प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
              
स्थलजलचर— बेडूक व त्यासारखे इतर प्राणी हे स्थलजलचर प्राणी होत.

ल क्ष णें.— सशीर्ष सपृष्ठवंश प्राण्यांच्या विभागांतील वर्गांपैकीं स्थलजलचर हा एक वर्ग आहे. या वर्गांतील प्राण्यांनां माशांच्या पदयुगुलांच्या ठिकाणीं पंचांगुलींयुक्त गोत्रें असतात. तथापि त्या अंगुलीनां नख्या नसतात. गात्रें शरीराचा भाग सहन करण्याइतकी ताकदवान बनलेली असतात. विजोडपर अथवा मध्यपर असले तरी त्यांनां तरुणास्थींचे किंवा अस्थीचें आधारभूत होणारे दांडे बनलेले नसतात. सशीर्ष प्राण्यांत जलचर व स्थलचर यांच्या मध्यंतरी हे प्राणी सांखळीच्या दुष्याप्रमाणें असलेले दिसतात. या वर्गांतील अगदी खालच्या प्रतीच्या प्राण्यांनां सर्व आयुष्यभर काटे अथवा जलश्वासेंद्रियें व फुप्फुसें हीं दोन्ही असतात; परंतु या वर्गांतील वरिष्ठ दर्जाच्या प्राण्यांत कल्ले अथवा जलश्वासेंद्रियें फक्त प्रथम परिपूर्तितावस्थेंत व नंतर स्थित्यंतर होत असलेल्या अवस्थेंतच असतात. पुढें पूर्णवस्था प्राप्त झाली म्हणजे ती नाहींशीं होऊन श्वसनक्रिया फुप्फुसानें व त्वचेनेंच चालते. यावरून असले प्राणी जलचरस्थितीपासून पूर्णपणें स्थलचर स्थितीप्रत पोंचले आहेत हें स्पष्ट दिसतें.

सर्व स्थलजलचर प्राणी प्राण्यापासून फार दूर रहात नाहींत तथापि स्थलचर स्थितींत राहण्यास अनुकूलता यावी असा ह्यांच्या शरीररचनेंत फरक झालेला असतो. शिवाय नवीन इंद्रियेहि त्यांच्या ठिकाणी उद्भूत झालेलीं असतात. सफुप्फुस माशांमध्ये फुप्फुसें व तीन कर्णांचें हृदय हीं अगदीं आरंभीच्या स्थितींत दिसतात. तशींच तीं या वर्गांत दिसून पूर्णत्वास आलेली असतात. या वर्गांतील प्राण्यांत कल्ले किंवा जलश्वासेंद्रियें नष्ट होतात तेव्हा त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या रचनेंतहि योग्य ते फरक होतात. हृदयाला शिरापात्र उजवा व डावा संचयकर्ण, एक निःसारकर्ण व त्याला जोडून संकोचक उदरतलधमनी असे भाग झालेले असतात. वृक्कोन्मुखी शिरा झालेल्या असून शरीराच्या पश्चिम भागापासून पूर्वभागीं अभिसरण पावणारें थोडें रक्त त्यांच्या वाटे पुढें जातें व बाकीचें रक्त पूर्णेदरशिरांच्या मार्गानें यकृतोन्मुखी शिरांच्या केशवाहिन्यांत अंतर्भूत होतें. रक्तरुधिरपेशी अंडाकृति गोलाकार असून चैतन्यकेंद्रयुक्त असतात व त्या साधारण ठसठशीत अशा बनलेल्या असतात. लसीकावाहिन्या समुह चांगला बनलेला असतो. त्वचेमध्यें रसविमोचक पिंडपेशी असतात व श्वेतत्वचेंतून झालेलें अस्थिमय बाह्यकत्व कित्येकांमध्यें झालेलें असतें. परंतु तें बहुतेकांमध्यें नसते. बाह्यत्वचेंतून कवच कधींच झालेलें नसतें. तोंडाचा खालचा जबडा करोटीला करोटीपैकींच हाडानें संयोजित झालेला असतो; म्हणजे करोटी स्वसंलग्नद्दनु अशी असते व ती पहिल्या कशेरूशीं बाह्य पश्चिमकपालास्थीवरच्या संच्युर्वुद युगुलांच्या योगेंकरून जोडली गेलेली असते. पश्चिमभूमि कपालास्थी व ऊर्ध्वपश्चिमकपालास्थी बहुतकरून बनलेल्या नसतात. परंतु भूमिकीलाकारास्थि कधीच बनलेली नसते. तथापि कृपाणिकास्थी या चांगल्या मोठ्या बनलेल्या असून रक्कमोसल नामास्थीहि चांगल्या रीतीनें बनलेल्या असतात. करोटीच्या कर्णकोशाच्या बाह्याला एक अंडाकृति रंध्र असून त्यांत कर्णपयलाला जोडलेल्या कर्णपटलास्थाचें शेवटचें टोंक बसलेलें असतें. नासिकेचीं आंतरनासाछिद्रें मुखक्रोडात उघडतात. अनुमस्तिष्क फार लहान असतें. निःसारमुष्कस्त्रोतसें वृक्कनलिकांशीं संयोग पावतात व वृक्कस्त्रोतस, जें मध्यमवृक्कनलिकासमुहापासून बनलेलें असतें तें पुढें नरामध्यें मूत्रशुकस्त्रोतसें म्हणून कायम होते. मादीमध्यें हे वृक्कस्त्रोतसच असें राहतें व पूर्ववृक्कनलिकासमूहापासून बनलेल्या स्त्रोतसाचें रूपांतर होऊन त्याचें अंडस्त्रोतस बनतें व याचें पूर्वशेवटचें मुख शररिगृहेंत उघडलेलें असतें. पूर्ववृक्कनलिकासमूह फक्त परिपूर्तितावस्थेंतच उपयोगी असतात व नंतर प्रौढ दशेमध्यें मध्यमवृक्कनलिकासमूहांचेच कायमचे वृक्क बनतात. नालासारख्या भागांतून मूत्राशय बनलेलें असतें. परिपूर्तितावस्थेंतून पूर्णावस्थेंत विकास पावरा असतांना प्राण्याचें रूपांतर होत असतें म्हणजे अंड्यापासून विकास पावून तयार झालेला डिंभ जलश्वासेंद्रियें यांनी युक्त असा प्राणी होतो.

शरीराच्या आकारमानाचा विचार केला असतां स्थलजलचर वर्ग त्याच्या भरभराटीच्या कालापासून आतांपर्यंत बराच खालावला आहे. तथापि हा वर्ग प्रागतिक आहे. कारण यांतील कांहीं प्राण्यांची शरीररचना उरगवर्गांतील प्राण्यांच्या शरीररचनेसारखी झालेली आहे. या वर्गांत महत्त्वाचे प्राणी म्हटले म्हणजे सर्व प्रकारचे बेडूक, न्यूट, सालामांडर आणि सापासारखा सिसीलियन (विरोळा) हे असून निर्वेश व राक्षसी आकाराचे लयबेरिंथोडोटहि मोडतात. या वर्गांचें वर्गीकरण केलें असतां त्यांत पुढील चार गण येतात:- (१) पुच्छयुक्ततनु; उदाहरणार्थ सालामांडर व न्यूट होत. (२) पुच्छ वहीनतनु; उदाहरणार्थ बेडूक. (३) उरगसमतनु; उदाहरणार्थ सिसीलियन; (४) निर्वंशपुच्छयुक्ततनु; उदाहरणार्थ लयाबेरिंथोडोंट.

