावयास किंवा किल्ले, गिरण्या, इतर इमारती बांधण्यास लागणार्या जमीनी मापण्यास उपयोगाची आहे. परंतु रस्ते, कालवे किंवा रेल्वे वगैरे दूर अंतरापर्यंत जाणार्या कामास लागणारी लांबच लांब परंतु लांबीच्या मानानें अतिशय चिंचोळी अशी पट्टी मापण्यास कोनमापक यंत्राच्या साहाय्याशिवाय फक्त ही शंकुसांखळीची पद्धति अपुरी पडते. कारण अशा पट्टीची मध्य रेषा किती किती अंतरावर दिशा बदलते हें दाखविण्यास कोनमापन यंत्राची जरुरी असतेच. ही पद्धत म्हणजे सांखळीनें सरळ रेषेची लांबी मोजणें व त्या रेषेच्या दोन्ही बाजूंस असलेल्या शेतांच्या किंवा इमारतीच्या हद्दी शंकूच्या साहाय्यानें लंब काढून व प्रत्येक बिंदूचीं अंतरे मोजून वाटेल तेवढ्या रुंदीच्या पट्टीचें चित्र वठवितां येतें. जेथें एक सरळ रेषा संपून दिशा बदलते व दुसरी सरळ रेषा जेथपर्यंत न्यावयाजोगीं असेल तेथपर्यंत नेऊन तिची पूर्वीप्रमाणेंच शंकु-सांखळीची मापणी करतात. परंतु असें करण्यापूर्वी पूर्वीची जी सरळ रेषा असेल तिच्याशीं किती अंशांचा कोन करून ही दुसरी रेषा काढली आहे व तो कोन किती अंशांचा आहे, हें कोनमापक यंत्राच्या साहाय्यानें काढावें लागतें. अर्थांत हें कोनमापक यंत्र, ज्या बिंदुपासून दिशा बदलतें त्या ठिकाणीं जमिनींत खुंटी मारून त्या खुंटीवर बरोबर ओळंब्यानें त्या कोनमापक यंत्राचा मध्य येईल अशा रीतीनें तें कोनमापक  यंत्र उभें करावें लागतें. असें कानेमापक यंत्र साधारण रस्त्याच्या किंवा कालव्याच्या मापणीसाठीं विपार्श्वकांचयुक्त दिगंशमापकयंत्र (प्रिझमॅटिक कांपस) वापरतात आणि रेल्वेसारख्या मोठमोठ्या कामांत कोनमापक दूरदर्शनयंत्राचा (थीओडोलाइट) उपयोग करतात. ह्या यंत्राच्या योगानें कोणत्याहि दोन रेषांमधील कोन मोजतां येतो, किंवा त्या यंत्रावर बसविलेल्या दिग्दर्शकाच्या साहाय्यानें कोणतीहि रेषा उत्तरेपासून किती दिगंशांचा कोन करून स्थित आहे हें काढतां येतें. परंतु असें दिगंश आरंभापासून जी पहिली सरळ रेषा काढणें असेल तिचे मात्र घेतात आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी मध्यरेषेची दिशा बदलते त्या त्या ठिकाणी पुढें जाणारी सरळ रेषा आणि आतापर्यंत ज्या रेषेनें पाहणी करणारा आला असेल ती रेषा यांमधील कोन मोजतात व हे कोन अंशकलात्मक असल्याकारणानें त्यावरून काढलेला नकाशा अगदीं बरोबर उतरतो. ह्याच कोनमापक यंत्राच्या योगानें उद्दिष्टस्थानाचें उन्नतांश (व्हर्टिकल अँगल्स) मापतां येतात. ह्यांच्यापेक्षां कमी महत्त्वाच्या मापणीमध्यें हें त्रिपार्श्वकांचयुक्त दिगंश मापक नांवाचें यंत्र वापरतात त्याच्या साहाय्यानें प्रत्येक मध्यरेषेचा प्रत्येक सरळ भाग उत्तरदिशेशीं किती दिगंशाचा कोन करतो हें मापतात. परंतु ह्या यंत्राच्या योगानें पाव अंशांपर्यंतच कोन मापतां येतात. यामुळे आणि प्रत्येक वेळेला यंत्रांतील चुंबकाकर्षक सूची (म्यामेटिक नीडल) नेहमीं बरोबर उत्तर दिशेलाच स्थिर होते अशी खात्री नसल्यामुळें थोडाफार फरक पडण्याचा संभव असतो. यामुळें लांबपर्यंत जाणार्या मापणींत ह्या यंत्राचा उपयोग करण्यानें थोडीफार चूक होण्याचा संभव असतो.

पाहणी व मापणी यांत जी साधनें साधारणतः वापरतात त्यांचें थोडेसें वर्णन पुढें दिलें आहे. कोणत्याहि ठिकाणीं लांबी मोजणें असेल तर शंभर फुटी सांखळीचा व तीरांचा उपयोग करतात. आणि ह्या मुख्य रेषेच्या दोन्ही बाजूंचीं अंतरे मोजावयाची असतील तेव्हां शंभर फुटी किंवा पन्नास फुटी (टेप) फूट व इंचांच्या खुणा केलेल्या फितीचा उपयोग करतात. मोजावयाची सांखळी लोखंडी किंवा पोलादी सळईची बनविलेली असते. आणि तिच्या दोन्ही टोकांनां पितळी चपट्या कड्या, आंत हाताचा पंजा मावेल इतक्या रुंदीच्या, ती सांखळी दोन्ही टोंकाला खेंचून सरळ करतां येईल अशा बेताच्या बसविलेल्या असतात. तिला एक एक फुटाच्या १०० कड्या असतात आणि दर दहा फुटावर पितळा खुणा बसविलेल्या असतात. किती सांखळ्या झाल्या हें ध्यानांत रहावें म्हणून सांखळीचें माप पुरें झालें की, जमिनींत रोंवता यावें असे पोलादी सळईचे दहा तीर प्रत्येक सांखळीबरोबर येतात. या तीरांचे एक टोंक जमिनींत रोंवण्यासाठीं निमुळतें केलेलें व दुसरें टोंक वळवून वर्तुळाकृति केलेलें असें असतें. ते अशासाठीं कीं तीर जमिनींतून सहज रीतीनें उपसून काढतां यावा.

आडवी मापें घेण्यासाठीं जी फीत उपयोगांत आणतात ती फीत विणतांनांच तिच्या पोटांत पितळेच्या तारांचे ताणे घातलेले असतात आणि बाणे सर्व सुताचेच असात. हेतु हा कीं, माप घेतांना दर वेळेस फितीला जो ताण पडतो ह्याच्या योगानें ती तुटूं नये व ज्या वेळेला ती गुंडाळून डबींत ठेवावयाची असेल तेव्हांहि तिच्यांत एक प्रकारचा ताठरपणा असावा. ही फितीची डबी बहुतकरून कांतड्याची असते व ती बाहेर खेचण्यासाठीं तिला एक कडी बसविलेली असते. आणि तिच्यावर ज्या इंचांच्या व फुटांच्या खुणा केलेल्या असतात त्या ह्या कडीच्या बाहेरच्या टोकांपासून केलेल्या असतात. हिच्यावर इंचांच्या व अर्ध्या इंचांच्या खुणा असतात. इंचांचें जे आंकडे मांडलेले असतात ते सर्व काळ्या शाईनें व फुटांचे तेवढें तांबड्या शाईनें, अशा रीतीनें शंभर फुटांपर्यंत आंकडे असतात. फितीचें दुसरें टोंक मधील पितळी दांड्यांत गुंतविलेलें असतें तें अशा रीतीनें की तो दांडा बाहेरून फिरविला असतां ती सर्व फीत त्याच्याभोवतीं गुंढाळली जावी. ही मापें घेतांनां अर्ध्या इंचापेक्षां सूक्ष्म मापें घेण्याची जरुरी पडत नाहीं.

पाहणींला व मापणीला जी कोनमापक यंत्रें वापरतात ती अशीं:— मापणी जेव्हां अगदी बिनचूक करणें असेल तेव्हां कोनमापक दूरदर्शनयंत्राचा उपयोग करतात. हीं यंत्रे वेगवेगळ्या तर्हेचीं असतात. परंतु साधारणतः ती उभीं करण्यासाठीं लांकडी तिवईला (तीन पायाची बैठक) किंवा घोडीला वरच्या बाजूस कोनमापक यंत्र खिळवून टाकण्यासाठीं तीन भोकें पाडलेली पितळी तबकडी बसविलेली असते व ह्या तीन भोंकांत यंत्राच्या बैठकीचे तीन पादभ्रम (फूट स्क्रू) अडकवून ठेवतां येतात. हे तीन पादभ्रम पितळेचे असून त्यांनां पेच पाडलेले असतात व त्यांचा मधला भाग फुलवून त्याचा परिघ चरचरीत केलेला असतो तो अशासाठीं कीं, बोटांनीं तो भ्रम (स्क्रू) फिरवीत असतां बोटे सरकूं नयेत किंवा बोटांची पक्कड सुटूं नये. ह्या तीनहि भ्रमांची मळसूत्रें वरच्या बाजूसच पाडलेलीं असतात, ती अशासाठी कीं, यंत्राची जी मुख्य बैठक तिच्या तीनहि टोकांतील मळसूत्रांत फिरून ती वेगवेगळी वरखाली करतां यावी. त्यांचा उपयोग यंत्र भूपृष्ठ समपातळींत (लेव्हलिंग) आणण्यासाठी करतात. ही यंत्राची मुख्य बैठक म्हणून जी सांगितली तिच्यावर एकमेकांस काटकोनांत असलेली समस्थें (लेव्हल्स) बसविलेली असतात. व ह्या दोन्ही समस्यांतील बुडबुडे बरोबर मध्यावर असले म्हणजेच यंत्र भूपृष्ठसमपातळींत आहे असें समजावयाचें आणि ह्या पातळीलाच समांतर असा वरील दुर्बिणीचा आंस म्हणजे दृष्टिपथ येईल अशा रीतीनें हें यंत्र बनविलेलें असतें व ह्या यंत्राची रचनाच अशी असल्यामुळें खालील दोन्ही समस्यांमधील बुडबुडे बरोबर मध्यभागीं असतांना प्रत्येक दूरदर्शन यंत्र वाटोळें आठहि दिशांत फिरविलें तरी तें नेहमीं भूपृष्ठसमपातळींतच राहतें. व अशा रीतीनें ह्या भूपृष्ठसमपातळीतील कोन बरोबर मोजतां येतात. ह्या कोनदर्शक यंत्राची जी मुख्य तबकडी तिच्या परिघावरच चांदीची पट्टी बसवून तिच्यावर शून्यापासून तीनशेंसाठ अंशांपर्यंत रेघा अर्ध्या अर्ध्या अंशाच्या अंतरानें कोरलेल्या असतात. व प्रत्येक दहा अंशांवर अंशाचा आंकडा कोरलेला असतो. आणि ही मुख्य तबकडी जेथून कोनमापन सुरू करावयाचें असेल त्या लक्ष्याकडे दूरदर्शनयंत्र बरोबर रोखलें असतांना शून्य अंश येतील अशा रीतीनें फिरवून व त्या ठिकाणीं हीं मुख्य तबकडी खिळवून टाकतात. आणि कोन मापण्याचें जें दुसरें लक्ष्य असेल त्या दिशेकडे ह्या मुख्य तबकडीचा वरचा भागच दूरदर्शनयंत्रासह फिरवितात. व ह्या वरच्या भागावरच लघुभागमापक लहानशी पट्टी जोडलेली असते. व तिचें शून्य अंशाचें माप बरोबर दूरदर्शनयंत्राच्या रेषेंत शराग्रानें दाखविलेलें असतें. आणि त्यावर २९ कलांचे तीस भाग केलेले असल्याकारणानें लघुभागमापक वर्तुळखंडावरील जी रेषा मुख्य तबकडीच्या ज्या भागाशीं समरेषेंत येईल तितक्या कला समजावयाच्या. उदाहरणार्थ ह्या वर्तुळखंडाची शून्य रेषा १३७॥ अंशांच्या पुढें असेल तर कोनाचें माप १३७॥ अंश + वर सांगितलेल्या कला (अर्थात ह्या कला ३० कलांपेक्षां कमीच असणार) इतकें होय. अशा रीतीनें वाटेल तो दिगंशमापक कोन मापतां येतो. तसेंच एखाद्या डोंगरावरील उंच शिखराचें उन्नतांश मापणें असतील तर दूरदर्शनयंत्र वरखाली करण्याची ह्या यंत्रांत व्यवस्था केलेली असते. यंत्राच्या मुख्य तबकडीवरील काटकोनांत असलेलीं दोनहि समस्यें जेव्हां मध्यस्थित असतील म्हणजे ती तबकडी भूपृष्ठसमपातळींत असेल तेव्हा किंवा त्याच्या खालीं समांतर असणार्या समस्थांमधील बुडबुडाहि मध्यस्थित होईल, तेव्हां अशा रीतीनें दूरदर्शन यंत्र ठेविलें असतां उन्नतांश मापणारें जें वर्तुळ असेल त्या वर्तुळावर दूरदर्शन यंत्राच्या काटकोनांत बसविलेल्या लघुभागमापक (व्हर्नियर) वर्तुळखंडाचा शून्यांश येईल, अशा रीतीनें खुंटवून टाकतात. व नंतर दूरदर्शन यंत्र जितकें वर करावें लागेल तितकें करून ज्याचे उन्नतांश घ्यावयाचे असतील तें लक्ष्य दूरदर्शन यंत्राच्या मध्यबिंदूंत आलें म्हणजे उभ्या बसविलेल्या वर्तुळाच्या जितक्या अंशांवर वर सांगितलेला शून्य बिंदू असेल तितके उन्नतांश समजावयाचें. ह्या दूरदर्शन यंत्रांत वेध घ्यावयाचा असेल असा बिंदु दूरदर्शनयंत्राच्या मध्यबिंदूवर आणण्यासाठी दुर्बिणीच्या आंतल्या बाजूला एक पडदा (डायाफ्रेम) बसविलेला असतो. हा पडदा पातळ कांचेचा असतो. व त्या कांचेवर तीन मध्यबिंदूंतून जाणार्या रेषांच्या खुणा किंवा चरे पाडलेले असतात. अथवा एक सहस्त्रांश इंच जाडीच्या प्लॅटेनच्या तारा अथवा कोळ्याच्या जाळ्याचें तंतू बसवितात. इतकें सूक्ष्म रीतीचें काम करावयाचें असल्याकारणानें मुख्य तबकडी किंवा तिच्यावरून फिरणारा लघुभागमापक वर्तुळखंड, तसेंच उन्नतांश मापण्याचें वर्तुळ व त्यावरून फिरणारा वर्तुळखंड ह्या प्रत्येकानें कोणत्याहि एका स्थितींत खिळवून टाकणारे भ्रम (स्क्रू) (फ्ल्यांपिंग स्क्रू), व अशा रीतीनें खिळविल्यानंतर लक्ष्याचा मध्य साधण्यासाठी दुर्बिण किंवा वर्तुळखंड जो थोडा फार फिरवावा लागतो त्यासाठीं दुसरा स्पर्शरेषाभ्रम (ट्याजंट स्क्रू) बसविलेला असतो. आणि अंशांचीं मापें व कलांचीं मापें पाहण्यासाठीं सूक्ष्मदर्शक कांचाहि त्याच्याबरोबर बसविलेल्या असतात व दुर्बिणींतून पहावयाचा पदार्थ स्पष्ट दिसावा म्हणून ज्या कांचांतून पाहतात-ज्याच्या योगानें दुर्बिणींतून दिसणार्या पदार्थांचें प्रतिबिंब मोठें होऊन दिसतें. त्या कांचा (आय पिस) मागेंपुढें सरकवून दृश्य प्रतिबिंब स्पष्ट दिसावें असें भ्रमरकीलाच्या योगानें करतां येतें. ह्या कोनमापक दुर्बिणी अगदीं हलक्या प्रतीच्या म्हणजे ४/५ इंच तबकडीच्या असल्या तरीहि त्यांच्यां साहाय्यानें एक कलापर्यंतचें कोनमापन होऊं शकतें. आणि ह्याच जास्ती किंमतीच्या व १०/१२ इंच रुंद तबकडीच्या असल्या म्हणजे तर एक विकलापर्यंत सूक्ष्म कोनहि मापतां येतो. ही यंत्रें अवजड असल्यामुळें आणि ती वेध घेण्याजोगीं नीट व्यवस्थित रीतीनें मांडण्यास फार काळ लागत असल्यामुळें महत्त्वाच्या मापणीकामावांचून यांचा उपयोग करीत नाहींत.

अशा साधारण कामाला त्रिपार्श्वकांचयुक्त दिगंशमापक यंत्राच्या डबीचा उपयोग करतात. ही डबी खिशांत मावणारी किंवा गळ्यांत अडकवितां येण्याजोग्या कांतड्याच्या टोपणांत मावण्याजोगी असते. ती चार इंच व्यासाचीं, हलकी असल्याकारणानें नेण्याआणण्यास सोईची आणि लांकडांच्या बारीक तिकोनी घोडीवर बसवितां येत असल्याकारणानें फार सोईची असते. तिच्या मधोमध चुंबकाकर्षक सूची विवर्तनकीलावर (पिव्हट) बसविलेली असते. आणि ह्या सूचीला चांदीचें, अर्ध्या अंशापर्यंत भाग कोरलेलें वलय डांक लावून बसविलेलें असतें. ते अशा रीतीनें कीं, सूचीचें उत्तर दिशा दाखविणारें अग्र १८० अंश दाखविणार्या भागावर आणि दक्षिण दिशादर्शक अग्र ३६० अंश दाखविणार्या बिंदूवर यावें. असा व्युत्क्रम करण्याचें कारण असें आहे कीं, उत्तर दिशेकडे पाहतांना पाहणारा मनुष्य डबीच्या दक्षिण बाजूस उभा राहनू त्या दिशेकडे पाहतो. आणि ह्या डबीला त्रिपार्श्वकांच अशी बसविलेली असते कीं, त्या कांचेच्या वरल्या बाजूनें वेजांतून समोरील बाजूला जी, घोड्याचा केंस मधोमध उभा बसविलेली, बिजागिरीवर फिरणारी कडी असते तिच्या मध्यस्थ केंसाच्या उत्तर दिशेंत असणारी लक्ष्य वस्तु आणिली असतां पाहतांना ह्या त्रिपार्श्वकांचेतून चांदीच्या वलयाचा रेघा कोरलेला भागहि दिसतो. यामुळें ह्या भागावर ३६० अंश किंवा शून्य अंश मांडले तरच उत्तर दिशेकडे पाहतांना दिर्गंश शून्य येतील व अशाच रीतीनें उत्तरेकडून दक्षिणेस पाहतांना वलयाचा जो भाग बरोबर उत्तरेस असेल त्या ठिकाणीं १८० अंश कोरलेले असले पाहिजेत. व ह्याप्रमाणें या वलयाचें अंकन केलेलें असतें. खेरीज ह्या डबींत विवर्तनकील झिजूं नये म्हणून अशी व्यवस्था केलेली असते कीं, वर सांगितलेल्या बिजागिरीवर फिरणारी कडी, यंत्राच्या वरच्या बाजूस धूळ जाऊं नये म्हणून जी कांच बसविलेली असते त्या कांचेवर ती आडवी ठेविली कीं, ह्या आडव्या ठेवण्यानेंच आंतील चुंबकाकर्षक सूची थोडीशी उचलली जाते. आणि अशा रीतीनें कीलाग्राची अणकुची सतत घर्षण होऊन होऊन ती झिजण्याची आणि बोथट होण्याची भीति रहात नाहीं. हें सोईचें आटोंपशीर यंत्र वापरण्यांत व दिगंश मोजण्यांत थोडीशी चूक होण्याचा संभव असतो. कारण लोखंडाचा मोठा पदार्थ जवळपास असल्यास ही लोहचुंबक सूची खरोखरीची उत्तर दिशा सोडून लोखंडाच्या पदार्थाकडे थोडीशी वळते. यामुळें थोडाफार फरक पडतो. तसेंच ही चुंबकाकर्षक सूची नेहमीं जी उत्तर दिशा दाखविते ती ज्योतिषशास्त्रादृष्ट्या खरी उत्तर म्हणजे पृथ्वीचा आस ज्या बिंदूंत जाऊन आकाशकटाहाला मिळतो तो बिंदु दाखवीत नाहीं. परंतु पृथ्वीच्या उत्तरेकडे असणारा जो चुंबकाकर्षक केंद्र आहे त्या केंद्राकडे ह्या सूचीचें टोंक नेहमीं वळत असतें व तें किती वळतें हें वेगवेगळ्या देशांत याची मापणी करून ठरविलेलें आहे. आपल्या इकडे महाराष्ट्रांत हा कोन किंवा केंद्रच्युति सुमारें सव्वा अंश पूर्वेकडे आहे. म्हणजेच तो केंद्र इतका सव्वा अंश खरी उत्तर दिशा सोडून आहे. हाच कोन (म्याग्नेटिक व्हेरिएशन) इंग्लंडात सुमारें सतरा अंश आहे. खेरीज हा कोन सदा सर्वकाळ सारखा राहतो असेंहि नाहीं. तो हळू हळू कमी होत चालला आहे. असें जरी आहे तरी हा विशिष्ट कोन प्रत्येक कोनमापनाच्या वेळीं तितकाच रहात असल्यामुळें त्यावरून केलेली मापणी फारशी चुकत नाहीं, आणि ह्या कोनमापनांत पाव अंशापर्यंतच्या स्थूलतेचाहि, प्रत्येक मापणीच्या सरळ रेषेची लांबी थोडी असल्याकारणानें फारसा बाध येत नाहीं. खेरीज या यंत्रांत दुर्बिण नसल्याकारणानें फार लांबपर्यंतच्या बिंदूंचे यांतून वेधहि घेत नाहींत. ह्या सर्व गुणांमुळें हें यंत्र नेहमींच्या सर्वसाधारण मापणींत उपयोगांत आणतात. आणि कामापुरता बिनचूकपणाहि यांत साधतां येतो. कोनमापनाच्या वेळेस ही डबी साधारणतः मध्यस्थ (लेव्हल) म्हणजें भूपृष्ठसमपातळींत ठेवावी लागते. आणि यासाठीं ती लांकडी घोडीवर बसवितांना घोडीच्या माथ्यावर जो गोलविवर्त (बॉल अॅन्ड सॉकेट वाईट) सांधा असतो त्याच्या योगानें मध्यस्थ ठेवून ह्या स्थितींत तो सांधा खिळवून टाकातां येतो.

हीं दोन यंत्रें नेहमींच्या जमिनीवरील कोनमापनासाठीं उपयोगांत आणतात. परंतु जेव्हां होडींत बसून समुद्रांतील विवक्षित स्थलांचा स्थाननिर्देश करावयाचा असेल त्यावेळी होडीसारख्या चरस्थानावरून मापणी करण्याला षष्ठीयंत्रासारख्या प्रकाशपरावर्तक (सेक्स्टंट) यंत्रांचा उपयोग करतात. अशा यंत्रांत आरशाचीं दोन भिंगे बसविलेली असतात व त्यांपैकीं एक यंत्राच्या कोणत्यातरी एका धारेला समांतर असें बसविलेलें असतें व दुसरें फिरतें असतें. मात्र हें शून्य अंशापासून साठ अंशांइतक्या कोनापर्यंत फिरवितां येतें. ह्या दोन कांचा जेव्हां एकमेकांस समांतर असतात त्या वळेस कोणताहि पदार्थ एका आरशाच्या, पारा न लावलेल्या भागांतून दिसतो. आणि त्याच पदार्थांचें प्रतिबिंब स्थिर कांचेवरून परावर्तन पावून चलकांचेंतहि एकाच रषेंत दिसतें. परंतु चलकांच जितके अंश फिरवावी त्याच्या दुप्पट अंशाइतका कोन ज्या वस्तूंशी होत असेल ती वस्तु त्या कांचेंतून दिसते. उदाहरणार्थ, ह्या दोन कांचांमधील काने ३० अंश असेल तर ज्या दोन पदार्थांमधील कोन पहाणाराच्या डोळ्याजवळ होणारा कोन ६० अंश असेल असे दोनहि पदार्थ एका रेषेंत दिसतील. त्यापैकीं एक शुद्ध कांचेंतून आणि दुसरा परावर्तन पावून आरशांतून दिसेल. ह्या यंत्राच्या नांवाप्रमाणें ते यंत्र ६० अंशांचें म्हणजे वर्तुळाच्या सहाव्या भागायेवढें असतें. आणि त्यामुळें त्या यंत्रानें १२० अंशांपर्यंत कोन मापतां येतो. हेंच यंत्र दोन तार्यांमधील किंवा सूर्यचंद्रांमधील अंतर मोजण्यासहि उपयोगी पडतें.

ह्या मोठ्या यंत्राची लहानशा डबींत राहण्याजोगी प्रतिकृति केलेली असते. हिलाच खिशांत राहणारें षष्ठीयंत्र (पॉकेट सेक्स्टंट) म्हणतात. ह्याचा उपयोग कोनमापनावरून अंतर काढण्याकडेच लष्करी कामांत करतात. कारण कोणत्याहि त्रिकोणाची एक बाजू फितीनें किंवा नुसतीं पावले टाकून मोजली आणि त्या रेषेच्या दोन्ही टोकांपासून लक्ष्य पदार्थाचे कोन मोजले तर लक्ष्य पदार्थाचें अंतर त्रिकोणमितीच्या साहाय्यानें काढतां येतें. अशा रीतीनें तोफा जेथून उडत असतील त्यांच्या नुसत्या चमकण्यावरून किंवा धुरावरून त्यांचें अंतर काढतां येतें. त्याचप्रमाणें जेव्हां जमिनीवर मोठा लांब व्यासाचा वर्तुळखंड आंखावयाचा असेल तेव्हां ह्या डबीच्या साहाय्यानें हें काम फार जलद व बिनचूक करतां येतें.

ह्या षष्ठियंत्रांत ज्याप्रमाणें आरशांच्या दोन कांचा असतात तशाच प्रकारच्या पंचेचाळीस अंशांइतका कोन करून पक्क्या बसविलेल्या कांचा दीड किंवा दोन इंच व्यासाच्या पितळी डबींत बसविलेल्या असतात. व त्या डबीच्या बाजूला एक मोठें व एक लहान अशीं भोंकें काटकोनांत पाडलेलीं असतात. तिला परावर्तक गुण्या (ऑप्टिकल स्क्वेअर) असें म्हणतात. याच्या योगानें शंकुसांखळींतील शंकूनें ज्याप्रमाणें कोणत्याहि सरळ रेषेवर लंब काढतां येतो त्याप्रमाणें यानेंहि लंब काढतां येतो. कारण असें कीं आंतील कांचा पंचेचाळीस अंशांवर बसविलेल्या असल्याकारणानें जेव्हां कांचेच्या पारा न लावलेल्या भागांतून एखाद्या वस्तूकडे पहावें तेव्हां त्या पदार्थांच्या रेषेंत त्याच कांचेच्या पारा लावलेल्या म्हणजे आरशाच्या भागांत जो पदार्थ दिसतो ती वस्तू स्वच्छ कांचेतून दिसणार्या पदार्थाकडे जाणार्या सरळ रेषेच्या बरोबर काटकोनांत असते. ह्या डबीच्या साहाय्यानें लंब काढण्याचें काम फार जलदीनें होतें.

उच्चनीचत्वमापन किंवा उछ्रयमापन (लेव्हलिंग).— रस्त्यासारखीं कामें करावयाचीं असल्यास ज्या दिशेनें रस्ता करावयाचा असेल त्याच्या मार्गात कोणत्या प्रकारची जमीन किती उंच किंवा सखल आहे आणि रस्ता सारखा करण्यासाठीं किती भराव किंवा खोदाई करावी लागेल हें ठरविण्यासाठीं त्या मार्गांतील प्रत्येक बिंदूची उंची किती आहे हें कळणें जरूर असते. आणि हें पाणसळीच्या दुर्बिणीनें (लेव्हलनें) करतात. आणि प्रत्येक बिंदूची उंची मोजल्यानंतर त्यावरून गमनमार्गाचा पथच्छेद (लाँजिट्यूडिनल सेक्शन) आणि वेगवेगळ्या ठिकाणचें आडवे छेद कागदावर काढतात. हा पथच्छेद घेण्याच्या पूर्वी पहाणी व मापणी करून आणि त्यावरून त्या भूप्रदेशाचें चित्रण करून त्या चित्रितावर रस्ता कशा कशा रीतीनें जावयाचा त्याची मध्यरेषा दाखवितात. आणि त्या मध्यरेषेवरून पाणसळीच्या दुर्बिणीनें उच्चनीचत्व मापावयाचें असतें. यासाठीं रस्त्याची मध्यरेषा जशी चित्रितांत दाखविली असेल तशीच ती जमीनीवर खुंट्या मारून आंखतात. आणि ह्या रेषेवरूनच पथच्छेद घेतात. हा पथच्छेद घेतेवेळीं आरंभस्थानाजवळ असलेल्या इमारतीच्या जोत्यावर किंवा विहिरीच्या वरवंडीवर किंवा कोणत्याहि कायम टिकणार्या बांधकामावर निशाणी खोदून त्यावर अंकित दंड उभा करून तेथपासून उछ्रयमापन (लेव्हलिंग) सुरू करतात. अशा निशाणीला प्रमाणचिन्ह (बेंचमार्क) असें म्हणतात व अशीं प्रमाणचिन्हें ज्या ठिकाणी पुलासारखी कामें व्हावयाची असतील अशा ठिकाणींहि ठेवतात. ज्या ठिकाणी अशी कायम खूण करण्यासारखें बांधकाम सांपडत नसेल अशा ठिकाणीं दगडाचा नवा खुंट बांधकामात किंवा काँक्रेटमध्यें कायमचा बसवून त्याच्या माथ्यावर खूण करून त्याचा उछ्रय लिहून ठेवतात. पथच्छेद घेतांना आरंभस्थानापासून त्या मध्यरेषेची लांबी मोजून दर पन्नास किंवा शंभर फुटांवर उछ्रयमापनाचा अंकित दंड (लेव्हलिंग स्टाफ) उभा करून त्या त्या बिंदूंचा उछ्रय दुर्बिणीनें मोजतात.

हा अंकित दंड म्हणजे ३ इंच रुंदीची पट्टी असून त्यावर तळापासून माथ्यापर्यंत माथ्यापर्यंत, फुटांच्या खुणांचे आंकडे तांबड्या रंगांत आणि फुटांच्या दशांशांचे आंकडे काळ्या रंगांत व फुटांचे शतांश विभाग एकाआड एक काळ्या व पांढर्या रंगांत दाखविलेले असतात. हे दंड बहुतकरून पांच फुट उंचीचे असतात. आणि त्यांतून दुर्बिणीच्या नळीप्रमाणें बाहेर ओढतां येण्याजोगी ४॥ फूट लांबीची पट्टी बसविलेली असते. व या दुसर्या पट्टींतून ४॥ फूट लांबीची तिसरी पट्टी ओढून काढतां येते. व अशा रीतीनें पांच फूट उंचीपर्यंत तळच्या पट्टीवरचें काम भागतें. आणि ९॥ फूट उंचीपर्यंत दुसरी पट्टी बाहेर ओढली असतां माप घेतां येतें. आणि यापेक्षां जास्ती म्हणजे १४ फुटांपर्यंत माप घेणें झाल्यास तिसरी पट्टी बाहेर ओढून काढावी लागते. या अंकित दंडानें माप घेऊन उछ्रय काढणें म्हणजेच उच्चनीचत्व मापन होय. यांत ज्या स्थलाचा किंवा जागेचा उछ्रय काढणें असेल त्यावर अंकित दंड ठेवून ज्या जोत्याच्या, वरवंडीच्या किंवा खुंटीच्या उछ्रयाशीं तुलना करणें असेल, तेथें पाणसळीच्या दुर्बिणीतून त्या अंकित दंडाचा दुर्बिणीतल्या आडव्या तारेनें वेध कोणत्या ठिकाणीं होतो (म्हणजे फूट किती व फुटांचे शतांश किती) हें टिपून ठेवतात. आणि नंतर जोत्यावर किंवा खुंटीवर तोच अंकित दंड ठेवला असतां त्या दंडाचे किती फूट व किती शतांश यांवर दुर्बिणीतील तारेचा छेद होतो हें टिपून घ्यावयाचें आणि अंकित दंडावरील दोन्ही मापांची वजाबाकी म्हणजेच त्या दोन्ही स्थळांतील उछ्रयाचें अंतर होय. उदाहरणार्थ, एका ठिकाणीं दंड ठेवला असतां भेदनरेषा जर १०॥ फूट उंचीवर असली आणि दुसर्या ठिकाणी तो दंड ठेविला असतां २॥ फूट उंचीवर जाऊन त्या अंकित दंडाला भिडली तर पहिलें स्थळ हें दुसर्या स्थळापेक्षां ८ फूट नीच आहे असें समजावयाचें. अशा रीतीनें पथच्छेद व आडवे छेद घेण्यासाठीं प्रत्येक बिंदूचें उच्छ्रयमापन काढावें लागतें. रस्त्याची किंवा कालव्याची दिशा ठरल्यानंतरचें सूक्ष्म उच्छ्रयमापन पाणसळीच्या दुर्बिणीनेंच करावें लागतें व अशा मापनानें पाणढाळाची रेषा (रिजलाईन किंवा वाटर शेड लाईन) कोणत्या दिशेनें जात आहे तें समजतें. त्याचा उपयोग असा होतो कीं, रस्ता  अशा पाणढाळाच्या रेषेवरून नेला असतां रस्त्याच्या बाजूस पाणी सांठून राहण्याची कधींहि भीति रहात नाहीं. कारण पाणढाळाची रेषा म्हणजेच त्या रेषेपासून दोन्ही बाजूला ढाळ किंवा उतार असावयाचा व यामुळेंच अशा ठिकाणीं पाण्याचा थेंब पडला तरी तो उजव्या किंवा डाव्या बाजूस वाहून जावयाचाच. तसेंच कालवाहि अशा रेषेवरून नेला असतां त्याचें पाणी दोन्ही बाजूंच्या शेतास सहज रीतीनें देतां येतें. याच्या उलट, कोणत्याहि प्रदेशावर जो पाऊस पडेल त्याचे लोट ज्या रेषेवरून (व्हॅली लाईन किंवा ड्रेनेज लाईन) ओघळून वहात जातात अशा ओहोळ, ओढे, नाले, नद्या यांच्या रेषाहि नकाशावर दाखवितात. आणि अशी रेषा ओलांडून जाण्यास कोणती जागा जास्त सोईची आहे हें रस्ता करतांना शोधून काढावें लागतें.

तलावाच्या मापणींत त्या तलावांत किती फूट खोल पाणी सांचलें असतां किती घनफुटांचा सांठा त्या तलावांत आहे हें काढण्यासाठीं सारख्या उछ्रयाचा परिघी (कंटूर) कोणत्या आकाराचा व किती चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे हें काढावें लागतें आणि यासाठीं समोछ्रित किंवा समस्थ बिंदू कोणकोणते आहेत हें पाणसळीच्या दुर्बिणीनें शोधून काढतात. हे सर्व बिंदू समस्थ असल्याकारणानें दुर्बिण कोणतयाहि ठिकाणीं उभी केली तरी अंकित दंडावरील विद्धस्थान एकच येईल अशा रीतीनें तो दंड अलीकडे-पलीकडे सरकवून ज्या ठिकाणीं इष्ट माप येईल त्या ठिकाणीं खुंटी मारतात. याप्रमाणेच इतर ठिकाणींहि याच पद्धतीनें तलावाच्या कांठावरून खुंट्या मारतात. उदाहरणार्थ, दुर्बिणीतून पहातांना एखाद्या बिंदूवर अंकित दंड ठेवला असता जर आठ फुटांवर वेध होत असला तर इतरहि सर्व ठिकाणीं आठ फूटच वेध येईल असे बिंदू शोधून त्या ठिकाणीं अंकित दंड ठेवून आठ फुटांचें माप आलें म्हणजे त्या ठिकाणीं खुंटी मारतात. अशा रीतीनें तलावाच्या परिघीरेषा काढतात अर्थांत तलावांत जसजसें पाणी चढेल तसतसा पाण्याचा पृष्ठभाग विवक्षित उछ्रयाचा परिघीच दाखविणार व तलावाच्या तळापासून म्हणजे तलावांतील पाणी बाहेर सोडण्याचे नळ अथवा मोर्या असतील त्यांच्या तळापासून पांच फूट उंच असलेल्या उछ्रयाचा परिघी (कंटूर) नकाशावर दाखवून त्याचें क्षेत्र किती चौरस फूट आहे हें क्षेत्रमापक यंत्राच्या योगानें शोधून काढतात. आणि अशा दहा फूट, पंधरा फूट, वीस फूट, पंचवीस फूट इतका उछ्रय असणार्या परिघीरेषांची क्षेत्रें काढून त्यावरून किती घनफूट पाणी ह्या तलावांत सांचेल तें काढतां येतें. उदाहरणार्थ, तलावांत २५ फूट पाणी चढलें असतां जर परिघिक्षेत्र ऐशीं हजार चौरस फूट भरलें आणि त्याच तलावांतील पाणी अटून २० फूट पाणी राहीलें असतांना परिघिक्षेत्र जर ६० हजार चौरस फूट भरलें तर येवढ्या पाच फुटांत ८००००+६००००/२×५=३५००००     घनफूट पाणी होतें असें समजावें व अशा रीतीनें दर पांच फूट खोलींत किती पाणी मावलें हें काढतां येतें. ह्या कारणास्तव वेगवेगळ्या उछ्रयाच्या परिघींचें क्षेत्र कंटूर किती आहे हें समजण्यासाठी समोछ्रयबिंदूची रेषा (कंटूर लाईन) परिघि पाणथळीच्या दुर्बिणीनें अथवा खुंट्यामारून जमीनीवर आंखावी लागते व ती तशी आंखल्यानंतर त्या क्षेत्रांचीं मापें त्रिपार्श्वकांचयुक्त दिगंशमापक यंत्रानें कोण मोजून व सांखळानें त्रिकोणांच्या बाजू मोजून फितीनें मापें घेऊन त्या मापांप्रमाणें चित्रण करतात. व अशा चित्रिताचें क्षेत्रफळ वर सांगितल्याप्रमाणें क्षेत्रमापक (प्लीनी मिटर) यंत्राच्या साहाय्यानें थोडक्या श्रमांत काढतां येतें. एखाद्या टेंकडीचा किंवा जड असलेल्य भूपृष्ठाचा नकाशा करावयाचा असला आणि त्या टेंकडीच्या बाजूनें रस्ता करावयाचा असला तर अशा समोछ्रय परिघीरेषा फार उपयोगी पडतात. कारण १०० फुटांत तीन फूट इतका चढ रस्त्यास देणे असेल तर रस्ता कशा रीतीनें आंखला असता इतका चढ येईल हें नकाशावरून ठरवितां येतें. जर नकाशाचें प्रमाण १०० फुटांस एक फूट असें असेल व समोछ्रय रेषा एक एक फूट जास्ती उछ्रयाच्या असल्या तर (उदा.) चाळीस उछ्रयाच्या कोणत्याहि बिंदूपासून ४३ उछ्रयाचा जो बिंदू तो एक इंच अंतरावर नकाशांत असेल जसें - बिंदू जोडणारी रेषा ही शंभर फुटांत तीन फूट चढ असणारी रेषा होईल. व ह्याप्रमाणें जमीनीवर आंखणी करून रस्ता केला असतां त्या रस्त्याला शंभर फुटांस तीन फूट इतका चढ असणार हें उघड आहे.

ह्या उछ्रयमापनाच्या यंत्रांत दुर्बिणीला समांतर असें मध्यस्थ बसविलेलें असतें. व ती दुर्बिण सभोंवार फिरविल्यास मध्यस्थांतील बुडबुडा मधोमध राहिला म्हणजे दूरदर्शक नलिकेंतील कांचांच्या मध्यांतून जाणारी रेषा ही मध्यस्थ राहतें. आणि यामुळें या रेषेंत दिसणारे सर्व बाजूंचें बिंदूहि भूपृष्ठाच्या समांतर पातळींतच असतात. यामुळें कोणत्याहि ठिकाणीं अंकित दंड ठेवला म्हणजे त्या दंडाला ज्या ठिकाणी ही रेषा भेदील तितके फूट ह्या समरेषेच्या खालीं अंकित दंडाचा तळ, म्हणजे ज्या खुंटीवर अथवा जोत्यावर तो दंड ठेवला असेल त्याचा माथा आहे असें समजावयाचें. उदाहरणार्थ, एखाद्या विहिरीच्या वरवंडीवर ठेवलेल्या दंडावर समरेषेनें भेदलेलें स्थान जर एक फूट भरलें आणि नंतर तो दंड उचलून सडकेवर ठेवला असतां जर हें भेदनस्थान पांच फूट उंच भरलें तर त्या विहिरीच्या वरवंडीचा माथा सडकेपेक्षां चार फूट उंच आहे असें झालें. हे समरेषेचें वेध घेतांना अंकित दंड एकमेकांच्या विरुद्ध दिशेंत, साधारणतः सारख्याच अंतरावर ठेवतात. ह्या दुर्बिणीलाहि पितळी बैठक असून तिला तीन किंवा चार पादभ्रम (फूट स्क्रू) असतात व हे भ्रम किंवा स्क्रू एकमेकांच्या विरुद्ध दिशेस फिरवून दुर्बिणीवरील मध्यस्थ सम स्थितींत (लेव्हल) आणतां येतें. ह्या दुर्बिणीची घोडी लांकडी तीन पायांची असून तिला माथ्यावर पितळी तबकडी बसवून ती तिला खिळवून टाकण्याची व्यवस्था केलेली असते. ह्या दुर्बिणीत पाहण्याची जी कांच असतें ती व पुढची बाह्यगोल कांच ह्यांच्यामध्यें ज्यां ठिकाणीं अंकित दंडाची प्रतिमा स्पष्ट दिसते (व ती तशी दिसण्यासाठी पाहण्याची कांच मागेंपुढें फिरवितां यावी यासाठी बाहेरील बाजूस एक मोठा भ्रमरकील [मिल हेडेड स्क्रू] बसविलेला असतो) त्या ठिकाणी दुर्बिणीच्या वर्तुळाच्या मधोमध एक आडवी तार आणि मध्याच्या दोन बाजूंस सारख्या अंतरावर दोन उभ्या तारा बसविलेल्या असतात. ह्या उभ्या तारांच्या योगानें अंकित दंड बरोबर ओळंब्यांत आहे कीं नाहीं हें समजतें आणि आडव्या तारेनें जेथें तो दंड भेदला जातो तीच दुर्बिणीतल्या आंसरूपी सम रेषेची उंची होय व तिचेंच उंचीचे माप लिहून घेतात व अशा रीतीनें ह्या पाणसळीच्या दुर्बिणीचा उपयोग करतात.

वर सांगितल्याप्रमाणें प्रत्येक बिंदूची उंची मोजल्यानंतर त्यावरून कागदावर मूल रेषा (डेटम लाईन) काढून त्या रेषेपेक्षां प्रत्येक बिंदू किती फूट उंच आहे हें प्रमाणपट्टीनें मोजून सडकेच्या मध्यरेषेवरील सर्व बिंदूंचें अंकन झालें व ते सर्व बिंदू जोडले म्हणजे त्या सडकेचा पथच्छेद तयार झाला व या पथच्छेदावर सडकेची मध्य रेषा काढतात. आणि ह्यावरून आडवा छेद-रस्त्याची रुंदी, दोन बाजूंचें ढाळ, वगैरे दाखविण्यासाठी–काढून त्यावरून किती भराव किंवा किती खोदाई करावी लागेल याचा अंदाज करतां येतो.

पहाणी व मापणी ह्यांतच उच्चनीचत्व मापनहि येतें. पहाणी व मापणी झाल्यानंतर क्षेत्राचें चित्रण (प्लॅन) करतात. आणि अशा चित्रितावर योजनेच्या (रस्ता किंवा कालवा यांच्या) रेषा दाखवितात. आणि त्यांची मध्यरेषा कागदावर दाखवून त्याप्रमाणें गमनमार्गावरून पथच्छेद घेतात. अथवा त्यांत थोडाफार फेरफार करणें झाल्यास ज्या ज्या रेषेनें जमिनीवर पथच्छेद घेतात त्या त्या रेषा चित्रितावर दाखवितात. आणि ह्या पथच्छेदाच्या काटकोनांत ज्या ज्या ठिकाणी आढवे छेद घेणें असेल त्या त्या ठिकाणचे उच्चनीचत्व दर्शक आडवे छेद घेतात. हे नकाशे काढण्याची अशी पद्धत आहे कीं, नकाशा काढावयाच्या कागदावर वरील बाजूस रस्त्याचें दिग्दर्शक चित्रण (प्लॅन) इंचास दोनशें किंवा चारशें फूट या प्रमाणांत काढतात आणि त्याच्या खालच्या बाजूस रस्त्याच्या मध्यरेषेंवरून घेतलेला पथच्छेद त्याच प्रमाणांत (म्हणजे इंचास दोनशें किंवा चारशें फूट या प्रमाणांत) काढतात. परंतु ह्याच पथच्छेदांत वेगवेगळ्या बिंदूंचे उच्चनीचत्व दाखविणार्या उभ्या रेषा मात्र इंचास दहा किंवा वीस फूट अशा प्रमाणांत काढतात. आणि हे बिंदू एकमेकांस जोडले म्हणजे जमीन चढती आहे किंवा उतरती आहे हे ताबडतोब लक्षांत येतें. आणि अशा जमीनीवरून जाणार्या रस्त्याला जास्ती खोदाई न करतां किंवा जास्ती भराव न घालतां किती उतार किंवा चढ देता येईल हें ठरवितां येतें. उदाहरणार्थ, रस्ता करणें झाल्यास साधारणतः तीस फुटांत एक फूट यापेक्षां जास्ती अवघड चढ किंवा उतार देतां कामा नयें. तसेंच रेल्वेचा मार्ग आंखणें झाल्यास शंभर फुटांस एक फूट ह्यापेक्षां अवघड उतार किंवा चढ द्यावयाचा नाहीं हें लक्षात बाळगून रस्त्याच्या किंवा रेल्वेच्या पथच्छेदांत रेघा मारावयाच्या असतात. आणि अशा रेघा मारल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणीं किती भराव किंवा खोदकाम करावे लागेल हे आडव्या छेदांत दाखवून त्यावरून मातीकामाचा अंदाज करतां येतो.

हे नकाशे काढावयासाठीं नकाशे काढण्याचा जाड चिंवट कागद फळ्याला चार बाजूस चार टिकल्या (ड्राइंग पिन्स) लावून तो कागद पक्का करतात. आणि नंतर त्या फळ्याच्या डाव्या बाजूस लागून, सरकणारा सुमारें ३ फूट लांबीचा टीस्क्वेअर (इंग्रजी 'टी' च्या आकाराची) पट्टी वर खालीं सरकवून तिच्या योगानें त्या कागदावर वाटेल तितक्या समांतर रेषा फळ्याच्या खालील व वरील धारेला समांतर काढतात व ह्या आंखण्याच्या पट्टीला लागून लांकडी गुण्या (सेट स्क्वेअर) ठेवून वाटेल तितक्या समारंत रेषा मुख्य रेषांच्या काटकोनांत काढतात. कागदावर ज्या आडव्या रेषा काढतात त्यांवर प्रमाणपट्टीनें अंतरें मोजून वेगवेगळे बिंदू दाखवितात व ह्या बिंदूपाशीं जमीन किती उंच किंवा किती नीच आहे हें गुण्यानें उभी काटकोनांत रेघ काढून त्यावर उंचीच्या प्रमाणपट्टीनें इच्छित स्थानाचें उच्चत्व दाखवितात. व अशा रीतीनें वाटेल तो पथच्छेद जलदीनें काढतात. अर्थात या पथच्छेदाचें प्रमाण (स्केल) आडव्या रेषांवरून मापें घेतांना दोनशें किंवा चारशें फुटांस एक इंच याप्रमाणें आणि उंचीची मापें घेतांना दहा किंवा वीस फुटांस एक इंच याप्रमाणें घेतात. अशा पथच्छेदावरील आडवे छेद जे घेतले असतील ते दाखवितांना उंचीचें व रुंदीचें प्रमाण (स्केल) एकत्र ठेवतात. व असें केल्यानें रस्त्याची किंवा कालव्याची खरी आकृति कशी होईल व त्याचे दोन बाजूंचे उतार किंवा चढ कसे होतील याचें बरोबर चित्र डोळ्यापुढें उभे राहतें. परंतु पथच्छेदावरून उच्चनीचत्वाची विकृत कल्पना मनांत उभी राहतें. व असें व्हावे असा हेतूच असतो. कारण अंतराचें (आडवें) आणि उंचीचें (उभें) प्रमाण एकच असलें तर उच्च नीचत्व एकदम लक्षांत येतच नाहीं. आणि तें यावें असा तर हेतु असतो. ज्या वेळेस टीस्क्वेअर वापरणें नसेल तेव्हा समारंतर रेषा काढणारी पितळेची किंवा लाकडाची, कागदावरून दोन चाकांच्यायोगें गडगडत जाणारी पट्टी किंवा सरकणारी जोडपट्टी वापरतात. आणि ह्या पट्टीच्या काटकोनांत रेषा काढणें झाल्यास लांकडी किंवा अबनूसच्या लहना (सेट स्क्वेअर) गुण्यानें त्या काढतां येतात.

रस्त्यांचें वगैरे चित्रण करतांना ज्याप्रमाणें अंतरें मोजण्यासाठीं प्रमाणपट्टीची जरूर पडते त्याचप्रमाणें कोनाच्या चित्रणासाठी कोनमापक वलयाचा उपयोग करावा लागतो. हीं वलयें (प्रेट्र्याक्टर) पितळेचीं किंवा अन्य धातूंचीं वर्तुळाकार असतात. आणि त्यांच्या मधोमध वर्तुळाचा व्यास दाखविणारी आडवी पट्टी असते. व वर्तुळाचा मध्य दाखविण्यासाठी तिच्यावर खूण केलेली असते. आणि ह्या व्यासाच्या एका टोंकाला शून्य मांडलेलें असतें आणि तेथून त्या वर्तुळाच्या परिघावर अंशाच्या व अर्ध्या अंशाच्या खुणांचे चरे पाडलेले असतात. आणि प्रत्येक दहा अंशांवर आंकडे मांडलेले असतात. व वलय पूर्ण असलें तरी दहा, वीस, तीस ते एकशें ऐंशी व्यासाच्या समोरील टोकापर्यंत; व तेथून एकशें नव्वद, दोनशें ते ३६० अंशांपर्यंत दहा दहा अंशांच्या अंतरावर मांडतात. हीं कोनमापक वलयें पुष्कळ वेळां अर्धवर्तुळाकृतीच असतात. आणि त्यांचें अंकन वर सांगितल्याप्रमाणेंच असतें. ह्या कोनमापक वलयाच्या साहाय्यानें मापणींत आलेल्या कोणत्याहि कोनाचें चित्रण बरोबर करतां येतें. ही वलयें (प्रोट्रॅक्टर) कधीं कधीं लंबचौरस असतात. रस्त्याची मध्यरेषा, आंखण्याच्या पट्टीनें काढून त्या रेषेवरील अंतरे प्रमाणपट्टीनें (स्केलनें) मोजून खुणा करतात. आणि त्या रेषेवर लंब काढणारी पट्टी असेल तर त्या पट्टीला लागूनच प्रमाणपट्टीचे दोन इंच लांबीचे तुकहे काटकोनांत कापलेले असतात त्यांनांच लंबांतरमापक (आफसेटपिस्) म्हणतात. त्यांच्यायोगानें त्याच प्रमाणांत लंबांतरेंहि दाखवितां येतात.

नकाशा काढण्याच्या प्रमाणपट्ट्या १२ इंच लांबीच्या आणि इंच सव्वाइंच रुंदीच्या असतात आणि त्यांवर दर एक इंचाचें आठ किंवा साळा भाग पाडलेले असतात व ह्या पट्ट्यांचा उपयोग इमारतींचे नकाशे काढण्याकडे करतात. परंतु रस्त्यांचे वगैरे नकाशे काढतांना इंचांचे दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ असे भाग पाडलेल्या पट्ट्यांचा उपयोग करतात. कोणत्याहि नकाशावर दिलेल्या रेषेचे सारखे भाग पाडावयाचे असतील तेव्हां विभाजक (डिव्हायडर) कंपासाचा उपयोग करतात. ह्या कंपासाची दोन्ही टोकें निमुळतीच असतात. परंतु ज्या वेळीं पेन्सिलीनें किंवा शाईनें वर्तुळ काढणें असेल तेव्हां एका बाजूस बारीक सुईसारखें टोंक असलेला आणि दुसर्या बाजूस पेन्सिल बसविण्याजोगा किंवा शाई भरून रेषा ओढतां येण्याजोगीं टोकें असलेला असा कंपास किंवा कैवार वापरतात.

कोणत्याहि नकाशाच्या प्रती करणें झाल्यास त्या नकाशावर पारदर्शक कागद अथवा पारदर्शक कापड ठेवून दिसणार्या रेषा त्या कागदावर किंवा कापडावर शाईनें काढून पहिली प्रत तयार करतात. आणि नंतर त्या प्रतीवरून रासायनिक द्रव्यें लावलेल्या कागदावर ती पहिली पारदर्शक कापडावरील प्रत ठेवून ती फोटोपद्धतीप्रमाणें वठवितां येते. व अशा तर्हेनें वाटेल तितक्या प्रती काढतां येतात.

नकाशाच्या निळ्या प्रती तयार करणें:- ह्या प्रती करण्यासाठी ट्रेसिंग क्लाथवर नकाशाचें ट्रेसिंग करावें लागतें. आणि ज्या कागदावर निळ्या रंगाची प्रत करावयाची असेल त्या कागदाला एक अंश पाण्यांत सीट्रेट ऑफ आयर्न अँड अमोनिया १०० ग्रेन थिरवून आणि तसेंच १ औस पाण्यांत ७० ग्रेन रेडप्रशीएट ऑफ पोट्याश थिरवून या दोन्ही द्रावणांचे मिश्रण समभाग घेऊन ते अंधार्या जागेंत लाल काचेंच्या दिव्याच्या उजेडांत एका ठिकाणीं मिसळून त्यानें कागदाच्या एका बाजूस २ मिनिटेंपर्यंत स्पंजानें नीट रीतीनें भिजवून व जास्ती राहिलेले पाणी स्पंजाने टिपून घेऊन तो कागद अंधार्या कोठडींतच वाळावयास ठेवावा. आणि तो वाळल्यानंतर त्यावर अंधार्या कोठडींतच नकाशा काढलेलें ट्रेसिंग क्लॉथ त्याच्यावर ठेवून व त्यावर स्वच्छ व जाड काचेचा पत्रा (शिट्) ठेवून व सर्वांच्या खालीं काळ्या कापडाचा तुकडा-ज्या फलकांवर हें सर्व ठेवावयाचें त्यांवर बसवून नंतर हें तकट उन्हांत नेऊन ठेवतात. आणि ८ ते १० मिनिटें उन्हांत ठेवल्यानंतर अंधार्या कोठडींत तो कागद स्वच्छ पाण्यानें धुवून काढतात. असें केलें म्हणजे निळ्या कागदावर पांढर्या रेघांचा नकाशा काढलेला आढळून येतो. अशा निळ्या प्रतीवरील एखादी पांढरी रेषा काढून टाकावयाची असेल तर त्या भागावर वर सांगितलेल्या दोन्ही द्रावणांचें थोडेसें मिश्रण करून तें मिश्रण बारीक ब्रशानें जितका भाग पुसून काढणें असेल तितक्या भागावर लावलें व नकाशा उन्हांत धरला व नंतर तो पूर्वीप्रमाणेंच पाण्यानें धुतला म्हणजे सर्व भाग निळा होऊन जातो.

परंतु निळ्या भागावर पांढर्या रेषा काढून दुरुस्ती करावयाची असेल तर १ औंस पाण्यांत ४० ग्रेन कार्बोनेट ऑफ पोट्याश घालून त्या द्रावणानें व कुईल पेनानें इष्ट स्थळीं रेघा ओडल्या आणि टिपकागदानें जास्ती राहिलेला ओलावा किंवा पाणी टिपून काढलें व पाण्यानें धुतलें म्हणजे नवीन काढलेल्या पांढर्या रेषा स्वच्छ दिसू लागतात. तसेंच काढलेला नकाशा मोठ्या अगर लहान प्रमाणांत काढणें असल्यास तो पँटाग्रॉफ नांवाच्या यंत्राच्या साहाय्यानें काढतां येतो.

प्लॅन चित्रित.— चित्रित म्हणजे भूपृष्ठमाग हा कागदाची पातळी समजून त्यावर वेगवेगळ्या इमारती, रस्ते, विहिरी, झाडें वगैरें एकमेकांपासून किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहेत याचें नक्की सापेक्ष चित्रच होय. यावरून इमारतीचा कोणताहि भाग किती लांबीचा व कोणत्या दिशेस आहे व त्याला कोणकोणत्या ठिकाणीं खांचे, कोपरे आहेत हें, तसेंच जवळून रस्ता अगर बोळ जात असेल तर तो वेगवेगळ्या ठिकाणीं किती रुंदीचा व कोणीकडे जात आहे हें समजतें. तसेंच एखादी विहीर असल्यास ती किती व्यासाचीं किंवा किती परिघाची व भोंवतालच्या इमारतींच्या वेगवेगळ्या कोंपर्यांपासून किती अंतरावर आहे हें बरोबर दिसून येतें. त्याप्रमाणेंच झाडें किंवा रोंवलेले दगड कोणकोणत्या ठिकाणीं आहेत व ते एकमेकांपासून किती अंतरावर आहेत व भोंवतालच्या इमारती किंवा इतर स्थावर वस्तू ह्यांपासूनच बरोबर किती अंतरावर आहेत हें, असा नकाशा पाहिल्यानें चट्कन लक्षांत येतें. असा नकाशा रस्ता, किंवा रेल्वे, किंवा कालवे बांधण्यासाठी जेव्हां तयार करतात तेव्हां असे रस्ते किंवा कालवे ज्या ज्या जमिनींतून ज्या ज्या दिशेनें काढावयाचें असतील त्या मार्गांत येणारी जी शेतें वगैरें असतील त्या शेतांचे आकार व त्यांचे हद्दीचे खुंट किंवा वरवंट्या किती अंतरावर आहेत त्याचें बरोबर मापसळ चित्रच होय. अशा या लांबचलांब नकाशावर कालव्याची अगर रस्त्याची किंवा रेल्वेची मध्यरेषा ओढून त्या रेषेच्या दोन्ही बाजूंला किती किती जमीन प्रत्येक सर्व्हेनंबरांतून घ्यावी लागेल याचें स्थूलमानानें नकाशावरून माप काढतां येतें. अशा प्रकारचें कोणत्याहि कामाचें योजनादर्शक जें चित्र काढतात त्यास चित्रित म्हणतात. तसेंच रस्ता, रेल्वे किंवा कालवे बांधतांना त्यांच्या मार्गात येणार्या भूभागावर किती भराव टाकून किंवा खोदाई करून त्यांच्या मध्यरेषेला जितका चढ किंवा उतार देणें इष्ट असतें तितका देण्याकरितां भूपृष्ठाच्या सपाटींत फेरफार किती करावा लागेल हें काढण्यासाठीं त्यांचा पथच्छेद पाणसळीच्या दुर्बिणीनें घ्यावा लागतो. त्याचप्रमाणें रस्त्याची रुंदी किती ठेवावयाची व त्याच्या भरावाला दोन्ही बाजूंनां किती ढाळ द्यावयाचा, तसेंच मध्यें किती जागा सोडावयाची आणि बाजूंला पाणी जाण्याकरितां गटारें करावयाचीं आणि तसेंच एकंदर जमीन किती घ्यावयाची हें दाखविण्यासाठीं आडवां छेद (क्रॉस सेक्शन) घ्यावा लागतो व नकाशांत हे छेद दाखवितांना एक मूल रेषा (डेटम लाईन) काढतात व ती नेहमीं भूगर्भापासून सारख्या अंतरावर असतें आणि ती बहुतकरून इतकी खाली घेतात कीं, ज्या सर्व क्षेत्राचाच छेद घ्यावयाचा असेल त्या क्षेत्रांतील कोणताहि बिंदू तिच्यापेक्षा नीच असतां कामा नये. व ती अशीं असल्यामळें छेंदांत काढलेल्या भूपृष्ठाचा कोणताहि बिंदु त्या रेषेच्या नेहमी वरील बाजूस असतो व अशी रेषा साधारणत: समुद्राच्या मध्यम सपाटीपासून विवक्षित उंचीवर असणारी घेतात. उदाहरणार्थ, मुंबईस किंवा समुद्रकांठाच्या भागी भूभागाचें उच्चनीचत्व मापणें असेल तर समुद्राची मध्यम सपाटी हीच मूलरेषा घेतात. व ही मूलरेषा घेऊन प्रत्येक बिंदु ह्या मूलरेषेपेक्षां किती फुटांनी उंच आहे हें दाखवितात. उलटपक्षी समुद्रांतील जमीनीची, म्हणजे बंदरें व बंदरकांठ ह्या ठिकाणीं धक्के, जलोर्मिशक्तिभंजक सेतु (ब्रेकवॉटर) बांधण्यासाठीं मापणी करणें असेल तरीहि हीच मूलरेषा वापरतात. परंतु ह्या ठिकाणीं मलरेषेपेक्षां प्रत्येक बिंदू किती खोलीवर आहे हें दाखवितात, म्हणजे समुद्रच्या मध्यम सपाटीपेक्षां जे जे भाग नीच किंवा सखल असतील त्या त्या ठिकाणी घेतलेला छेद ह्या मूळ रेषाच्या खालीं इतके फूट अशा रीतीनें दाखविला जातो (व अशा छेदावर धक्क्यांचा पाया ह्या मूल रेषेच्या खालीं अमक्या फुटांवर असेंच दाखवितात]. साधारणतः समुद्रसपाटीच्या खालीं ५० फुटांपेक्षां धक्के, गोवा वगैरे पायांची कामें खोल जात नाहींत व कोंकणांतील इतर भागांच्या मापणीला समुद्राच्या मध्यम सपाटीची रेषाच उपयोगी पडते. व तत्त्वतः हीच मूल रेषा अखिल हिंदुस्थानच्या किंवा कोणत्याहि देशाच्या उच्चनीचत्व मापणींत उपयोगांत आणतात. उदाहरणार्थ, पुणें शहर हें समुद्रसपाटीच्या वर १८०० फुटांपेक्षां थोडें जास्त उंच असल्याकारणानें पुणें येथील मूळरेषा समुद्राच्या मध्यम सपाटीच्या वर १८०० फूट उंच असणारी रेषा ती मूळ रेषा घेता येते व अशा रेषांच्यापेक्षां प्रत्येक बिंदु इतके फूट उंच आहे असें दाखवितां येतें. साधारणतः जें कोणतें काम करणें असेल त्या ठिकाणच्या सखलांत सखल, जो भूभाग असेल अशा बिंदूच्या खालीं पंचवीस-तीस फुटांवर येणारी रेषा ती मूळ रेषा घेतात आणि ही मूल रेषा समुद्राच्या मध्यम सपाटीच्या वर इतके फूट उंच आहे असा शेरा मारून ठेवतात. असें केल्यानें कोणत्याहि कामाची समुद्रसपाटीपासून किती उंची आहे हें समजतें. नेहमीं पर्वतांच्या शिखरांची उंची जी सांगितलेलीं असते ती समुद्राच्या मध्यम सपाटीच्या वर अमुक फूट अशी सांगितलेली असते. उदाहरणार्थ, हिमालयाचें शिखर गौरीशंकर हें एकोणतीस हजार फूट उंच आहे, याचा अर्थ, समुद्रसपाटीपासून इतकें आहे अशाच घ्यावयाचा. कागदावर छेद काढण्याची पद्धति म्हणजेच ह्या मूल रेषेपेक्षां प्रत्येक बिंदु किती उंच आहे व त्याचें सापेक्ष अंतर किती आहे हें दाखविणें होय ह्यामुळेंच रस्त्याला किंवा कालव्याला किती ढाळ दिला असतां प्रत्येक बिंदूजवळ किती खोदाई किंवा भराव लागेल हें पथच्छेदावरून समजून येतें.

लांजिट्यूडिनल सेक्शन.— ही चित्रितें व पथच्छेद, व आडवे छेद कागदावर दाखवितांना भूपृष्ठावरील त्याच्या खर्या परिमाणाच्या मानानें त्याचें कागदावरील चित्र किती लहान आहे हें दाखविणारें व्युत्क्रमपद (रेसिप्रोकल, म्हणजेच ज्याला प्रमाण (स्केल) म्हणतात ते होय.