साधारण जीवनक्रम.— बहुतेक स्थलजलचर पाण्याच्या डबक्यांत व पाणथळ जमिनींत रहातात. पण खारें पाणी म्हणजे त्यांनां अगदीं विष आहे. रूपांतर होऊन पूर्णत्वास आलेले व ज्यांच्यामध्यें जलश्वासेंद्रियांचा मागमूसहि रहात नाहीं असे स्थलजलचर सुद्धां पाण्याचे मोठे चाहते असतात. ते पाण्यापासून फार दूर रहात नाहींत. झाडावर राहणारे काहीं बेडूक आहेत, त्यांनां वृक्षबेडूक म्हणतात. तसेंच कांहीं जातीचे बेडूक जमिनीच्या पृष्ठभागाखालीं रहातात. आल्प्स पर्वतातील काळे सालामांडर पाण्याचीं डबकीं जेथें नाहींत तेथें राहतात. त्यांनां प्रत्येक खेपेला दोन पिलें होतात; व ती उपजतांच फुप्फुसानें श्वसनक्रिया करतात. उपजण्यापूर्वी या पिलांनां कल्ले अथवा जलश्वसेंद्रियें असतात व ती गर्भाशयाच्या त्वचेला अगदीं चिकटून असतात. यामुळें कांहीं शास्त्रज्ञाचें असें मत आहे कीं, रक्तरूधिरपेशी गर्भाशयाच्या कातडींतून या जलश्वासेंद्रियांत शिरतात. कांहीचें असेंहि मत आहे कीं, हीं पिलें गर्भाशयांत आपली उपजीविका दुसरीं अंडी व वाढीस न लागलेले गर्भ यांच्यावर करतात. स्थलजलचर प्राण्यांजवळ आत्मरक्षणाचें कांहींच साधन नाहीं, परंतु यांच्या कातडीचे रंग पुष्कळ वेळां त्यांनां दृग्गोचर होऊं देत नाहींत. पुष्कळांच्या ठिकाणी आपले रंग पालटण्याची ताकद असते. या कारणानें या प्राण्यांची त्वचा ही एक आत्मरक्षणाचें साधनच आहे. त्वचेंत उत्पन्न होणार्या द्रवापासून उग्र व घाणेरडा वास येतो. यामुळें तोहि संरक्षक होतो. पुष्कळ स्थलजलचरांनां एकाकीं राहणें आवडतें. जेव्हां जे माजास येतात तेव्हां त्यांचा जमाव जमतो. अशा वेळीं मदोन्मत्त नर फार मोठ्यांनें ओरडतात. या कालांत व भुकेनें त्रस्त झालेल्या काळांत स्थलजलचरांमध्यें पुष्कळ चपळाई दिसून येते. परंतु एकंदरींत पाहतां हे प्राणी जात्याच सुस्त व आळशी आहेत.

किडे, कीटक व कवचहीन गायगोल्या इत्यादि प्राणी यांचें भक्ष्य होय. कांहीं स्थलजलचर परिपूर्तितावस्थेंत अगदीं कडक शाकाहारी असतात. अन्नावाचून पुष्कळ काळपर्यंत स्थलजलचरांनां राहतां येतें. पुष्कळ स्थलजलचर सुषुप्तावस्थेत चिखलामध्यें पडून रहातात. जमिनीच्या आंत हे जर गढून राहिले तर पुष्कळ काळपर्यंत जिवंत राहूं शकतात. तथापि दगडाच्या अंतर्भागांत जिवंत राहिलेल्या बेडकांच्या गोष्टीमध्यें पुष्कळसा भाग अतिशयोक्तीचा आहे. या वर्गांतील प्राण्यांची प्राणधारणाशक्ती जशी जबरदस्त आहे तशीच शेंपूट अगर गात्रें यांनां जखमा झाल्यावर त्या बर्या होण्याची ताकदहि या प्राण्यांत मोठी आहे.

बेडूक, राना टैग्रिना:— स्थलजलचर वर्गाचा प्रतिरूप बेडूक होय. बेडकाच्या कांहीं जाती आहेत व त्या जातीचें जातिविशेषहि आहेत. राना टैग्रिना हा जातिविशेष साधारणतः या प्रांतांत विशेष आढळतो व तो शरीराच्या मानानें चांगला वाढलेला असल्यामुळें त्याला या वर्गाचा प्रतिरूप कल्पिण्यास सोईस्कर पडतें. पुढें दिलेलें वर्णन त्याला अनुसरून आहे.

बेडकाच्या कवंधाचा भाग आंखूड असतो व त्याचें शीर्ष थोडेसें चपटलेलें असतें. त्याच्या शरीराला मानेचा भाग नसल्यामुळें त्याचें शीर्ष कबंधांत एकदम अंतर्भूत झालेलें दिसतें. याच्या प्रौढावस्थेंत शरीराला पुच्छ असल्याचें कांहींच चिन्ह आढळत नाहीं, पूर्वशेवटला मुख असून तें विशाल असतें व त्याची मर्यादा नेत्रांच्या पाठीमागें बरीच गेलेली असते. गुदद्वार पश्चिमशेवटाला असतें. मुस्कटाच्या पृष्ठावर दोन बारीक नासाछिद्रें असतात. नेत्र विशाल असून कातडीच्या पटाची बनलेली वरची जाड पापणी त्याला झालेली असते व त्याच्या खालच्या सीमेला लागून खालच्या पापणीच्या ऐवजीं वरखाली करतां येण्यासारखा कातडीचा पातळ पडदा झालेला असतो. नेत्रांच्या लगत पाठीमागें जाड कातडीचा ताठ ताणलेला एक गोलाकृति भाग असतो त्याला कर्णपटल म्हणतात. तो माशांमध्यें नसतो. जलश्वासेंद्रियविवर अथवा भेगा यांचा मागमूसहि दिसत नाहीं. बेडूक बसलेला असतांना त्याच्या पाठीला पोंक आल्यासारखें दिसतें परंतु हें खरें पोंक नसून तसा भास होतो. कारण पाठीचा कणा सरळ असतो व त्याला बांक आलेला नसतो. कण्यापैकीं त्रिकदाशेरू व त्याला जोडलेले श्रोणिमंडल स्पष्ट व्यक्त होतात व श्रोणिमंडलाला पश्चिम गात्रांची हाडें जुळलेलीं असतात; त्यापैकीं आदिम हाडामध्यें व श्रोणिपलकामध्यें लघुकोन झाल्यामुळें तसा पोंक आल्याचा भास होतो. पूर्व व पश्चिम गात्रांच्या जोड्या लांबीनें सारख्या नसतात. पूर्वगात्रें तोकडीं असतात व त्यांपैकीं प्रत्येकाला प्रचंड, प्रकोध व हस्त असे तीन भाग असतात. हस्ताला निमुळत्या चार अंगुली असतात. पश्चिमगात्रें लांबलचक असतात व त्यापैकीं प्रत्येकाला ऊरू, जंघा व पाद हे तीन भाग असतात. पाद जणूं काहीं दोन भागांचा झालेला दिसतो. त्याचा आदिम भाग तो खोट्याचा भाग असून तो पुढें पसरट असा बनलेला असतो व त्याच्या पुढचा अंतिम भाग पांच अंगुलीयुक्त असा झालेला असतो. अंगुली एकमेकींनां कातडीनें जोडलेल्या असतात. त्वचेमध्यें पिंडपेशी बनलेल्या असल्यामुळें ती बुळबुळीत चिकट असते. त्वचेमध्यें कवचरूपी कठिण भाग कसलेहि बनलेले नसतात. बेडकामध्यें लिंगभेद कांहीं बाह्य चिन्हांवरून ओळखतां येतो. नरामध्ये मुखाच्या खालच्या व वरच्या जबड्यांच्या संधिकोनाजवळ कातडीचा भाग पातळ व शिथिल बनून त्याची घडी बसलेली असते व त्यामुळें एक पोकळ कोश बनतो त्याला ध्वनिकोश म्हणतात.

अस्थिपजर अथवा सांगाडा:— बेडकाचा पाठीचा कणा म्हणजे पृष्ठवंश आंखूड असून त्याच्यांत पृष्ठवंशाचे नेहमींचे विभाग दिसून येत नाहींत. त्याचा पृष्ठवंश दोन विभागांचा झालेला दिसतो. पूर्वविभाग एकमेकांपासून अलग अशा नऊ कशेरूंचा झालेला असतो व पश्चिमविभाग दांड्याप्रमाणें दिसणारा व त्यांत भाग पडलेले नाहींत असा असतो; त्याला पुच्छकशेरू म्हणतात. दुसर्या कशेरूपासून सातव्या कशेरूपर्यंत सर्व कशेरू सारखे असतात. यांतील प्रत्येकाचें कशेरू घन थोडेसें चपटलेलें असून तें पूर्वशेंवटी कटाहाकृति असतें व पश्चिमशेवटी गोलाकार असतें म्हणून त्या कशेरूंना पूर्वखात असें म्हणतात. कशेरूवलयाचा आरंभ कशेरूघनापासून प्रत्येक बाजूस होतो. परंतु हें वलय आरंभीं दोहोबाजूस दांड्याप्रमाणें वर्तुळाकार असून पुढें उर्ध्वभागीं चपटलें जातें. जेव्हा हे कशेरू एकमेकांना जोडलेले असतात तेव्हां दोन लगत जवळ जवळ असलेल्या कशेरूंच्या कशेरूवलयाच्या या दांड्याप्रमाणें वर्तुळाकार आरंभाच्या भागांत जागा राहते, तिला कशेरूमध्यवर्ती छिद्र असें म्हणतात व त्या छिद्रांतून प्रत्येक बाजूस एक सुषुम्णाज्ञानरज्जू बाहेर पडते. कशेरूवलयाच्या गोलाकार व चपटलेल्या संधिभागावर संध्यधुंद झालेले असतात. संध्यबुंदांची एक पूर्वजोडी पृष्ठावर व दुसरी पश्चिमजोडी उदरतलाच्या भागावर झालेली असते. तेव्हां पश्चिम संध्यर्बुदाची जोडी ही लगत पाठीमागें असलेल्या कशेरूच्या पूर्वसंध्यर्बुदांच्या जोडीशीं जुळलेली असतें. कशेरूवलयापासून कशेरूच्या प्रत्येक बाजूस बाह्य दिशेस एक एक कशेरूवाहू झालेला असतो. पहिल्या कशेरूला कशेरूघनाचा भाग झालेला नसतो असें म्हटलें री चालेल. व त्याला कशेरूवाहूहि नसतात. त्याला पूर्वसंध्यर्बुदें अशीं झालेलीं नसून त्याच्या वलयाच्या आरंभाच्या भागाला संधिस्थलें प्रत्येक बाजूस एक अशीं झालेली असतात, त्याच्या योगानें त्याच्या करोटीशीं संयोग होतो. आठव्या कशेरूचें कशेकघन पूर्व व पश्चिमरीत्या कटाहाकृति बनलेलें असतें म्हणून त्याला द्विखातकशेरू म्हणतात. नवव्या कशेरूचें म्हणजे त्रिककशेरूचें कशेरूघन पूर्वशेवटीं गोल असतें. तसेंच त्याचें पश्चिमशेवटहि गोल असून दुभागलेलें असतें. हे दुभागलेल्या पश्चिमशेवटाचें दोन गोलाकार भाग पुच्छकशेरूच्या दोन पूर्वखळग्यांत बसले जातात.

करोटी ही मस्तिष्कावरण किंवा मस्तिष्ककोश आणि त्याला त्याच्या पश्चिमभागीं लागलेले कर्णकोश व पूर्वभागीं लागलेले नासाकोश या दोहोंची मिळून बनलेली असते. वरच्या जबड्यांचीं हाडें अचल अशा रीतीनें मस्तिष्ककोशाला जोडलेलीं असतात. खालचा जबडा हाच काय तो हालणारा करोटीचा भाग होय. त्याशिवाय करोटीचा हालणारा भाग म्हटला म्हणजे मुखक्रोडाच्या उदरतलाच्या भित्तीमध्यें असलेला तगटासारखा जिव्हातरुणास्थितसमूह होय. माशांच्या करोटींतील शारीरिक वलयाच्या ऐवजी किंवा जलश्वासेंद्रियांच्या कमानीच्या समूहाऐवजीं स्थलजलचरामध्ये हा शेवटचा भाग कायतो झालेला असतो. मस्तिष्ककोशाच्या पूर्वशेवटीं नासामध्यगत विरळास्थि बनलेली असते. तिच्या पृष्ठाचा व बाजूचा भाग पुरःपार्श्वकपालास्थींच्या जोडीचा झालेला असतो. बेडकाच्या बाल्यावस्थेंत पुरःकपालस्थि व पार्श्वकपालास्थि हीं दोन हाडें निराळीं असतात. परंतु पुढें ती संयुक्त होऊन त्यांचीहि एक जोडी बनते. मस्तिष्ककोशाच्या उदरतलाचा भाग कृपाणिकास्थीचा बनलेला असतो. व त्याच्या पश्चिमशेवटीं फक्त बाह्यपश्चिमकपालास्थी व कपालमहाविवराच्या दोन्ही बाजूवर पसरून बनलेल्या असतात. ऊर्ध्वपश्चिमकपालास्थि व भूमिपश्चिमकपालास्थि या मुळीच झालेल्या नसतात. कपालमहाविवराच्या खालच्या बाजूवर दोन अंडाकृति संध्यर्बुदें या बाह्यपश्चिम कपालास्थींनां लागलेलीं असतात व तेणेंकरून करोटी पहिल्या कशेरूशी संयोग पावते. प्रत्येक बाजूच्या नासाकोशावर एक त्रिकोना नासास्थि लागलेली असते. व या नासाकोशाच्या उदरतलाच्या भागी एक एक लहान दंतयुक्त तालुगतास्थि लागलेली असते. त्याच ठिकाणी थोडेसें पश्चिमभागीं प्रत्येक बाजूवर एक एक लांब दांड्याप्रमाणें असणारी ताल्वस्थि आडवी लागलेली असते. वरच्या जबड्याची कमान मध्याच्या प्रत्येक बाजूवर तीन अस्थी मिळून झालेली असते. मधोमध दंतयुक्त पूर्वमुखास्थीची जोडी असून त्यांच्यापुढें दंतयुक्त मुखास्थीची जोडी बनलेली असते व त्यांच्यापुढें कमानीच्या शेवटी हन्वस्थिसंधिज जोडीनें झालेले असतात. ही कमान वर सांगितलेल्या आडव्या ताल्वस्थीनें मस्तिष्ककोशाशी जोडली जाते व तिला शेवटच्या भागीं बळकटी येण्यास ती पुन्हां पृष्ठभागीं स्केमोसोल नामस्थीनें जोडली जाते व उदरतलाच्या भागीं त्रितारकिद अशा टेरोगॉईड नामास्थीनें जोडली जाते. वरचा जबडा खालच्या जबड्याशीं हनुसंघानास्यीनें जोडला जातो. ही हनुसंघानास्थि तरुणास्थीच्या रूपांतच असते व ती हन्वस्थिसंधिव गर्तेमध्यें बसलेलीं असते. खालचा जबडा मेकेल तरुणास्थीचा बनलेला असून त्याला वरून प्रत्येक बाजूस दोन अस्थींचें वेष्टन झालेलें असतें. मधोमध दंतास्थीची जोडी असून त्यांच्यापुढें अँग्युलोस्थीनीअल नामास्थीची जोडी असते. प्रत्येक बाजूचा भाग मध्याला मेन्टोमेकेल तरुणास्थीनें जोडलेला असतो व हा एकंदर जबडा दंतविहीन असतो.