हें ढाळ किंवा चढ ह्यांचे प्रमाण अमक्या फुटांत एक फूट असें म्हणण्याचा प्रघात आहे; उदाहरणार्थ, चित्रिताच्या दोनशें फुटांस एक इंच प्रमाण आहे असें म्हटलें म्हणजे चोवीसशें इंचांस एक इंच असा याचा अर्थ होतो. व यासच एक भागिलें चोवीसशेंचें प्रमाण असेंहि म्हणतां येतें. परंतु असें प्रमाण लिहिण्याचा रिवाज भूगोलाच्या नकाशांतच बहुतकरून वापरतात. उदाहरणार्थ, एखाद्या नकाशाचें प्रमाण जर एकास दशलक्ष असें असलें तर त्या नकाशांत दोन बिंदू एक इंच अंतरावर असले तर ते खरोखरी दहा लक्ष इंच म्हणजे ऐशीं हजार तीनशें तेहेतीस फूट, म्हणजेच १५.८ मैल, म्हणजे सुमारें १६ मैलांस एक इंच असें प्रमाण झालें. जिल्ह्यांचे वगैरे नकाशे ह्याच प्रमाणांत काढलेले असतात, आणि इलाख्याचे किंवा हिंदुस्थान वगैरे देशांचे नकाशे, एक भागिलें चाळीस लक्ष, म्हणजे त्रेसष्ट मैलांस एक इंच ह्या प्रमाणांत काढलेले असतात. सध्या हिंदुस्थानचे जे नकाशे भूपृष्ठाकृतिदर्शक पहाणी व मापणी या खात्यानें (टोपोग्राफिकल सर्व्हे) काढलेले आहेत ते बरोबर मापणी करूनच काढलेले आहेत. त्यांच्या नकाशाच्या पुस्तकांत जे नकाशे काढलेले आहेत ते चार मैलांस एक इंच या प्रमाणांत काढलेले आहेंत. ह्याच्याहिपेक्षां जास्त बारकाईनें, ज्यांत खेडेगांवच्या हद्दी, ओढे, नालें, नद्या, रस्ते, गांवठाणें वगैरे दाखविणारे नकाशे एक इंचास एक मैल ह्या प्रमाणानें काढलेले असतात. व मुंबई, पुणे वगैरे सारख्या शहरांचे व लष्करी हद्दीचें नकाशे मैलास आठ इंच किंवा मैलास सोळा इंच ह्या प्रमाणांत सुद्ध काढलेले असतात. मुद्दा इतकाच कीं, जर बारीक सारीक गोष्टीहि दाखविल्या जाव्यात असें ध्येय असेल तर भूपृष्ठावरील कोणत्याहि वस्तूची कागदावर काढलेल्या आकारावरून खरी कल्पना येण्यास चार हजारांस एक म्हणजे मैलास सोळा इंच एवढें तरी प्रमाण असावयास पाहिजे. आणि म्हणूनच या प्रमाणावर शहरांचें वगैरे नकाशे काढतात. अशा ठिकाणीं देशाच्या नकाशाप्रमाणें चाळीस लक्षांस एक हें प्रमाण अर्थातच उपयोगी पडावयाचें नाहीं. कारण अशा नकाशावर जी दोन गांवें चार मैलांच्या अंतरावर असतील ती सुद्धां १/१४ इंच अंतरावर बारीक बिंदूनें दाखविली जातील. आणि यामुळेंच देशाच्या नकाशांत तालुक्याची ठिकाणें दाखविणें सुद्धा अवघड जातें, मग खेडेंगांवची गोष्टच कशाला ?

वर सांगितलेले नकाशे व छेद इमारतींचे असल्यास ८ फुटांस किंवा १० फुटांस १ इंच किंवा २० फुटास १ इंच ह्या प्रमाणांत (स्केलमध्यें) काढतात. व रस्ते किंवा कालवे ह्यांची १०० फुटांस १ इंच किंवा २०० फुटास १ इंच ह्या प्रमाणांत चित्रितें व पथच्छेद काढलेले असतात. परंतु यांच्या निरनिराळ्या बिंदूंची उंची दाखवितेवेळीं १०  फुटांस १ इंच किंवा २० फुटांस एक इंच या प्रमाणांत पथच्छेदांत व आडव्या छेदांतहि दाखवितात. अशा पथच्छेदांत अंतराचें माप घेतांना एक प्रमाण, तर उंची घेतांना दुसरेंच प्रमाण घ्यावें लागतें. ह्याचें कारण भूपृष्ठाच्या सपाटीमध्यें अंतराच्या मानानें उंचींत तफावत फार थोडी पडते. आणि यामुळें दोन्ही परिमाणें एकाच प्रमाणांत (स्केलांत) काढलीं असतां चढ किंवा उतार एकदम लक्षांत येत नाहीं, परंतु तो चट्कन् ध्यानीं यावा हा तर हेतू असतो. यामुळें उंचीचें प्रमाण अंतराच्या प्रमाणाच्या दसपट किंवा वीसपटहि असतें; ह्यालाच अतिदर्शितप्रमाण (एक्झारेटेड स्केल) असें म्हणतात व असें करण्याच्या नेहमींचाच परिपाठ आहे. यामुळें अंतराचें प्रमाण दोनशें फुटांस एक इंच असलें तरी उंचीचें प्रमाण दहा फुटांस १ इंच एवढेंच असतें.

पाहणी, मापणी व आंखणी.— पाहणी व मापणी झाल्यानंतर किंवा पाणसळीच्या दुर्बिर्णीनें उच्चनीचत्व मापल्यानंतर घरीं आल्यावर घेतलेल्या मापावरून कागदावर याचें जे चित्र वठवितात किंवा नकाशा काढतात त्याला चित्रण म्हणतात. हें चित्रण केल्यानंतर त्यावर बांधकाम किंवा रस्ता वगैरे कशा रीतीनें करावयाचा हें ठरवून त्याप्रमाणें कागदाच्या चित्रितभागावर ती ती कामें कशीं दिसतील त्याच्या नियोजित रेषा दाखवितात. नंतर नियोजित रेषा कागदावर आहेत तशा त्या जमीनीवर आंखतात. व ह्यालाच 'आंखणी' (सेटिंग औट) म्हणतात आणि ह्या आंखणीप्रमाणेंच इमारतीचा पाया अगर रस्त्याची मांडणी अथवा कालव्याचें खोदकाम वगैरे करतात. लांब सरळ रेषा जेव्हां जमिनीवर आंखावयाच्या असतील तेव्हां तें काम कोनमापक दूरदर्शक (विकोडोलाईट) दुर्बिणीचें ऊर्ध्ववलय इच्छित रेषेच्या पातळींत ठेवून तिच्या साहाय्यानें करतात व अशा आंखणीमध्यें फार फार तर १ मैलांत ३ इंचाइतकी चूक असूं शकते आणि तेव्हां अशा सरळ रेषेचीं लांबी थोडी असेल तेव्हां त्या रेषेच्या शेवटच्या खुंटीवर एक फूट पांढरा व एक फूट काळा असा एकाआड एक रंगविलेला सरळ दंड उभा करून नुसत्या दृष्टीनें जमिनीवर रेघ आंखतां येतें. अशा रीतीनें दर शंभर किंवा दोनशें फुटांवर खुंट्या मारून सर्व रेघा आंखतात.

जेव्हां रेल्वेच्या मार्गांत वळणें येतात तेव्हां त्या वळणांची रेघा दुर्बिणीच्या साहाय्यानेंच आंखतात. असें करतांना तें वळण किती व्यासाचें किंवा त्रिज्येचें ठेवावयाचें हें मुक्रर करून त्यावरून त्या वळणावर प्रत्येक शंभर फुटांवरील बिंदु वळणाच्या स्पर्शरेषेस किती कोन करील याचें गणित करून त्यावरून त्या वळणावरील दरएक शंभर फुटांवरील बिंदु जमिनीवर बरोबर आंखतां येतो. किंवा हेंच काम षष्ठीयंत्राच्या साहाय्यानेंहि करतां येतें. कारण वर्तुळपरिघीचा वर्ग हा आहे कीं, त्यावरील प्रत्येक बिंदू त्या वर्तुळाच्या दोन बिंदूंशीं सारखाच कोन करतो व असा जो कोन असतो तो वर्तुळमध्याशीं होणार्या कोनाच्या बरोबर निम्मा असतो.

शंभर फूट वर्तुळखंडाचा त्या वर्तुळाच्या मध्यबिंदूशीं जर एक अंशाचा कोन होत असेल तर अशा वळणाला एक अंशाचें वळण असें म्हणतात. व असें एक अंशांचे वळण म्हणजेच ५७२९ फूट त्रिज्येचें वळण होय. याच हिशोबानें तीन अंशांचे वळण म्हणजे १९०९ फूट त्रिज्येचें वळण होतें. अशीं वळणे नुसत्या सांखळीनें व फितीनेंहि आंखतां येतात. कारण स्पर्शरेषेपासून वळणाचा शंभर फूट अंतरावरील बिंदू स्पर्शरेषेपासून किती अंतरावर आहे; तसेंच दोनशें, तीनशें, चारशें इतक्या फुटांवरील बिंदूंहि कोणकोणत्या अंतरावर असतील हेंहि गणित करून काढतां येतें आणि तितकीं अंतरें जमिनीवर फितीनें मापली असतां वळणावरील शंभर शंभर फूट अंतरावरचें बिंदू सांपडतात.

अशा रीतीनें रेषा आंखल्यानंतर त्या मध्यरेषेचें जमीनीवर कायमचें चिन्ह रहावें यासाठीं सुमारें ६ इंच रुंदीचा चर (निकिंग औट) त्या रेषेंत करतात. परंतु शंभर शंभर फुटांवर मारलेल्या खुंटचा निघून जाऊं नयेत म्हणून तेवढ्यापुरती खुंटीच्या आसपासची जागा मात्र खोदीत नाहींत. व अशा रीतीनें जितक्या मैल लांबीचा रस्ता असेल तेथपर्यंत एकसारखा जर खणून जमीनीवरील मध्यरेषेची आंखणी पुरी करतात. काम सुरू करावयास बराच अवधि असेल आणि मध्यरेषेच्या खुंट्या निघून जाण्याचा संभव असेल तेव्हा मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंस सारख्या अंतरावर मोठमोठ्या मेखा मारून ठेवतात. त्या इतक्या अंतरावर कीं, रस्त्याचें काम पुरें होईतोंपर्यंत देखील त्यांनां छेडण्याची जरूर पडूं नये. अशा खुणा जेथून वळण सुरू होतें व जेथें तें संपतें त्या दोन्ही ठिकाणींहि ठेवाव्या लागतात. जेव्हां उछ्रयदर्शक प्रमाणचिन्ह (बेंच मार्क) म्हणून मोठाल्या मेखा माराव्या लागतात तेव्हां त्या ३ पासून ४ फूट लांब आणि चार इंच समचौरस अशा असतात आणि त्यांनां माथ्यावर लोखंडाची विडी बसविलेली असते हेतू असा कीं त्या मेखा जोरानें ठोकून बसवितांना त्यांच्या चिरफळ्या होऊं नयेत. अशा मेखेच्या माथ्यावर खिळा ठोकून व तो मेखेंत जिरवून त्या खिळ्याचा वरील भाग तेंच प्रमाणचिन्ह समजून त्यावर अंकित दंड ठेवतात व पाणसळीच्या दुर्बिणीनें त्याचा उछ्रय मोजतात. अशा प्रमाणचिन्हरूपी मेखा पुलाची किंवा इतर बांधकामें व्हावयाचीं असतील त्या ठिकाणीं आवश्य ठेवाव्या लागतात. तसेंच रेल्वेच्या कामांत ज्या ठिकाणीं रेल्वे लाईनीचा चढ किंवा उतार बदलतो अशा ठिकाणीं मेखा ठेवतात.

काम करावयाच्या वेळीं ह्या मध्यरेषेपासून रस्त्याच्या माथ्याची रुंदी उभ्या काठ्या रोंवून व दोन बाजूंचें ढाळ दोर्या बांधून किती फूट अंतरावर जाऊन जमिनीला मिळतील ते बिंदू खुंट्या मारून दाखवितात व त्या खुंट्यांना ढाळ दाखविणारी दोरी बांधतात व ह्याप्रमाणें भराव करून घेतात व असा भराव करतांना रस्त्याचा माथा, जितक्या उछ्रयाचा करावयाचा असेल तेथपर्यंत भरावाची जितके फूट उंची असेल तितके इंच किंवा त्यांच्या दुप्पट इंच वर ठेवतात. हेतु कीं पाऊस पडून भराव खालीं बसला असतांहि इच्छित उछ्रयाच्या खालीं त्याचा माथा जाऊ नये, तसेंच मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंनां जमिनीच्या जितक्या रुंदीच्या पट्ट्या घ्यावयाच्या असतील त्यांच्यावर मेखा मारून खुणा करतात व दगडी खुंट बसवितात.

जेव्हां खोदाई करावयाची असेल तेव्हां जितक्या रुंदीचें खोदकाम व्हावयाचें त्याच्या पलीकडे मेखा मारून त्यांच्या माथ्यापासून किती फूट खोलीवर रस्त्याचा तळ असावयास पाहिजे त्याप्रमाणें पाणसळीच्या दुर्बिणीच्या साहाय्यानें जमिनीत घळ काढून इच्छित रुंदींचें व इच्छित ढाळ असलेलें खोदकाम करतां येतें. बोगदे खोदतांना बोगद्याची मध्यरेषा जमिनीवर आंखून त्या मध्यरेषेवरील इच्छित बिंदूंपाशीं बोगद्याचा तळ जितके फूट खोल करणें असेल तितक्या फुटांपर्यंत खोल उभे घळ पाडतात. आणि नंतर बोगद्याच्या, दोन्ही तोंडाकडून मध्यरेषेच्या दिशेनें खोदाई करतात.

इमारतीचेनकाशे व अंदाजपत्रकें.

कोणतीहि इमारत बांधतांना प्रथम तिचे नकाशे करतात. व ते वेगवेगळ्या मजल्यावर उभ्या व आडव्या भिंती, दरवाजे, खिडक्या वगैरे किती किती जाडीच्या व काय काय मापाच्या करावयाच्या हें दाखविण्यासाठीं वेगवेगळ्या मजल्यांचे वेगळे नकाशे करावे लागतात. खेरीज दरवाजे, खिडक्या व जाळ्या वगैरेंची उंची व मांडणी कशा तर्हेची करावयाची; त्याचप्रमाणें तुळ्या, कड्या व तक्तपोशी वगैरे दरएक मजल्याची काय मापाची, कसकशी करावयाची व छपराच्या कैच्या, आढें, पाखाड्या वगैरे काय मापाचीं करावयाचीं, किती उंचीवर बसवावयाचीं वगैरे दाखविण्यासाठी इमारतीचे उभे व आडवे छेद दाखवावें लागतात. खेरीज इमारत समोरून पाहिली असतां कशी दिसेल बाजूनें आणि मागें उभे राहिले असतां कशी दिसेल, कंगण्या, मुंढेर्या, खांब, कमानी व त्यांनी बसवावयाचे कठडे व पानपट्टया वगैरे भाग दर्शनी कसे दिसतील याचा उभा देखावा (एलेव्हेशन) हीहि द्यावी लागतात. हे सर्व तिन्ही प्रकारचे नकाशे अशा प्रमाणांत किंवा स्केलावर काढावे कीं, ज्यांत भिंतीची जाडी, दरवाजे, खिडक्यांची मापें व तुळवंटे, कड्या, पाटणी, कैच्या पाखाड्या वगैरेचीं मापें स्पष्टपणें दाखवितां येतील व इमातीच्या वेगवेगळ्या भागांची रचनाहि, उभे देखावे, छेद व वेगवेगळ्या मजल्यांचे नकाशे पाहिल्याबरोबर कशा रीतीची आहे याचीहि वास्तविक कल्पना व्हावी. अशा नकाशांचे माप प्रत्यक्ष लांबी, रुंदी किंवा उंची यांच्या सुमारें १/१०४ इतकी म्हणजे ८ फुटांस १ इंच या प्रमाणांत साधारण रीतीनें दाखवितात. कांही कांही विवक्षित भागांचे ज्यांत बारीक रचना दाखवावयाची असेल अशा ठिकाणीं ४ फुटास १ इंच याप्रमाणें नकाशे तयार करतात. जाळ्या, महिरपी, कमानी, मुंढेर्या वगैरेंचे आकार त्यांतील खांचाखोंचा व ती प्रत्यक्ष तयार करावयाच्या वेळीं लागणारी सर्व मापें दाखविण्यासाठीं दर फुटास अर्धा इंच या प्रमाणाचे नकाशे साधारणतः काढतात. व जेथें दगड घडणारे पाथरवट व नकाशीचे लांकूडकाम करणारे सुतार असतात त्यांनां फर्मे कापून त्यावरहुकूम काम करण्यास लागणारे पूर्ण आकाराचेहि नकशीच्या कामाचे नकाशे तयार करतात असे सर्व मापें दाखविणारे नकाशे तयार असले व प्रत्येक प्रकारचें काम कोणकोणत्या जातीचें व कसकसें करावयाचें याचीं सविस्तर खुलासेवार टांचणें लिहिलेलीं असलीं म्हणजे तशा कामास लागणार्या खर्चाचा अंदाज (एस्टिमेट) करतां येतो. खुलासेवार टांचणांत कोणकोणत्या प्रकारचा मालमसाला वापरावयाचा व काम कशा रीतीनें करावयाचें हें दाखवावें लागतें. उदाहरणार्थ, पायांत किंवा जोत्यांत किंवा भिंतीत कोणत्या प्रकारच्या विटांचे किंवा दगडांचें बांधकाम करावयाचें, चुन्यांत रेती कशा प्रकारची व किती घालावयाची, अस्तरगारी करावयाची असल्यास कोणत्या प्रकारची कोणत्या ठिकाणीं करावयाची, जमीनी किंवा फरशा कोणत्या जातीच्या व पाटणी वगैरे कोणच्या प्रकारची व काय मापाची, बहालें, कड्या, फळ्या, व त्यांवरील जमीनी फरशीच्या किंवा चुनेगच्चीच्या करावयाच्या, त्याचप्रमाणें पाटणी किंवा छत कोणत्या जातीचें व छप्पर काय मापाच्या कैच्यांचें व त्यावर कोणत्या प्रकारच्या पाखाडी, वासे, रिपा, कौलें किंवा पत्रे वगैरे घालवयाचे, त्याचप्रमाणें दरवाजे व खिडक्या कोणत्या जातीच्या, चौकटीचीं लांकडें काय मापाचीं व झडपा कोणत्या जातीच्या व किती जाडीच्या व त्या बसवितांना लोखंडी किंवा पितळी सामान वापरावयाचें, या सर्व गोष्टींचा खुलासा करावा लागतो. अंदाजपत्रकें करतांना प्रत्येक जातीचें काम नकाशावरून व तपशीलपत्रकांवरून किती होईल हें काढावें लागतें. उदाहरणार्थ, पाया भरावयाचें काम किती घनफूट आहे हें काढण्यासाठी प्रत्येक भिंतीच्या पायाची लांबी किती, रुंदी किती व उंची किती हें एकाखालीं एक क्रमवार लिहून एकंदर सर्व भिंतीचें, पडद्यांचे, जिन्यांचे, पायर्यांचें वगैरे मिळून पायांचे काम किती घनफूट झालें हें काढतात अशा रीतीनें पायांतील बांधकामाला किती रूपये लागतील हें काढतां येतें. अशाच रीतीनें, जोतें, भिंती वगैरेंचें काम किती घनफूट होईल हें काढतात, तसेंच तुळवंटें, कड्या, खांब, लगी, कैच्या, पाखाड्या, आढें वगैरे कामांत किती घनफूट लांकूड जाईल हें काढून दर घनफुटास ५ किंवा ६ रुपये किंवा लांकूडकामाचा त्यावेळीं जसा भाव असेल त्याप्रमाणें इतक्या लांकूडकामाला काय खर्च येईल, गलथे कंगव्या, जोतें, पानपट्टी वगैरे जेथें जास्ती मेहनतीचें किंवा कलाकुसरीचें काम असेल तेथें दर १०० फूट लांबीस अमूक रुपये असा कामाचा मगदूर पाहून त्याप्रमाणें भाव घालतात. तसेंच जमीनीची फरशी किंवा भिंतींची अस्तरगारी किंवा कौलारू वगैरेचें क्षेत्रफळ काढून दर १०० फुटास इतके रुपये खर्च लागेल हें पाहून प्रत्येक प्रकारच्या कामाला किती रुपये लागतील याचा अंदाज करतात. हें अंदाजपत्रक करतांना पायापासून आरंभ करून नंतर जोते, मग पहिला मजला, त्यानंतर दुसरा मजला अशा रीतीनें छपरापर्यंत करावी लागणारीं सर्व कामें ओळीनें घेतात. म्हणजे कांहीं कामें अथवा मापें विसरून राहण्याचा संभव कमी राहतो. कैच्यांनां लागणारें लोखंडी सामान पट्ट्या, बोल्ट वगैरे किती मण लागेल याचा अंदाज वेगळा करतात, त्याचप्रमाणें मोठ्या गाळ्यांची पहाळें किंवा कैच्या याहि उचलून जागच्याजागी बसवावयास खर्च बराच येतो, म्हणून अशा अधिक होणार्या खर्चाची वेगळी तरतूद केली पाहिजे. अशा रीतीची पूर्ण माहिती मिळवून अंदाजपत्रकें तयार केली म्हणजें कोणत्याहि कामाला शेंकडा १०/५ रुपयांच्या फरकानें साधारण खर्च किती लागेल हें आगाऊ समजतें. अशी अंदाजपत्रकें केली म्हणजे कोणकोणत्या प्रकारचें किती किती सामान लागेल हें काढून त्याप्रमाणें सामान तयार ठेवलें म्हणजें कामावरील माणसांची खोटी होत नाहीं. तसेंच अमक्या प्रकारचें घनफूट काम करावयास इतके गंवडी किंवा सुतार, इतके गडी, इतक्या बाया किंवा मुलें, लागतात हें अनुभवानें ठरलें आले; त्याप्रमाणें तितकी माणसें ठेविलीं असतां तितकें काम झालें कीं नाहीं हें मात्र रोजच्यारोज पाहिलें पाहिजे. तसेंच अमक्या प्रकारच्या दरवाज्यांच्या झडपा करावयास इतका वेळ लागतो हें अनुभवानें ठरलें आहे. त्याप्रमाणें तितक्या वेळांत काम झालें कीं नाहीं हें पाहिलें पाहिजे. अशाच प्रकारची सर्व कामें कामगार लोक रोजच्यारोज करतात कीं नाहीं हें रोज पहात राहिलें पाहिजे. व असें पहात राहिलें म्हणजे अंदाजपत्रकांत धरलेल्या किंमतींत बहुतकरून काम होतें. बरोबर देखरेख नसली तर अंदाजापेक्षां खर्च किती जास्ती होईल. याचा नेम नाहीं.

वर सांगितलेल्या इमारतीचीं मापें दाखविणार्या नकाशाखेरीज ज्या ठिकाणीं ती इमारत बांधावयाची असेल त्याचाहि स्थलनिर्देशक नकाशा (साईट फार्म) केला पाहिजे. व त्यावर ती इमारत कोणीकडे तोंड करून, कशी बांधावयाची हें दाखविलें पाहिजे. या नकाशावर उत्तर दिशा कोणीकडे आहे त्या दिशेची रेषा व साधारण रीतीनें नेहमीं वारा कोणीकडून येतो, निदान पावसाची झड तरी कोणीकडून लागते ती दिशा दाखविली पाहिजे. म्हणजे इमारतींत कोणत्या बाजूनें कसें ऊन येईल व ऊन येणार्या खिडक्यांनां झापें वगैरे करावयास लागतील कीं काय व पावसाची झड ज्या बाजूकडून लागते त्या बाजूला पडव्या आहेत की नाहीं हें पाहतां येतें. तसेंच जमीनीला ढाळ कोणत्या बाजूला आहे व पावसानें पाणी कोणत्या बाजूला कोणीकडून जातें हें दाखविणारें उछ्रय (लेव्हलस्) मांडले पाहिजेत. त्याचप्रमाणें इमारतीच्या आजूबाजूला रस्ते कसे आहेत व त्यावरून इमारतीच्या कंपाउंडांत (आवारांत) येण्यासाठीं झापा कोणत्या ठिकाणीं ठेवतां येतील, तसेंच जवळपास विहीर वगैरे आहे कीं नाही व आसपास इमारती आहेत कीं नाहींत, असल्यास कोठें कशा प्रकारच्या आहेत व आवाराच्या भोंवतीं भिंती वगैरे घालाव्या लागतील कीं काय हें दाखविलें पाहिजे.

कोणतीहि इमारत बांधतांना ती कोणत्या ठिकाणीं व कशी बांधावयाची हें पहिल्यानें ठरवावें लागतें. ज्या ठिकाणीं कोणतीहि इमारत बांधावयाची त्या ठिकाणीं पाया चांगला व फार खोल न जातां लागतो कीं नाहीं हें पहावें लागतें. नाहींतरी पाया भरून काढण्यांतच फार खर्च होतो. इमारत बांधावयाची जागा उंच असून तेथून सर्व बाजूंकडे ढाळ असावा, निदान इमारतीच्या आसपास पाणी सांठून न राहील अशी तरी ती जागा असली पाहिजे. खेरीज इमारतीची व धणीहि तिच्या भोंवतालच्या इमारतींच्या बांधणीशीं साधारण रीतीनें जमेल अशी असावी. माणसें राहण्याच्या उपयोगासाठीं इमारत बांधावयाची असेल व कोणत्या बाजूला इमारतीचें तोंड केलें असतां जास्ती वारा व उजेड मिळेल हें पाहून योग्य ती मांडणी करावी लागते. खेरीज प्यावयाचें पाणी जवळच मिळतें कीं नाहीं हेंहि पाहिले पाहिजे. कोणतीहि इमारत पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बांधली असतां सकाळी व संध्याकाळीं तिचा पुढचा मागचा भाग आंत ऊन आल्याकारणानें तापतो. परंतु पश्चिमेकडून वारा येत असल्यास उन्हाचा त्रास बराच कमी होतो. दक्षिणेस किंवा उत्तरेस तोंड करून इमारत बांधली असतां ती उन्हानें तापत नाहीं व दक्षिणेकडून वारा येत असल्यास ती हवाशीरहि होते. आपल्या इकडे वारा, पाऊस साधारणरीतीनें दक्षिण व पश्चिम दिशांकडून येत असल्यामुळें या दोन बाजूंला पडव्या कराव्या लागतात. तशा पडव्या केल्या म्हणजे उन्हाचा व पावसाचा त्रास होत नाहीं.

ज्या ठिकाणीं जागा विपुल असते त्या ठिकाणीं एकमजली इमारत सोयीची व स्वस्त पडते. परंतु मोठ्या शहरांत थोडक्या जागेंत निर्वाह करावा लागत असल्याकारणानें दोन किंवा जास्त मजल्यांच्या इमारती बांधाव्या लागतात. खेरीज ज्या ठिकाणची हवा दमट असते अशा ठिकाणी वरच्या मजल्यावरच निजणें-बसणें असलें म्हणजे जास्ती हितावह होतें. कारण खालच्या मजल्यांतील हवा सर्द व शहरांतील घाण मुरलेल्या जमीनींतून निघणारी हवा दूषित असते. व भूपृष्ठभागापासून जसजसें जास्ती उंच जावें तसतशी हवेची शुद्धता जास्ती वाढत जाते. मजल्यांची इमारत बांधावयाची असली म्हणजे सर्व मजल्यांचा येणारा जास्ती भार सहन करावयाइतका मजबूत पाया मिळतो कीं नाहीं हें पाहिले पाहिजे व भिंतींचें बांधकामहि पक्के मजबूत व जितके मजले जास्ती असतील तितक्या जास्ती जाडीच्या भिंतीत तळ मजल्याला, त्याच्यापेक्षां कमी जाडीच्या वरच्या मजल्याला, थोडा गाळा म्हणजे १०/१२ फुटांचा असल्यास १ फुटापासून १। फूट जाडीच्या अगदीं वरच्या मजल्याला भिंती कराव्या लागतात. तोंच गाळा जर २० फूट असेल तर अगदीं वरच्या मजल्याची जाडी निदान १॥ फूट तरी ठेविली पाहिजे. इमारतीला मजले असले म्हणजे खालच्या मजल्यांतून पाटणीपर्यंत सारख्या जाडीच्या भिंती येतात. व अशा भिंतींतून पाटणीजवळ हवा खेळण्यासाठीं जाळ्या किंवा गवाक्षें ठेविली पाहिजेत. खेरीज माडीवर जाण्याचें जिनेहि चढावयास सोईचें असले पाहिजेत. इमारत मोठी असल्यास वेगवेगळ्या भागांतून दोन किंवा जास्त जिने ठेवावेंत व अशा जिन्यांपैकी निदान एक जिना तरी दगडाचा किंवा लोखंडाचा म्हणजे अदाह्य असला पाहिजे व अशा जिन्याला इमारतीच्या कोणत्याहि भागांतून जावयाची सोय असली पाहिजे.

दिवसा दारें व खिडक्या उघड्या ठेविल्या म्हणजे मनुष्यांच्या श्वासोच्छ्वासानें दूषित झालेली हवा सहज बाहेर निघून जाते व स्वच्छ हवा आंत येते. पण रात्रीच्या वेळीं जेव्हां दारे व खिडक्या लाविलेल्या असतात त्यावेळीं निजावयाच्या जागीं शुद्ध हवा यावी व श्वासोच्छ्वासानें तप्त व दूषित झालेली हवा बाहेर निघून जावी म्हणून जमीनीपासून ५/६ फूट उंचीवर स्वच्छ हवा येण्यासाठी जाळ्या ठेवाव्या व दूषित हवा निघून जाण्यासाठी पाटणीच्या जितक्या होईल तितक्या जवळ दुसर्या जाळ्या ठेवाव्या. जेथें पाटणी नसेल व नुसतें कौलारूच असेल त्या ठिकाणी दूषित हवा निघून जाण्यासाठीं जाळ्या ठेवण्याची जरूर नाहीं. कारण वरच्या कौलाच्या फटींतून अशी हवा निघून जातें.

इमारतीच्या बांधकामास लागणारें सामान.— यांत प्रथमतः पाया भरून काढण्यासाठीं कराव्या लागणार्या कांक्रीटला कोणत्याहि कठिण दगडाची फोडून तयार केलेली खडी लागते. जेथे खडी मिळत नाही तेथे पक्क्या भाजलेल्या विटांच्या रोड्यांच्या खडीएवढ्या फोडून केलेल्या तुकड्यांचे कांक्रीट बनवितात. हें कांक्रीट बनवितांना एक भाग चुना, दोन भाग रेतीमध्यें मिळवून मळून तयार करून जशा मळलेल्या चुन्याच्या दुपटीपासून तिपटीपर्यंत खडीच्या किंवा फोडलेल्या रोड्यांच्या ढिगावर पाणी शिंपून, व तें सर्व मिश्रण कालवून व खोर्यानें खापून त्या सर्व मिश्रणाचा चांगला एकजीव झाला म्हणजे पायामध्यें सहा इंच पासून नऊ इंच पर्यंत जाडीचा थर टाकून धुमसानें ठोकतात. व असे कांक्रिट दोन पासून चार फूट जाडीचें तयार झालें म्हणजे त्यावर पायाचें बांधकाम व त्यावर जोतें व नंतर त्यावर भिंती बांधतात. हें बांधकाम जेथें दगड मिळत असतील तेथें दगडाचें व जेथें दगड मिळत नसतील तेथें विटांचें करतात.

देवळें, मशिदी, राजवाडे वगैरे महत्त्वाच्या इमारतीना बाहेरील म्हणजे निदान दर्शनी भागावरील अतिशय कठिण, हवेनें किंवा पावसानें न झरणारा असा दगडच वापरतात. असल्या कामासाठीं लांब पल्ल्यावरून दगड आणवितात. अशा रीतीनें जयपूर येथील संगमरवरी दगड इमारतीसाठी व मूर्तीसाठी दूर दूर अंतरावर नेतात. तसेंच इटलीसारख्या परद्वीपाहून सुद्धां पुतळे घडावयाजोगे संगमरवरी दगड किंवा सफेत, अथवा काळी अशी संगमरवरील आगबोटींतून आणवितात. महाराष्ट्रांत सांपडणारा काराचा दगड पुष्कळ देवळांतून वापरलेला आहे. वांई, कोल्हापूर वगैरे ठिकाणी आरशासारखें प्रतिबिंब त्यांत दिसेल इतके घोटून गुळगुळीत केलेले खांब वगैरे आढळतात; दक्षिण हिंदुस्थानांतल्या देवळांतून २५।३० फूट लांबीची बहालें, खांब वगैरे, वज्रतुंड किंवा ग्रानाईट ह्या जातीचे दगड वापरलेले आहेत. उत्तरहिंदुस्थानांत आग्रा, दिल्ली वगैरे ठिकाणीं तांबडे सैकतप्रस्तर (सँड स्टोन) व अहमदाबाद वगैरे ठिकाणीं १००।१०० मैलांवरून आणलेलें पांढरे सैकतप्रस्तर (सँड स्टोन = वाळूचे दगड) वापरलेले आहेत. अशा दगडांच्या इमारती ३००।४०० वर्षांपूर्वी बांधलेल्या अजून अभंग आहेत.

घटकद्रव्यानुरोधानें दगडांचे तीन प्रकार मानतात; प्रकार पहिला:— वालुकामय (सिलिशियस); यांत वेगवेगळ्या प्रकारचे, तांबडे, पांढरे, व इतर रंगांचे, पाण्यांत थर बनून नंतर दाब व उष्णता यांच्या योगानें काठिण्य प्राप्त झालेले असे सैकतप्रस्तर (सँड स्टोन) व महाराष्ट्रांत सांपडणारा अग्न्युत्पन्न इग्निअस काळा दगड (ट्र्यापरॉक) व दक्षिण हिंदुस्थानांत सांपडणारा अग्न्युत्पन्न वज्रातुंड (ग्रानाईट) दगड हे भूगर्भांतून ज्वालामुखी पर्वताच्या मुखांतून द्रवरूपानें बाहेर येऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरून थंड झाल्यानंतर कठिण झालेले दगड होत. गारगोटी ज्या सिलिका नांवाच्या द्रव्याची बनलेली असतें तें द्रव्य ह्या सर्व दगडांचें मुख्य घटक असतें. प्रकार दुसरा:-मृण्मय (आर्जिलेशस); लिहावयाच्या पाट्यांच्या जातीचे मातीचे बनलेले पातळ थराचे दगड पाण्यांत माती स्थित होऊन तिचे थरावर थर बनतात, नंतर उष्णता, दाब यांच्या योगानें त्यांचा कठिण दगड बनतो. त्याला नेहमीं पापुद्रे असतात. अशा दगडाचें मुख्य घटकद्रव्य चिकणमाती हें असतें. प्रकार तिसरा - चूर्णोपल (लाईम स्टोन); हेहि पाण्यांत भोंवतालच्या प्रदेशांतून विरून आलेल्या चुन्याचें व तलावांत किंवा समुद्रांत बनलेल्या थराचे असतात व असे एकावर एक थर बसल्यावर त्यांच्यावर येऊन बसलेल्या गाळाचा दाब किंवा भार आणि जमिनींतील उष्णता ह्यांचें कार्य झालें म्हणजे चुनखडीचा दगड बनतो. असे चुनखडीचे दगड पोरबंदर वगैरे ठिकाणीं पुष्कळ सांपडतात व आपल्या इकडे चुनखडी म्हणून ज्याला म्हणतात व गुजराथींत कंकर व संस्कृतमध्ये कर्कर असें म्हणतात (पाकविलेल्या काजूसारखे किंवा साखरफुटाण्याच्या आकाराचें) अशा खड्यांचे असतात. यांचें मुख्य घटकद्रव्य (चूर्ण) चुना हें असतें. मॅग्नेशिया व चुना यांचे बनलेले दगड शहाबाद येथें सांपडतात, त्यास शहाबादी दगड म्हणतात.

साधारण इमारतींनां, फारशी मेहनत न पडतां जो दगड सहज घडून वापरतां येईल असा दगड वापरतात. परंतु महत्त्वाच्या इमारतींना चांगल्यांत चांगला दगड शोधून काढावा लागतो. चांगल्यांत चांगला म्हणजे ज्या कामाला तो दगड लावावयाचा असेल त्या कामाला उपयुक्त असा तो असावा लागतो. उदाहरणार्थ, समुद्रांत बांधावयाचें दीपगृह किंवा समुद्रकांठचा धक्का यांना समुद्राच्या तुफानाच्या वेळचे लाटांचे तडाखे सोसावयाजोगे म्हणजे वज्रतुंडा (ग्रानेट) सारखें काठिण्य ज्या दगडांत आहे असे दगड अशा कामाला योग्य होत. परंतु ज्या ठिकाणीं बारीक नकशीचें, कलाकुसरीचें काम करावयाचें आहे अशा कामाला फार कठिणपणा किंवा आघात सोसण्याची शक्ति असण्याची जरुर नाहीं. परंतु साधारण कठिणपणा; व बारीक दाण्याचा व हवा, पाऊस, वारा, ऊन यांनीं न झरणारा, दगड असावा लागतो. म्हणजेच त्यावर बारीक नकशी करतां येते. म्हणून बंदराच्या धक्क्यांना काराचा दगड किंवा ग्रानाईट वापरतात. व नकशीच्या कामाला पोरबंदरी दगड किंवा अगदीं बारीक कणाचे बनलेले सैकतप्रस्तर (सँड स्टोन) वापरतात. अशा महत्त्वाच्या कामीं दगडांनां मजबुती असावी लागते व ते पावसानें किंवा उन्हानें झरून न जाणारे असावे, ते घडावयासहि फारसे त्रासदायक असतां उपयोगाचें नाहींत. जे दगड हवेनें किंवा वर्षातपानें झरून जाणारे नसतात ते पाहिजे तितके मजबूत असतातच. म्हणून वर्षातपसहिष्णुता हाच गुण मुख्यतः दगडांत पाहिजे असतो. सिकतोपल (सिलिशियस) या जातींत सगळ्यांत कठिण दगड म्हणजे ग्रॅनाईट किंवा वज्रातुंड हा होय. हा मद्रास इलाख्यांत व उत्तर हिंदुस्थानातहि कांही कांही ठिकाणीं सापडतो. बुद्धगयेंतील देवळे याच दगडांची बांधलेलीं आहेत.

हा दगड फार कठिण व घडावयास जाचक असल्यामुळें मोठमोठाले पूल किंवा समुद्रकांठचे धक्के, अथवा दीपगृहें बांधण्याकडे याचा उपयोग करतात. वज्रातुंडाच्या घटकांचाच बनलेला पण थरावर थर असलेला जंजूर (नीस) हा मद्रास इलाख्यांत व अबूच्या पहाडांतहि पुष्कळ सांपडतो. पिवळ्या व काळ्या अभ्रकाचे दगड राजपुतान्यांत सांपडतात व त्यांचा तिकडे बांधकामाकडे उपयोग करतात.

सिकतोपलपैकीच महाराष्ट्रांत सर्व ठिकाणी सांपडणारा काळा दगड व कार हे आहेत. ह्या दगडांचीं, बारीक मोठी व काम करून व घोटून झिलई आणून कोल्हापूर, सांगली, वाई, या ठिकाणीं देवळें बांधलेलीं आहेत. हा दगड फार मजबूत व टिकाऊ असल्यामुळें मोठाले पूल, धरणें, धक्के वगैरे बांधण्याकडे त्याचा उपयोग केलेला आहे. साध्या इमारतीसाठीं तर तो पुष्कळच वापरतात. ह्याची फरशी फारच टिकाऊ होते. याच दगडांची खडी करून ती रस्त्यांवर घातली म्हणजे रस्ते मजबूत व टिकाऊ होतात.

स्फटिकाचे (क्वार्टझ्) किंवा गारगोटीचे दगड कांहीं कांही ठिकाणीं मिळतात. त्यांचा उपयोग चूर्णसंकर (लाईम कांक्रीट) करण्याकडे करतात. सिकतोपलाचा आणखी एक प्रकार म्हणजे काठेवाडांत (घ्रांगध्रा) व महिकांठा (हिमतनगर) येथें सांपडणारे, पांढर्या वाळूचे थरावर थर बनून झालेले दगड हे होत. हे दगड चांगले मजबूत व टिकाऊ असतात व अहमदाबादच्या मशिदी व इमारती व दगडाच्या बांधलेल्या आहेत. हे दगड बारीक बारीक स्फटिकांचे (क्रिस्टल) बनले असल्याकारणानें फार मजबूत असतात. त्यांचा सर्व प्रकारच्या बांधकामाकडे, फरशी करण्याकडे, फोडून खडी करून रस्त्यावर उपयोग करतात. अशा दगडाचें कोणतेंहि बांधकाम करतांना त्यांचे थर उभे न येतील अशा रीतीनें ते बसवावे लागतात. कर्नाटकांत कांही ठिकाणीं मृण्मय दगड सांपडतात. हे बहुतकरून नीळसर काळ्या रंगाचे असतात, त्यांच्या फरशा बनवितां येतात व पातळ कापले असतां लिहावयाच्या स्लेट पाट्या बनवितात. ह्यांचा उपयोग कधीं कधीं छपरावर कौलांच्या ऐवजी घालण्याकडेहि करतात.

तिस-या प्रकारचे दगड म्हणजे चूर्णोपल हे होत. ह्या जातीच्या कोणत्याहि दगडावर कोणत्याहि प्रकारचा सौम्य अम्लद्रव टाकला असतां सुरसुर आवाज होऊन फेंस येतो. हा फेस म्हणजे त्या दगडांत असलेल्या कर्बाम्लाचेच बुडबुडे होत. कोणत्याहि अम्लाच्या योगानें या दगडावर परिणाम होतो. तशाच प्रकारचा परिणाम हे दगड भाजले असतांहि होतो; म्हणजे उष्णतेच्या योगानें त्यांतील कर्बाम्ल सर्व निघून जातें व त्याला कळीच्या चुन्याचें रूप येतें. अशा प्रकारच्या दगडांतला अतिशय किंमतवान दगड म्हटला म्हणजे संगमरवरी दगड होय. हा दगड पांढरा, काळा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा व पट्टे किंवा चित्रविचित्र रंगांचा असा सांपडतो. ह्यापैकीं अगदीं शुभ्र असा दगड असेल त्याच्या मूर्ती, पुतळे वगैरे बनवितात. व बारीक नकशीदार काम, कठडे, फरशा वगैरेहि करतात. संगमरवरी दगड फार कठिण असल्यामुळें व त्यांतील कण फार सूक्ष्म असल्याकारणानें त्यावर उत्तम प्रकारची झिलई चढते. व तो रंगीबेरंगी मिळत असल्यानें त्याचे झिलईदार खांब बनवितां येतात. व तशाच प्रकारची सफाईदार फरशीहि बनवितां येते. संगमरवरी दगडाचा चुरा भाजला म्हणजे त्याचा शुद्ध कळीचुना तयार होतो. संगमरवरी दगडांपेक्षां कमी कठिण असे चूर्णोण्लहि कांहीं कांही ठिकाणी मिळतात व त्यांचा साध्या इमारतींत पुष्कळ उपयोग होतो. हा दगड सिंध-हैद्राबाद वगैरेकडे पुष्कळ सांपडतो. याच्यापेक्षाहि मऊ जातीचा चूर्णोपल असतो. आपल्या इकडे त्याला पोरबंदरी दगड म्हणतात. हा दगड चुनखडीच्या अण्डाकृति रव्यांचा बनलेला असतो व हाही भाजला असतां त्याचा कळीचुना तयार होतो. हे दगड फार मऊ असल्याकारणानें करवतीनें कापतां येतात व मुंबईंतील बहुतेक मोठ्या इमारतींनां ज्या ज्या ठिकाणी नकशीचें काम केलें आहे त्या त्या ठिकाणीं हाच दगड वापरलेला आहे. याच्या इतका मऊ व ज्यांत बारीक नकशीदार काम करतां येईल असा दुसरा दगड नाहीं म्हणून पोरबंदरहून (५००।६०० मैलांवरून) हा दगड जहाजांतून आपल्याकडे आणतात.

मॅग्नेशिया व चुना यांचा मिळून झालेला दगड आपल्या इकडे शहाबादी या नांवानें ओळखला जातो. हा दगड भाजला असतां मॅग्नेशियायुक्त कळीचुना बनतो. परंतु मॅग्नेशियाच्या योगानें हा चुना कममजबूत होतो. हा दगड पाण्यांत बनलेला असतो व याच्या लाद्या किंवा फरशा एक इंच जाडीच्याहि मिळूं शकतात. ह्याचे कधीं कधीं बारा इंच जाडीचेहि थर सांपडतात. हा पापुद्र्यांचा किंवा थरांचा बनलेला असल्यामुळें एकपासून सहा इंचपर्यंत वाटेल त्या जाडीचे दगड काढातां येतात. प्रत्येक थराचा तळ व माथा दोन्ही सपाट व गुळगुळीत असतात. हा बराच कठिण पण कांचेसारखा ठिसूळ दगड असतो. हा फरशांच्या कामाला फार सोईचा असल्यामुळें रेल्वेंतून ५०० मैलपर्यंत सुद्धां नेतात.

साधारण जातीचे सिकतोपल व चूर्णोपल यांचे वजन दर घनफुटाला १४० पासून १६० पौंडांपर्यंत असतें व कारीच्या दगडाचे वजन १८० पौंड असते. ग्वाल्हेरकडे एक प्रकारचे सिकतोपल मिळतात. त्यांचीं मोठमोठीं बहालें, इमारतीसाठीं वापरतात. ह्या बहालांची लांबी १५ फूट, रुंदी ९ इंच व जाडी २४ इंचांपर्यंत असते व अशा बहाल्यावर १२ फूट लांबीच्या १८ इंच रुंदीच्या व सहा इंच जाडीच्या फरशा पसरून गच्ची तयार करतात. दक्षिणेस त्रिचनापल्लीकडे जंबूर जातीचे दगड सांपडतात व मद्रासकडे वज्रातुंड (ग्रानेट) सांपडतात.

दुसरेही सिकतोपल व चूर्णोपल तिकडे सांपडतात. व अशा दगडांची तिकडे मोठमोठीं प्रसिद्ध देवळें बांधलेली आहेत. तिकडेहि अशा दगडांची बहालें २०।२० फूट लांबीची, व त्यावर फरशा १०।१२ फूट लांबीच्या व दीड पासून दोन फूट रुंदीच्या, सहा इंज जाडीच्या तिकडे वापरलेल्या आहेत. आग्रा व भरतपूर इकडे तांबड्या रंगाचे सिकतोपल सांपडतात. व ते बारीक कणांचे व फार कठिण नसल्याकारणानें तिकडे ते इमारतीच्या कामाला फार वापरलेले आहेत. महाराष्ट्रांत काळे काराचे दगड सर्व ठिकाणी सांपडतात. मुंबईच्या दीपगृहाला ह्या जातीचे दगड- एक एक दगडाचे वजन ३ टन असे मोठमोठे दगड -वापरलेले आहेत. हे दगड वेगवेगळ्या रंगांचेहि मिळतात. मुंबईत कुर्ल्याजवळ पिंवळ्या रंगांचे व कांहीं ठिकाणीं हिरवट काळे व कांहीं ठिकाणीं निळसर काळे सांपडतात. हे दगड फार कठिण असतात. यामुळें त्यामध्यें पाणी फारच थोडें जिरतें. यांचें विशिष्टगुरुत्व सुमारें ३ असतें, म्हणजे दर घनफुटाचें वजन १८१ पासून १८५ पौंडपर्यंत असतें.

आपल्या इकडे सांपडणारा ग्रानाईट रायचूर, मुनिराबाद, शिवपुरम्, वगैरे निजामहैद्राबाद इलाख्यापैकीं, तसेंच खानापूर, नगरगल्ली, ही बेळगांव जिल्ह्यांतील गांवे, कारवार जिल्हा, तसेंच गोध्रा, पंचमहाल वगैरे ठिकाणीं सांपडतो. व तो दगड इंग्लंड किंवा स्कॉटलंड वगैरे देशांत सांपडणार्या ग्रानाईटच्या इतकाच किंवा अधिक मजबूत असतो असें आढळून आलें आहे. ग्रानाईटचें वजन साधारणतः दर घनफुटास १६५ पौंड असतें.

आपल्या इकडील ग्रानाईटचें दगड दर चौरस फुटास सोळाशें ते चोवीसशें टन वजन आलें असतां चुरले जातात. काराच्या दगडांपैकींहि कांहीं ठिकाणची उत्तम जातीचे नमुनेहि इतका भार सहन करू शकतात. परंतु साधारणतः मुंबईजवळ किंवा पुण्याजवळ सांपडणारे काराचे दगड दर चौरस फुटावर तीनशें ते पाचशें टन भार आला असतां चुरले जातात. चिंचवडाजवळ सांपडणारे कारीचे दगड जे पुण्यास चांगल्या कामासाठीं वापरतात ते दर चौरस फुटावर सुमारें ४३० टन म्हणजे दर चौरस इंचास ३ टन भार आला असतां चुरले जातात.

पोरबंदरी दगडाचें वजन दर घनफुटास सुमारें ११० पौंड असतें. व तो पाण्यांत भिजवून ठेवला असतां स्वतःच्या घनफळाच्या विसाव्या भागाइतकें पाणी शोषून घेतो. हा दगड दर चौरस फुटावर १३० ते १५० टन म्हणजे दर चौरस इंचास सुमारें १ टन येवढा भार आला असतां चुरला जातो. परंतु हा पाणी शोषून ओला झाल्यावर दर चौरस इंचात अर्धा टन इतका भार आला असतांहि चुरला जातो. हिंमतनगर येथील पांढरा सिकतोपल दगड दर चौरस फुटावर ३२० टन भार आला असतां चुरला जातो. ध्रांगध्रा येथील सिकतोपल ह्याच्यापेक्षां थोडे जास्त मजबूत असतात. कडाप्पा येथील स्लेटीचे दगड वजनांत दर घनफुटास सुमारें १६५ पौंड आणि मजबुतीत दर चौरस फुटास सुमारें १००० ते १५०० टन भार आला असतां चुरतात.

वजन सहन करण्याच्या शक्तीसंबंधानें पहातां कोणतेहि सिकतोपल (सँड स्टोन), चूर्णोपल (लाईमस्टोन) किंवा पृण्मय प्रस्तर (स्लेटी) ह्या उत्तम प्रकारच्या जाती असल्या तर, तसेंच काराचें किंवा ग्रानाईटचे भूगर्भांतून वितळून वर आलेले दगड हे दर चौरस इंचावर निदान दोन टनांपेक्षां कमी भारानें बहुधां चुरले जात नाहींत. व कांही उत्तम जातीचे दगड ३ ते ५ टन भार पडला असतांहि चुरले जात नाहींत. मथितार्थ इतकाच कीं, दर चौरस फुटास ३०० टनाचा भार आला असतां साधारणतः चांगला दगडहि चुरला जाईल असें समजावें. व पोरबंदरी मऊ दगड १०० टन भारानेंहि चुरले जातात. नुसत्या शुद्ध सिमेंटच्या विटा केल्या असल्यातर दर चौरस फुटांस ३५० टनानें व १ भाग सिमेंट, २ भाग रेती व ४ भाग खडी यांचें केलेलें सिमेंट कांक्रीट व तें आळून ६ ते १० महिने झाल्यानंतर वरच्या निम्मे म्हणजे दर चौरस फुटास सुमारें १७५ टन इतक्या भारानें चुरेल. विटा आणि सिमेंट यांचे बांधकाम सुमारें ५० टनानें आणि विटा आणि चुना यांचें बांधकाम दर चौरस फुटास २५ टन भार आल्यास चुरतें. मळलेल्या चुन्याच्या विटा केल्या असतां त्या दर चौरस फुटास २७ ते ४० टन इतका भार आला असतां चुरून जातात.

वर जे दगडांचे वगैरे चुरून जाण्याचें भाराचें परिमाण दिलें आहे त्याच्या निम्म्याइतका भार पडला असतां त्यास तडे किंवा भेगा पडूं लागतात. आणि साधारणतः जेवढ्या भारानें दगडाचें काम किंवा विटांचें काम चुरून जाण्याचा संभव असतो त्याच्या सुमारें दशांशच भार येईल अशा रीतीची भिंतीची वगैरे जाडी ठेवतात.

बांधकामासाठीं लागणारें दगड:- मुंबई इलाख्यांत पुढें लिहिलेले दगड वापरतात : काळा दगड किंवा कारी दगड; हा दगड महाराष्ट्रांत बहुतेक ठिकाणीं सांपडतो. व गुजराथेंत मही नदीच्या कांठीं व काठेवाडांत राजकोटजवळहि सांपडतो. हा लोखंडासारखा काळा असतो. हा भूगर्भांतून ज्वालामुखींच्या द्वारें बाहेर पडणार्या उष्ण प्रवाही पदार्थांचा बनलेला असतो. याचे समकोनी अष्टपैलू असे सुळके सांपडतात. महाराष्ट्रांतील मोठमोठाले किल्ले, पूल, देवळें व मोठाल्या इमारती बहुतकरून याच दगडाच्या बांधलेल्या आहेत हा दगड अतिशय घन असतो. व त्याचें विशिष्टगुरुत्व सुमारें ३ आहे हें वर सांगितलेंच आहे. ह्या दगडाचा एक जास्ती निळसर प्रकार मुंबईत सांपडतो. तो दर चौरस इंचास ४॥ टन भार पडला तरीहि चुरला जात नाहीं. त्याचाच एक कमी निळसर प्रकार सांपडतो तो दर चौरस इंचास २ टनाचा भार आला तरी चुरला जात नाहीं. ह्याचेच हलक्या जातीचें दगडहि सांपडतात, ते काम करावयास सोपे असतात; परंतु थोड्याच वर्षांत झरावयास लागतात. मोठाल्या गुंड्या दगडांतून फोडून काढलेले दगड कधीं कधीं थोड्याच महिन्यांत झरूं लागतात व त्यांचे पापुद्रे सुटतात. चांगला कारी दगड कठिण, उजळ रंगाचा किंवा तजेलदार, फोडला असतां साफ व कठिण अशा कणांचा, हातोडीनें मारलें असतां खणखण् आवाज निघणारा असा असतो. हा हलक्या प्रकारचा असला म्हणजे मऊ, मातट रंगाचा असतो.

मुंबईजवळ कुर्ला व मालाड येथील खाणींतून पिंवळ्या रंगाचा कारीचा दगड निघतो. तो दर चौरस इंचावर ४ टनाच्या वजनानेंहि चुरला जात नाहीं. हा मुंबईत पुष्कळ इमारतींनां वापरलेला आहे. पुणें जिल्ह्यांतील तळेगांवाजवळ एक जातीचा तांबूस कारीचा दगड सांपडतो. गुजराथेंत अहमदाबाद जिल्ह्यांत अमदाबादेपासून सुमारे ५५ मैलांवर हेमनगर (हिंमतनगर) येथे साधारण कठिण बारीक पोगराचा, पांढर्या रंगाचा सिकतोपल (सँड स्टोन) सांपडतो. हा दर चौरस इंचावर २। टन इतका भार आला तरीहि चुरला जात नाहीं. हा काम करावयासहि सोपा आणि पाऊस व ऊन सहन करून फार वर्षे टिकणारा असल्यामुळें अमदाबाद येथील सुमारें ४०० वर्षांच्या जुन्या इमारती, राजवाडे, मशीदी, देवळें वगैरे इमारतींनां हा वापरला आहे व हा अजूनहि चांगल्या स्थितीत असलेला आढळतो. अशाच प्रकारचे दगड काठेवाडींत ध्रांगध्रा संस्थानांतहि सांपडतात. व ते अमदाबाद येथेंहि इमारतींस वापरले आहेत. हे दगड रंगानें व गुणानें हेमनगर दगडांसारखेच आहेत. हे दर चौरस इंचावर २॥ टन भार आला असताहि चुरले जात नाहींत.

पोरबंदरी दगड:— हे सूक्ष्म शिंपांचे आणि स्फटिकांच्या कणांचें, चुना ह्या संयोजक द्रव्यानें बद्ध असे चूर्णोपल (लाईम स्टोन) आहेत. हे दगड, बारीक पोगराचे, चांगल्या रंगाचे आणि लोणा न लागलेले असावे. हे दगड दर चौरस इंचास दोन हजार पौंड म्हणजे दर चौरस फुटास सुमारें १२५ टन इतका भार आला असतांहि चुरले जात नाहींत. ह्यावरून ते दर चौरस फुटास २०-२५ टन भार येत असला तरीहि वापरण्यास हरकत नाहीं. हे दगड नक्षी खोदण्यास वगैरे फार सोपे असल्यामुळें व पाऊस आणि ऊन सहन करणारे असल्यामुळें त्यांचा मुंबईस व इतर ठिकाणींहि नक्षीकामाकडे फार उपयोग करतात.

ग्रानाईट किंवा वज्रातुंड:— हा दगड गुजराथेंत कांही ठिकाणीं, मोगलाईंत आणि कर्नाटकांत सांपडतो. पण तो कठिण असल्यामुळें काम करावयास फार अवघड असतो. हा दर चौरस इंचावर ११ ते १६ टन भार असतांहि चुरला जात नाहीं.

लॅटराईट—जंबुरी दगड:— हा दगड मृण्मय असून यांस लोखंडाचा बराच भाग असतो. यामुळें तो गेरूच्या रंगाचा असतो. त्यांत भोंके फार असतात. यामुळें तो कच्च्या कामालाच उपयोगी पडणारा असतो. पूल किंवा मोठ्या इमारतींत तो वापरतां येत नाहीं. असा दगड बेळगांव, रत्नागिरी, धारवाड, कारवार जिल्हा व महाबळेश्वर येथें सांपडतो. ह्या दगडाची खडी फार उत्तम होते. ह्या खडीचा केलेला रस्ता फार मऊ व गुळगुळीत होतो. यामुळें त्यावरून जनावरांनां व माणसांनां चालण्यास तो फार सुखावह वाटतो. तसेंच गाड्या किंवा मोटारी यांनांहि फार सोईचा वाटतो. मात्र ह्यावर जड व ओझें भरलेल्या गाड्यांचा फार राबता असल्यास त्यावर लौकरच चाकोर्या पडावयास लागतात.

चूर्णोपल (लाईम स्टोन):— मोगलाईत शहाबाद व तांडूर येथें असे दगड सांपडतात. व ते फरशीकामास फार सोईचे असे मिळतात. फरशीसाठीं असे दगड १ इंच, १॥ इंच किंवा २ इंच जाडीचेहि मिळतात. व बांधकामाला ३ इंचांपासून १५ इंच जाडीचे वाटेल तेवढ्या आकाराचे मिळतात. चूर्णोपलांत संगमरवरी दगडहि येतात. ह्यांनां उत्तम पॉलिश किंवा झिलई देतां येत असल्याकारणानें यांचा उपयोग देवळांच्या फरशा वगैरे कामाकडे करतात. हे दगडहि दर चौरस इंचावर २। टन भार आला तरी चुरले जात नाहींत. व सिकतोपलहि साधारणतः इतक्याच मजबुतीचें असतात.

या वरील कोणत्याहि दगडांचें बिनघडीव बांधकाम केलें तर त्या बांधकामाची मजबुती, चांगल्या माठलेल्या नुसत्या दगडाची म्हणून, दर चौरस इंचास किंवा चौरस फुटास जें मजबुतीचें परिणाम वर दिलेलें आहे त्याच्या २/५ इतकी त्याच दगडाच्या डबरबांधकामाची मजबुती असते.

कारीच्या दगडाचें वजन दर घनफुटास सुमारें १८० पौंड असतें. त्याचप्रमाणें चॉक किंवा खडूचें १२०, कांक्रीटचें १२० पासून १५० पौंड, ग्रानाईटचें १६८ पौंड, चूर्णोपल (लाईम स्टोन) चें १३९ पौंड, संगमरवरी दगडाचें १६९ पौंड, सिकतोपल (सँड स्टोन) चें १३७ पौंड, व स्लेटचें १७१ पौंड असतें.

तसेंच विटांच्या बांधकामाचें वजन दर घनफुटास १२० पौंड, कच्च्या विटांचे ११० पौंड, दगडाचें बांधकाम १५६ पौंड, री ईन् फोर्स कांक्रीटचें १५० पौंड असतें.

तसेंच चिकणमातीचें वजन दर घनफुटास या प्रमाणांत १२० पौंड, रेताड मातीचें १०० पौंड, ग्र्याव्हल गोट्यांचें ११० पौंड, क्राऊन ग्लासचें १५७ पौंड, साधी कांच १६९ पौंड, मळलेला चुना १०९ पौंड, प्लॅस्टर ऑफ पॅरिस ५० पौंड, नदीची रेती ११७ पौंड व मोठे गोटे (सिंगल) ८८ पौंड.

कठिण खडक फोडून काढावयास सुरुंगाची जरुरी पडते. सुरुंगाच्या भोंकांमध्यें पहिल्यानें दारू घालतात. त्या भागापासून खडकाचा उघडा भाग म्हणजे ज्या बाजूला सुरुंगाच्या धडाक्यानें दगड फुटून निघतील म्हणजे ज्या बाजूला त्या खडकाची कमीतकमी जाडी असेल अशा ठिकाणीं हे कमींतकमी अंतर जर २ फूट असेल तर पाव पौंड म्हणजे दोन छटाक दारू लागते, हेंच ४ फूट अंतर असेल तर २ पौंड म्हणजे १ शेर व ८ फूट असल्यास १६ पौंड म्हणजे ८ शेर दारू लागते. भोंकात दारू भरल्यानंतर दारूमध्यें कड्याच्या वातीचें म्हणजे डांबरबत्तीचें टोंक बसवून व तें वातीचें कडें उलगडून नंतर त्या वातीभोंवती वारुळाची माती दर वेळेस तें भोंक इंच दीडइंच भरेल इतकी घालून, अशा रीतीनें सुरुंगाचें भोंग तोंडापर्यंत भरून काढतात. हें ठोकतांना ठिणगी पडूं नये म्हणून पितळी गजानें ठोकण्याचें काम करतात. पोलादी गज वापरला आणि तो रेतीवर किंवा खडकाच्या बाजूवर जोरानें आपटला तर चकमकीसारखी ठिणगी उडून दारू पेटण्याचा संभव असतो. म्हणूनच पितळ वापरावे लागते.

दगडाच्या खाणी:— दगड कठिण असून निकोप असावा. त्यावर चिरा, डाग, शिरा व भूंगीर नसावें. रंग सारखा असून सफाईदार असावा. इमारतीकरितां लागणारे दगड म्हणजे गुंडे, पाटथर, ठोकळे, खांडक्या, तोडी, व डबर वगैरे ज्या नमुन्याचे पाहिजेत त्या नमुन्यावरहुकूम खाणीवरच साधारण घडवावे. डबर मिळतील तितके समचतुष्कोण थराचे, बाजूस सपाट, चांगल्या दुमाल्याचे व विशेष अडचण न पडतां उचलण्याजोगे असावे. ओबडधोबड, सारख्या थरास निरुपयोगी व एकतृतीयांश घनफुटापेक्षां कमी घनफळाचे दगड कामावर आणूं नये. पोरबंदरी दगड चांगल्या रंगाचा असून त्यांतील कण बारीक असावे. त्यांत क्षार असतां उपयोगी नाहीं. खरखरीत कणाचे व काळे डाग असलेले पोरबंदरी दगड इमारतीकरितां नापसंत होत.

सुरुंग लावणें:— सुरुंगाची दारू वापरून खाणींतून दगड काढतात तसेंच बंदुकीच्या दारूपेक्षां ८ पट जोरानें फुटणार्या डायनामाईटचीं काडतुसें सुरुंगी पहारेनें पाडलेल्या भोंकांत ठांसून आणि त्यावर धडकन् भडकणारी किंवा बार होऊन उडणारी केप व डामरबत्ती बसवून ती उडवितात. ही डायनामाईटचीं काडतुसें २ प्रकारची बाजारांत मिळतात. त्यापैकीं पहिल्या प्रकारची ७/८ इंच व्यासाची आणि ३॥ इंच लांबीचीं व ५ तोळे वजन असणारी व दुसर्या प्रकारचीं १ इंच व्यासाचीं व ३॥ इंच लांबीचीं आणि ५५/८ तोळे वजन भरणारीं असतात. आणि त्यांचे ५ पौंड वजनाचे पुढे मिळतात. आणि असे १० पुडे घातलेल्या पेट्याहि मिळतात. व अशा ४० पेट्या किंवा २००० पौंड झाले म्हणजे डायनामाईटचा १ टन झाला असें म्हणतात. हीं काडतुसें भोंकात बसवितांना १ काडतुस भोंकात ठेवून तें लांकडी रुळानें घट्ट दाबून बसवितात. आणि जितक्या वजनाचा बार भरावयाचा असेल तितकीं काडतुसें एकामागून एक भोंकांत उतरवून व दाबून बसवितात. हीं बसवितांना नुसत्या दाबाचाच उपयोग करावयाचा व तोहि लांकडी रुळानें (लोखंडाच्या किंवा कोणत्याहि धातूच्या सळईनें नव्हे) सगळीं काडतुसें जाग्यावर बसविलीं म्हणजे बार होऊन उडणारी अशी केप हळूच दाबून खालील डाइनामाईटला चिकटेल अशा बेतानें बसवितात (ठोकतां उपयोगी नाहीं). केप बसविल्यानंतर तिच्या वरच्या बाजूला सुमारें ८ इंचपर्यंत कोरडी माती दाबतात. नंतर भोंकाच्या वरील भाग माती ठांसून भरून काढतात. हे सुरुंग लावण्यासाठीं भोकें पाडावयाचीं ती ५ ते ६ फूट खोलीपर्यंत १ इंच व्यासाची पाडतात. त्यांची खोली, खडकाचा पृष्ठभाग त्या भोंकांपासून कमींतकमी जितक्या अंतरावर असेल तितके फूटच सुमारें ठेवतात. ज्या ठिकाणी खडक फोडून काढण्यास एका भोंकांत घातलेले डायनामाईट पुरें होत नसेल तेथें जवळजवळ दोन किंवा तीन भोंके पाडून हिशोबानें जितकें पाहिजे असेल त्यापेक्षां जास्ती डायनामाईट घालून या तिन्ही भोंकांतील डायनामाईट एकदम उडेल अशा रीतीनें त्यांच्या बत्त्या जोडून त्यांचा बार उडवितात.

डायनामाईटच्या भोंकाचा वरील भाग भरून काढण्यासाठीं चिकणमातीच वापरली पाहिजे असें नाहीं, साध्या पाण्यानेंहि भोंक भरून काढलें तरी चालतें, पण असें करतांना बत्ती व भडक होणारी केप यांच्या सांध्यांत पाणी न शिरेल अशी व्यवस्था करावी लागते. असें करावयाला कोलटारमध्यें कळीचुना घाऊन त्या दाट मिश्रणाचा बत्ती व केप यांमधील सांध्याला लेप दिला असतां पाणी सांध्यांत शिरत नाहीं. या मिश्रणाचा लेप दिल्यानंतर फडकें गुंडाळून दोरीचे २-३ अटे देतात.

एखाद्या भोंकांतील बार कोणत्याहि कारणानें उडावयाचा राहिला तर जुन्या भोकांला हात न लावतां त्यापासून ६ इंचांवर निराळें भोंक पाडून त्यांत डायनामाईट घालून त्याचा बार उडविला म्हणजे जुन्या भोंकांतील डायनामाईटचाहि बार उडतो. डायनामाईट वापरतांना अतिशय काळजी घ्यावी लागते. थोडा निष्काळजीपणा झाला तरीहि धडाका होऊन प्राणहानि होण्याचा संभव असतो.