शाखागत अस्थिपंजराचा भाग सुटला म्हणजे अंसमंडळ व त्याला जोडलेल्या पूर्वगात्रांच्या अस्थी तसेंच श्रोणिमंडल व त्याला जोडलेल्या पश्चिमगात्रांच्या अस्थी मिळून झालेला होय. अंसमंडल हें पाठीच्या कण्याशीं संयुक्त झालेलें नसतें. दोन्ही बाजूवर पाठीकडे वळलेला त्याचा भाग अस्थीचा झालेला असून त्या अस्थींनां अंसफलक म्हणतात. ह्यांच्या पुढचा भाग पाठीवर वळलेला असून तो साधारणतः तरुणास्थीचा बनलेला असतो. त्या प्रत्येक भागाला ऊर्ध्वअंसफलक म्हणतात. या अंसमंडलाच्या उदरतलाचा भाग अंसचंचू हा पश्चिम भागीं व जत्रुपूर्वभागीं मिळून झालेला असतो. उदरतलाच्या मध्याला हे दोन्हीकडचे भाग एका तरुणास्थीला योगेंकरून संयुक्त झालेले असतात. या तरुणास्थीला ऊर्ध्वअंसचंचु म्हणतात. या ऊर्ध्वअंसचंचूच्या पूर्वशेवटी एक दांड्याप्रमाणें अस्थि बनलेली असते तिला पूर्वउरोस्थि म्हणतात व तिच्या शेवटाला एक गोलाकार तरुणास्थिचें तगट झाललें असतें. तसेंच या ऊर्ध्वअंसचंचूच्या पश्चिमशेवटीं एक जाड दांड्याप्रमाणें अस्थि बनलेली असते तिला उरोस्थि असें म्हणतात व तिच्या शेवटालाहि एक गोलाकार तरुणास्थीचें तगट झालेलें असतें.

सपृष्टवंशाच्या पंचांगुलीयुक्त गात्रांच्या प्रतिरूपक गात्रांच्या हाडांच्या रचनेहून याच्या पूर्वगात्राच्या हाडांत जो थोडा फरक आहे तो हाच कीं, याच्यांत अक्षक व कूर्परास्थि हे संयोग पावून त्यांचें एकच संयुक्त हाड बनलेलें असतें त्याला अक्षककूर्परास्थि म्हणतात. दुसरा फरक हा कीं याच्या हस्ताला चारच अंगुली असतात.

श्रोणिमंडलामध्यें बराच फरक झालेला असतो. त्रिककशेरूंच्या प्रत्येक बाहूपासून पाठीमागें दांड्यासारखे दोन लांब बांकदार दांडे निघून ते त्यांच्या पश्चिमशेवटीं एका चपटलेल्या उभ्या अस्थीच्या व तरुणास्थीच्या झालेल्या बेडौल तबकडीमध्यें शेवट पावतात व तिच्या योगेंकरून जुळले जातात. ह्या उभ्या तबकडीच्या प्रत्येक बाह्यांगाला एक खोल अर्धगोलाकार उर्वस्थिसंधिविवर असतें त्याच्याशीं प्रत्येक बाजूची उर्वस्थि संयोग पावते. हें बांकादर दांडे म्हणजे कटिकपाल होत. त्यांच्या पश्चिम शेवटीं ते चपटले जाऊन एकमेकांनां या चपटलेल्या शेवटांनीं कबंधाच्या मध्याक्षावर जोडले जातात. उर्वस्थिसंधिविवराच्या पृष्ठाचा व बहुतेक अर्धा भाग व चपटलेल्या शेवटांचाच झालेला असतो. या चपटलेल्या उभ्या तबकडीचा व उर्वस्थिसंधिविवराचा पश्चिम भाग ककुंदरास्थींचा जोडून बनलेला असतो. तसेंच या तबकडीचा व उर्वस्थिसंधिविवराचा उदरतलाचा भाग दोन भगास्ति मिळून झालेला असतो.

पश्चिमगात्रांच्या जोडीमध्यें अंधास्थि व बहिर्णेधास्थि या संयोग पावून त्यांचे एक संयुक्त हाड बनलेलें असतें. पादाच्या आदिम भागांतील म्हणजे खोट्याच्या भागांतील कूर्चशीर्ष व पार्ष्णि ही हाडें लांबट बनलेली असल्यामुळें पाद दोन भागांचा झालेला दिसतो. प्रत्येक पादाला पांच अंगुली असतात व त्याच्या कुर्चशीर्षाच्या बाजूवर एक जास्त अंगुलीप्रमाणें अस्थियुक्त कंटक झालेला असतो.