नोबलचें पहिल्या नंबरचे डायनामाईट ग्रॅनिटिक जातीचा खडक फोडण्यास उपयोगांत आणलें तर लाइन ऑफ लीस्ट रेझिस्टंट धडाका होण्याजोग्या बाजूचें कमीतकमी अंतर जर २ फूट असेल तर एकतृतीयांश पौंड, ४ फूट असले तर एकपूर्णांक दोनतृतीयांश पौड, व ६ फूट असेल तर ४॥ पौंड सुमारानें लागतें असें आढळून आलें आहे. हें प्रमाण खडकाचें एकच तोंड उघडे असेल त्यावेळेस लागतें. खडकाचा कोपरा म्हणजे २ तोंडें उघडी असतील तर त्या वेळेला याच्या सुमारें अर्ध्यानें डायनामाईट लागतें. जेव्हां दगडाचे मोठे गुंडे फोडावयाचें असतील तेव्हां गुंड्याच्या दोनतृतीयांश खोलीपर्यंत भोंक पाडून डायनामाईट उडविलें असतां ४ फूट खोलीला सुमारें ५ औंस डायनामाईट लागतें. डायनामाईटचा भाव दर पौंडास १ रु. १२ आणे याप्रमाणें साधारणतः असतो आणि त्याच्या केपांनां दर शेंकडा ३॥ रू. व २४ फूट लांबीच्या तांबड्या किंवा पांढर्या बत्त्यांनां ९ आण्यांपासून ११ आण्यांपर्यंत किंमत पडते.

विटा:— ज्या ठिकाणीं दगड मिळत नाहींत त्या ठिकाणीं बांधकामासाठीं विटा वापरतात. मातीचा गारा करून कांहीं दिवसपर्यंत तो भिजत ठेवून व पायानें तुडवून चांगला मळून नंतर विटाळ्यांत घालून दाबून विटा पाडतात. व नंतर त्या जमीनीवर वाळावयास ठेवतात. त्या थोड्याशा वाळल्या व कठिण झाल्या म्हणजे त्या कोडीवर ठेवतात. व पुढें उपड्या वाळूं देतात. विटांची माती फार चिकण असतां कामा नये. चिकण असली म्हणजे विटा तडकतात व रेताड असली तर विटा फार ढिसूळ होतात व जास्ती आंच लागली असतां विघळून त्यांचे खंगर बनतात म्हणून थोडी रेती असलेली चिकणमाती विटांनां चांगली; तींत चुनखडीचे कण असले तर भाजलेल्या विटा भिजवल्यावर हे कण फुटून व फुगून विटा फुटतात. विटा करावयाच्या वेळीं माती विटाळ्यास चिकटूं नये म्हणून दर वेळीं विटाळ्यांतून पाण्याचा बोळा फिरवितात. व ज्या फळ्यावर त्या बनवावयाच्या असतील त्या फळ्याची वरची बाजू रंधून साफ केलेली असावी. त्या फळ्यास वीट चिकटूं नये म्हणून पाण्याचा बोळा फिरवितात किंवा रेतीचा पातळ थर त्यावर पसरतात. विटा वाळून तयार झाल्या म्हणजे त्यांना 'कच्च्या' विटा म्हणतात. व ज्या ठिकाणी त्यावर पाणी लागण्याचा फारसा संभव नाहीं अशा ठिकाणीं किंवा इमारतीचा भार त्यावर येणार नाहीं अशा पडद्या वगैरेंच्या कामास त्या वापरतात. खास कमावलेल्या पांढर्या मातीच्या भेंड्याच्या भिंती महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं करतात. व कांहीं ठिकाणीं भुईकोटांनां व गांवकुसांनांहि अशाच प्रकारची माती वापरलेली असतें. ही माती साधारण पावसानें धुवून जात नाहीं इतकी मजबूत व चिकण असते. जुन्या भुईकोटाचे तटहि ह्या मातीचे मोठ्या जाडीचे केलेले असत. व ज्या ठिकाणीं कठिण दगडांचे किंवा विटांचे कोट, तोफेच्या गोळ्यांच्या तडाख्यानें फुटून जाऊन कोटांत खिंडारें पडत असत अशा ठिकाणीं हे मातीचे जाड कोट टिकाव धरीत असत. कारण त्यांच्या भुसभुशीतपणामुळें तोफेचा गोळा आला तरी, तो भिंत फार जाडी असल्यामुळें न फुटतां, तो तिच्या पोटांतच गढून जात असे.

साधारण रीतीची घरें, अशा भेंड्यांची किंवा अशा प्रकारच्या मातींत तोडी किंवा साधे दगड बसवून तयार केलेली असतात. व वरच्या पटईचा किंवा कौलाराचा भार तुळ्यावरून खांबावर, खांबावरून खालच्या जोत्यापर्यंत पोंचविलेला असतो. व अशा रीतीनें या कच्च्या भिंतीवर कोणत्याहि ठिकाणीं एकाच बिंदूवर भार न आल्याकारणानें त्या टिकतात.

विटा करणें:— ज्या मातीमध्यें चिवणपणा कमी व वाळूहि कमी असते अशी माती अथवा नदी किंवा नाल्याचा गाळ विटा पाडण्यासाठीं शोधून काढावा. त्यांतील झुडपांच्या किंवा गवताच्या मुळ्या, जाडी व भरड वाळू आणि कंकर ही धुवून अगर अन्य रीतीनें काढून टाकावी. पसंत केलेल्या मातीचा गारा करून फावड्यानें तो खालवर करावा. व तो चांगला तुडवावा. सवड असेल तर पावसाळ्याच्या आंत माती खणून काढावी व कांहीं महिनें तशीच उघडी पडूं द्यावी परंतु असें न करवेल तर मातीचा चांगला गारा करून त्यांत पाणी पाहिजे तितकें घालून उपयोग करण्यापूर्वी निदान ८ तासपर्यंत तो फावड्यानें खालीवर करावा व साच्यांत घालण्याजोगा चिवट होईपर्यंत तुडवावा. तयार केलेल्या मातीचा एकजीव व्हावा व ती माती साच्यांत घालण्याजोगी घट्ट असावी. खार्या पाण्याच्या आसपासची जमीन विटांकरितां अगदीं नापसंत होय. मातीत कोणत्याहि प्रकारचा क्षार असतां उपयोगी नाहीं. विटा करतांना विटाळ्यास माती चिकटूं नये म्हणून किंचित् स्वच्छ बारीक वाळू अथवा भट्टीतील राख टाकावी. किंवा विटाळें पाण्यांत बुचकळावें. नंतर मळलेली माती विटाळ्यामध्यें खूप जोरानें बसवावी व कोनेकोपरे दाबावे. माती जितकी घट्ट असेल तितकी बरी. विटाळ्यांतील फाजील माती काढण्याकरता लोखंडाची पट्टी त्यावर फिरवावी. विटा फळ्यावर करणें चांगलें. चार पांच विटा काढल्या म्हणजे विटाळें धुवावें. पाडलेल्या विटाच्या कोरा चांगल्या बारीक व सरळ असून त्या चौरस असाव्या. विटा पाडल्यावर त्या रचतांनां व उचलतांना त्यांचे कोनेकोपरे खराब न होऊं देण्याबद्दल विशेष काळजी घ्यावी. लोखंडी विटाळें पाव इंच जाडीचें असावें. व त्याच्या तळास व बाजूंस पोलादाची पट्टी असावी. अशा विटाळ्याचा आकार लांकडी विटाळ्याच्या आकाराप्रमाणें बदलत नाहीं. व थोडी डागडुजी लागून तें अदमासें ५ लक्ष विटा पडेपर्यंत टिकतें. निरनिराळी माती भाजून व वाळून किती आंकुचित होते याचा अनुभव घेऊन पहावा. विटा वाळतांना वार्यांत ठेपल्या तर त्या तडकतात. म्हणून वारा न लागेल अशा पडवींत त्या वाळवाव्या. विटा भाजण्यासाठीं जळण वाळलेलें असावें.

विटा भाजणें:— विटा भाजण्याच्या साध्या भट्ट्या असतात. त्यांत विटा भाजून झाल्या म्हणजे भट्टी निवाल्यावर त्यांतून त्या काढतात. परंतु नवीन प्रकारची गोल भट्टी (बुलची चराची भट्टी) केली असतां रोजच्यारोज १० हजार विटा, एक चिमणी किंवा धुरांडे करून व सुमारें २० खण करून रोजच्या रोज काढतां येतात. या भट्टींत रोज नव्या विटा करून एका बाजूच्या खणांत भरावयाच्या आणि दुसर्या बाजूच्या एका खणांतून भाजून पक्क्या झालेल्या विटा काढावयाच्या असें अखंड काम चालतें. अशा भट्ट्यांतून, याच्यापेक्षाहि जास्ती विटा रोज लागत असल्यास दोन चिमण्या किंवा धुराडी करून व सुमारें ३० फुटांपर्यंत भट्टीची रुंदी वाढवून भट्टी बांधिली असतां त्यांतून वाटेल तितक्या जास्ती विटा रोज मिळूं शकतात.

अशा भट्टयांची चिमणी सुमारें ३५ फूट उंच ठेवतात. व ती ओतीव बिडाच्या बैठकीवर बसवितात आणि ही बैठक वाटाळी फिरवितां यावी म्हणून तिच्या खालीं चाकें बसविलेली असतात. जेव्हां दोन चिमण्या किंवा धुरांडीं असतात तेव्हां त्याची उंची सुमारें २५ फूट ठेवतात. अशा भट्टीत, पाडलेल्या विटा वाळल्यानंतर योग्य रितीनें भरतात. आणि नंतर सुमारें १५० मण दगडी कोळसा, १४ भिंतींच्या भट्टींत किंवा २५० मण कोळसा, २४ भिंतींच्या भट्टीत आग सुरू करण्यासाठीं घालतात, व अशा रीतीनें वेगवेगळ्या खणांतील विटा लागोपाठ भाजण्याचें काम चालू ठेवतात.

हें भाजण्याचें काम बाभळीचीं लांकडें जाळूनहि करतां येतें. अशीं बाभळीचीं लांकडें दर हजार विटांनां सुमारें अर्धा टन साध्या भट्टींत लागतात. आणि अशा साध्या भट्टींत १ हजार कौलांनां १॥ गाडी साधारणत जळण पुरतें.

जास्ती पक्कें काम करावयाचें म्हणजे भाजून कठिण केलेल्या विटांचा उपयोग करतात. नव्या प्रकारच्या विटा ९ इंच लांब, ४। इंच रुंद व २॥ इंच जाड, त्या भाजल्यावर व्हाव्यात अशा बेताचें विटाळें बनवावें लागतें. त्या चांगल्या भाजल्या म्हणजे एक रंगाच्या, तांबड्या, चारी धारी सारख्या, वाजविल्या म्हणजे खणखण् वाजणार्या असाव्यात. व साधारण रीतीनें त्यांचा कठिणपणा इतका असावा कीं, नखानें त्यांच्यावर चरा पडूं नये. वरील मापाच्या दर हजार विटांना बांधून काढलेल्या बंद भट्टीत चांगल्या भाजावयास सुमारें अर्धा टन म्हणजे बंगाली १४ मण वाळलेलें लाकूड किंवा ७ मण दगडी कोळसा लागतो. विटांचा भाव दर हजारी सध्या (१९२५) २१-२२ रुपये पडतो. व नळीच्या कौलांनीं भाव सुमारें ४॥। रु. हजारी पडतो. उघड्या भट्टींत किंवा अव्यांत विटा भाजल्या तर जळण जास्ती लागतें. खेरीज त्यांत कांहीं विटा पिंवळ्या रंगाच्या म्हणजे कमी आंच लागलेल्या, कांहीं जास्ती आंच लागल्यामुळें खंगर बनलेल्या अशा सांपडण्याचा संभव असतो. कमी आंच लागलेल्या विटा पिंवळ्या रंगाच्या, नरम असतात, त्या पाण्यांत घालून ठेवल्या असतां झरावयास लागतात व इमारतींत हवेच्या संसर्गांत असल्या तर हवेंतील क्षाराच्या योगानें त्या फार लवकर झरूं लागतात. जास्ती उष्णतेनें जेव्हा विटांचा खंगर बनतो त्यावेळीं ५।७ विटांचा मिळून एक गोळा बनतो. व खंगर कठिण असल्यामुळें रस्त्याकडे यांचा उपयोग करतां येतो. परंतु कोणत्याहि भट्टींत खंगर किती निघेल हें आगाऊ सांगतां येत नसल्यामुळें रस्त्याच्या कामाला खंगरच वापरीन असें म्हणणें तडीस जात नाहीं. आपल्या इकडील चांगल्या विटांचें वजन दर घनफुटाला १०० पासून ११२ पौंड असलें आणि त्या दर चौरस इंचावर ९०० ते ९५० पौंड इतका भार आला असतां त्या चुरून फुटून जातात. सिंधकडील विटा फार मजबूत असतात व त्या १२ इंच लांब, ६ इंच रुंद व २॥। इंच जाड अशा असतात. एक कुंभार ८०० पासून १००० विटा एका दिवसांत विटाळ्यांत घालून पाडूं शकतो.

कल्याण येथील किंवा बिलिमोरा येथील विटांमध्यें त्यांच्या वजनाच्या सुमारें षष्ठांशाइतकें पाणी मुरतें. कल्याणच्या विटा दर चौरस फुटास ४७ टन भार आला असतां, म्हणजे दर चौरस इंचास सुमारें एकतृतीयांश टन भार आला असतां चुरल्या जातात. परंतु बिलिमोराच्या विटा दर चौरस इंचास अर्धा टन भार आला असतां चुरतात.

विटांची ही जी मजबुती सांगितली आहे त्याच्या साधारण निम्यानें वीट-चुन्याचें बांधकाम केलें असतां त्या कामाची मजबुती होते. म्हणजे कल्याणविटांचें बांधकाम सुमारें २१ टन वजन आलें असतांच चुरलें जातें. यावरून असें निघतें कीं कल्याणविटांच्या कामावर दर चौरस फुटास २ ते ३ टनांपेक्षां जास्ती भार येऊं देऊ नये.

अलीकडे रेती व चुना यांच्या विटा बनवूं लागले आहेत. ह्या विटा रेती व विरविलेला चुना याचें बरोबर मिश्रण करून बनविलेल्या असतात. आणि त्यांवर अतिशय मोठा दाब घालून व पाण्याच्या वाफेचा त्यावर परिणाम होईल अशा प्रकारच्या पेटींत घालून त्या तयार करतात. त्यांचा आकार ९ x ४ ३/८ x  २ ११/१४ इंच म्हणजे नेहमीं वापरल्या जाणार्या विटांइतकाच साधारणतः असतो. त्या, रेती आणि चुना यांचें नीट रीतीनें मिश्रण करून आणि नंतर हें मिश्रण विटाळ्यांत घालून विटेवर दर चौरस इंचास ५ हजार ते ८ हजार पौंड इतका भार येईल अशा रीतीनें दाबून काढून नंतर त्या विटा पेटींत घालून त्या पेटींत जोराची वाफ सोडून त्या वाफेची क्रिया त्यांवर होऊं देतात. ह्या आंत सोडलेल्या वाफेचा दाब दर चौरस इंचास १२० पौंड इतका असतो. आणि असा तो दाब १० तासपर्यंत कायम ठेवतात. असें केलें म्हणजे आंतील विटा अतिशय मजबूत होतात. रेती वापरणें ती दर चौरस इंचास २५०० छिद्रें असणार्या चाळणींतून चाळलेली असावी. व ती दर चौरस इंचास १० हजार छिद्रें असणार्या चाळणींतून दर शेंकडा १५ भागांपेक्षां जास्ती चाळून जाईल इतकी मोठा असली पाहिजे. व तिच्यांत क्षार असतां उपयोगी नाहीं. चुना वापरणें तो शिंपांचा किंवा सुरती चुन्यासारखा शुद्ध असा असावा. कोरडी फकी (चुना) व रेती ही दोन्हीं मिळून शंभर भाग घेतलीं असतां त्यांत ७॥ ते १२॥ टक्केपर्यंत म्हणजे सुमारें एकत्र योदशांश ते एकअष्टमांशांपर्यंत वजनांत चुन्याचें प्रमाण असावें. ह्या विटा वाळलेपणीं एक हजारपासून अठ्ठावीसशें पौंड एवढा भार दर चौरस इंचावर आला तरी चुरून जात नाहींत त्या ओल्या केल्या असतां त्यांची मजबुती सुमारें पावपटीनें कमी होतें. त्या स्वतःच्या वजनाच्या सुमारें दशांशाइतकें पाणी शोषून घेतात.

कोणत्याहि बांधकामाला दगड किंवा विटा हीं एकमेकांनां जोडण्यासाठीं व त्यांचा एकजीव करण्यासाठीं चुना किंवा सिमेंट यांचा संधानद्रव्य म्हणून उपयोग करतात. चुना म्हणजे कोणताहि चूर्णोपल, म्हणजे चुनखडीचा दगड भाजून व विरवून तयार केलेली पूड होय. चुनखडी म्हणजे कॅल्शियम नांवाच्या रासायनिक द्रव्याचा कर्बाम्लाशीं संयोग होऊन बनलेला पदार्थ होय. चुनखडी भाजली म्हणजे उष्णतेच्या योगानें कर्बाम्ल वायुरूपानें निघून जातें व कळीचुना अवशिष्ट राहतो. संगमरवरी दगडाचे (शुद्ध चुन्याच्या दगडाचे) तुकडे, त्यांतील सर्व कर्बाम्ल निघून जाईल इतके भाजले म्हणजे त्यांचें वजन ९ छटाक राहतें. म्हणजे प्रत्येक शेरांत ९ छटाक कळीचुना व सात छटाक कर्बाम्ल इतकें असतें. उष्णतेच्या योगानें कळीचुना व कर्बाम्ल यांचा संयोग झाल्यामुळें कळीच्या चुन्यांत एक प्रकारचें वीर्य (विरी) म्हणजे जलालपणा येतो. हा जलालपणा किंवा विरी ह्या चुन्याशीं हवेंतील कर्बाम्लाचा संयोग झाला म्हणजे नाहींशीं होते. चुन्यांत पाणी (३ शेर कळीच्या चुन्यांत १ शेर पाणी या प्रमाणांत) घातलें म्हणजे त्या दोहोंचें रसायनिक मिश्रण तयार होतें व ही रासायनिक क्रिया फार थोड्या अवकाशांत झाल्याकारणानें फार उष्णता उत्पन्न होते. कॅल्शियम ह्या धातूचा अणुभारांक (अॅटॉमिक वेट) ४० आहे. व ऑक्सिजन (प्राणवायु) याचा अणुभारांक १४ आहे. संगमरवरी दगडाचे तुकडे यांची रासायनिक घटना म्हणजे कॅल्शियम (खट)चा एक परमाणु, म्हणजे ४० भाग व कर्बाचा एक परमाणु म्हणजे १४ भाग व ऑक्सिजनचे ३ परमाणू म्हणजे ४८ भाग म्हणजे १०२ भागांपैकीं कर्बाम्लाचे १४ + १६ x २ = ४६ इतके भाग केले म्हणजे कळीचा चुना म्हणजे खप्र.= ५६ भाग म्हणजे १०२ इतकें दगडाचें वजन असलें तर त्यांपैकीं ५६ भाग कळी चुना असतो; म्हणजे दर शेरास ९ छटाक असें झालें. व खप्र = ५६ भाग कळी चुन्यांत पाणी उ. प्र.=२+ १६ = १८ भाग म्हणजे कळीचुन्याच्या वजनाच्या १/३ घातलें म्हणजे उज्जितचूर्ण (कॅल्शियम हायड्रेट) म्हणजे उज्जित चूर्ण होतें. व नंतर त्याच्याशीं हवेंतील कर्बाम्लाशीं संयोग होतांना पाणी निघून जातें. व कॅल्शियम कार्बोनेट बनतो. व अशा रीतीनें त्याचें मूळचें रासायनिक रूप त्याला प्राप्त होतें व यामुळें त्याला दगडासारखें काठिण्य प्राप्त होते. शुभ्र संगमरवरी दगड व खडू हे चुन्याच्या दगडाचें म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटमय शुद्ध स्वरूप होय. चूर्णोपलाचा दुसरा प्रकार म्हणजे चिरोडी नांवाचा जो पदार्थ बाजारांत मिळतो तो होय. ह्यालाच इंग्रजीत जिप्सम असें म्हणतात. हा दगड भाजला असतां प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणून जी बाजारांत शुभ्र रंगाची पूड मिळतें ती तयार होतें. हिची ओतून चित्रें वगैरे करतात. ह्या फ्लस्टा ऑफ परिसमध्यें पाणी घालून त्याचा साधे बंद करण्याकडे किंवा ठशांत ओतून चित्रें करण्याकडे उपयोग करतात. कारण कीं, तें ठशांत ओतल्याबरोबर लागलीच कठिण होतें. हा पदार्थ शुद्ध चुन्यावर गंधकाम्लाची रासायनिक क्रिया होऊन तयार होत असतो. ह्याचेंहि एक प्रकारचें सिमेंट किंवा संधानकाम्ल द्रव्य तयार करतात. परंतु तें वापरण्यास फारच अडचणीचें असतें. कारण तें भिजविल्यावर थोड्या वेळांत अतिशय कठिण होऊन जातें. खडूचा किंवा संगमरवरी दगडाचा भाजलेला चुना वाळू घालून मळून तयार केला व कामांत वापरला तर त्याला कठिण होण्याला हवेंतील कर्बाम्लाची जरूर असते व म्हणून तो पाण्यांत किंवा ज्या ठिकाणीं त्याला हवेंतील कर्बाम्ल मिळावयाचा नाहीं अशा ठिकाणीं वापरला असतां घट्ट किंवा कठिण होत नाहीं, आणि म्हणूनच असा चुना थोड्या उंचीच्या पातळ भिंतीसाठीं वापरला तर त्यांतील पाणी लवकर वाळून जात असल्यामुळे त्याची राखेसारखी भुकी होते व त्याचे सांधे खचूं लागतात. त्याच्या उलट, रुंद पाया करून व ओल असलेल्या पायांत तो वापरला म्हणजे त्याला कर्बाम्ल न मिळाल्यामुळें तो तसाच ओला व मऊ राहतो. म्हणून अशा पायाच्या कामाला चुनखहीचा म्हणजे अशुद्ध किंवा मृण्मिश्रित चूर्णोपलाचा चुना वापरतात. ह्या चुन्यांत, ओलीत किंवा पाण्यांत कठिण होण्याचा फार थोडा गुण असतो. ह्या गुणाची अभिवृद्धि होण्याकरितां चुना व माती नियमित प्रमाणांत मिसळून व त्यांचे गोळे बनवून ते भट्टींत घालून भाजतात व नंतर दळून बारीक पीठ करतात. ह्या पिठालाच सिमेंट किंवा संघानक म्हणतात. अशा सिमेंटमध्यें पाण्यांत कठिण होण्याचा गुण पूर्ण आणल्यामुळें त्याचा उपयोग पुलाचे पाये समुद्राचे धक्के वगैरे ठिकाणीं करतात. कंकर किंवा चुनखडीचा दगड म्हणजे बहुतकरून चुना व माती यांच्या मिश्रणानें झालेला असतो व त्यामुळेंच तो कोणत्याहि ठिकाणीं वापरावयास सोयीचा पडतो. यांत शुद्ध चुन्याखेरीज सिलिका म्हणजे सैकतद्रव्य (म्हणजे पांढरी चकचकणारी वाळू ज्याची बनलेली असतें तें द्रव्य), अल्युमिना अथवा शुद्ध मृत्तिका (अॅल्युमिनम धातूचें भस्म), मॅग्नेशिया अथवा मग्न धातूंचे भस्म (दिवाळींत विजेसारखा स्वच्छ प्रकाश पाडणार्या ज्या तारा मिळतात त्या मग्न धातूच्याच असतात व त्या जाळल्यानंतर जी पांढरी पूड होते तेंच मॅग्नेशिया अथवा मग्न मृतिका होय), लोह अथवा लोखंड व मंगल (मँगेनीज) नांवाचा तांबूस धातु इतकीं द्रव्यें असतात व त्यांचें प्रमाण चुनखडीच्या दगडाच्या वजनाच्या एकदशांशापासून ते तीन दशांशापर्यंत असतें. जेव्हां एकदशांशाइतकींच वरील द्रव्ये एखाद्या चुनखडींत असतात तेव्हां अशा चुनखडीपासून केलेला चुना पाण्यांत घातल्यापासून पंधरा-वीस दिवसांनंतर साधारण साबणाइतका कठिण होतो. हेंच प्रमाण १/२ इतकें असेल तर तो ६ पासून ८ दिवसांत बराच कठिण होतो व सहा महिन्यांत मऊ दगडाइतका कठिण बनतो. वरील पदार्थांचें प्रमाण चुनखडीच्या ३/१० इतकें असेल तर त्याचा चुना २ पासून ४ दिवसांत घट्ट बनतो व एक महिन्यांतच पुष्कळ कठिण होतो. व इतकें प्रमाण असणारी चुनखडी कांहीं कांहीं ठिकाणी मिळते. ह्यापेक्षां लवकरच कठिण होणारें संयोजक द्रव्य (सिमेंट) स्वाभाविक अवस्थेंत मिळत नाहीं. तें मुद्दाम तयार करावें लागतें व तें वर सांगितल्याप्रमाणें माती व चुना यांचे गोळे बनवून भाजून तयार करावें लागतें. अशा संयोजक सिमेंट द्रव्यामध्ये ३/१० पासून निम्म्यापर्यंत मृण्मयद्रव्यें असतात व बाकीचा चुना असतो. कधीं कधीं जमीनींत सांपडणार्या चूर्णोपलांतहि वरील प्रमाण आढळतें व त्यापासून केलेले संयोजक द्रव्य भाजून तयार केल्यानंतर पाण्यांत घातले असतां थोड्याच मिनिटांत घट्ट होते. विलायतेहून येणारे संयोजक द्रव्य अथवा पोर्टलंड सिमेंट हें आठ किंवा ९ भाग खडू व दोन भाग पुरानें वाहून आलेली माती (ह्या मातींत ७० भाग मृतिका व ३० भाग सैकतद्रव्य असतें) ह्यांचें बनविलेलें असतें. हीं द्रव्यें म्हणजे खडू व मृत्तिका दळून त्यांचें पीठ करतात व हें मिश्रण वाहत्या पाण्याच्या नळांत पडेल अशी व्यवस्था केलेली असते. ह्या वाहत्या पाण्याबरोबर हे मिश्रण वाहात जाऊन साठ फूट लांब, ४० फूट रुंद व ३ फूट खोल अशा टांक्यांत जाऊन सांठतें व तें वाळल्यानंतर भट्टींत घालून एक कोळशाचा थर व एम मिश्रणाचा थर; पुन्हां त्यांवर कोळशाचा व मिश्रणाचा असे थरावर थर घालून त्याला खूप आंच देतात, ती इतकी कीं, ते मिश्रर विरघळून त्याचे लहान लहान खडे बनतात व नंतर हे विरघळलेले खडे किंवा खंगर पोलादी चरकांत घालून त्यांचे अगदीं बारीक पीठ बनवितात. व हें पीठ लांकडी पिपांना आंतून कागद लावून त्यांत, दर एक पिंपात ४ घनफूट पीठ भरून बंद करून परदेशीं पाठवितात. ह्या संयोजक द्रव्याला पाणी लागूं न देतां ठेवले तर तें पुष्कळ दिवस टिकतें. हें पाण्यांत भिजविल्यानंतर लवकरच कठिण होत असल्यामुळें ओल्या जागेंत बांधकाम करण्याला व अस्तरगारी करण्याला फार उपयोगी पडतें, व ह्यांत कोणतेंहि उद्भिज वाढूं शकत नाहीं. हें वाहत्या पाण्यांत उपयोगांत आणतां येत नाहीं, कारण तें लावल्याबराबेर कठिण होत नाहीं. पण जर दोन दिवसपर्यंत पाणी वाहणें बंद केलें व बैठें ठेवलें तर तेवढ्या अवधींत तें बरेच कठिण होतें व नंतर साधारण प्रवाहानेंहि तें वाहून जात नाहीं. ह्या त्याच्या गुणामुळें पुलांच्या वगैरें पायांमध्यें त्याचा उपयोग करतां येतो.

अशा पायामध्यें भोंवताली पेटी वगैरे केली असल्यामुळे पाणी बैठेंच असतें व त्यांत सिमेंटचे कांक्रीट हें अलाद तळाशी नेऊन सोडतात व अशा रीतीनें सिमेंट वाहून न जातां त्याला पाण्यांत कठिण होण्यास अवसर मिळतो. ह्या त्याच्या गुणामुळें जलसंचयाचीं, पुलाच्या पायाचीं व घाण पाणी सांचवावयाच्या टांक्या वगैरें ठिकाणी याचाच उपयोग करतात. ह्याचे संयोजक गुण फार असल्याकारणानें त्यांत ३ पटीपासून ४ पटीपर्यंत रेती खपते व तें खार्या पाण्यांतहि मिळविलें असतां त्याच्या मजबुतींत कमीपणा येत नाहीं. एरवींच्या चुन्याला मात्र खारे पाणी चालत नाहीं. हल्ली कटणी, पोरबंदर वगैरे ठिकाणी सिमेंट करण्याचे कारखाने निघालेले आहेत व त्यांत तयार होणारे सिमेंट परदेशी सिमेंटच्या बरोबरीचें असतें व ते भावालाहि सारखेच पडतें. मद्रासकडेहि असें सिमेंट तयार होते. तें ७ मापें चुना व ५ मापें माती घालून गोळे करून भाजून तयार करतात.

पोर्टलंड सिमेंट:- हें इतकें बारीक दळलेलें असावें कीं, तें दर चौरस इंचास ७६ x ७६ =५७७६ इतकीं सूक्ष्म छिद्रें असणार्या तारेच्या चाळणींतून चाळलें असतां शेंकडा ९९ भाग चाळणीतून खालीं चाळून गेलें पाहिजे, व १८० x १८० = ३२४०० इतकीं छिद्रें दर चौरस इंचांत असणार्या चाळणींतून चाळिले असतां शेकडा ८६ भाग चाळून गेला पाहिजे. ह्या चाळण्या करावयास नंबर ४१ आणि नंबर ४७॥ ब्रिटिश स्टँडर्ड वायर गेजच्या तारा वापरल्या पाहिजे.

ह्या सिमेंटचें विशिष्टगुरुत्व ३ १/१० असावें. या सिमेंटच्या विटा करून त्या २४ तासपर्यंत दमट हवेंत ठेवल्यानंतर पाण्यांत बुचकळून ठेवून ७ दिवस पुरे झाल्यावर त्यांची साहक (खेचाण सहन करण्याची) शक्ति दूर चौरस इंचास ४०० पौंड इतकी असली पाहिजे. व तशाच शुद्ध सिमेंटच्या विटा २८ दिवसपर्यंत पाण्यांत ठेवल्या असतां त्या दर चौरस इंचास ५०० पौंडांचें खेचाण पडलें असतांहि तुटतां उपयोगी नाहीं. ह्याच विटा सिमेंट १ भाग व रेती ३ भाग ह्यांच्या केलेल्या असल्यास ७ दिवसांनी १२० पौंड आणि २८ दिवसांनी २२५ पौंड इतकें खेचाण दर चौरस इंचास सहन करूं शकतील. चांगलें पोर्टलंड सिमेंट हें जलदीनें आळणारें असल्यास १० मिनिटांच्या आंत आळूं नयें किंवा त्याला आळण्यास ३० मिनिटांपेक्षां अधिक वेळ लागू नयें. हेंच मध्यम प्रकारचें असल्यास हे काळ अर्धा तास व २ तास असावे. सिमेंट सावकाश आळणारें असल्यास हेच काळ दोन तास आणि ११ तासांचे असावे.

पोर्टलंड सिमेंट हें ताजें असून फिक्या उदी रंगाचे, गोळे व डिखले न बनलेलें व चांगलें बारीक केलेलें असावें. तें पाण्यांत घातल्यापासून ६ तासांच्या आंत आळूं लागलें पाहिजे व उत्तरोत्तर जास्त आळूं लागलें पाहिजे. आळत असतांना त्यांत चिरा पडू नयेत. व त्याचा रंग पिंवळा होऊं नये. त्याच्या १ घनफूटाचें वजन ८६ पौंडापेक्षां कमी किंवा १०० पौंडांपेक्षां जास्ती नसावें.

जो चुना ओल्या जमीनींत कठिण व्हावयाजोगा नसतो अशा चुन्यांत, विटा किंवा कौलें फोडून त्यांची केलेली भुकी म्हणजे सुरकी घालून त्याचा चुना मजबूतदार केला म्हणजे अशा चुन्यांत, ओलीतहि कठिण होण्याचा गुण येतो. बांधकाम केल्यावर किंवा फ्लॅस्टर अथवा अस्तरगारीचाहि चुना तो कठिण होईतोंपर्यंत तो ओला ठेवावा लागतो. म्हणून अशा प्रकारचें काम पाण्यानें रोज भिजवावें लागतें. पाणी न घालतां असा चुना लवकर वाळूं दिल्यास त्याचा कठिण होण्याचा गुण नाहींसा होतो. असा लवकर वाळलेला चुना भिजवून कठिण झालेल्या चुन्यापेक्षां जास्ती पांढर्या रंगावर येतो व त्याला धक्का लागला असतां खरपुड्या पडतात व तो राखेसारखा झरूं लागतो. मळलेला चुना कामांत वापरल्यावर त्याला तडा पडूं नयेत म्हणून तो मळतांना त्यांत रेती घालतात. चुन्याच्या किंवा सिमेंटच्या बरोबरीनें रेती घातली असतां त्याच्या मजबुतीत फारसा फरक पडत नाहीं परंतु चुन्याच्या अथवा सिमेंटच्या दुप्पट रेती घातली म्हणजे त्याची मजबुती बरीच कमी होते.

चुना भाजून तयार झाला म्हणजे त्याला कळीचुना असें म्हणतात. त्या कळीचुन्याच्या वजनाच्या तिसर्या हिश्श्याइतकें किंवा मापाच्या चौथ्या हिश्श्याइतकें कळीचुन्यावर पाणी घातलें म्हणजे तो सर्व चुना विरतो. साधारण मळलेल्या चुन्यांत १॥ पासून २ पटीपर्यंत रेती घातली तरी चालते. पण सिमेंट हें अतिशय मजबूत असल्याकारणानें त्यांत ४ पट किंवा ५ पट रेतीहि घातली असतां अशा संयोजकाची मजबुती विटांच्या मजबुतीपेक्षां कमी होत नाहीं. चुन्यांत १॥ पट किंवा २ पट रेती घातली म्हणजे अशा संयोजकाची मजबुती विटेच्या एकपंचमांशांइतकीच होते. ज्या ठिकाणीं विटांचे बांधकाम करतात अशा ठिकाणीं चुन्याचा एक भाग, रेतीचा एक भाग व सुरकीचा एक भाग ह्यांचें संयोजक द्रव्य बनवितात. चुन्याच्या दीडपट किंवा दुप्पट रेती चुन्यांत घालून नंतर तो चुना घाणीमध्यें घालतात. घाणीमध्यें चुना साधारणरीतीनें घट्टच राहील इतकें पाणी घालावें. जास्त पाणी घातले असतां चुना चांगल मळला जात नाहीं. बांधकामांत चुना वापरावयाच्या वेळी जे दगड किंवा विटा जोडून बांधकाम करणें असेल ते दगड किंवा विटा चांगल्या भिजवून तर्र करावे लागतात. असें केलें म्हणजे सांध्यांतील चुना विटांनां किंवा दगडांनां धरून राहतो, नाहींतर चुन्यांतील पाणी कोणड्या विटा शोषून घेऊन चुना कोरडा पडतो व त्यामुळें काम मजबूत होत नाहीं. विटा आपल्या वजनाच्या एकषष्ठांश इतके पाणी शोधूं शकतात. म्हणून बांधकामांत वापरावयाच्या पूर्वी त्या पाण्यांत १०।१२ तास तरी अगोदर भिजवून ठेवाव्या.

भिंतीला गिलावा करणें झाल्यास तो गिलावा बांधकामाला बराच चिकटून रहावा येवढ्यासाठीं त्या बांधकामाचें सांधे गिलाव्याला धरून ठेवतील अशा रीतीनें खरवडून चरचरीत करतात व नंतर त्यावर गिलाव्याचा पहिला हात चढवितात. हा गिलाव्याचा चुना करतांना चुन्याच्या पाऊणपट रेती किंवा सुरकी व त्यांत सणाचे तुकडे कापून घालतात. जसजसा हा थर पुरा होत जाईल तसतसें त्यावर थापीनें ठोकून उभ्या आडव्या रेषा पडतील अशा रीतीनें तो मजबूत करतात. यावर दुसरा हात सनल्याचा देतात. ह्यांत निम्म्यानें अगदी बारीक वाळू घालतात व पुन्हां थापीनें ठोकून गिलाव्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करतात. ह्यावर तिसरा हात पांढर्या स्वच्छ कळी चुन्यांत एकषष्ठांश रेती घालून व फडक्यांतून गाळून हा जाड लोध्या, कुंचानें भिंतीला लावून नंतर करणीनें घांसून घांसून गुळगुळी करतात.

ज्या ठिकाणीं चिरोडीचा दगड मिळतो त्या ठिकाणी तो दगड भाजून (हा भाजतांना त्याला लावावयाची आंच २१२ अंशांपासून म्हणजे पाणी उकळण्याची उष्णता असते तितकी २७२ अंशांपर्यंत असावी)  प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखें जें पीठ तयार होतें त्याचा घरांतील आंतल्या भागास गिलावा करण्याकडे उपयोग करतात. हा पदार्थ पाण्यांत घातल्याबरोबर लागलीच कठिण व्हावयास लागतो म्हणून भिजविल्याबरोबर लगेच याची अस्तरगारी केली पाहिजे. नाहींतर तो जागच्याजागीच कठिण व्हावयास लागातो. खेरीज तो पाण्यांत विरघळून जात असल्याकारणानें बाहेरच्या कामाला अगदीं निरुपयोगी आहे. भिंतीला द्यावयाची सफेती म्हणजे विरविलेल्या शुभ्र चुन्यांत भिंतीला चांगल्या रीतीनें चिकटून राहण्यासाठी डिंग, किंवा सरस किंवा तांदुळाची खळ घालून तयार केलेला पातळ पदार्थ होय. तो भिंतीला लावावयाच्या वेळीं इतका जाड असावा कीं, त्याच्यांत कुंचा बुचकळून बाहेर काढला असतां तो त्यांतून खाली गळूं नये.

चुना:- कोणत्याहि जातीचा कंकर किंवा चुनखडी पांढर्या रंगाची नसल्यास व उदी किंवा भुरकट, किंचिंत् निळसर असल्यास तिचा चुना बहुत करून हॉयड्रॉलिक म्हणजे पाण्यांत आळणारा असतो. परंतु खड्यांत चमक असल्यास त्यांत रेतीचा भाग आहे असें समजावें. त्यांत मृदंश आहे किंवा नाहीं हें जिभेनें किंवा खडी ओली केल्यावर मातीचा वास आल्यावरून समजतें अशा चुनखडीपैकी थोडे खडे भाजावे आणि भाजल्यानंतर विरवून व एकास एक ह्या प्रमाणानें रेती घालून दोन तास पर्यंत तो चांगला मळावा व अशा मळलेल्या चुन्याच्या २ इंच जाडीच्या विटा विटाळ्यांत घालून व नीट रीतीनें दाबून बनवाव्या. ह्या विटा विटाळ्यांतच २४ तास पर्यंत दमट किंवा ओलसर स्थितींत राहूं द्याव्या. २४ तासांनंतर त्या विटाळ्यांतून काढून ओल्या रेतींत आणखी २४ तासपर्यंत पुरून ठेवाव्या व त्यानंतर त्या ओल्या रेतींतून काढून पाण्यानें भरलेल्या भांड्यांत बुचकळून ठेवाव्या. पाण्यांत ठेवल्यानंतर जर त्यांचा आकार बदलला नाहीं किंवा त्या रेवल्या नाहीत तर तो चुना चांगला हॉयड्रॉलिक म्हणजे पाण्यांत आळणारा आहे असें समजावें. अशा रीतीनें १० दिवसपर्यंत पाण्यांत राहिल्यावर त्या विटा बाहेर काढाव्या. आणि त्या आडव्या ठेवून त्यांच्यावर (२ इंच जाडी) दर चौरस इंचास ५० पौंड इतका भार येईल असें वजन ठेवले असतां त्या चुरतां उपयोगी नाहींत. हेंच वजन दर चौरस इंचास ७० पौंड इतकें वाढविलें असतां जर ही विट चुरली गेली नाहीं तर तो चुना चांगला असें समजावें. दर चौरस इंचास ५० ते ७० पौंड म्हणजे दर चौरस फुटास ३। ते ४॥ टन होय. चुनखडीचे दगड जे जमिनीवर सांपडतात तें त्याच्या पेक्षां खणून काढलेले दगड जास्ती हायड्रॉलिक असतात. कंकर किंवा चुनखडी भाजण्यासाठीं ती २ इंच व्यासाच्या बांगडींतून जाईल इतकी फोडून बारीक करतात. चुनखडी कोळशानें भाजणे झाल्यास ती फोडून जितकी बारीक करतात तितकाच बारीक दगडी कोळसाहि फोडून बारीक करावा लागतो. लोणारी कोळसा वापरणें झाल्यास तोहि त्याच्यासारखाच फोडून चुनखडीत मिसळून भट्टीत घालतात. आणि विशेषतः असें करण्याचा हेतु इतकाच कीं, कोणत्याहि एकाच ठिकाणीं आंच जास्ती वाढूं नये. ह्याच हेतूनें नवीन तोडलेली लांकडें वापरावयाची असल्यास त्यांचीहि खांडे ३ फुटांपेक्षां जास्त लांब ठेवीत नाहींत. भट्टया २० फूट व्यासाच्या आणि १२ फूट उंचीच्या करून त्यांत २ दरवाजे ६ x ३ चे करतात. वर सांगितलेल्या १२ फूट उंचीपैकीं ४-६ फूट जमिनींत व बाकीचे वर असावेत. भट्टीच्या तळाशी ६ x ९ इंच मापाचे मधोमध आणि मध्यापासून चारी बाजूंकडे जाणारे आणि सभोंवार हवा आंत जाण्यासाठीं घळ ठेवतात. धरणासारख्या मोठ्या कामावरून ५० फूट लांब, २० फूट रुंद व ७ फूट उंच जमीनीवर भट्टया बांधलेल्या आढळतात. व त्यांत चुना भाजून तयार होण्यास १५ ते २० दिवस लागतात. भट्टीच्या तळाला सुमारें १२ इंच जाडीचा जळाऊ लांकडांचा थर किंवा गोवर्या घालून त्यांवर चुनखडीचा थर आणि त्यावर कोळशांचा (सिंडरर्स) थर व त्यावर चुनखडीचा थर याप्रमाणें वरपर्यंत घालतात. कांहीं कांहीं ठिकाणीं दगडी कोळसे किंवा लोणारी कोळसे खडींत मिसळूनहि घालतात. १०० घनफूट चुनखडीला ५० ते ६० घनफूट लोणारी कोळसा किंवा इंजिनांतून निघालेली कोळशी घालतात. अथवा २५ ते ३० घनफूट दगडी कोळसा घालतात. अथवा १२ ते १५ घनफूट दगडी कोळसा आणि २५ ते ३० घनफूट इंजिनमधून निघालेली कोळशी अथवा ५० ते ६० मण नवीन तोडलेलें बाभळीचें किंवा चिंचेचें लांकूड इतकें जळण लागतें. खेरीज भट्टीच्या तळाशी घालण्यासाठीं १०० घनफूट चुनखडीस सुमारें ६ मण लांकूड लागतें. या तळाच्या लांकडाच्या थरावर ८ ते ९ इंच जाडीचा चुनखडीचा थर घालतात. चुनखडीचा या थरावर ३ इंच जाडीचा दगडी कोळशाचा किंवा ६ इंच जाडीचा कोळशीचा थर घालतात. त्यावर फिरून आठ-नऊ इंच चुनखडीचा व त्यावर कोळशाचा याचप्रमाणें माथ्याच्या खाली २ फूट पर्यंत भट्टी भरून काढतात आणि त्याच्यावरील भाग, पूर्वीच्या भट्टयांतून निघालेल्या अर्ध्या भाजलेल्या चुनखडीनें शीग लावून भरून काढतात. थर घालतांना जसजसें माथ्याच्या जवळजवळ यावें तसतसा कोळशाचा थर कमी जाडीचा करावा किंवा चुनखडीच्या थराची जाडी वाढवावी आणि या थरांतून ९ इंच व्यासाचें पांच उभे घळ (एक मधोमध आणि चार बाजूंस चार) ठेवावे. हे घळ चुनखडीच्या मोठ्या खड्यांचेच बनविलेले असतात. भट्टीच्या बाजूची चुनखडी कच्ची राहूं नये म्हणूज ३ इंच जाडीचा कोळशीचा थर सर्व बाजूंनीं देतात. अशी भट्टी भरल्यानंतर भट्टीच्या तळाशीं चारी बाजूंस असलेल्या घळांतून वाळलेली लांकडें पेटवून सगळ्या बाजूंनी सारखी आग पसरेल अशा बेतानें तळाशीं चेतवितात. भट्टींतील आग वरपर्यंत पोंचल्यानंतर बाजूचे डबरानें भरलेले दरवाजे आणि अंशतः तळाजवळचे घळहि मातीचा गिलावा लावून बंद करून टाकतात. १००० ते ४००० घनफूट चुनखडीचा घाणा घातलेली भट्टी निवण्यास १५ ते ३० दिवस लागतात. ज्यावेळीं कोळशाचे व चुनखडीचे थर वेगवेगळे घालीत नाहींत. त्यावेळीं चुनखडी व कोळसा भट्टीच्या बाहेरच फावड्यानें चांगला मिसळून त्या मिश्रणाचे ९ इंच जाडीचे थर भट्टींत घालतात.

चुन्याचे दगड ३० घनफूट भाजले असतां १ खडी म्हणजे ४० घनफूट विरलेल्या चुन्याची फकी त्यांतून मिळते व तेवढा चुना भाजण्यास पाव टन म्हणजे ५६० पौंड बाभळीचा कोळसा किंवा अर्धा टन वाळलेलीं बाभळीचीं लाकडें व १२५ गोवर्या लागतात. भाजलेल्या कळ्या विरविल्या म्हणजे त्या फुलून दीडपट चुना तयार होतो. व चाळून वगैरे निदान तिसरा हिस्सा इतकी वाढ तरी पदरांत पडते.

चुना दगडी कोळशाने भाजणें झाल्यास दर १०० घनफुटास सुमारें अर्धा टन कोळसा आणि ५॥ मण वाळलेली लाकडे लागतात. याचा भाव सुमारे १०० घनफूट चुन्याची फकीस सध्यां (१९२५) ४१ रु. पडतात व लांकडाने किंवा लोणारी कोळशानें भाजला असां सध्यां (१९२५) ६० ते ६७ रुपये पडतो.

भाजलेली चुनखडी:- हिचा उपयोग करावयाच्या पूर्वी ही फार दिवस विरवून ठेवूं नये. कारण विरविलेला चुना फार दिवस ठेवल्यास बिघडतो. चुना विरविल्याबरोबर त्याचा रेती घालून व घाणींत मळून तयार केलेला चुना पुष्कळ दिवस पडून राहिलेल्या फकीच्या चुन्यापेक्षां जास्ती मजबूत असतो. भट्टींतून तयार झालेल्या कळ्या काढल्यानंतर त्यांचा जमिनीवर ६ इंच जाडीचा थर करतात. आणि त्यावर विरण्यास बरोबर जितकें लागेल तितकें गोडें पाणी घालून ६ ते १२ तासपर्यंत तसाच पडून देतात आणि नंतर तयार झालेली फकी चाळून काढतात आणि चाळणीवर राहिलेला चाळ फिरून दोन दिवसानंतर बारक्या चाळणींतून चाळतात. पहिली चाळणी जर तीन अष्टमांश इंची एक्सप्यांडर मेटलची असेल तर दुसरी चाळरी पाव इंच जाळीची असावी. दुसर्या चाळणीवर राहणारा गाळ नंतरच्या भट्टींत फिरून भाजण्यासाठीं घालतात.

चुना घाणींत घालून मळतांना चुन्याची फकी व पाणी घालून घाणीच्या चाकाचे सुमारें १८० फेरे होईतोंपर्यंत तो मळावा. व त्यानंतर त्या घाणींत मळलेल्या चुन्यावर भिजलेली रेती दुप्पट घालून चाकाचे फिरून १८० फेरे करावे. म्हणजे चुना चांगला मळला जातो. व त्याला १०० घनफुटांस सध्यां (१९२५) ८ रु. खर्च येतो. व इंजननें चालणार्या (मार्टरलिक) घाणींत मळला असतां भाव ४॥ रु. पडतो. असा मळलेला चुना मळल्यापासून ७२ तासांच्या आंत वापरावा.

जो चुना भिजवून मळल्यापासून पाण्यांत ठेवला असतांहि ७ दिवसांत आळतो त्या चुन्याला हायड्रॉलिक म्हणजे पाण्यांत आळणारा चुना असें म्हणतात. असा चुना प्रत्येक कामांत वापरण्यास चांगला. जेथें काम केल्याबरोबर थोड्याच वेळांत काम पाण्यांत बुडून जावयाचें असेल तेथें उत्तम प्रकारचा हॉयड्रॉलिक चुना किंवा सिमेंट वापरलें पाहिजे. हॉयड्रालिक चुना वापरला म्हणजे केलेलें काम बरेच दिवसपर्यंत ओलें ठेवले तर तो चुना आळतो व घट्ट होतो. परंतु तो लवकर वाळला तर खराब होतो. आणि म्हणूनच बांधकाम करतांना वापरावयांच्या विटा व दगड चांगले भिजविलेले असले पाहिजेत.

गिलावा करण्यासाठीं वापरावयाचा चुना पहिल्यानें मळल्यानंतर ८ दिवसांनीं फिरून मळावा. नाहींतर चुन्यांत न विरलेल्या कळ्यांचें बारीक खडे गिलाव्यांत वापरल्यानंतर हवेंतील कळ्यांचें बारीक खडे गिलाव्यांत वापरल्यानंतर हवेंतील ओलाव्यानें विरून फुगतात. आणि त्यामुळें गिलाव्यावर फोड आल्यासारखें दिसतात.

हॉयड्रालिक चुन्याचें चुनखडींत ८ ते ३० टक्के मृदंश असतो. जेव्हां मृदंश थोडा असेल तेव्हां जास्ती मृदंश त्यांत घालण्यासाठीं चुना आणि माती यांचें मिश्रण भाजून त्याचा उपयोग करतात.

हें मिश्रण भट्टींतून काढल्यानंतर कोरडेंच घाणींत घालून पिसतात आणि दर चौरस इंचास १५० छिद्रें असणार्या चाळणींतून चाळून त्याची जरूर लागेतोंपर्यंत तें सावलींत ठेवतात. व जेव्हां वापरावयाचा असेल तेव्हां असा चुना, व एकपट किंवा दुप्पट किंवा चुना फारच चांगला असल्यास तिप्पट रेती घालूनच भिजवून घाणींत मळून तयार झाल्यावर एक-दोन दिवसांत वापरतात.

सिंधमध्यें अशा रीतीनें हॉयड्रॉलिक चुना तयार करून पुष्कळ ठिकाणीं वापरलेला आहे. तेथें साधा पिसलेला चुना घट्ट कालवून व त्याचे ५॥ भाग आणि चिकणमाती १ भाग असें मिसळून त्यांचे चेंडूसारखे वाटोळे गोळे बनवितात व ते वाळल्यानंतर भट्टींत घालून भाजतात. अशा तयार केलेल्या चुन्यांत कांक्रीटमध्यें तिप्पट रेती आणि वरील बांधकामास दुप्पट रेती घालतात.

मळलेला चुना व सिमेंट:- चुना भाजण्यासाठीं लागणारी चुनखडी आणि चुन्याचे दगड हे माती किंवा दुसर्या कोणत्याहि अशुद्ध पदार्थांशीं मिश्र नसावें. चुना ज्या कामासाठीं पाहिजे त्या कामाजवळच चुना भाजण्याची भट्टी असावी. घाणींत घालतांना कळीचा चुना नेहमीं ताजा असावा म्हणजे भट्टींतून काढल्यावर तो ७ दिवसांच्या आंत घाणीवर आणला पाहिजे. त्यांत राख व न भाजलेली चुनखडी व दुसरे गदळ अगदीं असूं नये. व तो उपयोगास लागेंपर्यंत कोरडा ठेवावा. घाणींत टाकण्यापूर्वी तो विरवावा आणि त्यांतून अर्धवट किंवा न विरलेली चुनखडी निवडून काढून टाकावी. विरलेला चुना चाळावा व चाळणींत राहिलेले चुनखडी निवडून काढून टाकावे. कळीचा चुना चांगला विरत नसला तर तो अगोदर तसाच घाणींत घालून चाकाचे अदमासें १० फेरे झाले म्हणजे त्यांत सुरकी किंवा वाळू प्रमाणानें टाकून पाणी घालून चुना चांगला मळेपर्यंत पाणी चालू ठेवावी. घाणींत चुना साधारण चिखलासारखा घट्ट होईल इतक्या बेताचें पाणी घालावें, जास्त घालूं नये. इमारतीचा पाया ओल्या जमिनींत किंवा पाण्यांत राहण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं हायड्रॉलिकलाईम अथवा सुरकी म्हणजे विटांची पूड मिसळलेला शुद्ध चुना किंवा पेरीलट सिमेंट किंवा दुसर्या कोणत्याहि सिमेंटचा उपयोग करावा. विरी गेलेल्या चुन्याचा किंवा हवेंत पुष्कळ वेळ राहून आवळलेल्या किंवा वाळलेल्या मळलेल्या चुन्याचा इमारतींत उपयोग करूं नये. व असला चुना कामावर न ठेवण्याची खबरदारी ठेवावी.

वाळू:- चुना व काँक्रीटमध्यें जी बारीक किंवा मोठी वाळू घालतात ती स्वच्छ व दाणेदार असून कठिण असावी; ती चाळून धुवावी, म्हणजे तींत असलेली माती, सोरा वगैरे अशुद्ध पदार्थ निघून जातील. उडून येऊन जमलेल्या किंवा समुद्रातील वाळूचा चुन्यांत अगदीं उपयोग करूं नये.

सुरकी:- सुरकी म्हणजे ताज्या भाजलेल्या (विशेष पक्क्या भाजलेल्या नसल्या तरी चालतील) विटा अथवा खापराची दळून किंवा कांडून केलेली पूड होय. ही विटांची पूड स्वच्छ असून तींत दुसरा कोणताहि पदार्थ मिश्र असूं नये. व ती एक इंचांत ६८ भोकें असतील अशा चाळणींतून गाळल्यानंतर चुन्यात मिश्र करावी.

कमावलेला चुना:- वर सांगितल्याप्रमाणें चुना १ भाग व वाळू १॥ किंवा २ भाग या प्रमाणानें मिश्रण करून घाणींत टाकावें व घट्ट चिखलाप्रमाणें होईल अशा बेताचें पाणी घालून ५ तासांपर्यंत घाणींत मळावे. घाणीतून तयार झालेला चुना लागलीच उपयोगांत आणावा. उपयोग करीतोंपर्यंत तो सावलींत ओला राहील असा ठेवावा. किंवा त्यावर काहीं तरी आच्छादन टाकावें. उपयोग करण्यापूर्वी जर तो आळूं लागला किंवा आळला तर तो कामांत वापरूं नये.

वाळूचा चुना (हायड्रॉलिक लाईम):- पाण्यांत ठेवल्यापासून जो चुना ७ दिवसांच्या आंत आळतो त्याला हॉयड्रॉलिक लाईम समजतात. हा चुना भाजल्यानंतर घाणींत घालून जलद बारीक करतात. व एका चौरस इंचास १५० भोकें असलेल्या चाळणींतून चाळतात. नंतर प्रमाणानें त्यांत कोरडी वाळू मिश्र करून जरूर लागेतोंपर्यंत झांकून ठेवतात. त्याचा उपयोग करणें झाल्यास ह्या मिश्रणापैकीं थोडे घेऊन घट्ट होईल इतकें पाणी घालून घाणीत चांगला मिसळेपर्यंत तो मळतात. वाळूचें प्रमाण चुन्याच्या दुप्पट किंवा तिप्पट म्हणजे चुन्याच्या योग्यतेप्रमाणें असावें. कराची बंदराच्या कामावर क्रांकीट व डबराच्या बांधकामाकरितां १ भाग पोर्टलंड सिमेंट व ४ भाग नदीची वाळू घातली आहे. व चुनेगच्ची जमीनीवर चट देण्याकरितां जो संदला करतात त्यांत १ भाग सिमेंट व २ भाग वाळू घालतात.

इ मा र ती स ला ग णा रें लां कू ड.

लां कू ड का म.- सुतारकामास वापरावयाचीं लाकडें बहिर्वर्धिष्णु म्हणजे बाहेरच्या बाजूला दर वर्षी नवीन थर बनून वाढणार्या झाडांची असतात. अंतर्वर्धिष्णु म्हणजे आंतून वाढणारीं झाडें म्हणजे नारळ, बांबू वगैरेंसारख्या झाडाचें लांकूड चिरस्थायी इमारतींत वापरीत नाहींत. करवतीनें कापून झाडांच्या गंडेर्या केल्या असतां झाड किती वर्षांचे आहे हें, त्यातील वेढे किती आहेत हें मोजून पाहिलें असतां कळतें. झाडास प्रत्येक वर्षी एक वेढा बसत असतो. ह्या वेढ्यांची रुंदी सर्व बाजूंनीं सारखींच नसते. ज्या बाजूनें ऊन व वारा जास्ती लागतो त्या बाजूला हे वेढे जास्त रुंद असतात. मध्यें गाभा त्याच्या भोंवताली तांबूस किंवा गहिर्या रंगाचें वेढे व त्याच्या सभोंवती पिंवळसर पांढरे असे वेढे असतात. हे बाहेरचे थर कोंवळे म्हणजे पक्के न झालेले असतात. ह्यास्तव असा पांढर्या रंगाचा भाग तासून काढून नंतर लाल, तांबूस, पक्क्या रंगाचें लांकूड इमारतींत वापरतात. पांढर्या लांकडाला, ते मऊ असल्याकारणानें फार लवकर भुंगा लावतो व अशा लांकडाला वाळवीहि फार जलद लागते. लांकूड लाल, तांबूस पक्कें किंवा कठिण असलें म्हणजे ह्या कीटकांचा कांहीं उपाय चालत नाहीं. साग, साल, शिस वगैरे लांकडांना बहुतकरून वाळवी लागूं शकत नाहीं. शिसवीचें लाकूड कठिण व मजबूत असतें परंतु तें फार थोडें मिळतें. म्हणून साधारण बांधकामाकडे त्याचा उपयोग करतां येत नाहीं. परंतु त्याला पॉलिस चढूं शकतें, म्हणून त्याचा खुर्च्या, टेबलें, कपाटें, जाळ्या वगैरेसाठीं उपयोग करतात. चिरस्थायी इमारतींसाठी बहुतकरून सागाचाच उपयोग करतात. हें फार जड नसून याचा कठिणपणाहि बेताचाच असतो. व ब्रह्मदेशांतून वगैरे येणार्या सागाला तर उत्तम पॉलिसहि चढतें व खेरीज त्याला वाळवीहि बहुतकरून लागत नाहीं. या कारणास्तव त्याचा उपयोग सुतारकामांत फार करतात. कोणत्याहि झाडांतील रस वसंत ॠतूमध्यें वर चढत जातो व ह्यामुळें पालवी, फुलें, फळें वगैरे येतात. अशा वेळीं कोणतेंहि झाड तोडलें असतां त्याचें लांकूड कठिण निपजत नाहीं. कारण त्याच्या शिरांतून ह्यावेळीं रस असतो. त्याचप्रमाणें थंडीच्या दिवसांत रस खाली उतरतो. त्यामुळें झाडांची पाने गळून पडतात. म्हणून ज्यावेळी झाडांतील रसासिरण बंद  असेल अशा वेळीं ती तोडली असतां त्यांचें लाकूड मजबूत निपजतें. झाडाची वाढ पूर्ण झाली म्हणजे त्यांतील आंतला भाग मजबूत व कठिण होतो. अशा वेळीं तें तोडले असतां त्याचें लांकूड चांगलें मजबूत आहे असें आढळून येतें. ही त्याची अवस्था उलटून गेली म्हणजे झाडांनां एक प्रकारचा वृद्धापकाळ येतो. व नंतर जसजसा काळ जाईल तसतसें त्यांचें लांकूड कममजबूत होतें. झाड कापल्याबरोबर त्याच्या चारी बाजूंकडून चार खापी करवतून टाकल्या म्हणजे तें लवकर वाळतें. व सर्व बाजूंनीं त्याला हवा लागल्याकारणानें ते चांगले मुरते. तसेच ते सावलीत वर्ष दोनवर्ष पडूं दिले म्हणजे ते चांगले मुरुन पुढें वांकडें होण्याची किंवा फाण्याची भीति रहात नाहीं. झाडामध्यें देवदारासारखीं लांब धाग्याचीं जी झाडें असतात. त्यांत टरपेनतेल बहुतकरून असतें. त्यांच्या मोठमोठ्या लांबीच्या फळ्या काढतां येतात. पण तें लांकूड कममजबूत व नरम असतें व त्याचे धागे एकमेकांनां फार जोरानें चिकटलेले नसतात. त्यामुळें त्याचा चिरस्थायी कामांत उपयोग करीत नाहींत. कोणतेंहि झाड धीमे धीमे वाढलेलें असलें म्हणजे त्याचें लांकूड बहुतकरून मजबूत असतें. जें लांकूड करवतलें असतां आंतून गहिर्या रंगाचें निघतें व ज्याचे तंतू किंवा कापलेला भाग लोंकरीसारखा विळविळीत किंवा मऊ असत नाहीं असें लांकूड वापरावें. लांकूड दोन वर्षे मुरून दिले म्हणजे सुतारी कामाला तें योग्य होतें व चार वर्षे मुरलें म्हणजे झडपा, खुर्च्या, टेबलें, कपाटें वगैरे नाजूक सांधकाम करण्यास योग्य होतें. लांकूड लवकर मुरविण्यासाठीं किंवा रापविण्यासाठीं १०।१५ दिवस तें पाण्यांत बुडवून ठेवतात. त्याच्या योगानें आंतील रस धुवून जातो. हा रस आंतच राहिला तर तो नासल्यामुळें लांकडास कीड लवकर लागते. पाण्यांतून बाहेर काढल्यावर लांकूड हवेंत वाळूं देतात. म्हणजे तें नंतर वांकडें होत नाहीं किंवा फाटत नाहीं. बाभळीचें लांकूड त्याच्या सालीसह सुमारें ३/४  तास पाण्यांत घालून उकळविलें म्हणजे सालींतील तुरट द्रव्य आंतील लांकडांत मुरल्याकारणानें त्याला भुंगा लागत नाहीं. व त्यापासून केलेली गाडीची चाकें ५।६ वर्षे टिकतात. साल, साग हीं लांकडेच चिरस्थायी इमारतींत वापरावयाजोगी आहेत. कोणत्याहि लांकडाला विरविलेला चुना लागूं देऊं नये. तो लागला असतां लांकूड लवकर सडतें. हवेंतल्या दमटपणामुळें लांकडावर होणारा दुष्परिणाम, लांकडाला तेलांत कालवून रंग लावला असतां होऊ शकत नाहीं. ज्यांच्या कडांनां कीड लागते अशीं लांकडें कांहीं रासायनिक द्रव्ये पाण्यांत विरवून अशा पाण्यांत ती बुडवून ठेवल्यानें त्यांनां कीड लागेनाशी होते. अशा लांकडांना भुंगा किंवा वाळवीहि लागत नाहीं. अशा रासायनिक द्रव्यांपैकी रसकापूर (करोझिव्ह सव्लिमेट किंवा क्लोराईड ऑफ मर्क्युरी) व जस्ताचें हरित (क्लोराईड आफ झिंक) मोरचूत (कॉपर सल्फेट) ही आहेत. च्यापैकी मोरचूत जेव्हां वापरतात तेव्हां एक ग्यालन (म्हणजे १० पौंड किंवा ५ शेर) पाण्यांत पाव पौंड (अदपाव) मोरचूत विरवून अशा पाण्यांत लांकडे बुडवून ठेवतात. ह्या बुडविलेल्या लांकडांची जितके इंच जाडी असेल त्याच्या दुप्पट दिवसपर्यंत तीं बुडवून ठेवावींत व नंतर सावलींमध्यें सुकूं द्यावीं. ह्याखेरीज दुसरा एक प्रकार असा आहे कीं, क्रिओसोट नांवाचें तेल (अर्क काढण्याच्या भट्टींत लांकडे घालून त्यापासून जो एक प्रकारचा धुराची घाण येणारा अर्क निघतो तो) हें ज्या लांकडाला कीड लागू नये म्हणून तयार करावयाचें असेल अशीं लांकडें मोठ्या पेटीत घालून त्यांतील हवा वाताकर्षक यंत्रानें काढून घेऊन नंतर त्या पेटींत क्रिओसोट तेल पंपानें घालून त्या तेलावर दर चौरस इंचास १५० पौंड इतका भार येईल. अशा रीतीनें तें तेल दाबतात व हा दाब बरेच दिवसर्यंत असाच कायम ठेवतात. वाताकर्षणानें लांकडाच्या केंसासारख्या बारीक रंध्रांतून असणारी हवा व दमटपणा हीं काढून घेतल्या कारणनें ती मोकळी झालेलींच असतात व त्यांत हें दाबलेलें तेल स्वभावत:च प्रवेश करतें. व अशा रीतीनें लांकडाच्या वजनाच्या १/१० इतकें तेल त्यांत कायमचें जाऊन बसतें व ती लांकडे बाहेर काढल्यानंतर ह्या तेलाच्या दर्पामुळें कोणत्याहि प्रकारची कीड किंवा वाळवी त्याला लागूं शकत नाहीं. कापीव लांकूड हे किती घनफूट आहे हें त्याची लांबी, रुंदी व जाडी यांचा गुणाकार करून काढतात.

गोल म्हणजे अनघड लांकूड मोजावयाचें असल्यास त्याच्या मधोमध दोरीनें त्याचा परिघ मोजून त्या परिघाच्या चौथ्या भागाइतक्या मापाचें तें चौरस तुळवंट आहे असें समतून त्या तुळवंटाच्या लांबीनें गुणून त्याचें घनफळ काढतात. २४ इंचांपेक्षां कमी घेराचें लांकूड इमारतकामाला फारसें उपयोगाचें नाहीं असें समजून उभ्या झाडाचें माप घेतानां २४ इंचांपेक्षां जास्ती घेर आहे तेथपर्यंतची उंचीच मापतात. व त्याच्या निम्म्या उंचीवर घर घेऊन त्याचें घनफळ काढतात.