पचनेंद्रियें:— मुखापासून पुढें मुखक्रोड लागतो. याच्या वरच्या भागांत पश्चिम अथवा आंतरनासाद्वारें असतात. डोळे मोठे असल्यामुळें त्यांची खालच्या बाजूला झालेलीं अर्बुदें मुखक्रोडांत दिसतात. तसेंच त्यांत मुखक्रोडकर्णविवरसंघिनलिकाछिद्रें दिसतात. मुखक्रोडांत भूमिभागावर मोठी जीभ असते. ही पूर्वशेवटीं निबद्ध झालेली असून पश्चिम शेवटीं मोकळी असते. या शेवटाला हिला दोन टोंकें झालेलीं असतात. जीभेची ठेवण अशी असल्यामुळें ती आपल्या स्नायूंच्यामुळें वाटेल तेव्हां टोंकें पुढें करून बाहेर येऊं शकते व यामुळें बेडकाला कीटक चटदिशी पकडतां येतात. जिभेच्या मागच्या बाजूला ध्वनियंत्रमुख असतें. वरच्या जबड्याच्या धारेला एकाच पंक्तीनें दांत लागलेलें असतात व हे दांत पुरोमुखास्थि व मुखास्थि यांनां लागलेले असतात. आंतरनासाद्वारांच्या थोडेसें आंतल्या बाजूस तालुगतास्थीवरहि दांत बसलेले असतात. हे सर्व दांत टांचण्यांप्रमाणें अणीदार असल्याकारणानें चर्वणक्रियेंत ते उपयोगी पडत नाहींत. तरी पकडलेला पदार्थ अथवा प्राणी परत बाहेर निसटून जाऊं न देणें याप्रकारें यांचा उपयोग होतो. मुखक्रीडा गलविवराच्या बाजूकडे अरूंद होत जातें. गलविवरानंतर अन्ननलिकेस आरंभ होतो ही फार लहान असते. ही जठरामध्यें अंतर्भूत होते. जठर रुंद नलिकाकार असून त्याचा आदिम भाग रूंद असतो व अंतिम भाग अरुंद व तोकडा असतो. जठराच्या पश्चिम शेवटापासून आंत्राचा भाग लागतो. आंत्राच्या आरंभीच्या भागांत यकृतस्त्रोतस व पक्कस्तोतच उघडतात म्हणून या भागाला पक्काशय म्हणतात. हा जठराशीं समानांतर असतो. याच्या पुढें तन्वांत्र लागतें व त्याची वेटोळी बनलेलीं असतात. तन्वांत्रापुढें बृहदांत्र लागतें. हें फार रुंद व लांबीनें कमी असतें. ॠज्वांत्रहि तेंच होय. याच्या आकारमानांत बदल न होतां हें पुढें पश्चिमबाह्यत्वचाविवरांत शेवट पावतें.

यकृताचे दोन भाग आहेत : या दोहोंमध्ये एक मोठा पित्ताशय असतो. पित्तस्त्रोतसाभोंवती पक्कपिंड बनलेला असतो याला स्वतंत्र स्त्रोतस नाहीं. याचा रस पित्तस्त्रोतसाच्या मार्गानें पक्वाशयांत जातो. फ्लीहा ही लहान ताम्रवर्णी व गोलाकार असून ॠज्वांत्राच्या आदिम भागीं आंत्रकलेला चिकटलेली असते.

श्वसनेंद्रियें:- बेडकाचीं फुप्फुसें हीं स्थितिस्थापक असून पिशव्यांच्या आकाराचीं असतात. शरीरगुहेच्या आदिम भागीं यकृत व हृदय यांच्या वरच्या बाजूला हीं असतात. बिस्तरांच्या मानानें त्यांचा आकार व स्वरूप हीं बरींच बदलतात. प्रत्येक फुफ्फुसाचें विवर असून तें बरेंच मोठें असतें व त्याच्या भित्तीवर उंचवटे झालेले असून त्यांचें एक जाळेंच बसललें दिसतें. या उंचवट्यामध्यें रक्तवाहिन्या विपुलतेनें बनलेल्या असतात. ध्वनियंत्र व महाश्वासनलिका यांचें मिळून बनलेल्या एका विवरांत दोन फुफ्फुसें उघडतात. या विवरांचा मुखक्रोडाशीं ध्वनियंत्रमुखाच्याद्वारें संयोग होतो. या विवराच्या मित्तींनां तरुणास्थीचा आधार आहे; आणि याच्या श्लेष्मकलाच्छादित पोकळींत क्षितिजाबरोबर श्लेष्मकलेच्या दोन सपाट घड्या पडतात त्याच स्वरतंतू होत. या स्वरतंतूंच्या कंपनानें बेडकाला ध्वनि उत्पन्न करतां येतो. श्वसनक्रिया करितांना बेडूक तोंड बंद करितो; नंतर मुखक्रोडाचा भूमितल स्नायूंच्या संकोचानें खालीं रेटतो अथवा नमवितो; यामुळें मुखांतील पोकळीची वाढ होते व त्यामुळें नाकावाटें बाह्यनासाद्वारानें हवा मुखक्रोडांत शिरते. नंतर पडद्यांच्या साहाय्यानें नासाद्वारें बंद होतात व मुखक्रोडाचा भूमितल वर उचलला जातो. तेव्हां आंतील हवेवर दाब पडून ती ध्वनियंत्रमुखाच्याद्वारें फुफ्फुसांत मारली जाते. बाह्य नासाद्वारें पुनः उघडीं झाल्याबरोबर आंत सारलेली जास्त हवा नासाद्वारांच्या वाटें बाहेर निघून जाते. बेडकाची ही श्वसनक्रिया पुष्कळ अंशीं कातडींतून चालू असते. कारण कातडी ही एकप्रकारचें श्वसनेंद्रिय आहे.

हृदय व रुधिरवाहिनीसमूह:- बेडकाचें हृदय हें शिरापात्र, उजवा व डावा असें दोन संचयकर्ण, एक निःसारकर्ण आणि संकोचक उदरतलधमनी मिळून बनलेलें असतें. शिरापात्रांतून रुधिरप्रवाह उजव्या संचयकर्णांत जातो व फुफ्फुसशिरांतून डाव्या संचयकर्णांत येतो. या दोन संचयकर्णांमध्यें एक पडदा असतो. सफुफ्फुस माश्यापेक्षां स्थलजलचरांमध्यें जास्त प्रगतिपर विकास झालेला आहे हें बेडकाचें डावे संचयकर्ण आकारमाननें जास्त विकास पावलेलें असतें यावरून व उजव्या व डाव्या संचयकर्णांमधील पडदा अगदीं पूर्णत्वानें बनलेला आहे यावरून खास सिद्ध होतें. या पडद्यामुळें हे दोन्ही संचयकर्ण एकमेकांपासून अगदीं अलग राहतात व ते दोन्हीं शेंवटी निःसारकर्णांत एकाच द्वारानें उघडतात व या द्वाराला पडद्यांची एक जोडी लागलेली असतें. निःसारणकर्णाची पोकळी आडवी बनलेली असून तिच्या पृष्ठावरच्या व उदरतलावरच्या भिंतीला आंतून मांसल उंचवटे झालेले असतात व या उंचवट्यांच्या मध्यंतरी खळग्या राहतात. येणेंकरून निःसारकर्णाच्या पोकळीचे जणूं कांहीं तीन भाग पाडतात ते असे:— एक उजवीकडील, एक डावीकडील व एक मध्यंतरीं. निःसारकर्णाच्या तळाच्या उजवीकडून संकोचक धमनीचा आरंभ होतो व तिच्यामध्यें एक अर्धचंद्रकृति तीन दलांचा पडता आहे. तिच्यांत तिच्या लांबीपर्यंत एक उभा पडद्याप्रमाणें पदर झालेला असतो. तो तिच्या पृष्ठापासून उगम पावलेला असतो परंतु उदरतलाला सुटा असतो. संकोचक उदरातलधमनी तिच्यामध्येंहि कांहींहि फरक न होता उदरतलधमनीमध्यें अंतर्भूत होते. या दोहोंच्या मध्यंतरीं अर्थचंद्राकार पडदा असतो व वर सांगितलेला ऊर्ध्व पडदाहि तेथेंच शेवट पाडतो. या उदरतलधमनीपासून एक डावीकडे व दुसरी उजवीकडे अशा दोन शाखा उत्पन्न होतात व त्या प्रत्येक शाखेपासून त्यांच्यांत उभे पडदे तयार होऊन, तीन तीन एका पाठीमागून एक अशा धमन्यांच्या कमानी निघतात. सर्वांत पूर्वशेवटची कमान ही ग्रीवाधमनीची होय, मधली महाधमनीची होय व पश्चिमशेवटची फुफ्फुस-त्वचाधमनीची होय. या प्रत्येक बाजूवरील तीन कमानीपैंकी फुफ्फुसधमनीचा उगम संकोचक उदरतल धमनीच्या पूर्वशेवटाशींच होतो. आणि महाधमनी आणि ग्रीवाधमनी यांच्या कमानीचा प्रारंभ साधारणतः त्या दोन शाखांपासून होतो. तशांतून ग्रीवाधमनीच्या कमानीचा आरंभ सर्वांत पूर्वशेवटी होऊन तिच्या आरंभीं एक गड्डा बनलेला असतो. या कमानीपासून जिव्हाधमनी व ग्रीवाधमनीं निघतात व त्यांच्यामुळें शीर्षाच्या भागांत रुधिराभिसरण होतें.