मुंबई इलाख्यांत सुतारकामांत वगैरे लांकडे वापरतात त्यांच्या जाती: वाळलेल्या लांकडाचें दर घनफुटी वजन; ताण पडला असतां दर चौरस इंचावर भार सोसण्याची त्यांची शक्ति; व लांकूड आडवें ठेवल्यास दर चौरस इंचावर भार सोसण्याची शक्ति यांचें कोष्टक (आंकडे पौंडांचे):-

लांकडाची वाळक्या लांकडाचें ताण सोसण्याची आडव्या
जात घनफूट वजन शक्ति लांकडाची शक्ति
सागवान ४२ ते ५२ १४००० ६८०
चिंच ७९ २०००० ८१०
शिसवी ५० २०००० ९१०
फणस ४४ १६००० ७८०
आंबा ४२ ७७०० ५६०
खैर ७० ... ७७०
कळंब ४२ ... ६६०
हिरडा ५४ ७५०० ८२०
सावरी २३ ... ६३०
बकुळ ७० १९००० ९४०
रायणी ७० .... ९४०
अर्जुन ५४ १६००० ८२०
निंब ३० ... ५९०
अंजन ८२ १२००० ९४०
मोव्हा ६६ ... ७६०
ऐन ६० २२००० ८६०
होनागी ४२ १०००० ५००
बाभूळ ५४ १६८०० ८७०
शिरीस ५५ ... ५३०

वरील कोष्टकांत शेवटच्या रकान्यांत दिलेल्या आंकड्यांनी कोणत्याहि बहालाच्या रुंदीला त्याच्या जाडीच्या वर्गानें गुणून (जाडी व रुंदी इंचांत दिलेली असावी) बहालाचा गाळा जितक्या फुटांचा असेल त्यानें भागिलें असतां तितक्या पौंडांचें वजन बहालाच्या मधोमध ठेवलें असतां तें बहाल मोडेल असा हिशोब समजावयाचा. जितक्या पौंडांनीं बहाल मोडेल त्याच्या १० वा हिस्सा वजन बहालावर नेहमीं ठेवण्यास हरकत नाही असें समजावें.

ऐनाचें लांकूड:- हें भुरकट तांबूस रंगाचें, कठिण, साधारण जड, पाण्यांत टिकणारें परंतु अंमळ भरड तंतूंचें व काम करण्यास कठिश असें असतें. हें मुरावयास तोडल्यापासून १२ ते १५ महिने लागतात. याला वाळवी बहुतकरून लागत नाहीं. याचा चांगला कोळसा पडतो.

अंजनाचें लांकूड:- हें काळसर रंगावर व जड असतें. त्याचें खांब चांगले होतात. सुतारकामास तें अवघड असतें.

अर्जुन:- भुरकट काळसर रंगाचें व जड आणि फार मजबूत असून त्याच्या डोलकांठ्या, बहालें, वासें, वगैरे करतात. सुतारकामास तें अवघड असतें.

बाभूळ:- आंतला गाभा तांबूस भुरकट असतो. व हें कठिण, चिवट आणि जड असतें. हें टिकाऊ असल्यामुळें त्याचा पुष्कळ उपयोग करतात. गाड्यांचीं चाकें, आरे, पुठ्ठे, तुंबे वगैरे आणि शेतकीची आऊतें याचीं करतात. याची आंच दांडगी असते व कोळसा चांगला पडतो.

बकुळ:- हें लांकूड जड व घट्ट असतें. हें किंचित् गुलाबी रंगावर असतें व त्याला पॉलिश चांगलें चढतें.

हिरडा:- हें दक्षिण हिंदुस्थानांत घरकामांत वापरतात. हें हलकें व भरड आणि ढिसूळ असतें. याची फळें रंगांत वापरतात.

फणस:- याची सावली फार दाट असतें. व फळेंहि पुष्कळ येतात. याच्या लांकडाचा रंग पिवळसर व उघड्यावर राहिल्यावर धुरकट बनतो. हें लांकूड ठिसूळ असतें.

जांबा, आणि होनागी व होनें:- हीं दक्षिण हिंदुस्थानांत सांपडतात. व त्यांचा घरकामाकडेहि उपयोग करतात.

कळंब:- याच्या फळ्या चांगल्या होतात. व कोतर म्हणजे कोरीव कामाकडे याचा उपयोग करतात.

खैर:- हें चांगले मुरतें, व याला चांगलें पॉलिश चढतें व हें टिकाऊ असतें. यास वाळवी लागत नाहीं. हें झाड लहान असल्याकारणानें याचें जाड लांकूड मिळत नाहीं. याची चाकें करतात.

आंबा:- याचीं स्वादिष्ट फळें सर्वांस माहीत आहेतच, परंतु याचें लांकूड हलक्या जातीचें, भरड व भुरकट रंगावर असतें. व भिजलें असतां सडतें. आणि याला वाळवी फार लागतें. हें हलक्या कामांत-दरवाजे, फळ्या, वगैरेस वापरतात. हें लांकूड अतिशय ढिसूळ असल्याकारणानें याला बहालासाठी कधींहि उपयोग करूं नयें.

मुंबईच्या बाजारांत अमेरिकेहून येणारा देवदार सीलिंगसाठीं म्हणजे छतासाठीं वापरतात आणि ऑस्ट्रेलियांतून करीं व जरा लालटीन नांवाचें कठिण व जड तांबूस रंगाचें लांकूड येतें. हें मजबूत असतें, परंतु तडकतें. हें सुतारकामास कठिण असतें.

सागवान:- देशी सागवानापेक्षां ब्रह्मदेशांहून मुरमीन वगैरे बंदरांतून येणारें सागवान फार उत्तम प्रतीचें असतें. जोहोरहून येणारें सागवान फार जड व मजबूत असतें. आणि दिसावयास शोभिवंत असें सागवान विंध्याचलांच्या जंगलातून येतें. मलबारी साग हें ब्रह्मी सागापेक्षां जास्ती काळसर रंगाचें असून फार मजबूत असतें. परंतु त्यांत गांठी, शिरा, वगैरे जास्ती असतात. त्या लांकडाला, त्यांत एक प्रकारचें उग्र वासाचें तेल असल्यामुळें बहुधां वाळवी लागत नाहीं.

शिरीस:- हें ४० पासून ५० फूट उंचीचें व ५ ते ६ फूट पर्यंत घेराचें असतें. व त्याला पालवी चांगली येतें आणि सुवासिक फुलें येतात. याचीं दक्षिण हिंदुस्थानांत चाकें वगैरे करतात. आणि उत्तरहिंदुस्थानांत पेट्या वगैरे करतात.

शिसवी:- या झाडाचा आंतला गाभा काळसर तांबूस किंवा भुरकट रंगाचा असतो. झाडाच्या बाहेरील बाजूस सुमारें १॥ इंच जाडीची पांढर्या रंगाची त्वचा असतें. यांतील काळा भाग सुमारें पाण्याइतका जड असतो. हें लांकूड सागाइतकेंच मजबूत असतें आणि जेथें हवेचा मारा नसेल अशा ठिकाणी तें सागावानाइतकेंच टिकतें व पाण्यांत चांगलें टिकतें. परंतु थोडा वेळ ओलें राहिलें व थोडा वेळ वाळलें तर फार लवकर किडतें व उन्हांत राहिलें तर तडकतें. परंतु त्यावर पॉलिश चढत असल्यामुळें व तें मजबूत असल्यामुळें खुर्च्या, टेबले, कोच, कपाटें वगैरे नक्षीकामाकडे त्याचा फार उपयोग करतात.

चिंच:- याची छाया फार गर्द असल्यामुळें छायेकरतां व फळाकरतां हीं झाडें  फार लावतात. हें फार सावकाश वाढतें व याचा मोठा वृक्ष बनतो. त्या लांकडाचा गाभा फार कठिण काळसर तांबूस रंगाचा असतो. यामुळें सुतारकामास हें लांकूड फार जाचतें. परंतु याचा कांतकामाकडेस उपयोग करतात. तसेंच तेल्याचे घाणे, गुर्हाळाचे घाणे, मोठाले मोगर, रंध्याचीं खोडे वगैरे जिन्नस करतात. याची आंच फार असते. यामुळें विटा भाजावयास याचा उपयोग फार करतात. साल वृक्षाचें लांकूड वजनांत दर घनफुटास ६२ पौंड आणि देवदार (डील) ४० पौंड भरतें, कोणत्याहि बांधकामांत वापरावयाचें लांकूड झाडाच्या गाभ्याजवळचें असेल तितकें चांगलें.

जेव्हां लांकडाच्या वजनाचा एकपंचमांश वाळून जाईल तेव्हां तें मुरलें असें समजावें. आणि जेव्हां त्याचें वजन कमी होत होत एकतृतीयांश इतकें घटेल तेव्हां तें पुरें वाळलें व सांधे करून चौकटी वगैरे बनविण्याजोगें झालें असें समजावें. ज्या बहालांतून किंवा बीमांतून वासे, पाखाड्या, किंवा अशाच प्रकारचे लहान डाग करवतून काढणें असेल तेव्हां तें बहाल चांगले मुरलेले असलें पाहिजे. व असें करवतलेले नगहि बरेच महिनेपर्यंत मुरत ठेवावे. आणि ते कामांत वापरले तरीहि पुरतेपणीं वाळल्याखेरीज त्यांनां ओला रंग देऊं नये.

शेतकीच्या आउताला उपयोगी पडणारीं लांकडें बाभूळ, जांभूळ, अंजन, रायणी, कळंब, साग, अर्जुन, व बोर. बहालासाठीं बाभूळ, जांभूळ, अंजन, बकुळ, रायणी, मोह, साग, अर्जुन दरवाजे व खिडक्यांसाठी, मोह, फणस, तूण, साग व बाभूळ, शिसू, धामणी, आंबा, लिंब, ह्यांच्या चौकटी वगैरे करतात. पायासाठीं ठोकावे लागणारे लांकडी खुंट, खैर, अंजन, रायणी, साग वगैरेंचे करतात. फळ्या सावरी, शिवणी, आंबा, मोहा, साग, हिरडा, कांचन ह्यांच्या करतात. घरासाठीं लागणारे खांब, वासे, पाखाड्या वगैरेसाठीं बाभूल, खैर, शिरीस, कीन्हई, फणस, मोह, शिसू, जांभूळ धामणी, अंजन, लिंब, रायणी, साग, अर्जुन, ऐन, हिरडा वगैरे झाडांची लांकडें वापरतात. विहिरी बांधतांना लांकडाचें चक्कर करून कुंडी उतरविणें झाल्यास पळस, बाभूळ, खैर, शिरीस, कीन्हई, फणस, मोह, शिसू, जांभूळ, शिवणी, अंजन, आंबा, चिंच, साग, अर्जुन आणि शमी ह्या झाडांची लांकडें वापरतात.

बांधकामाला किंवा इमारतींनां लोखंड, शिसें, तांबे, जस्त व त्यांच्या मिश्रणानें बनविलेले मिश्र धातू ह्यांचा उपयोग करतात. त्यांचे खिळे, स्क्रू, बोल्ट, पट्टया, वरचे, बहालें, खांब, नळ्या, गटारें, आच्छादनार्थ पत्रें, हीं सर्व बहुतकरून लोखंडाचीच करतात. या सर्व धातू अशुद्ध स्थितींतच सांपडतात. म्हणजे त्या धातूंचा प्राणवायूशीं किंवा गंधकाशीं किंवा कर्बाम्लाशीं संयोग होऊन त्यांची एक जातीचीं भस्मे बनलेली असतात. व ह्या भस्मरूपी दगडांतून शुद्ध धातु काढावयाचा म्हणजे भट्टींत घालून खूप आंच देऊन व वेगवेगळे पदार्थ त्यांत घालून वरील पदार्थांच्या म्हणजे प्राणवायुगंधक किंवा कर्बाम्ल ह्यांच्या मिठींतून त्यास सोडविणें म्हणजे त्यांचा विसंयोग करणें होय. ज्या ठिकाणीं लोखंडाचें दगड सांपडतात व अशा दगडांत निदान चौथा हिस्सा तरी शुद्ध लोखंड असेल व ह्याच खाणींत तें वितळविण्यास लागणारा कोळसा व चुनखडी हीं सांपडत असलीं तर अशा खाणींतून लोखंड काढणें फायद्याचें पडतें. लोखंडाच्या दगडांत जर मृत्तिका असेल तर त्याच्या शोधनास चुना घालावा लागतो व चुना असल्यास मृत्तिका घालावी लागते. ज्या वेळीं दगडी कोळसा वापरतात त्यावेळीं भात्यानें, आंत जोरानें सोडावयाची किंवा फुंकावयाची हवा तप्त असावी लागते. ह्या जोराच्या फुंकण्यानें भट्टींत अतिशय उष्णता उत्पन्न होते व कोळशांतील कर्बापैकीं कांहीं भागाचा शुद्ध झालेल्या लोखंडाशीं संयोग होऊन तें वितळून विडाच्या रूपानें प्रवाही स्थितींत तळाला बसतें. व नंतर तो रस भट्टीचा दरवाजा उघडून मोठमोठाल्या लांब चरांत सोडतात. हे चर ओतार कामासाठी जशा प्रकारची वाळू लागते तशा प्रकारच्या वाळूचे केलेले असतात व यांनां दोन्ही बाजूंना फांटे फोडलेले असतात. नंतर हे ओतलेले तुकडे थिजून कठिण झाले म्हणजे तेच ओतकामाला लागणारें बीड म्हणून सांठवून ठेवतात. बीड तयार होण्याला शुद्ध लोखंडांत त्याच्या वजनाच्या निदान ५० व्या भागाइतका कार्बन रासायनिक क्रियेने मिळाला म्हणजेच तें वितळतें व त्याचें बीड बनतें. लोखंडाच्या वजनाच्या शेंकडा २ पासून ६ इतका कर्ब मिळालेला असला म्हणजे तें बीड (कास्ट आयर्न) व ह्या कर्बापैकीं कांहीं भाग भट्टींत असतांनाच जास्ती हवा फुंकून, तो जाळून टाकला म्हणजे त्याचेंच पोलाद बनतें. पोलादांत सुमारें दर शेंकडा १॥ पासून अर्ध्या भागाइतका कर्ब मिसळलेला असतो. म्हणजे पोलादांत बिडापेक्षां कर्ब बराच कमी असावा लागतो. म्हणून तें शुद्ध लोखंडापेक्षां जास्ती कठिण होतें व वितळूं शकतें म्हणजे त्याचें ओतकाम करतां येतें. तेवढ्याच उष्णतेने शुद्ध लोखंड (रॉट आयर्न) विरघळत नाहीं. शुद्ध लोखंडांत कर्ब बहुतेक असत नाहीं. फार झाला तर शंभर शेरांत पावशेर असतो. लोखंड तापलेले असतांना किंवा थंड असतांनाहि बडवून किंवा हातोड्यानें ठोकून वाढवितां येतें. त्यांतच गंधकाचा थोडा तरी भाग राहिला तर तें तापविलें असतांना बडविलें तर त्याला तडा पडतात किंवा तें फुटतें. गंधकाच्या ऐवजीं फास्फरस हें मूलतत्त्व जर लोखंडांत राहिलेलें असलें तर तें लोखंड थंड असतांना ठोकलें तर तडकतें किंवा फुटतें.

बीड दोन प्रकारचें असतें; पुष्कळ कोळसा घालून फार कडक आंच दिली असतां जें बीड बनतें तें करड्या रंगाचें व दाणेदार असतें. तें लवकर वितळतें व दुसर्या जातीच्या म्हणजे पांढुरक्या रंगाच्या बिडाच्यापेक्षां नरम असतें व त्यामुळें त्याचें ओतकाम फारच सुबक बनतें पण तें मजबुतीसंबंधानें किंवा काठिण्यासंबंधानें पांढुरक्या बिडापेक्षां कमी प्रतीचें असतें. कमी आंच व कोळसा थोडा घातला म्हणजे पांढुरकें बीड निपजतें. तें शुभ्र रंगाचें, दाणेदार पैलुदार, कणांचें बनलेलें असतें. तें अतिशय कठिण पण कांचेसारखें ढिसूळ असतें व तें वितळावयासहि फार अवघड जातें म्हणून अशा बिडाचें ओतकाम सहसा करीत नाहींत. तर त्यांतील कर्ब जाळून टाकून त्याचें ठोकून घडावयाजोगें साधें लोखंड तयार होतें. बिडाचे ओतकाम करावयाचें म्हणजे भट्टीमध्ये जितकें बीड घातलें असेल त्याच्या निम्म्या वजनाइतका कोक (म्हणजे दगडी कोळशांतील धूर निघून जाईल इतकी त्यास उष्णता लावून तयार केलेला कोळसा) किंवा लांकडापासून तशाच क्रियेनें तयार केलेला लोणारी कोळसा घालून तें बीड वितळवितात व नंतर बारीक रेतीमध्यें जे ठसे उमटविलेले असतील त्या ठशांत तें सोडतात. म्हणजे त्या ठशाच्या आकाराचें जिन्नस बनतात. बिडाचे साधारण उपयोगांत येणारे जिन्नस म्हणजे कठडे, जिने, पाणी नेण्याचे नळ, खांब, रुळाच्या खाली बसविण्याच्या बैठकी वगैरे होत.

लोखंडाच्या दगडापासून आपल्या इकडे धावडे लोक तयार करीत असत तें लोखंड अतिशय शुद्ध असें व तें सध्यां परदेशांहून येणार्या शिकई लोखंडापेक्षां सुद्धां जास्ती शुद्ध म्हणजे वरच्या प्रतीचें असे. त्यांनां पाहिल्यानं बीड करून मागाहून शुद्ध लोखंड करण्याची जरूर लागत नसे. परंतु ते फार लहान प्रमाणावर करीत असत व त्यामुळें तें महाग पडे. सध्यां परदेशांतून जें लोखंड येतें तें सर्व अशुद्ध लोखंडाच्या मातीपासून किंवा दगडापासून बीड तयार करून नंतर त्यांतील कर्ब जाळून तयार केलेलें असतें. असें करतांनां भट्टीमध्यें टन दीड टन बीड घालून वितळवितात; व त्या वितळविलेल्या बिडाच्या पृष्ठभागावरून जोरानें दाबलेली हवा सोडतात म्हणजे त्या हवेंतील प्राणवायू बिडांतल्या कर्बाशी संयोग पावतो, म्हणजे कर्बाचा बराच भाग जळून जातो व तो कर्बाम्ल रूपानें निघून जातो. नंतर हें बरेंच शुद्ध झालेलें बीड पुन्हां दुसर्या भट्टींत घालून वितळवितात. ह्या भट्टींत जें जळण घातलें असेल त्याची फक्त ज्वालाच ह्या वितळविलेल्या बिडावरून जाते. ही ज्वाला जात असतां वितळविलेलें बीड लोखंडी दांड्यानें ढवळतात. म्हणजे त्या वितळलेल्या बिडाचा वेगवेगळा भाग वरच्या बाजूला येतो व त्या योगानें आंत फुंकल्या जाणार्या हवेंतील प्राणवायूची क्रिया सर्व बिडांतील कर्बावर होते व त्या योगानें कर्ब जळून जातो. असें करीत असतां मीठ, किंवा लोखंडाचें कीट किंवा गंज वगैरे पदार्थ पातळ बिडांत टाकतात व त्याच्या योगानें त्या बिडाच्या वरच्या बाजूला एक प्रकारची मळी येते. ह्या मळीवर येणार्या खरपुड्यांनांच स्लेज असें म्हणतात. व त्या खरपुड्या काढून टाकल्या म्हणजेच शुद्ध लोखंड खालीं राहतें. ही मळी म्हणजे शुद्ध बिडामध्यें जी अशुद्ध द्रव्यें असतात त्यांचीच राख झालेली किंवा आंत टाकलेल्या पदार्थांशीं संयोग होऊन बनलेलें कीट होय. बिडांतील कर्ब जळून गेला म्हणजे तें घट्ट बनतें. व त्यांतील कीट किंवा मळी काढावयासाठीं त्या घट्ट झालेल्या लोखंडाचें गोळे बाहेर काढून घणानें बडवितात म्हणजे त्यांतील मळी बाहेर निघून जाते व त्याचा एकजीव होतो. व हेंच घनवर्धनीय लोखंड होय. बिडाचें अशा रीतीनें घनवर्धनीय लोखंड करतांना त्याचा १/५ पासून ३/५ पर्यंत भाग जळून जातो. किंवा वाया जातो  व ४/५ पासून ३/४ भागच हातीं लागतो. या बडवून तयार केलेल्या गोळ्याचें उंसाच्या चरकासारख्या खोबण पाडलेल्या चरकांतून दाबून लाटी, लगडी किंवा कांबी बनवितात. व त्या कापून व तापवून पुन्हां चरकांतून काढतात व अशा रीतीनें त्या लोखंडाला घनता व तंतुमयता येईपर्यंत वरचेवर चरकांतून ओढून काढतात. या वर सांगितलेल्या पद्धतीला खर्च कमी लागत असल्यामुळें जरी ती उपयोगांत आणतात तरी कधीं कधीं एकाच भट्टींत बीड करणें व त्यांतील कर्ब जाळून टाकणें हेंहि करतात परंतु यांत कोळसा फार लागतो व लोखंडहि फार वाया जातें. वर सांगितलेल्या नुसत्या हवा दाबून फुंकण्याच्या पद्धतींतहि कधीं कधीं थोडा फार फरक करतात. व ह्यांत भट्टींमध्यें वितळविलेल्या बिडाच्या तळांतून वाफ सोडतात. त्या वाफेच्या योगानें तें वितळलेलें बीड आपोआप हलूं लागतें किंवा खदखदूं लागतें व त्या वाफेतील घटक प्राणवायू ह्याचा बिडांतील कर्बाशीं संयोग होऊन कर्ब जळून जातो व त्यांतील म्हणजे वाफेंतील उज्ज (हायड्रोजन) ह्याचा बिडांतील गंधक व फास्फरसशीं संयोग होऊन सर्व मळ जळून जातो.

घनवर्धनीय लोखंडाचें खिळे, स्क्रू, पट्टया, गज, पत्रें, बहालें वगैरे वस्तू करतात. हें लोखंड चांगलें असलें म्हणजे त्याचा रंग निळसर करडा असतो व त्याचा गज तोडला असतां त्यांत रेशमासारखा तुकतुकीतपणा असावा व तें तंतुमय असावें. तें जर तंतुमय नसेल व तें जर स्फटिकासारखें दाणेदार किंवा खपल्याखपल्याचें बनलेलें आहे असें दिसेल तर ते कममजबूत आहे असें समजावें. चांगलें धनवर्धनीय लोखंड नेहमीं फार चिवट असतें व ते घणानें ठोकलें असतां वाढते व त्याची ओढून तारहि काढतां येतें. तें पांढरें (व्हाइट हीट) दिसेतोंपर्यंत तापविलें म्हणजे त्यास ठोकून वाटेल ती आकृति देतां येते. व तशाच लोखंडाचा दुसरा तुकडा तितकाच तापवून (म्हणजे पांढरा दिसेल इतका) त्याच्यावर ठेवून घणानें ठोकलें असतां त्या दोहोंचा एकजीव होऊन जातो व त्याचा सांधा कोठें झाला आहे हेंहि कळत नाहीं. असा सांधा करतानां दोन्ही तुकड्यांवर गंज असतां उपयोगी नाहीं. गंज असल्यास तापविलेल्या कांबावर थोडी माती किंवा रेती टाकतात म्हणजे त्याच्यायोगानें गंजाचा मातीशी संयोग होऊन एकप्रकारची पातळ मळी बनते. व ती दोन्ही कांबी एकेठिकाणीं करून ठोकल्या म्हणजे निघून जाते व दोन्ही कांबीचा एकजीव होतो.

घनवर्धनीय लोह म्हणजे साधारण रीतीनें ज्याला आपण लोखंड म्हणून म्हणतो तें तयार झाल्याबरोबर चरकांत घालून त्या चरकांत अशा प्रकारची भोकें किंवा खोबणी पाडल्या असतील त्या आकाराचें डा दाबून खेंचून काढतात. चौरस खोबण पाडली म्हरजे त्यांतून चौरस गज दाबून निघतात. अशा गजांनां १ इंच, २ इंच, २॥ इंच गज अशीं नावें देतात. १ इंच गज म्हणजे १ इंच रुंद व १ इंच जाडीचा व २॥ इंच गज म्हणजे २॥ इंच रुंद व २॥ इंज जाड असे मोठमोठ्या लांबीचे तुकडे बनवितात. चरकांतील खोबणी गोल आकाराच्या असल्या म्हणजे त्यांतून दाबून काढलेले तुकडे गोल सळईच्या आकाराचे बनतात. अशा तुकड्यांना ते अर्धा इंच व्यासाचे असल्यास अर्धा इंची सळई म्हणतात. व १॥ इंच किंवा २॥ इंच व्यासाचें असल्यास १॥ इंची किंवा दोन इंची लाट असें म्हणतात. गज किंवा लाटी किंवा सळ्या तयार करतेवेळी चरकांत ज्या खोबणी पाडलेल्या असतात. त्यांपैकीं अर्धी खोबण एकांत व अर्धी दुसर्या भागांत पाडलेल्या असतात. वर्तुळाकृति सळ्या किंवा लाटी दाबून काढावयाचे जे रोलर असतात त्या प्रत्येक रोलरमध्यें अर्धवर्तुळाकृति खोबण पाडलेली असते, म्हणजे दोन्ही अर्धवर्तुळे मिळून एक गोलाकृति सळई किंवा लाट तयार होते. चौरस गज तयार करावयाचे असल्यास त्यांच प्रत्येक रोलरमध्यें म्हणजे रुळामध्यें त्रिकोणाकृति खोबण पाडलेली असते. ही त्रिकोणाकृति समभूज काटकोनत्रिकोणाकृति अशी असते म्हणजे दोन्हीं रुळांतले त्रिकोण मिळून एक समभुज चौकोन तयार होतो व ह्या आकाराचे गज त्यांतून दाबून निघतात. ह्याच खोबरी मिळून L अशी आकृति तयार होत असेल तर त्यांतून दाबून काढलेल्या डागांना अँगल आयर्न कोण लोह असें म्हणतात. ह्या खोबणी T ह्या इंग्रजी अक्षराच्या आकाराच्या असल्या म्हणजे त्यांतून दाबून काढलेल्या तुकड्यांनां ट्रँगल किंवा T लोह असें म्हणतात. व त्या दोन्ही खोबणी मिळून जर N सारखा आकार बनत असेल तर त्यांतून दाबून काढलेल्या आकृतीस H आयर्न किंवा H लोह म्हणतात. T लोह व H लोह ही पुलाच्या कामाला व कोठेंहि जोडकाम करावयाचें असेल त्यावेळीं उपयोगी पडतात व H लोह लहान आकाराचें असेल त्यावेळीं उपयोगी पडतात व     लोह लहान आकाराचें (रोल्ड जॉइस) असल्यास म्हणजे चरकांतून दाबून काढून बनविलेले असल्यास तें लोखंडी वरघे किंवा कड्या ह्या रूपानें इमारतींत वापरतात. ह्याच आकाराचें मोठाले नग असतात त्यांनां गर्डर म्हणजे लोखंडी बहालें असें म्हणतात व अशी बहालें सात आठ इंच रुंद व २४ इंचापर्यंत जाडीची किंवा खोलीची मिळतात व त्याचा ३०।३५ फूटपर्यंत गाळ्यांच्या तुळ्यांच्या किंवा बहालांच्या कामीं उपयो होतो. हे दाबून काढावयाचे चरक म्हणजे उंसाच्या रस काढावयाच्या चरक प्रमाणें दोन रोलरचे म्हणजे रुळांचे बनलेले असतात व ते सांच्याप्रमाणेंच फिरतात. व ह्यामुळें चरकांत ऊंस दाबून पुढें ढकलला जातो त्याचप्रमाणें ह्या रुळांमध्ये एकदां  लावलेला लोखंडाचा तुकडा दाबला जाऊन रुळांतील खोबणीच्या आकाराचा बनून बाहेर पडतो. असे दाबून काढलेले गर्डर तर ४५ फूट लांबीपर्यंत म्हणजे सुमारें २ टन वजनाचे सुद्धां तयार करतात. त्याचप्रमाणें बहालांचेहि तुकडे ३०-४० फूट लांबीपर्यंतचें मिळतात. परंतु असें पातळ म्हणजे हलके डाग फार लांबीचें असले म्हणजे ते स्वतःच्या वजनानेच वांकण्याचा फार संभव असतो व ते रेल्वेंतून नेण्यासहि मोठ्या लांबीची व्यागन किंवा डबा लागतो. त्याचप्रमाणें आगबोटींत घालावयाच्या व काढावयाच्यावेळीं त्याचप्रमाणें आंत रचून ठेवण्यासहि बरीच अडचण पडते व खेरीज कोणत्याहि नग फार जड असला म्हणजे तो जागचा हलवावयास व जागीं उचलून बसवावयास फार त्रास पडतो म्हणून हे चरकांत घालून काढलेले डाग जरी वाटेल तितक्या लांबीचे काढतां येतात तरी ते १२, १६, २०, २४ फुटांपर्यंत साधारण रीतीनें तयार करतात. या रूळांतील खोबणी आगगाडीच्या रुळाच्या आकाराच्या म्हणजे सुमारें २॥ इंच रुंद व ५ इंच उंचीच्या डमरूच्या आकाराच्या करून त्यांतून दाबून काढून आगगाडीचे रूळ बनवितात. हे २० पासून ३० फूट लांबीपर्यंतचे असतात. त्याचप्रमाणें खोबणी ज्या आकाराच्या कराव्यात तशा वाटेल त्या आकाराचें नग निघूं शकतात व त्याप्रमाणें ते काढतात.

ज्याप्रमाणें गज, सळ्या, लाटी, आगगाडीचे रूळ, कोणलोह, 'टी' लोह वगैरे त्या त्या आकाराच्या खोबणी चरकाच्या रुळांत पाडून दाबून ओढून काढतात त्याचप्रमाणें खोबण न पडलेल्या अशा रुळांमधून दाबून लोखंडी पत्रें व छरपट्टया काढतात. व घरावर घालावयाचे नळीचे पत्रे असतात ते तशाच आकाराच्या पृष्ठभागावर एकमेकांत बसतील अशा प्रकारच्या गंडेर्या पाडलेल्या रुळांमधून दाबून काढतात. व अशा रीतीनें ज्या कामीं इतका पातळ पत्रा, त्याच्या कममजबुतीमुळें उपयोगांत यावयाचा नाहीं अशा कामाला वापरतां येतो. म्हणजे ज्या साध्या पत्र्यावर मनुष्य उभा राहिला असतां तो लागलीच वांकून जातो असचा पत्रा वांकवून त्याच्या नळ्या पाडल्या म्हणजे तशाच पत्र्यावर मनुष्याला सहज रीतीनें उभें राहतां येतें. हे पत्रे अशा रीतीनें रुळांतून काढल्यानंतर त्यांचा पृष्ठभाग रासायनिक रीतीनें स्वच्छ करून वितळविलेल्या जस्तांत बुचकळून काढतात व अशा रीतीनें ते न गंजणारे बनतात. लोखंड कोरड्या हवेनें गंजत नाहीं पण ओल्या किंवा दमट हवेनें फार लवकर गंजतें. लोखंडावर थोडासा गंज चढला म्हणजे तो गंज व लोखंड यांच्यामध्यें एक प्रकारचा विद्युत्प्रवाह चालू होतो व त्यामुळें गंज वाढतच जातो. कारण हवेंतील प्राणवायूचा बाकी राहिलेल्या शुद्ध लोखंडांवर परिणाम होण्यास त्याची मदत होतो. व अशा रीतीनें कांहीं दिवसांनी त्या सर्व लोखंडांचा गंजच बनतो. लोखंडावर जस्ताचा एक प्रकारचा मुलामा चढविल्याच्या योगानें लोखंडाचें रक्षण होतें व तें पुष्कळ दिवस टिकतें. व अशा रीतीनें घरावर घालावयाचे पत्रे, पाणी न्यावयाच्या बादल्या, पिपें, हौद, वगैरे ज्या पत्र्यांचे करतात त्या पत्र्यांवर जस्त चढविलेलें असतें. ज्याप्रमाणें जस्त चढविल्यानें लोखंडाचें रक्षण होते त्याचप्रमाणें कथील चढविल्यानेंहि होतें. अशा कथील चढविलेल्या पत्र्यांना टिनचे पत्रे म्हणतात. परंतु खरोखर ते पत्रें लोखंडाचे असतात व त्यावर कथील चढावलेलें असतें. अशा प्रकारचे पत्रे, राकेलचे डबे व लहान डब्या वगैरे करण्याकडे वापरतात. व हे पत्रे जस्त चढविलेल्या पत्र्यांपेक्षां पुष्कळ पातळ असतात. तापविलेलें डामर (कोल टिन) लोखंडाच्या पत्र्याला लाविलें असतां ते पत्रें गंजेनासे होतात.

पोलाद:- म्हणजे शुद्ध लोखंडाशीं त्याच्या वजनाच्या शेंकडा अर्ध्यापासून दीडपर्यंत कर्ब संयुक्त झालेला पदार्थ होय. व तें तयार करतांना शुद्ध लोखंडांत वर सांगितलेल्या प्रमाणांत कर्ब घालतात व अशा रीतीनें तयार केलेलें पोलाद उत्तम प्रकारचें होतें. याखेरीज दुसरेहि कारखाने पोलाद तयार करतात. तें करण्याची रीत म्हणजे बीड वितळवून त्यांत असणारें शेंकडा ४ पासून ५ पर्यंत कर्बाचें प्रमाण त्यांतील जास्ती असलेला कार्बन जाळून टाकून तो शेंकडा १ पासून १॥ पर्यंत राहिला म्हणजे कर्ब जाळून टाकण्याचें काम बंद करतात. पण अशा रीतीनें बनविलेले पोलाद वर सांगितलेल्या रीतीच्या पोलादाइतकें चांगलें नसतें. शुद्ध लोखंडापासून कार्बन त्यांत घालून तयार करण्याची जी रीत सांगितली त्या रीतींत भट्टींतील उष्णतेनें न वितळणार्या मातीची मोठी लांब पेटीसारखी मूस तयार करून त्या मुशीच्या तळाशीं किंवा बुडाशीं साध्या लांकडाच्या कोळशाची पूड ह्या पुडीच्या १ / १०   वजनाइतकी लांकडाची राख व साधें खावयाचें मीठ हीं पसरतात. व त्यावर शुद्ध लोखंडाच्या गजांचा किंवा सळ्यांचा थर करतात व त्या थरावर वर सांगितलेल्या मिश्रणाचा एक थर करतात व त्यांवर पुन्हा सळ्यांचा व मिश्रणाचा थर, असें करीत करीत ती पेटी भरतात व नंतर ती पेटी सहा पासून आठ दिवसपर्यंत तापलेली लाल राहील अशी व्यवस्था करतात. व नंतर ही मूस निवूं देतात. मूस निवाल्यावर सळ्या बाहेर काढून पाहतां त्यांच्यावर बारीक फोड आलेले दिसतात व त्यांच्यात आंतपर्यंत कर्बाचा शिरकाव झालेला दिसून येतो. हें तयार झालेलें पोलास एक जातीचें व्हावे म्हणून ह्या सळ्या पुन्हां भट्टीत घालून वितळवितात. व त्यांत आणखी थोडा कर्ब व मँगेनीज नांवाचा धातु घालतात. ह्याच्यापासून फार उत्तम प्रकारचे व शुद्ध एकजात व कठिण जातीचें पोलाद तयार होतें. ह्या पोलादाची धार लावून वापरण्याची सुरी, चाकू, वस्तरें पटाशा वगैरे हत्यारें तयार करतात. त्याच्या काठिण्यामुळें दोन तुकडे तापवून ठोकून त्यांचा सांधा करतां येत नाही. पोलाद हें साध्या धनवर्धनीय लोखंडापेक्षां दाणेदार असतें. व तें जास्त लवकर वितळवितां येतें. पण ह्याहिपेक्षा त्याचा अतिशय उपयोगी गुण म्हणजे तें वेगवेगळ्या कामासाठीं वेगवेगळ्या प्रकारचें पाणी देऊन वेगवेगळ्या प्रकारची कठिणता किंवा स्थितिस्थापकता किंवा लवचिकपणा त्यांत आणतां येतो. पोलादाचा तुकडा जसजसा ऊन करावा तसतसे त्यावर वेगवेगळें रंग दिसूं लागतात. व असे वेगवेगळे रंग त्यावर चढलेले असतांना तें निवविलें म्हणजे त्यामध्यें वेगवेगळ्या प्रकारचें गुण उत्पन्न होतात. त्यांत कठिणपणाचा गुण उत्पन्न झाला असतां ते निवविलें म्हणजे कापण्याचीं हत्यारें तयार करण्याकडे त्याचा उपयोग करतात. त्याचप्रमाणें त्यास वेगवेगळ्या प्रकारचें पाणी दिलें असतां त्यापासून घड्याळाच्या कमानी वगैरे अतिशय लवचीक व स्थितिस्थापकता असणारे पदार्थहि बनवितां येतात. कधीं कधीं सबंध हत्यार पोलादाचें न करतां त्याचा पृष्ठभागच रासायनिक क्रियेनें अतिशय कठिण करतां येतो. असें करावयाचें असल्यास हत्यार चांगलें लाल तापवून त्यावर पोटॅशियम फेरोसायनाइड नांवाच्या रासायनिक द्रव्याची पूड टाकतात. व त्याच्या योगानें त्या लोखंडाच्या हत्याराच्या पृष्ठभागावरचाच भाग तेवढा पोलाद बनून तें पोलादी हत्यारासारखेंच कठिण होतें. यालाच केसहार्डिंग म्हणतात. सध्यां तर बिडापासून एकदम पोलाद करण्याची सोपी रीत साध्य झाल्यामुळें बरघे, बहालें वगैरे जी पूर्वी घडीव लोखंडाचींच करीत असत ती आतां त्याच भावानें मऊ पोलादाची कच्च्या पोलादाचीं बनविलेलीं मिळतात.

लोखंडकाम:- लोखंडी सळ्या अर्ध्या इंचापासून तीन इंचापर्यंत व्यासाच्या किंवा चौरस मिळूं शकतात व लोखंडाचें पट्टे १ इंचापासून ६ इंच रुंदीचें व पाव इंचापासून १ इंच जाडीचे मिळतात जाड लोखंडी पत्रें १२ इंचापासून ४ फूट रुंदीचें व १५ फूटपर्यंत लांबीचें मिळतात व ते ४ हंड्रेडवेटपर्यंत वजनाचे मिळूं शकतात. कोणलोह ७/८ इंच x ७/८ ते ४ x ४ इंच मापाचे ४० फूट लांबीपर्यंत मिळूं शकतें लोखंडाच्या सळ्या व पट्टे याची मजबुती, दर चौरस इंचास २२ ते २७ टन पर्यंत खेचाण पडलें असतां न तुटेल अशी व कोणलोह किंवा ''टी'' लोह २१ ते २५ टन आणि जाडी पत्र्याची १७ ते २४ टन इतकी मजबुती असावी. पोलादाची मजबुती दर चौरस इंचास २६ ते ३० टनांपर्यंत असतें.

वर लोखंडाची व पोलादाची मजबुती म्हणून सांगितली आहे तिच्या सुमारें चतुर्थांशाइतकें किंवा पंचमांशाइतकें खेचाण नेहमीं येईल अशा आकाराचें लोखंडी किंवा पोलादी काम असावें लागतें. बिडाचे ओतीव डाग असतील त्यावर दर चौरस इंचास १॥ टनाइतकें खेचाण किंवा दर चौरस इंचास ८ टनांपेक्षा जास्ती भार न येईल, तसेंच साध्या लोखंडाच्या नगावर दर चौरस इंचास ५ टन इतकें खेचाण आणि ४ टन इतका भार येईल व पोलादी बहालावर वगैरे दर चौरस इंचास ७॥ टन इतकें खेचाण अथवा भार यावा; याच्या पेक्षां जास्ती येऊं नये, अशी खबरदारी घेतली पाहिजे. लोखंडाच्या ऐवजी सागवानी लांकूड वापरलें तर दर चौरस इंचास ४-५ टनाच्या ऐवजीं अर्धा ते ५/३ टनापर्यंतच भार किंवा खेचाण सागवान सहन करूं शकतें. बाजारांत ज्या मापाचे लोखंडी नग मिळूं शकतात ते साधारणतः असे असतात:- गोल सळ्या तीन षोडशांश, एकचतुर्थांश, पांचषोडशांश, तीनअष्टमांश, आणि अर्धा इंच पर्यंत व त्याच्या पुढे एकसप्तमांशांनें वाढत वाढत २ इंच व्यासापर्यंत आणि तेथून पाव इंचानें वाढत वाढत ४ इंचापर्यंत आणि त्याच्या पुढें अर्ध्या इंचानें वाढत ५ इंचांपर्यंत आणि त्याच्या पुढें १ इंचानें वाढत ८। इंचापर्यंत मिळतात.

चौरस गज:- पाव इंचापासून अष्टमांश इंचानें वाढत १॥। इंचापर्यंत आणि पाव इंचानें वाढत २ पासून ४ इंचापर्यंत समचौरस गज मिळूं शकतात.

चपटे पट्टे:- अर्ध्या इंचापासून अष्टमांश इंचानें वाढत ३ इंचापर्यंत रुंदीच्या आणि एकअष्टमांश इंच जाडीच्या पट्टया मिळतात. आणि तसें १-४ इंच रुंदीचे आणि पाव इंच जाडीचे, १-६ इंच रुंदी आणि तीनअष्टमांश जाडीचे किंवा अर्धा इंच जाडी, अथवा पांचअष्टमांश इंच जाडीचे; १॥ इंचापासून अर्ध्या इंचानें वाढत वाढत ६ इंचापर्यत रुंदी आणि पाऊण इंच किंवा सातअष्टमांश इंच, किंवा १ इंच इतक्या जाडीचेंहि पत्रे मिळतात. असेच ६ ते १२ इंच रुंद आणि पाव इंच जाड व ६-१६ इंच रुंद आणि तीनअष्टमांश ते अर्धा इंच जाड व ३० फूट लांबीचें असें रुंद आणि जाड पट्टे मिळतात.

कोणलोह:- पाऊण इंच x पाऊण इंच किंवा १ x १ इंच किंवा १। x १। इंच आणि एकअष्टमांश इंच जाड असे लहानांत लहान आकाराचे कोणलोह मिळतात. तसेंच १ इंच, १। इंच, १॥ इंच, व १॥। इंच, समचौरस आणि तीनषोडशांश इंच जाडीचें. तसेंच एक, सव्वा, दीड, पावणेदोन, दोन, अडीच व तीन इंच, समचौरस आणि पाव इंच जाडीचें. तसेंच २ x  २ इंच, २॥ x २॥ इंच, आणि ५/१६ जाडीचे, तसेंच  २ x २ इंच, २॥ x २॥इंच, ३ x ३ इं, ३॥ x२॥ इंच, ३॥ x ३॥ इंच, ४ x ३ इंच, ४ x ४ इंच, ५ x ३ इंच, ६ x ३ इंच व ६ x   ४ इंच या मापाचे आणि तीनअष्टमांश जाडीचे; तसेंच २॥ x २॥ इंच, ३ x ३ इंच, ३॥ x   ३॥ इंच, ४ x ३ इंच, ४ x ४ इंच, ५ x ३ इंच, ६ x ३ इंच, आणि ६ x ४ इंच, या मापाचे व अर्ध्या इंच जाडीचे तसेंच ३ x ३ इंच, ४ x ४ इंच आणि ५ x ५ इंच या मापाचे व पांचअष्टमांश इंच जाडीचेहि लोहकोण मिळतात.

''टी'' लोह:- १। x १। इंच, १॥ x १॥ इंच, २ x २ इंच, व २॥ x २॥ इंच आणि पाव इंच जाडीचे बारीक टी लोह मिळतात. त्याचप्रमाणें २॥ x २॥ इंच, ३ x ३ इंच, ३ x ४ इंच, ३॥ x ३॥ इंच, ४ x ३ इंच, ४ x ४ इंच, ५ x ३ इंच, ६ x ३ इंच, आणि ६ x ४ या मापाचे आणि तीनअष्टमांश इंच जाडीचे, तसेच ३ x ३ इंच, ३ x ४ इंच, ३॥ x ३॥ इंच, ४ x ३ इंच, ४ x ४ इंच, ५ x ३ इंच, ६ x ३  इंच मापाचे व अर्धा इंच जाडीचे टीलोह मिळतात. कोणलोह आणि टीलोह २४, २५  किंवा ३० फूट लांबीचे साधारणतः मिळतात.

पातळ व जाड पत्रें:- लोखंडी पातळ पत्रें १८ ते २४ गेजचे ४ x २॥ फूट आकाराचे मिळतात. याच्यापेक्षां एक पोडशांश ते एक अष्टमांश इंच जाडीचे आणि ३ ते ४ फूट रुंद आणि ६, ८, १०, आणि १२ फूट लांबीचे मिळूं शकतात. त्याच्याहि पेक्षां जाडी पत्रें किंवा तकटें तीनषोडशांश ते पांच अष्टमांश इंच जाडीचे व ३ फूट, ३॥ फूट किंवा ४ फूट रुंदीचीं आणि ६ फूट, ८ फूट, १० फूट, किंवा १२ फूट लांबींची. तसेंच पाऊण ते एक इंच जाडीची आणि ३ व ४ फूट रुंदीचीं आणि ६ व ८ फूट लांबीचीहि जाड तकटें किंवा फ्लेटस बाजारांत मिळतात. कोणत्याहि लोखंडीं सामानाचें वजन काढणें झाल्यास पत्र्याचें किंवा तकटाचें क्षेत्रफळ किती चौरस फूट आहे आणि त्याची जाडी किती इंच आहे हें माहीत असलें म्हणजे काढतां येतें. तकट जर १ चौरस फूट असलें व त्याची १ इंच जाडी असली तर त्याचें वजन ४० पौंड असतें. तेंच तकट किंवा पत्रा एकअष्टमांश इंच जाडीचा असेल तर त्याचें वजन ४० भागिले ८ = ५ पौंड होईल. याच्या निम्मे जाडीचा एकषोडशांश इंच जाडीचा म्हणजे सुमारें १६ गेजचा असला तर त्यांचे वजन दर चौरस फुटास २।। पौंड भरते. याच्याहि निम्याने म्हणजे एकबत्तिसांश इंच जाडीचा (म्हणजे सुमारे २२ गेजचा) पत्रा असला तर त्याचें वजन दर चौरस फुटास १। पौंड भरतें. अशा रीतीनें कोणत्याहि तटकाचें किंवा पातळ किंवा जाडी पत्र्याचें वजन काढतां येतें. तसेंच सळ्या, गज, कोणलोह, रोल्डबीम्स किंवा बहालें यांचें वजन काढणें झाल्यास त्यांचा छेद (क्रॉस सेक्शन) १ चौरस इंच असल्यास दर यार्डाचें म्हणजे ३ फूट लांबीचें वजन १० पौंड असतें.

लोखंडी सामान (ग्यास टयूबिंग.)
नळीच्या आंतील व्यास इंच नळीची जाडी इंच दर फुटास वजन पौंड
पाऊण .११६ १.१८
.१२८ १.७९
१॥ .१६० २.९७
.१६० ४.४८छरपट्टया
बर्मिंगहॅम वायर गेज रुंदी इंच १०० फुटांचे वजन किती पौंड
१३ ६३
१५ १॥ ३६
१८ १  १६
१९ ७/८ १२

शिशाचा पत्रा एकदशांश इंच जाड असला म्हणजे त्याचें वजन दर चौरस फुटास ६ पौंड म्हणजेच लोखंडी पत्र्याच्या दीडपट भरतें.

पत्र्यांची जाडी बर्मिंगहॅमवायर गेजनें मोजतात. व अशा गेजचा नं. ३ म्हणजे सुमारें पाव इंच जाडी, नं. ६ म्हणजे एकपंचमांश इंच, ११ गेज म्हणजे सुमारें एक अष्टमांश इंच जाड, नं. १६ म्हणजे एकषोडशांश इंच. नं. २१ म्हणजे एकबत्तीसांश इंच, नं. २७ म्हणजे एकसाठांश इंच, ३३ गेज म्हणजे १ १/१२५ इंच, ३६ गेज म्हणजे १ १/२०० इंच.

यावरून गज १॥ इंच समचौरस असला तर त्याचें वजन दर यार्डास म्हणजे ३ फूटांस १॥ x १॥ x १० = २२॥ पौंड म्हणजे दर फुटास ७॥ पौंड होतें. अशा रीतीनें कोणत्याहि सळईचें किंवा गजाचें किंवा कोणलोहाचें वजन चट्कन काढतां येतें.

बिडाचें वजन दर घनफुटास ४५० पौंड व लोखंडाचें ४८० पौंड, व पोलादाचें सुमारें ५०० पौंड, अल्युमिनिअमचें १६६ पौंड, तांब्याचें सुमारें ५५० पौंड, सोन्याचें ११५० पौंड व चांदीचें ६५३ पौंड, शिशाचें ७०८ पौंड, कथलाचे ४५५ पौंड व जस्ताचें ४३७ पौंड, व पार्याचें ८४८ पौंड, पितळेचें ५२४ पौंड, कांशाचें ५०२ पौंड इतकें असतें.

पाण्याचें वजन दर घनफुटास ६२ पौंड केल्टार (डामराचें ६३ पौंड) आणि हवेचें वजन दर घनफुटास २ २/२५  पौंड असतें. पाण्याच्या वाफेचें हवेच्या सुमारे २/३ असतें. कॅर्बानिक  अॅसिडचें वजन हवेच्या दीडपट असतें.

शुद्ध लोखंडांत (रॉट आयर्न) कार्बन बहुधा नसतोच. असलाच तर १ लक्ष भागांत २५ भाग इतका अल्प प्रमाणानें असतो. बिडांत त्याच्या वजनाच्या विसाव्या भागाइतका म्हणजे शेंकडा ५ टक्के इतका कार्बन असतो. व पोलादांत हजारी ४ ते १५ भाग इतका असतो.

सर्व ओतीव लोखंड स्वच्छ पाणीदार व कठिण असून त्यांत भेगा व कडा नसावी. त्यांत निम्में मग्न असणारें उदी रंगाचें बीड असावें व तें चिरणींने किंवा सामत्यानें तोडतां किंवा विंधतां येईल असें मऊ असावें. बोलट घालण्यासाठीं भोकें सामत्यानें पाडलेली किंवा ओततांनाच ठेवलेलीं असावीं.

घडीव (रॉट आयर्न) लोखंडाचें काम मोठ्या काळजीनें स्वच्छ, नीट व मजबूत केलेलें असावें. रिव्हेट मलबार (लोमूर) किंवा शिकेकाही (स्वीडिश) किंवा हिंदुस्थानांतील चांगल्या लोखंडाच्या कराव्या. कैच्च्या व कमानीसाठीं ताणांच्या सळ्या अशा प्रकारच्या लोखंडाच्या असाव्या. लोखंडी बहालें दर चौरस इंचास २२ टन व पोलादी दर चौरस इंचास ३० टनांचा जोर लावला तरी न तुटणारीं असावीं. बोलट किंवा रिव्हेटासाठीं भोकें पाडावयाची असल्यास ती सामत्यानें पाडावीं. किंवा पंचिंग मशीननें पाडावीं सर्व रिव्हेंटें लोखंड ऊन आहे तोंच ठोकून त्यांचीं डोकी गोल व सारख्या आकाराचीं करावीं. बोलटांचा व्यास, ज्या भोंकांत ते बसवावयाचें असतील त्यांच्यारबरोबर असावा. व यांचीं डोकीं पत्र्याला लपटून बसवावीं. बोलट व त्याचें डोकें एका तुकड्याचें असावें. रिव्हेंट चांगला भोंकांत जाऊं द्याव्या. व मग डोकें दाबून धरून तोंडावर वाटोळ्या खोबणीची छिनी धरून तीवर हातोड्यानें ठोकावें म्हणजे फुलून गोलाकार होईल. सर्व स्कूचें पेंच साफ असून सारख्या जाडीचे व वर्तुळांत बरोबर असावे. चाक्या चौरस व षट्कोनाकृति किंवा अष्टकोनाकृति असून त्यांच्या बाजूची लांबी बोलटांच्या व्यासाच्या निदान दुप्पट व जाडी बोलटाच्या व्यासापेक्षां अधिक असावी.

लोखंडाच्या सर्व प्रकारच्या वस्तूंस तापवून त्यावर पक्के जवस्त्राचें तेल लावावें, किंवा शेंदरी ओल्या रंगाचे २ हात द्यावे. चरकावर कांतलेल्या लोखंडाच्या भागास सफेता व चरबी मिश्र करून ह्या मिश्रणाचा हात द्यावा. लोखंडी तुळ्या व गर्डरांच्या खालच्या तबकडींतून बांधकामांत घातलेले बोल्ट जाग्यावर बिनचूक व लंब रेषेंत बसवावे आणि तबकडी विवक्षित उंचीवर क्षितिजपातळींत बसवावी म्हणजे चाक्या सांधणींत तबकडींस लागून बसतील. तबकडीच्या तळाशीं सिमेंट घालावें.

तांबें:- इमारतीच्या कामाला तांबें महाग असल्याकारणानें त्याचा फारसा उपयोग करीत नाहींत. इमारतीवर वीज पडूं नये म्हणून जी विद्युद्वाहक पट्टी इमारतीच्या शिखरापासून तों थेट जमीनीच्या आंतपर्यंत बसविलेली असते ती मात्र बहुतकरून तांब्याचीच असतें. खेरीज त्याची विद्युद्वाहकशक्तीहि फारच उच्च प्रकारची असते. म्हणून जास्ती महत्त्वाच्या विद्युद्वाहक तारायंत्राच्या तारा तांब्याच्याच असतात. तारायंत्राच्या नेहमींच्या तारा जस्ताचा मुलामा दिलेल्या लोखंडाच्याच असतात. तांब्यावर गंज चढला म्हणजे त्याचा पृष्ठभाग हिरवा दिसूं लागतो. व हा गंज हवेंतील कर्बाम्लाच्या संयोगापासून बनतो. तांब्यांत जस्त मिळविलें म्हणजे त्यापासून पितळ बनतें. व त्याचा उपयोग इमारतकामामध्यें बिजागर्या, दरवाज्यास लावावयाच्या कड्या, दरवाज्यास लावावयाचे बोल्ट, स्क्रू वगैरेंच्या कामीं (इमारत उच्च दर्जाची असल्यास) करतात.

जस्त:- जस्ताचा उपयोग लोखंडी पत्र्यावर मुलामा चढविण्याकडे करतात. परंतु खेरीज घरावर घालावयाचें पत्रे व त्यावरील पाणी काढून नेण्याकरितां पत्र्याचीं केलेलीं गटारें व नळ या कामीं ते वापरतात. जस्तावरहि हवेंतील प्राणवायूचा परिणाम होऊन एक प्रकारचा गंज चढतो. पण तो गंज खालील पत्र्याला धरून राहिल्याकारणानें आंतल्या जस्ताचें रक्षण करतो म्हणजे त्यावर प्राणवायूची क्रिया होऊं देत नाहीं.

शिसें:- शिशाचा उपयोग कौलारांवरील कुंदाचें पाणी काढून नेण्यासाठी पत्र्याचीं गटारें व पाणी न्यावयाच्या नळ्या यांच्याकडे होतो. शिशावर कोणत्याहि अम्लाचा परिणाम होऊं शकत नाहीं. म्हणून गंधकाच्या अम्लासारखी जलाल अम्लें तयार करावयास लागणार्या भट्टयांना आंतल्या बाजूनें शिशाचा पत्राच लावतात. त्याचप्रमाणें रासायनिक प्रयोग करावयाचें असतील अशा टेबलांनां व त्या टेबलांतून बसविलेल्या घुण्याच्या कुंड्या व त्यांतून वाहून जाणार्या पाण्याच्या नळ्या ह्या सर्व शिशाच्याच करतात. अतिशय शुद्ध पाणी असेल तर शिशाचा परिणाम त्यावर जलद होऊं शकतो. परंतु पाण्यांत कोणत्याहि प्रकारचें चुन्याचें कार्बोनेट किंवा सल्फेट म्हणजे कर्बाम्ल किंवा गंधकाम्लयुक्त पदार्थ द्रवरूपानें असले (व बहुतेक झर्याच्या पाण्यांतून असे असतात) तर त्याच्यावर शिशाचा परिणाम होऊं शकत नाहीं व यामुळें जरी कधीं कधीं पाण्याच्या सांठवणीच्या टांक्यांनां आंतून शिशाचे पत्रे जडलेले असतात व नळ्याहि शिशाच्याच वापरतात तरी त्याचे दुष्परिणाम पहाण्यांत येत नाहींत. शुद्ध पाण्यांत (डिस्टिल वॉटर) मात्र तें थोडे विरतें व असें पाणी पोटांत गेलें असतां कंप वायूसारखा एक प्रकारचा रोग उत्पन्न होतो. शिशाचे पत्रे दर चौरस फुटाला ७ पौंडांपर्यंत वजनांत भरणारे असे घरावर घालण्याला वापरतात. व अशा छपराला १५ फुटांस १ फूट याप्रमाणें ढाळ देतात. ह्या पत्र्यांवर हवेंतील प्राणवायूच्या संयोगापासून भुरकट रंगाचा पापुद्रा बनतो व त्या पापुद्रयानें खालील शिशाचें रक्षण होतें शिसें हें अतिशय मऊ व जड असतें व त्याचें विशिष्टगुरुत्व ११॥ असतें. व तें ६२० अंश तीव्रतेची उष्णता लावली म्हणजे वितळतें.

पन्हळासाठी १ चौरस फुटास ५ पासून ८ पौंडांपर्यंत वजनांत भरतील असे शिशाचे पत्रे असावे. आढ्यावर व कोनवाशांवर लागणार्या शिशाच्या पत्र्याचें वजन दर चौरस फुटास ६ पौंड असावें. छप्पर किंवा गच्ची जेथें भिंतीशीं मिळते अशा ठिकाणीं भिंतीवर पडलेलें पाणी भिंतीवरून खालीं न गळतां गच्चीवर किंवा छपरावर पडावें म्हणून जे शिशाचे पत्रे भिंतींत घालून थोडे छप्परावर किंवा गच्चीवर बाहेर आणतात त्यांचे वजन दर चौरस फुटास ५ पौंड असावें. सर्व पन्हळ ओतीव शिशाचें आणि आढें व कोनवाशांसाठीं लागणारे पत्रे रुळामध्यें दाबून काढलेले असावे. शिशाच्या पन्हळाच्या लांबीस समांतर मिळण्याच्या सांध्याखाली २ इंच जाडीचा तक्ता असावा. पन्हळाच्या लांबीस काटकोनांत येणार्या सांध्यांत पत्रे एकमेकांवर चढवून बसवावें. किंवा त्यांची टोंकें एकमेकांत ३ इंच दुमटून बसवावीं. शिशाचे पत्रें लांकडाशीं तांब्याच्या खिळ्यांनीं जोडावे. पन्हळाच्या प्रत्येक फूट लांबीस अर्ध्या इंचांपेक्षां कमी ढाळ नसावा व भिंतीच्या कडेस जी पन्हळाचीं टोकें बाजूस वळवितात त्यांची लांबी ७ इंचाहून कमी नसावी. छप्परांत कौलाखाली ही त्यांची बाजू ७ इंच जावी. जेथें पन्हळ भिंतीस लागेल तेथें भिंतीवरील पाणी पन्हळांत पडण्यासाठीं तींत पत्रा घालावा.

मिश्रधातू:- पितळ तयार करावयाचें म्हणजे ३ भाग जस्त व ५-६ भाग तांबे एकत्र वितळवून करतात. तें चिवट असतें व त्याची तारहि काढतां येतें व त्याच्या पत्र्यावर किंवा नळ्यावर उत्तम झिलई चढते. दुर्बिणीच्या नळ्या व नकाशे काढावयाचीं व सर्व्हे किंवा मोजणी करण्याचीं हत्यारें, कंपास, दुर्बिणी वगैरें यंत्रें किंवा हत्यारें पितळेचींच करतात. आणि त्यांवर लाखेचा एक प्रकारचा रंग चढविला म्हणजे ती पुष्कळ वर्षे सोन्यासारखीं पिवळी व चकचकीत राहतात. दर राज्यांच्या बिजागर्या, कुलुपें, बोल्ट, स्क्रू, वगैरें पितळेचींच करतात. पण त्यांत एक भाग जस्त व तीन भाग तांबे घालतात. जे पितळेचे डाग चरकीं धरावयाचें असतील त्यांत तांबे व जस्त खेरीज थोडें शिसेंहि घालतात. मात्र शिसें घातले तर त्याची धनवर्धनीयता नाहींशी होतें.

पाणी काढावयाचे किंवा हवा आकर्षण करण्याचे वगैरे जे पंप किंवा जी जलोच्चालक यंत्रें असतात. त्यांचे एकमेकांवर घर्षण होणारे भाग, उघडणारे बंद होणारे पडदे (व्हाल्व्ह) व सिलेंडर्स म्हणजे ज्यांत पंपाचा दट्टया वरखालीं होतो ती व कोणत्याहि फिरणार्या चक्राचा आंस किंवा लाट ज्यावर बसवितात त्या गोल बैठकी (जर्नल) हीं सर्व ९ भाग तांबें व १ भाग कथील घालून गनमेटल म्हणून जें एक प्रकारचें कांसें तयार करतात त्याचींच केलेलीं असतात व त्यांत कधीं कधीं थोडें जस्तहि घालतात. तें चिवट, कठिण आणि मजबूत असल्याकारणानें लवकर झिजत नाहीं.

कांसें:- म्हणजे ज्याच्या घंटा वगैरे बनवितात तें ७८ भाग तांबें व २२ भाग कथील मिळवून तयार करतात.

ब्रांझ:- ब्रांझ म्हणून मिश्र धातूचे पुतळे वगैरे करतात व पेन्स वगैरे नाणीं करतात ती धातु. हें तांबें, कथील व थोडेंसें जस्त व शिसें मिळून तयार करतात.

संयोजक धातू (कस्तर):- हे अनेक जातीचे असतात. कथलाच्या दोन पत्र्यांचीं तोंडें एकमेकांस जोडावयाचीं असल्यास एक भाग कथील व दोन भाग शिसें मिळवून त्याचें कस्तर करतात लोखंड, तांबें व पितळ यांनां डाक लाववयाचा असल्यास ३ भाग जस्त व ४ भाग तांबें हीं मिळवून केलेला मिश्र धातु वापरतात. शिशाचे पत्रे जोडावयाचें असल्यास नुसतें शिसें किंवा शिसें व कथील मिळून त्याचें कस्तर करतात. कस्तर करावयाच्या पूर्वी किंवा डांक लावतांना जे दोन भाग सांधावयाचे असतील ते अगदीं स्वच्छ, झळझळीत व गुळगुळीत करतात. व नंतर त्यांवर सवागीं किंवा नवसागरासारखी पूड टाकून नंतर त्यावर संयोजक मिश्रण म्हणजे कस्तर किंवा डांक लावतात. असें केल्यानं सांध्यावर एक प्रकारचा नवा मिश्र धातु तयार होऊन सांधा पक्का बनतो. पितळ जोडावयाचें असल्यास सवागीची पूड; कथील, किंवा तांबें, अथवा लोखंड जोडावयाचें असल्यास नवसागर अथवा राळ; व जस्त जोडावयाचें असल्यास उज्जहराम्ल (हायड्रोक्लोरिक अॅसिड) वापरतात. कच्चा डांक लावावयाच्या वेळीं दोन भाग कथील व एक भाग शिसें यांचें मिश्रण वापरतात. व अशा प्रकारचा डांक लावतांना जे दोन तुकडे सांधावयाचे असतील ते ऊन करण्याची किंवा तापविण्याची जरूर पडत नाहीं. पण संयोजक द्रव्य मात्र वितळवून सांध्यावर खडीनें लावतात. म्हणजे कच्चा डांक बसतो. पक्का डांक किंवा पक्के कस्तर करावयाच्या वेळीं ज्या पृष्ठभागांचा जोडून सांधा करावयाचा असेल ते दोन्ही भाग तापवून लाल करावे लागतात.

हिंदुस्थानांत मद्रास इलाख्यांत सालेम व वेंपूर जिल्ह्यांत, जबलपुराजवळ, विंध्याद्रीमध्यें व झांशी आणि ग्वाल्हेर संस्थान व बंगल्यांत साकची, राणीगंज वगैरे ठिकाणीं, तसेंच आसाम व ब्रह्मदेश वगैरे ठिकाणीं लोखंडाचे दगड पुष्कळ सांपडतात. कुमाऊन, राजपुताना वगैरे प्रांतात तांब्याचे दगड, व ब्रह्मदेशांत कथलाचे दगड सांपडतात.