अन्ननलिकेच्या पृष्ठावर दोन्ही बाजूवरील महाधमनीच्या कमानीचा संयोग होऊन महाधमनीचा आरंभ होतो व तिच्या शाखांतून व उपशाखांतून शीर्षाचा भाग खेरीज करून, तसेंच त्वचा व फुफ्फुस, ह्यांशिवाय सर्व शरीरभर रुधिराचें अभिसरण होतें. प्रत्येक कमानीपासून जत्रुधमनी निघते. व पुढें ही महाधमनी, जठरांत्रकलाधमनी, वृक्कधमनी, जननेंद्रियधमनी इत्यादि शाखा फोडून पश्चिमशेवटीं दोन उभयोरुगामी धमन्यांमध्यें दुभागली जाते. प्रत्येक उभयोरुगामी धमनी पश्चिमगात्रांत रुधिर नेते. फुफ्फुसत्वचाधमनीच्या कमानीपासून त्वचाधमनी व फुफ्फुस-धमनी या निघतात व त्या त्वचेंमध्यें व फुफ्फुसांत रुधिर नेतात.

शीर्षाच्या प्रत्येक बाजूवरून आंतरग्रीवाशिरा व बाह्यग्रीवाशिरा यांच्या योगेंकरून रुधिर परत हृदयाकडे वळतें. ह्या दोन शिरांनां दोन्ही बाजूवरील जत्रुशिरा मिळतात व त्यांच्या संयोगानें दक्षिणऊर्ध्वमहाशिरा व वामऊर्ध्वमहाशिरा अशा दोन ऊर्ध्वमहाशिरा तयार होतात व ही प्रत्येक बाजू वरील ऊर्ध्वमहाशिरा शिरापात्राच्या पूर्वशेवटीं त्या त्या कोनांत अंतर्भूत झालेली असते. कबंधाच्या पश्चिमभागांतून हृदयाकडे वर येणारें रुधिर माशांच्या शरीरांतील रचनेपेक्षां थोड्याशा निराळ्या तर्हेनें अभिसरण पावतें. याचें कारण मुख्यतः बेडकामध्यें शेपूट नाहीं हें होय. प्रत्येक पश्चिम गात्रांतून रुधिर बहिरुरुशिरा व अंतरुरुशिरांच्या योगें वर चढतें. बहिरुरूशिरा शरीरगुहेमध्यें आल्यावर एक पृष्ठाकडे जाणारी व दुसरी उदरतलाकडे जाणारी अशा दोन शिरांमध्ये दुभागून जाते. पृष्ठाकडे जाणार्या या शाखेला अंतरुरुशिरा मिळते व यांच्या या संयोगानें वृक्कोन्मुखी शिरा बनते व ही वृक्कोन्मुखी शिरा वृक्काच्या बाह्यकांठावर पसरून अनेक शाखांनीं वृक्कांतील केशवाहिन्यांत शेवट पावते. बहिरुरुशिरांच्या उदरतलाकडे जाणार्या प्रत्येक बाजूवरच्या शाखा यांनां शरीरगृहेंत श्रोणिशिरा म्हणतात व त्या एकमेकीशीं संयोग पावतात व या संयोगापासून वर जाणारी एक शिरा बनते तिला पूर्वोदरशिरा म्हणतात व ती यकृतामध्यें शेवट पावते. जेथें यकृतामध्यें ही पूर्वोदरशिरा शेवट पावते त्याच ठिकाणीं यकृतोन्मुखी शिरा तिला मिळते. जठर, आंत्र, प्लीहा व पक्वपिंड यांच्यातून अभिसरण पावणारे रुधिर यकृतोन्मुखी शिरेंत एकवटतें व तें तिच्या मागें यकृतामध्यें जातें. प्रत्येक वृक्कामधून अभिसरण पावून रुधिर अनेक शिरांच्या द्वारें बाहेर पडतें व ह्या सर्व शिरा त्या दोन वृक्कांच्या मध्यंतरीं एकवटून जाऊन त्यांच्यापासून एक मध्यवर्ती अधोमहाशिरा उगम पावते. ही अधोमहाशिरा वरच्या अंगाला गति घेत शिरापात्रांत त्याच्या पश्चिमशेवटीं उघडते. जेथें ही अधोमहाशिरा उघडते त्याच ठिकाणी यकृतापासून निघालेल्या दोन यकृतशिरा दोन बाजूंस उघडतात.

याप्रमाणें कबंधाच्या पश्चिम भागांतून अभिसरण पावणारें कांहीं रुधिर यकृतोन्मुखी शिरांच्या द्वारें यकृतांतून अभिसरण पावून व कांहीं रुधिर वृक्कोन्मुखी शिरांच्या द्वारें वृक्कांमधून अभिसरण पावून हृदयामध्यें दाखल होतें. फुफ्फुसांत अभिसरण पावणारें रुधिर तेथें प्राणवायूशीं संलग्न होऊन फुफ्फुसशिरामार्गें सरळ हृदयाच्या डाव्या संचयकर्णांत येतें.

वरील रचनेवरून असें दिसून येतें कीं, हृदयाच्या उजव्या संचयकर्णांत सांठणारें रुधिर अशुद्ध असतें. तें शिरापात्र प्रथमतः संकोच पावून या संचयकर्णांत येतें. संचयकर्ण एकाच वेळेस संकोच पावतात तेव्हां त्यांच्यांतील रुधिर निःसारकर्णांत प्रवेश करतें. हें रुधिर निःसारणकर्णांत त्याच्या डाव्या, उजव्या व मधल्या अपूर्ण पोकळ्यांच्या भागांत सांठते. शुद्ध व अशुद्ध रक्ताची विशेष भेसळ होण्यापूर्वीच निःसारकर्ण संकोच पावतें. उदरतलधमनी निःसारकर्णाच्या उजव्या कडेपासून उगम पावत असल्यामुळें निःसारकर्णाच्या उजव्या भागांत असलेलें रुधिर त्यावाटें एकदम बाहेर पडतें. म्हणजे पहिल्या प्रथम अशुद्ध रक्त चट्कन बाहेर निघतें. तें फुफ्फुसत्वचाधमनीच्या कमानीवाटें फुफ्फुसांत व त्वचेंत अभिसरण पावतें. फुफ्फुसाभिसरणाचा एकंदर मार्ग आंखूड असून त्यांतील रुधिराचा दाबहि कमी असतो. त्याकारणानें व फुफ्फुसत्वचाधमनीच्या कमानीचा उगमहि संकोचक उदरतलधमनीच्या आरंभापासूनच झाला असल्याकारणानें अशुद्ध रुधिर त्या मार्गानें एकदम बहुतेक फुफ्फुसांत व थोडें त्वचेंत असें निघून जातें. आतां त्या मार्गांत एकदम रुधिर शिरत्वानें रुधिराचा दाब तेथें जास्त वाढतो व त्यामुळें पाठीमागून येणारें रुधिर पुढें उदरतलधमनीच्या वाटें वर चढून महाधमनीच्या कमानीच्या मार्गानें जाऊं लागलें. कारण तिच्यामधला रुधिराचा दाब वरच्यापेक्षां कमी पडतो. तसेंच तिचा उगमहि लगेच झालेला असतो. परंतु हें महाधमनीच्या कमानीच्या मार्गानें जाणारें रुधिरनिःसारकर्णाच्या मधोमधच्या भागांतलें असल्यामुळें तें शुद्ध-अशुद्ध मिश्रित रुधिर होय. तेव्हां बेडकाच्या कबंधाच्या भागांत मिश्र रुधिर अभिसरण पावतें. यापुढें उदरतलधमनींत निःसारकर्णांतून येणारें रुधिर म्हणजे त्याच्या डाव्या कोपर्यांत सांठलेलें शुद्ध रुधिर होय. हें शुद्ध रुधिर आतां ग्रीवाधमनीच्या कमानीवाटें शीर्षाच्या भागांत जातें. कारण उदरतलधमनीमध्यें रुधिराचा दाब आतां विशेष वाढला गेल्यामुळें व फुफ्फुसत्वचाधमनी व महाधमनी यांच्या कमानी रुधिरानें भरून त्यांच्यांतील रुधिराचा दाब जास्त असल्यामुळें हा ग्रीवाधमनीच्या कमानीचा मार्ग मोकळा होतो. ग्रीवाधमनीच्या कमानीच्या आरंभी जो छिद्रयुक्त गड्डा झालेला असतो त्याच्यामुळें रुधिर एकदम तिच्यावाटें वर चढूं शकत नाहीं. रुधिराचा पुष्कळसा दाब तयार झाल्यावर तिचा मार्ग मोकळा होतो व तो होईपर्यंत अशुद्ध व मिश्र रुधिर निःसारकर्णांतून वर सांगितलेल्या दोन मार्गांनीं निघून जातें हें खरे. याप्रमाणें निःसारकर्णांत बाकी राहिलेलें शुद्ध रुधिर त्याच्यांतून शेवटीं बाहेर पडून शीर्षाच्या भागांत अभिसरण पावतें व या योजनेनें मेंदूला शुद्ध रक्त पोहोंचतें.

रुधिराच्या घटकरचनेसंबंधीं पाहिलें असतां रुधिर हें रुधिरद्रव व रुधिरपेशी मिळून झालेलें आहे. रक्तरुधिरपेशीं अंडाकृति गोलाकार असून सकेंद्र असतात.

बेडकामध्यें लसीकावाहिनीसमूह चांगल्या तर्हेनें विकास पावलेला असतो व त्याच्या कांहीं लसीकावाहिन्या विस्तृत अशा बनून त्यांची लसीकापात्रें बनलेलीं असतात. पृष्ठवंशाच्या उदरतलाच्या भागीं महाधमनीच्या सभोवतीं एक लसीकापात्र झालेलें असतें. बेडकामध्यें लसीकानिःसारकर्णांचीं दोन युंगुलें बनलेलीं असून तीं जवळपास असलेल्या शिरांमध्यें संकोचविकासानें लसीका सोडतात. एक युगल ऊर्ध्वअंसफलकाच्या खालीं बनलेलें असतें व दुसरें पुच्छकशेरूच्या पश्चिमशेवटीं बनलेलें असतें.

ज्ञानेंद्रियसमूह आणि ज्ञानेंद्रियें:- सपृष्ठवंशांतील पूर्णवंशाच्या सशीर्षविभागांतील प्राण्यांच्या साधारण विवेचनांत सांगितल्याप्रमाणें बेडकाच्या मेंदूला नेहमींचे सर्वसाधारण भाग बनलेले असतात तरी त्याचें अनुमस्तिष्क अगदीं लहान असते. आकारमानानें त्याच्या चक्षुमस्तिष्काचीं जोडी मोठी झालेली असते व प्राणमस्तिष्कखंड अगदीं संयुक्त झालेले असतात. मस्तिष्कज्ञानरज्जूंच्या दहा जोड्या असतात. सुषुम्णा आंखूड असून ती पश्चिमशेवटीं एका तंतुमय भागामध्यें शेवट पावते. पृष्ठवंशाच्या कशेरूंच्या संख्येबरोबर सुषृम्णारज्जूच्या दहा जोड्या बनलेल्या असतात. दुसरी व तिसरी सुषृम्णारज्जू मिळून बाहुज्ञानरज्जू होते व सात ते दहा सुषृम्णारज्जू एकवटून त्रिक्कटिज्ञानरज्जूसमूह होतो व त्यापासून पश्चिम गात्रांनां ज्ञानरज्जू पुरविल्या जातात. नासिका, चक्षु व कर्णेंद्रियें हीं जोडीनें बनलेलीं असून बेडकाच्या शरीरांतील ही विशिष्ट ज्ञानेंद्रियें होते.

वृक्क-जननेंद्रिय समूह:- शरीरगुहेच्या पश्चिमशेवटीं बेडकाच्या कबंधांत वृक्कांची एक जोडी चपटलेली, लंबगोलाकार व तांबड्या रंगाची बनलेली असते. प्रत्येक वृक्काच्या उदरतलाच्या भागावर पिंवळा असा थोडा भाग असतो त्याला अॅड्रीनल म्हणतात. प्रत्येक वृक्काच्या पश्चिमशेवटीं बाहेरच्या कांठापासून एक वृक्कस्त्रोतस निघतें व तें पश्चिमबाह्यत्वचाविवरांत त्याच्या पृष्ठाच्या भागांत उघडतें. याच विवरांत त्याच्या उदरतलाच्या भागीं मूत्राशय उघडतें. हें नाजूक, पातळ व दुभागलेलें असें असतें व त्यांत पश्चिमबाह्यत्वचाविवरांत आलेलें मूत्र परत उलटून जाऊन सांचतें.