लांकूडकाम पावसानें खराब होऊ नये व सर्द हवेनें सुद्धां जी एक प्रकारची कीड लागते ती लागूं नये म्हणून लांकडी कामाला नुसतें तेल लावतात किंवा तेलांत कालवून रंग लावतात. याच्या योगानें लांकडाच्या पृष्ठभागावरील सर्व छिद्रें बंद होऊन जातात व असें झाल्यानें दमट हवेचा परिणाम होऊन लांकूड कुजावयाचें किंवा सडावयाचें बंद होतें व त्याचप्रमाणें लांकडांत भोकें पाडून पोखरणार्या कीटकांचाहि उपद्रव कमी होतो. अशा कामाला अळशीचें तेल व टरपेन तेल यांत शिसें किंवा जस्त किंवा तांबें वगैरे धातूंची भस्में वेगवेगळे रंग येण्यासाठीं कांहीं ठराविक प्रमाणांत कालवून त्यांत लवकर वाळण्यासाठीं कांहीं द्रव्यें घालून लावावयास सोपें पडावें म्हणून रंग पातळ होईल इतकें तेल व टरपेंन तेल घालून लांकूडकामास कुंचानें लावतात. रंगाच्या कामांत नेहमीं वापरण्यांत येणार्या वस्तू म्हटल्या म्हणजे, सफेता व शेंदूर हीं शिशाची भस्मे, गेरू व पिवडी ही लोहज द्रव्ये, जंगला हें तांब्यापासून निघणारें द्रव्य, व दुसरे हिरवे व निळे रंग हे तांबें, जस्त व सोमल वगैरेंचीं भस्में, काजळ, मुरदाड शिंग, जवसाचें किंवा आळशीचें तेल, टरपेन तेल वगैरे होत. कोणत्याहि रंगाचा गहिरेपणा कमी करण्यासाठीं त्यांत सफेता मिसळतात. उदाहरणार्थ सफेत्यांत थोडें काजळ घालून रंग केला म्हणजे तो शिसें या धातूच्या रंगासारखा रंग तयार होतो. नीळ किंवा गुळी आणि पिवडी यांच्या रंगापासून हिरवा रंग होतो. अशा रीतीनें वेगळे रंग मिसळून वेगवेगळ्या प्रकारची छटा आणतां येते. शिसें वितळविलें म्हणजे त्यावर जी एक प्रकारची पातळ साय येते ती साय काढून ती तापवून त्यापासून त्यापासून जो पिंवळा पदार्थ तयार होतो तेंच मुरदाडशिंग होय. व हा पिवळा पदार्थ वितळूं न देतां तसाच तप्त ठेवला तर त्याचाच शेंदूर बनतो. त्याचप्रमाणें सफेता हा, ओतलेल्या शिशावर जी एक प्रकारची खरपुडी बनते त्या खरपुडीवर शिरका किंवा शिरक्याचा तेजाब यांच्या रासायनिक क्रियेनें झालेला होय. निळा रंग हा पार्शियन ब्ल्यू नांवाचा निळा रंग, लोखंडाच्या गंधकाम्लाशीं संयोग होऊन जो हिराकस नांवाचा पदार्थ होतो त्यावर सायनोजिन नांवाच्या द्रव्याची रासायनिक क्रिया होऊन तयार होतो. तांब्यावर चिंच किंवा दुसर्या तत्सम कोणत्याहि अम्लाची क्रिया घडलेली असली म्हणजे त्यापासून जो गंज किंवा हिरवा रंग येतो त्यास 'गंजला' म्हणतात. आळशीचें म्हणजे जवसाचें तेल हें रंग कालवावयास वापरतात. याचें कारण तें वाळून कठिण होऊं शकतें. दुसरी तेलें वाळत नाहींत. हें लवकर वाळावें म्हणून त्यांत थोडेंसें मुरदाडशिंग घालून खूप उकळवितात व तें असें उकळविलें म्हणजे त्याला बेलतेल म्हणतात. व हें बेलतेल सर्व प्रकारच्या रंगकामाला वापरतात. कोणताहि रंग द्यावयाचा नसेल व लांकडाचें नुसतें किडीपासून रक्षण व्हावें येवढाच उद्देश असेल तेव्हां नुसत्या बेलतेलाचेच एकदोन हात देतात म्हणजे तें वाळून लांकडाचीं छिद्रें बंद करून त्याचें ओलीपासून रक्षण करतें व एक प्रकारची चकाकीहि देतें.

टरपेनतेल हें, रंग पातळ करण्यासाठी वापरतात. व तें वाळतेंहि लवकर. परंतु तें बाहेरच्या कामाला वापरीत नाहींत. कारण त्यास तेलासारखी ऊन व पाऊस सहन करून राहण्याची शक्ति नसते. म्हणजे तें ऊन्हानें किंवा पावसानें नष्ट होते. फक्त अगदीं शुभ्र पांढरा रंग देतांना त्याचा उपयोग करतात. कारण बेलतेलानें जो रंगात किंचित काळसरपणा येतो तशा प्रकारचा काळसरपणा याच्या योगानें येत नाहीं. कधी कधीं रंगाचा शेवटचा हात नुसत्या टरपेन तेलांत रंग कालवूनच देतात व त्याच्या योगानें तेलानें जी एक प्रकारची चकाकी येते. तशी चकाकी न आल्यामुळें हा रंग एकसारखा दिसतो. रंगांत वापरावयाचें टरपेनतेल, त्यांत पाणी घालून व त्याची वाफ करून फिरून ती थंड करण्याच्या योगानें त्यांतील चिकटपणा किंवा राकेलचा भाग नाहींसा करून तयार केलेलें असतें.

ज्या ठिकाणीं सफेता म्हणजे शिशाचें शुभ्र भस्म, याला गंधक व उज्ज ह्यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारा व अतिशय दुर्गंधयुक्त वायु (सल्फ्युरेटेड हॉयड्रोजन)  लागल्यामुळें रंग काळा पडण्याचा संभव असेल त्या ठिकाणी जस्ताचें भस्म किंवा जस्ताची लाही-जिला साधारण रीतीनें मराठींत हबक (हा रंग तयार करणार्या कारखानदाराच्या नांवावरून त्या रंगास हें नांव पडलें आहे) असें म्हणतात. तो पांढरा रंग वापरतात. पण तो शिशाच्या रंगाइतका म्हणजे सफेत्याइतका जलदीनें वाळत नाहीं व भिंतीला किंवा लांकडाला पडलेले डागहि तो झांकून टाकीत नाहीं. अर्थात वरील कोणतेहि रंग लावावयाचें म्हणजे ते बेलतेलांत कालवून लावावयाचें असें समजावें.

भिंतीला किंवा लांकडाला रंग लावावयाच्या आरंभी त्या भिंतीवरील गिलावा किंवा लांकडाचा पृष्ठभाग धुवून साफ व मऊ गुळगुळीत करावा लागतो. भोकें, चिरा किंवा बारीक बारीक खवले पडलेले असल्यास खडूची पूड बेलतेलांत कालवून त्याची लांबी तयार करून त्यानें ते भरून काढतात. व पृष्ठभाग मऊ गुळगुळीत असा झाला म्हणजे मग रंगाचा पहिला हात बेलतेलांत सफेता घालून त्याचा देतात. व नंतर ज्या प्रकारचा रंग द्यावयाचा असेल तशा प्रकारचा रंग सफेत्यांत घालून व तो बेलतेलांत कालवून दुसरा हात देतात. व तो वाळल्यावर तिसरा हात देतात. अशा रीतीनें रंग दिला असतां रंग दिलेला पृष्ठभाग पुष्कळ वर्षे पर्यंत नवा रंग दिला नाहीं तरी टिकतो. थोडाफार मळला असतां साबणाच्या पाण्यानें धुतला म्हणजे स्वच्छ होतो. वर्दळ असेल अशा ठिकाणी ३ पासून ५ वर्षांनी रंगाचा दुसरा हात दिल्यास बरें ज्या ठिकाणीं वर्दळ नसेल अशा ठिकाणीं १० वर्षांनीं फिरून रंग दिला तरी चालतो.

आपल्या इकडे तेल्या रंगाच्या ऐवजीं पाण्यांत कालवूनच रंग देण्याची चाल फार आहे. असा रंग द्यावयाचा म्हणजे तांबड्या रंगासाठी हुरमुजी रंग किंवा कांव; पिवळ्या रंगासाठीं पिवडी, हरताळ; निळ्या रंगासाठीं नीळ किंवा मोरचूद वापरतात. रंगाचा गहिरेपणा कमी करावयाचा असल्यास त्यांत कळीचुन्याचा पांढरा रंग घालून तो रंग तयार करतात. हा रंग पुसून जाऊं नये म्हणून त्यांत डिंक किंवा तांदुळाची खळ किंवा सरस घालून नंतर कुंचानें तो भिंतीस लावतात.

कांचेच्या खिडक्या, दरवाजे यांना कांचा बसवावयाच्या असल्यास कांच कापण्याच्या हिरकणीनें मापाबरहुकूम कांचा कापून त्या निघून पडूं नयेंत म्हणून बारीक बारीक टेकस बाजूच्या चौकटीत ठोकतात व त्या कांचा वार्यानें हलूं नयेत म्हणून खडूची पूड बेलतेलांत कालवून व त्यांत थोडा सफेता (शिशाचें भस्म) घालून त्याची लांबी तयार करून त्या लांबीनें त्याच्या चारी बाजू भरून काढतात.

रंगाच्या ऐवजीं कधीं कधीं भिंतीनां वेगवेगळ्या रंगांची वेलबुट्टी काढलेले कागद आयतें बाजारांत विकत मिळतात ते खळ लावून चिटकवितात. ह्या कागदांनां कीड किंवा वाळवी लागूं नये म्हणून खळींत थोडासा सोमल घालतात.

ओले रंग:- हे लावण्याचा हेतु लांकूडकाम किंवा लोखंड किंवा दगड अथवा गिलावा ह्यांचें, ओल किंवा कोणत्याहि प्रकारचा धूर अथवा वायु, उष्णता किंवा थंडी किंवा पाऊस, वारा, ह्यांपासून रंगविलेल्या पृष्ठभागाचें रक्षण करणें अथवा त्याला शोभा आणणें हा असतो.

(१) रंगास स्थिरता आणण्यासाठीं सफेता व शेंदूर व कलखापरीची किंवा जस्ताच्या रंगाची पांढरी पूड (व्हाइटझिंक) आणि लोखंडावर तांब किंवा गंज (आयर्न ऑक्साईड) चढतो त्याची पूड ह्यांपैकीं कोणता तरी द्रव घेतात.

(२) वर सांगितलेल्या पुडीपैकीं कोणती तरी घेऊन ती भिंतीला लावण्याजोगी प्रवाही बनविण्यासाठीं कोणत्या तरी तेलांत मिसळावी लागते. व हें तेल बव्हंशीं दोनदा उकळलेले जवसाचे तेलच होय.

(३)  रंग लावल्यानंतर लौकर वाळावा म्हणून त्यांत घालावा लागणारा तिसरा घटक म्हणजे मुरदाडशिंग: व सफेता, मोरचूद व शेंदूर आणि लेड अॅसिटेट ह्यांपैकीं कोणता तरी पदार्थ जवसाचें तेल उकळतांना, किंवा रंगांत घालतात.

(४) ज्या प्रकारचा वर्ण किंवा छटा किंवा रंग दिसावयास पाहिजे असेल त्या रंगाचीं पूड मिसळावी. जसें:-पिवळी, गेरू, काजळ, मोरचूद, जंगला, नीळ, किंवा अशाच प्रकारचें कोणतेहि रंग. वरील चारहि रंगांचें प्रवाही मिश्रण केल्यानंतर त्याला पातळपणा आणण्यासाठीं त्यांत टरपेनटाईन घालतात.

सफेता म्हणजे शिशाचा कार्बोनेट आणि शेंदूर म्हणजे शिशाचा ऑक्सॉईड, जस्ताचा पांढरा रंग म्हणजेच झिंक ऑक्साईड होय. आयर्न ऑक्साईड हें लोखंडाच्या गंजापासून होतें व त्याचा रंग पिवळसर भुरकट असतो. त्यांत मातीचे (अॅल्युमिनाचें) मिश्रण होऊनच पिवडी, गेरू, वगैरें पदार्थ बनतात. लोखंडापासून झालेले रंग कधींहि उजळ नसतात. ते नेहमीं पिंवळसर, तांबूस व काळसर असतात. मोरचूद हा तांब्याचा सल्फेट होय. हा हिरवा रंगासाठीं वापरतात. हिंगूळ हा पार्याचा सल्फेट आहे. त्याचा रंग लालभडक असतो. हा रंग फार महाग असतो.

मुरदाडशिंग हेंहि शिशाचें ऑक्साईड आहे. ह्यापासूनच शेंदूर बनवितां येतो. रंग लवकर वाळण्यासाठीं मुरदाडशिंग घालणें तें १ ग्यालन जवसाच्या तेलांत ५ पौंड घालतात. जवसाच्या तेलाचें वजन दर घनफुटास ५९ पौंड आणि टरपेनटाईनचें वजन दर घनफुटास ५४ पौंड असतें.

पाण्यांतले रंग:- ह्यांत रंगाच्या स्थिरतेसाठीं सफेत्या (व्हाईटलेड्) ऐवजी खडूची पांढरी पूड असते व इष्ट छटा किंवा वर्ण आणण्यासाठी वर सांगितलेल्या रंगांच्या पुडीपैकीं कोणती तरी घालून व तींत खळ किंवा कांजी घालून पाण्यांत कालवून रंग भिंतींना लावतात. असे पाण्यांत कालवून लावण्याचें रंग (डिस्टेंपर) बाजारांत वेगवेगळ्या जातीचे मिळतात. व ते कारखानदारानें वर्णिलेल्या रीतीबरहुकूम लावले असतां बरेच दिवस टिकतात.

हबकचा उत्तम पांढरा (जस्ताचा) रंग घेतला तर १ पौंड जवसाचें तेल आणि अर्धा पौंड टरपेनटाईन यांत दोन पौंड रंगाची पूड घातली असतां तो लावावयाजोगा झाला पाहिजे. कदाचित इतकें तेल व टरपेनटाईन घातल्याने तो पातळ होऊन भिंतीवरून त्याचे ओघळ वाहावयाला लागले तर तो रंग चांगला नाहीं असें समजावें. उत्तम बेलतेल कोरड्या हवेंत लावल्यापासून २४ ते ३६ तासांत वाळून कठिण झाले पाहिजे, असे तेल वाईट असल्यास तें चांगले नाहीं आणि सर्द हवा असतांना चिकट होतें. कोणकोणत्या रंगाचें किती हात दिले असतां किती क्षेत्र नाखलें जातें तें पुढें दिलें आहे.

हात जस्ताचा पांढरा रंग बेलतेल टरपेन टाईन रंग रंगविलेलें क्षेत्र चौ. फू.
पहिला २ पौंड १ पौंड १/२ पौंड कोणतेहि ११२
२ रा, ३रा २ पौंड १ पौंड १/२ पौंड ,, १६८

एक पौंड ऑक्साईड ऑफ आयर्ननें ७२-१०८ चौ. फूट जागा रंगवितां येते. एक ग्यालन पातळ डामरांत (कोल्टार) १ पौंड काळे खडे डामर घालून वितळविलें तर तेवढ्यानें पहिल्या हाताला १०८ चौरस फूट क्षेत्र आणि नंतरच्या प्रत्येक हाताला सुमारें १५० चौरस फूट क्षेत्र रंगवितां येतें. १ पॉईट (१/८ ग्यालन) तेलाच्या व्हारनिशांत ७० ते ८० चौरस फूट लांकूडकाम रंगवितां येतें.

जस्ताच्या रंगाची पांढरी पूड सल्फ्यूरिक अॅसिड (गंधकाचें तेल) मध्यें पाणी घालून त्यांत टाकली असतां बुडबुडे बिलकुल न येतां सर्व पूड नि:शेष विरून गेली पाहिजे. जवसाचें तेल ६० अंश पर्यंत उकळलें तर ते ९३ इतक्या विशिष्ट गुरुत्वाचें असावें. आणि बेलतेल (डबल बॉईल्ड ऑईल) .९४ ते .९५ इतक्या विशिष्ट गुरुत्वाचें असावें आणि ते वाळल्यानंतर पृष्ठभाग लुकलुकीत दिसला पाहिजे. जवसाचें तेल व बेलतेल हीं पेट्रोलियम स्पिरिट किंवा टरपेनटाईन यांमध्यें विरतात.

निवार्यांत असणार्या लांकूडकामाला रंग द्यावयाच्या वेळी पहिला हात देतांना अर्धा पौंड शेंदूर व ८ पौंड शिशाचा पांढरा रंग, ३॥। तोळे भुरदाडशिंग, १/४ ग्यालन बेलतेल आणि १/८ ग्यालन साधें जवसाचें तेल ह्या सर्वांचा मिळून रंग कालवून तो लांकूह जागच्या जागी बसवावयाच्या पूर्वी द्यावा.

जेव्हां लांकूडकाम उघड्यांत असेल म्हणजे पाऊस, ऊन लागण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं १० पौंड शिशाचा पांढरा रंग, २॥ तोळे शेंदूर व ५ तोळे मुरदाडशिंग हीं अर्धा ग्यालन जवसाच्या तेलांत कालवून तो रंग, लांकूड कामांत बसवावयाच्या पूर्वी सर्व लांकडास द्यावा.

चुन्याचा गिलावा केलेल्या भिंतींना त्या १ वर्षपर्यंत तशाच राहूं देऊन नंतर पांढरा शिशाचा रंग आणि शेंदूर हे समभाग घेऊन बेलतेलांत कालवून तो रंग भिंतीस द्यावा.

लोखंड व पोलाद यांच्या कामाला त्यावरील सर्व गंज खरडून काढून नंतर बेलतेलांत शेंदूर घालून त्याचा हात द्यावा. जेव्हां उघड्यावर असणार्या कामाला पांढरा रंग देणें असेल तेव्हां पांढरा शिशाचा रंग द्यावा.आणि निवार्यांतील काम असेल तेव्हां पांढरा शिशाचा रंग द्यावा आणि निवार्यांतील काम असेल तेव्हां जस्ती पांढरा रंग द्यावा.

फ्रेंच पॉलिश:- आपल्या हवेंत टिकावयाजों फ्रेंच पॉलिश करतांना मेथीलेटेड स्पिरीट १२ बाटल्या म्हणजे ३ ग्यालन घेऊन त्यांत पुढील जिन्नस विरवावे:- चपडा काळी लाख ३ पौंड, विशेष (ऑलीमेनम) अर्धा पौंड, रेवचिनीचा शिरा (ग्यामबोज) अर्धा पौंड, कोपाळ अथवा चंद्रूसा अर्धा पौंड, व लोबान अर्धा पौंड. या जिनसा खलबत्यांत घालून कुटून स्पिरीटमध्यें टाकाव्या आणि हे मिश्रण कालवावें. म्हणजे सर्व जिनसा विरून जातील.

लांकडाला सोनेरी रंग देणें असेल तर चपडा लाख पाऊण पौंड, चंद्रूसा ३॥ पौंड, हळद १ पौंड, रेवचिनीचा शिरा ६। तीळे व अल्कोहल २ ग्यालन घेऊन त्यांचें मिश्रण करतात.

लांकूडकाम निवार्यातील असलें म्हणजे त्याला नुसतें तेल दिलें तरी चालतें. परंतु उघड्यावर असणार्या म्हणजे पाऊस, ऊन वगैरे लागणार्या लांकूडकामाला रंग दिलेला बरा. लांकूडकामास तेल देणें झाल्यास ३ पौंड बेलतेल (डबल बॉईल्ड लिन्सीडाईल) व एक पौंड टरपेनटाईन व १ पौंड मधमाशीचें मेण घेऊन तेल मंदाग्नीवर ठेवून व त्यांत मेण घालून सर्व मेण वितळेपर्यंत तापवावें व नंतर मिश्रण थंड झाल्यावर त्यांत टरपेनटाईन घालावें. व चांगलें कालवून अशा मिश्रणाचे दोन हात लांकूडकामास द्यावे. साधें तेल देणें असेल तर शिरका, गोडे तेल आणि टरपेनतेल ही समभाग घेऊन अशा मिश्रणाचे दोन हात लांकूडकामास दिले असतां तें काळसर रंगावर जातें.

वाहतूक:- दोन बैलांच्या गाडींत ९ इंच x ४ इंच x २॥ इंच मापाच्या विटा २००, किंवा मंगलोरी कौलें २५०, किंवा मंगलोरी ढापे १५० पर्यंत नेतां येतात. तसेंच दगडाची खडी १२ घनफूट किंवा मुरुम १६ घनफूट, ग्रयाव्हल गोटे १२ घनफूट, चुनखडी किंवा कंकर १३ घनफूट, विरवलेला किवा फकी चुना २० घनफूट, बांधकामाचे दगड ९ घनफूट किंवा माती १८ घनफूट दर खेपेस नेतां येतें. किंवा बंगाली १५ मण जळाऊ लाकडें; २० घनफूट दगडी कोळसा; २५ घनफूट इंजिनमधून निघालेली कोळशी, पोत्यांत भरलेली लोणारी  चुनाफक्की ३५ घनफूट पोती भरून शिवलेली २० ते २५ घनफूट, किंवा सिमेंटची ३ टिपें इतका माल नेतां येतो.

साधारणतः ७ मैल अंतरापर्यंत सुमारें १४०० पौंड आणि लांब अंतरावर १००० पौंड वजन गाडींत नेतां येतें. पुढील पदार्थांचे वजन दर घनफुटास किती पौंड असतें तें दिलें आहे. त्यावरून दर एक गाडींत किती माल जाईल हें काढतां येईल:- खडेडाभर ७२ पौंड; १२ x  १२ x १२ इंची भाजलेल्या फरशा दर चौरस फुटास १५ ते १६ पौंड, मळलेला चुना दर घनफुटास ११० ते ११५ पौंड.

कोणत्याहि इमारतीला लागणारें सामान कोणीकडून तरी वाहून आणावें लागतेंच. मालमसाल्याचें वजन घनफळाप्रमाणें दर एक मैल अंतरास अमूक असें ठरवून दोन विवक्षित स्थळांमधील वाहतुकीचा दर ठरवितात. गाड्या रोजंदारीनें लावल्या तर त्यांनीं रोज कितीं चालावें किवा किती खेपा कराव्या व प्रत्येक खेपेत मालमसाला किती न्यावा हें ठरवावें. प्रत्येक गाडींत दगड अदमासें १२ घनफूट, मुरूप १६ घनफूट, वाळू १६ घनफूट, व  लांकूड २५ ते ३० घनफूट पर्यंत नेतात.

बां ध का म:- कोणतीहि इमारत बांधतांना जागा उंचवट्याची म्हणजे जिच्यापासून सर्व उतारच आहे अशी व कोरडी हवा व प्रकाश मुबलक येणारी अशी असावी.

कोरडेपणासंबंधानें विचार करतां जमिनीवर पडलेला पाऊस चट्कन निघून जाईल अशी उंचट जागा असली पाहिजे. व त्याचप्रमाणें जमिनींत खड्डा केला असतां पाणी फार जवळ लागणार नाहीं अशी असली पाहिजे. सपाट आणि चिकण मातीची किंवा थोडी रेताळ किंवा भुसभुसशीत असून खाली चिकण मातीचा थर असेल तरी तीहि जमीन ओलसर राहते. जमीन ओली किंवा दमट असल्यास क्षयासारखे फुफ्फुसाचे विकार किंवा साधें धरणें, अर्धशिशी किंवा घशाचे विकार होण्याचा फार संभव असतो. तसेंच जेथें पानें व गवत कुजून अथवा जनावरांनीं अथवा माणसांनी केलेली घाण सांचून जमीन कुजलेली असेल अशा ठिकाणीहि बांधूं नये. कारण अशी घाण पुष्कळ वर्षेपर्यंत कुजत राहते आणि तींतून विषारी वायू उत्पन्न होऊन ते आसपासची सर्व हवा बिघडवितात आणि घरांत राहणार्या माणसांची आरोग्यहानि करतात. जेथें दमटपणा असेल तेथें जमीनींत खोल वर खणून ते गोठ्यांनी व डबरांनीं भरून त्यांतून भोंवतालच्या जमिनींतील पाणी झिरपून निघून जाईल अशी व्यवस्था करावी.

शहरांतून जेथें जेथें पाण्याचे नळ आले असून गटारें मात्र बांधलेलीं नाहींत अशी स्थिति असते अशा ठिकाणीं लोक नळ नेहमीं वहाते ठेवतात त्यामुळें, आणि जवळपास असलेल्या झाडांनां पुष्कळ पाणी मिळतें म्हणून नळी सोडून ठेवतात. यामुळें बागेंतील जमीन ओली राहतें एवढेंच नव्हें तर आसपासची सर्व जमीन भिजते आणि अशा रीतीनें घराच्या आसपासची आणि पाया उथळ असल्यास घराखालचीहि सर्व जमीन भिजून जाते. घराला जोतें फारसें उंच नसलें म्हणजे तर हमखास ओल येते व घरांतील सांड-पाण्याच्या मोर्या वगैरे गळक्या असल्या म्हणजे तर त्या ओलीत नेहमीं भर पडत जाते. अशा ठिकाणीं पावसाचें पाणी जमीनींत न मुरेल म्हणजे तें लागलीच निघून जाईल असे चर खणून व त्यांतून मोरी बांधून पाणी बाहेर सोडून दिल्यानें जमीन हळू हळू कोरडी होत जाण्याचा संभव असतो. तसेंच होतां होईल तितकें खुल्या जमिनीवर कमी पाणी पडेल अशी तजबीज ठेवल्यास ओल कमी होईल. जेथें जेथें नळ सुटत असेल तेथें तेथें फरशी बांधून पाणी बाहेर काढून द्यावें. हे सर्व उपाय केले असतां कांही वर्षांनीं ओल कमी झाल्याचें आढळून येईल. पुण्यासारख्यां शहरांतून गांवाच्या वरील बाजूस कालवा असल्यामुळें आणि पाण्याची मोठी टांकी गळकी असल्यामुळें त्यांतून पाण्याचा झिरप शहरांखालून वहात जाऊन नदीकडे उतार असल्यामुळें तिकडे वहात जाण्याची त्याची प्रवृत्ति असल्यामुळें शहरांतील कांहीं ठिकाणीं १० फूटांपेक्षांहि कमी खोलीवर पाणी आढळून येतें आणि ह्यामुळेंच फार ओल माजून पुण्याची हवा रोगट बनत चालली आहे. जमिनीपासून १० फूटांच्या आंत पाणी असणें केव्हांहि इष्ट नसतें.

चिकण मातींत पाणी फार वेळ राहूं शकतें. आणि तिच्यांत दर घनफुटास १ ग्यालन इतकेंहि पाणी राहूं शकतें. अशा चिकण मातींतून चार फुटांपेक्षां खोल नाहींत असे चर खणून आणि त्यांनां १०० फुटांत १ फूट किंवा १०० फुटांत १ फूट एवढा उतार देऊन जवळ कोठें तरी असलेल्या खुल्या गटाराला ते मिळविले तर त्यांपासून बराच उपयोग होतो. अशा चरांचें एकमेकांपासून अंतर २० पासून २५ फूट आणि जमीन रेताळ असल्यास ४० फूट ठेवावें.

खेळती हवा:- राहण्याच्या जागेंत हवा नेहमीं खेळती असावी. कारण मनुष्याच्या श्वासोच्छवसनामुळें त्यांतील प्राणवायु कमी होत जातो आणि उच्छ्वसनामुळें विषारी कर्बाम्लची अभिवृद्धि होते. अशा दूषित हवेमुळें डोकें दुखण्यासारखे आजार आणि मलूलपणा उत्पन्न होतो. आणि माणसें पिकुटलेली व रोगट दिसूं लागतात. व अशा माणासांनां रोग तेव्हांच पछाडतात. ह्यासाठीं अशी दूषित हवा काढून टाकणें व तिच्या जागीं स्वच्छ हवा येईल असे करणें अगत्याचें असतें. राहण्याच्या घरांतील हवा इतकी खेळती असली पाहिजे कीं, बाहेरून येणार्या मनुष्याला कोणत्याहि प्रकारचा फेरफार किंवा यतकिंचितहि घाण भासतां कामा नये.

स्वच्छ हवेंत २०९.६ भाग ऑक्सिजन किंवा प्राणवायू, ७९० भाग नत्रवायु (नायट्रोजन) आणि ०.४ भाग कार्बाम्ल असे दर हजार भाग हवेंत (मापानें) असतात. खेरीज दुसरेहि कांहीं वायू अति सूक्ष्म प्रमाणांत असतात.

कर्बाम्ल (कार्बन डॉयाक्साईड) जें दर हजारी .४ भाग मापानें असतें तें राहत्या जागेंत हवा दूषित झाल्यामुळें जर. ०.६ इतकें झालें म्हणजे नेहमींच्या प्रमाणांच्या १॥ पट वाढलें तर मनुष्याच्या घाणेंद्रियाला त्याबद्दल प्रतांति येते. आणि म्हणून यापेक्षां कर्बाम्लाचे जास्ती प्रमाण एखाद्या घरांत आढळून आले तर तेथें हवा जितकी खेळती रहावयास पाहिजे तितकी खेळत नाहीं असें खास समजावें.

उच्छ्वसनक्रियेमुळें प्रत्येक मनुष्य दर एक तासास ०.६ घनफूट कर्बाम्ल हवेंत सोडीत असतो. ह्यास्तव त्याच्या राहण्याच्या खोलींत दर तासास दर माणशीं ३ हजार घनफूट शुद्ध हवा येणें अगत्याचें असतें. वार्याचा सोसाटा अंगावर येणें केव्हांहि चांगलें नसतें आणि आंत येणार्या हवेचा वेग जर दर सेकंदास ३ फूटांपेक्षां जास्ती असला तर मनुष्यास वारा जास्ती आला असें वाटतें. आणि म्हणून प्रत्येक मनुष्यास १०० चौरस फूट जागा असून खोलीची उंची १० फूट असली म्हणजे माणशीं १ हजार घनफूट इतकी जागा दरएक माणसास वांटून दिलेली असली आणि अशा खोलीतील हवा एक तासांत ३ वेळां बदलली म्हणजेच तितकी दूषित हवा बाहेर निघून गेली तर वहात्या हवेचा वेग फारसा लक्षांत न येतां इष्ट कार्य घडून येतें. ज्याप्रमाणें मनुष्याच्या श्वासोच्छवासानें हवा खराब होते त्याचप्रमाणें कोणत्याहि प्रकारचें दिवे जळत असले म्हणजे त्या दहनक्रियेमुळें उत्पन्न होणार्या कार्बाम्लामुळेंहि खोलींतील हवा श्वसनास अपात्र होते. साधी ग्यासची बत्ती दर तासास ५ घनफूट ग्यास जाळणारी असेल तर तिला दर तासास नऊ हजार घनफूट म्हणजे ३ माणसांइतकी हवा लागते. साधारण तेलाचा दिवा असला तर त्याला एक माणसाइतकी व मेणबत्ती जळत ठेवली तर तिला अर्ध्या माणसाइतकी हवा लागते. श्वासोच्छवसनाची हवा अगदी शुष्क किंवा कोरडी असतां कामा नये. तिच्यांत जास्तीत जास्त जितका ओलसरपणा असूं शकतो त्याच्या निदान २/३ इतका तरी ओलसरपणा असावा. हवा शुद्ध राहण्यासाठीं दर तासास किती घनफूट हवा इमारतींत आली पाहिजे ते पुढें दिले आहे:- वयांत असलेला पुरुष मोठ्या मेहनतीचे काम करीत असतां ९००० घनफूट; वयांत आलेला पुरुष साधारण मेहनतीचें काम करीत असतां ४७५०; वयांत आलेला पुरुष स्वस्थ बसला असेल तेव्हा ३३०० घनफूट; वयांत आलेली स्त्री स्वस्थ बसली असेल तेव्हा ३ हजार घनफूट. मुलें स्वस्थ असतील तेव्हां २००० घनफूट; साधारणतः पुरुष, बायका, मुलें मिळून स्वस्थ असतील तेव्हा ३००० घनफूट, अशींच माणसें थोडा वेळपर्यंत एखाद्या जागेंत असतील तेव्हां १५०० घनफूट (उदाहरणार्थ नाटकगृह वगैरे)

या वर दिलेल्या प्रमाणांत जागा देणें बरेंच खर्चाचें असते. यास्तव याच्यापेक्षां बर्याच कमी प्रमाणांत जागा देतात व दर तासास पुष्कळ वेळां हवेचा फेरबदल होत जाईल अशीं दारें, खिडक्या, गवाक्षें, जाळ्या वगैरे ठेवून काम भागवावें लागतें. इमारतींत दर माणशीं किती जागा साधारणतः देतात याचें प्रमाण पुढें दिलें आहे:-

इमारतीचा प्रकार दर माणशी जागा घनफूट माणशी जमिनीचें क्षेत्रफळ चौ. फू.
राहण्याची घरें ३०० २५ ते ३०
चाळी ३०० २५ ते ३०
कारखानें २५० २० ते २५
शाळा १४४ १० ते २०
इस्पितळांतील वार्ड १००० ८० ते १००
तबेले ८००-१००० ८० ते १००

वर सांगितलेलें हें कमीतकमी प्रमाण होय. त्याच्यापेक्षां जितकी जास्ती हवा मिळेल तितकें चांगलेंच. हवा आरपार निघून जाईल तर फार चांगलें. अशा ठिकाणी दक्षिणेकडील भिंतीत किंवा उत्तरेकडील भिंतीत समोरासमोर दारें खिडक्या असाव्या. वेगवेगळ्या इमारतींनां खिडक्या व जाळ्या केवढ्या व किती असाव्या याचें साधारण प्रमाण:- कोणत्याहि खोलीची किंवा दिवाणखान्याची जेवढी जमीन असेल त्या जमीनीच्या क्षेत्रफळाच्या निदान दशांशाइतक्या क्षेत्रफळाच्या खिडक्या व जाळ्या असल्या पाहिजेत. परंतु हेंच प्रमाण जमिनीच्या क्षेत्रफळाच्या पंचमांशाइतकें वाढवितां आल्यास फार बरें.

ज्या ठिकाणीं छाताच्या जवळ जाळ्या ठेवल्या नसतील अशा ठिकाणीं खिडक्यांची उंची वरपर्यंत वाढविणें बरें. हवा शुद्ध ठेवणें हें जितकें अगत्याचें आहे तितक्याच अगत्याचें प्रकाश आंत येऊं देणें हेंहि आहे. ऊन आंत आल्यामुळें उन्हाच्या तापानें हवेंत चलनवलन सुरू होतें आणि रोगबीजांचाहि नाश होतो. घरांतील भिंतींनां सफेती वरचेवर दिल्यामुळें रोगबीजांचा नाश होतो व प्रकाश वाढतो. जाळ्या ठेवणें त्या जितक्या उंच ठेवातां येतील जितक्या उंच ठेवाव्या. खिडक्यांचा तळ साधारणतः जमिनीपासून २॥ फुटांवर असावा. शाळांतून भिंतींची उंची निदान १२ फूट आणि लहान मुलांच्या शाळेंत दर मुलास १० ते १२ चौरस फूट, मोठ्या मुलांनां १२ ते १५ चौरस फूट आणि ट्रेनिंग कॉलेजें वगैरे ठिकाणीं १८ ते २० चौरस फूट जागा प्रत्येक विद्यार्थ्यांस असावी. आणि दक्षिण व उत्तर बाजूंस दर विद्यार्थ्यांस ४८ चौरस इंच इतका वातागममार्ग किंवा व्हेंटीलेटर भिंतीच्या माध्यापाशी ठेवतात.

इ मा र ती.

इमारतीची जागा साफ करणें:- ज्या जागेवर इमारत बांधावयाची असेल त्या जागेवरील सर्व झाडेंझुडपें काढून टाकवीं, व त्यांच्या मुळ्या खणून जागेवर असलेले सर्व खाचखळगे भरून काढून नवीन घातलेली माती चांगली सपाट करावी. इमारत बांधण्याच्या जागीं असलेली जुनी घरे जमिनीबरोबर पाडावीं व ती पांडतांना जुन्या सामानाची नासधूस न होऊं देण्याची खबरदारी घ्यावी.

इमारतीसंबंधानें पहिलें काम म्हणजे पाया खोदणें व भरणें होय. कोणत्याहि इमारतीचा पाया भरावयाच्या पूर्वी त्याच्या खालील जमीनीचा तळ हा वर येणारें ओझें सहन करण्याइतका मजबूत असला पाहिजे. असा तळ बिलकुल न दबणाराच पाहिजे असें केवळ नाहीं, तर तो सारखा दबणारा असला म्हणजे पुरे आहे. ह्या अर्थ असा कीं, पायाच्या तळाचा कोणताहि भागावर दर चौरस फुटाला दोन टन इतका भार आला तर तो प्रत्येक ठिकाणीं तितकाच दबला पाहिजे. अशा प्रकारचा सारखा तळ मिळाला पाहिजे. त्यावर येणारा भार दर चौरस फुटाला साधारण रीतीनें सारखाच पडेल अशा बेतानें पायाची रुंदी कमीजास्त करतात. पायाचा तळ जर खडकाचा नसला तर त्यावर वजन दर चौरस फुटाला पाऊण टनापासून दोन-अडीच टनांपेक्षां जास्ती न येईल अशी खबरदारी घेतात. पाया इतक्या खालीपर्यंत खोदावा कीं, त्याचा तळ कोणत्याहि कारणानें सहसा उघडा पडूं नये. आणि तो इतका रुंद असावा लागतो कीं, त्यावर जें ओझें किंवा दाब येणार त्याची मध्य रेषा पायाच्या रुंदीच्या मधल्या तृतीयोंश भागामध्यें पडली पाहिजे. ही रेषा बाकी राहिलेल्या दोन्ही बाजूंच्या तृतीयांशांत पडली तर पायाचा शेवटचा भाग चुरून जाऊन इमारतीला नुकसान पोंचतें. ही दाबाची मध्यरेषा जर उभी असेल तर पायाचा तळ तिच्या काटकोनांत म्हणजे क्षितिजसमांतर पातळींत असावा लागतो. तीच दाबाची रेषा जर तिरपी असेल तर तिच्या पायाचा तळ देखील तिच्या काटकोनांतच ठेवावा लागतो. पाया सर्व ठिकाणीं सारखाच दबणारा असला म्हणजे वरच्या इमारतीला तड किंवा फाट पडत नाहीं. ही तड किंवा फाट पडण्याचें कारण पायाचा एक भाग दुसर्या भागापेक्षां जास्ती किंवा कमी दबतो हें होय. पायाचा तळ रेतीचा किंवा गोट्यांचा असला तरी चालतो; पण पायाखालची रेती किंवा गोटे ह्यांनां सरकावयास किंवा निसटून जाण्यास वाव असतां कामा नये. तळाशी जमीन जर मऊ असेल तर अशा जमीनीच्या दर चौरस फुटावर अर्ध्या किंवा पाऊण टनापेक्षां जास्ती भार न येईल इतका रुंद पाया घ्यावा लागतो. किती खोलीवर पाया घालावयाजोगा कठिण तळ मिळेल हें पाहण्यासाठीं तीन किंवा चार फूट समचौरस असा खाडा, कठिण तळ मिळेतोपर्यंत खोल खणतात. पायाला जितकी कठिण पाहिजे तितकी जमीन जर ८/१० फुटांपेक्षां जास्ती खोलीवर असेल तर त्या खाड्याच्या मधोमध तीन किंवा चार इंच व्यासाचें गिरमिटानें भोंक पाडून किती खोलीवर कठिण जमीन लागेल तें पहावें. कोणत्याहि इमारतीच्या पायाचा तळ पुढील ती प्रकारांपैकी कोणत्या तरी एक प्रकाराचा असतो:-

प्रकार १ ला:- कठिण खडकाळ जमीन, किंवा खडक किंवा टिकावानेंहि मोठ्या प्रयासानें खोदली जाणारी माण, किंवा तिच्यासारखी दुसरी कठिण जमीन. अशा प्रकारच्या जमीनीवर कितीहि भार आला तरी ती फारशी दबत किंवा खचत नाही. अशा प्रकारच्या जमीनींत पाया घालणें तो पक्का खडक असल्यास फूट दीड फूट पुरे, माण किंवा मुरूम अशी जमीन असल्यास साधारण इमारतीसाठी दोन-तीन फुटांपेक्षां जास्ती खोल पाया घेण्याची जरूर नसते.

प्रकार  २ रा:- शुद्ध रेती किंवा निर्भेळ गोटे असणार्या अशा नद्यांच्या पात्रांत पूल बांधावयाच्या वेळी पाया खोदतांना लागणारा तळ हा दुसर्या प्रतीचा होय.

प्रकार  ३ रा:- ह्यांत सर्व प्रकारच्या दबणार्या जमीनी येतात. ह्यापैकीं पुष्कळ प्रकारच्या जमीनी बर्याच कठिण असतात. परंतु ज्या कांहीं दलदलीसारख्या असतात अशा जमीनींत पाया घालणें फार कठिण असतें.

ख ड का व र पा या.- हा घालणें असल्यास खडकाच्या पृष्ठभाग साधारण रीतीनें एक लेव्हलमध्यें येईल अशा रीतीने घडून काढतात. हें काम करतांना पायर्यांप्रमाणें एकापेक्षां एक उंच असे टप्पे कधीं कधीं करावे लागतात. मुद्दा एवढाच  कीं प्रत्येक टप्प्याचा पृष्ठभाग लेव्हलमध्यें असला पाहिजे. उन्हापावसानें खडकाचा पृष्ठभाग झरून गेला असेल तर किंवा मऊ अथवा भुसभुसशीत झाला असेल किंवा चुरून गेला असेल तर असा सर्व भाग कापून काढतात व कठिण भाग लागला म्हणजे त्यावर पायाचें बांधकाम सुरू करतात. यावर येणारा दाब तिरपा असेल तर त्याच्या चौरशींत किंवा काटकोनांत पायाचा तळ कापून काढावा लागतो.

कठिण जमीनींत पाया घालणें झाल्यास ४ पासून ६ फूट खोलीचे चर खणून कठिण जमीन लागल्यावर क्रांकीटनें पाया भरून काढतात. चिकण मातींत पाया घालावयाचा असल्यास तिच्यांत खोदलेला चर जास्ती दिवस उघडा ठेवूं नये. कांक्रीटनें भरून काढावा. पायांत कांक्रीट घालावयाचें तें ६ इंच पासून ९ इंच जाडीचा दर एक थर टाकून धुमसून तो थर कठिण झाल्यावर त्यावर दुसरा थर टाकावा. (कांक्रीट म्हणजे एक भाग चुना दोन भाग रेती व चार पासून सहा भाग पर्यंत फोडलेली खडी किंवा खडीच्या आकाराचें विटांचे तुकडे किंवा त्याच आकाराचें कंकरचे म्हणजे चुनखडीचे खडे किंवा त्याच आकाराचें नदीतले गोटे यांचें मिश्रण होय.) कांक्रीटच्या मालापैकीं रेती व चुना हीं एक करून घाणींत मळून तयार करतात. व नंतर खडी किंवा गोटे अथवा विटांचे रोडे ह्यांचा एक फुटाचा थर करून त्यावर ५ किंवा ६ इंच जाडीचा मळलेल्या चुन्याचा थर करतात. आणि नंतर पाणी टाकून व खापून तो नीट रीतीनें मिसळल्यावर म्हणजे प्रत्येक खडीचा किंवा रोड्याचा किंवा गोठ्याचा सर्व बाजूचा पृष्ठभाग चुन्यानें माखला जाईल अशा रीतीनें खापून व मिसळून नंतर असा मिसळलेला गारा पायांत नेऊन टाकतात. व धुमसानें ठोकतात.

ठो क ण्या चें प्र मा ण:- जो चुना पूर्वी गोट्यांच्या किंवा खडीच्या सांधीत बसलेला होता तो त्या सांधी धुमसाच्या ठोकण्याच्या योगानें फार बारीक झाल्यामुळें त्यांतून चुना वर निघून येतो. थोडासा चुना वर निघून आला म्हणजे ठोकणें पुरें झालें असें समजावें.

पा यां त झ रें.- ज्यावेळीं पायांतून पाण्याचे झरे फुटून निघत असतील त्यावेळीं तें पाणी पायाच्या एका कोपर्यांत काढून देतात व नंतर सगळ्या तळावर मेणकापड किंवा पाणी न शोषणारें कापड पसरून त्यावर कांक्रीटचा थर घालून ठोकून मजबूत करतात. व त्या कापडाच्या तळाखालून वाहणारें पाणी पंपानें बाहेर काढीत राहतात व अशा रीतीनें थरावर थर टाकून कोरड्यांत काम करून घेतात व असें कांक्रीट आंतल्या चुन्याच्या रासायनिक क्रियेच्या योगानें कठिण किंवा एकजीव झाल्यावर वाहणार्या झर्यांत सिमेंट व रेती एकदम टाकून तो वाहण्याचें बंद करून टाकतात.

पा ण्या हू न खो ल पा या.- नदींत किंवा जितक्या खोलीवर विहीर खणली असतां पाणी लागतें त्या पेक्षां जास्ती खोलीवर पाया घालणें असेल तर जेवढा लांबीरुंदीचा पाया घालणें असेल तेवढी जागा सोडून त्याच्या बाहेरच्या लाइनींत फळ्या ठोकून व त्यांना आंतल्या बाजूनें धिरे किंवा टेके देऊन नंतर आंतल्या बाजूची रेती व माती काढून खालीं कठिण जमीन लागेतोपर्यंत खोदाई करतात, व नंतर पाणी काढण्यचा वाफेचा पंप सतत चालू ठेवून पायांत कांक्रीट भरतात. असें काम पाण्यांत १०/१५ फूट खोलीपर्यंत करतां येतें. याच्यापेक्षां खोल पाया घालणें झाल्यास लोखंडी किंवा पोलादी शीटिंग पाइल्स किंवा लॉकिंग पाइल्स म्हणजे एकमेकांत गुंतणार्या चरकांतून दाबून काढलेले लोखंडी वरघे (जॉइस) ठोकतात व नंतर त्यांतील रेती व पाणी काढून सिमेंटच्या कांक्रीटनें पाया भरून काढतात.

द ल द ली ची जा गा व खुं ट प द्ध ति.- अशा ठिकाणी पाया घालणें जरूरच असेल तर अशा दलदलीत लांकडी सीट किंवा लोखंडी स्क्रू पाईल्स किंवा अलीकडे अलीकडे लोखंडी सळ्या घालून सिमेंट कांक्रीटचे केलेले वाटोळे सोट खाली जमीन कठिण लागेतोपर्यंत ठोकतात व त्यांचा माथा एका लेव्हलला जाणून त्यावर लांकडीं तराफा तयार करतात. कधीं कधीं अशा दलदलीच्या जागेंत सहापासून बारा फूट लांबीचे व सहापासून नऊ इंच व्यासाचें लांकडी सोट जेवढ्या जागेवर बांधकाम करावयाचें असेल त्यापेक्षां कांहीं फूट जास्ती लांब-रुंद जमिनींत जितकें एकमेकांच्या जवळ जवळ ठोकवतील तितके जवळ ठोकतात. व नंतर ठोकलेल्या सोटांचीं वरचीं टोकें एका सपाटींत येतील अशा बेतानें कापून त्यावर उभे व आडवे साधारण चौरस केलल्या सीट जोडून तराफा तयार करतात. किंवा ह्या जवळ जवळ ठोकलेल्या सीटांच्या मध्यावर दोन-तीन फूट जाडीचा कांक्रीटचा थर घालतात. व त्यावर बांधकाम करतात. कधीं कधीं असे लांकडीं सोट न ठोंकतां मोठ्या गिरमिटानें दहा बारा फूट खोलीचीं भोकें पाडतात व गिरमिट काढल्यावर ती भोकें रेतीनें भरून काढतात. अशी रेती भरल्याच्या योगानें वर येणारें ओझें त्या सर्व जागेवर विभागलें जातें. कारण भोंकांतील रेतीवरील ओझें, हीं पाडलेली भोकें जवळ जवळ असल्यामुळें तळावर व सर्व बाजूच्या मातीवर प्रवाही पदार्थांच्या धर्माप्रमाणें सारखें पसरलें जातें. व अशी जमीन साधारण कठिण असल्यास अशा पायावर साधारण वजनाचें बांधकाम निघूं शकतें.

का ळ्या ज मी नी त पा या.- काळ्या जमीनीइतकी वाईट जमीन कोणतीहि नाहीं. ही जमीन पाण्यानें भिजली असतां सुमारें १। पट फुगतें. आणि वाळली असतां तितकीच आकुंचन पावते. यामुळें तिच्यांत उन्हाळ्याच्या दिवसांत वरील बाजूस ३ ते ६ इंच रुंच आणि १०-१० फूट खोलीपर्यंतहि तडा पडतात. आणि अशा दिवसांत वळीवाचा पाऊस पडला म्हणजे त्या भेगांतून १० फुटांपेक्षाहि जास्ती खोलीपर्यंत पाणी शिरल्यानें इमारतीच्या पायाखालची जमीनहि मऊ होऊन दर चौरस फुटास १०० पौंडाच्या एवढा भारहि सहन करण्यास असमर्थ होते. पावसाळ्यांत सगली जमीन एकजीव होऊन उन्हाळ्यांत जेव्हां ती आकुंचन पावते आणि तींत भेगा पडतात त्यावेळी पायांतील कांक्रीट किंवा बांधकाम ह्यांनांहि तडा पडतात. ह्याकरतां पुढील उपाय योजावें:-

(१) पायाची जमीन भिजण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं दर चौरस फुटांवर १००० पौंडापेक्षां अधिक वजन न येईल इतका रुंद पाया ठेवावा. (२) ज्या खोलीपर्यंत जमिनीला भेगा पडत असतील त्याच्या खालपर्यंत पाया खणावा. (३) काळ्या जमिनीचा आणि पायांतील कांक्रीट व बांधकाम यांना एकमेकांशीं संसर्ग होऊं नये म्हणून पायाच्या दोनहि बाजूंकडील काळी माती कांक्रीटच्या तळापर्यंत खणून काढावी. (४) अथवा उन्हाळ्यांत अशा काळ्या जमिनींत मोठमोठाल्या भेगा पडल्याकारणानें जें खेचाण अथवा ताण कांक्रीट मध्यें उत्पन्न होतो त्या ताणानें कांक्रीट फाटून जाऊन त्यांत भेगा पडूं नयेत म्हणून कांक्रीटात सळ्या घालून कांक्रीटाची, आडवें खेचाण अथवा ताण सहन करण्याची शक्ती वाढवावी. अशी खबरदारी घेतली असतां काळ्या मातींतील पायेहि बहुतकरून टिकतात. कधीं कधीं १०-१५ वर्षेपर्यंत इमारत चांगली राहाते आणि नंतर तिला पडूं लागतात असेंहि घडतें. ह्याला कारण एखाद्या वर्षी पाऊस अतिशय कमी पडल्यामुळें जमिनींतील भेगा दर वर्षीपेक्षां जास्ती खोलीपर्यंत जातात व अशा भेगांतून आंत पाणी शिरून पूर्वी जी खोल जमीन भिजून मऊ होत नव्हती ती नव्यानेंच भिजल्यामुळें पूर्वी इतका भार सहन करण्यास असमर्थ होते.

आवाराच्या भिंती किंवा अशाच कमी महत्त्वाच्या कामाचे पाये काळ्या मातीत ४ फूट रुंदीचे आणि खाली जेथपर्यंत उन्हाळ्यां दिवसांत जमिनींत भेगा पडत असतील त्याच्या खाली निदान ६ इंच खोलीपर्यंत पाया खोदावा आणि खणलेल्या चरांत पाणी घालून धुमसानें तळ चांगला धुमसून काढावा आणि नंतर त्यांवर सहा सहा इंचांचे चांगल्या मुरमाचे दोन थर घालून प्रत्येक थर पाणी घालून चांगला ठोकावा. ह्या १२ इंच जाडीच्या मुरमावर सुमारं १८ इंच जाडीचा ओलसर रेतीचा थर घालून धुमसून बसवावा. परंतु असा थर टाकतेवेळीं चरांच्या दोन्हीं बाजूं अर्थ्या विटेच्या भिंतीनी चिखलांत बांधाव्या. विटा मिळत नसल्यास दगडमातीच्या पातळ भिंती बांधून घ्यावा. असे करण्याचा हेतू हा कीं, ही पायांतील रेती वाळल्यानंतर सैल होऊन भोंवतालच्या काळ्या मातींतील भेगातून शिरूं नयें.

वर सांगितलेल्या ओलसर रेतीच्या चांगल्या ठोकलेल्या थरांवर चुन्याचें कांक्रीट घालतात. आणि त्या कांक्रीटचे थर नेहमीप्रमाणें टाकून व ठोकून जमिनीच्या माथ्याच्या खाली ६ इंचापर्यंत करून त्यांवर बांधकाम सुरू करतात.

पा या खा ली ल खुंट.- म्हणजे मऊ भुसभुशीत जमिनींत वरील बांधकामाचा भार सहन करण्यासाठी पायाच्या खाली जे लांकडी सोट किंवा खुंट ठोकतात ते बहुतकरून वाटोळ्या आकाराचे मजबूत लांकडाचे असतात. व ते जितक्या जमिनीवर वरील इमला बांधावयाचा असेल तेवढ्या सगळ्या क्षेत्रफळावर पूर्वपश्चिम व दक्षिणोत्तर अशा दोन्ही दिशांनीं सारख्या अंतरावर ठोकीत जातात. असे खुंट चार चार फूट अंतरावर ठोकावयाचे असले म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जी रेषा जाईल त्या रेषेवर प्रत्येक चार फुटांवर एक एक खुंट व त्याचप्रमाणें दक्षिणोत्तर रेषेवरहि एक एक खुंट याप्रमाणें ठोकतात. व अशा रीतीनें त्या सर्व जमीनीवर बुद्धिबळाच्या पटांप्रमाणे चौकटी आंखल्या जातात, व अशा रीतीनें त्या जमिनीवरील कोणताहि खुंट त्याच्या चारी बाजूंच्या खुंटांपासून चार फुटांपेक्षां जास्ती अंतरावर नसण्यामुळं दर एक खुंटावर ४ x ४ =१६ चौरस फूट इमल्याचा भार येतो. याच हिशोबानें दर एक खुंटावर सोळा चौरस फुटांवरील भार, अशा रीतीनें सर्व भाग सर्व खुंटांवर सारख्या रीतीनें विभागला जातो. हे खुंट इतक्या लांबीचें असावे लागतात कीं, ते वरील मऊ जमीनींमध्ये आरपार जाऊन खालच्या कठिण जमिनींत थोडेफार तरी गेले पाहिजेत. हे खुंट किंवा सोट ९ पासून १८ इंच व्यासाचें व १५ फुटांपासून ३० फूट लांबीचें असतात. खुंटाच्या व्यासाच्या २० पटीपेक्षां त्यांची लांबी जास्ती असूं नये, नाहीं तर ते ज्या लोखंडी घणानें ठोकतात त्या घणाच्या तडाख्याबरोबर वांकतात. हे सोट किंवा खुंट जमीनींत ठोकावयाच्या आरंभीं त्यांची बाहेरील साल काढून व जेथून फांद्या फुटलेल्या असतील त्या ठिकाणच्या गांठीं कापून काढून गुळगुळीत करावें लागतात व त्यांनां खालच्या तोंडाला शंक्वाकृति लोखंडाची शेंबी बसवितात. व त्यांच्या माथ्याला चपट्या लोखंडी पट्टीचें वेढे बसवितात. या वेढ्याच्या योगानें त्या सोटाला वरून जेव्हां घणाचा तडाखा बसतो त्यावेळीं तो माथा पिंजून किंवा चिंबून जात नाहीं व खालच्या शंक्वाकृति शेंबीच्या योगानें ते सोट जमिनींत सहज रीतीनें घुसतात व त्या सोटांचा घेर गुळगुळीत केला असल्याकारणानें भोंवतालच्या मातीशींहि त्यांचे घर्षण कमी होतें, व अशा रीतीनें या तिन्ही गोष्टींची ते सोट ठोकावयास मदत होते ही शंक्वाकृति शेंबी. शिक्कई लोखंडाची घडून बनवितात. तिचें खालचें टोंक निमुळतें असून कांहीं भाग शंकूसारखा करून त्याच्या वरचा भाग चार पाकळ्यासारखा चिरतात व त्या प्रत्येक पाकळीला खिळे बसविण्याकरितां भोंकें पाडतात. सोटाच्या खालचें टोंक घडून शंक्वाकृति निमुळतें केलेलें असतें त्या टोंकाला शेंबीच्या चारी पाकळ्या खिळे ठोकून खेळवून टाकतात; किंवा, ही शेंबी अथवा सूची विडाची शंक्वाकृति निमुळती केलेली असते व तिच्या बाजूला ही सूची ओतावयाच्या वेळींच तिच्या मधोमध वरच्या बाजूस आटे असलेला लांब स्क्रू बसवून सोटाच्या खालच्या निमुळत्या भागाला तो स्क्रू फिरवून पक्का करून टाकतात.

खुं टां ची ठो क णी.- यासाठीं एक प्रकारची घडवंची तयार करतात. तिची उंची ठोकावयाच्या सोटांपेक्षां सुमारे ६-८ फूट जास्ती असावा लागते. व त्या घडवंचीच्या माथ्याला एक गडगडी बसविलेली असते, तीवरून दोन नेऊन तिच्या एका टोकाला घण बांधलेला असतो व दुसरे टोक खाली जमीनीपर्यंत नेलेले असतें व हा घण सहा किंवा आठ माणसांनी उचलतां येण्यासारखा असल्यास तितकीं माणसें एकदम जोर करून तो दोर ओढतात व एकदम सोडून देतात हा पण तितक्या माणसांनीं उचलण्याजोगा नसल्यास तो रहाटाला दोर गुंडाळून त्याच्या योगानें तो उचलतात. व त्या घणाला उचलावयाची पक्कड असते ती थडवंचीच्या माथ्याजवळ आल्यावर आपोआप उघडावी अशी योजना केलेली असते. त्या योगानें तो घण पक्कडीतून सुटून खालीं जो सोट किंवा खुंट उभा असेल त्याच्या माथ्यावर जाऊन आदळलतो व अशा रीतीनें तो खुंट जमीनींत ठोकला जातो. हा घण घडवंचीची फ्रेम सोडून एका बाजूला पडूं नये म्हणून, त्याला त्या फ्रेमीच्या दुसर्या बाजूला लागूनच फिरतां येण्यासाठी एक प्रकारचा फिरता अडणा केलेला असतो. हा सोट किंवा खुंट ठोकावयाचा घण बिडाचा सुमारें दोन टन वजनापर्यंत चौरस ठोकळाच असतो व त्याला उचलावयासाठीं एक प्रकारची मूठ केलेली असते. अशा घणाचा आघात किंवा तडाखा बसूनहि तो खुंट किंवा सोट जमिनींत जास्ती उतरेनासा झाला म्हणजे तो खुंट ठोकणें बंद करावयाचें.

खुं टा सं बं धा चें ग णि त.- हें येणेंप्रमाणें:- १० पौंडांचें वजन ५ फूट उचललें म्हणजे १० x ५ = ५० फूट पौंड इतके कार्य झालें असें म्हणतात. अशा प्रकारचें कार्य दर मिनिटाला ३३००० फूट पौंड म्हणजे एक अश्वबलाइतकें झालें असें समजतात. एखादें एंजिनें १० अश्वबलाचें आहे. असें म्हटलें म्हणजे त्याचा अर्थ त्या एंजिनच्या योगानें दर मिनिटाला ३३००० पौंड वजन १० फूट उंच उचललें जातें असा असतो. ३३०० ग्यालन पाण्याचें वजन ३३००० पौंड असतें. म्हणून वरच्या १० अश्वबलाच्या एंजिननें ३३०० ग्यालन पाणी १० फूट उंचीवर एक मिनिटांत चढवलें जाईल असें समजावें. वरील सोट किंवा खुंट ठोकण्याचा घण १ फूट उंचीवरून पडला असतां जितकें कार्य करील त्याच्या दुप्पट कार्य तोच घण चार फूट उंचीवरून पडला असतां करील, व तोच घण नऊ फूट उंचीवरून पडला किंवा टाकला तर तिप्पट कार्य करील, १६ फुटांवरून टाकला तर चौपट, व पंचवीस फुटांवरून टाकला तर ५ पट करील कार्य, म्हणजे उंचीच्या वर्गमुळा इतक्या पटीनें त्याचें कार्य होत असतें. वर सांगितलेंच आहे कीं, हे घण दोन टन वजनापर्यंत असतात व आणि तें कितीहि हलके असले तरी ३० फुटांपेक्षा जास्ती उंचीवरून टाकीत नाहींत. त्याचें कारण ह्यापेक्षा तडाखा इतका जोरात बसतो कीं, ठोकल्या जाणार्या सोटाचा किंवा खुंटाचा माथा (त्याच्यावर नेहमीं ठेवतात तसा चिवट लांकडाचा त्या सोटाच्या माथ्यापेक्षांहि मोठ्या व्यासाचा जाडीचा ठोकला ठेवला असला तरी सुद्धां) चिंबतो व पिंजून जातो. साधारण रीतीनें आठशें पौंड वजनाचा घण पांच फूट उंचीवरून टाकला व अशा घणाचे पंचवीस तीस तडाखे एकामागून एक दिले असतां सोट एकपंचवमांश इंचापेक्षां जास्ती उतरेनासा झाला म्हणजे तो ठोकणें बंद करतात. वरील इमला जितक्या वजनाचा असेल तितक्या वजनाच्या मानावरून हे सोट किती ठोकावयाचें हें ठरवितात. व प्रत्येक खुंटाच्या माथ्याचें क्षेत्रफळ जितकें चौरस इंच असेल तितक्या हजार पौंडांचें ओझें त्यावर आलें तरी चालेल असें मानतात; उदाहरणार्थ, १२ इंच व्यासाचा जर खुंट असेल व तो पुरता ठोकला असेल तर त्याच्यावर पन्नास टन ओझें आलें तरी चालेल. हाच सोट नऊ इंच व्यासाचा असेल तर त्यावर पंचवीस-सत्तावीस टन; व तोच सहा इंच व्यासाचा असेल तर बारा टन ओझें जास्तीतजास्ती त्यावर चालतां येईल असे बारके सोटहि एकमेकांपासून २॥ फूट अंतरापेक्षां कमी अंतरावर ठोकता येत नाहींत. सर्व खुंट ठोकल्यावर त्या सर्वांचें माथे एका पानसळींत आणण्यासाठीं त्यांचे कमीजास्ती उंचीचे माथे करवतीनें कापून टाकतात व नंतर त्यांच्या माथ्यावर उभ्या व आडव्या लांकडांचा तराफा तयार करून त्यावर बांधकाम करतात. अशा प्रकारचें खुंट ठोकून करावयाचे पाये करण्याची जरूर महाराष्ट्रांत पडत नाहीं. परंतु ते गुजराथेंत ज्या ठिकाणीं मऊ जमीन किंवा दलदल असेल अशा ठिकाणीं कधीं कधीं वापरावे लागतात.

लो खं डी खुं ट:-लांकडी सोट कांही दिवस ओले व कांही दिवस अगदीं कोरडे राहत असल्याकारणानें कांही वर्षांनीं सडतात व त्यामुळें ते निरुपयोगी होतात. त्याकरितां जास्ती कायमचा इमला जेथें करणें असेल त्या ठिकाणीं लोखंडीं सोय आगगाडीच्या रुळाचे बनवून ठोकतात. किंवा रीइनफोर्स्ड कांक्रीट म्हणजे लोखंही सळ्या लोखंडी तारेनें बांधून त्यांच्या आंतल्या बाजूला व बाहेरच्या बाजूला बारीक खडीचें व रेतीचें सिमेंट कांक्रीट ठासून ते कांक्रीटचे सोट बनवितात तसे सोट. कठिण जमीन लागेतोपर्यंत ठोकून त्यावर पाण्याचें बांधकाम करतात. सोट पुरे ठोकले गेले आहेत कीं नाही हें ठरवितांना हे सोट ठोकण्यासाठीं काहीं विवक्षित उंचीवरून जे वजन टाकतात त्या वजनाचे लागोपाठ १० दणके बसल्यावर सुद्धां तो सोट अर्धा ते एक इंचापेक्षां जास्ती खोल ठोकला जाऊं नये. त्या सोटावर किती वजन यावयाचें आहे त्या मानानें त्यावर वरून टाकावयाचें वजन आणि तें किती फुटांवरून टाकावयाचें हें ठरवितात. हें टाकावयाचें वजन २ टनाचें वजन २ फुटांवरून टाकलें आणि अशा १० तडाख्यांनी सोट आर्ध्या इंचापेक्षां जास्त आंत उतरला नाहीं किंवा जास्त जमीनींत घुसणार नाहीं असा ठोकला तर त्या खुंटावर ३० टनांच्या आंत कायमचें वजन झालें तरी चालेल. हेंच कायमचें वजन ४० टनांपर्यंत यावयाचें असल्यास १॥ टनाचें वजन २ फूट ८ इंचावरून किंवा २ टनांचे वजन १ फूट ८  इंचावरून लागोपाठ १० वेळां टाकलें असतां पाईलाचा सोट अर्ध्या इंचापेक्षां जास्ती उतरतां कामां नये.

पा यां ची रुं दी आ णि ज मी नी चें स्व रू प.- पायावर येणारें वजन म्हणजे बांधलेल्या इमारतीचें वजन इमारतीच्या खेरीज जेव्हां जेव्हां लोकांची फार गर्दी जमेल अशा वेळेला जो जास्ती भार बहालावर येतो तो व वरील मजल्यावर येणार सर्व प्रकारच्या भार आणि छपरावर किंवा गच्चीवर वार्याचा, भार किंवा पावसाचें पाणी मुरल्यामुळें येणारा भार हा सर्व वेगवेगळ्या भिंतींच्या द्वारें पायावरच येतो. व तो दर चौरस फुटास किती टन येईल असें काढण्याचा प्रघात आहे. अशा भार वेगवेगळ्या प्रकारच्या पायावर किती घालावा ह्याचे स्थूलत:प्रमाण पुढीलप्रमाणें:- मऊ ओलसर अशा मातीवर पाच टनापासून एकतृतीयांश टन; रेताळ माती कोरडी असल्यास पाऊण ते १॥ टन व अतिशय घन चिकण मातीवर २ ते ५ टन; नदीच्या पात्रांत खोल असणार्या घट्ट किंवा घन रेतीवर २ ते ३ टन; अशीच रेती २० फुटांपेक्षां अधिक खोलीवर असेल तर ६ ते ७ टन; घट्ट तांबड्या मातीवर ३ टन; मुरुमावर ४ टन; बर्याच खोलीवर असलेले घट्ट गोटे असणार्या जमिनीवर ७ ते ९ टन; जंबुरीच्या खडकावर २ टन; कारीच्या किंवा ग्रँनॉईट दगडावर २५ टन किंवा त्याच्याहि वर ज्या प्रकारची पायाची जमीन असेल त्या जमिनींत वरील हिशोबा प्रमाणें रुंदीचे पाये घातले पाहिजेत.

पा यां ती ल कां क्री ट आ णि इ मा र ती चा भा र.- याचा हिशोब पुढें दिल्याप्रमाणें:-सिमेंटचे कांक्रीट (एक भाग सिमेंट, एक भाग रेती व तीन भाग फोडलेली खडी) ह्याच्यावर दर चौरस फुटास ३५ टन; सिमेंट कांक्रीट (एक भाग सिमेंट २ रेती ४ खडी) वर ३२ टन; सिमेंट कांक्रीट (एक भाग सिमेंट तीन भाग रेती सहा भाग खडी) वर २५ टन; सिमेंट कांक्रीट (एक भाग सिमेंट चार भाग रेती आठ भाग खडी) वर १९ टन; चुर्णप्रस्तर (लाईम स्टोन) आणि सैकतप्रस्तर (सँड स्टोन) २ ते ९ टन; कारीच्या दगडाचे संगीन काम २० टन; पोरबंदरी दगडाचे संगीन कामावर ग्रानाईटच्या खांडकीचें सिमेंटमध्यें बांधलेल्या कामावर १२ टन; ग्रॉनीटचें संगीन कामावर काम १५ टन; सिमेंटचे कांक्रीट कारीच्या दगडाचें १० टन, चांगल्या विटा व सिमेंटचें बांधकाम ८ टन, साधारण चांगल्या देशी विटा व सिमेंटचे बांधकाम ४ ते ६ टन; खांडकीचे थराचे बांधकाम चुन्यांत ३।। ते ७ टन, चुन्या विटांचे बांधकाम २ ते ५ टन; डबर चुन्याचें बांधकाम ३ टन विटांचे रोडे व चुना ह्यांचें कांक्रीट २ टन; पक्क्या विटा व मातीचें बांधकाम १। टन.

पा या सा ठी जा गे ची त पा स णी आ णि ती सा ठीं भों क पा ड, (बोअरिंग).-ही १० ते १२ फूटपर्यंत वर किंवा खड्डे करून करतां येते. परंतु ह्याच्या पेक्षां खोल चर खणले असतां जास्ती खर्च लागण्याचा संभव असतो. व खेरीज या चरांच्या बाजू ढांसळून पडूं नये म्हणून त्यांच्या बाजूनां फळ्या उभ्या करून ठेपे द्यावे लागतात याकरितां १० फुटांपेक्षां जास्त खोकी असल्यास बोअरिंग घेतात. म्हणजे वाटोळें भोंक वाटेल तितक्या खोलीपर्यंत पडतात. अशीं भोकें दोनशें फूट खोलीपर्यंतहि पांडतां येतात. परंतु पायाच्या कामासाठीं फार झालें तर ३० फुटांपर्यंत खोलीची भोकेंच पाडावीं लागतात. अशी भोकें पाडण्यासाठीं पाऊण इंच ते १ इंच समचौरस अशा दहा दहा फूट लांबीच्या गजाना आटे पाडून ते एकमेकांस जोडतां येतील अशी व्यवस्था केलेली असतें. आणि अशा गजांनां खालच्या बाजूनां २ इंच रुंदीच्या चपट्या पहारी किंवा माती वर काढावयासाठीं गिरमिट बसवितात. आणि असें हत्यारें लावलेले गज दोराच्या योगानें थोडे वर उचलून खाली पडूं देतात. आणि प्रत्येक वेळेला थोडथोडे उजव्या बाजू पिवळटतात. असें केल्यानें भोकांतील माती उकरली जाते व सैल होते. नंतर खोदावयाचें हत्यार काढून घेऊन माती किंवा रेती काढावयाचें हत्यार भोकांत उतरवितात. व अशी क्रिया जितक्या खोलीपर्यंत भोंक न्यावयाचें असेल तितक्या खोलीपर्यंत जाईपावेतों चालू ठेवतात. हें काम करण्यास बराच वेळ लागतो. कारण प्रत्येक वेळेस हत्यार बाहेर काढण्याच्या वेळीं सगळा गज बाहेर ओढून काढून व स्क्रूचे सांधे फिरवून मोकळे करावे लागतात. व दुसरें हत्यार किंवा गिरमिट भोंकांत उतरवितांनां याच्या उलट क्रिया, (म्हणजे स्क्रू बसविणें व एकेक गज जास्ती जोडणें ही करावी) लागते. ही हत्यारें बाहेर काढण्यासाठीं किंवा आंत उतरविण्यासाठीं भोंकाच्या वरच्या बाजूच्या जमिनीवर मजबूत लाकडाची ३ पायाची घोडी उभी करून व लोखंडी सांखळीच्या साहाय्यानें १२ इंच व्यासाची पुली किंवा कप्पी घोडीच्या माथ्याच्या मधोमध खालीं लोंंबत सोडून त्या कप्पीवरून दोर सोडून त्या दोरांचें एक टोंक गजाच्या वरच्या टोंकाला बसविलेल्या कडींत आंकड्याच्या योगानें अडकवितात. आणि त्याच्या दुसर्या टोंकाला ४ किंवा ६ माणसें लागून तो दोर खेंचतात. म्हणजे हत्यार लावलेला गज उचलला जातो व या माणसांनी सैल सोडल्याबरोबर आपल्या वजनानेंच आंतील हत्यारासह सगळा गजच खाली आपटतों. व अशा रीतीनें सुरुंगाच्या पहारीप्रमाणेंच ह्या हत्याराच्या योगानें भोंक खोल खोल पडत जातें. ह्या बोअरिंगच्या हत्यारांच्या संचा(सेट) त वेगवेगळ्या प्रकारचीं लागणारी फळें, माती किंवा रेती उकरण्यासाठीं व भरून वर आणण्यासाठीं येतात. तसेंच हत्यारासह गज पिळवटण्यासाठीं, तसेंच ते उचलल्यावर वाटेल तितक्या उंचीवर अडकविण्यासाठी माथ्यापाशीं मोरकडीं, तसेंच गज तुटल्यास किंवा स्क्रूचे आटे फिरून निघून आल्यास खाली राहिलेल्या गजाला कमानीच्या जोरानं पकडून उचलून वर काढण्यासाठीं पकडीचा आंकडा व सुमारें २० फूट लांबीचा दोर, तसेंच पुली किंवा कप्पी वगैरे हत्यारें असतात. बोअरिंगची खोली ३० फुटांपर्यंत असल्यास गज पाऊण इंच समचौरस आणि ५ फूट लांबीचें आणि आंतील हत्यारें २ इंच रुंदीची असतात.

वि ष यां त र पा ण्या सा ठी भों क पा ड.- पाणी लागण्यासाठी जेव्हा जास्ती खोल बोअरिंग (भोंक) पाडावयाचें असतें तेव्हां ५० फूट खोलीपर्यंत १ इंची गज दहा दहा फूट लांबीचे आणि आंतील हत्यारें २॥ इंच रुंदीचीं व ३० फूट लांबीचा दोर, त्याचप्रमाणें हें भोंक १०० फूट खोलपर्यंत न्यावयाचें असेल तर वरीलप्रमाणेंच दहा फूट लांबीचे व  १ इंच समचौरस १० गज व दोर ३० फूट लांबीचा आणि आंतील हत्यारें ३ ते ४। इंच रुंदीची वापरतात. आणि त्याच्यापेक्षांहि खोल म्हणजे २०० फुटांपर्यंत भोंक सांपडणें झाल्यास १० फूट लांबीचें व १। इंच रुंद समचौरस असे गज २० व आंतील हत्यार ३। इंच ते ४। इंच व ५। इंच रुंदीची असतात.

जींत भोंक पाडावयाचें असतें ती जमीन कठिण असल्यास भोंकाला आंतून लोखंडी नळ घालावा लागत नाहीं. परंतु जर बाजू ढासळून पडत असेल तर किंवा मध्यें रेतीचा थर लागला तर लोखंडी पत्र्याचें १२ ते १६ फूट लांबीचे व ३ इंच किंवा त्याच्यापेक्षां जितक्या मोठ्या म्हणजे ६/८ इंच व्यासाचे नळ बोअरिंगमध्यें ठोकून बसवावे लागतात. ह्या नळानांहि दोन्हीं तोडांनां आटे पाडलेले असतात. व हे आटे वरील सांध्याच्या साकेटमध्यें पाण्याच्या एरव्हीच्या नळाप्रमाणें बसवितां येतात. या बोअरिंगच्या भोंकांत माती पडूं नये म्हणून भोकांच्या तोंडाला खाड्याच्या तळाशीं १२ इंच समचौरस लांकडी चौकट बसवितात. आणि त्या चौकटीला दोन झडपा केलेल्या असतात व त्या झडपांच्या मधोमध २ इंच व्यासाचें भोंक पाडलेलें असतें व त्यांतूनच गज वर आलेला असतो व तो फिरतो. जेव्हां गजांचें व हत्यारांचें वजन माणसांनां खेचतां येईल याच्यापेक्षां ज्यास्ती असेल तेव्हां दोर रहाटाला गुंडाळून त्या रहाटाच्या योगानें तो वर खाली करतां येतो. अर्थात हा रहाट वजनानें उलथूं नये म्हणून रेतीचीं पोती बांधून किंवा अन्य तर्हेनें ती खुंटवून टाकलेला असतो.

जेव्हां खालील हत्यारें व वरील गज ह्यांचें वजन फार होतें तेव्हां नुसत्या टाकून देण्यानेंहि हत्यारें मोंडण्याचें व गज वाकून जाण्याचें भय असतें. म्हणून फार उंचावरून हत्यार लावलेले गज खाली  टाकतां किंवा सोडतां उपयोगीं नाही. अलीकडे गजांच्या ऐवजीं पोलादी तारांची दोरखंडें वापरतात. व ह्या दोरांच्या शेवटीं एक गज असतो. व त्या गजालाच वाटेल तीं हत्यारें स्क्रूंनी बसवितां येतात. अशा दोरखंडाच्या योगानें बोअरिंग करणें झाल्यास हत्यारें उभीं उचलून व टाकून देऊनच त्यांच्या आघातानें काम करावे लागतें गजाप्रमाणें हे पिळवटतां येत नाहींत.

त्यापेक्षाहि खोल आर्टीशियनवेलसाठीं खोल बोअरिंग घेणें झाल्यास वाफेच्या एंजिनानें चालणार्या कॉलिक्सड्रिल नांवाच्या भोंक पाडण्याच्या यंत्रानें ६ इंच, ८ इंच व १२ इंच रुंदीची भोकें गुजराथेंत ४०० फुटांपर्यंत व याहिपेक्षां जास्ती खोल पाडलेली आहेत. ह्या यंत्रांत आत हत्यार वाटोळें गरगर फिरत असतें. व त्याच्या योगानें भोंकांतील सर्व प्रकारच्या द्रव्यांचा चुरा व माती होऊन आंत तळाशीं तोंडांतून वाहून जाणार्या पाण्याबरोबर रेंदा होऊन सर्व माती किंवा चिखल वाहून जातो.

पा या वि ष यीं पु न्हां.- पायाकरतां खाडा पायाच्या रुंदीबरोबर खणावा. खाड्याच्या बाजू ओळंब्यात रहाण्याजोग्या असतील तर तशाच राहून द्याव्या पण माती भुसभुशीत असून कडा ढासळण्याचा संभव असल्यास बाजूस कांही उतार द्यावा. किंवा फळ्या ठोकून माती ढासळणार नाहीं अशी तजबीज करावी. पाया करतां खाडे कठिण जमीन लागेतोंपर्यंत खणावे. पायाच्या तळाची पातळी पाणसळींत राहील असा पाया खणावा त्यांत भोंकें लागली तर तेथें तो चौकोनीं खणून त्यांत कांक्रीट भरावें. भोकें फार खोल गेली असतील तर त्यावर कमानीं बांधाव्या. पाया भरण्यापूर्वी तळची जमीन पाणी घालून ठोकावी. पायांतून खोदून काढलेली माती वगैरे पायाच्या खाड्याच्या कडेपासून ४ फुटांच्या आंत टाकूं नये. पायाचे खाडे कांक्रीटचे ६ ते ९ इंचांचे थर घालून भरावे व प्रत्येक घरावर पाणी घालून चांगला धुमस करावा.

पा यां ती ल कां क्री ट:- म्हणजे, १॥ इंच व्यासाच्या बांगडीतून जाईल इतकी बारीक फोडलेली खडी ३ किंवा ४ भाग व विरलेला कळीचा चुना एक भाग व स्वच्छ दाणेदार वाळू २ भाग यांचें मिश्रण होय. खडी मिळत नसल्यास ४/५ भाग लहान गोटे घातले तरी चालतात. पहिल्यानें १ भाग चुना व २ भाग रेती एकत्र करून घाणींत घालून नेहमींप्रमाणें मळतात व असा मळलेला चुना त्यांत मिळवावयाच्या खडीचा किंवा गोट्यांचा थर करून त्यावर पसरता व नंतर थोडथोडें पाणी टाकून व खोर्यानें खापून त्याचें नीट मिश्रण करतात. तें अशा रीतीनें कीं, प्रत्येक गोटा किंवा खडीचा दगड सर्व बाजूंनीं चुन्यानें माखला जावा. अशा रीतीनें तयार केलेल्या कांक्रीटचे ६ ते ९ इंच जाडीचे थर घालून त्यावर जड लांकडी अथवा लोखंडाच्या धुमसानें ठोकतात. धुमस केल्यानंतर पातळ चुना वर आला नाहीं तर बाहेरच्या चुन्याचा रद्दा करून ठोकलेल्या थरावर घालतात व त्यावर दुसरा कांक्रीटचा थर पसरतात. ९ इंचापेक्षां ६ इंच जाडीचा थर पसरून व तो दबून ४ इंच जाडीचा होईल इतका ठोकणें बरें. कांक्रीट मजबूत होईपर्यंत त्यावर रोज पाणी घालून तें ओलें ठेवावे लागतें.

जेथें खडी किंवा गोटे मिळत नाहींत. अशा ठिकाणी कंकर म्हणजे चुनखडी २ भाग, विटांचें तुकडे २ भाग, विरलेल्या चून्याची फकी १ भाग व बारीक वाळू १ भाग यांचें मिश्रण करून वरच्या प्रमाणेंच सर्व क्रिया करतात.

जेथें पाण्यांत किंवा अतिशय ओल्या जागेंत पाया घालावयाचा असतो त्याठिकाणीं किंवा काम झाल्याबरोबर थोड्याच तासांनीं केलेलें काम पाण्यांत बुडून जाण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं चुन्याच्या ऐवजीं सिमेंटचें कांक्रीट घालतात. यांत १ इंचापासून १॥ इंचापर्यंत व्यासाच्या बांगडींतून प्रत्येक खडा जाईल इतकी बारीक फोडलेली व धुतलेली खडी ४ भाग आणि पाण्यानें स्वच्छ धुतलेली वाळू २ भाग आणि सिमेंट १ भाग यांचें मिश्रण ही सर्व कोरडी असतांनाच करतात व ती चांगली मिसळल्यावर त्या मिश्रणावर झारीनें बेताचें पाणी (म्हणजे सिमेंटच्या निम्म्या प्रमाणांत) घालतात. व खापून खडीचा प्रत्येक खडा व वाळू या सर्वांनां सिमेंटचें सर्व बाजूनीं लिंपण होईल व कोणताहि खडा कोरडा (अथवा सिमेंट सर्व बाजूनें न लागलेला असा) न राहील अशा बेतानें तें सर्व कालवून जेथें वापरावयाचें असेल तेथें कांक्रीट भिजविल्यापासून ३ तासांच्या आंत वापरलें पाहिजे. कोरडें मिश्रण केल्यापासून ३ तासांच्या आंत त्याचा उपयोग करावयाचा नसेल तर मिसळण्यापूर्वी वाळू व खडी ही चांगली खडखडीत वाळलेलीं असलीं पाहिजेत. व ती कोणत्याहि कारणानें न भिजतील अशी खबरदारी घेतली पाहिजे.

कांक्रीट पाण्यांत घालावयाचें असेल तर त्यांत हॉयड्रॉलिक चुना असलाच पाहिजे. किंवा साधारण कळीच्या चुन्यांत विटांची पूड (सुरकी) टाकून हॉयड्रॉलिक चुना बनवावा. कळीच्या चुन्याचें प्रमाण जाडी वाळू खडी, किंवा विटांचे तुकडे याच्या एकशष्ठांशांहून कमी नसावें. पोर्टलंड सिमेंटचा उपयोग करणें झाल्यास त्याचें प्रमाण खडी अथवा बारीक गोट्याच्या एकदशांशाहून कमी असूं नये. चुना किंवा सिमेंट व वाळू अथवा सुरकी यांत पाणी घालून घाणींत चांगलें घट्ट मिश्रण करावें. खडी पाण्यानें चांगली भिजवावीं, मळलेला चुना व खडी यांचें मिश्रण करण्याकरतां इमारत बांधण्याच्या ठिकाणावर विटांनीं बांधून काढलेल्या चक्क्यावर एका बाजूस मळलेला चुना व दुसर्या बाजूस ओली केलेली खडी ठेवावीं. मग मळलेल्या चुन्याचें १ घमेलें व खडीचीं ३ घमेली या प्रमाणानें एकें ठिकाणी मिसळून हें मिश्रण फावड्यानें चांगलें कालवावें. तयार झालेलें कांक्रीट कामावर लागलीच उपयोगांत आणावें. कांक्रीट पायांत टाकतांना उंचीवरून टाकूं नये; आलाद ओतावें. कांक्रीटाचा प्रत्येक थर सुमारें ६ ते ९ इंच करून त्यावर चांगला धुमस करावा. एका दिवसांत कामासाठीं जेवढें कांक्रीट पाहिजे असेल तेवढेंच त्या दिवशीं तयार करावें, अधिक करूं नयें. पोर्टलंड सिमेंटचा उपयोग करावयाचा असल्यास कांक्रीट पसरण्याच्या वेळेसच तें खडीशीं मिसळावें. कारण तें ओलें केल्यावर लवकर वाळूं लागतें. कांक्रीटचें थर ९ इंचांहून जास्त जाडीचे नसावे. प्रत्येक थर ठोकला म्हणजे त्यावर दुसरा थर घालण्यापूर्वी पाणी घालावें. व त्याचा पृष्ठभाग खरवडून चरचरीत करावा. म्हणजे वरील व खालील थराचा एकजीव होईल.

बां ध का म.

बां ध का मा चे प्र का र.- बांधकाम म्हणजे दगडाच्या किंवा विटांच्या भिंतीं चुन्यांत बांधणें किंवा लांकडी फर्मे तयार करून त्यांत खडी, वाळू व चुना किंवा सिमेंट यांचें मिश्रण करून व भिजवून तें मिश्रर त्या फर्म्यंत ओतून व ओतल्याबरोबर ठोकून कांक्रीटची भिंत बनविणें होय. हे सर्व पक्क्या बांधकामाच्या प्रकाराखेरीज दगड किंवा भाजलेल्या विटा चिखलांत बसवून बांधकाम करणें आणि कच्च्या विटांच्या भिंती बांधणें किंवा भेंड्याच्या भिंती बांधणें हे सर्व कच्च्या बांधकामाचें प्रकार होत. पक्क्या बांधकामांतहि माठीव दगडांच्या कळाशी व बंद भिंती बांधणें व डबराच्या जाड तांब्यांच्या भिंती बांधणें वगैरे प्रकार आहेत. पक्क्या विटांच्याहि चुन्यांत बांधलेल्या भिंती म्हणजे पक्क्या भिंती व पक्क्या विटांच्या चिखलांत बांधलेल्या भिंती म्हणजे कच्च्या. पक्क्या व कच्च्या विटांच्या, चिखलांत बांधलेल्या भिंती त्या कच्च्या विटांच्या भिंती होत.

द ग डां च्या भिं ती:- उत्तम जातीचा पक्का दगड सर्व बाजूनें चांगला घडून त्याचें कळाशीबंद बांधकाम केलें म्हणजे तें अतिशय मजबूत व निरंतर टिकणारें होतें. परंतु दगड घडून कळाशीबंद सांधे करावयाचें हें मोठ्या खर्चाचें काम आहे. सबब तें मोठ्या महत्त्वाच्या कामाखेरीज वापरीत नाहींत. असें उत्कृष्ट माठीव संगीन काम देवालयें, राजवाडे यांतच करतात. पूल वगैरेंमध्यें ज्या ठिकाणीं फार भर यावयाची असेल अशा कामांत तळाचे व माथ्याचे सांधे मात्र कळाशीबंद करावे लागतात. दगडांचा दर्शनी भाग चरचरीत असला तरी चालतो.

सा धें द ग डी बां ध का म.- दगड कठिण, टिकाऊ आणि चिवट असावा. भिंतींत बसवितांना त्याची सर्वांत मोठी बाजू ती खालच्या बाजूला करावी. जेव्हां प्रस्तर दगड वापरावयाचें असतील तेव्हां प्रस्तराचें थर केव्हांहि उभे येतां कामा नयेंत. दगडचुन्याचें बांधकाम चाललें असतांना भिंतीतील चुना बळकट ठेवावें. काम ज्या दिवशी बंद असेल त्या दिवशीं सुद्धां पाणी घालण्यासाठीं मजूर ठेवावे. जेव्हां चुना चांगला नसेल तेव्हां कळीचुन्यांत विटांच्या किंवा कौलांच्या तुकड्याचें पीठ करून घाणींत घालून मळतात. अशानें त्याला मजबुती येते. व जमीन ओली असली तरी त्यांत तो कठिण होतो. अशा हायड्रॉलिक चुन्याच्या दगडाच्या बांधकामावर दररोज संध्याकाळीं आळीं करून त्यांत एक इंच उंचीचें पाणी राहील असें करावें. म्हणजे रात्रभर हें पाणी चुन्यांत मुरून तो कठिण होतो. पहाड करणें ते विटांच्या बांधकामाप्रमाणेंच करावे. दगड कंगणीदार वगैरे घडावयाचे असल्यास जसा घाट करावयाचा असेल त्या घाटाला बरोबर लागू होतील अशा जस्ताच्या पत्र्याचे कापलेले नमुने (फर्मे) पाथरवटास द्यावें. जरूर पडल्यास वरवंड्या जोडपट्टीनें जोडाव्या. जोडपट्टया कठिण व चिवट दगडाच्या किंवा तांब्याच्या असून त्या चुन्यांत बसवाव्या.

सं गी न बां ध का म.- अशा कामाला दगड जितक्या मोठ्या आकाराचे मिळतील तितके जास्त चांगले. हे दगड वापरतांना येवढें लक्षांत ठेवावें कीं जर त्यांत थर किंवा पापुद्रे असतील तर ते कधींहि उभे येतां कामा नये, ते नेहमीं आडवेच म्हणचे जो भार येणार त्याच्या काटकोनांत ठेवले पाहिजेत. खेरीज दगडाची जितकी जाडी असेल त्याच्याइतकी तरी निदान त्याची रुंदी असली पाहिजे. ही रुंदी जाडीच्या दुप्पटीपर्यंत असलेली चालते आणि दगडाची लांबी, जाडीच्या दुपटीपेक्षां कमी आणि तिप्पटीपेक्षां जास्ती नसावी. रुंदी किंवा लांबी, वर सांगितलेल्या जाडी प्रमाणापेक्षां जास्ती असेल तर तो दगड कमजास्ती भार झाल्याकारणानें फुटण्याचा संशय असतो. अशा कामाला एक फुटापासून दोन फूट जाडीपर्यंतचे दगड वापरतात. व वर सांगितलेल्या प्रमाणाचे ते असले तर प्रत्येक दगडाचे वजन १ हजार पौंडांपासून ८ हजार पौंडांपर्यंत म्हणजे सुमारें ३॥ टनांपर्यंत असतें. असे जड दगड असले म्हणजे ते जाग्यावर बसविलें हे यंत्राच्या साहाय्यानेंच करावें लागतें.

अशा संगीन बांधकामाचे सर्व थर सारख्याच जाडीचे असावे. पण यदाकदाचित वेगवेगळ्या जाडीचे दगड खाणींत मिळाल्याकारणानें तसे वापरणेंच जरूर असेल तर जास्ती जाडीचे थर खालीं व कमी जाडीचे थर वरच्या बाजूला घालतात. अशा उत्कृष्ट संगीन माठीव कामाचा प्रत्येक दगड तळमाथ्यांत व दर्शनी उत्कृष्ट माठीव असावा आणि कोपर्याचा दगड गुण्यांत असून बाजूस तिपट नसावा असे दगड सनल्यांत बसवितात व त्यांचे सांधे एक अष्टमांश इंचापेक्षां जाडी नसावे. व दर्शनी बाजूच्या दगडाचे नात्रे किंवा कुरें उडलेले नसावेत. प्रत्येक दगड कामांत ठेवल्यावर त्याचे तळ व सांधे पोगरानें बरोबर ठोकून अगदीं ठेपून बसवितात. दर्शनी बाजूस दगड प्रत्येक थरांत एका आड एक उभा व आडवा बसवितात. म्हणजे सांधमोड होऊन काम मजबूत होतें. अशा प्रकारचें चोख काम जेथें अतिशय जड यंत्रें बसवावयाचीं असतात त्याच्या बैठकीसाठीं वापरतात. ह्याचा भाव सध्यां (१९२५) शंभर घनफुटांस २७७ रु. आहे.

स ड का व का म.- हें वरच्यापेक्षां कमी प्रतीचें संगीन काम होय. यांत दर्शनी दगडांच्या कडांच्या पट्टया एक इंच माठीव असून कडामधील भाग, तळ, माथा, व वाळू सडकीव असाव्या. सांधे पाव इंचापेक्षां जस्ती नसावे. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस २३८ रु. आहे.

बू च का म.- सडकीव कामापेक्षां उतरत्या दर्ज्याचें काम म्हणजे दगडाच्या माठीव नातर्यांच्या पट्टयांमधील दर्शनी बाजूस बूच म्हणजे खाणीतून जसा दगड आला असेल तसाच ठेवणें होय. बूच माठीव पट्टयांच्या बाहेर ३ इंचापेक्षां अधिक ठेवू नये. ह्याचा भाव सध्यां (१९२५) शंभर घनफुटांस २३२ रू. आहे.

अशाच कामाच्या दुसर्या प्रकारांत दर्शनी दगडांच्या नातर्यांत सभोंवार ४५ अंशाच्या कोनाची एक इंच खोल चव मारतात. हें वरील तीन प्रकारचें बांधकाम पुलांचे मच्छी पुलाच्या कैच्च्या किंवा गर्डन यांच्या खालीं करतात. कांहीं कांहीं ठिकाणीं पुलांचें मधले स्तंभ व धरित्री भित्ती यांच्या मत्स्यांच्या दर्शनी बाजूस संगीन काम करतात. व आंतल्या पुरणींत खांडकीचें बांधकाम किंवा विटांचें बांधकाम किंवा कांक्रीट घालतात. अशावेळी कामाची दर्शनी बाजू मात्र सडकीय किंवा बुचाची असावी. व दगडांची मागील बाजू मात्र अगदीं न घडतां खाणींतून ज्या स्वरूपांत येईल त्या स्वरूपांतच ठेवतात. अशा दर्शनी संगीन कामाचे तळमाथे व उभे सांधे सडकीय असून सांधणींत व गुण्यांत असावे. व कळाशी गुण्यांत थराच्या जाडीइतकी असावी म्हणजे थराची जाडी १२ इंच असल्यास तळमाथा व सांध्याची कळाशी गुण्यांत १२ इंच असावी. ह्याचा भाव सध्यां (१९२५) शंभर घनफुटांस २४२ रु. आहे.

ठोकळ्यांचें थराचें काम.- हें संगीन सडकीव कामाप्रमाणें असतें. परंतु दगड मात्र लहान आकाराचे असतात. यांत थरांची जाडी ७ इंचांपेक्षां कमी नसावी. सर्व थर सारख्या उंचीचे असावे, किंवा निदान कोणत्याहि वरील थराची जाडी खालच्या थराच्या जाडीपेक्षां अधिक असूं नये. दगडांची रुंदी उंचीपेक्षां कमी नसावी व लांबी किंवा दुमाला उंचीच्या दुपटीपेक्षां कमी नसावा. दगडाची दर्शनी बाजू सुतकीनें साधारण टापांची बूच दोन इंचांपेक्षां बाहेर येऊ देऊ नये. कोपर्याच्या दगडाच्या दर्शनी बाजूस अर्धा इंच माठीव नातर्याची पट्टी असावी. सर्व दगडांचे तळ व माथे गुण्यांत व उभे सांधे ओळब्यांत असावे व कळाशी सडकीव असून थराच्या उंचीइतकी आंत गुण्यांत असावी. म्हणजे थराची जाडी ७ इंच असल्यास भर कळाशी ७ इंच असावी. सांधे पाव इंचापेक्षां जाडी नसावेत. ह्याचा भाव सध्यां (१९२५) शंभर घनफुटास १८९ रु. आहे.

खाडकीचें थराचे काम-हें काम पहिल्या प्रतीचें असल्यास थरांची उंची ७ इंचांपेक्षां कमी नसावी. व एका थरांतील सर्व खांडक्या सारख्या जाडीच्या असाव्या पण सर्व सारख्या उंचीच्या करण्यास सवड नसेल तर वरील थरांची जाडी खालच्या कोणाच्याहि थरापेक्षां जास्ती नसावी. दर्शनी दगडांचे तळ, माथे व बाजू सुतकीनें टापलेलें असून गुण्यांत  असावे. तळ आणि माथ्यात दर्शनी बाजूपासून ३ इंचपर्यंत कळाशी गुण्यांत असली पाहिजे पण ती बाजूच्या सांध्यांत निदान दीड इंच कळाशी गुण्यांत असावी. खांडक्यांची दर्शनी बाजू सुतकीनें टापलेली असावी. व बुचें १॥ इंचापेक्षां जास्ती बाहेर येऊं नयेत. दर्शनी बाजूस कपचांचा उपयोग करूं नये, सर्व तळ व माथे सांधणींत व उभे सांधे ओळंब्यांत असावेत. सांध्यांची जाडी तीनअष्टमांश इंचापेक्षां जास्ती असूं नये. दर्शनी दगडांची रुंदी व दुमाला त्यांचे उंचीपेक्षां कमी नसावा. थरांतील सर्व दगडांपैकीं निदान एकतृतीयांश दगड दुमाल्यांत उंचीच्या दुप्पट असावे व भिंतीची जाडी अधिक असल्यास उंचीच्या तिप्पट असावेत. प्रत्येक थरांत ५ किंवा ६ फूट अंतरावर दुतोंडे दगड (थ्रूस्टोन) असावेत. भिंतीची जाडी २ फुटांपेक्षां अधिक असल्यास एकतोंडी बंद हेडर थराच्या दोन्हीं बाजूनें घालून पुरणींत ६ इंचसांधमोड होईल असें एकमेकांस ठेपून बसवावें. उभें ओळंब्यांतील सांधे एकमेकांपासून थराच्या उंचीच्या निदान निम्म्या अंतरावर असावे. पुरणींचे काम करतांना दगडांचा तळ व माथा सपाट ठेवून ते बांधकामांत बसवितांना चांगलें चुन्यांत ठोकून बसवावेत. व त्यांमधील चुन्याचे सांधे फार जाड होऊ नये. म्हणून चुन्यांत कपच्या बसवाव्यात व प्रत्येक थराचा माथा सांधणींत आणावा. मोठव्यात व प्रत्येक थराचा माथा साधणींत आणावा. मोठमोठ्या इमारती, साधारण पुलांच्या धरित्री भित्ती, किंवा मच्छराच्या कामास, असल्याप्रकारचें बांधकाम करतात भिंतीच्या बाजूच्या आंतील कामाला गिलावा करावयाचा नसेल तर ते बाहेरील कामाप्रमाणेंचे असावें. पण आंतील बाजूस गिलावा करावयाचा असेल तर उभे सांधे ओळंब्यांत नसले तरी चालेल. याचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफूटांस ७० रु. आहे.

खांडकीचें काम दुसर्या प्रतीचें असल्यास त्यांत प्रत्येक थरांतील दगड सारख्या उंचीचे असले पाहिजेत असें नाहीं. एका थराच्या जाडींत दोन दगडांपेक्षां अधिक दगड असूं नयेत व सांध्यांची जाडी अर्धा इंच असावी. याचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस ५६ रू. आहे.

खांडकीचें थराचें तिसर्या प्रतीचें काम:- यांत प्रत्येक थरांत ५ फूट अंतरावर थराच्या पुर्या उंचीचे व सुतकीनें टाकलेले बंद असावेत. बंदाची रुंदी उंचीपेक्षां कमी नसावी. व दुमाला उंचीच्या तिप्पट असावा. बंदामधील भाग दोन इंचापेक्षां जाडीत कमी नसतील अशा लहान दगडांनीं बांधून घ्यावा. व एका थराच्या उंचीत अशा जाडीचे २ किंवा ३ दगड बसवावेत. हे लहान व थोड्या जाडीचे दगड अनघड असून त्यांचे तळमाथे सपाट असावे उभे सांधे ओळंब्यांत नसले तरी चालतात. पण दगडाच्या तळमाथ्याशी त्यांचा कोन ६० अंशांपेक्षां प्रत्येक दगडाची लांबी व रुंदी उंचीपेक्षां कमी नसून निरनिराळ्या दगडांची सांधमोड चांगली झाली पाहिजे व दगड सर्व बाजूंनीं चुन्यांत बसवावे. भिंतीची जाडी २ किंवा दोन फुटांहून कमी असेल तर दर सांगितलेले बंद दुतोंडी असावे. याहून अधिक जाडीच्या भिंतीतील बंद थराच्या दोन्ही बाजूकडून घालून त्यांची पुरणींत ६ इंच सांधतोड होईल अशा रीतीनें एकमेकांस लागून बसवावे. निरनिराळ्या थरांतील बंद एकमेकांवर येऊं देऊं नयेत. लहानसान इमारती किंवा भिंतीची उंची जेथें कमी असेल अशा ठिकाणीं व कुंपणांच्या भिंती लहान मोर्या वगैरे अशा प्रकारच्या बांधकामाच्या करतात. याचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस ४३ रू. आहे.

कळीचें बांधकाम (डबराचें):- दर्शनी दगड बसवितांना दर्शनी बाजूस कपचांचा बिलकूल उपयोग करूं नये. प्रत्येक दगड काळजीनें एकासएक लागून म्हणजे सांध्याची जाडी बारीक होईल अशा बेतानें बसवावा. दगडांच्या नात्रा चिरणीनें घडून सांध्याची कळाशी त्रिकार करून बसवावी सांध्याची जाडी पाव इंचापेक्षां जास्ती नसावी. दर्शनी बाजूसाठी सारख्या रंगाचें व एकाच आकाराचे दगड निवडावेत. व त्यांच्या दर्शनी बाजू साधारण सडकीव असाव्यात. सर्व दगड चुन्यांत बसवावें. ते पुरणींत लांब जावे व त्यांचा दुमाला व रुंदी उंचीपेक्षां कमी असूं नये. दर्शनी बाजूस दर ९ चौरस फुटांस एक बंद असावा व भिंतीची रुंदी २ फुटांपेक्षां अधिक नसेल तर तें बंद दुतोंडे असावे पण भिंतीची रुंदी दोन फुटांपेक्षां जास्ती असेल तर दोन्ही तोंडाकडून बंद ६ इंच सांधमोड होईल अशा रीतीनें घालावे. या कामाचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस ६९ रु. आहे.

डबर चुन्याचें बिनकळीचें बांधकाम:- या बांधकामांत खाणीतून जसा दगड येईल तसाच उपयोगांत आणतात. फक्त कोपरे व नात्रा कमजोर असतील तर त्या सुतकीनें किंवा हातोड्यानें साफ करतात. दगडांच्या मांडणींत साधमोड होण्याची सवड असेल तितकी करावी. दगड एकमेकांस अगदीं ठेपून चुन्यांत बसवावे व सांध्याची जाडी अर्ध्या इंचापेक्षां अधिक असूं नये. दर्शनी बाजूला मोठे दगड तळ व माथा साधारण सपाट असेल असे व सारख्या रंगाचे बसवावे. यांच्या मांडणींत सांधमोड व्हावी व त्यांचा दुमाला भिंतींत बराच जावा. त्यांची लांबी व रुंदी उंचीपेक्षां अधिक असावी. या दगडांपैकीं निम्मे दगड एक घनफुटाचे असावे. आणि पाव भाग १५ इंच दुमाल्याचे बंद असावे. दर्शनी बाजूच्या प्रत्येक चौरस यार्डास निदान एक बंद किंवा दुतोंडा असावे. भिंतीची जाडी २ फुटांपेक्षां कमी असल्यास बंद दुतोंडे असावे. पण जाडी २ फुटांपेक्षा अधिक असल्यास त्यांचा दुमाला भिंतीत निदान दोन फूट असावा व भिंतीच्या दोन्ही तोंडाकडील बंद पुरणींत ६ इंचाची सांधमोड करून बसवावे. पुरणींतील बरेच दगड मोठमोठे असावे. आणि त्यांपैकीं निदान तिसरा भाग तरी पाऊण घनफुटापेक्षां अधिक घनफळाचे असावे. कोंपर्यासाठीं दगड निवडक असून सुतकीनें टापलेले असावे त्यांचे कोन गुण्यांत आणण्याकरतां सुतकीनें अथवा चिरणीनें घडावे. व ते बसवितांना एक टाकून एका थरांत, बंद व अडवा असे असावे. कोणत्याहि कोपर्याच्या दगडाचें घनफळ एक घनफुटापेक्षां कमी नसावें. दर्शनी बाजूच्या सांध्यांत लहानमोठ्या दगडांसभोवतीं सुबक दिसतील अशा चुन्याच्या दर्जा भराव्या. सांध्यांतील चुना टांचणीनें एक इंच खोल खरडून काढून भिंत पाण्यानें चांगली भिजवावी व ताज्या मळलेल्या चुन्यानें प्रत्येक दगडाच्या दर्शनी सांध्यांत दर्जा भरून करणीनें घोटून काढाव्या भिंतीच्या आंतल्या बाजूस बांधकाम होत असतानांच सांध्यांतील चुना करणीनें साफ बसवून घोटून साफ करावा. याचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस ३८ रु. आहे.

द ग ड मा ती चें बां ध का म.- हें तिसर्याप्रतीच्या खांडकीच्या थराच्या थराच्या बांधकामाप्रमाणेंच करतात. परंतु चुन्याच्या ऐवजीं चिखलाचा उपयोग करतात. मातींत पाणी बेतान घालून तींतील गोळे चांगलें फोडून चिखल घट्ट होईपर्यंत ती पायानें तुडवितात व ती फार चिकण असल्यास तींत थोडी रेती व तोडलेलें गवत घालतात. ह्या बांधकामाचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस २८ रुपये पडतो.

सुक्या दगडाचें बांधकामहि वरप्रमाणेंच करतात. यांत चुन्याशिवाय सुके दगडच बसवितात. पण अशा कामाची मजबुती त्यांच्या सांध मोडीवरच अवूलंबून राहते. अशा प्रकारचें बांधकाम धक्क्याच्या भिंतीसाठींच वापरतात. त्यांतील थर ८ इंचापासून २० इंचापर्यंतच्या जाडीचे करतात. व भिंतीची उंची ३० फूट असली तर भिंतीच्या मध्याची जाडी ३ फूट ठेवतात व मागची बाजू ओळंब्यांत व पुढच्या बाजूला चारास एक याप्रमाणें स्लोप देतात. पाया मुरमाड जमीनींत असेल तर टेंकडीच्या बाहेरील उताराच्या पायथ्याखाली २ फुटांपासून ३ फूट खोल खणऊन तो जवळपास जे मोठे धोंडे मिळतीत त्यांनीं भरून काढावा. धोंड्याच्यां फटींतून लहान लहान चिपा घालून सर्व दगड ठोकून बसवावे. ह्या सुक्या दगडाच्या भिंती दगडांचे तळ व माथे भिंतीच्या दर्शनी स्लोपाच्या पातळीशीं काटकोनांत असावे. थरांतील उभे सांधे एकमेकावर येऊ नयेत. प्रत्येक थरांत खालच्या व वरच्या थरांची सांधमोड चांगली व्हावी. भिंतीच्या मागचें व पुढचें म्हणजे दर्शनी काम यांचा पुरणींतील कामाशीं चांगला मिलाफ झाला पाहिजे. प्रत्येक थरांत ५ किंवा ६ फूट अंतरावर निदान ३ फूट दुमल्याचें बंद घालावे. हे दर्शनी बाजूपासून भिंतीच्या जाडींत आरपार जावेत. व पुरणींत त्यांची ९ इंच सांधमोड होईल असे एकमेकांवर ठेपून बसवावे म्हणजे भिंतीच्या दर्शनी व मागच्या बाजूचा एकजीव होईल. मगच्या बाजूच्या बंदांची उंची पुढ्च्या बाजूच्या बंदाच्या उंचीबरोबर असावी व रुंदी निदान उंचीइतकी असून दुमाला ३ फुटांहून जितका जास्त मिळेल तितका असावा. दगड थोडक्या अंतरच्या आंत मिळतील तितके मोठें व टिकाऊ असावे. त्यांचे तळ व माथे सुतकीनें टापावे व ते बांधकामांत बसविल्यावर त्यांमध्यें जी पोकळ जागा राहील तींत लहान लहान दगड हातोड्यानें ठोकून बसवावे. सवड असेल तर भिंतीच्या मागचा भराव, बांधकामास निरुपयोगी अशा राहिलेल्या दगडांचा व कपर्यांचा असावा. मातीचा भराव करण्याचें जितकें टळेल तितकें बरें ह्या बांधकामाचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुटांस २२ रु. पडतो.

वि टां चें बां ध का म.- विटांच्या भिंतीतील रचना एक थर आडव्या विटांचा व त्याच्यावरील थर उभ्या विटांचा असे एका आड एक थर बांधून, किंवा प्रत्येक थरांत एक आडवी व एक उभी व नंतर आडवी व उभी अशा रीतीचे सर्व थर बांधूनही करतात. दोन भिंतीचा जोड असेल अशा ठिकाणी एका आड एक थरांत उभ्या विटा दोन्हीं भिंतींत जाव्या, म्हणजे भिंती चांगल्या जोडल्या जातील. पक्षभित्ती (वुइंग बॉल्स), पुस्तीच्या भिंती (बट्रेसस) या बांधतांनां मुख्य भिंतीशीं त्यांची वर सांगितल्याप्रमाणें सांधमोड व्हावी दर्शनी कामाचे सांधे सुबक दिसतील असे करावे व दर्जा भराव्या. दर्शनी बाजूस गिलावा करणें झाल्यास सांध्यांतील चुना खरडून काढावा म्हणजे भिंत गिलाव्यास आवळून धरील. पहाड दहेरी असावा. भिंतीच्या प्रत्येक बाजूस उभे वासे जोडीनें उभे करून त्यांवर आडवा वासा बांधतात आडव्या वाशाचें टोंक भिंतीवर टेंकण्यासाठीं भिंतीत एक विटेची जागा सोडतात. वाशाच्या टोंकाखाली बंदवीट (हेडर) असावी. पहाड सोडल्यानंतर वाशाच्या टोंकाच्या बाजूची पोकळ जागा भरून काढावी. पहाडाचीं लांकडें, गवंडी, मजूर, विटा, चुना वगैरेचें ओझें  सुरक्षितपणें सहन करण्याजोगी बळकट असावीं. इमारतींच्या भिंती बांधतांना त्या सारख्या उंचीच्या बांधीत आणाव्या. कोणतीहि भिंत बाकीच्या भिंतीपेक्षां तीन फुटांहून अधिक चढवूं नये. कमान बांधतांनां तीतील सर्व उभे सांधे तिच्या माथ्यापासून काढलेल्या वर्तुळाच्या स्पर्शरेषेशीं काटकोनांत असावेत किंवा ते कमानीच्या आंतल्या बाजूस वाढविले असल्यास ते कमानीच्या मध्यबिंदूंतून जावे. विटांची कमान बांधतांना विटा दाबून बसवाव्या. म्हणजे त्यांच्या सांध्यातील चुना दाबला जाऊन बाहेर येतो व सांधा कमी जाडीचा होतो.

विटाचुन्याचें बांधकाम.- पहिल्या प्रतीच्या कामासाठीं विटा ९ इंच लांब, ४॥ इंच रुंद व २॥ इंच जाड या आकाराच्या असून गुळगुळीत फळ्यावर तयार केलेल्या, पक्क्या भाजलेल्या व मजबूत असाव्यात व त्या ठोकल्या असतां धातूसारखा खणखणीत आवाज त्यांनी दिला पाहिजे. विटा या बांधकामाच्या मांडणीत चुन्यांत बसवाव्या प्रत्येक थरावर पातळ चुन्याचा रद्दा करून ओतावा व नंतर त्यावर दुसर्या थराची मांडणी करावी. दर्शनी बाजूस गिलावा करावयाचा नसेल तर त्या बाजूकरिता एकरंगी विटा निवडून काढाव्या. विटा २॥ इंच जाडीच्या असल्या तर तळ किंवा माथ्याच्या सांध्याची जाडी ३/८ इंचापेक्षां अधिक नसावी म्हणजे ४ थरांची उंची सांध्यासुद्धा ११॥ इंचांपेक्षां जास्ती होऊं नये. कामांत उपयोग करण्यापूर्वी विटा निदान १२ तास पाण्यांत ठेवाव्या, बांधकामांत सांधमोडीकरितांच फक्त विटांच्या रोड्यांचा उपयोग करावा, एरवी करूं नये. सुरकी मिसळून केलेल्या हायडॉलिक चुन्याचा किंवा सिमेंटचा उपयोग बांधकाम करण्यांत केला असेल तर रोज संध्याकाळी अपुर्या भिंतीवर चुन्याची आळीं करून त्यांत एक इंच पाणी राहील इतकें पाणी भरीत जावें. ह्या बांधकामास सध्यां (१९२५) १०० घनफूटांस ५९ रु. खर्च येतो.

वीटचुन्याचें काम दुसर्या प्रतीचें करणें झाल्यास जमीनीवर केलेल्या विटांचा उपयोग करतात, व सांध्यांची जाडी अर्धा इंच असली तरी चालते. दरवाजा व खिडक्यांवरील कमानीं दुसर्या प्रतीच्या वीटचुन्याच्या कामाप्रमाणेंच असाव्या. पण विटांचे सांधे   इंचापेक्षां अधिक जाड नसावें. ह्या बांधकामाचा भाव सध्यां (१९२५) १०० घनफुयांस ४८ रु. पडतो.

वाटोळे खांब चौकोनी विटा छिनून त्यांचें बांधावे. पण प्रत्येक चारपासून सहा फूट उंचीवर खांबाच्या व्यासाइतका व तीन इंच जाडीचा वर्तुळाकार दगड घालावा म्हणजे विटाचें काम चांगले आवळून जाईल. दरवाज्यावर व खिडक्यांवर चपट्या (प्ल्याट) किंवा मुक्या (रिलिव्हिंग) कमानी बांधतात. चपट्या कमानीचा वर्तुळाचा थर तीन इंचांपासून चार इंचपर्यंत असावा. कंगणी (स्ट्रिंग कोर्स) व गलथ्याचें काम गुण्यांत व ओलव्यांत असावें. व त्यांतील सांध्यांची जाडी कमी असावी. सुरकी घालून केलेला किंवा स्वभावत:च (हायड्रॉलिक) पाण्यांत घट्ट होणारा चुना किंवा सिमेंट व विटांचें बांधकाम चाललें असल्यास प्रत्येक दिवशीं संध्याकाळीं अपुरच्या भिंतीवर चुन्याचीं आळीं करून त्यांत एक इंच उंचीचें पाणी राहील अशी तजवीज करावी.

वीटमातीचें बांधकामहि वरच्याप्रमाणेंच करतात. पण चुन्याऐवजी चिखल वापरतात. चिखल तयार करण्याची कृति मागें दिलीच आहे.

विटांची पडदी:- सागवानी खांब व आडवटें यांचा सांगाडा करून त्यांतील लांकडामध्यें वीटचुन्याच्या भिंती बांधतात. वीटचुन्याचें बांधकाम अर्ध्या विटेचें म्हणजे ४॥ इंच जाडीचें सांधमोड करून करतात व त्याच्या दोन्हीं बाजूंनां पाऊण इंच गिलावा करून भिंत ६ इंच जाडीची होते. लांकडाचें खांब ६ x ५ पांच फूट अंतरावर ओळंब्यांस उभे करतात व त्यांमध्ये ६ x २ या मापाच्या पाटल्या खांबांत कुसूं व खांचा करून तीन तीन फूट अंतरावर बसवितात व पाटलांच्या कर्णरषेंत ६ x १॥ या मापाचे तक्ते खांबाला खिळे मारून बसवितात. सांगाड्यांतील लांकडांमधील जागेंत वीटचुन्याचें बांधकाम करतात. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस १४० रु. पडतो.

सिमेंट आणि विटा याचे बांधकाम.- अशा बांधकामास विटा अगदीं चांगल्या भाजलेल्या असाव्या आणि त्या पाण्यांत भिजवून तर्र झालेल्या असाव्या आणि त्या बसवितांना एक भाग सिमेंट, तीन भाग रेती यांचा गारा करून त्यांत बसवाव्या. हा गारा जसजसा लागेल तसतसा तयार करीत जावा. आधींच भिजवून ठेवूं नये. असें काम जेव्हां ४॥ अगर ९ इंच जाडीच्या पडद्यां बांधण्यासाठी उपयोगांत आणतात तेव्हां त्याला मजबुती आणण्यासाठीं १ इंच रुंद आणि १८ गेजच्या छरपट्टया अथवा पाव इंच जाडीच्या लोखंडी सळ्या सिमेंटच्या सांध्यांतून घालतात. ह्या घालतांना भिंतीच्या दोन्ही दर्शनी बाजूंच्या जितक्या जवळ दोन पट्टया किंवा सळ्या सिमेंटांत सर्व बाजूंनी नीट झांकल्या जातील अशा रीतीनें बसवून दोन्ही कडांच्या मुख्य भिंतीत निदान ६ x ६ इंच जातील अशा रीतीनें गुंतावा करावा. अशा दोन पट्टया अगर दोन सळ्या प्रत्येक तिस-या किंवा चौथ्या थरांत घालतात.

मुंबईस पक्क्या विटा व चुना यांच्या भिंती बांधणे झाल्यास त्या किती उंचीच्या असतांना व दोन पडद्यांमधील भिंतीची लांबी म्हणजे दोन पड्यांतील अंतर किती असावें व या भिंती किती जाडीच्या असाव्या याबद्दलचें प्रमाण पुढें दिलें आहे:-

(१) भिंतीची उंची १० फुयांपर्यंत व लांबी म्हणजे दोन पड्यांतील अंतर कितीहि असल्यास जाडी ९ इंच. (२) १० ते १५ फूट उंची, कितीहि लांबी असतां ८ फूटपर्यंत १४ इंच जाडी व नवव्यापासून ९ इंच जाडी. (३) १५ ते २५ उंची, दोन पडद्यांत अंतर ३० फूटांपर्यंत, १४ इंच जाडी माथ्यापर्यंत (४) १५ ते २५ फूट, उंची ३० फुटांपेक्षां जास्ती अंतर, अगदी वरील मजल्याच्या खालच्या मजल्याच्या माथ्यापर्यंत १८॥ इंच जाडीवर इमारतीला एक मजल्यापेक्षां जास्ती मजले असतील तर आणि जर तळमजला म्हणजे एक मजलाच असेल तर तळापासून १५ फूट उंचीपर्यंतचा भाग १८॥ इंच जाडीचा आणि त्यावरील भाग १४ इंच जाडीचा (५) २५ ते ३० फुटांपर्यंत उंची, २५ फूटांपर्यंत अंतर, दाने मजल्यापेक्षां जास्ती मजले असतीलत तर वरील दोन जमले सोडून त्याच्या खालीं १८॥ इं जाडी आणि जर दोन मजल्यांपेक्षां जास्ती मजले नसतील तर अगदी वरील मजल्याच्या खालच्या बाजूस १८॥ इंच जाडी आणि पडद्यामधीं अंतर ३५ फूटांपेक्षां जास्ती असेल तर वरील माथ्यापर्यंतचा भाग १८ इंच जाडीचा, अगदीं वरील दोन मजले सोडून खालची जाडी १८॥ इंच व वरील सर्व भाग १४ इंच जाडीचा (६) ३० ते ४० फूटांपर्यंत उंची, ३५ फूटपर्यंत पडद्यांतील अंतर, अगदीं वरील दोन मजले सोडून खालची जाडी १८॥ इंच व वरील सर्व भाग १४ इंच जाडीचा पण ३५ फूटांपेक्षां जास्ती अंतर असेल तेव्हां १ मजल्यापर्यंत २३॥ इंच जाडी आणि अगदीं वरचा मजला सोडून खालचा भाग १८॥ इंच जाडीचा व बाकीचा वरील भाग १४ इंच जाडीचा. (७) ४० ते ५० फूट उंची, ३५ फूट लांबी अगदी वरील, मजला १४ संच जाडीचा व त्याच्या खालचा भाग १८॥ इंच जाडीचा. पण ३५ फुटांपेक्षां जास्ती अंतर असेल तर तळमजल्यावर २४ इंच जाडी व त्याच्या वरील भाग १८॥ इंच जाडीचा. अगदीं वरील मजल्यचा्या तळापर्यंत अगदीं वरील मजल्याची जाडी १४ इंच. (८) ५० ते ६० फूट उंची ४० फूटपर्यंत, लांबी तळमजल्याची जाडी २३॥ इंच व वरील माथ्यापर्यंतचा भाग १८॥ इंच जाडीचा. पण ४० फुटांपेक्षां लांबी जास्ती असेल तर खालच्या दोन मजल्यांच्या भिंती २३॥ इंच जाडीच्या व वरील भाग १८॥ इंच जाडीचा आणि सगळ्यांत वरील मजला १४ इंच जाडीचा. आणि ५० फूटांपेक्षां जास्ती अंतर असेल तेव्हा २८॥ इंच जाडीत पहिला म्हणजे माथ्याचा मजला त्याच्यावरील दोन मजल्याची जाडी २४ इंच व त्याच्यावरील माथ्यापर्यंतची जाडी १८॥ इंच. (९) ६० ते ७० फूट उंची, ४० फुटपर्यंत अंतर २३॥ इंच जाडी दुसर्या मजल्याच्या माथ्यापर्यंत व वरील शेवटच्या मजल्याखेरीजचा भाग एक इंच जाडीचा. आणि शेवटल्या मजल्याची जाडी १४ इंच. पण ४० फुच्पेक्षणा जास्ती अतंर असेल तर २८॥ इंच झाडी व त्याच्या वरील भागाची १८॥ इंच जाडी शेवटच्या मजल्याच्या तळापर्यंत. आणि शेवटच्या मजल्याची २४ इंच जाडी महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतींच्या भितीची जाडी कमीत कमी किती असली पाहिजे त्याचें कोष्टक:-

उंची दोन पडद्यांमधील लांबी जाडी
१५ फूट वाटेल तितका १४ इंच
१५ ते २५ फूट '' १८॥ इंच तळाशीं.
२५ ते ३० फूट ४५ फुटांपर्यंत १८॥ इंच तळाशीं.
२५ ते ३० फूट ४५ फुटांपेक्षां जास्ती २४ इंच तळाशीं.
३० ते ४० फूट ३० फूट असल्यास १८ इंच तळाशीं
३० ते ६० फूटांपर्यंत २४ इंच तळाशीं.
६० फुटांपेक्षा जास्ती २८॥ इंच तळाशीं
४० ते ५० फूट ४० फुटांपर्यंत  २४ इंच तळाशीं
३० ते ७० फूट २८॥ इंच तळाशीं
७० फुटांपेक्षा जास्ती ३३॥ इंच तळाशीं
५० ते ६० फूट ३५ फूटांपर्यंत २४ इंच तळाशीं
३५ ते ५० फूट २८॥ इंच तळाशी
५० फुटांपेक्षां जास्ती ३३॥ इंच तळाशी
६० ते ७० फूट ३० फुटांपर्यंतत ३० फुटांपर्यंतत
३० ते ४५ फूट २८॥ इंच तळाशी
४५ फूटांपेक्षा जास्ती ३३॥ इंच तळाशी

(१) कोणतीहि भिंत २५ फुटांपेक्षां जास्ती उंचीची असेल तर तिचा माथ्यापासून १५ फूट खालपर्यंतचा भाग १४ इंचांपेक्षां कमी जाडी असूं नये. (२) आडव्या पडद्यांची जाडी पाहेरील भिंतीच्या निदान २/३ पेक्षां कमीं असूं नये. पडदी कितीहि लहान असली तरी ती ९ इंचांपेक्षां कमी असूं नये.

इमारतीचा पाया खोदून तयार झाला किंया सोट ठोकून अथवा लोखंडी पंतपात्रें उतरवून किंवा विटांचे किंवा दगडाच्या बांधकामाचे कुवे उतरवून तयार झाला म्हणजे त्यावर वरील इमातरीचा किंवा पुलाचा भार सारखा वाटला जावा म्हणून दोनपासून चार फूट जाडीचें कांक्रीट (जरूर तर लांकडी पेटींत) घालून त्यावयर बांधकाम सूरू करतात.

कांक्रीट:- कांक्रीट म्हणजे विरविलेला चुना, रेती व गोटे किंवा फोडलेल्या विटांचें सारखें कालवून तयार केलेलें मिश्रण होय. यांपैकीं चुना १ भाग व रेती २ भाग अशीं सर्व एकत्र करून व त्यांत पाणी घालून चुन्याच्या घाणींत घालून चार पांच तास चांगला मळल्यानंतर जो मळलेला चुना तयार होईल त्याचा ५/६ इंच जाडीचा, वर सांगितलेल्या गोटे, खडी किंवा विटांचे रोडे यांचा एक फूट जाडीचा तर करून व तो नीट रीतीनें भिजवून त्यांवर घालतात. व नंतर तो थर खापून व थोडें थोडे पाणी घालून मळलेला चुना व खडी वगैरेंचें बरोबर मिश्रण करतात. हें मिश्रण फावड्याने किंवा खोर्यानें अशा रेतीनें फिरवितात कीं खडीचा रोड्यांचा,अथवा गोट्यांचा कोणताहि खडा, त्याला सर्व बाजूनें चुना लागल्यावांचून राहूं नये. चुना मळतांना दोन भाग रेतीमध्ये जो पोकळ भाग असतो त्यामध्येंच एक भाग चुना समावून जातो. म्हणजे ४० घनफूट रेती व २५ घनफूट चुना यांचा मळून ५० घनफूटच मळलेला चुना तयार होतो. व त्याचप्रमाणें शंभर घनफूट बारीक फोडलेली खडी, किंवा रोडे अथवा गोटे व ५० घनफूट मळलेला चुना यांचे वर सांगितल्याप्रमाणें मिश्रण करून तें ठोकळें असतां मळलेला सर्व चुना खडीच्या किंवा रोड्यांच्या वेगवेगळ्या खड्यांमध्यें जी थोडी थोडी पोकळ जागा राहते त्या जागेंत सामावून जाऊन ठोकल्यावर ह्यांचें १०० घनफूटच कांक्रीट बनतें. ज्या ठिकाणीं कांक्रीट कोरड्या जागेंतच घालावयाचें असतें त्या ठिकाणी कळीचुन्यासारखा शुद्ध चुनाहि चालतो. परंतु अशा चुन्यांत फोडलेल्या विटांचा अथवा कौलांची भुकी घालून मळून चुना तयार केला तर जास्ती बरें. परंतु जेथें ओल्या जमीनींत पाया घालावयाचा असेल त्या ठिकाणीं चुनखडीचा म्हणजे ज्यांत थोडा तरी मातीचा भाग असतो असा चुना असावा लागतो. अशा चुन्याला फारशी हवा न लागली तरी सुद्ध तो स्वतःच्या अंगच्या गुणानेंच कठिण होतो व ज्या ठिकाणी पाण्यांतच पाया घालावयाचा असेल व चुन्याला कठिण होण्याला अवसर मिळाला नाहीं अशा ठिकाणीं सिमेंटचाच उपयोग करतात. सिमेंट म्हणजे शुद्ध कळीचा चुना व माती यांचें मिश्रण करून व त्या मिश्रणाला पुष्कळ आंच देऊन नंतर तें भाजलेलें मिश्रण दळून त्याची तयार केलेली पूड होय अशा कारणानें सिमेंटमध्यें पाण्यांतहि कठिण होण्याचा गुण येतो व तें कठिण होण्याला हवेची जरूर लागत नाहीं. सिमेंटचें कठिण होणें हें त्याच्या घटकावयवांमध्यें जी रासायनिक क्रिया चालते तीवरच अवलंबून असतें. त्या क्रियेला एरवीच्या कळीचुन्याला किंवा चुनखडीच्या चुन्याला हवेंतील कॅर्बानिक अॅसिड वायूची (कर्बाम्लची) कठिण होण्याच्या कामीं जरूर लागते अशा रीतीची सिमेंटला जरूर लागत नाहीं. कारण एरवीचा मळलेला चुना कामांत वापरल्यानंतर तो दगडासारखा घट्ट बनतो म्हणजे त्याचा कार्बोनेट होतो. पण सिमेंट कठिण झालें म्हणजे त्याचा एक प्रकारचा सिलिकेट बनतो. म्हणून त्याला हवेंतील कॅबार्निक अॅसिडची जरूरी नसते. ह्या त्याच्या धर्मामुळें ज्या ठिकाणी पाण्यांतच पाया घालावयाचा असेल अशा ठिकाणीं सिमेंट कांक्रीटचाच उपयोग करतात. चुन्याच्या ऐवजी सिमेंट घालून कांक्रीट केलें म्हणजे तें पायांत घातल्यावर थोड्याच तासांनी इतकें कठिण होतें कीं तें पाण्यांनें  धुऊन निघून जात नाहीं व नंतर त्यावर पाणी चढलें तरी त्याच्या घटकावयवांमध्यें रासायनिक क्रिया चालून जसजसें जास्ती दिवस जातील तसतसें जास्ती कठिण होत जाते.

पा या च्या आ णि म ज ल्या च्या भि ती ची रुं दी:- साधारण प्रकाच्या कठिण मातींत पाया घालावयाचा असेल तेव्हां पायांतील कांक्रीटची रुंदी इतकी घ्यावी कीं, वरील इमल्याच्या वजनाच्या मानानें त्यावर दर फुटाला एक टनापेक्षां जास्ती भर येऊं नये व कांक्रीटच्या थराची एकंदर जाडी दीड फुटापेक्षां कमती असतां कामा नयें. पायाचें कांक्रीट पुरें केल्यानंतर म्हणजे कांक्रीटच्या एकंदर थराची जाडी ४/५ फूट झाल्यानंतर त्यावर दोन्हीं बाजूंनां ६ इंचाचा संजाव सोडून त्यावर पायाचें बांधकाम करतात. हें बांधकाम जमीनीच्या पृष्ठभागाच्या खालीं ६ इंच किंवा एक फूटपर्यंत रचून आलें म्हणजे मग त्यावर जोत्याचें बांधकाम करतात. जोत्याची उंची जमीनीपासून निदान २/३ फुट तरी असावी, इमारत १५/१६ फूटपर्यंत गाळ्याची व तीन मजल्यांची असेल व अगदी वरच्या मजल्याच्या भिंती विटांच्या असल्यास निदान १३॥ इंची, व दगडांच्या असल्यास १५ इंची; व त्याच्या खालच्या मजल्याच्या १॥ फूट जाडीच्या व तळ मजल्याच्या १॥। पासून २ फूट जाडीच्या करतात. अशा वेळी जोत्याच्या भिंतीची जाडी २॥ फूट ठेवतात. व पायाच्या बांधकामाची ३ फूट व जास्ती खालीं ४॥ किंवा ५ फूट रुंदीचें व ४ फूट खोलीचें कांक्रीट घालावें. गाळा १५ फुटापेक्षां जास्ती असल्यास अगदीं वरच्या मजल्याच्या भिंती निदान १८ इंच जाडीच्या असाव्या. चाळीवजा लहान गाळ्यांच्या इमारती असल्यास अगदीं वरच्या मजल्याच्या भिंती ९ इंच जाडीच्याहि करतात. परंतु मोठ्या गाळ्याच्या जास्ती महत्त्वाच्या इमारतींनां इतक्या पातळ भिंतीं घालणें धोक्याचें असतें. जोत्यापर्यंत बांधकाम झालें. म्हणजे घराच्या आंतील भाग मातीनें किंवा मुरमानें भरून काढतात. हा भराव टाकीत असतांना प्रत्येक थर ९/९ इंचांचा घालून व त्यांवर पाणी शिंपडून तो ठोकला म्हणजे आंत फरशीं किंवा कोणत्याहि प्रकारची जमीन केल्यावर ती जागजागीं दबून जाण्याचा संभव राहात नाहीं. जोत्याच्या बाहेरच्या बाजूलाहि पायाचा चर खणला असेल तितक्या रुंदीची जागा वरच्या प्रमाणेंच ९/९ इंचांचे थर करून व पाणी घालून ठोकून जमीनीच्या पृष्ठभागापर्यंत इमारतीच्या सर्व बाजूचा भाग तयार केला म्हणजे पावसाचें पाणी सर्व बाजूंनीं पायांत मुरून जें कधीं कधीं नुकसान लागतें तें लागण्याचा संभव रहात नाहीं. इमारतीचें भोंवतालून सर्व बाजूनें जोत्याला लागून अशा रीतीनें माती टाकून अशा प्रकारानें भराव करावा कीं त्या भरावाच्या पृष्ठभागाला १० फुटांस तीन इंच इतका स्लोप किंवा ढाळ मिळावा. असें केल्यानें पावसाळ्याचें जें पाणी पडेल तें इमारतीच्या जवळ न सांचतां इमारतीपासून ताबडतोब वाहून जातें, व त्यामुळें इमारतीच्या पायाला कधीहि नुकसान लागत नाहीं, व भोंवतालची जागा सर्व कोरडी राहिल्यानें ओल येण्याचेंहि भय रहात नाहीं. वर सांगितल्याप्रमाणें वरच्या मजल्यापासून पायापर्यंत भिंतीची जाडी वाढवावयाची ती दर मजल्याच्या दोन्ही बाजूंनां सारखा २। पासून ३ इंच रुंदीचा संजाव सोडून भिंती बांधल्या असतां इमल्याचें सर्व वजन पायाच्या मधोमधच असल्याकारणानें पाया खचण्याचा संभवच रहात नाहीं. भिंतीच्या बाहेरच्या बाजूला हा संजाब दिसण्यांत येऊं नये म्हणून दर मजल्याच्या माथ्याच्या लेव्हलबरोबर कंगणी किंवा गलथा करतात. त्याच्या योगानें बाहेरून शोभाहि दिसते व इमारतीस पाणी लागूं शकत नाहीं.

ज्या ठिकाणीं लहान एकमजली इमारत बांधावयाची असेल व पायाची जमीन चांगली नसेल अशा ठिकाणी जोत्याचें बांधकाम करतांना त्यांत प्रत्येक चौथ्या थराला सांध्यांतून भिंतीच्या एका टोंकापासून दुसर्या टोंकापर्यंत छरपट्टया घालून बांधकाम करतात. त्याच्या योगानें पायाची जमीन एकसारखी न दबल्यामुळें, ज्या साधारण रीतीनें भेगा व चिरा पडतात  त्या पडत नाहींत. कारण या छरपट्टयांच्या योगानें वरील सर्व भिंत एकजीव होते. अगदीं वरच्या मजल्यांच्या भिंतीची जाडी साडेतेरा इंच असेल तर ज्या ज्या ठिकाणीं म्हणजे प्रत्येक ९ किंवा १० फुटाव कैचीचा भार सहन करण्यासाठीं भिंतीची जाडी निदान ४॥ इंचानीं वाढवून १॥ फूट रुंदीचा व सुमारें दोन फूट लांबीचा खांब होईल अशा रीतीनें बांधकाम करतात.

कं ग ण्या व मुं ढे र्या.-याचे दगड इमारतीच्या नकाशांत दाखविलेल्या आकृतीचे व मापाचे असून दर्शनी बाजूस व सांध्यांत उत्कृष्ट माठीव घडले पाहिजेत. आणि त्यांत कांही तेढतिप्पड नसावा. त्यांचे तळ साधणींत असून सडकीव असावे. सांधें गुण्यांत असून कळशीहि चांगली गुण्यांत असावी. सांध्याची जाडी एक अष्टमांशापेक्षां अधिक नसावी. दर्शनी बाजूचे नात्रे व कोन तुटलेले नसावे. कोणताहि दगड दुमाल्यात व रुंदींत उंचीपेक्षां कमी असूं नयें. भिंतीच्या बाहेर येणार्या कारबेल वगैरे दगडाची बाजू जितकी भितीच्या बाहेर आली असेल तितकीच्या निदान दुप्पट लांबी भिंतीत असावी. व उंचीच्या दीडपट दुमाला भिंतीत असावा.

द ग डी पा य र्या.- त्यांची दर्शनी बाजू व सांधे फरशीप्रमाणें घडलेले असावे. पायर्यांचे दगड एकमेकांवर निदान १॥ इंच सारखे चढवून बसवावे. पायर्या दाने भिंतींमध्यें असतील अशा ठिकाणीं दगड भिंतीत निदान १॥ इंच जावेत. प्रत्येक दगडाची रुंदी टप्प्याच्या पुर्या रुंदीस व झुकत्या गोलाईस पुरेल अशा बेताची व उंची अंधारीच्या उंचीबरोबर असावी.

द ग डी जि ना.- सर्व दगड दर्शनी बाजूस चांगले माठीव असून त्यांचा आकार, लांबी-रुंदी व उंची नकाशांत दाखविल्याप्रमाणें असावी. प्रत्येक पायरी एकाच दगडाची असून दगडाच्या दर्शनी बाजूच्या नात्रास पाहिजे असल्यास गोलची व बलकी असावी. पायर्यांची खालची बाजू साधारण सडकीव असून तीत सारखा उतार द्यावा. तळाच्या पायर्यांस दोन्हीं बाजूचें कोपरे थोडे वाढवून त्यास गोलची करावी. पायर्या भिंतीवर व गडरावर (लोखंडी बहालें) टेंकावयाच्या असतील तर त्या बांधकामांत चांगल्या बसवून त्यांची टोकें भिंतीत निदान ३ इंच जावीत. जिना वर्तुळाकृति किंवा चौकोनी असेल तर पायर्यांचे दगड भिंतीचया जाडीच्या मध्यापर्यंत जातील असे लांब असावे किंवा भिंतीत निदान ९ इंच जावेत. पायर्यांच्या मागील बाजूचे सांधे नकाशांत दाखविल्याप्रमाणें असून दगड एकमेकांवर, पायरीच्या प्रत्येक फूट लांबीस अर्धा इंच ह्या प्रमाणानें चढवून बसवावें. पायर्या बांधतेवेळीं त्यांच्या खालीं पाहिजे असेल अशा नमुन्याचें कलबूद बसवून तें कठड्याच्या खांबाची व गजांची भोकें पाडल्या नंतर काढावें.

लां क डी जि ना.- लांकडं मोडमीन सागवानी असावीं. अंधार्यांची जाडी १। इंच असून तक्त्याची जाडी १॥ इंच असावी. अंधार्यांचा तळ आणि माथा टप्प्यांत खोबणदात्यांचे सांध करून त्यांत बसवावा. टप्प्याच्या दर्शनी बाजूच्या कोरांस वलकी ठेवून गोल्या करावा. पायर्यांच्या खालच्या बाजूस पाऊण इंच जाडीचे तक्ते खोबणदात्यांचे सांधे करून बसवावे. पायर्या आंतील व बाहेरील तरकांत (बाह्य) खोबण करून बसवाव्या. तरक १४ x ३ इंच मापाचे असावे. तबकडीच्या (लँडिग) दर्शनी कोपर्यांस पायर्यांप्रमाणेंच गोल्या व बलकी असून तिची खालची बाजू पायर्याप्रमाणेंच असली पाहिजे. तळाच्या पायरीचे दोन्ही बाजूचें कोपरे वाढवून टोंकास गोल करावे. पायर्यांच्या बाजूस नकाशांत दर्शविल्याप्रमाणें कठडा असून त्यांतील गज, फिरक्या आणि गराद्या टप्प्यांत चांगल्या बसवाव्या. (साधारण नेहमींच्या जिन्यांत  म्हणजे ज्यांत टप्प्याची रुंदी ९ इंचांपासून १४ इंचांपर्यंत असतें, अशा जिन्याच्या टप्प्याची व अंधारीची उंची ज्या नियमावरून काढतात ते नियम असे: टप्प्याची रुंदी गुणिले अंधारीची उंची = ६६ इंच. अथवा टप्प्याच्या कोणत्याहि रुंदीवरून उंची काढणें झाल्यास टप्प्याची रुंदी + अंधारीची दुप्पट उंची = २३ इंच)

दगडी पायर्यांची रुंदी व उंची, अमुक इंच रुंदीस अमुक इंच उंची या प्रमाणांत पुढें दिली आहे:- ६ इंच रुंदीस ८॥ इंच उंची; ७ इंच रुंदीस ८ इंच उंची; ८ इंच रुंदीस ७॥ इंच उंची; ९ इंच रुंदीस ७ इंच उंची; १० इंच रुंदीस ६॥ इंच उंची; ११ इंच रुंदीस ६ इंच उंची; १२ इंच रुंदीस ५॥ इंच उंची; १३ इंच रुंदीस ५ इंच उंची; १५ इंच रुंदीस ४ इंच उंची.

फ र शी.- भिंतींचें बांधकाम तयार झाल्यावर व कौलारू किंवा दुसर्या कोणत्याहि प्रकारचें आच्छादन इमारतींवर घातल्यानंतर घरांच्या जमीनी करतात. वर सांगितल्याप्रमाणें जोत्याच्या माथ्यापर्यंत खालचा भाग मातीनें व वरचा भाग मुरमानें भरून ठोकून जमीन तयार करतात ही जमीन पाण्यानें भिजवून आणि चोपण्यानें ठोकून तयार केली व अगदीं वरच्या बाजूला नदींतील जाडी रेती घालून ठोकून पक्की केली म्हणजे ती साधारण बागीनें झिजून न जाण्याइतकी कठिण व पाणीसुद्धां लवकर न जिरेल इतकी टणक होऊं शकते. अशा भुईला सारवण वगैरे घालून नीट व्यवस्थित ठेविली तर ती पुष्कळ वर्षे टिकते.

ज्या ठिकाणीं जमिनीला जास्ती वर्दळ असेल अशा ठिकाणीं दगडाची फरशी करतात. ही फरशी करावयाच्या अगोदर मुरमाच्या जमिनीप्रमाणेंच खालची जमीन ठोकून तयार करून तीवर ४ इंच जाडीचा कांक्रीटचा थर घालतात. व तो ठोकून कठिण झाला म्हणजे त्यावर दीड इंच जाडीची शहाबादी किंवा तांडूर किंवा अशाच जातीची फरशी बसवितात. हे फरशीचे दड १२ इंच लांबी-रुंदीचे मिळत असल्यामुळें ते मधल्या भागाला तिरपे (म्हणजे भिंतीशी ४५ अंशाचा कोन करून) बसवितात. व चारी भिंतीला समांतर अशा दीड किंवा २ फूट रुंद फरशा संजावाप्रमाणें बसविल्या म्हणजे अशी फरशी गालीच्या सारखी नकशीदार दिसते. अशा प्रकारच्या फरशीच्या सांध्यांची जाडी अर्ध्या दोरीपासून एक दोरीपर्यंत असावी.

ज्या ठिकाणीं असें दगड मिळत नाहींत अशा भागांत वर लिहिलेल्याप्रमाणें कांक्रीट करून त्यावर दगडांच्या ऐवजी विटांची फरशी (कधीं कधीं विटा कोडीवर बसवूनहि) करतात किंवा आतां अर्ध्या इंच पासून पाऊण इंच जाडीपर्यंच्या ६ इंच चौरस किंवा त्याच्यापेक्षांहि लहान तुकड्यांच्या दाबून बनविलेल्या तांबड्या किंवा पिंवळसर रंगांच्या मंगलोरी किंवा यूरोपमधून येणार्या विटा मिळतात व त्याचे सांधे अर्ध्या सुतापेक्षाहि बारीक करतां येतात. अशा विटा बहुतकरून सिमेंटमध्यें बसवितात. अशा विटा अगर फरशा चित्रविचित्र रंगाच्याहि मिळतात. व तशा फरशा बसवून व त्याच जातीच्या फरशांच्या संजाब बनवून मोठमोठ्या दिवाणखान्यांनां गालीचा पसरल्यासारखी शोभा देणारी फरशी बनवितां येते. आंघोळीच्या किंवा मोरीच्या ठिकाणीं ह्याच जातीच्या पांढर्या झिलई असलेल्या फरशा जमिनीला व भिंतींनांहि बसवितात. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या फरशा बसवितांत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या फरशा बसवितांनां खालीं ६ इंचाचा कांक्रीटचा थर घालतात आणि सहा इंच कांक्रीटच्या थराखालीं ओल येऊ नये म्हून ३ इंचांचा शुद्ध रेतीचा थर पसरवितात. या रेतीच्या तळाखालची जमीन मुरमाच्या जमिनीप्रमाणेंच कठिण करावी. दर १२ इंच लांब व १२ इंच रुंद अशा दगडाच्या फरशा सांगितल्या आहे. त्या आकाराच्या संगमरवरी दगडाच्याहि फरशी मिळतात. व त्या देवळें किंवा राजवाडे अशा ठिकाणीं वापरतात. ह्याच आकाराच्या जमिनीवर घालण्याजोग्या दाबून काढलेल्या व भाजून लाल केलेल्या मातीच्या फरा सिंधमध्यें पुष्कळ वापरतात. व तशाच जातीच्या १॥ इंच जाडीच्या फरशा वरच्यावर बसवितात. व त्यावर मातीचें माळवद किंवा धाबें करतात.

फरशी, पहिल्या प्रतीची:- कांक्रीट घालण्यापूर्वी मुरमाची भराई (लेव्हल) करून तीवर पाणी घालून चांगली चोपावी व कांक्रीट तयार करून ठोकून ६ इंच जाडीचा थर होईल अशा बेतानें पसरवी, व धुमसानें खूप ठोकावें. फरशीचे पृष्ठभाग उत्कृष्ट माठीव घडावें. फरशा सारख्या रुंदीच्या असाव्या; म्हणजे बाजूचें सांधे समांतर होतील. फरशांच्या मधील सांधे अष्टमांश इंच जाडीचे असून त्या कांक्रटवर खालच्या बाजूस व सांध्यास चुना घालून असाव्यास व त्यांच्या खाली अथवा बाजूस पोकळ जागा राहूं देऊं नये; फरशा ३ इंच किंवा ४ इंच जाडीच्या असून त्यांची लांबी व रुंदी १२ x १२ इंच याहून कमी नसावी; आणि त्यांचा पृष्ठभाग चांगला माठून त्या गुण्यांत बसवाव्या; फरशांच्या बाजूच्या सांध्यांची कळाशी पृष्ठभागापासून निदान १॥ इंच गुण्यांत असावी; असल्या प्रकारची फरशी देवळांत वगैरे करतात. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस १३८ रु. आहे.

फरशी, दुसर्या प्रतीची:- हें काम साधारणतः वर सांगितल्याप्रमाणेंच असावें; परंतु फरशांचा पृष्ठभाग साधारण ओबडधोबड माठीव असावा. व सांध्याची जाडी तीनषोड्शांश असून कळाशी पृष्ठभागापासून १ इंच गुण्यांत असावी. यांचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस १११ रु.

फरशी, तिसर्या प्रतीची:-ह्यांत फरशा सडकीव असाव्यात. व सांधे पाव इंच जाडीचे असून कळाशी पृष्ठभागापासून अर्धा इंच गुण्यांत असावी; फरशा १२ x ६ इंचांपेक्षां कमी लांब-रुंद असाव्यात. फरशाखालीं कांक्रीट ठोकून तें ३ इंच जाडीचा थर होईल. अशा बेतानेंच पसरावें. याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ९० रू. आहे.

फरशी, चौथ्या प्रतीची:- यांत फरशा कोणत्याहि नमुन्याच्या असल्या तरी चालतात. व पृष्ठभाग साधारण सडकीव (गजगुण्यांत) असून सांधा तीनअष्टमांशापेक्षां अधिक जाड नसावा. कळाशी अर्धा इंच गुण्यांत असली पाहिजे. खालचा कांक्रीटचा थर ठोकून ३ इंच जाड राहील असा घालावा. अशा प्रकारची फरशी धर्मशाळा व स्वयंपाकघर वगैरें ठिकाणीं असते. ह्याचा भाव सध्यां (१९२५) २०० चौरस फुटांस ७७  रु. आहे.

दुसर्या मजल्याची फरशी:-या फरशा बसेदावर ठेवतात. त्या निदान १॥ इंच जाड असून सारख्या असाव्या, व चौरस असून त्यांचा तळमाथा समांतर असावा. कळाशी गुण्यांत फरशीच्या जाडीइतकी असावी. व अशा फरशीवर कांक्रीट घालणें नसेल तर दगड अशा लांबीरुंदीचे असावेंत कीं, त्यांचे सांधे सरळ रेषेंत असावेत. सांध्यांत पोर्टलंड सिमेंटचा उपयोग करावा. जेथें फरशीवर कांक्रीट करणें असेल तेथे फरशीची वरील बाजू घडूं नये. व फरशी चुन्यांत बसवावी. आणि सांधे पाव इंच असावेत.

विटा व कौलांची जमीन:- ही करतांना ६ इंच जाडीचा कांक्रीटचा थर घालून त्यावर विटा किंवा चपटीं कौलें चांगली भिजवून चुन्यांत बसवावी. या कामासाठीं विटा कठिण व उत्कृष्ट भाजलेल्या व एक रंगी अशा निवडून काढाव्या. व सांधे घासावेत. विटा उभ्या-आडव्या वर कोरेवर बसवून चुन्याच्या सांध्याची जाडी तीन अष्टमांश इंच ठेवावी. व विटांचा पृष्ठभाग सांधणींत बसवावा. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ६० रु. आहे.

चुनेगच्ची:- ही करण्याच्या पूर्वी मूरबादची भरणी सांधणींत आणून ती वर घालून चांगली ठोकून ६ इंच कांक्रीट लागोपाठा ३ दिवस लांकडाच्या किंवा लोखंडाच्या जड धूमसानें खूप ठोकावें. १०० चौरस फुटांस निदान ३ मजूर दररोज ठोकण्यास लावावे. कांक्रीट ठोकून घट्ट बसल्यावर त्यावर पाऊण इंच जाडीचा चुन्याचा गिलावा करवा. व त्यावर चपट्या ठोकण्यांनीं एकसारखें ३ दिवस ठोकावें. गिलाव्यांत पाहिजे असल्यास मसाला घालावा. गिलाव्यांच्या पृष्ठभागावर ओल्या गवताचें आच्छादन ठेवावें. व सर्व जमीन पुरी होईपर्यंत ती कमी जास्त वाळूं देऊं नये. ह्याचा भाव सध्या (१९२५) १०० चौरस फुटांस ३९ रु. आहे.

आसफाल्टची जमीन:- हीं करतांना कांक्रीटची जमीन तयार करून ती चांगली वाळल्यावर तिच्यावर आसफाल्ट पसरावा. तो पसरतांना १ भाग आसफाल्टांत एकबत्तीसांश भाग विश्वभूमीत म्हणजे डामर आणि अर्धा भाग स्वच्छ वाळू घालून तो कढवून पातळ करावा. व ह्या कढलेल्या मिश्रणाचा सारखा अर्धा इंच किंवा पाऊण इंच जाडीचा थर पसरून त्याचा पृष्ठभाग सणसळींत येईतोंपर्यंत लांकडी पट्टीनें मोठ्या काळजीनें साफ करावा. आसफाल्टची जमीन करतांना निरनिराळें तुकडे मोठ्या काळजीनें जोडले पाहिजेत. व त्याचा पृष्ठभाग कठिण झाला नाहीं तोंच पाणसळीत आणून त्यावर बारीक रेती घालून रंग सारखा काळा होईतोंपर्यंत घोटून गुळगुळीत करावा. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ९५ रु. आहे.

डामरी जमीन:- ही जमीन करण्याची रीति अशी आहे कीं, कढविलेल्या पातळ डामरांत खडी टाकून तिच्या सर्व बाजूंस डामर लागलें म्हणजे तें ओलें आहे तोंच त्या खडीचा एक वर ज्या जोवर अशा प्रकारची जमीन करण्याची असेल त्या जागी पसरतात. व तिचा पृष्ठभाग ठोकून किंवा रूळ फिरवून बसविल्यानंतर त्यावर पातळ डामरांत जाड वाळू टाकून वर रूळ फिरवितात.अशी डामरी जमीन करण्यापूर्वी खाली घातलेला मुरुम पाणी घालून व चोपून सांधणींत आणावा लागतो. व प्रत्येक खड्याचें घनफळ सुमारें १ घनइंच असेल अशी खडी पातळ डामरांत घालून तें मिश्रण कढवून ऊन आहेत तोंच या मिश्रणाचा ६ इंच जाडीचा थर पसरावा. पसरण्याचें काम आटोपल्यानंतर खडी चांगली बसेपर्यंतच तिजवर दगडी किंवा लोखंडी रूळ फिरवावा. रूळ फिरवितांना त्यावर पाणी घालून ओलें ठेवावें. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ३८ रुपये आहे. पातळ डामर (कोल्टार) साधारण घट्ट असून चांगलें कढवावें.व तें फार पातळ असेल तर रूळ फिरविल्यावर खडी आवळून बसणार नाहीं. वर सांगितलेल्या ६ इंची घरावर पुढें सांगितल्याप्रमाणें मिश्रण तयार करून त्याचा अर्धा इंच जाडीचा थर पसरावा. ह्या मिश्रणांत बारीक दगडाच्या कांचळा किंवा खरखरीत जाड वाळू २ भाग व फकी चुना १ भाग घेऊन तो १ भाग बीचू (खडे डामर) व दोन भाग पातळ डामराच्या कढविलेल्या मिश्रणांत टाकावा आणि मिश्रर ऊन आहे तोंच साफ पसरावें. कांचळा व जाड वाळूच्याऐवजीं चांगल्या भाजलेल्या विटांची पूड किंवा चुनखडीचा फंकर घातला तरी चालतो. शेंवटच्या थरावर रेतीचा पाव इंच जाडीचा थर पसरून त्यावर आणखी रूळ फिरवितात. हें काम करतांना रूळ जेवढ्या लांबीचा असेल तेवढ्या रुंचीची पट्टी प्रत्येक वेळेला तयार करावी. म्हणजे तीवरून रूळ फिरवून ती चांगली घट्ट बसेल. पसरतांना किंवा रूळ फिरत असतांना खडी नियमित रुंदीच्या बाहेर जाऊं नये म्हणून पट्टीच्या कोरा ९ फूट लांब व ६ x ३ इंच पाटल्या कोरेवर ठेवाव्या. पाटल्या न हलाव्या म्हणून त्यांच्या बाजूंवर वजनें ठेवावीं. पहिली पट्टी पुरी झाल्यावर पाटल्या दुसर्या पट्टीच्या कडेला ठेवून मध्यें डामरी खडी भरून रूळ फिरवून बसवावी. याप्रमाणें काम पूर्ण रुंदीचें होईपर्यंत करावें. तयार झालेल्या पट्टीच्या कडेस दुसर्या पट्टीची डामरी खडी पसरण्यापूर्वी पातळ डामर लावावें. म्हणजे दोन पट्टयांच्या सांध्यांत खडीचा एकजीव होऊन ती आवळून बसेल. ऊन येण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं या प्रकारची जमीन करावी. जेथें रहदारी विशेष आहे अशा ठिकाणीं ही जमीन फार दिवस टिकत नाहीं. कमी महत्त्वाच्या इमारतींत डामरी खडीची जाडी ३ इंच ठेवावी.

मिंटनच्या चपट्या कौलांची जमीन:- ही करतांना कांक्रीटचा थर तयार करून त्यावर चुन्याच्या गिलाव्याची साफ चट द्यावी. गिलावा दोन तीन दिवस तसाच राहूं देऊन मग त्याचा पृष्ठभाग पाणसळींत आणावा. व अशा पृष्ठभागावर मिंटनची किंवा त्याच जातीचीं कोणतीहि कौले पोर्टलंड सिमेंटांत बसवावीं. प्रत्येक १०० चौरस फूट कौलांस पोर्टलंड सिमेंट सुमारें पाऊण पीट (सुमारें ३ घनफूट) लागतें. सर्व फरशी तयार झाल्यापासून १० दिवसांच्या आंत धुवून स्वच्छ करावी. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस २२२ रू. आहे.

टाईल स्कार्टिंग:- हव्या त्या रंगांची मिंटनची किंवा साध्या किनारीचीं कौलें गिलाव्याच्या पृष्ठभागापासून बाहेर पाव इंच येतील अशीं पोर्टलांड सिमेंटांत बसवितात.

ज मी नी.- मद्रासेकडे ४ ते ५ इंच जाडीचें चुन्याचें कांक्रीट करून तें चांगलें ठोकून मजबूत झाल्यावर त्यांवर पाऊण ते दीड इंच जाडीचें सिमेंटकांक्रीट करून घासून मऊ करतात. सिमेंट कांक्रीट करावयाचें तें कठिण दगडाचा बारीक चुरा १/८ ते १/२ जाडीचा २॥ ते ३ भाग घेऊन व त्यांत १ भाग सिमेंट घालून तयार करतात. आणि खालचें चुन्याचें कांक्रीट आळून कठिण होण्याच्या पूर्वी ४ ते ८ फूट रुंदीच्या सिमेंट कांक्रीटच्या पट्टया करतात. आणि हें सिमेंटकांक्रीट टाकल्याबरोबर ५ पौंड वजनाच्या लांकडी थापीनें लागलीच ठोकून घेतात. अशा १० ते १५ मिनिटेंपर्यंत ठोकल्यानें सिमेंट वरील बाजूस तरून आलें पाहिजे. सिमेंट हें भिजविल्यापासून आळावयास सुरवात होते म्हणून असें सिमेंट कांक्रीट भिजवून टाकल्यापासून १५ मिनिटांनंतर बिलकुल ठोकतां कामा नये. ठोकण्यानें तरून वर आलेलें सिमेंट करणीनें चोळून सर्व जमीन सारखी गुळगुळीत करतात. वर सांगितलेल्या ४ किंवा ८ फुटी पट्टयांच्या बाजूंनां साधे राहण्यासाठीं म्हणून उभ्या लोखंडी किंवा लांकडी चिपा, त्यांनां सफेती देऊन बसवितात. आणि अशी सिमेंट कांक्रीटची जमीन आवळून कठिण झाली म्हणजे ह्या लांकडी किंवा लोखंडी चिपा उपसून काढतात. आणि त्यांची जागा १ भाग सिमेंट व दोन भाग रेतीच्या मिश्रणानें भरून काढतात. अशा जमिनीला रंग देणें असेल तर सिमेंट कांक्रीटच्या अगदीं वरच्या थरांत दर घनफूट कांक्रीटास एकद्वादशांश घनफूट आक्साईड ऑफ आयर्नची पूड किंवा गेरू अथवा कांव घालतात. म्हणजे जमीनीस तांबडा रंग येतो. पिंवळसर रंग पाहिजे असल्यास दर घनफुटांस एकषोडषांश घनफूट इतकी पिंवडी घालावी. अशी जमीन घोटून गुळगुळीत केल्यानंतर तिच्यावर गवत व रेती किंवा लांकडाचा भुसा सुमारें २ इंच जाड पसरून ७ ते १४ दिवसपर्यंत जमीन पाणी शिंपून सर्व काळ भिजलेली राहील अशी व्यवस्था करतात.

जमीन योग्य खोलीपर्यंत खणून तळाचा पृष्ठभाग सांधणीत आणून चोपडल्यानंतर त्यांवर ३ इंच जाडीचा वाळूचा थर पसरावा व त्यावर आडव्या विटांचा १ थर चुन्यांत बसवून त्यावर कोरावर ठेवलेल्या विटांची वीटबंदी करावी. विटांच्या रचनेंत ओळी समांतर किंवा एकमेकांशीं काटकोनांत असाव्या. कित्येक ठिकाणीं जमीन चोपून वाळूचा थर न घालतां त्याच्या ऐवजीं कांक्रीटचा ६ इंच जाडीचा थर देऊन त्यावर वरीलप्रमाणें कोरावर ठेवलेल्या विटांची वीटबंदी चुन्यांत करतात. विटा उत्तम व भाजलेल्या असून बसवितांना त्याचे सांधे घांसावे. सांध्याची जाडी तीनअष्टमांश इंचापेक्षां अधिक नसावी. विटा चुन्यांत बसविण्यापूर्वी चांगल्या भिजवाव्या.

सिमेंट कांक्रीटची जमीन:- जमीनीचा तळ सांधणीत आणून चोपल्यानंतर त्यावर ठोकून ६ इंच जाडीचा होईल असा सिमेंट कांक्रीटचा थर पसरून लांकडाच्या धुमसानें लागोपाठा ३ दिवस ठोकावा. कांक्रीटांत ८ भा खडी. ३ भाग नदीची वाळू व १ भाग पोर्टलंड सिमेंट असावें. वाळू स्वच्छ व कठिण असावी. खडी १॥ इंच व्यासाच्या बांगडीतून जाईल अशी चौरस फोडलेली असावी. पहिल्यानें वाळू व सिमेंट मिसळून मग त्यांत खडी घालून सर्व चांगले कालवावें. व पाहिजे तेवढ्या जाडीचा थर पसरून त्यावर धुमस करावा. पाण्याचा होईल तितका उपयोग करावा. या चांगला ठोकल्यानंतर त्यावर सिमेंटची पातळ चट देऊन घोटावी व तिच्या पृष्ठभागावर गवत पसरून तें १० दिवस ओलें ठेवावें.

ज्या ठिकाणी अशा कोणत्याच प्रकारचें साधन नसते. त्याठिकाणीं चुनेगच्चीची जमीन करतात. ही करतांना वर सांगितल्याप्रमाणें रेती पसरल्यावर त्यावर विटांचा एक थर पसरतात. व त्यानंतर त्यावर ६ इंच जाडी विटांचा चुरा पाऊण इंचाच्या चाळणींतून जाईल इतका बारीक पसरून त्यावर साध्या चुन्याची फकी २ इंच जाडी होईल इतक्या बेताने पसरतात व फावड्यानें किंवा खोर्यानें ती दोन्हीं मिसळवी म्हणजे त्यावर पाणी शिंपडून व खोर्यानें ती दोन्ही मिसळली म्हणजे त्यावर पाणी शिंपडून व खोर्यानें वरखाली करून त्याचा जीव त्याचा एकजीव होईपर्यंत मिसळतात व नंतर लोखंडी घुमसानें ठोकून हा सहा इंचांचा थर दाबून चार इंच झाला  म्हणजे थापेनें ठोकून तो कठिण व गुळगुळीत करतात व नंतर दोरी जाडीच्या मळलेल्या चुन्याचा थर करून त्यावर थापेने ठोकतात व नंतर त्याचा पृष्ठभाग करणीनें घांसून अगदीं गुळगुळीत होईपर्यंत घोटतात व सर्व पृष्ठभाग सारखा एका पातळींत व कठिण झाला म्हणजे त्याच्यावर चटया घालून किंवा रेती पसरून सर्व पृष्ठभाग बरेच दिवस ओला राहील इतका भिजवून ठेवितात.

वर सांगितलेल्या बहुतेक प्रकारच्या जमीनी तळमजल्याला त्याचप्रमाणें वरच्या मजल्यालाहि उपयोगी पडण्यासारख्या असतात. परंतु भार कमी व्हावी म्हणून लांकडी फळ्यांच्या जमीनी, वरच्या मजल्यासाठीं काहीं काहीं ठिकाणीं वापरतात. तुळ्यांवर कड्या घालून त्या कड्यांनां वरच्या बाजूनें १ इंचापासून १॥ इंच जाडीचा स्क्रू पिळून बसवितात. अशा नुसत्या फळ्यांच्या जमीनी वरून माणसें चालत असता आवाज फार करतात व त्यांच्या सांध्यांतून ठोकून, मुंग्या वगैरे बसावयास जागा सांपडते. ह्या कारणास्तव अशा फळ्यांस किंवा रिफाडावर मुरमाची जमीन करतात किंवा कांक्रीट घालून गच्चीची जमीन करतात.

ज्या ठिकाणीं ओल असेल अशा जागीं तळमजल्याच्या जमिनीच्या खालीं हवा खेळेल अशा बेतानें नऊ इंच समचौरस असे चर एका भिंतीपासून दुसर्या भिंतीपर्यंत राहतील अशा कमानी करतात. किंवा पालथ्या कौलांचे थर घालून किंवा नळ घालून हवा आंत खेळेल अशी तजवीज करतात. अशा भिंतींतून बाहेर निघणार्या नळांची तोंडें जाळी लावून बंद करतात, किंवा आसफाल्ट नांवाचें एक प्रकारचें डामर मिळतें त्याचा थर सर्व जमीनीला भिंतीच्या बाहेरच्या बाजूपर्यंत देतात म्हणजे त्यांतून आलहि वर येऊं शकत नाहीं व वाळवीहि लागूं शकत नाहीं.

सु ता र का म.

सुतारकाम म्हणजे लांकडाचे वेगवेगळे हे तुकडे जोडून चौकट, तिकट, वगैरे आकाराचे करावे लागतात, आणि त्यांवर येणारा भार किंवा जोर सहन करण्याइतके मजबूत सांगाडे तयार करणें हें होय (१) यांत घरांवरील कौलार वगैरेंचा भार सहन करणार्या कैच्या व (२) त्यांवरील आढें, (३) पाखाड्या वगैरे जोडणें, (४) बहालें व (५) त्यावरील कड्या, (६) कडीपाट ही जोडून त्यावर व चुन्याची गच्ची किंवा मातीचें माळवद किंवा धाबें किंवा वेगवेगळ्या मजल्याची जमीन करतां येईल असा मजबूत सांगाडा तयार करणें आणि पुलाच्या दगडी किंवा विटांच्या वगैरे कमानी बांधतांना त्या तयार होईतोंपर्यंत त्यांचा भार सहन करण्यासाठी (७) ते लांकडें जोडून कमानींच्या आकाराचें सांगाडे तयार करतात ते करणें इत्यादि कामाचा अंतर्भाव होतो. (८) तद्वतच लांकडी चौकट तयार करून तींत अर्ध्या विटेची पडदी खालील बहालावर राहील अशा पडद्या, किंवा अशाच चौकटींना फळ्या जोडून तयार करावयाच्या (९) लांकडी पडद्या, तसेंच (१०) दरवाजें (११) खिडक्या वगैरेंच्या चौकटी व त्यांची दारें व झडपा,(१२) लांकडी जिने वगैरें कामें ही इमारतीसंबंधांत येतात. या खेरीज लांकडांच्या कैच्या करून त्यांवर आडवीं बहालें कड्या घालून व त्यावर खडी, मुरूम घालून लांकडी पूल तयार करतात त्यातहि सुतारकाम असतेंच. तसेंच पुलाचे पाय वगैरे घालावयाच्या वेळीं पायाच्या लांबी-रुंदीइतकी मोठी लांकडी चौकय तयार करून व तिच्याभोंवती फळ्या ठोकून आंत पाणी व वाळू न येईल अशा रीतीनच्या मोठाल्या पेट्या तयार करतात, त्यांनांहि सुतारकाम असतेंच. सुतारकामांत छप्पर, तक्तपोशी, व्हरांडा, जिने, दरवाजे, व खिडक्यांच्या चौकटी, लांकडी पूल, (१५) लांकहक्ष कलबुतें, (१६) कापरड्याम्स (पायासाठीं कराव्या लागणार्या पेट्या), (१७) विहिरीचीं कडीं व (१८) पायांच्या उभ्या बाजू ढासळून पडूं नयेत म्हणून बसवावे लागणारें टेपे, धीरे (१९) कंपाऊंडांतील फाटकें व ३ चौरस इंचांहून ज्याच्या रूंदीचें व जाडीचें क्षेत्रफळ अधिक व ज्यांत विशेष नक्षीचें काम नाहीं अशा सर्व लांकूडकामाचा समावेश करतात. लांकडाची जाडी २ इंचांहून अधिक नसून रुंदी जाडीच्या दुप्पट असली तर त्यांच पाटल्या किंवा तक्ते म्हणतात. लांकडी सामान (फर्निचर) दरवाजे किंवा खिडक्यांच्या प्यानेलच्या झडपा, कांतीव खोदीव सर्व प्रकारच्या नक्षीकामाचा समावेश जडकामांत किंवा सांधकामांत (जायनर वर्क्स) करतात.

सुतारकामाचा दर प्रत्येक घनफुटावर आकारतात. परंतु पाटल्यांचा किंवा तक्त्यांचा आकार मात्र त्यांच्या जाडीच्या मानानें प्रत्येक चौरस फुटावर किंवा नियमित रुंदी व जाडीच्या पाटल्यांच्या लांबीवर आकारतात. दरवाजे, खिडक्या, व याच प्रकारचें दुसरें काम व प्यानेलच्या कामाचा दर चौरस फुटावर आकारतात. महत्त्वाच्या सुतारकामासाठीं बहुतेक सागवानी लांकडांचा उपयोग करतात. सागवानी लांकूड उत्तम प्रतीचें व मुरलेलें असावें. उपयोग करण्यापूर्वी त्याची तोड होऊन निदान दोन वर्षे तरी झाली पाहिजेत. त्यांत भेगा, भुंगीर, उन्हळ, चीर, गांठीं व इतर प्रकारचें कोणतेंहि व्यंग नसावें. लांकडाचा पृष्ठभाग रंधून साफ करणें, सांधे करून त्यांचा जुवा बसविणें कैच्या भरणें, कोनानां चप मारणें, अनेक प्रकारच्या चौकटी करणें खिळे, स्क्रू व रॉड बसविणें. तसेंच इमारतींत, पुलाच्या कलबुतांत व दुसर्या कोणत्याहि कामांत लांकूड जाग्यावर उभें करणें, बसविणें, वगैरें सर्व प्रकारचें काराभिरी काम चांगल्या रीतीनें केलें पाहिजे. पाचरा व गाभाड्या घातल्याशिवाय सांधे बरोबर जुळून बसावे. व कळाशीं चांगली असावी पाटल्यांच्या किंवा तक्त्यांच्या बाजू गुण्यांत असून त्यांस ठेप, पालवान, चरपट्टी, खोबण व दाते यांतून कोणत्याहि प्रकारचे सांधे करणें. वगैरे गोष्टी सुतार कामांत महत्त्वाच्या आहेत. लांकडाचें माप बरोबर घेऊन त्यावर सुतारकामाचा आकार करतात. घस व तुटीबद्दल लांकूड आकारांत धरीत नाहींत. प्रत्येक तुकड्याची लांबी मोजतेवेळेंस कुसांची, पालवांची व लांकडांचा जो भाग इमारतीत किंवा तिच्या बाहेर गेला असेल त्याचीहि लांबी धरावी. शाठे व चौकट जुडाई करून बसविण्याच्या कामांत रंधणें, सांधे करणें, चौकटी भरणें, चौकटी व साठ्यासाठी लागणारे बोल्ट, पट्टया, खिळे लांकडाच्या सांध्यांतील खुंट्या, वगैरे उत्तम रीतीनें बसविले पाहिजेत. लांकडांचा जो भाग बांधकामांत राहील त्यास पातळ डामर कढवून लावावें. चूल किंवा धुराड्यापासून दोन फुटांच्या आंत लांकूडकाम असूं नये.

कैच्या वगैरे करतांना वेगवेगळे तुकडे जोडावयाच्या वेळीं वेगवेगळ्या प्रकारचे सांधे करावे लागतात. नेहमीं प्रचारांत येणारा सांधा म्हटला म्हणजे एका लांकडाला कुसूं पाडून तें दुसर्या लांकडाला बरोबर कुसाच्या आकाराची खोवण करून त्यांत बसविणें हा होय

जेव्हां लांकडाचे दोन तुकडे एकमेकांशीं आडवे जोडावयाचे असतील त्यावेळीं प्रत्येक तुकड्याच्या जाडीपैकीं अर्धी जाडी खांचून ते एकमेकांत बसवितात. ज्यावेळीं दोन तुकडे जोडून त्यांचा काटकोन करावयाचा असेल त्यावेळीं विशिष्ट प्रकारचा सांधा करतात. जेव्हां लांकडाचें दोन तुकडे एका सरळ रेषेंत जोडावयाचें असतील त्यावेळीं ''वसल्याचा'' सांधा (स्कार्फ जाईंट) करतात याच्या चढावाचा, टाळीचा, फांसाचा व निमुळता अशा चार जाती आहेत. या सांध्यांत प्रत्येक लांकडाचा सारखाच भाग खांचून व त्यांचा एकमेकांवर चढाव करून एकमेकांत बसती करतात. कैच्या तयार करतांना वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचें सांधे करावें ते एन्जीनिअरच्या नकाशांत दाखविलेलें असतें. त्यांतच लोखंडी पट्टया कोठें कोठें, कोणकोणत्या आकाराच्या व कशा बसवाव्या हें दाखविले असतें. सांध्याचें स्वरूप त्यावर येऊन पडणार्या वजनाकडे लक्ष देऊन निश्चित होतें. जेथें जोडून लांबविलेल्या बहालावर तक्तपोशींचें वजन यावयाचें असेल त्यावेळी त्या बहालांतील सांधा जेव्हां त्याच लांकडावर नुसतें दाबण यावयाचें असेल किंवा नुसती खेंचाई यावयाची असेल त्यावेळीं जसा सांधा करतात त्याच्यापेक्षां वेगळ्या प्रकारचा सांधा करावा लागतो. आणि असे सांधे करतांना लांकडाची जितकी जाडी असेल त्याच्या सहापट लांबीचा तो सांधा असावयास पाहिजे, पण जर बोल्ट घालून त्यास मजबुती आणली असेल तर सांध्याची लांबी तिप्प केली तरी चालते. दोन्हींहि तुकड्यांची लांबी कमी न करतां सांधा करावयाचा असल्यास तसाहि करतां येतो. दोन लांकडांचा दोन लांकडाचा सांधा करतात तेव्हां त्याच्या सांध्याच्या बाहेरच्या दोन्ही बाजूंला लाफे जोडून तो करण्यास हरकत नसेल तेव्हां ती युक्ती अमलांत आणली जाते. हे सांधे मजबूत करण्यासाठीं जेव्हां जेव्हां बोल्ट बसवितात तेव्हां तेव्हां त्या सर्व बोल्टांच्या छेदाचें एकंदर क्षेत्रफळ जोडावयाच्या लांकडाच्या छेदाच्या क्षेत्रफळाच्या पंचमांशापेक्षां कमी नसावें.

कैच्या.- छपरासाठीं जेव्हां लोखंडी कैच्या वापरतात तेव्हां त्यांची उंची गाळ्याच्या पंचमाशांइतकी ठेवतात. म्हणजे दोन्ही पाख्यांनां फुटास ४॥। संच इतका ढाळ मिळतो. २० फुटांची कैची असल्यास तिची उंची ४ फूट; ४० फुटांची असल्यास ८ फूट; ६० फुटांची असल्यसा १२ फूट असतें. अशा कैच्या ६/६ फूट अंतरावर ठेवल्या तर ज्यांवर पाखाड्या बसवितात त्या मुख्य वाशांचें माप २० फूट गाळ्याला २ x २॥ x १/४  इं. या मापाची, जिचा छेद इंग्रजी 'टी' (T) अक्षराच्या आकाराचा होईल अशी पट्टी; ४ फूट गाळ्यास ३।   ४ इंचाची टी आकाराची व ५० फूट गाळ्यास ३॥। x ४॥। x  ७/१८ इंचाची टी आकाराची पट्टी असते. यांचे तीर २० फूट गाळ्यास १। x १॥ x १/४ इंच या मापाची व ४० फूट गाळ्यास २॥ x ३ x ३/४ या मापाची ''टी'' व कैचीच्या तळाचा टायरॉड म्हणजे कैचीच्या तुळईच्या ऐवजीं ओ गज घालतात तो २० फूट गाळ्याला पाऊण इंच जाडीचा गज; ४० फूट गाळ्याला १। इंच जाडीचा व ५० फूट गाळ्याला १॥ इंच जाडीचा गज वापरतात, मधले स्तंभरूपी उभे गज असतात त्यांची मापें २० फूट गाळ्याला पाचअष्टमांश इंच; ४० फूट गाळ्याला १ इंच; व ५० फूट गाळ्याला १। इचं, व मधल्या स्तंभाच्या दोन बाजूलां पांच पासून ७ फूट अंतरावर जे उभे गज असतात ते ४० फूट गाळ्याला ।।। इंच व्यासाचे व ५० फूट गाळ्याला १ इंच व्यासाचे असतात. ह्यांच्याहि बाहेरल्या बाजूला ६/७ फूट अंतरावर ५० फूट गाळ्याच्या कैचीला .॥।. इंच व्यासाचे गज असतात.

ह्या सर्व कैचांचे टायरॉड म्हणजे खालचे आडवे गज सरळ रेषेंत नसतात. मध्यें ''उपेट'' दिलेला असतो. हा उपेट २० गाळ्याच्या कैचीला ६ इंचांचा, ४० फूट गाळ्याच्या कैचीला १२ इंचांचा व ५० फूट गाळ्याच्या कैचीला १५ इंचांचा असतो. ह्या कैचीचें साधारण रूप व त्यांचे सांधे कसे करावयाचें हें नकाशांत दाखविलेलें असतें.

वारा नेहमीं आडवा वाहात असल्याकारणानें भिंतीसारखा उभा पृष्ठभाग असेल त्यावर दर चौरस फुटास ४० पौड इतकाहि दाब मोठ्या तुफानाचें वादळ होतें. त्यावेळेस पडतो. गच्चीसारखा क्षितिजाच्या समपातळींत म्हणजे लेव्हलमध्यें असणारा पृष्ठभाग ह्यावर तो बहुतेक पडतच नाहीं, परंतु कौलारू किंवा पत्र्याच्या छपराला २५ पासून ३० अंशांपर्यंतचा ढाळ असल्याकारणानें ह्यांवर दाब दर चौरस फुटास ७ पासून ८ पौंडाचा येतो असें हिशेबांत धरतात. छपरावर पातळ स्लेटी घातल्या तर त्यांचा भार दर चौरस फुटास सुमारें ८ पौंड, पत्रे घातले असते तर दर चौरस फुटास २ पासून २॥ पौंड, साधीं एकेरी कौलें घातली तर दर चौरस फुटास १२ पौंड, व दुहेरीं घातलीं तर दर चौरस फुटांस २६ २७ पौंड इतकें वजन येतें. साधारणतः कैच्या, पाखाड्या, वगैरे काय मापाच्या घालाव्या हें काढतांना दर चौरस फुयावर वजन सुमारें ४० पौंडापासून ७० पौंडापर्यंत येईलअसे हिशेबांत धरतात. म्हणजे त्यांत तुफानाच्या वार्याच्या वेळी पडणारा दाबहि येऊन जातो. व छप्पर तयार करावयाच्या वेळीं व नंतरहि कांहीं माणसें चढलीं तरी त्या सर्वांचाहि भार असें छप्पर सहज रीतीनें सहन करूं शकतें.

दुहेरी कौलें छपरावर घातलेली असलीं म्हणजे त्यांचा भारच इतका असतो कीं, ती मोठ्या वार्यांतहि उडून जाण्याचा संभव नसतो. परंतु छपरावर पत्रे घातलेले असले म्हणजे मात्र ते पत्रे खालच्या लांकूडकामाला व भिंतीला पक्के खिळून टाकलेले नसले तर मोठ्या वार्यांत उडून जातात. ते उडून जाऊं नयेत म्हणून पाखाड्यांनीं हुक-बोल्टानें किंवा स्क्रूने खिळवून टाकतात. जेथें अतिशय वारा असतो व भिंतीवर व लांकडी पाखाड्या बसविलेल्या असतात त्या ठिकाणीं पाखाड्या सुद्धां पत्रे उडून जाऊं नयेत म्हणून अशा पाखाड्यांच्या खाली १॥ किंवा २ फूट अंतरावर भिंतीमध्यें लोखंडी बोल्ट बसवितात व अशा बोल्टांनां वरची पाखाडी बोल्टानें किंवा पाव इंच जाडीच्या पट्टीनें खिळून टाकतात.

घरांतील तापलेली हवा बाहेर निघून जावी म्हणून मार्ग ठेवतात. व त्यातूंन पाखरें वगैरे येऊ नयेत म्हणून त्यास जाळी लावतात. अशा ठिकाणीं आढ्यापाशी छपराची रचना कशी करावयाची हें नकाशांत दाखविलेलें असतें. छपरावर मंगलोरी कौले घातलेली असली तर अशी हवा निघून जाण्यासाठी बनविलेली कौलें (व्हेटिलेटिंग टाईल) मिळतात. ती जितकी आढ्याच्या जवळ बसवितां येतील तितकीं बसवावींत त्यांच्याखालील फळ्यांनां गिरमिटानें भोंकें पाडावीं.

छप्पर ज्या वेळीं गच्चीचेंच असेल त्यावेळीं त्याच्या खालीं पाटणी असल्यामुळें तेथें छताची जरूर पडत नाहीं. परंतु जेथें कौलारू असेल तेथें खालचा भाग सगळा सारखा करण्यासाठीं अर्धा इंची किंवा पाऊण इंची सागवानी फळ्यांचें खत करतात. या छताच्या फळ्या सहा इंचांपेक्षां तितक्या कमी रुंदीच्या असतील तितक्या चांगल्या. या फळ्या बसवितांना छपराला जो ढाळ असेल त्या ढाळाला लागूनच या फळ्या बसवितात किंवा ज्या ठिकाणीं कैच्या १०/१२ फुटांपेक्षां जास्ती उंचीवर बसविल्या असतील त्या ठिकाणीं कैचीच्या खालच्या तुळ्यांनां २ ते ३ फूट अंतरावर आडवीं लांकडें जोडून अशा लांकडांना छताच्या फळ्या जडतात. जेव्हां नुसत्या पत्र्याचेंच छप्पर असेल तेव्हां घरांच्या आंतील भाग फारच तापतो. अशा वेळीं ह्या फळ्यांच्या छताची फार आवश्यक असते.

कधीं कधीं छपराच्या कैच्या बसवून त्यांवर पाखाड्या व वासे घालून त्या रिपांवर १२ इंच x १२ इंच व १॥ इंच जाडीच्या भाजलेल्या मातीच्या फरशा किंवा शहाबादी फरशा चुन्यांत बसवितात आणि त्यांवर ३ इंच जाडीचें, चुना व जाडी रेतीचें कांक्रीट करून ठोकून जास्ती ढाळ असलेली गच्चीच तयार करतात. अशा प्रकारचें छप्पर हलकें असून पुष्कळ दिवस टिकतें. पण तें तापल्याच्या योगानें उन्हाळ्यांत त्रासदायक होतें व खेरीज तें गळण्याचाहि संभव असतो.

जेथें पाऊस फार पडतो अशा ठिकाणीं छपराच्या कैच्यांवर पाखाड्या ठोकून त्यावर फळ्या जडतात. व अशा फळ्यांवर जस्त चढविलेलें पत्रे किंवा कौलें घालतात. अथवा त्यांच्याऐवजीं आसफाल्टचा पातळ थर बसविलेल्या फळ्यावरून देतात. किंवा कधीं कधीं वर १॥ इंची फारशा सांगिलेल्या आहते तशा फरशांवर असा थर देतात.

अलीकडे सिमेंट व असबेस्टॉस नांवाचा बाखांडीसारखा तंतुमय शुभ्र रंगाचा अदाह्य खनिज पदार्थ मिळतो त्या दोहोंचें मिळून एक दोरीपासून तीन दोरीपर्यंत जाडीचे चार फूट रुंद व आठ फूट लांब ''इटनिंट'' किंवा यासारख्याच नांवाचें पत्रे बनविलेले असतात. त्यांचा रंग भुरकट किंवा तांबडश असतो. त्याचें वजन हलकें असतें, त्यांनां तडा फडत नाहींत व ते अदाह्य असतात. असे पत्रे छपरावर घातले असतां खालच्या बाजूला लोखंडी पत्र्यांच्यापेक्षां उष्णताहि कमी भासते.

खादीसारखें २/३ फूट पन्हाचें भरड कापड घेऊन त्याच्या दोन्हीं बाजूंनां बेलतेलांत भरड रेती व खडूची पूड आणि थोडें मुरदाडशिंग मिसळून त्यांचा चांगला रांधा करून त्याच्या सुमारें १॥ ते १॥ दोरी जाडीचा थर करतात. व अशा कापडाच्या लांबचलांब वळकट्या पाव इंचापासून तीनअष्टमांश इंच जाडीच्या लांबचलांब पट्टया करून त्या पट्टया, फळ्या ठोकलेल्या छपरावर आढ्यापासून पागोळ्यापर्यंत पसरतात. व त्यांचे सांधे झांकण्यासाठीं ६/६ इंच चढाव येईल, अशा रीतीनें पट्टया पसरतात. व त्यांचे सांधेहि तशाच प्रकारच्या लुकणानें जडतात.

अशाच प्रकारच्या पट्टया बुरणुसा (फेल्ट) डामरासारखा पदार्थ लावूनहि तयार करतात. व कांहीं कांहीं पट्टया असबेस्टॉस तयार करून त्याला डामराचें मिश्रण लावून त्यांत पाणी न जिरेल अशा रीतीच्या करतात व त्याहि वर सांगितल्याप्रमाणेंच वापरतात.

छपरावर घालण्यासाठीं सध्यां जस्त चढविलेलं व नागमोडीसारखे वळविलेले लोखंडी पत्रे वापरतात. हे जसे नागमोडीसारखे वळविल्याच्या योगानें जितका जाडी पत्रा गाळ्याला सुद्धा वापरतां येत नाहीं. तितक्याच जाडीचा पत्रा ३/४ फूट गाळ्याला वापरतां येतो. म्हणजे ३ किंवा ४ फूट अंतरावर पाखाड्या बसवून त्यांवर पत्रे बसविलें व त्यांवर माणसें चाललीं तरी सुद्धां ते दबत नाहींत. हे पत्रे बहुतकरून २६ इंच किंवा ३२ इंच रुंदीचे व ६ पासून १० फूट लांबीचे असतात. २६ इंची जे पत्रे असतात त्यांनां ८ नळ्या पाडलेल्या असतात व ३२ इंची जे पत्रे असतात त्यांनां ८ नळ्या पाडलेल्या असतात व ३२ इंची असतात त्यांनां ३/३ इंच रुदीच्या १० नळ्या पाडलेल्या असतात. हे पत्रे पातळांत पातळ म्हणजे २४ गेजचे व २६ इंच रुंदीचे असले म्हणजे दर रनिंग फुटात २॥ पौंड वजनांत भरतात. ६ फूट लांबीचें पान १६॥ पौंड भरतें व १० फूट लांबीचें पान सुमारें २७॥ पौंड भरतें. हींच पानें जर ३२ इंच रुंदीचीं असलीं तर ती फुटास ३। पौंड वजनांत भरतात म्हणजे ६ फूट लांबीचे पान १९॥ पौंड व १० फट लांबीचें असल्यास ३२॥ पौंड भरतें. ह्यांच्यापेक्षां जाडी पत्रा वापरणें झाल्यास २२ गेजचा, ह्याच्यापेक्षां जाडी म्हणजे १८ गेजचा. ह्याच्यापेक्षां जाड पत्रे छपराच्या कामास वापरीत नाहींत २४ गेजचे पत्रे म्हणजे अगदीं हलक्या म्हणजे तात्पुरत्या कामासाठी वापरतात. कायमच्या म्हणजे पुष्कळ दिवस टिकणार्या कामाला २० गेजचे पत्रे वापरणें चांगलें. येवढ्या जाडीचें वापरण्याची ऐपत नसेल तर निदान २२ गेजचे तरी वापरावे. १८ गेजचे पत्रे हे २४ गेजच्या पत्र्यापेक्षां जाडीला जवळजवळ दुप्पट असतात म्हणजे २६ इंच रुंदीच्या पत्र्याचें वजन ५१ पौंड असतें व ३२ इंच रुंदीच्या पत्र्याचें वजन दर फुटास ६। पौंड असतें. हेच पत्रे २० गेजचे असल्यास अनुक्रमें ४। पौंड व ५ पौंड वजन व २२ गेजचे असल्यास अनुक्रमें ३ व ४ पौंड वजन असतें हे पत्रे विकत घेतांना त्यांची कोणत्या गेजचीं, किती लांबीचीं व किती रुंदीची किती पानें एका टनांत भरतात हें पुढील कोष्टकांत दाखविलें आहे.

लांबी फूट रुंदी २६ इंच व गेज
नंबर१८, नंबर २०,  नंबर २२, नंबर २४,
७२ ९५ ११६ १४०
५४ ७१ ८७ १००
१० ४३ ५७ ६९ ८४
रुंदी ३२ इंच व गेज
६२ ७९ ९७ ११७
४६ ५९ ७३ ८८
१० ३७ ४७ ५८ ७०

हे पत्रे बसवितांना एकमेकांवर ६/६ इंचांचा चढाव करून बसवावे. म्हणजे रुंदीच्या बाजूला दोन नळ्यांचा चढाव करावा व इतर चढाव धरला असतां १०० चौरस फूट छप्पर करण्यास सुमारें १३५ चौरस फूट पत्रें, १ पौंड शिशाचे वायसर १॥ पौंड बुगडीबोल्ट आणि एक पौंड जस्त चढविलेले स्क्रू आणि ३ पौंड लोखंडी बोल्ट वगैरे लागतात.

जस्ती पत्रेहि कधीं कधीं छपरावर घालतात. व त्यांचे वजन १ २/८ पौंडापासून १ ३/४ पौंडांपर्यंत असतें. परंतु ते पत्रे ओले असतां दुसर्या कोणत्याहि धातूचा किंवा चुन्याचा संसर्ग झाला म्हणजे विद्युतप्रवाह सुरू होऊन ते कटले जातात.

शिशाचे पत्रेहि कधीं कधीं छपरावर घालतात. परंतु ते महाग असल्यामुळें दोन बाजूंच्या पाख्यांचें पाणी जेथें एकत्र होतें अशा ठिकाणचीं करावयाची गटारें व जेथें भिंतीला किंवा लांकडाला पाणी बिलकूल लागू नये अशा ठिकाणचीं गटारें शिशांच्या पत्र्यांची करतात. शिशावर हवेचा किंवा अॅसिडांचा किंवा अम्लांचा परिणाम फारसा होत नसल्यामुळें अशीं गटारें फार दिवस टिकात. ह्या गटारांनां ४० फुटांस एक फूट इतका स्लोप साधारण रीतीनें देतात. पण इतका डाळ म्हणजे १० फुटांस ४ इंच देण्याची वाव नसेल तर १० फुटांस निदान १ इंच तरी ढाळ दिलाच पाहिजे. व ही शिशाचीं गटारें बसवितांना खालच्या बाजूच्या पत्र्याला सर्व बाजूंनीं आधारे मिळावा म्हणून १ इंच जाडीच्या फळ्यांचें गटार पहिल्यानें तयार करतात, व त्यांवर दर चौरस फुटास निदान ६ पौंड तरी वजन भरेल इतक्या जाडीचे शिशाचे पत्रे बसवितात. ज्या ठिकाणीं शिसें वापरावयाचें असेल त्या ठिकाणीं १८ गेजचे लोखंडी पत्रे किंवा १६ गेजचे पत्रे वापरतात.

घ र मा थें.- यांचे स्थूलमानानें दोन विभाग करतां येतात. विभाग १ला:- चुनेगची किंवा माती घालून केलेंलें. धाबे किंवा माळवद. यांनां पावसाचें पाणी चटकन निघून जाईल इतकाच ढाळ दिलेला असतो व त्यांचा खालील लांकडी जांगाडा एका सपाटींत केलेला असतो विभाग २रा:- यांत कैच्या घालून नजरेस येईल इतका जास्ती ढाळ खालच्या सांगाड्यास दिलेला असतो. वर नळीचे पत्रे घातलेले असल्यास १५ फुटांस एक फूट इतका कमी ढाळ दिलेला असला तरी चालतो. कौलार असल्यास एक फुटाला ६ इंचांपासून ७ इंच इतका ढळ द्यावा लागतो. यांपैकीं चुनेगची किंवा माळवद ही सोईच्या दृष्टीनें जास्ती उपयोगी पडतात. कारण पाऊस नसेल तेव्हां त्यांचा सामानसुमान टाकण्यास, बसावयास, निजण्यास वगैरे उपयोग करतां येतो. परंतु ही छपरें फार वजनदार असल्यामुळें खालचे खांब, तळ्या वगैरे सर्वच जास्ती जाड व भारी घालवे लागतात. व आंत पाणी मुरून त्याच्या खालील लाकडें कुजलीं तर एकदम पडून अपघात होण्याचा संभव असतो. खेरीज २० फुटांपेक्षा जास्ती गाळ्याची मोठी बहालें मिळावयासहि अडचण पडतें. त्यामुळें मोठ्या गाळ्याच्या गच्च्या करावयाला बरीच अडचण पडते. खेरीज मोठा गाळा केला म्हणजे वर घातलेली चुनेगची किंवा धांबे यांची जाडीहि वाढवावी लागते कारण असें केल्यावांचून पावसाचें पाणी वाहून जावयासाठी जितका ढाळ त्याच्या पृष्ठभागास द्यावयास पाहिजे तितका तो मिळू शकत नाहीं. या त्याच्या जडपणामुळें खालील लांकडी सांगाडा जास्ती भारी लांकडांचा करावा लागतो व त्यामुळे त्यांनां खर्चहि कौलारू छपरांपेक्षां जास्ती येतो.

गच्चीचें छप्पर करावयाचें असल्यास चार फुटांवर बहाले घालून त्यावर ३ इंच जाडीच्या व ३ इंच रुंदीच्या अशा कड्या ९ इंचांपासून १२ इंच अंतरावर बसवितातं व त्यावर तयार झाला म्हणजे त्यावर ४ इंच जाडीची चुनेगची करतात. ही बहालें ७ फूट गाळ्याचीं असल्यास ४ इंच रुंद व ६ इंच जाड असावीं, ९ फुटांची असल्यास ५ इंच x ७ इंच बारा फुटांची असल्यास ६ इंच x ९ इंच असावीं जर बहालें व त्यावर कड्या घालावयाच्या नसल्या तर नुसत्या कड्यांचा एक फूट गाळा असल्यास ३ इंच x ४ इंच च्या कड्या लागतात. ११ फूट असल्यास ४ इंच x ६ इंचाच्या लागतात. गच्चीच्या छपराचें वजन दर चौरस फुटास १०० पौंड असतें. तेंच कौलारू छप्पर असल्यास नळीची दुहेरी कौलें घातलीं तरी १५ पौंडांपेक्षांहि कमी होतें. गच्चीच्या छप्परास उन्हाळ्यांतील प्रखर उष्णता व हिवाळ्यांतील अत्युग्र थंडी ह्यांच्या योगानें तडकून याला भेगा पडतात. व एकदां भेगा पडल्या व छप्पर गळावयास लागलें म्हणजे तें गळणें बंद करणें फार कठिण जातें. छपरांचा दुसरा प्रकार म्हटला म्हणजे कौलारू किंवा लोखंडी नळीचे पत्रे, किंवा (मिळत असतील तेथे) स्लेटी घालणें हा होय, कधीं कधीं छपराला जास्ती ढाळ देऊन गवताचेंहि छप्पर बनवितात. परंतु सहज ठिणगी उडूनहि पेटण्याचा संभव फार असल्यामुळें असें छप्पर घालणें फार धोक्याचे असतें. खेरीज त्यांत साप, विंचू, किडे इत्यादि राहण्यालाहि जागा असतें, पावसानें ते कुजल्यावर वरचेवर बदलावेंहि लागतें. पूर्वी जेव्हां लोखंडाच्या कैच्या करणें प्रचारांत नसे तेव्हा लांकडाच्याच कैच्या करीत असत. त्या कैचा २५-२६ फूट गाळ्यापर्यंत मध्यें एक खांब घालून व खालीं बंदाचें आडवट, दोन बाजूला दोन तीर व माण्याला दोन बाजूला सोट घालून तिकोणी कैची करीत असत. २५ फूट पासून ४० फूट गाळ्यापर्यंत २ खांब घालून सध्यां लांकडी कैच्या बनवितात व यापेक्षां मोठ्या गाळ्याच्या कैच्या करावयाच्या असल्यास लोखंडी कैच्याच सध्यां बनवितात. कैचा लांकडाच्या करावयाच्या असल्यास त्यांची लांकडें काय काय मापाचीं असावी ते पुढें दिलेल्या कोष्टकांत (कोष्टक नं. १ मध्यें) दाखविलें आहे. तसेंच कैच्या लोखंडी असल्यास त्याचें वेगवेगळे भाग काय मापाचे असावे ह्याबद्दलचेंहि कोष्टक (कोष्टक नं. २) पुढें दिलें आहे या बाबतींत इतकें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं कैच्यांचें जें खालचे आडवट असतें त्यावर कैचीखेरीज इतर कोणताहि भार येतां कामा नये. या आडवटांची मापें जी दिलेलीं असतात ती फक्त कैचीवर येणारा भार सहन करण्याइतकींच असतात म्हणून त्यांवर फळ्या टाकून माला करणें किंवा झोपाळा टांगणें किंवा लांकडी खतहि जोडणें धोक्याचें असतें. जेथें कैचीच्या आडवटाचा उपयोग तुळईसारखाच करावयाचा असेल त्या ठिकाणीं तुळईच्या मापाचेंच तें आडवट असलें पाहिजे. म्हणजेच त्यावर माळ्याचा किंवा इतर कोणत्याहि प्रकारचा भार वाटेल त्या ठिकाणीं घालतां येतो.

ज्यावेळी घराच्या चांघया कौलाराला मिळेपर्यंत चढवितात त्यावेळेला दुपाखी छप्पर होतें व त्याच्या वळचणी पुढील व मागील बाजूसच होतात. कधीं कधीं ह्या चांघया कौलाराच्यावर नेऊन त्यांवर चुन्याच्या मुंढेर्या किंवा दगड बसवून त्यांच्या बाजूला कौलारू येऊन लागेल असें करतात. भिंत व कौलारू यांच्या सांध्यांतून पाणी आंत शिरू नये म्हणून चुन्याचें वाटे भिंतीच्या बाजूला लागून करतात आणि त्यांच्या योगानें भिंतीवर पडणारें पाणी ओघळून कौलांवर पडतें. जेथें चारी बाजूला वळचणीचें पाणी पडण्यास हरकत नसेल अशा ठिकाणीं चौपाखी छप्पर करतात. अशा छप्परांच्या चारी बाजूला वळचणींचें पाणी पडतें. व ह्या वळचणी व पाणपट्टया चारीहि एका लेव्हलमध्येंच असतात. व म्हणून घराच्या चारी बाजूंच्याहि भिंती सारख्याच उंचीपर्यंत चढवाव्या लागतात. छप्पर दुपाखी असलें म्हणजे दोन्ही बाजूंच्या सांध्यातून खिडक्या ठेवता येतात. त्यामुळें घरांत किंवा वर माळा असल्यास तेथें जास्ती प्रकाश घेतां येतो. छप्पर दुपाखी असलें अगर चौपाखी असलें तरी त्यांचे क्षेत्रफळ एकच असतें. म्हणून छप्पर

 चौपाखी केलें असतां दोन्ही बाजूंच्या सांध्याच्या तिकोनीइतक्या बांधकामाची बचत होते.

लोखंडी कैचांची मापें, कोष्टक नंबर २ (अ)

परिस्थिति:— सागवानी पाखाड्यांना पाऊण इंच सागवानी फळ्या जोडून त्यांवर मंगळूरी कौलें, वजन दर चौरस फुटांस १५ पौंड, आणि वार्याचा दाब १८ पौंड, स्लोप २ फुटांस १ फूट, टायबार क्षितिजसमपातळींत.

 
जेव्हां टीलोह रुफाच्या कैचीच्या माथ्यासाठीं वापरतात. तेव्हां तें किती टनाचें ओझें किंवा दाब सहन करूं शकेल त्यांची मापें.

कोष्टक नं. २ (आ)
टीलोह आकार इंचांत साहक शक्ति    गाळा फुटांत
(४ फूट) (८ फूट) (१२ फूट)
६×४×१/२ २६टन २२ टन १६ टन
६×३×'' २२ '' १५ '' ०  ''
५×४×'' २४  '' १९  '' १४  ''
५×३×'' २०  '' १४  '' ०  ''
४×४×'' २० '' १४  ''  ०''
४×३×'' १७  '' १२  '' ०  ''
३×३×'' १३  '' ७  '' ०  ''
२×२×१/४ ३॥  '' ०  '' ०  ''
१॥।×१॥।×१/४ २॥  ''  ०  '' ०  ''
१।×१।×३/४ १॥। '' ० '' ०  ''

छपराला आपल्या इकडेस फुटाला ६ इंचांपासून ७ इंच इतका ढाळ देतात. व इतका ढाळ कौलांना किंवा स्लेटींना पुरा होतो. तेंच छप्पर गवताचें असेल तर ढाळ जास्ती देतात. व हा ढाळ दर फुटास ९ इंचांपासून १२ इंचांपर्यंत देतात. ज्या देशांत बर्फ पडतें अशा देशांत कौलांवरून किंवा स्लेटींवरून आकाशांतून पडणारें बर्फ घसरून जावें व छपरावर भार होऊं नये म्हणून इकडच्या पेक्षां जास्ती ढाळ देतात. छपराला ढाळ जास्ती दिला म्हणजे त्याची उंची वाढते. व छपराची जितकी उंची वाढेल तितकी तुफानी वार्यापासून दीड किंवा दोन फूट अंतरावर वळचणीचें पाणी पडेल अशा बेतानें भिंतीच्या बाहेरपर्यंत छपरावरचें आच्छादन (कौलें, पत्रा वगैरे) घातलेलें असतें. असें केल्यानें भिंतीचा व छपराच्या कैचा वगैरे लांकूडकामाचा पावसापासून बचाव होतो. परंतु ज्या ठिकाणीं पुढच्या भिंतीवर शोभेसाठी वरवंडी घालावयाची असेल अशा ठिकाणीं त्या वरवंडीच्या आंतल्या बाजूस शिशाच्या पत्र्याचे किंवा झिलाई चढविलेले चिनी मातीचे अर्धवर्तुळाकृती नळ बसवून त्यांत वळचणीचें पाणी पाडून दोन्ही बाजूंला काढून देतात. मात्र अशा वेळीं ह्या गटारांतील पाणी खाली न उतरेल किंवा न गळेल अशी खबरदारी घेतली पाहिजे. असें करण्यास या गटारांचा स्लोप चांगला दिला पाहिजे व त्यांचें सांधे पाण्याचा थेंबहि न उतरेल असे मजबूत करण्याची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे नाहीं तर खालीं भिंतीवर पाणी उतरून भिंतीची खराबी व्हावयाची. व त्यावर टेकलेल्या कैच्यांचीं टोकें भिजून सडावयाची भीति असते.

कैच्या भिंतीवर ठेवतांना त्यांचा व त्यांच्यावर येणारा सर्व छपराचा भार एकाच ठिकाणी पडूं नये म्हणून कैच्यांच्या खाली ४ इंच जाडीचे व ५/६ इंच रुंदीचे दोनापासून ३ फूट लांबीचें चौरस लांकडांचे तुकडे घालतात. किंवा दगडाचे मोठे पाटथरेहि बसवितात. असें केलें म्हणजे तो सर्व भार भिंतीच्या सगळ्या रुंदीवर व दोन तीन फूट लांबीवर वाटला जातो. असें केलें नाहीं तर सर्व भार एकाच बिंदुवर एकवटल्यामुळें भिंतीला तडा पडण्याचा संभव असतो. कैचीचें मुख्य भाग म्हटले म्हणजे ज्यावर पाखाड्या बसवितात ती छपराच्या ढाळाशीं समांतर बसविलेली दोन जाडीं लांकडें होत. हीं दोन लांकडे कैच्यांचा मधला जो खांब असतो त्या खांबाच्या माथ्याजवळ त्याला दोन्ही बाजूनीं खांचा पाडून बसविलेलीं असतात, त्यांच्यावर येणार्या भारानें ती घसरून जाऊं नयेत व भिंतींनां बाहेर ढकलूं नये म्हणून त्यांचीं खालचीं दोन्हीं तोंडें आवळून धरण्यासाठीं एक आडवें लांकूड घातलेलें असतें. व ह्याच लांकडावर मधला खांब उभा केलेला असतो. हें आडवट व मधला खांब ह्या दोहोंवरहि छपराच्या भाराच्या योगानें ताण पडत असल्यामुळेंच लांकडांच्या ऐवजीं लोखंडी गज घातले तरी चालतात. अशा प्रकारचा ताण पडल्यामुळें मधला उभा खांब खालच्या आडवटापासून सुटून जाऊं नये म्हणून लोखंडाची झोळी घालून ती खांबामध्यें वोल्टानें बसवितात. त्याचप्रमाणें वरचीं दोन्हीं बाजूचीं तिरपीं आडवटें घसरून जाऊं नयेत म्हणून खालच्या एका सपाटींतील आडवटाला खांच्या पाडून त्यांत बसवितात. व या दोहोंचा सांधा जेथें संपतो त्याच्या पलीकडे निदान ९ इंचांची तरी माया खालच्या आडवटाच्या दोन्ही बाजूंस ठेवतात. खेरीज जास्ती मजबुतीसाठीं म्हणून लोखंडाच्या पट्टीच्या झोळ्या करून त्या दोन्हीं तोंडास बसवितात. कैचीचा गाळा जास्ती असेल तर वरचीं तिरपीं आडवटें वांकूं नयेत म्हणून मधल्या खांबापासून दोन तीर देतात. २५ फुटांपेक्षां जास्ती गाळा असेल तर कैचीच्या मधोमध एक खांब न देतां गाळ्याचे तीन विभाग करून दोन खांबांची कैची तयार करतात.

अशा कैच्या ८ पासून १० फूट अंतरावर बसवितात. व त्यांवर ३ फूट अंतरावर चौरस लांकडांच्या पाखाड्या जडून त्यांवर उभ्या फळ्या जडतात. व नंतर त्यांवर कौलें किंवा कैचीच्या प्रत्येक सांध्यावर एक एक जाडी पाखाडी जडून त्या पाखाड्यांवर १। पासून १॥ अंतरावर उभे वासे जडतात व अशा वाशांवर आडव्या फळ्या व त्यांवर कौलें. किंवा फळ्या जडावयाच्या नसल्यास ४/४ इंच अंतरावर दोन इंच रुंद व अर्धा इंच जाड अशा रिपा जडून त्यावर दुहेरी नळीचीं कौलें घालतात. किंवा मंगलोरी कौलें घालावयाचीं असल्यास १॥×१ इंच किंवा २×१ इंच या मापाच्या रिपा एक फूट अंतरावर जडून त्यावर मंगळोरी कौलें बसवितात. फळ्या जोडून मंगलोरी कौलें बसवावयाची असल्यास या रिपा १×॥। इंच या मापाच्या असल्या तरी चालतात. पाखाड्या, आढें, वासे ही वेगवेगळ्या गाळ्याला काय काय मापाचीं असावीत हें येणेंप्रमाणें—

एका कैचीचें छपर
गाळा नं. प्रिन्सिपल प्युरिलिन्स कॉमन रॅफ्टर रिजेस
१२ ३/४ ४/५ २-२॥ २॥-५
३/५ ४/६ १॥.२ २॥-७
२० ४/५ ४/५ २/३ २॥-६
३/७ ५/६ २/३ २॥-८
दोन कैच्यांचें छपर
२८ ४/५ ४/५ २/३ २॥-६
४/७ ४/६ २/३ २॥-७
४० ४/७ ४/५ ३/४ २॥-७
५/८ ५/६ ३/४ २॥-८

      

वॉलप्लेट्स:— कैचीखालीं २ फूट लांब व ६×४ इं. जाड, पाखाड्या व आढें यांच्याखालीं १। फूट लांब ८इं×३ इं. जाड; तरकाखालीं ३ फूट लांब व ८×४ इंच. जाड; वळचणीजवळ २॥×॥।. जाडीची पट्टी; पानपट्टी ६×१ इंच, रिपा २×२। इंचांच्या ४ इंच मध्यापासून मध्यापर्यंतच्या अंतरावर बसवावयाच्या.

मंगलोरी कौलें घालणें असल्यास हीं मापें अर्धा ते एक इंच कमी असलीं तरी चालतात.

छप्पर.— इमारतीचें बांधकाम पुरें झाल्यावर त्यावर आच्छादन म्हणून कौलें घालतात. अशा कौलाराला २५ पासून ३० अंशांइतका म्हणजे दर फुटाला ६ इंचांपासून ७ इंचांपर्यंत ढाळ देतात. नळीचे पत्रे घातले तर त्यांनां ४ अंशांपासून ५ अंशांपर्यंत म्हणजे बारापासून पंधरा फुटांस एक फूट इतका कमी ढाळ देतां येतो. चुन्याची गच्ची केलेली असेल तर तिलाहि २० फुटांत एक इतका ढाळ दिला असतां खालीं पाणी गळत किंवा टिपकत नाहीं. मातीची धाबीं किंवा माळवदें ह्यांनांहि इतकाच ढाळ असावा. गवताच्या छपरांनां कौलारूपेक्षां जास्ती म्हणजे ४५ अंशांचा ढाळ असावा. महाराष्ट्रांत थापटकी किंवा पायपोशी कौलें वापरतात. ह्या कौलांच्या दोन्ही बाजूंनां उंच कांठ असतात व पुढचें तोंड निमुळतें व मागचें तोंड रुंद असतें, व हीं फार लहान असल्यामुळें त्यांत गळती राहण्याचा संभव असतो. गुजराथेंत एकेरी किंवा दुहेरी नळीचीं कौलें वापरतात. ह्यांचीं लांबी १०/११ इंच असते, व मध्यम रुंदी ३ इंच व म्हणून एका चौरस फुटांत सुमारें ११ कौलें लागतात. व दुहेरी घालणें झाल्यास २२ कौलें लागतात. ह्या दोन्ही प्रकारांपेक्षां बेळगांवाकडे खालच्या बाजूचें कौल लांब व चपटें व त्यांचें सांधे झांकणारें कौल नळीचें असें असतें म्हणून तें कौलारू चांगलें होतें. मंगलोरी कौलें मजबूत, टिकाऊ व हलकीं असतात व प्रत्येक कौल चारी बाजूनें आसपासच्या कौलांत अडकेल अशा रीतीच्या खोबणी व धारा त्याला असल्याकारणानें त्याच्यावरून ऊद वगैरे जनावरें गेलीं किंवा पांखरें बसलीं तरी तीं जाग्यावरून हलत नाहींत यामुळें दरवर्षीचा शाकारणींचा खर्च वांचतो. व ती कौलें आकारानें मोठीं असल्याकारणानें प्रत्येक कौल १२ इंच तें ८ इंच इतकी जागा व्यापते म्हणजे दर चौरस फुटाला १। फूट कौल पडतें व यामुळें हीं कौलें जरी महाग असतात तरी चांगल्या इमारतींनां हीं कौलें वापरतात. जेथें नळीच्या कौलांचें कौलार असेल अशा ठिकाणीं देखील मंगलोरी ढापेच आढें झांकण्यासाठीं वापरतात. हे ढापें १५ इंचांपासून १६ इंच लांब व १० इंच रुंद असतात. व ते एकमेकांत गुंतण्यासाठीं त्यांनां खोबणी पाडलेल्या असतात. व त्यामुळें ते एकमेकांत बसविले व खालची धार चुन्यांत बसविली म्हणजे ही ढांच्यांची लाईन सहसा हलत नाहीं व ती एका सरळ रेषेंत व एकसारख्या लाल रंगाची असल्याकारणानें सुशोभित दिसतें. कौलें करण्याची माती ही विटा करण्याच्या मातीपेक्षां जास्ती चिकण असावी लागते, व ती जास्ती कमवावीहि लागते. छपरावर घालण्याच्या मातीचीच चौरस कौलें किंवा फरशा करतात. ह्या फरशा सिंधमध्यें १२ इंच लांब, १२ इंच रुंद व एक इंचापासून २ इंच जाडीच्या करतात.

एकेरी नळीची कौलें दर चौरस फुटास सुमारें ११०० लागतात. त्यांचें वजन सुमारें १३०० ते १४०० पौंड भरतें. दुहेरी कौलाराचें वजन अर्थांत ह्याच्या दुप्पट म्हणजे चौरस फुटास २७ ते २८ पौंड असतें. धाब्या (छपरा)चें वजन दर चौरस फुटास १०० पौंड आणि लोखंडीं गर्डरावर (बहालें) बैठ्या कमानीची पक्की गच्ची केल्यास दर चौरस फुटास १५० पौंड इतकें वजन भरतें.

प्रत्येक मंगलूरी कौलानें १२॥×८। इंच येवढी जागा व्यापिली जाते. व यामुळें दर १०० चौरस फूट कौलारास १५० कौलें लागतात. १००० मंगलूरी कौलांचें वजन २॥ टन भरतें. ती एका गाडीत सुमारें १५० मावतात. ही कौलें कोरडी असतांना सुमारें ५॥ पौंड वजनांत भरतात. आणि पुरी भिजली असतां त्यांचें वजन सुमारें ६॥ पौंड भरतें. मंगलूरी ढांपे लांबीला १६ इंच असतात. आणि त्यांचे वजन प्रत्येकीं ७॥ पौंड असतें. व असे १५० ढांपे गाडींत मावतात. असें ढांपें सिमेंटांट सांधे करून बसविण्यास १०० रनिंग फुटांस ५३ रु. पडतात. मंगलुरी कवलें मोठ्या म्हणजे ५॥ फूट गेजच्या रेल्वे लाईनीवरून नेणें झाल्यास एका १२ टनी डब्यांत ४८०० पासून ५००० जाऊं शकतात. आणि धाकट्या (मिटरगेज) गाडींतून ह्याच्या निम्यानें म्हणजे २५०० अथवा ६ टन एका व्यागनींत जातात. सध्यां (१९२५) मंगलूरी कौलांचा भाव मुंबईस हजारी ७० ते ८० रुपये आणि ढांप्यांचा भाव दर शेंकडा २५ रु. आहे.

दु हे री कौ लां च्या छ प रा चें आ च्छा द न:— नळीचीं कौलें १०×३। इंच इंतक्या मापाचीं व कठिण असून चांगली भाजलेलीं असावी. त्यांत तडे वगैरे दोष नसावेत. ती एकमेकांत ३ इंच जुवा होऊन बसतील अशीं बसवावीं. कवलांचे थर दुहेरी असावे. वळचणीजवळील कौलें चुन्यांत बसवावीं (अशा १०० रनिंग फुटांस १३ रु. पडतांत) किंवा कोरडीं बसवून गजभोंगळी ठोकावी. म्हणजे ती घसरून खाली पडणार नाहींत. आढें व कोणवाशांवरचीं कौलें कोरडी बसवून दरजा भरव्या. कौलांचा उपयोग करण्यापूर्वी ती निदान १२ तास शेणकाल्यांत भिजत ठेवावी. रिफा सागावानी असून २×॥ इंच या मापाच्या असाव्यात व त्या ठोकतांना २ इंच अंतरावर ठोकाव्या. ह्या कामाचा भाव रिफासुद्धां कवलांस सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ५० रु. पडतात. सर्व लांकडें चांगली मुरलेली ब्रह्मी सागाची व निर्मळ रंधलेली असावीं. पाहिजे असेल तर त्यांस ओले रंग किंवा रोंगण (व्हारनीस) लावावें. लाकडांचे जे भाग बाहेर दिसणार नाहींत ते साधारण साफ करावेंत. पण रंधू नयेत. कैच्यांचे सर्व तिरप्या पालवांचे सांधे, कुसें आणि त्यांची भोंकें बरोबर कळाशींत असावीं. कैच्या गर्भापासून गर्भापर्यंत साधारण १० फुटांच्या अंतरावर ठेवाव्या. व तुळ्यांची (टायबीमांचीं) टोकें भिंतींत दगडाच्या फरशीवर किंवा लांकडाच्या ठोकळ्यावर टेकावींत. त्यांचे जे भाग भिंतीत राहतील त्यांस पातळ डामर (कोल्टार) लावावें. पाखाड्या जितक्या लांब मिळतील तितक्या असाव्या व त्यांचे रोड कैच्याच्या मुख्य वांशावर यावेत व ते तिरप्या पालवांच्या सांध्याचें असावे. कैच्या घसरूं नयेत म्हणून त्यांच्या खालच्या बाजूस मुख्य वाशांवर ठोकळें बसवावे. साधारण वासे गर्भापासून गर्भापर्यंत १८ इंचांपेक्षां अधिक अंतरावर असूं नयेत. व मिळाल्यास आड्यापासून वळचणीपर्यंत लांब असल्यास बरे. ते पाखाड्यावर किंवा तोंडकड्यावर खिळे मारून पक्के बसवावे. कैचीला बसवावयाच्या सर्व लोखंडी पट्ट्या व बोल्ट सुबक केलेले असून लाल तापवून तिळाच्या तेलांत बुचकळून काढावे. पडवीला (व्हरांड्याला) असें दुहेरी कौलारू छप्पर करणें झाल्यास पडवीची रुंदी ८ फुटांपेक्षां अधिक असेल तर ज्या मुख्य वाशांवर पाखाड्या टेंकतात, ते ८ फुटांपासून १० फूट अंतरावर असावे. साधारण वाशांचे माथे भिंतीत लग घालून तीवर टेंकावे, नुसत्या भिंतीवर कधीहि ठेवून नयेत. दुहेरी कौलारू छप्पर (साध्या वाशांच्या मोबदला पाखाड्या) ह्यात वळचणीजवळील पाखाडी उचलून धरण्याकरितां कैचीतील मुख्य वाशाच्या मापाचा तुकडा मुख्य वाशाच्या मापाचा तुकडा मुख्य वाशास व टायबीमास बोल्टांनीं जोडून मुख्य वासा वळचणीपर्यंत लांबवितात. मुख्य वाशावर ३॥×५। इंच या मापाच्या पाखाड्या गर्भापासून गर्भापर्यंत ३ फूट अंतरावर साधारण पाखाड्याप्रमाणेंच ठेवतात. पाखाड्यांची लांबी निदान कैच्यांच्या मधील अंतराच्या दुप्पट असावी. पाखाड्यांवर पाऊण इंच जाडीचे सागवानी तक्ते खोबणदात्यांचे सांधे करून आढ्यापासून वळचणीपर्यंत बसवावे. तक्त्यांवर नेहमींच्या पद्धतीप्रमाणें कौले घालावीं. भिंत येईल तेथें तक्ते न घालतां या जागेवरील कौलें चुन्यांत बसवावीं. म्हणजे ती घसरणार नाहींत. वाटेल तर पाखाड्या गर्भापासून गर्भापर्यंत २ फूट अंतरावर बसावाव्या. व त्यांचीं मापें ३।×४॥। इंच असावी. परंतु असल्या छपरास खर्च ३ फुटांवर पाखाड्या असलेल्या छपरांहून अधिक लागतो.

कल्हई केलेल्या नळीच्या लोखंडी पत्र्याचें आच्छादन:— यांस जस्ताची कल्हई केलेले नळीचे लोखंडी पत्रे निकोप व बळकट असून २० ते १८ गेजचे असावे. त्यांवरील बस्ती कल्हई घासून गेलेली नसावी.

छपरावर डामर लावणें:—पाखाड्यांनां किंवा वाशांनां वरून ठोकलेल्या फळ्यांच्या वरच्या पृष्टभागास खडे डामर वितळून लावतात. व तें घट्ट झालें नाहीं तोंच त्यावर जुन्या ताडपत्र्यांच्या बाजू व त्यांचीं टोंकें एकमेकांवर पाणी खाली न गळेल अशीं चढवून ठेवावीं. नंतर खडे डामर व पातळ डामर यांचें मिश्रण ऊन करून या मिश्रणाचा एक हात ताडपत्र्यांच्या पृष्ठभागावर द्यावा. मिश्रण लावतांना चांगलें पसरून घोटून लावावें. गटारास १० फुटांस १ इंच इतका तरी निदान ढाळ असावा. सवड असेल तर अधिक दिल्यास चालेल पन्हळ करतांना वाशांवर तक्ते बसण्यासाठी कांहीं व्यवस्था करून त्यावर तक्त्यांचा पन्हळ बसवितात. पन्हळाची रुंदी तळांत ६ इंचांहून कमी असूं नये. व रुंदीच्या प्रत्येक बाजूस त्याचा भाग कौलांखालीं १२ इंच जावा. व त्यावर दर चौरस फुटास ६ पौंड वजन भरेल अशा शिशाच्या पत्र्याचें अथवा १८ किंवा १९ गेजच्या जस्ती पत्र्याचें किंवा एकषोडशांश इंच लोखंडी कल्हई केलेल्या पत्र्याचें विवक्षित आकाराचें आच्छादन करून बसवावें. शिशाचे पत्रे बसवितांनां तांब्याचे खिळे वापरावे. शिशाचे जस्ती किंवा लोखंडी पत्रे बसविण्यापूर्वी पन्हळाच्या तक्त्यांस डामर लावावें. अशा शिशाच्या पत्र्याच्या गटारांचा भाव दर रनिंग फुटांस ६॥ रु. व लोखंडी पत्र्याचें केल्यास २ रनिंग फुटास १२ रु. पडतात. भिंतींत पाणी पडलें असतां तें भिंत व छपर यांच्या सांधींतून खालीं पडूं नये म्हणून छपराच्या वरच्या बाजूस भिंतीत पत्रा बसवितात. व त्याची बाहेरची बाजू वांकवून खालील कौलांवर किंवा पन्हळांत पडेल अशी व्यवस्था करतात. ह्याकरितां शिशाचा पत्रा दर चौरस फुटास ५ पौंड वजन भरेल असा किंवा १८ गेजचा जस्ती पत्रा भिंत बांधतांना तीत घालतात. किंवा भिंतींत ३ इंच खांचा घेऊन त्यांत आकड्यांनीं व पोर्टलंट सिमेंटांनीं बसवितात. असें केल्यानें भिंतीवरील पाणी या पत्र्यावरून छपरावर पडेल. रुफाच्या गटाराचें पाणी काढून देण्याचे नळ लोखंडी पत्र्याच्या चांगल्या गोल नळ्या करून त्याच्या बाजू रिव्हेटानें अशा जोडतात कीं, रिव्हेटापासून नळीच्या पत्र्याची कड पांचअष्टमांश इंच अंतरावर राहावी. निरनिराळ्या नळ्यांची शेवटें एकमेकांस चांगली खेटून बसवावींत. व त्यासभोंवतीं त्याच प्रकारच्या पत्र्याची ६ इंच लांबीची विडी बसवावी. नळ भिंतीस लागून बसण्यासाठीं अर्धवर्तुळाकार खोबळा करून त्यांच्या बाजू ६ इंच लांबीच्या खिळ्यांनीं भिंतीत ठोकाव्या. नळ्यांच्या सांध्यांतून पाणी न गळेल असें करावें. पत्रे कल्हई केलेले नसल्यास नळ्यांच्या आंतील व बाहेरील अंगास रंगाचे ३ हात द्यावे.

पत्र्यांची टोकें एकमेकांवर ६ इंच चढवून बसवावीं व त्यांच्या लांबीच्या बाजूस दोन नळ्या एकमेकांवर याव्या. पत्रे बसवीतांना उताराच्या वरच्या बाजूच्या पत्र्यांचीं टोकें खालच्या बाजूकडील पत्र्यावर ६ इंच यावीं. पत्र्यांनां रिव्हेटासाठीं भोकें सामत्यानें खालच्या बाजूकडून वरच्या बाजूकडे पाडावी. छिनीनें अगर पोगरानें पाडूं नयें. भोकें पत्र्याच्या लांबीच्या बाजूस ९ इंच अंतरावर असावींत. व ती त्यांच्या रुंदीच्या बाजूस एक टाकून एका नळांत असावी. व वरील प्रमाणें पत्रे कल्हई केलेल्या रिव्हेटानें व शिशाच्या मुक्या चाक्यांनीं जुडल्यावर जुडलेले पत्रे पाखाड्यांवर चढवून कल्हई केलेल्या लोखंडी स्क्रुनीं व चाक्यांनीं अथवा बोल्टांनीं (सफेत्याच्या ओल्या रंगांत बुचकळून) बसवावेंत. बोल्ट एका सरळ रेषेंत सारखे ५ फूट अंतरावर पाखाड्यांवर मारावें. रिव्हेट किंवा बोल्टकरितां जी पत्र्याला भोकें पाडावयाचीं ती सर्व पत्र्यांतील नळ्यांच्या आढ्यावर (उंच भागावर) सामत्यानें पाडलेलीं असावीं. वॉशर, बोल्ट सुद्धां बसविण्याची मजुरी १०० चौरस फुटांस १३ रुपये पडते.

आढें व कोनवाशांवरील पत्रे जस्ताचें असून ते २० गेजचे असावे. आणि ते नळीच्या पत्र्यावर १ फुटाचा चढाव करून बसवून रिव्हेटांनी व बोल्टांनीं पक्के करावे. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० रनिंग फुटांस १३ रुपये आहे. ओट्यावर असलेल्या पडवीस जेथें पत्र्याच्या खालच्या बाजूस वारा जाण्याचा संभव असतो अशा ठिकाणी पत्र्यावर दोन × पाव इंची लोखंडी पट्टी घालून तीतून पाखाड्यांत बोल्ट घालावे. व पाखाड्या बोल्टांनीं बांधकामांत किंवा खांबांस पक्क्या जोडाव्या.

कल्हई केलेल्या नळीच्या लोखंडी पत्र्याचें छप्पर २० गेजचें असावें. अशा छपरांनां कैच्या व पाखाड्या हलक्या मापाच्या पुरतात. यांत पाखाड्या गर्भापासून गर्भापर्यंत ३ फूट अंतरावर ठेवून त्यांवर नळीचे पत्रे ठोकावे. पत्र्याच्या टोकांकडील सांधे पाखाड्यांवर यावे. पत्र्यांचीं टोकें ३ इंच केलेल्या लोखंडी स्क्रूनीं व चाक्यानीं बसवावीं. स्क्रू ६ इंच अंतरावर असावेंत. अर्ध्या इंच जाडीचें सागवानी तक्ते खोबणदात्यांच्या सांध्यांनीं जोडून पाखाड्यांच्या खालच्या अंगास आढ्यापासून भिंतीपर्यंत स्क्रूनीं बसवावे. म्हणजे तक्ते व पत्र्यांमध्यें हवा खेळण्याकरतां पाखांड्याच्या जाडीची जागा रहाते. पत्र्यांचें छप्पर असलें म्हणजे बहुतेक वातागमनिर्गममार्गा (व्हँटिलेटर) वा उपयोग करतात. अशा वेळीं त्यांच्या बाजूस जी दोन आढीं असतात तेथपर्यंतच तक्ते मारतात. व दोन आढ्यांमधील जागेंत कल्हई केलेल्या तारेची जाळी बसवितात. जेथें असें करीत नाहींत तेथे आढ्याजवळील दोन्हीं बाजूंच्या तक्त्यास १ इंच व्यासाचीं भोंकें पाडतात. म्हणजे नळीचे पत्रे व आढ्यावरच्या साध्या पत्र्यांमधून हवा खेळण्यांस जागा राहाते. त्याचप्रमाणें भिंतीजवळील तक्त्यांस १ इंच व्यासाची भोंकें पाडावीं. म्हणजे तक्ते व पत्रे यांच्या मध्यें हवा जाण्यायेण्याचा मार्ग होतो. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ७८ रुपयें व पत्रे आणि एकेरी कौलें घातली तर सध्यां (१९२५) ८० रुपये पडतात. वळचणीजवळ गटार असावें.

मंगलोरी कौलांचें छप्पर:- ह्यांत १×१॥। इंच या मापाच्या रिफा गर्भापासून गर्भापर्यंत १२॥ इंच अंतरावर मारून त्यांवर कौलें काटकोनांत ठेवतात. आढें व कोणवाशांवरील कौलें चुन्यांत बसवितात. ही एकमेकांस असणार्या खाच्यांत बसवून सर्व वाशांशीं समांतर बसवावीं. वळचणींजवळील कौलांच्या खालच्या बाजूस जी खोबण असते तिच्या खालीं कौलांचा उतार सारखा रहावा म्हणून बाकीच्या रिफापेक्षां अधिक जाडीच्या रिफा माराव्या. जेथें तुफान वारा असण्याचा संभव असेल अशा ठिकाणी वळचणींजवळील कौलांची टोकें खिळे मारून पक्की बसवावी. किंवा पानपट्टी वरच्या रिफास तारेनें बांधावी. ह्याचा भाव सध्यां (१९२५) १०० चौरस फुटांस ३१ रु. पडतात. बेळागांवाकडे छपरांतील वाशांवर २×अर्धा इंच मापाच्या रिफा ३ इंच अंतरावर मारतात. व त्यावर ५×५×अर्धा इंच मापाची चौकोनी चपटीं कौलें (चदर बिल्ली) त्यांच्या बाजू घासून सफेतीच्या साधारण चुन्यांत भिजवून मळलेल्या चुन्यांत बसवितात. चपट्या कौलांवर अर्धा इंच जाडीचा चुन्याचा गिलावा करून १४×५ इंच मापाची नळीची कौलें चुन्यांत बसवितात. ह्याचा भाव सध्या (१९२५) १०० चौरस फुटास ३४ रु. आहे.

धाबें.— माळवद किंवा धाबें करणें झाल्यास ६ फूट अंतरावर तुळ्या घालून त्यांवर ३×३ इंच मापाच्या कड्या एक एक फूट अंतरावर (मध्यापासून मध्यापर्यंत) घालतात. व त्यांवर फळ्यांचे तुकडे किंवा रिफाड किंवा किलच्या ठोकून त्यांच्यांवर ६ इंचापासून ९ इंच जाडीचा मातीचा थर घालतात. ही माती फार चिकण असतां कामा नये किंवा फार रेताळहि असूं नये. म्हणजे साधारण विटांनां अशा प्रकारची वापरतात तशा प्रकारची असावी, व ती चांगली कमावून घालवी. ज्या ठिकाणीं १/१ फूट लांबीच्या विटा मिळतात त्या ठिकाणीं फळ्यांच्या किंवा किलच्यांच्या ऐवजी अशा विटा वापरतात. व सिंधमध्यें अशा घाब्यांच्यासाठीं १२ इंच लांब व १२ इंच रुंद व १॥ इंच जाडी अशा, मातीच्या फरशा भाजून तयार करतात व त्या वापरतात. ह्या विटांचें किंवा फरशांचे सांधे चुन्यात बसवितात. व मग त्यांवर ९ इंच जाडीचा मातीचा थर घालतात. या मातींत थोडी लीदहि घालण्याचा प्रघात आहे. अशा मातीच्या धाब्यांनां चांगला स्लोप किंवा ढाळ दिला पाहिजे. हा ढाळ २० फुटांत १ फूट इतका असला म्हणजे पाणी ताबडतोब निघून जातें व गळत नाहीं.

जेव्हां माळवदाच्या ऐवजीं चुन्याची पक्की गच्ची करावयाची असेल तेव्हां खालचें लांकूडकाम जास्ती मजबूत करतात आणि त्यावर विटांच्या एक थराऐवजी दोन थर घालतात. हे दोन्हीं थर पुष्कळ चुना वापरून चांगले घातले पाहिजेत. त्यांत पोंकळ सांधा कोठेहि रहातां उपयोगी नाहीं. या विटांच्या थरावर ३ पासून ६ इंच जाडीचें कौलांच्या तुकड्यांचे अथवा विटांच्या फोडलेल्या बारीक तुकड्यांचे किंवा जाडी रेतीचें कांक्रीट घालून वरचा भाग अगदीं गुळगुळीत करतात व ह्यालाहि २० फुटांत १ फूट इतका स्लोप दिला म्हणजे पाणी झट्कन निघून जातें ज्या ठिकाणीं १। इंच किंवा १॥ इंच जाडीच्या फरशा मिळत असतील त्या ठिकाणी विटांच्या ऐवजीं अशा जातीच्या फरशा वापरतात व त्यांवर ६ इंच जाडीचें कांक्रीट घालतात. ह्या कांक्रीटांत घालावयाचें खडीचे, कौलांचे अथवा विटांचे तुकडे असावे. निदान चार तासपर्यंत तरी पाण्यांत भिजवून ठेवलेल्या अशा तुकड्यांच्या १०० घनफुटात ५० घनफूट मळलेला चुना घालून तो चांगला कालवून तें कांक्रीट फरशांवर ६ इंच जाड पसरावें. हें कांक्रट २० फुटांस १ फूट इतका ढाळ त्याच्या वरच्या पृष्ठभागास येईल अशा बेतानें घालावें व ते ६ इंच व्यासाच्या लहान धुमसानें ठोकून दबून ५ इंच होईल तेथपर्यंत धुमसावें म्हणजे तें बरेच घट्ट होईल व त्यानंतर तें थापीनें ठोकावयासाठी शक्य तितके जास्त मजूर एकदम लावून एका टोंकापासून दुसर्या टोंकापर्यंत तिवारी थापीनें किंवा ठोकणीनें दिवसभर ठोकीत बसावयास सांगावे. हें ठोकणीचें काम चाललें असतां एका पिपांत ३ शेर गुळ व २ शेर बेलफळाचा गीर कालवून तें पाणी वरचेवर शिंपीत राहावें. अशा रीतीनें तीन दिवस ठोकलें असतां वरचा पृष्ठभाग अगदीं कठिण होतो व थापीच्या धारेंचा आघात वेगवेगळ्या वेळीं निरनिराळ्या दिशेनें झाल्या कारणानें सर्व पृष्ठभाग गुळगुळीत व इतका मजबूत होतो कीं, त्यावर कोणत्याहि ठिकाणीं थापीचा आघात केला असतां त्या पृष्ठभागावर चरा किंवा रेषा वठूं शकत नाहींत. आणि ठोकण्यानें बराच चुना वर येतो व असा वर आलेला चुना करणीनें पाणी टाकून घासलें असतां अगदीं गुळगुळीत होतो व नंतर त्याला अस्तरगारी करण्याची जरूर पडत नाहीं. अशा रीतीनें काम केलें असतां गच्ची गळण्याची भीति राहात नाहीं. ज्या ठिकाणीं लोखंडी बहालें किंवा तुळवटें असतील त्या ठिकाणी अतिशय उष्णता व अतिशय थंडी यांच्या योगानें त्यांची लांबी कमीज्यास्ती झाल्यामुळें भिंतीच्या सांध्यावर तडा पडण्याचा मात्र संभव असतो. पण अशा तडा, बेलतेलांत कळीचुना व रेती यांच्या मिश्रणानें भरून काढल्या असतां त्यांतून पाणी उतरण्याचा संभव रहात नाहीं, गच्चीचें काम चांगलें गुळगुळीत झालें म्हणजे तें दमट असतां त्यावर दोन इंच जाडीचा रेतीचा अथवा मातीचा थर घालतात व त्यावर गवती चटया घालून किंवा वरील भाग पुढील पावसाळ्यापर्यंत नेहमीं ओला राहील इतकें पाणी शिंपडीत रहातात.

छपरें:— कौलारांनां २६ ते २७ अंशांचा म्हणजे एक फुटास ६ इंचांचा स्लोप किंवा ढाळ देतात. व स्लेटी वापरल्यास त्यांना २२ पासून ३३ अंशांपर्यंत म्हणजे १ फुटास ४॥। पासून ७ इंच इतका स्लोप अनुक्रमें मोठ्या आकाराच्या व लहान आकाराच्या स्लेटींच्या छपरास देतात. वापरावयाच्या स्लेटी जर पाव इंच जाडीच्या, २० इंच लांबीच्या असल्या तर ६-६ इंच अंतरावर (मध्यापासून मध्यापर्यंत) रिपा बसवाव्या लागतात. या रिपा २×१॥ इंच या पापाच्या असतात व त्या खिळ्यानीं खालील वाशांनां बसविलेल्या असतात. स्लेटीचा आकार २४×१२ इंच किंवा १२×१० इंच असा साधारण रीतीनें असतो. व त्या १२ इंचांपेक्षां कमी लांबीच्या वापरूं नयेत. त्यांची जाडी पाव इंचापेक्षां जास्ती नसावी व एकषष्ठांश इंचापेक्षां कमी नसावी. या स्लेटी बसवितांना दरएक स्लेटीला मधोमध भोंक पाडून १॥। इंच लांबीच्या जस्ताचा मुलामा चढविलेल्या खिळ्यांनीं रिपा बसवितात. या खिळ्यांचे माथे स्लेटींच्या माथ्यांच्या वर न येतील असे बसवावें. असें करण्यास पहिल्यानें सामत्यानें खिळ्याच्या जाडीचें भोंक पाडून तें पोगरानें वरच्या बाजुला रुंद करतात, म्हणजे खिळ्याचा माथाहि आंत दबून बसतो. या थराच्या वरचा थर बसवितांना त्याच्या निम्या रुंदीची सांधमोड करून स्लेटी बसवितात. व तिसराहि थर अशाच रीतीची सांधमोड करून बसवितात. असें करतांना स्लेटी जर २० इंच लांबीच्या असल्या तर प्रत्येकीचा माथा कोणत्याना कोणत्या तरी रिपेच्या मधोमध येतो व या रिपा ६-६ इंच अंतरावर असल्याकारणानें एक स्लेट तीन रिपांवर येते आणि दरएक रिपेवर एक एक स्लेटीचा माथा येत असल्याकारणानें कोणत्याहि ठिकाणीं तीन स्लेटीपेक्षां कमी जाडी येत नाहीं. अशा रीतीनें स्लेटीचें आडवे सांधे ३ थरावर येतात. व उभे सांधे खालच्या व वरच्या स्लेटीच्या मधोमध आणतात. अशा प्रकारच्या छपरांचें आढें जस्ती पत्र्यानें झांकतात

गवती छपरें:— सर्व प्रकारच्या छपरांमध्यें गवताचें छप्पर वापरल्यानें इमारतीची आंतली बाजू थंड राहते. हें करतांना खालच्या बाजूला बाबूंच्या चिरलेल्या कांचीची साटी तयार करून तीवर लांब सरकटाचें ३-३ इंच जाडीने २ थर व त्यावर डोंगरी गवत बांधून वर पडलेलें पाणी झट्कन निघून जाईल अशा रीतीनें रचतात. हा प्रत्येक थर ९-९ इंच अंतरावर बांबूंच्या चिपांनां दोरीनें बांधून मजबूत करातात. हें गवत लांब असून न मोडतां वांकणारें व लांब सडक असावे लागतें. अशा छपराचें खालच्या बाजूचें लांकूडकाम म्हणजे गोल सागवानी आढें, कळकी पाखाड्या ३×३ फूट अंतरावर बसविलेले वांसे वगैरे कौलारासारखेंच घालतात. व छप्पर उडून जाऊं नये म्हणून तयार केलेली साटी खालच्या पाखड्या, वांसे वगैरेस दोर्यांनीं बांधून टाकतात. अशा छपरांनां फुटास नऊ इंच इतका ढाळ देतात. अशीं छपरें आंतून किंवा बाहेरून ठिणग्या उडाल्यानें पेटण्याजोगीं असल्यामुळें कायमच्या इमारतीसाठीं वापरतां येत नाहींत. खेरीज ती दुसर्या इमारतीच्या जवळहि बांधतां उपयोगी नाहींत.

जेथें थंडी जास्ती असते अशा प्रदेशांतून निजावसावयाची जागा गरम रहावी म्हणून भिंतीतून आगठ्या बसविलेल्या असतात व अशा आगट्यांतून दगडी कोळसें किंवा लांकडे जळत ठेवतात. व त्यामुळें इमारतीच्या आंतील बाजूची हवा तापते व त्यामुळें घरात ऊब राहतें. पण अशा आगटीतील धूर व जळणार्या लांकडांपासून किंवा कोळशांपासून उत्पन्न होणारा कर्बाम्ल इमारतींत राहतां उपयोगी नाहीं. येवढ्याकरितां धूर व ही खराब विषारी हवा बाहेर निघून जाण्यासाठीं अगदीं वरच धुराडे बनवितात व त्याचा भिंतीत बसवावयाचा नळ छपराच्या वर निसून जाईल इतका उंच बांधून घेतात व त्या नळाच्या चारी बाजूला भोकें ठेवून वरचा माथा झांकून घेतात. म्हणजे पाऊस पडत असला तरी पाणी आंत न येतां धूर जाऊं शकतो. हा नळ सुमारें १ चौरस फूट क्षेत्रफळाचा असावा व त्याच्या आंतल्या बाजूला चुन्याची अस्तरगारी करतांना त्या चुन्यांत गाईचे शेण घालतात. असें गाईचें शेण मिसळून तयार केलेल्या चुना धुराड्याच्या बाजूच्या वीटकामाला धरून राहतो, झरून पडत नाहीं. असें न केलें व नुसताच चुना वापरला तर उष्णतेच्या योगानें त्याचे कळपे सुटतात.

अदाह्य किंवा पक्क्या गच्च्या:- अलीकडेस लोखंडी किंवा पोलादी बहालें मिळावयास लागल्यापासून अशा गच्च्या करणें सोपें झालें आहे. त्याच्या पूर्वी लहान लहान गळ्यांच्याच गच्च्या कराव्या लागत. दहा फूट गाळ्यापर्यंत अशा गच्च्या करावयासाठी विटांच्या किंवा कांक्रीटच्या कमानी करून दर दोन कमानींतला मधला भाग कांक्रीटनें भरून काढून १०-१० फूट गाळ्याच्या एकाला एक लागून वाटेल तितक्या कोठड्या बांधतां येत असत. अशा कमानींची जाडी माथ्याजवळ ६ इंच व तळाशीं ९ इंच इतकी ठेवीत असत. पण आतां ३०-४० फूट लांबीचीं लोखंडी बहालें मिळत असल्याकारणानें एवढ्या गाळ्याच्याहि गच्च्या करता येतात. अशा गच्च्या करतांना बहलावरून एक एक फूट अंतरावर लोखंडीच कड्या घालून अशा कड्यावर १॥ इंच जाडीच्या फरशा घालतात. व त्या फरशांवर ६ इंच जाडीचें कांक्रीट घालून गच्ची करतां येते. अशा गच्च्यांनां ढाळ द्यावयाचा तो तितक्या स्लोपांत कड्या बसवून देतां येतो. ह्याच कड्या मोठ्या जाडीच्या २ पासून ३ फूट अंतरावर घातल्या असतां व एका कडीपासून दुसर्या कडीपर्यंत ३-४ इंच उंचीच्या अर्ध्या विटेच्या कमानी किंवा कांक्रीटच्या कमानी करून त्यांचा वरचा पृष्ठभाग सारखा करून घेऊन गच्चीसारखी करतां येते. किंवा बहालांवर लोखंडी जाळी (एक्सपाँडेड मेटल) पसरून किंवा लोखंडी सळ्या पसरून किंवा हें सर्व काम ३-४ इंच जाडीच्या सिमेंट कांक्रीटांत सर्व बाजूनी आतं दबून जाईल अशा रीतीनें करून सिमेंट कांक्रीटची गच्ची तयार करतां येतें. वापरावयाच्या जाळीची जाडी वाढविली व सळ्या जास्ती जाडीच्या व जवळजवळ घातल्या असतां व सिमेंट कांक्रीटची जाडीहि ५-६ इंच केली असतां आडव्या कड्यांची जरूर लागत नाहीं. नुसत्या बहालांवरच काम भागतें.

लोखंड जरी अदाह्य आहे तरी इमारतींत सांठविलेलें सामान पेटलें असतां लोखंडी बहालें तापून लाल होण्याचा संभव असतो व असें झालें म्हणजे ती थंड असतां त्यांची मजबुती किंवा भार सहन करण्याची शक्ति जितकी असते त्यापेक्षां पुष्कळच कमी होते. म्हणून साधारण रीतीनें गच्चीचा वगैरे जो भार ती सहज सहन करूं शकतात तीच भार सहन करावयास ती लाल झाली असतां त्यांच्यांत शक्ति रहात नाहीं व तेवढ्याच भारानें ती वांकतात व पडतात. असें होऊ नये व आग लागली असतांहि इमारत सुरक्षित व्हावी अशी इच्छा असल्यास कोणतेंहि लोखंडी काम उघडें राहतां उपयोगीं नाहीं. त्यांवर निदान १॥ पासून २ इंच जाडीचा सिमेंट कांक्रीटचा थर पाहिजे. व यामुळें जरी ही बहालें त्यांच्या नेहमीच्या T आकाराच्या असतात. तरी त्यांच्या भोंवतीं लोखंडाची जाळी वेष्ठून तिच्या आधारानें सिमेंट कांक्रीटमध्यें ती सर्व बाजूनें गढून जातील अशा रीतीनें त्यांच्या बाहेरून फळ्यांची तात्पुरती पेटी करून सिंमेंट कांक्रीटनें भरून काढतात. ही पेटी काढल्यावर ती एरवीच्या लाकडी बहालांप्रमाणें चौरस, चव मारलेली अथवा गोलची मारलेली दिसतील अशीं करतां येतात.

छप्पर,(चुन्याची गच्ची)— लांकडाच्या बरोदावर ६३×१ इंच ह्या नमुन्याच्या चांगल्या भाजलेल्या विटांचा १ थर कर्णरेषेंत घालावा व त्यावर विटांच्या तुकड्याचें केलेलें कांक्रीट ३ इंच जाडीचें घालून लांकडाच्या चोपणीनें चांगलें चोपावें. आणि चुन्याचे पाणी शिंपून तें ओलें ठेवावें. कांक्रीट बळकट झालें म्हणजे त्यावर चपट्या कौलांचे थर सांधमोड करून सुरकीच्या चुन्यांत किंवा सिमेंटांत बसवावें. कौलें बसविण्यापूर्वी पाण्यांत चांगली भिजवावी. कौलांच्या थरावर चुन्याचा गिलावा करून त्याचा पृष्ठभाग चांगला घोंटावा किंवा गिलाव्याच्या पिहिल्या चटीवर पातळ डामर (कोल्टार) व वाळूचें मिश्रण ऊन करून त्याची पातळ चट देऊन लांकडाच्या रंध्यानें रंधावें. वरील चट घट्ट बसली म्हणजे तीवर सफेतीचे दोन हात द्यावे. ह्यांचा भाव सध्यां (१९२५) दर शंभर फुटांत ११६ रु. आहे.

कमानीची गच्ची:— ह्यांत भिंतीवर माठीव चौरस दगडांचे ठोकळे बसवून त्यांवर रोव्हस्टील, बहालें, ही ४ ते ७ फूट अंतरावर बसवितांत. व ह्या लोखंडी बहालांनां ओल्या र्शेदरी रंगाचा एक हात देतात व हीं बहालें जाग्यावरून हलूं नयेत म्हणून १॥ इंच ते तीन अष्टमांश इंच लोखंडाच्या पट्ट्या त्यांच्या माथ्यावर बसवितात. आणि त्यांतून रिव्हेट बसवून ह्या पट्टयांची टोकें शेवटच्या आडव्या भिंतीच्या माथ्यावर बसवितात व कोनलोहांत (अँगल आयर्नं) रिव्हेट मारून खिळवून टाकतात. इमारतीच्या भिंती लोखंडी तुळ्यांच्या माथ्याच्या बांधणीच्या साधणींत आणून त्यांत कमानीचा भाग ६ इंच जाण्याकरितां जागा सोडावी. कमान बांधीत असतात ती संभाळून धरण्याकरण्याकरितां तुळ्यांमध्ये आंब्यांची अगर कोणत्याहि रायवळ लांकडाची ३ इंच जाडीची कलबुतें (सेंटरिंग्ज) तयार करून ५ फूट अंतरावर ठेवून त्यावर बांबूच्या अथवा देशी सागवानाच्या रिपा १ इंच अंतरावर माराव्या व त्यावर बांबूचें तट्टे पसरून वर मातीचा गिलावा करून विवक्षित त्रिज्येची वर्तुळखंडाकृति बरोबर तयार करावी व यावर कमान बांधावी. कमानीसाठी विटा चुनेगच्चीच्या विटांप्रमाणेंच असाव्या. कमानीची जाडी ६ इंच असून शर (चढ) गाळ्याच्या एकअष्टमांश पासून एकदशांशापर्यंत असावा. कमान फिरविल्यावर ३ किंवा ४ दिवसांनी तिच्या पायथ्याजवळील भिंत (स्टँड्रील वॉल) तिच्या माथ्याच्या साधनींत येईल अशी बांधावी व कमानीवर कांक्रीट घालावें. लोखंडी तुळ्यांच्या माथ्यावर कांक्रीटची जाडी ३ इंच असावी. लांकडाच्या चोपणीनें कांक्रीट चोपल्यावर त्यावर चपटी कौल चुन्यांत बसवून वर चुन्याचा अथवा पातळ डामर व वाळूच्या मिश्रणाचा गिलावा करावा. किंवा कड्या घालून तक्तपोशी, फरशी किंवा आसफाल्टची जमीन करावी.

पातळ डामर व वाळूची गच्ची:— तेल किंवा कोणत्याहि प्रवाही पदार्थांशीं मिश्रण झालेलें पातळ डामर (कोल्टार) कढवून त्यांत वाळू ऊन करून घालावी (वाळू ऊन केली म्हणजे तीतला ओलावा नाहींसा होतो). हें मिश्रण चांगले ढवळून त्यांत अधिक वाळूचा समावेश होईल तर ती घालावी. मिश्रण ढवळून घट्ट झालें म्हणजे तें उपयोग करण्याजोगें झालें असें समजावें. वाळू बारीक व स्वच्छ असावी. ज्या बांधकामावर हें मिश्रण घालावयाचें असेल त्याच्या पृष्ठभागावर चुन्याच्या गिलाव्याची पातळ चट द्यावी म्हणजे बांधकामांतील उंचसखळ व पोकळ जागा साफ भरून येईल. गिलावा वाळल्यावर तयार केलेल्या मिश्रणाची पाव इंच जाडीची चट करणीनें द्यावी व लांकडाच्या रंध्यानें तिचा पृष्ठभाग रंधून गुळगुळीत करावा. डामरवाळूची चट घट्ट बसण्यास १० किंवा अधिक दिवस लागतात. अशा प्रकारची गच्ची छप्पराच्या ऐवजी असली तर तिच्या पृष्ठभागावर चुन्याचे दोन हात द्यावे.

चुन्याची गच्ची:— यांत सागवानी इतर लोखंडी बरोद गर्भापासून गर्भापर्यंत १ फूट अंतरावर असून त्यावर दाट सफेतीच्या चुन्यांत बुचकळलेल्या चपट्ट्या विटांचे २ थर मळलेल्या चुन्यांत बसवितात व थरांवर ३ इंच जाडीचा कांक्रीटाचा थर घालून कांक्रीटवर चपट्या विटांचा आणखी एक थर देतात. खालच्या थरांच्या विटा १२×६×१ मापाच्या असून त्यांचे एकावर एक असे २ थर सांधमोड करून चुन्यांत, बसवावे. चपट्या विटा बसवितांना त्यांच्या बाजू घासाव्या म्हणजे त्या एकमेकांस लागून बसतील. कांक्रीट फकीचा चुना स्वच्छ व बारीक वाळू आणि लहान गोटे यांचें असावें. तें पसरल्यावर त्यावर थोंडें पाणी घालून हलक्या चोपणीनें पातळ चुना पृष्ठभागावर येऊन कांक्रीट वाळेतोपर्यंत ठोकावें. कांक्रीटावर आणखी एक चपट्या विटांचा थर बसवावा. बरोदाच्या खाली ४×३॥ मापाची लग भिंतीवर बसवावी. गच्चीवरील पाणी लवकर निघून जावें म्हणून तिच्या पृष्ठभागास १ फूटास अर्धा इंच इतका ढाळ द्यावा. जेथे गच्ची एखाद्या भिंतीशी लागून असेल तेथें त्या भिंतीतून तिच्या बाहेर ४ इंच येईल असा गलथा करावा. गलथा गच्चीच्या पृष्ठभागापासून अदमासें २ इंच उंचीवर असावा. व हीं दोन इंचाची जागा कांक्रीटनें भरून काढावी. म्हणजे भिंतीवरील पाणी खाली गळणार नाहीं.

सिंधमध्यें करतात तशी अदाह्य गच्ची:- लोखंडी रोल्ड बीम्स यांच्यावर लोखंडी 'टी' कड्या घालून त्यांवर १॥ पासून २ इंच जाडीच्या फरशीच्या विटांचा एक थर देतात व त्यावर ४ इंच जाडीचें कांक्रीट पसरतात.

लोखंडी तुळ्या गर्मापासून गर्मापर्यंत ४ फूट अंतरावर ठेवून त्याची १८×९× टोकें भिंतींत पाव इंच लोखंडी पत्र्याच्या तबकड्यांवर बसवावीं. व तुळ्याच्या सभोंवती बांधकाम करावें. टी लोखंडाच्या कड्या २×२×पाव इंच लोखंडी मापाच्या असून त्यांची खालची रुंद बाजू (प्लॅन) लोखंडी तुळ्यांवर टेकावी. आणि त्या गर्मापासून गर्मापर्यंत १२॥ इंच अंतरावर ठेवाव्या. कड्याच्या खालच्या रुंद बाजूंवर १२×१२×१॥ इंचांपासून २ इंच जाडीच्या चांगल्या भाजलेल्या व कठीण फरशीच्या एकेरी विटांचा पोर्टलंड सिमेंटांत एक थर द्यावा. विटा १२×६×१ इंच ह्या मापाच्या असल्यास सांधमोड करून एकावर एक २ थर द्यावे. विटांच्या खालून दिसणारा भाग गुळगुळीत असून त्यांच्या सांध्यांत खालच्या बाजूनें दरजा करतात. कांक्रीटांत १ भाग फकीचा चुना, २ भाग वाळू व ५ भाग स्वच्छ लहान लहान गोटे असावेत. कांक्रीट पसरल्यावर थोडेसें पाणी घालून हलक्या हातचोपणीनें पृष्ठभागांवर अर्ध्या इंच जाडीची पोर्टलंड सिमेंटच्या गिलाव्याची चट द्यावी. जुन्या गच्चीवर भेगा बुजविण्यासाठी दोन भाग कच्च्या जवसाच्या तेलांत २ भाग राळ टाकून कढवून तें तेल उष्ण आहे तोंच त्यांत १ भाग प्यूमिस दगडाची पूड किंवा बारीक रेती घालून मिश्रणास तार येईपर्यंत कढवून तें उष्ण आहे तोंच भेगांत ओतून करणीनें साफ करावें.

कांक्रीटच्या कमानीचें छप्पर:— ह्या कमानी साधारणतः १० फुटांपेक्षां जास्त गाळ्याच्या करीत नाहींत. गाळा १० फूट किंवा त्याहून कमी असला व कमान साधारण चुन्याच्या कांक्रीटची असेल तर कमानीची उंची गाळ्याच्या षष्ठांशा इतकी ठेवतात. परंतु कमान पोर्टलंड सिमेंट कांक्रीटची असल्यास यापेक्षा उंची कमी ठेवली तरी चालते. १० फूट गाळ्याच्या कमानीची जाडी ७॥ इंच ठेवतात. गाळा कमी असल्यास ६ इंच जाडी ठेवली तरी चालते. कडेच्या भिंतीवर कमानीचा जोर येतो म्हणून त्यांची जाडी तो भाग सहन करण्याजोगी असावी. किंवा कमानीच्या दोन्ही तळाशीं भिंतीवर लोहकोण बसवून व त्यांनां गोल सळ्याचें ताण देऊन त्या लोहकोणांवर कमानी आधारल्या म्हणजे कमानीच्या तिरप्या दाबानें भिंती बाहेर झुकण्याचा संभव रहात नाहीं. एकमेकांस लागून पुष्कळ कमानी असल्यास दोन कमानींमधील पावसाचें पाणी कमानीच्या पायथ्याच्या भरतीस दोन्ही बाजूंस उतार देऊन काढून द्यावें. कमानीची कल्युतें वाळूच्या पेट्यांवर किंवा पाचरीवर ठेवलेली असावी. व कमानी बांधणें सपंल्यावर २० दिवसांनीं ती काढावीं. पण ती १ महिनाभर न काढल्यास बरें. कांक्रीटांत चांगला विरलेला फकी चुना १ भाग, स्वच्छ व बारीक वाळू ९ भाग व खडी, कंकर अथवा मऊ दगडांचे किंवा विटांचे तुकडे ४ भाग असावे.

कलबूत तयार झाल्यावर त्याचा पृष्ठभाग भिजवून त्यावर विटांच्या फकीचा १/८ इंच जाडीचा थर घालून त्यावर अर्ध्या इंच जाडीची गिलाव्याची चट द्यावी. व लागलीच कांक्रीट पसरण्यास सुरवात करावी. गिलावा करण्याचीं किंवा कांक्रीट पसरण्याचीं कामें एकाच वेळेस चालावीं. कारण असें केल्यानें गिलाव्याचा व कांक्रीटचा एकजीव होतो. व कांक्रीटच्या खालच्या बाजूस चुन्याची त्वचा बनते. पसरण्याचें किंवा धुमस करण्याचें काम कमानीच्या पायथ्यापासून माथ्याकडे दोन्ही बाजूंकडून एकाच वेळी करीत असावें. कमानीची जाडी ६ इंचांपेक्षां अधिक नसेल तर कमान एकाच थराची एका दिवसांत पुरी करावी. परंतु जाडी अधिक असल्यास कांक्रीटाचें दोन थर घालावे. प्रत्येक थर एक दिवसांत पुरा झाला पाहिजे. आणि दुसरा थर पसरण्यापूर्वी पहिल्या थराचा पृष्ठभाग थोडा उकरून खरखरीत करावा. म्हणजे दोन्ही थरांचा एकजीव होतो. कमानीचें काम संपल्यावर तिच्यावर गवत, पानें, किंवा भुसा घालून त्यावर दररोज पाणी घालून एक महिनाभर ती ओली ठेवावी. कमानीच्या खालच्या बाजूस साधारण गिलावा करून वरच्या बाजूस गच्चीच्या गिलाव्याप्रमाणें गुळगुळीत गिलावा करावा किंवा वाटेल तर त्यावर पोर्टलंड सिमेंटची पातळ चट द्यावी.

चुन्याचें कांक्रीट रुफासाठी करणें झाल्यास कमानीची उंची गाळ्याच्या दर फुटास २ इंचांप्रमाणें ठेवतात. आणि १० फूट गाळ्यास कमानीची जाडी ६ इंच ठेवतात. आणि १० फुटांपेक्षां जितक्या फुटांनीं गाळा मोठा असेल त्याच्या अष्टमांशानें कमानीची जाडी वाढवितात. ह्या हिशोबानें १० फूट गाळ्यांस कमानीची जाडी ६ इंच ठेवली तर १२ फुटांस ९ इंच, १६ फुटांस १५ इंच, व २० फुटांस २१ इंच इतकी जाडी असावी. चुन्याच्या कांक्रीटाच्या ऐवजीं जर सिमेंटकांक्रीट वापरलें तर ह्याच्यापेक्षां कमानीची जाडी कमी ठेवली तरी चालते.

पटई किंवा पाटणी.— पटई करावयाची म्हणजे तळमजल्याच्या भिंती बांधून तयार झाल्यावर त्यांवर लांकडी किंवा लोखंडी तुळ्या घालतात व ह्या तुळ्यांवर येणारा भार भिंतीवर सारखा वाटला जावा म्हणून सहा इंचापासून एक फूट जाडीचे पाटथर भिंतीच्या इतके रुंदीचे व १॥ पासून २ फूट लांबीचें, त्यांचा सपाट भाग तळाला घालून व ज्या ठिकाणीं तुळईचें टोंक त्यांवर टेकावयाचें असेल त्या ठिकाणी त्या मापाची माठीव खोवण पाडून त्यावर बरोबर त्या अर्ध्या इंचाच्या खोवणींत बसवितात. याच्या योगानें भार सगळीकडे सारखा वाटला जातो. तुळ्यांची भिंतींत जाणारी ही टोकें हवा न लागल्यामुळें सडूं नयेत म्हणून त्यांच्या भोंवती हवा खेळावयासाठी सर्व बाजूंनी थोडी जागा सोडतात व त्या जागेंत चिमण्या किंवा उंदीर, खडी किंवा खारी यांनी वस्ती करू नये म्हणून ह्या फटींची बाहेरची बाजू जाळी बसवून भरून काढतात. खेरीज तुळई लांकडी असेल तर भिंतीत दबणार्या भागाला तापविलेल्या डामराचे दोन-तीन हात देतात. म्हणजे त्यास कीड लागण्याची भीति राहात नाहीं. या तुळ्या, लोखंडी असल्या तर त्यांच्या भिंतीत दबल्या जाणार्या भागाला बेलतेलांत कालविलेल्या रंगाचे तीन हात देतात; त्यापैकीं पहिल्या हातांत बहुतकरून शेंदूर घालतात. अशा तुळ्या ८ पासून १० फूट अतंरावर बसवितात व त्यांवर एक एक फूट (मध्यापासून मध्यापर्यंत) अंतरावर लांकडी किंवा लोखंडी बरोद किंवा कड्या आडव्या बसवितात व अशा बरोदांवर फळ्या एक इंच पासून दीडइंच जाडीच्या जडतात. म्हणजे लांकडी तक्तपोशी तयार होते. किंवा अर्ध्या पासून पाऊण इंच जाडीच्या फळ्या जडून त्यांवर तीन चार इंच कांक्रीट घालून त्यांवर दीड इंच जाडीची फरशी बसवितात. अथवा कांक्रीटची जाडी वाढवून चुन्याच्या अस्तरगारीची जमीन करतात. किंवा फळ्यांच्या ऐवजी १॥ इंच जाडीचे फरशीचे दगड बरोदावर बसवितात व त्यांवर ३ इंच कांक्रीट घालून त्यावर १। इंच फरशी किंवा चुन्याची अस्तरगारी करतात. अथवा हीं दोन्ही पायाला गार लागतात म्हणून मुरुममातीची जमीन करतात. अशा फरशा व कांक्रीट दोन्हीं मिळून ६ इंच जाडीच्या जमिनीचें वजन दर चौरस फुटास सुमारें ७६ पौंड होते. व त्यावर माणसें अतिशय दाटीनें उभी राहिली तर त्यांचे वजन दर चौरस फुटास ९० पौंडाइतकें होतें. आपल्या इकडच्यापेक्षां यूरोपमधील माणसें धिप्पाट, वजनाचे जास्ती असल्याकारणानें त्यांचा भार दर चौरस फुटास १२० पौंड धरण्याचा प्रघात आहे. वर सांगितल्याप्रमाणें पटईचें वजन ७५ पौंड व माणसाचें ९० पौंड घेतलें म्हणजे एकंदर भार दर चौरस फुटास १६५ पौंड म्हणजे १॥ हंड्रेडवेट अथवा बंगाली दोन मण इतका होतो व तुळ्या व बरोद हीं काय मापाचीं असावी याचा हिशोब करतांनां पटईवर येणारा भार १॥ हंड्रेडवेट किंवा २ मण घेत असतात. अशा रीतीचा भार आला असतां सागवानी लांकडाच्या तुळ्या असल्या तर त्या काय मापाच्या असाव्या हें पुढें नं. १ च्या कोष्टकांत दाखविले आहे. व एक फूट अंतरावर (मध्यापासून मध्यापर्यंत) बसविले तर असे सागवानी बरोद किंवा कड्या हे काय मापाचें असावेत हें पुढें कोष्टक नं. २ यांत दाखविलें आहे.

सागवानी बहलांवर भार दर चौरस फुटास १॥ हंड्रेडवेट म्हणजे सुमारें २ मण असला तर गाळा व तुळईपासून तुळईंतील अंतर वगैरे किती असावें यांचें कोष्टक:-

कोष्टक नं. १
गाळ अंतर तुळ्यांचें माप
रुंदी इंच उंची इंच
१० ६'' १० १/४,,
,, ६ १/४,, ११,,
,, १० ६ ३/४,, ११ १/२,,
१६ ८ १/२,, १४ १/२,,
,, ,, १५ १/२,,
,, १० ९ १/२,, १६ १/२,,
२० १०,, १७ १/४,,
,, १० ३/४,, १८ १/२,,
,, १० ११ १/४,, १९ १/२,,
२४ ११ १/२,, १९ ३/४,,
,, १२ १/२,, २१ १/२,,
,, १० १३,, २२,,


कोष्टक नं. २

सागवानी बरोद:-भार दर चौरस फुटास दीड हंड्रेडवेट अथवा २ मण. मध्यापासून मध्यापर्यंत १२ इंच अंतरावर बसविलेले बरोद.

गाळा बरोदाचें माप
'' ३ x ४''
०६ ३ x ६''
१० ३ x ८''

याच तुळ्या किंवा गर्डर व बरोद लोखंडी किंवा नरम पोलादाचे असलें तर ते काय मापाचे असावे हें पुढें दिलें आहे. पोलादी बहालें वापरतांना जेवढा गाळा असेल त्याच्या २० व्या भांगाइतकी त्याची जाडी किंवा उंची असावी. असे:- गाळा ४० फूट असला तर उंची २ फूट; २० फुटास उंची १ फूट; १० फुटास उंची ६ इंच; इतकी असावी. म्हणजे बहालांवर सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणांत वजन आल्यास तें स्वतःच्या गाळ्याच्या (फुटांत) एकचाळीसांस इंचापेक्षा जास्ती वांकणार नाहीं. म्हणजेच गाळा ४० फूट असला तर १ इंचापेक्षां जास्ती वांकणार नाहीं. व गाळा २० फूट असला तर त्याला अर्ध्या इंचापेक्षां जास्ती झोळ यावयाचा नाहीं असें समजावयाचें.

जेथें वरील मजल्यासाठीं लोखंडी बरोद वापरावयाचे असतील तेथें ८ फूट गाळ्यापर्यंत ते दर एक भिंतीवर सहा सहा इंच चढतील इतके लांब ठेवावेत. गाळा ९ ते १२ फूट असेल तर ते भिंतीवर नऊ नऊ इंच चढवावे आणि बहालें १२ ते २'' फूट गाळ्याचीं असतील तर ती दर एक भिंतीवर निदान बारा इंच तरी चढवावी. आणि गाळा ह्याच्यापेक्षां जास्ती असेल तर भिंतीवरचा चढाव १८ ते २४ इंचहि ठेवावा लागतो (जितके फूट गाळा असेल त्याच्या पाऊणपट इंच उंचीचे बहाल घेतल्यास तें भारानें फार वांकत नाहीं.)

पोलादी बहालें.
बहालांची उंची व रुंदी इंचात दर फुटास वजन पौंड भारवाहक शक्ति टनांत बहालांतील नम
२४ x ७ १/२ १०० ११०८ .००००७५
२० x ७ ८९ ८३८  .००००९०
१८ x ७ ७५ ६४० .००००१०
१६ x ६ ६२ ४५५ .००११२५
१५ x ६ ५९ ४२० .००१२
१५ x ५ ४२ २८६ .००१२
१४ x ६ ४६ ३१५ .००१२८६
१२ x ६ ५४ ३१४ .००१५
१२ x ६ ४४ २६३ .००१५
१२ x ५ ३२ १८४ .००१५
१० x ८ ७० ३४७ .००१८
१० x ६ ४२ २१२ .००१८
१० x ५ ३० १४६ .००१८
९ x ७ ५८ २५६ .००२०
९ x ४ २१ ९० .००२०
८ x ६ ३५ १३९ .००२२५
८ x ५ २८ ११३ .००२२५
८ x  ४ १८ ६९ .००२२५
७ x  ४ १६ ५६ .००२५७
६  x ५ २५ ७२ .००३०
६ x ३ १२ ३३ .००३०
५ x ३ ११ २७ .००३६
४ ३/४ x १ ३/४ ६॥ १४ .००३७६
४ x ३ ९॥ १८ .००४५
४ x १ .००४५
३'' x  ३''