वृक्कांच्या पूर्वशेवटीं व त्यांच्या उदरतलाजवळ पुंजननेंद्रियें अथवा मुष्क बनलेले असतात व ते मुष्क आंत्रकलाच्या योगानें त्यांनां लागलेले असतात. या मुष्कांच्या जोडीपैकीं प्रत्येकीच्या आंतल्या कांठापासून पुष्कळ स्त्रोतस निघून ते वृक्कांमध्यें शिरतात व तेथें वृक्कनलिकांशीं संयोग पावतात. यामुळें बेडकाचें रेत वृक्कनलिकांच्या द्वारें वृक्कस्त्रोतसाच्या मार्गे बाहेर पडतें. तेव्हां नरामध्यें वृक्कस्त्रोतस हें वृक्कजननेंद्रियस्त्रोतस होय. मुष्काला लागून चकचकीत पिवळ्या रंगाचे व पुष्कळ विभागांचे असे मेदपिंड झालेले असतात. अंडकोश अथवा स्त्रीजननेंद्रियांची जोडी झालेली असून प्रत्येक अंडकोश दुमडलेल्या मोठ्या पिशवीप्रमाणें असतो व त्याच्या पृष्ठावर सफेत-काळ्या रंगाचीं अंडी पुढें बाहेर आलेलीं असतात. प्रत्येक अंडकोशाला सुद्धां मेदपिंड लागलेला असतो. प्रत्येक अंडस्त्रोतस हा एखाद्या लांब नागमोड्या नलिकेप्रमाणें असून त्याचें पूर्वशेवट अरुंद असतें व तें शरीरगुहेंत फुफ्फुसाच्या तळाशीं एका छिद्रानें उघडतें. अंडीस्त्रोतसाचें पश्चिम शेवट रुंद, पातळ असें बनलेलें असून तें पश्चिमबाह्यत्वचाविवरांत उघडतें. अंडीं अंडकोशाच्या पृष्ठापासून मोकळीं झाल्यावर अंडस्त्रोतसांच्या शरीरगुहेंतील छिद्रांत प्रवेश करतात व अंडस्त्रोतसांच्या मार्गानें बाहेर पडतात. अंडस्त्रोतसांची भित्ति आंतल्या बाजूनें पिंडमय असून तिच्यापासून एक प्रकारचा स्निग्ध स्त्राव निघतो तो अंड्यांनां लागतो व चिकटतो. अंडस्त्रोतसांच्या मार्गे अंडीं बाहेर पडत असतांना अगोदर ती त्याच्या पश्चिमशेवटाच्या रुंद, पातळ भागांत जमून राहतात, त्यामुळें तो भाग फुगतो. हा अंडस्त्रोतसाचा शेवटचा फुगलेला भाग जणूं कांहीं गर्भाशयासारखा भासतो. बेडूक पावसाळ्याच्या सुरवातीला जेव्हां माजास येतात तेव्हां मादी पुष्कळ अंडीं पाण्यांत घालते. त्याच वेळेंस नरहि आपल्या रेताचा स्त्राव त्यांच्यावर करतो, अशा रीतीनें पाण्यांत अंडीं शुक्रबीजाशीं संयोग पावतात व फलद्रूप होतात. अंडस्त्रोतसांतून बाहेर पडत असतांना अंड्यांनां लागलेला त्याचा स्निग्ध स्त्राव पाण्यांत फुगतो, अशा तर्हेनें झालेला अंड्यांचा जमाव तीं फलद्रुप झाल्यानंतर त्या फुगलेल्या पदार्थामुळें पाण्यांत तरंगू लागतो व अशा स्थितींतच ती अंडीं विकास पावूं लागतात.

प्रत्येक अंड्याचा थोडासा भाग काळ्या रंगाचा असतो व बाकीचा भाग पांढरा सफेत असतो. हा काळ्या रंगाचा भाग अंडें पाण्यांत तरंगत असतांना नेहमीं वरच्या बाजूला राहतो. ह्या काळ्या रंगाच्या भागांत चैतन्यकेंद्राचा भाग असून त्याच्या सभोंवतीं पुष्कळ निर्भेळ असा चैतन्यद्रव्याचा भाग असतो. बाकीच्या पांढर्या सफेत भागांत चैतन्यद्रव्याचा थोडासा भाग असून त्याच्याशीं बलकाची विशेष भेसळ झालेली असते. या अंड्यापासून बेडूक तयार होतो परंतु तो विकास पावत असतांना त्याचें रूपांतर होतें. परिपूर्तितावस्थेंतील पेशीची द्विदलरूपानें विभाग पावण्याची क्रिया ह्या फलद्रूप झालेल्या अंड्यांत घडून येते. परंतु ती क्रिया सुरू झाल्यावर लवकरच या पांढर्या सफेत बलकमय भागांत मंदावतें. यावरून असें उघड हातें कीं, द्विदलरूपानें विभागून जाऊन पेशींची वाढ घडवून आणण्याचा चैतन्यद्रव्याचा गुण तें बलकमय असलें म्हणजे मंदावतो. ह्या पेशीविभागाच्या पूर्व पायर्या संपून जो लहानसा एक प्राणी उत्पन्न होतो तो माझ्याप्रमाणें गात्रविहीन असून जलश्वासी असतो. त्याला एक मोठी शेंपटी असून जलश्वासेंद्रियें असतात. पुढें त्याची जशी वाढ होत जाते तसें त्याला बेडकाचें स्वरूप येऊं लागतें. पश्चिमगात्रांची जोडी प्रथमतः दिसूं लागते, फुफ्फुसें शरीरांत बनून तयार झाल्यावर जलश्वासेंद्रियें हळू हळू दिसेनाशीं होतात व पुढें ती व त्यांच्यामधील जलश्वासेंद्रियें भेगा ह्यांचा मागमूसहि राहत नाहीं. फुफ्फुस तयार झाल्यामुळें तदनुरूप आंतील रुधिरवाहिन्यांच्या रचनेमध्यें फेरफार घडून येतो. पूर्वगात्राची जोडीहि तयार होऊन बाहेर दिसूं लागते व तोंडाचा भाग पूर्णत्वास येतो. शेंपटी हळू हळू कमी होऊं लागते तरी ती अगदीं नाहीशीं होण्यापूर्वी कांहीं दिवस जमीनीवर वावरणार्या बेडकांत थोडीशी तरी असलेली दिसून येतो. जेव्हां फुफ्फुस नुकतेंच तयार झालेलें असतें व जलश्वासेंद्रियें हीं अगदींच नाहींशीं झालेलीं नसतात तेव्हां तर हा डिंभ खरोखरीच स्थलजलचर या संज्ञेला योग्य असा असतो. कारण त्या कालांत याच्या श्वसनक्रियेंत याला पाण्यात विरलेला प्राणवायु शोषून घेतां येतो, तसेंच हवेंतील प्राणवायूहि घेतां येतो. परंतु हा काल थोडा वेळ टिकतो. व लवकरच हा प्राणी खरा स्थलचर बनतो.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .