प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
             
स्त्रीधन— स्त्रीधन या शब्दाचा यौगिक व सरळ अर्थ घेतला तर तो असा होतो कीं, स्त्रीचें जें धन तें स्त्रीधन, म्हणजे जें धन स्त्रीच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे अथवा ज्यावर तिला हक्क प्राप्त झाला आहे तें धन; मग तिला त्याच्यावर हक्क प्राप्त होण्याचें खरेदी घेणें, बक्षीस मिळणें, वारसानें मिळणें, वगैरे जे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांपैकी कोणत्याहि प्रकारानें हक्क प्राप्त झालेला असो. स्त्रीधनाची याप्रमाणें विस्तृत व्याख्या घेतला तर स्त्रीकडे आलेले सर्व धन स्त्रीधन होतें. परंतु मनु व इतर स्मृतिकार यांनीं स्त्रीधनाचा अर्थ इतका विस्तृत घेतलेला नाहीं हें त्यांनी स्त्रीधनाचे जे निरनिराळे प्रकार दिले आहेत त्यांवरून स्पष्ट होतें. कोणत्याहि प्रकारानें अगर कारणानें स्त्रीकडे आलेलें धन स्त्रीधन होतें असें मानिलें तर स्त्रीधनाचे विशिष्ट प्रकार देण्याची जरूर नाहीं, व असें प्रकार ज्या अर्थी पूर्वीच्या स्मृतिकारांनीं दिलले आहेत. त्या अर्थी त्यांच्या मतें कांहीं विशिष्ट प्रकारांनींच स्त्रीला मिळालेलें धन स्त्रीधन होतें असें स्पष्ट होतें. त्याचप्रमाणें स्मृतींवरील टीकाकार, निबंधकार यापैकींहि बहुतेकांनीं स्त्रीधनाचा अर्थ संकोचितच घेतलेला आहे. स्त्रीकडे आलेलें सर्व धन स्त्रीधन होतें किंवा तिला कांहीं विशेष प्रकारांनीं मिळालेलें धन स्त्रीधन होतें, या प्रश्नास महत्त्व येण्याचें कारण असें आहें कीं, जें धन स्त्रीधन समजलें जातें त्याचा वारसा स्त्रीच्या पश्चात तिच्या ताब्यांत असलेल्या इतर धनास जे वारस असतात त्यांच्याकडे न जातां तिच्या कांहीं विशिष्ट नातेवाईकांकडे जातो; त्याचप्रमाणें स्त्रीधनाचा विनियोग करण्यास स्त्रीस जितकी स्वतंत्रता दिलेली आहे तितकी स्वतंत्रता तिच्या ताब्यांत असलेल्या इतर धनाचा विनियोग करण्यास कायद्यानें दिलेली नाहीं.

आतां आपण स्मृतिकारांनीं स्त्रीधनाचें कोणकोणते प्रकार दिलेले आहेत ते पाहूं. मनुस्मृतींत 'अध्यग्नि, अध्यावाहनिक, प्रीतिदत्त, भ्राता, माता, व पिता यांनीं दिलेलें' असें सहा प्रकार दिलेले आहेत. नारदानें 'अध्याग्नि, अध्यावाहनिक, प्रीतिदत्त, भर्तृदाय व भ्राता, माता व पिता यांच्याकडून मिळालेलें' असें सात प्रकार दिलेले आहेत. विष्णूनें 'पिता, माता, पुत्र, भ्राता यांच्याकडून मिळालेलें, अध्यग्निक, अधिवेदनिक, बन्धुदत्त, शुल्क व अन्वाधेय' असे नऊ प्रकार दिलेले आहेत. कात्यायनानें मनुस्मृतींत सांगितलेल्या सहा प्रकारांखेरीज ''अन्वाधेय, शुल्क व सौदायिक'' असे तीन ज्यास्त प्रकार दिले आहेत, व शिल्पानें स्त्रीला मिळालेल्या धनावर व तिर्हाईतांकडून (विवाहाखेरीज इतर प्रसंगीं) मिळालेल्या धनावर तिच्या नवर्याचा अधिकार असतो; इतर स्त्रीधन समजलें जातें असाहि त्यानें अभिप्राय दिला आहे. याज्ञवल्क्यस्मृतींत 'पिता, माता, पति, भ्राता यांनीं दिलेलें, अध्याग्निक, आधिवेदनिक, बंधुदत्त व शुल्क' असें आठ प्रकार दिले आहेत व हे प्रकार देऊन त्यापुढें 'आदि', 'वगैरे' ही पदें लाविलीं आहेत. देवलानें 'वृत्ति, आमरण, शुल्क व लाभ' असे प्रकार दिलेले आहेत. यांशिवाय कांही इतर स्मृतींत स्त्रीधनाचे प्रकार दिलेले आहेत परंतु त्यांत वरील प्रकारांखेरीज नवीन प्रकार दिलेले नाहींत. व शिवाय स्मृतींइतकेंच ज्याच्या मतास महत्त्व आहे. अशा टीकाकारांनीं व निबंधकारांनीं वरील स्मृतीचाच आधार विशेषतः घेतला असल्यामुळें इतर स्मृतींत कोणते प्रकार दिले आहेत हें पहाण्याचें कारण रहात नाहीं.

वर दिलेल्या अगर इतर कोणत्याहि स्मृतींत स्त्रीधनाची व्याख्या दिलेली नाहीं. त्याचप्रमाणें स्त्रीधनाचें प्रकार देतांना अध्याग्नि वगैरे जे शब्द योजिलेले आहेत त्याचे अर्थ कात्यायनाखेरीज इतर स्मृतिकारांनीं दिलेले नाहींत. कात्यायनानें मात्र आपल्या स्मृतींत जे प्रकार सांगितले आहेत त्याचे अर्थ दिले आहेत. मूळ स्मृतिग्रंथांत याप्रमाणें त्यांत नमूद केलेल्या प्रकारांचें अर्थ दिलेले नसल्यामुळें स्मृतींवरील टीकाकार व स्मृतींस आधारभूत धरून स्वतंत्र निबंध लिहिणारे निबंधकार यांनीं वरील शब्दांचे अर्थ सर्वांनीं सारखेच दिले नाहींत. स्त्रीधन याची व्याख्या काय करावयाची, स्त्रीधनास मूळ स्त्रीच्या पश्चात वारस कोण व वर जे प्रकार दिलेले आहेत ते दाखविण्यास योजिलेले अध्याग्नि वगैरे शब्दांचें अर्थ काय घ्यावयाचे, यासंबंधी टीकाकार व निबंधकार यांनीं निरनिराळीं मतें दिली असल्यामुळें हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांत स्त्रीधनासंबंधीं कायद्यांतहि भिन्नता आलेली आहे. मूळ स्मृतींस जरी सर्व प्रांतांतून सारखाच मान असला तरी टीकाकार व निबंधकार यांची तशी स्थिति नाहीं; उदाहरणार्थ, मुंबई इलाख्यांत याज्ञवल्क्य स्मृतीवरील टीकाकार विज्ञानेश्वर याच्या मिताक्षरा नांवाच्या टीकेस मोठा मान आहे व त्याच्या खालोखाल नीलकंठ याच्या व्यवहारमयूख नांवाच्या निबंधास आहे व मुंबई इलाख्यात स्त्रीधनासंबंधी जो कायदा आहे तो वरील ग्रंथकारांच्या मताप्रमाणेंच झालेला आहे. बंगालमध्यें जीमूतवाहन याच्या दायभाग नांवाच्या निबंधास अग्नपूजेचा मान आहे व मिताक्षरा व दायभाग यांच्यांत वर दिलेल्या बाबतीसंबंधी मतांत अत्यंत वैचित्र्य असल्यामुळें मुंबई व बंगाल प्रांतांतील पूर्वीच्या व प्रचलित स्त्रीधनाच्या कायद्यांतहि भिन्नता आलेली आहे. त्याचप्रमाणें इतर प्रांतांतील स्त्रीधनाच्या कायद्यांतहि वरील कारणांमुळें मुंबई इलाख्यांतील स्त्रीधनाच्या कायद्याशीं भिन्नता आलेली आहे.

आतां वर जे प्रकार दिले आहेत त्यांचे टीकाकार, निबंधकार यांनीं काय काय अर्थ दिले आहेत ते पाहूं. अध्यग्नि याचा अर्थ विवाहाच्या वेळीं वधूवर अग्नीसमोर बसलीं असतां वधूस मिळालेलें धन' असा कात्यायनानें दिला आहे, व तोच इतर ग्रंथकारांनीं मान्य केला आहे. अध्यावाहनिक याचा अर्थ 'विवाह झाल्यावर वधूस बापाच्या घरून सासरीं नेतात तेव्हां मिळालेलें धन' असा कात्यायनानें दिला आहे, व तोच इतरांनीं मान्य केलेला आहे. सदर दोन्हीं प्रसंगीं वधूस आप्तेष्टांकडून अगर परक्यांकडूनहि धन मिळूं शकेल व या दोन्ही प्रसंगी कोणांकडूनहि मिळालेलें धन जीमूतवाहनाखेरीज इतरांनीं स्त्रीधन मानिलें आहे. सदर ग्रंथकारानें आपल्या दायभागांत पहिल्या प्रसंगी वधूस कोणांकडूनहि मिळालेले धन स्त्रीधन धरिले आहे, परंतु दुसर्या प्रसंगीं म्हणजे वरातीच्या वेळीं फक्त बापाच्या कुळातील अगर आईच्या कुळांतील मंडळींकडून मिळालें असल्यास तेवढेंच स्त्रीधन मानिलें आहे. अध्यावाहनिक याची व्याख्या देतांना कात्यायनानें ''यत् पुनः लभते नारी नीयमानाहि पैतृकात्'' असें स्पष्टीकरण केलें आहे. त्यांतील पैतृकात् याचा अर्थ दायभागांत 'पित्याच्या घरून सासरी जातांना' असा न घेता पैतृकात् हा एकशेषी व्दंद समास घेऊन 'मातेच्या अगर पित्याच्या कुळातील मंडळींकडून वरातीच्यासमयीं मिळालेलें धन' असा घेतलेला आहे. इतर ग्रंथकारांनीं असा अर्थ घेतलेला नाहीं. प्रीतिदत्त याचा कात्यायनानें 'वधू प्रथम सासरीं आली म्हणजे तिला सासूसासर्यांकडून अभिवादनाच्या वेळी जें मिळतें तें' असा दिला आहे, त्यासच लावण्यार्जित अगर पादवंदनिक अशी संज्ञा दिली आहे. वरील तिन्ही प्रकार विवाहाच्या वेळेस स्त्रीस मिळालेल्या धनाचे आहेत. मनूनें बाकीचे जे तीन प्रकार दिले आहेत त्यांचे अर्थ स्पष्ट आहेत. मनूनें दिलेले सहा प्रकार येवढेच स्त्रीधनाचे प्रकार नाहींत हें इतर स्मृतींत त्यापेक्षां ज्यास्त दिलेल्या प्रकारांवरून स्पष्ट होतें, मनूनें दिलेले प्रकार पूर्ण आहेत असें त्याच्यानंतरच्या कोणत्याहि टीकाकारानें अगर निबंधकारानें मत दिलेलें नाहीं.

नारदानें भर्तृदाय म्हणून जो प्रकार दिला आहे त्याचा अर्थ 'नवर्याकडून मिळालेलें धन.' येथें दाय शब्दाचा अर्थ वारसानें आलेलें धन असा नसून नवर्यानें दिलेलें धन असा घ्यावयाचा आहे. त्याचप्रमाणें मनुस्मृतींत भ्रातृप्राप्त म्हणून जो प्रकार दिला आहे त्यांतहि 'प्राप्त' याचा अर्थ वरीलप्रमाणेंच घ्यावयाचा आहे.

अधिवेदनिक याचा अर्थ नवर्यानें दुसरें लग्न केलें तर त्यावेळी नवर्याकडून पहिल्या बायकोस तिच्या समाधानार्थ जें कांही मिळतें तें. बंधुदत्त याचा अर्थ आईबापाच्या कुळांतील मंडळींकडून जें मिळेल तें. अन्वाध्येय याचा अर्थ विवाहानंतर पित्याच्या अगर नवर्याच्या कुळांतील मंडळींकडून मिळालेले धन.

शुल्क याची व्याख्या देण्याकरितां कात्यायनानें जो श्लोक दिला आहे त्याचा अर्थ जीमृतवाहनानें दायभागांत 'घरें बांधणार्या वगैरे कारागीर स्त्रीला, तिनें नवर्यास त्याच्या कामावर पाठवावें म्हणून जो लांच देतात तो' असा केला आहे. नंद पंडितानें व्यवहारमयूखांत व देवाण्डभट्टानें स्मृतिचंद्रिकेंत 'घरांतील भांडी, दुभतीं जनावरें वाहतुकीची जनावरें, अलंकार वगैरेंचें मूल्य म्हणून स्त्रीस नवर्याकडून जें मिळतें तें' असा शुल्क याचा अर्थ केला आहे. विज्ञानेश्वरानें त्याच शब्दाचा अर्थ मुलीच्या बापांस नवर्याकडून वधूचें मुल्य म्हणून जें मिळतें तें असा घेतला आहे. सौदायिक याचा अर्थ विवाहापूर्वी अगर नंतर आई, बाप व भाऊ यांच्याकडून मिळालेलें धन असा कात्यायनानें दिला आहे. दायभागांत बापाच्या कुळांतील इतर मंडळींकडून मिळालेल्या धनासहि सौदायिकच म्हटलें आहे.

याप्रमाणें मूळ स्मृतींत दिलेल्या प्रकाराचें अर्थ आहेत. सर्व टीकाकारांनीं अगर निबंधकारांनीं सारखे अर्थ घेतले नाहींत हें, वर एकाच प्रकाराचे निरनिराळें अर्थ घेतले आहेत यावरून दिसून येईल. या प्रकारच्या अर्थासंबंधीं सर्व ग्रंथकारांचें एकच मत आहे. तेथें एकच अर्थ दिलेला आहे. परंतु स्त्रीधनासंबंधीं मुख्य वादाचे प्रश्न म्हणजे स्त्रीधन कशास म्हणावयाचें व स्त्रीधनास वारस कोण हे होत. या प्रश्नासंबंधीं निरनिराळ्या प्रांतांतील कायद्यांत भिन्नता असण्याचें कारण काय हें निश्चित सांगतां येणार नाहीं. कदाचित प्रत्येक प्रांतांतील रुढीप्रमाणें त्या त्या प्रांतांतील कायदा बनला असेल व ज्या प्रांतांत जे टीकाकार अगर निबंधकार झाले त्यांनीं आपल्या ग्रंथांतून प्रचलित रुढीचाच अनुवाद केल्यामुळें त्यांच्या मतास त्या प्रांतांत श्रेष्ठत्व प्राप्त झालें असेल, अगर सदर ग्रंथकारांपैकीं ज्या प्रांतांत जे उदयास आले त्या प्रांतांत त्यांच्या मताप्रमाणें कायदा बनला असेल व वरील सर्व ग्रंथकारांचीं मतें भिन्न भिन्न असल्यामुळें प्रांतांप्रांतांतील कायद्यांत वैचित्र्य आलें असेल. तें कसेंहि असलें तरी हल्लीं हिंदुस्थानांतील सर्व प्रांतांत स्त्रीधनासंबंधीं कायद्यांत वैचित्र्य आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. आतां प्रत्येक प्रांतांत हल्लीं स्त्रीधनाबाबत कायदा कसा आहे याचा विचार करूं.

सर गुरुदास बानर्जी यांनीं या मतवैचित्र्यामुळें आपल्या स्त्रीधनावरील ग्रंथांत हिंदुस्थानांत स्त्रीधनाच्या कायद्याचें पांत संप्रदाय, बनारस, द्रविड (मद्रास इलाखा), मिथिल व बंगाल संप्रदाय अशीं दिलेलीं आहेत. सर गुरुदास यांनीं जरी वर दिल्याप्रमाणें पांच निरनिराळ्या शाखा दर्शविल्या आहेत तरी वास्तविक दोनच संप्रदाय धरले पाहिजेत व ते एक विज्ञानेश्वराचा व दुसरा जीमूतवाहनाचा असे आहेत. विज्ञानेश्वराच्या मिताक्षरेंतील मतास जसा मुंबई इलाख्यांत मान आहे; त्याचप्रमाणें बनारस, मिथिल व मद्रास संप्रदायांतहि आहे. व ह्या संप्रदायांतहि तो ग्रंथ अधिकारयुक्त धरला जातो. परंतु सदर प्रांतातील रीतिरिवाजामुळें व इतर ग्रंथकारांच्या मतांस कांहीं बाबतींत मान दिला गेला असल्यामुळें त्या त्या प्रांतांत मिताक्षरेहून कांहींशीं भिन्न मतें प्रस्थापिलीं गेलीं आहेत. बंगाल संप्रदायाची तशी स्थिति नाहीं. सदर संप्रदायांत जीमूतवाहनाच्या दायभागास श्रेष्ठ मान आहे व त्यातींल मतें अधिकारयुक्त मानिलीं जातात. व मिताक्षरा व दायभाग यांतील प्रतिपादिलेल्या मतांची अत्यंत भिन्नता लक्षांत घेतां दोनच संप्रदाय करून बनारस, मिथिल व द्रविड संप्रदायास मिताक्षरेच्या पोटशाखा मानणेंच अधिक श्रेयस्कर आहे.

मुंबई संप्रदाय.— मुंबई इलाख्यांतील संप्रदायाचा प्रथम विचार केल्यास मिताक्षरेखाली येणार्या पोटशाखांचा विचार करताना प्रत्येक वेळेस मिताक्षरेंत त्या प्रश्नांसंबंधीं काय मत आहे हें सांगण्याची जरुरी उरणार नाहीं. मुंबई इलाख्यांत स्त्रीधनाच्यासंबंधीं प्रश्न सोडवितांना मिताक्षरेस प्राधान्य देतात व नीलकंठ यांचा व्यवहारमयूख म्हणून जो निबंध आहे त्यास मिताक्षरेच्या खालोखाल मान देतात. मुंबई बेटांत व गुजराथ प्रांतांत तर व्यवहारमयूखासच प्राधान्य आहे. या दोन ग्रंथांच्या महत्त्वाबद्दल मुंबई हायकोर्टाचा व प्रीव्ही कौन्सिलाच्या ठरावाचा निष्कर्ष असा आहे कीं, मुंबई इलाख्यांत दोन्ही ग्रंथ अधिकारयुक्त समजले पाहिजेत. [भगवानदिन वि. मयनाबाई, ११ मुं. इ. अ. पा. ४८७; प्राणजीवनदास वि. देवकुवर बाई, १ मुं. हायकोर्ट रिपोर्ट्स पा. १३०]. मिताक्षरेमध्यें जे प्रश्न सोडविलेले नसतील ते सोडवितांना मयूखाचा आधार घेण्यास हरकत नाहीं. [भागीरथीबाई वि. कान्होजीराव, ११ मुंबई २८५] परंतु दोन्ही ग्रंथांत एकाच प्रश्नांसंबंधीं मतभेद असेल तर मुंबई बेट व गुजराथ यांत मयूखांतील मतांस मान दिला पाहिजे, व मुंबई इलाख्यांतील इतर भागांत मिताक्षरेच्या मतांस मान दिला पाहिजे [कृष्णाजी वि. पांडुरंग, १२ मुंबई हायकोर्ट रिपोर्टर्स रा. २५; बाळकृष्ण वि. लक्ष्मण, १४ मुंबई ६०५].

मिताक्षरेंत याज्ञवल्कयस्मृतींत दिलेले प्रकार देऊन कात्यायनानें व इतरांनी दिलेल्या व्याख्या घेऊन सदर प्रकारांचे अर्थ दिले आहेत. व स्त्रीधन फक्त वर दिलेल्या विशिष्ट प्रकारांनीं मिळालेल्या धनासच म्हणावयाचें किंवा कसें याचा विचार केला आहे. विज्ञानेश्वराच्या मतानें स्त्रीधन या शब्दाचा यौगिक अर्थच घेतला पाहिजे, कारण जेथें यौगिक अर्थ घेण्यासारखा आहे तेथें पारिभाषिक अर्थ घेण्याची जरूर नाहीं; म्हणजे विज्ञानेश्वराच्या मताप्रमाणें स्त्रीकडे कोणत्याहि रीतीनें आलेलें धन स्त्रीधन होय. याज्ञवल्क्यस्मृतींत विशिष्ट प्रकार देऊन त्याच्यानंतर 'आदि' हा शब्द घातला आहे. त्याचा अर्थ 'इतर कोणत्याहि रीतीनें मिळालेलें' असा घेतला पाहिजे असें विज्ञानेश्वरानें आपलें मत दिलेलें आहे. मिताक्षरेंत 'आदि' या शब्दाचा हा जो अर्थ दिला आहे तो, अर्थ करण्याचे जे नियम आहेत त्यांस धरून केलेला नाहीं असें म्हणावें लागतें. आदि शब्दापूर्वी जे प्रकार आलेले असतात त्यांसारख्याच इतर प्रकारांचा आदि शब्दानें समावेश केला जातो;  त्याहून अत्यंत भिन्न प्रकारांचा समावेश होत नाहीं असा साधारण नियम आहे. तें कसेंहि असलें तरी मिताक्षरेंत हा जो विस्तृत अर्थ दिला आहे त्या मताप्रमाणें एका वर्गांत येणार्या स्त्रियांखेरीज इतर स्त्रियांकडे सर्व प्रकारांनीं येणार्या धनास मुंबई इलाख्यांत स्त्रीधन धरलें जातें व मुंबई इलाख्यांतील पूर्वीच्या व प्रचलित स्त्रीधनाच्या कायद्यांत, इतर प्रांतांच्या कायद्यांत जो फरक आहे तो विज्ञानेश्वराच्या याच मतामुळें झाला आहे.

विज्ञानेश्वरानें वर दर्शविल्याप्रमाणें स्त्रीधनाचा अर्थ फार व्यापक केलेला आहे. स्त्रीस कलाकौशल्यानें मिळालेलें असो, वारसानें मिळालेलें असो अगर इतर प्रकारांनीं मिळालेलें असो मिताक्षरेप्रमाणें तें सर्व धन स्त्रीधनच होतें. मुंबई इलाख्यांतील दुसरा अधिकारयुक्त ग्रंथ व्यवहारामयूख हा आहे. त्यांतहि विज्ञानेश्वराची स्त्रीधनाची व्याख्या ग्राह्य धरिली आहे. परंतु मिताक्षरेंत ज्याप्रमाणें सर्व स्त्रीधनास सारखेच वारस दिले आहेत. त्याप्रमाणें व्यवहारमयूखांत दिलेले नाहींत वारसाकरितां व्यवहारमयूखांत स्त्रीधनाचे परिभाषिक व अपारिभाषिक असे दोन विभाग केले आहेत व दोन्ही प्रकारच्या स्त्रीधनास निरनिराळें वारस दिलेले आहेत. [विजयरंगम वि. लक्ष्मण, ८ मुंबई हायकोर्ट रिपोर्टर्स पा. २४४ पहा].

वरील दोन्ही ग्रंथांत स्त्रीधन शब्दाच्या अर्थाबाबत जरी एकमत आहे तरी मुंबई हायकोर्टाच्या निवाड्यांत व सदर निवाड्याविरुद्ध प्रीव्ही कौन्सिलकडे झालेल्या अपीलांतील निवाड्यांत मिताक्षरेंतील मत सर्वस्वी मान्य केलेलें नाहीं. सदर निवाड्याप्रमाणेंच वर जे अध्यग्नि, अध्यावाहनिक वगैरे विशिष्ट प्रकार दिले आहेत. त्यांप्रमाणें मिळालेलें धन अर्थातच स्त्रीधन धरलें आहे. विवाहाखेरीज इतर प्रसंगी स्त्रीस बक्षीस मिळालेली मिळकतहि मुंबई इलाख्यांत स्त्रीधन समजली जाते व विवाहाखेरीज इतर प्रसंगी मिळालेल्या मिळकतीबाबत बंगालमध्ये आप्तांनीं दिलेली व परक्यांनीं दिलेली असा भेद करून आप्तांनीं बक्षीस दिलेल्या मिळकतीसच स्त्रीधन समजतात; तसा भेद मुंबई हायकोर्टाच्या ठरावांत केलेला नाहीं. स्त्रीस कोणत्याहि वेळीं व कोणाकडूनहि बक्षीस मिळालेली मिळकत मुंबई इलाख्यांतील हल्लींच्या कायद्याप्रमाणें म्हणजे अर्थात हायकोर्ट, प्रीव्हीकौन्सिल यांच्या ठरावाप्रमाणें स्त्रीधन समजली जाते [आशाबाई वि. हाजी (लग्नानंतर मिळालेले दागिने), ९ मुं. ११५; दयाळदास वि. सावित्रीबाई (लग्नानंतर बापाकडून बक्षीसपत्रावरून मिळालेली स्थावर मिळकत). ३४ मुं. ३८५; बाई नर्मदा वि. भगवंतराय, १२ मुं. ५०५) परक्याकडून लग्नानंतर बक्षीस मिळालेली स्थावर मिळकत)]. ह्याचप्रमाणें स्त्रीनें स्वकष्टानें मिळविलेलें धन मुंबई इलाख्यांत स्त्रीधन समजलें जाईल यांत शंका नाहीं. मिताक्षरेप्रमाणें स्त्रीनें स्वकष्टानें मिळविलेलें धन स्त्रीधन समजलें पाहिजे असा मद्रास हायकोर्टाचा ठराव आहे [सालेमा वि. लक्ष्मण, २१ म. १०००]. तेव्हां मुंबई ईलाख्यांतहि तें तसेंच समजलें पाहिजे [बाई नर्मदा वि. भगवंतराय, १२ मुं. ५०५ व मणीलाल वि. बाई रेवा, १७ मुं. ७५८ पान ७७० पहा].

वर दिलेले प्रकार म्हणजे स्वकष्ट अगर बक्षीस यांखेरीज धन मिळविण्याचें अर्थातच इतर प्रकार आहेत व त्यांपैकीं एका इसमाकडून दुसर्याकडे वारसानें मिळकत जाण्याचा जो प्रकार आहे तो बराच महत्त्वाचा आहे. स्त्रीकडे वारसानें आलेलें धन मिताक्षरेंत स्त्रीधन मानिलें आहे हें वर दिलेंच आहे. परंतु मुंबई हायकोर्टाच्या ठरावाप्रमाणें प्रत्येक स्त्रीला वारसानें मिळालेलें धन स्त्रीधन समजलें जात नाहीं. सदर ठरावाप्रमाणें ज्या कुळांत स्त्री जन्मली त्या कुळांतील मिळकतीचा वारसा तिच्याकडे गेला तर तिला वारस म्हणून जें धन मिळतें तें तिचें स्त्रीधन होतें; उदाहरणार्थ भावाचा वारसा बहिणीकडे गेला तर तिला भावाची जी मिळकत मिळते ती तिचें स्त्रीधन होतें. परंतु विवाहामुळें स्त्री ज्या कुळांत जाते त्या कुळांत मिळतीचा मालक पुरुष असून त्याचा वारसा तिच्याकडे गेल्यास वारसानें तिला मिळालेली मिळकत तिचें स्त्रीधन होत नाहीं; त्या मिळकतीचा तिला फक्त हयातीपर्यंत उपभोग घेण्याचा हक्क असतो; उदाहरणार्थ नवर्याचा वारसा बायकोकडे अगर दिराचा वारसा भावजयीकडे गेला, तर बायकोस अगर भावजयीस मिळालेली मिळकत त्यांचें स्त्रीधन होत नाहीं [मगनलाल वि. बाई गांधी, २४ मुं. १९२; गदाधर वि. चंद्रभागाबाई, १७ मुं. ६९०; ललूबाई वि. माणकूबरबाई, २ मुं. ३८८ व त्याशिवाय प्रीव्ही कौन्सिलचा ठराव ५ मुं. ११०]. वर दिल्याप्रमाणें लग्नामुळें कुळांत आलेल्या स्त्रीकडे वारसानें आलेली मिळकत तिच्या पश्चात तिच्याचसारख्या, लग्नानें त्याच कुळांत आलेल्या दुसर्या एखाद्या स्त्रीकडे वारसानें गेली तर ती मिळकत दुसर्या स्त्रीचेंहि स्त्रीधन होत नाही; उदाहरणार्थ एखाद्यां स्त्रीचा नवरा मरून त्याचा वारसा तिच्याकडे येऊन त्याची मिळकत तिला मिळाली व तिच्या पश्चात सदर मिळकतीचा वारसा तिच्या सासूकडे गेला तर ती मिळकत तिच्या सासूचेहि स्त्रीधन होत नाहीं. परंतु लग्नामुळें कुळांत आलेल्या स्त्रीकडे सुद्धां जेव्हां त्याच कुळांत जन्मलेल्या स्त्री मालकाकडून मिळकतीचा वारसा जातो तेव्हां ती मिळकत तिचें स्त्रीधन होतें; उदा. मुलीची मिळकत आईकडे वारसानें गेली तर ती मिळकत आईचें स्त्रीधन होतें [गांधी मगनलाल वि. बाई जाधव, ३४ मुं. १९२].

वर दिलेली व्यवस्था लग्नामुळें कुळांत आलेल्या स्त्रीकडे वारसा गेला तर तिला वारसानें मिळालेल्या मिळकतीसंबंधीं झाली, परंतु मुंबई हायकोर्टाच्या ठरावाप्रमाणें कुळांत जन्मलेल्या स्त्रीकडे त्या कुळांतील मिळतीचा जेव्हा वारसा जातो तेव्हां ती मिळकत त्या स्त्रीच्या पूर्ण मालकीची होते. उदा. भावाची मिळकत बहिणीकडे अगर बापाची मुलीकडे गेल्यास सदर मिळकत बहिणीच्या अगर मुलीच्या पूर्ण मालकीची म्हणजे स्त्रीधन होते [विठ्ठाप्पा वि. सावित्री, ३४ मुं. ५१०, लक्ष्मणराव वि. भानसाहेब ४८, इंडियन केसेस (नागपूर) ११६; गुळप्पा वि. तायबा, ३१ मुं. ४५३ व त्यांत त्यापूर्वीचें दिलेले ठराव. वरील मुलीसंबंधीं आहेत. त्याचप्रमाणें बहिणीबाबत, विनायक वि. लक्ष्मीबाई, १ मुं. हायकोर्ट रिपोर्ट ११७ व त्यावर प्रीव्ही कौन्सिलचा ठराव ९ मुं. इं. अ. ५२०; रिंडाबाई वि. अण्णाचार्य, १५ मुं. २०६ हे ठराव आहेत. कुळांत जन्मलेल्या आणखी कांहीं स्त्रियांबाबत माधवराव वि. दवे, २१ मुं. ७३९ तुळजाराम; वि. मथुरादास, ५ मुं. ६६२ हे ठराव पहा]. मुंबई इलाख्यांतील कायदा या बाबतींत इतर प्रांतांतील कायद्याहून भिन्न आहे व ही भिन्नता प्रीव्ही कौन्सिलच्या ठरावांतूनहि मान्य केली आहे. [शिवशंकरलाल वि. देवीशाही, २५ अ. लॉ ४६८ व बळवंतराव वि. बाजीराव २२ मुंबई लॉ रिपोर्टर १०७० हे ठराव पहा] इतर प्रांतांत स्त्रीकडे वारसानें आलेलें धन केव्हाहि स्त्रीधन समजलें जात नाहीं.

मुंबई हायकोर्टाच्या ठरावांत हा जो लग्नामुळें कुळांत आलेल्या स्त्रिया व कुळांत जन्मलेल्या स्त्रिया यांच्यामध्यें भेद केला आहे तो मिताक्षरा अगर व्यवहारमयूख यात केलेला नाहीं. व मुंबई हायकोर्टाचे एक माजी नामांकित जज्ज रे. वेस्ट यांनीं एका ठरावांत असें म्हटलें आहे कीं, हा जो भेद केला आहे तो पूर्वीच्या कायद्याच्या व पंडितांच्या मताविरुद्ध आहे. [भागीरथीबाई वि. कान्होजीराव, ११ मुं. २८५ पहा] परंतु हा भेद हल्लीं पूर्ण प्रस्थापिला गेला आहे व त्या विरुद्ध मत देणारा इसम कितीहि मोठा कायदेपंडित किंवा विद्वान असला तरी त्याच्या मताचा कांहींहि उपयोग नाही. व या भेदामुळें कांहीं काहीं ठराव थोडेसे चमत्कारिकहि दिसतात. उदाहरणार्थ मुलाच्या मुलीचा वारसा आजीकडे गेल्यास तिला वारस म्हणून मिळालेली मिळकत तिचें स्त्रीधन होतें परंतु तीच मिळकत मुलाच्या मुलाची वारस म्हणून आजीकडे गेल्यास ती तिचें स्त्रीधन होत नाहीं [२४ मुं. १९२ पहा].

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणें नवर्याचा वारसा बायकोकडे जाण्याच्या वेळीं बायको व्यभिचारी असेल तर वारसा तिच्याकडे जात नाहीं. परंतु हा नियम नवर्याच्या कुळांतील इतर पुरुषांकडून स्त्रीकडे वारसा येत असल्यास त्यास लागू नाहीं. मुलाचा वारसा त्याच्या व्यभिचारी आईकडे जाऊं शकतो व सर्व प्रांतांतून या बाबतींत प्रचलित कायदा सारखाच आहे. [अद्वयप्पा. वि. रूद्रप्या ५ मुं. १०४; कोजियाडू वि. लक्ष्मी ५ म. १४९; बाळदेव वि. मधुराकुवर, ३३ अला. ७०२]. वर दिल्याप्रमाणें लग्न झालेल्या कुळांतील पुरुष मालक असलेल्या मिळकतीचा वारसा स्त्रीकडे गेला तर तें तिचें स्त्रीधन होत नाहीं. परंतु लग्नामुळें स्त्री ज्या कुळांत जाते त्या कुळांतील मिळकत प्रथम एखाद्या त्याच कुळांत जन्मलेल्या स्त्रीकडे जाऊन तिचा वारसा पहिल्या स्त्रीकडे आल्यास ती मिळकत तिचें स्त्रीधन होतें व त्याचें उदाहरण, मुलीचा वारसा आईकडे गेला तर मुलीची आईस मिळालेली मिळकत तिचे स्त्रीधन होतें हें वर दिलेंच आहे. यामुळें केव्हां केव्हां असें घडतें कीं, एखाद्या इसमाच्या मरणसमयीं त्यास बायको व मुलगी असे नातेवाईक असल्यास व बायको वाईट चालीची असल्यास मयताचा वारसा त्याच्या मुलीकडे जातो व त्यानंतर मुलगी वारल्यास तिची म्हणून तीच मिळकत तिच्या व्यभिचारी आईकडे येण्यास कायद्याप्रमाणें प्रतिबंध नाहीं व त्याप्रमाणें ती आईकडे, मुलीची वारस म्हणून जाते व याप्रमाणें आईकडे ती मिळकत आल्यास मुंबई इलाख्यांत ती तिचें स्त्रीधन होते, पण इतर प्रांतात ती आईचें स्त्रीधन होणार नाहीं. परंतु आई व्यभिचारी असली तरी ती तिच्याकडे जाऊं शकते. [वल्लभ वि. बाई हरिगंगा, ४ मुंबई हायकोर्ट रिपोर्टर्स पा. १३५; नगेंद्रनंदी वि. विनयकृृष्ण, ३० क. ५२१; अंगमल वि. वेंकटा, २६ म. ५०९, गंगाजटा वि. घ. सिटा, १ अ ४६].

याशिवाय स्त्रीला व्यापारधंदा करून अगर इतर प्रकारानें मिळालेलें धन प्रचलित कायद्याप्रमाणेंहिं मुंबई इलाख्यांत स्त्रीधनच मानिलें पाहिजे. मिताक्षरेंत कात्यायनानें, कष्टार्जित धनासंबंधीं जो नियम दिला आहे तो कबूल केलेला नाहीं व मिताक्षरेप्रमाणें स्त्रीचें कष्टार्जित धन तिचें स्त्रीधन समजले पाहिजे असा मद्रास हायकोर्टाचा ठरावय आहे तो वर दिलाच आहे. त्याचप्रमाणें स्त्रीला तिच्या अन्नवस्त्राबद्दल बापाच्या कुळांतील मंडळींकडून अगर नवर्याच्या कुळांतील मंडळींकडून कांहीं रक्कम अगर मिळकत मिळाल्यास मुंबई इलाख्यांत तें तिचें स्त्रीधनच होतें [मणीलाल वि. बाई रेवा, १७ मुं. ७५८]. देवलस्मृतींत स्त्रीधनाचें प्रकार देतांनां वृत्ति हा एक प्रकार दिला आहे व त्याचा अर्थ चरितार्थाकरितां स्त्रीस जें कांहीं मिळालें असेल तें असा आहे वृत्ति म्हणून स्त्रीला मिळालेले धन नातेवाईकांकडून आपखुशीनें मिळालेलें असो अगर तें तिनें त्यांच्याकडून कोर्टमार्फत वसूल करून घेतलेलें असो; त्याचप्रमाणें तें कौमार्यावस्थेंत, विवाहित असतांना किंवा विधवा असतांना मिळालेलें असो; मुंबई इलाख्यांतील कायद्याप्रमाणें तें सर्व स्त्रीधनच समजलें जातें. [१७ मुं. ७५८ पहा] थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे मुंबई इलाख्यांतील स्त्रीला, वर जो अपवाद दिला आहे तो सोडून इतर रीतीनें मिळालेलें स्त्रीधन होतें.

मुंबई इलाखा-स्त्रीधनावर स्त्रीचा ताबा:- विज्ञानेश्वरानें वर दिल्याप्रमाणें स्त्रीधनाची व्याख्या जरी अत्यंत व्यापक दिलेली आहे तरी सर्व स्त्रीधनाचा स्त्रीला वाटेल त्याप्रमाणें उपभोग घेण्याचा अगर त्याचा वाटेल त्याप्रमाणें विनियोग करण्याचा अधिकार आहे असें त्यानें कोठेंहि मत दिलेलें नाहीं. उलट स्त्री स्वतंत्र नाहीं हें नारदाचें वचन विज्ञानेश्वरानें दिलेलें आहे व त्याप्रमाणें स्त्रीच्या नवर्यास तिच्या स्त्रीधनाचा कुटुंबपोषणाकरितां, आवश्यक धर्मकार्याकरितां, व्याधी दूर करण्याकरितां व धरणें आलें असतां तें दूर करण्याकरितां तिच्या परवानगीशिवाय उपयोग करण्याचा अधिकार आहे असें त्यानें म्हटलें आहे. यावरून धनाच्या व्याख्येंत त्याचा मनाप्रमाणें विनियोग करण्याच्या हक्काचा समावेश असणे जरूर आहे असें विज्ञानेश्वराचें मत नव्हतें असें दिसतें व त्यांत नवलहि नाहीं. हिंदु धर्मशास्त्राप्रमाणें धनाचा मालक पुरुष असला तरी त्यास मुलगे असले तर त्याचा त्यास मनाप्रमाणें विनियोग करता येत नाहीं. परंतु यामुळें तो मालक नाहीं असें कोणी म्हणत नाहीं. जीमूलवाहनानें याच्या उलट जाऊन ज्याचा, नवर्याच्या परवानगीशिवाय मनाप्रमाणें स्त्रीस विनियोग करतां येतो तेंच तिचें स्त्रीधन होय असा अभिप्राय दिला आहे.

स्त्रीधनाचा मनास येईल त्याप्रमाणें विनियोग करण्याचा स्त्रीस हक्क आहे किंवा काय यावर विज्ञानेश्वरानें स्पष्ट मत दिलेलें नाहीं. व्यवहारमयूखात कात्यायनाचें शिल्पावर मिळविलेल्या धनासंबंधीं मत दिलेलें आहे. त्यावरून सदर ग्रंथकाराच्या मतें त्या धनाचा स्त्रीस नवरा जिवंत असतांना वाटेल त्याप्रमाणें उपयोग करण्याचा अधिकार नाहीं असें दिसतें. त्याचप्रमाणें अधिवेदनिक वगैरे विशिष्ट स्त्रीधनाचा सुद्धां नवर्याच्या परवानगीशिवाय स्त्रीनें खर्च करूं नये, असें सदर ग्रंथकाराचें मत आहे. परंतु सौदायिकाचा विनियोग करण्यास मात्र त्यानें प्रतिबंध घातलेला नाहीं.

हल्लींच्या कायद्याप्रमाणें कौमार्यावस्थेंत व विधवा असतांना स्त्रीस स्त्रीधनाचा तिच्या मर्जीप्रमाणें उपयोग करण्याचा हक्क आहे. नवरा जिवंत असतांना स्वदायिक (सौदायिक) धनाखेरीज इतर धनाची नवर्याच्या परवानगीशिवाय विल्हेवाट करण्याचा स्त्रीस हक्क नाहीं. नवरा जिवंत असतांनाहि स्वदायिकाचा मनाप्रमाणें विनियो स्त्रीस करितां येतो [भाऊ वि. रघुनाथ, ३० मुं. २२९].

स्त्रीधनास वारस:— मुंबई इलाख्यांत मिताक्षरेप्रमाणें पुढीलप्रकारची वारसांची क्रमवारी आहे:-स्त्रीचा विवाह शिष्टसंमत पद्धतीनें म्हणजे ब्राह्म, दैव, आर्ष व प्राजापत्य यापैकीं कोणत्याहि एका पद्धतीनें झालेला असल्यास तिच्या पश्चात तिचें स्त्रीधन प्रथम तिच्या मुलीकडे जातें. एकापेक्षां जास्त मुली असल्यास प्रथम अविवाहित व नंतर विवाहित, व सर्वच विवाहित असल्यास त्यांत प्रथम ज्या अप्रतिष्ठित म्हणजे गरीब आहेत अगर ज्यांनां संतति नाहीं त्या व नंतर इतर मुलीं; मुलींच्या अभावीं मुलींच्या मुली व त्यांचे विभाग त्यांच्या आयांच्या हिश्श्याप्रमाणें केले जातात. म्हणजे प्रत्येकीच्या आईस जो हिस्सा मिळाला असता तो तिच्या एक अगर अनेक मुलींकडे जातो. मुलींच्या मुली नसतील तर मुलींच्या मुलांकडे व ते नसतील तर स्त्रीच्या स्वतःच्या मुलांकडे वारसा जातो; व त्यांच्या अभावीं मुलांच्या मुलाकडे व त्यानंतर नवर्याकडे व नवर्याच्या वारसाकडे वारसा जातो.

स्त्रीचा विवाह आसुर, गांधर्व, राक्षस व पैशाच या असंमत प्रकारांपैकीं एका प्रकारानें झाला असल्यास वरीलप्रमाणेंच नातवापर्यंत मिताक्षरेंत वारस दिले आहेत. मात्र नवरा व त्याचे वारस हे न देतां आईबाप व त्यांच्यानंतर बापाचे वारस असा क्रम दिलेला आहे. वर दिलेला क्रम शुल्क स्त्रीधनास लागू नाहीं. मिताक्षरेप्रमाणें शुल्क (मुलीची किंमत) प्रथम भावांकडे व नंतर आईकडे जातें. आईच्या पश्चात तें कोणाकडे जातें हें मिताक्षरेंत दिलें नाहीं. परंतु तें बाप व त्याचे वारस यांच्याकडे गेलें पाहिजे.

मुंबई हायकोर्टाच्या ठरावांत ज्या भागांत मिताक्षरेप्रमाणें वारस ठरविला जातो त्या भागांत वरील क्रमचे बहुतेक धरलेला आहे. अप्रतिष्ठित याचा अर्थ निर्धन असा केलेला आहे व संतति नसली तर स्त्रीधनाचा वारसा येण्यास बाध येत नाहीं [बकूबाई वि. मंचाबाई, २ मुं. हायकोर्ट रिपोर्टर्स पा. ५] दोन मुलींत सधन कोण व निर्धन कोण हें ठरवितांना कोर्टानें दोषींच्या स्थितीची बारकाईनें चवकशी करून दोघींत जास्त श्रीमंत अगर गरीब कोण हें ठरवावयाचें नसून फक्त जेथें दोघींच्या स्थितींत स्पष्ट अंतर असतें व एकीस दुसरीच्या मानानें निर्धन म्हणतां येईल, तेथेंच निर्धन मुलीस एकटीला स्त्रीधन मिळतें [तोट्टवा वि. वसाव्वा, २३ मुं. २२९]. स्त्रीस मुलाचा मुलगा अगर त्यापूर्वी मिताक्षरेप्रमाणें येणारे वारस नसल्यास तिच्या स्त्रीधनाचा वारसा तिचा विवाह संमत पद्धतीनें झाला असेल तर तिच्या नवर्याकडे जातो [भीमाचार्य वि. रामाचार्य, ३३ मुं. ४५२] नवर्यानंतर सावत्र मुलाकडे वारसा जाईल, कारण त्याच्याकडे वारसा मुलगा म्हणून जाणार नाही तर नवर्याचा वारस म्हणून जाईल; सबब तो नवर्याच्यानंतर येईल. मुलगा व मुलगी यांत सावत्र मुलामुलींचा समावेश होत नाहीं असें विज्ञानेश्वरानें मत दिलें आहे, त्याचप्रमाणें हायकोर्टाच्या वरील ठरावांत धरले आहे. स्त्रीला अपत्य नसेल तर तिचें स्त्रीधन तिच्या नवर्यास तिच्यापेक्षां उच्च जातींतील स्त्रीपासून झालेल्या मुलीकडे जातें असा मनूनें नियम दिला आहे; परंतु हल्लीं निरनिराळ्या जातीच्या स्त्रिया एकाच इसमास करतां येत नाहींत व वरील नियमास यामुळें हल्लीं महत्त्व नाहीं. परंतु वरील नियमाप्रमाणें सवर्ण सावत्र मुलगी असेल तर ती नवर्याच्या अगोदर वारस धरिली पाहिजे असें कोणी म्हणेल तर तें बरोबर नाहीं [३३ मुं. ४५२ पहा].

नवर्यानंतर त्याचे वारस येतात. त्यांत प्रथम सावत्र मुलगा [३३ मुंबई ४५२] अगर नातू येईल [गोजाबाई वि शहाजीराव, १७ मुं. ११४] नंतर नवर्याच्या दसर्या बायका [कृष्णाबाई वि. श्रीपती ३० मुं. ३३३] व नंतर त्याचे इतर वारस. मुंबई इलाख्यांत ललुभाई वि. माणकुवरभाई या ठरावाप्रमाणें विवाहामुळें गोत्रज सपिंड झालेल्या विधवांकडे जसा इतर धनाचा वारसा जातो त्याचप्रमाणें स्त्रीधनाचाहि जाऊं शकेल [बाई केसरबाई वि. हंसराज, ३० मुं. ४३१ हा प्री. कौ. चा ठराव व कृष्णबाई वि. श्रीपती ३० मुं. ३३३ पहा] असे मत पद्धतीनें विवाह झालेला असल्यास मुंबई हायकोर्टाच्या ठरावाप्रमाणेंहि मिताक्षरेंत दिलेल्या इसमाकडेच वारसा जातो. याप्रमाणें प्रथम आई, नंतर बाप, नंतर बापाचे मुलगे वगैरे इसमांकडे वारसा जातो [जंगलबाई वि. जेठा, ३२ मुं. ४०९].

मयूखाप्रमाणें वारस:— मयूखांत वाससाकरितां स्त्रीधनाचें परिभाषिक स्त्रीधन व इतर स्त्रीधन असे विभाग केले आहेत. परिभाषिक स्त्रीधन कोणतें याचा ग्रंथकारानें स्पष्ट खुलासा केला नाहीं, परंतु वर जे स्मृतींतील विशिष्ट प्रकार दिले आहेत त्यांनांच पारिभाषिक स्त्रीधन म्हटलें असावें असें दिसतें. पारिभाषिक स्त्रीधनात यौतक नांवाचा एक प्रकार मयूखांत दिला आहे, त्याचा अर्थ विवाहाच्या वगैरें धार्मिक प्रसंगीं स्त्री नवर्यासह एका आसनावर बसली असतां तिला जें काहीं मिळेल तें असा आहे.

परिभाषिक स्त्रीधनांपैकी अन्वाधेय (नवरा अगर त्याचे नातेवाईक अगर आईबाप व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून मिळालेल्या) स्त्रीधनास व नवर्यानें दिलेल्या स्त्रीधनास जे वारस दिले आहेत ते पुढें दिल्याप्रमाणें आहेत. स्त्रीचे मुलगे व मुली यांच्याकडे प्रथम तें जातें व मुलगे व मुली यांनीं तें सारखें वाटून घ्यावयाचें असतें. मुलींपैकी कांहीं विवाहित व काहीं अविवाहित असतील तर मुलगे व अविवाहित मुली प्रथम वारस होतील. प्रचलित कायद्याप्रमाणें देखील अन्वाधेय स्त्रीधनास वरील क्रमानेंच वारस ठरविलेले आहेत. [दयाळदास वि. सावित्रीबाई, १२ मुंबई लॉ रिपोर्टर ३८६]. अन्वाध्येयास वरील वारसांच्या अभावीं इतर कोण वारस येतात हें मयूखांत दिलेलें नाहीं. सर गुरुदास बानर्जी यांच्या मतें प्रथम वारसा मुलींच्या संततीकडे जाईल, नंतर मुलांच्या संततीकडे जाईल. प्रथम वारसा जर मुलगे व मुली या दोघांकडे एकदम जातो. तर त्याच्या आभावीं त्या दोघांच्याहि संततीकडे एकदम कां जाऊं नये. याचा खुलासा सर गुरुदास यांनी केलेला नाहीं.

मयूखांत यौतकांचा वारसा प्रथम अविवाहित मुलीकडे जातो येवढेंच सांगितले आहे, त्यानंतर तो कोणाकडे जातो हें दिलेलें नाहीं. अविवाहित मुली नसल्यास इतर पारिभाषिक स्त्रीधनाचा वारसा ज्यांच्याकडे जातो त्यांच्याचकडे यौतकाचाहि वारसा जाईल असें मानणे इष्ट आहे. व यावरूनच सर गुरुदास यांनीं अन्वाधेयाचा वारसा मयूखांत नमूद केलेल्या वारसांच्या अभावीं प्रथम मुलींच्या संततीकडे जाईल असें मत दिलेलें असावें.

मयूखाप्रमाणें इतर पारिभाषिक स्त्रीधनास वारस व त्यांचा क्रमः हा प्रथम अविवाहित व अप्रतिष्ठित (गरीब) मुली, नंतर विवाहित अप्रतिष्ठित व विवाहित प्रतिष्ठित मुली, मुलींच्या मुली, मुलींचें मुलगे, नंतर स्त्रीचे मुलगे, नातू या प्रमाणें आहे. वर दिलेल्यापैकीं कोणीहि वारस नसल्यास व स्त्रीचा विवाह संमत पद्धतीनें झाला असेल तर वारसा स्त्रीचा नवरा व त्याचे वारस यांच्याकडे जाईल व स्त्रीचा विवाह असंमतपद्धतीनें झाला असल्यास बाप व त्याचे वारस यांच्याकडे जाईल. मयूखांत नवरा व बाप यांच्यानंतर त्यांच्या वारसाकडे वारसा जाईल असें स्पष्ट लिहिलें नाहीं. नवर्यानंतर त्याच्या कुळांतील तिच्या जवळच्या (सपिण्ड) नातेवाईकाकडे वारसा जाईल व बापानंतर त्याच्या कुळांतील तिच्या जवळच्या नातेवाईकांकडे जाईल असें लिहिलेलें आहे. 'तद्वारा (नवर्याच्या द्वारा) तत्प्रत्यासन्नाः' (बायकोचे जवळचे नातेवाईक) असा मूळ शब्दप्रयोग आहे. परतुं यामुळेहि नवर्याच्या अगर बापाच्या वारसाकडेच वारसा जातो, कारण नवर्याच्या कुळांतील स्त्रीचे जवळचे नातेवाईक नवर्याच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकाखेरीज दुसरे असूं शकणार नाहींत. त्याचप्रमाणें बापाच्या कुळांतील नातेवाईकांचीहि स्थिति आहे [तुकाराम वि. नारायण, ३६ मुं. ३३९ पहा].

पारिभाषिकाखेरीज इतर स्त्रीधनाचा वारसा मुली असल्या तरी त्यांच्याकडे न जातां पुत्रदिकांच्याकडेच मयूखाप्रमाणें जातो. या नियमाचा अर्थ ज. वेस्ट यांनीं एका ठरावांत असा केला होता कीं, अपारिभाषिक स्त्रीधनाचा वारसा, पुरुषाच्या धनास ''पत्नी दुहिताश्चैव'' वगैरे जे वारस आहेत त्यांच्याकडे जातो त्यांच्या मताप्रमाणेंहि वारसांची वर दिलेली पंक्ति घेतांना पत्नीच्या ऐवजीं पति अशी दुरुस्ती करणें जरूर आहे. [विजयरंगम् वि. लक्ष्मण, ८ मुं. हा. रिपोर्टर्स पा. २४४, २६०] परंतु हा अर्थ बरोबर नसून अपारिभाषिक व पारिभाषिक स्त्रीधनास वारस सारखेच आहेत, मात्र पारिभाषिक धनाचा वारसा जसा मुली व त्यांच्या संततीकडे अगोदर जातो त्याप्रमाणें अपारिभाषिक स्त्रीधनाचा वारसा मुलगे, नातू व पणतू यांच्याकडे अगोदर जातो, व नंतरचे वारस पारिभाषिक स्त्रीधनाप्रमाणेंच घ्यावयाचें, असा ज. तेलंग यांचा त्यानंतरचा ठराव आहे [मलिलाल वि. बाई रेवा, १७ मुं. ७५८ पहा]. व जस्टिस तेलंग यांचेच मत नंतरच्या ठरावांत ग्राह्य धरलेलें आहे [बाई रमण वि. जगजीवन दास, ४१ मुं. ६१८]. याप्रमाणें मानिल्यास पुढीलप्रमाणें वारसांचा क्रम येतो:— मुलगा, नातू, पणतू, मुलीं, मुलींच्या मुली, मुलींचें मुलगे व नंतर पारिभाषिक धनास येणारे इतर वारस.

शुल्क याचा मयूखांत दिलेला अर्थ वर दिलेलाच आहे. मयूखांत शुल्कास वारस मिताक्षरेप्रमाणेंच दिलेले आहेत.

हल्लींच्या कायद्याप्रमाणें मुंबई बेट, गुजराथ यांत स्त्रीधनास वारस व त्यांचा क्रम वर दिला आहे त्याप्रमाणेंच आहे. अन्वाधेय स्त्रीधन मुलगे व मुली यांच्याकडे जातें [शिताबाई वि. वसंतराव, ३ मुं. लॉ. रिपोर्टर २०१; दयाळदास वि. सावित्रीबाई, ३४ मुं. ५१०; जगन्नाथ वि. नारायणलाल, ३४ मुं. ५५३]. अविवाहित मुली, विवाहित मुली व मुलगे असल्यास अविवाहित मुली व मुलगे यांच्याचकडे वारसा जातो [३४ मुं. ५१०]. अन्वाधेय व सौदायिक हे परस्परविरोधी प्रकार नाहींत; अन्वाधेय हा प्रकार सौदायिकापेक्षां जास्त विस्तृत आहे [३ मुं. लॉ रिपोर्टर पा. २०१ पहा].

अन्वाधेय  व नवर्यानें प्रेमानें दिलेल्या स्त्रीधनाखेरीज इतर पारिभाषिक स्त्रीधनाचा वारसा जेव्हां नवर्याच्या वारसाकडे येतो तेव्हां सावत्र मुलगा, नातू, पणतू, हे प्रथम येतील; नवरा अर्थातच त्याच्या अगोदर येईल [भीमाचार्य वि. बाळाचार्य, ३३ मुं. ४५२ पा. ४५९ पहा]. सावत्र मुलगा सावत्र नातवाच्या अगोदर येईल कारण, मुलगा व नातू असेल तरी जसा मुलाकडेच स्त्रीधनाचा वारसा जातो त्याचप्रमाणें येथेंहि समजले पाहिजे [४१ मुं. ६१८ पहा] वरील वारसानंतर नवर्याच्या भावाच्या अगर भावाच्या मुलाच्या अगोदर नवर्याच्या दुसर्या बायकोकडे म्हणजे सवतीकडे वारसा जाईल [बाई केसर बाई वि. हंसराज, ३० मुं. ४३१]. नवर्याच्या भावाकडे नवर्याच्या भावाच्या मुलाच्या अगोदर वारसा जातो [हंसराज वि. बाई मौंगी, ७ मुं. लॉ रिपोर्टर ६२२]. यानंतर नवर्याचे इतर वारस.

बृहस्पतीनें स्त्रीधनास कांहीं वारस दिले आहेत त्यांचा मिताक्षरा व मयूखाप्रमाणें विचार:— ''मातेची बहीण, मामाची बायको, चुलत्याची बायको, बापाची बहीण, सासू व वडील भावाची बायको या स्वतःच्या मातेप्रमाणें आहेत व यांनां जेव्हा मुलगा, मुलीचा मुलगा अगर मुलाचा मुलगा नसतो तेव्हा त्यांचें स्त्रीधन स्वस्त्राय (भाचा) वगैरे इसमांकडे जातें'' असा बृहस्पतीनें श्लोक दिला आहे. याचा अर्थ असा आहे कीं, वर जे वारस दिले आहेत ते नसतील तर मावशींचें स्त्रीधन भाच्याकडे, म्हणजे तिच्या नवर्याच्या बहिणीच्या मुलाकडे, चुलतीचें  पुतण्याकडे, आतेचें भाच्याकडे, सासूचें जावयाकडे व वडील भावाच्या बायकोचें पुतण्याकडे जातें. वर दिलेल्या स्त्रिया या जरी वर दिलेल्या त्या त्या इसमांच्या मातेच्या स्थानीं आहेत व ते इसम जरी त्यांच्या पुत्राप्रमाणें मानिले आहेत तरी या श्लोकामुळें ते नवर्यानंतर अगर बापानंतर स्त्रीधनास जे वारस दिले आहेत त्या सर्वांच्या अगोदरहि येत नाहींत अगर श्लोकांत जो क्रम दिला आहे त्या क्रमानेंहि ते एकामागून एक असे येत नाहींत. या श्लोकामुळें वर दिलेले इसम वारस होऊ शकतात इतकेंच घेता येईल व वर दिलेल्या इसमांपैकीं एखादा व स्त्रीधनास इतर जे वारस होऊ शकतात त्यापैकीं एखादा यांच्या दरम्यान स्त्रीधनाच्या वारसासंबंधीं तंटा असेल तर स्त्रीचा त्या दोघांपैकीं जो अधिक जवळचा नातेवाईक असेल त्याच्या वतीनें निकाल दिला पाहिजे. कारण स्त्रीधन वारस म्हणून मिळण्याचा जो हक्क प्राप्त होतो तो स्त्रीशीं नातें अगर सापिंण्डय असल्यामुळें प्राप्त होत असतो [हंसराज वि. बाई मोघी, ७ मुं. लॉ रिपोर्टर ६२२ पहा]. अशी स्थिति असल्यामुळें बृहस्पतीच्या श्लोकांत पुतण्याचा जरी उल्लेख आहे तरी तो आपल्या बापाच्या अगर चुलत्याच्या अगोदर चुलतीच्या स्त्रीधनास वारस येणार नाहीं (वर दिलेला ठराव पहा). त्याचप्रमाणें वरील श्लोकांत कांहीं इसम स्त्रीच्या नवर्याचें नातेवाईक आहेत तर कांही बापाचे नातेवाईक आहेत. यापैकीं जे नवर्याचे नातेवाईक आहेत त्याच्याकडे जेव्हां नवर्याकडे वारसा येतो तेव्हांच येईल व बापाकडील इसमांकडे जेव्हा बापाकडे वारसा जातो तेव्हाच जाईल; उदाहरणार्थ असंमत पद्धतीनें स्त्रीचा विवाह झालेला असल्यास तिच्या स्त्रीधनाचा वारसा बापाकडे  जाईल. तो अगर वराने बापाच्या बाजूचे इसम दिलेले आहेत त्यांच्यापेक्षां जवळचा कोणीहि वारस नसेल तर वर दिलेल्यांपैकीं कोणाकडे तरी जाईल [केसरबाई वि. हंसराज, ३० मुं. ४३१].

स्त्रीधनाचा वारसा जेव्हा एकत्र हिंदु कुटुंबातील दोन अगर अधिक पुरुषाकडे (उदा. आईच्या स्त्रीधनाचा वारसा तिच्या मुलाकडे) जातो तेव्हां प्रत्येकाचा सदर मिळकतींत हितसंबंध पृथक् असतो, व सदर मिळकतीची त्यांनीं वाटणी केली नसली तरी प्रत्येकाचा हितसंबंध त्याच्या मरणानंतर एकत्र कुटुंबातील इतर शेषाधिकार्यांच्याकडे न जातां त्याच्या वारसाकडे जातो [बाई पारसन वि. बाई सोमली]. स्त्रियांकडे वारसा गेला असतो हाच नियम लागू आहे (वरील ठराव पहा) वर दिलेला नियम इतर प्रांतांतहि लागू पडण्यास हरकत नाहीं. कारण शेषाधिकारित्वाचा नियम फक्त अप्रतिबन्ध दायास लागू आहे, सप्रतिबन्ध दायास लागू नाहीं व स्त्रीधन हें अप्रतिबन्धदाय या सदरांत कोठेहि येत नाहीं (वरील ठराव पहा).

द्रविड संप्रदाय, मद्रास इलाखा:— यांत मिताक्षरे खेरीज पराशर-माधन व स्मृतिचंद्रिका या दोन ग्रंथास मान आहे. पराशर-माधवात मिताक्षरेप्रमाणें स्त्रीधनाची व्याख्या घेतलेली नसून विशिष्ट प्रकारांनीं मिळालेल्या धनासच स्त्रीधन ही संज्ञा दिलेली आहे. कलाकौशल्यावर मिळविलेल्या व विवाहखेरीज इतर प्रसंगी तिर्हाईत इसमाकडून मिळालेल्या धनासंबंधी कात्यायनाचें मत सदर ग्रंथांत मान्य केलेले आहे. याज्ञवल्क्य स्मृतींतील 'आदि' याचा अर्थ स्त्रीधनाचा उपयोग करून स्त्रीनें मिळविलेलें धन असा' केला आहे. स्मृतिचंद्रिकेंत स्त्रीधनाची व्याख्या दिलेली नाहीं परंतु वर दिलेलें कात्यायनानें मत ज्याअर्धी मान्य केलें आहे त्याअर्थी सदर ग्रंथकाराच्या मतानेंहि स्त्रीधनाचा अर्थ संकुचित घेतला पाहिजे. वरील दोन्हीहि ग्रंथकारांच्या मतानें वारसानें स्त्रीस मिळालेलें धन केव्हांहि स्त्रीधन होऊं शकणार नाहीं. याशिवाय सरस्वतीविलास व व्यवहारनिर्णय या ग्रंथांसहि मद्रास इलाख्यांत थोडाफार मान आहे.

मिताक्षरा व वरील इतर ग्रंथ यापैकीं कोणास किती मान द्यावयाचा यासंबंधी मद्रास हायकोर्टाचे ठराव आहेत त्याचा सारांश असा आहे कीं, मद्रास इलाख्यातहि मिताक्षरेसच प्राधान्य आहे. वर दिलेल्या इतर ग्रंथांत कोणत्याहि प्रश्नाबाबत मिताक्षरेहून भिन्नमत असेल तर तें मत ग्राह्य होण्यास त्या प्रश्नाबाबत इतर सर्व ग्रंथांचें मतैक्य पाहिजे व तें मतैक्यहि चालू रीतिरिवाजास धरून असलें पाहिजे. एकट्या स्मृतिचंद्रिकेचें अगर दुसर्या ग्रंथांचें मत मिताक्षरेहून भिन्न असल्यास ते ग्राह्य नाहीं [सुंदरम् वि. रामसामी, ४३ म. ३२; मुठुपुड्यन वि. अमणीअमल, २१ म. ५८; सालेमा वि. लछमन, २ म. १००; राजग्रमणी वि. अमणी अमल २१ म. ३५९]

मुंबई व मद्रास इलाख्यांतील स्त्रीधनासंबंधीं प्रचलित कायद्यांत जो मुक्य भेद आहे तो वारसानें स्त्रीस मिळालेल्या धनासंबंधी आहे. मद्रास हायकोर्टाच्या ठरावाप्रमाणें स्त्रीस वारस म्हणून मिळालेलें धन केव्हाहि स्त्रीधन होत नाही. नवरा अगर त्याच्या कुळांतील दुसरा इसम मयत होऊन त्याच्या धनाचा वारसा स्त्रीकडे गेल्यास त्या धनावर त्या स्त्रीस फक्त हयातीपर्यंत हक्क पोहोंचतो [दि कलेक्टर ऑफ मुसलीपट्टम् वि. कावली वेंकटा, ८ मुं. इं. अ. ५०० पहा]. त्याचप्रमाणें बापाच्या अगर त्याच्या कुळांतील इतर इसमांच्या धनाचा वारसा मुलीकडे गेल्यास तें धन तिचें स्त्रीधन होत नाहीं. मुलगी अविवाहित स्थितींत असतांनाहि तिच्याकडे वारसाने आलेलें धन तिचें स्त्रीधन होत नाहीं [सेंगामल वि. वेलायडू. ३ म. हा. रिपोर्टर्स ३१२; जानकीशेट्टी वि. सूर्य, ३२ म. ५२१ (अविवाहित मुलीकडे आलेली मिळकत); वेंकट रामकृष्ण वि. भुजंग, १९ म. १०७ विवाहित मुलीकडे तिच्या आईचें असलेले स्त्रीधन); वीरसंगप्पा वि. रुद्रप्पा, १९ ग.११०]. वरील ठरावांवरून हेंहि लक्षांत येईल कीं, एखाद्या स्त्रीचें स्त्रीधन असलेल्या धनाचा वारसा दुसर्या स्त्रीकडे गेला कीं तें धन स्त्रीधन रहात नाहीं.

वारसानें मिळालेल्या धनाखेरीज इतर रीतीनें मिळालेल्या धनाबाबत मुंबई व मद्रास या इलाख्यांतील प्रचलित कायद्यांत भेद नाहीं. स्त्रीनें स्वकष्टानें मिळविलेलें धन मद्रास हायकोर्टाच्या ठरावाप्रमाणें स्त्रीधन धरलें गेलें आहे [मुठु रामकृष्ण नायकेन वि. मरीमुठु गौडन, ३८ म. १०३६]. त्याचप्रमाणें तिर्हाइताकडून विवाहानंतरहि बक्षीस मिळालेली मिळकत स्त्रीधनच धरली आहे [सालेमा वि. लछमन, २१ म. १०८; रामसामी वि. वीरसामी, ३ मद्रास हायकोर्ट रिपोर्टस २७२] व ती तशी धरणेंच योग्य आहे असें ज. सर शंकर नायर यांनीं ३८ म. १०३६ मध्यें आपलें मत दिलें आहे. यावरून कौमार्यावस्थेंत अगर विधवा असतांना स्त्रीला बक्षीस मिळालेली मिळकत मद्रास इलाख्यांत स्त्रीधन समजली पाहिजे याबद्दल शंका नाहीं. [मुथुकुरूपा वि. सेलाथम्मल, ३९ म. २९८ पहा.] कारण या दोन्ही अवस्थांत मिळालेल्या धनास कात्यायनानें दिलेला नियम लागू नाहीं. विवाहानंतर बापाकडून बक्षीस मिळालेली मिळकत अर्थातच स्त्रीधन समजलेली आहे [मुठापुड्यन वि. अमनी, २१ म. ५८०] स्त्रीनें विरुद्ध कब्जानें मिळविलेली मिळकत, त्याचप्रमाणें तिनें स्त्रीधनाच्या उत्पन्नांतून घेतलेली मिळकत स्त्रीधनच समजली गेली आहे [२१ म. १०० पा. १०७ पहा; सुब्रह्मण्य वि. अरुणवेलम् २८ म. १०]

स्त्रीधनावर ताबा:— या बाबतींतहि मद्रास हायकोर्टाचे ठराव बहुतेक मुंबई हायकोर्टाच्या ठरावाप्रमाणें आहेत, सौदायिक धनाचा विनियोग स्त्रीला आपल्या मनाप्रमाणें करण्याचा हक्क आहे [३९ म. २९८]. नवर्यानें स्थावर मिळकत बायकोस बक्षीस दिलेली असेल तर तीहि सौदायिक याच सदरांत येईल परंतु तिचा विनियोग नवरा जिवंत असतांना त्याच्या परवानगीशिवाय स्त्रीस करतां येईल किंवा नाहीं, याबाबत मद्रास हायकोर्टाचे ठरावावरून निश्चित मत देतां येणार नाहीं. ३९ म. २९८ पा. ३०० यांत ज शेषगिरी अय्यर यांनीं आपलें मत असें दिलें आहे कीं, सदरहु मिळकतीचाहि विनियोग करण्यास स्त्रीला स्वतंत्रता असावी; परंतु याच हायकोर्टाचा पूर्वीचा एक ठराव या मताविरुद्ध आहे. [गंगाधर वि. परमेश्वर ५ म. हा रिपोर्टस १११] विवाहाच्या प्रसंगी तिर्हाइताकडून मिळालेल्या देणग्यांचा नवर्याच्या परवानगीशिवाय विनियोग करण्याचा स्त्रीस अधिकार आहे असें ३९ म. २९८ या ठरावांतील ज शेषगिरी अय्यर यांच्या मतावरून दिसतें. [भाऊ वि. रघुनाथ, ३० मुं. २२९ यांत स्त्रीस तसा अधिकार असल्याचें नमूद केलेलें नाहीं].

स्त्रीधनास वारस:— स्मृतिचांद्रकेंत वारसाकरतां स्त्रीधनाचें यौतक, अन्वाध्येय व नवर्याचें प्रीतिदत्त, शुल्क व इतर स्त्रीधन असे भाग केले आहेत. अन्वाधेय व प्रीतिदत्त यास मुलगे व विवाहित व अविवाहित मुली असे वारस दिले आहेत. या सर्वांना एकाच वेळी सारख्या हिश्श्यांनीं स्त्रीधन वांटून घेण्याचा हक्क आहे. परंतु विधवा मुलीस हक्क नाहीं. यौतकाचा वारसा प्रथम बिनविवाहित मुलीकडे व नंतर मुलाकडे जातो. इतर स्त्रीधन प्रथम अविवाहित व अप्रतिष्ठित (संततिरहित, गरीब अगर विधवा) मुलीकडे, नंतर विवाहित मुलीकडे, नंतर मुलींच्या मुली, मुलींचे मुलगे, स्त्रीचें मुलगे व मुलांचे मुलगे या क्रमानें जातो. वर दिलेले वारस नसल्यास इतर (यौतक, अन्वाधेय व प्रीतिदत्त सोडून) स्त्रीधन, स्त्रीचा विवाह संमतपद्धतीनें झाला असल्यास, तिच्या नवर्याकडे जातें व असंमत पद्धतीनें झाला असल्यास, बापाकडे जातें. नवर्यानंतर व बापानंतर तें कोणाकडे जातें हें चंद्रिकेंत दिलेलें नाहीं. व त्याचप्रमाणें यौतक व अन्वाधेय या वर दिलेल्या वारसांच्या अभावीं कोणाकडे जातें हें दिलेलें नाहीं. शुल्कास मिताक्षरेंत दिलेलेच वारस स्मृतिचंद्रिकेंत दिले आहेत. पराशर-माधवांत मिताक्षरेंत दिलेलेंच वारस दिले आहेत. परंतु नवरा व बाप यांच्यानंतर येणार्या वारसांत कांहींसा फरक आहे.

मद्रास हायकोर्टाच्या ठरावांत स्मृतिचंद्रिकेंत दिलेला वारसांचा क्रम सर्वस्वी ग्राह्य धरलेला नाहीं. बापानें लग्नानंतर बक्षीस दिलेल्या धनाचा (जें अन्वाधेय या सदरांत येईल त्या) मुलाच्या अगोदर मुलीकडे वारसा जातो असा मद्रास हायकोर्टाचा ठराव आहे. [मुठुपुडनयम वि. अमनी अमल, २१ म. ५८] त्याचप्रमाणें लग्नानंतर सरकारकडून मिळालेल्या मिळकतीचा वारसा प्रथम अविवाहित मुलीकडे जातो असाहि ठराव आहे [सालेमा वि. लछमन. २१ म. १००]. त्याचप्रमाणें विवाहानंतर स्त्रीला अन्नवस्त्राबद्दल मिळालेल्या रकमेस अगर त्या पैशाच्या मदतीनें घेतलेल्या मिळकतीस वारस मुलीची मुलगी होते, स्त्रीचा मुलगा होत नाहीं असाहि ठराव आहे [२८ म. १ पहा] यावरून मद्रासच्या प्रचलित कायद्याप्रमाणें स्त्रीधनाचे वारस व त्यांचा क्रम मिताक्षरेंत दिल्याप्रमाणें ठरविला जातो असें मानण्यास हरकत नाहीं. स्त्रीस संतति नसल्यामुळें तिच्या स्त्रीधनाचा वारसा जेव्हा तिचा नवरा अगर त्याचे वारस अथवा बाप अगर त्याचे वारस यांच्याकडे जातो तेव्हां वारसांचा क्रम मद्रास हायकोर्टानें मिताक्षरेप्रमाणेंच ठरविलेला आहे. [कंकमल, वि. अनंतमठ्ठी, ३७ म. २९३ पहा] बृहस्पतीनें दिलेल्या वारसास, त्याच्यापेक्षा जवळचे नातेवाईक असल्यास, स्त्रीधनास हक्क प्राप्त होत नाहीं [राजू वि. अमनी, २९ म. ३५८]. सबब संमत पद्धतीनें विवाह झालेल्या स्त्रीच्या स्त्रीधनाचा वारसा प्रथम तिच्या नवर्याच्या भावाच्या मुलाकडे जाईल, तिच्या मामाच्या मुलाकडे अगर बहिणीच्या मुलीच्या मुलीकडे जाणार नाहीं [वेंकट सुब्रह्यण्य वि. थायरमल, २१ म. २६३] त्याचप्रमाणें स्त्रीची सावत्र मुलगी नवर्याच्या इतर दूरच्या नातेवाईकांच्या अगोदर येईल [पिल्लये वि. शिवभाग्य, ३६ म. ११६] व स्त्रीची बहीण तिच्या [बहिणीच्या] मुलाच्या अगोदर येईल [२९ म. ३५८]. स्त्रीची आई भावाच्या अगोदर अर्थातच येते [३७ म. २९३] संमत पद्धतीनें विवाह झालेल्या स्त्रीस जोंपर्यंत नवर्याकडील वारस आहेत तोंपर्यंत तिच्या स्त्रीधनाचा वारस बापाकडे जाणार नाहीं व असंमत पद्धतीनें विवाह झालेला असल्यास बापाकडील वारस असेतों नवर्याच्या कुळांतील इसमांकडे वारसा जाणार नाहीं. सबब संमत पद्धतीनें विवाह झालेल्या स्त्रीच्या स्त्रीधनाचा वारसा प्रथम सावत्र आईकडे जाईल, मामीकडे जाणार नाहीं [कमळाबाई वि. भागीरथीबाई, ३८ म. ४५]. दोन्हीही कुळांत स्त्रीस जेव्हां कोणी वारस नसेल तेव्हां तिची स्त्रीधन मिळकत सरकारकडे जाते. परंतु जोंपर्यंत दोहोंपैकी कोणत्याहि एका कुळात स्त्रीस वारस आहे तोपर्यंत सरकारास हक्क प्राप्त होत नाहीं [कनकामल वि. अनंतमठ्ठी, ३७ म. २९३ पहा.]

बनारस संप्रदाय:— या संप्रदायांत मिताक्षरेखेरीज वीरमित्रोदय या ग्रंथास मान आहे. स्त्रीधन शब्दाच्या व्याख्येसंबंधीं दोन्हीं ग्रंथांत मतैक्य असल्यामुळें दोन ग्रंथांत श्रेष्ठ मान कोणास द्यावयाचा हा प्रश्न उद्भवत नाहीं. तथापि वीरमित्रोदयाचें मत मिताक्षरेहून भिन्न असल्यास मिताक्षरासच मान दिला पाहिजे व ज्या प्रश्नासंबंधी मिताक्षरेंत व्यवस्था दिलेली नसेल अगर स्पष्ट केलेली नसेल तेथेंच वीरमित्रोदयाचा आधार द्यावयाचा असा नियम आहे [बानर्जी यांचा स्त्रीधनावरील ग्रंथ, पान ३८२, आवृत्ती ३ पहा; गिरीधर लाल वि. गव्हर्मेंट ऑफ बेंगाल, १ बंगाल लॉ रिपोर्टस ४४ प्रीव्ही कौन्सिल]. स्त्रीच्या कांहीं प्रकारच्या धनावर कात्यायनानें दिलेल्या नियमाप्रमाणें जरी नवर्याचा हक्क असला तरी त्यामुळें तें स्त्रीधन मानण्यास हरकत येत नाहीं; त्यामुळें फार तर इतकेंच सिद्ध होतें कीं, स्त्रीला सर्वच स्त्रीधनाचा विनियोग मनाप्रमाणें नवरा जिवंत असतांना करतां येत नाहीं असें वीरमित्रोदयांत मत दिलेलें आहे.

बनारस संप्रदायांतील दोन्ही ग्रंथात याप्रमाणें स्त्रीधनाच्या व्याख्येंसंबंधीं जरी एकवाक्यता आढळते तरी हल्लींच्या कायद्याप्रमाणें, म्हणजे अर्थात अलाहाबाद हायकोर्टाच्या व प्रीव्हीकौन्सलच्या ठरावांप्रमाणें ही व्याख्या मान्य केलेली नाहीं [शिवशंकरलाल वि. देवा शहाई, २५ अ. ४६८ व शिवप्रताप बहादुर वि. दि अलाहाबाद बँक २५ अ.]

या दोन्ही ठरावावरून आता हें निश्चित झालें आहे कीं, मुंबई इलाख्याखेरीज इतर प्रांतांत स्त्रीकडे वारसानें आलेलें धन केव्हांहि तिचें स्त्रीधन होत नाहीं. स्त्रीकडे वारसानें आलेली मिळकत पूर्वीच्या मालकाच्या ताब्यांत असातांना जरी स्त्रीधन असली तरी ती वारसानें दुसर्या स्त्रीकडे गेल्याबरोबर ती स्त्रीधन रहात नाहीं. याचप्रमाणें अलाहाबाद हायकोर्टाचेहि ठराव आहेत. परंतु प्रीव्हीकौन्सिलचे वरील ठराव दिले असल्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाचे सर्व ठराव देण्याचें प्रयोजन नाहीं.

या एका बाबतीखेरीज इतर बाबतींत मुंबई व बनारस संप्रदायांच्या प्रचलित कायद्यांत फरक नाहीं व बनारस संप्रदायांतहि वारसाशिवाय इतर रीतीनें स्त्रीला मिळालेलें धन स्त्रीधनच मानिलेलें आहे; व मिताक्षरा व वीरमित्रोदय यांचीं स्त्रीधनाच्या व्याख्येच्या बाबतींत एकवाक्यता लक्षांत घेतां तसें मानणेंच जरूर आहे. विवाहानंतर स्त्रीला मिळालेली मिळकत तिचें स्त्रीधन धरलेलें आहे [मृसमत राधा वि. विशेशरदास, ६ नार्थ वेस्ट प्राव्हिन्सेस रिपोर्टर्स २७९; मुनिया वि. पुरण, ५ अ. ३१०] स्त्रीनें स्त्रीधन मिळकतीच्या उत्पन्नांतून घेतलेली मिळकत तिची स्त्रीधन मिळकतच समजली पाहिजे [वेंकाकुनवर वि. जमनाकुनवर, १५ अ लॉ जर्नल ७९८ पहा] स्त्रीनें विरुद्ध कब्जानें मिळविलेली मिळकत तिचें स्त्रीधनच धरलेलें आहे. [काशीराम वि. अमनी, ३२ अ. १८९] कलाकौशल्यावर मिळविलेल्या धनाबाबत अलाहाबाद हायकोर्टाचा ठराव दिसत नाहीं. परंतु तें स्त्रीधन समजलें पाहिजे असें वर दिलेल्या कारणावरून दिसून येईल. येथें एक नियम लक्षांत ठेविला पाहिजे कीं, मुलांच्या दरम्यान जेव्हां वांटणी होऊन त्यांच्या मातेला वांटणींत जो हिस्सा मिळतो त्यामुळें तिला मिळालेली मिळकत तिचें स्त्रीधन होत नाहीं व हा नियम सर्व प्रांतांस लागू आहे [देवी मंगलप्रसाद वि. महादेव, ३४ मुं. २३४ (प्रीव्ही कौन्सिल)] नवरा जिवंत असताना सर्व प्रकारच्या स्त्रीधनाचा विनियोग स्त्रीला नवर्याच्या परवानगीशिवाय करण्याचा अधिकार आहे किंवा नाहीं या प्रश्नाबाबत अलाहाबाद हायकोर्टाचे ठराव दिसत नाहींत. सदर प्रश्न मुंबई इलाख्यांत भाऊ वि. रघुनाथ ३० मुं. २२९ या ठरावांत ज्याप्रमाणें सोडविला आहे त्याचप्रमाणें बनारस संप्रदायांत सोडविला पाहिजे, कारण वीरवित्रोदयातहि कात्यायनानें या बाबत दिलेल्या नियमाचा उल्लेख केलेला आहे व तो नियम सदर ग्रंथांत अमान्य केलेला नाहीं. भाऊ वि. रघुनाथ यांतील ठराव देतांना मयूखांत कात्यायनानें दिलेल्या नियमाचाच आधार घेतलेला आहे व ज्याअर्थी वीरमित्रोयांतहि वरील नियम दिला आहे त्याअर्थी भाऊ वि. रघुनाथ हा ठराव बनारस संप्रदायांत आधारयुक्त मानण्यास हरकत नाहीं.

वारसा:— मुंबई इलाख्यांत जेथें मिताक्षरेप्रमाणें वारसा ठरवितात तेथें जे वारस दिलेले आहेत तेच इसम बनारस संप्रदायांत वारस होतात. वीरमित्रोदयांत वारस व त्यांचा क्रम मिताक्षरेप्रमाणें सर्वस्वी दिलेला नाहीं. सदर ग्रंथांत साधारणतः स्त्रीधनाचे, मयूखाप्रमाणेंच वारसाकरितां भेद केलेले असून मयूखांत त्या त्या प्रकारास दिलेले वारसच तेथें वारस धरलेले आहेत. बनारस संप्रदायांत हल्लीं मिताक्षरेप्रमाणेंच वारसा ठरविला जातो व मिताक्षरेप्रमाणें स्त्रीधनास वारस कोण येतात हें पूर्वी दिलेलें आहे. सबब वीरमित्रोदयांत दिलेला क्रम तपशीलवार दिलेला नाहीं.

मिथिल संप्रदाय.— यांत मिताक्षरेखेरीज विविध चिंतामणी या ग्रंथास मान दिला आहे. त्या ग्रंथांतहि स्त्रीधनाची व्याख्या संकुचितच घेतलेली आहे. सदर ग्रंथकाराच्या मतानें मनूनें दिलेलें सहा प्रकारचें धन, अधिवेदनिक, शुल्क, सौदायिक, तसेंच स्त्रीस दिलेले अलंकार व अन्नवस्त्राकरितां दिलेलें धन-इतकेंच तिचें स्त्रीधन होतें.

सदर ग्रंथाप्रमाणें विवाहाच्या वेळीं मिळालेल्या इतर स्त्रीधनाचा वारसा स्त्रीचे मुलगे व अविवाहित मुलींच्याकडे जातो व विवाहाच्या वेळीं मिळालेल्या स्त्रीधनाचा वारसा फक्त अविवाहित मुलीकडे जातो. स्त्रीला संतति नसल्यास तिचा विवाह संमत पद्धतीनें झाला असल्यास नवरा व त्याचे वारस यांच्याकडे वारसा जातो व असंमत पद्धतीनें विवाह झाला असल्यास बाप व त्याचे वारस यांच्याकडे जातो. बचाझा वि. जगमोहन, १२ क. ३४८ या ठरावांत बृहस्पतीनें नवर्याच्या कुळांतील दिलेले वारस नवर्याच्या इतर वारसांपेक्षां अगोदर येतात असा निकाल दिला आहे. व त्याचप्रमाणें बापाच्या कुळांतील वारसांत बृहस्पतीनें दिलेले वारस अगोदर येतात असें म्हणता येईल [मोहन वि. किसन, २१ क. ३४४ पहा]. मिथिल संप्रदायांतहि बाकाचे प्रश्न मिताक्षरेप्रमाणेंच सोडविले पाहिजेत.

बंगाल संप्रदाय.— या संप्रदायांत जीमूतवाहनाच्या दायभागांतील व त्याचे अनुयायी रघुनंदन व श्रीकृष्ण यांच्या मतांचा पुरस्कार केलेला आहे. सदर ग्रंथकाराच्या मतें स्त्रीधन ही संज्ञा स्त्रीच्या ताब्यांत असलेल्या फक्त त्याच धनास लावतां येईल कीं ज्याचा उपभोग व विनियोग नवर्याच्या संमतीशिवाय स्त्रीच्या स्वतःच्या मनाप्रमाणें करतां येतो. स्त्रीच्या ताब्यांत असलेल्या सर्व प्रकारच्या धनाचा मनाप्रमाणें विनियोग करण्याचा स्त्रीस अर्थातच अधिकार नाहीं. त्यावरून सदर ग्रंथकाराच्या मतानें स्त्रीधन शब्दाचा अर्थ संकुचित घेतला पाहिजे हें स्पष्टच आहे. याज्ञवल्क्य स्मृतींत विशिष्ट प्रकार देऊन त्यापुढें ''आदि'' हा शब्द घातला आहे त्याचा अर्थ विज्ञानेश्वरानें काय केला हें मागें आलेंच आहे. परंतु दायभागांत 'आदि' हा शब्दच दिलेला नसून ''आधिवेदनिकंचैव' असे शब्द वापरलेले आहेत, व हे शब्द घातले तर विज्ञानेश्वरानें जो अर्थ केला आहे तो करण्यास जागाच रहात नाहीं.

स्त्रीला कोणत्या प्रकारच्या मिळकतीचा मनाप्रमाणें विनियोग करतां येतो, म्हणजे कोणतें स्त्रीधन होतें, याचा स्पष्ट खुलासा दायभागांत दिलेला नाहीं. फक्त सौदायिकासंबंधीं मात्र तसा खुलासा दिला आहे. तथापि मनूनें जे सहा प्रकार दिले आहेत तेवढेच स्त्रीधनाचे प्रकार नाहींत, त्यापेक्षां जास्त प्रकार आहेत ही गोष्ट दायभागांत कबूल केलेली आहे. वारसानें मिळालेली मिळकत त्याचप्रमाणें विवाहाच्या खेरीज इतर प्रसंगीं तिर्हाइताकडून मिळालेली मिळकत, व कलाकौशल्यावर मिळविलेली मिळकत स्त्रीचें स्त्रीधन होत नाहीं असें स्पष्ट मत सदर ग्रंथांत दिलेलें आहे. यावरून व सदर ग्रंथकारानें जे निरनिराळे प्रकार दिले आहेत त्यांवरून दायभागाप्रमाणें पुढें दिलेली मिळकत स्त्रीधन होऊं शकेल:- विवाहापूर्वी, विवाहसमयी अगर त्यानंतर त्याच्या कुळांतील इतर नातेवाईकांकडून मिळालेली मिळकत; त्याचप्रमाणें नवरा व त्याचे नातेवाईक यांच्याकडून विवाहसमयीं अगर नंतर मिळालेली मिळकत (वरील दोन्ही प्रकार सौदायिक स्त्रीधनाचे आहेत); विवाहाच्या वेळीं फक्त तिर्हाइताकडून मिळालेली मिळकत (यांत वरातीच्या वेळीं तिर्हाइताकडून मिळालेल्या धनाचा समावेश केलेला नाहीं). याप्रमाणें स्त्रीधनाचे साधारणतः दायभागाप्रमाणें विभाग करतां येतील. स्मृतींत जे प्रकार दिलेले आहेत त्यांप्रमाणें मिळालेलें धन अर्थांतच दायभागांतहि स्त्रीधनच मानिलेलें आहे, परंतु ते प्रकार, वर जे तीन भाग दिले आहेत त्यांपैकीं कोणत्या तरी एका विभागांत येतील.

कलकत्ता हायकोर्टाच्या व प्रीव्ही कौन्सिलच्या ठरावाप्रमाणें बंगाल इलाख्यांत वारसानें स्त्रीकडे आलेली मिळकत केव्हांहि तिचें स्त्रीधन होत नाहीं. स्त्रीकडे वारसा, तिचा नवरा अगर त्याच्या कुळांतील इतर इसम किंवा बाप अगर त्याच्या कुळांतील इसम यापैकीं कोणाकडूनहि आलेला असो-याप्रमाणें वारसानें मिळालेली मिळकत स्त्रीचें स्त्रीधन होत नाहीं. त्याचप्रमाणें स्त्रीधन असलेली मिळकतहि वारसानें मूळ स्त्रीमालकाकडून दुसर्या स्त्रीकडे वारसानें गेली कीं तिचा स्त्रीधन हा गुण नष्ट होतो [छोटालाल वि. चुनुलाल, २२ वुइक्ली रिपोर्टस ४९६; जलेश्वर वि. उग्ररे, ९ क. ७२५; नोगेंद्रचंद्र वि. फणीभूषण, ४३ क. ६४; हरिदयाळ वि. गिरीशचंद्र. १७ क. ९११].

दायभागाप्रमाणें शिल्पकलेवर मिळविलेलें धन स्त्रीधन मानिलेलें नाहीं व तें बंगाल संप्रदायांतील प्रचलित कायद्याप्रमाणें तसें मानिलें जात नाहीं [रामगोपाल वि. नारायणचंद्र, ३३ क. ३१५ पा. १२ पहा] त्याचप्रमाणें तिर्हाइतांकडून मिळालेल्या मिळकतींपैकीं फक्त विवाहांत मिळालेली मिळकत दायभागाप्रमाणें व प्रचलित कायद्याप्रमाणेंहि स्त्रीधन समजली जाते (वर दिलेला ठराव पहा). याखेरीज इतर रीतीनें स्त्रीला मिळालेली मिळकत बंगालमध्येंहि स्त्रीधनच समजली जाते. स्त्रीनें विरुद्ध कबजानें मिळविलेली मिळकत स्त्रीधन समजली गेली आहे [मोहनचंद्र वि. काशीकान्त, २ क. वुइक्ली नोट्स १६१] शिल्पकलेशिवाय इतर रीतीनें स्त्रीनें स्वतः मिळविलेली मिळकत तिचें स्त्रीधन धरलें पाहिजे [प्राणकिसन वि. श्रीमती नयनमणी, ५ क. २२२ पहा] स्त्रीला अन्नवस्त्राकरतां मुलानें दिलेले पैसे [मुसमतदुर्गा वि. मुसमततेजु, २ वुइक्ली रिपोर्टस् ५३]. विवाहापूर्वी बापाच्या वुइलवरून मिळालेली मिळकत [जदूनाथ वि. वसंत, १९ वु. रिपोर्टस २६४] विवाहानंतर बापाकडून कांहीं मुदतीपर्यंत भाडेकरी म्हणून मिळालेली मिळकत [रामगोपाळ वि. नारायणचंद्र, २३ क. ३१५]. विवाहानंतर भांवाकडून मिळालेली मिळकत [वसंतकुमारी वि. कामक्षयकुमारी, ३३ क. २३] या सर्व मिळकती स्त्रीधन धरलेल्या आहेत.

स्त्रीधनावर स्त्रीचा ताबा:— दायभागांतील स्त्रीधनाची व्याख्या लक्षांत घेतां या प्रश्नास बंगालमध्यें महत्त्व उरत नाहीं. ज्या धनावर नवर्याचा कोणताहि हक्क नाहीं तेंच स्त्रीधन अशी स्त्रीधनाची व्याख्या घेतली म्हणजे अर्थातच स्त्रीधन मानिलेल्या धनाचा नवर्याच्या परवानगीशिवाय विनियोग करण्याचा स्त्रीस हक्क प्राप्त होतो. यास दायभागांत फक्त एक अपवाद दिला आहे, आणि तो, नवर्यानें दिलेल्या स्थावर मिळकतीसंबंधीं होय. सदर मिळकत जरी स्त्रीधन होते तरी ती बक्षीस देण्याचा वगैरे स्त्रीस अधिकार नाहीं असें दायभागांत नमूद केलें आहे. प्रचलित कायद्याप्रमाणें हा नियम पाळला जाईल किंवा नाहीं याची शंका आहे व त्या बाबत कलकत्ता हायकोर्टाचा ठराव नाहीं [बानर्जीचा स्त्रीधनग्रंथ, पान ३२१ पहा]. याशिवाय इतर स्त्रीधनाचा स्त्रीस विनियोग करण्याचा, नवरा असतांहि पूर्ण हक्क आहे [लछमन वि. कालीचरण, १९ वु. रिपोर्टस २९२].

स्त्रीधनास वारस:— वारसाकरितां स्त्रीधनाचे यौतक, पित्याचें प्रीतिदत्त, व इतर असे दायभागांत विभाग केले आहेत. तिसर्या प्रकारच्या स्त्रीधनास दायभागांत वारस आहेत ते येणेंप्रमाणें:— मुलगे व अविवाहित मुली; यांपैकीं दोन्ही प्रकारचे वारस असल्यास दोघांत सारखी वांटणी करावयाची व एकच प्रकारचे वारस असल्यास त्यांनां सर्व मिळतें. दोन्ही नसल्यास ज्यांनां मुलगा आहे अगर होण्याचा संभव आहे त्या विवाहित मुली. अविवाहित मुलींमध्यें वाग्दान झालेल्या मुलींचा दायभागांत समावेश केलेला नाहीं  व कलकत्ता हायकोर्टाचे ठराव त्याचप्रमाणें आहेत [श्रीनाथ गांगोली वि. सर्वमंगल, १० वु. रिपोर्टस पान ४८८]. वरीलप्रमाणें मुली नसल्यास स्त्रीच्या मुलाचे मुलगे व ते नसल्यास मुलीचे मुलगे व त्यानंतर वंध्या व विधवा मुली. रघुनंद व श्रीकृष्ण यांनीं वंध्या व विधवा मुलींच्या अगोदर कांहीं वारस दिलेले आहेत पण तें बरोबर नाहीं [पूर्ण वि. गोपाळ, ८ क. लॉ. जर्नल पान ३६९ व बानर्जीचें स्त्रीधन, पान ४२० पहा].

यौतकास वारस, दायभागांत दिले आहेत तें:— ज्यांचा वाङनिश्चय झाला नाहीं अशा मुली, नंतर वाग्दत्त मुली, नंतर विवाहित सधवा मुली, व ज्यांनां मुलगा आहे अशा विधवा मुली व नंतर वंध्या व विधवा मुली. मुलगा असलेल्या विधवा मुलीस विवाहित सधवा मुलींबरोबर वारसा मिळतो (चारूचंद्र वि नवसुंदर [१८ क. ३३७] सपिंड या शब्दाचा दायभागांत व मिताक्षरेंत भिन्न अर्थ केल्यामुळें व दायभागांत पिंड देण्याचा ज्यांनां हक्क आहे ते सपिंड असा अर्थ असल्यामुळें मुलगा असलेल्या विधवा मुलीस इतर सधवा मुलींबरोबर हक्क आहे. मुलींच्या अभावीं स्त्रीचे मुलगे व मुलांच्या अभावीं मुलीचें मुलगे त्यानंतर मुलांचे नातू. या सर्वांच्या अभावीं सावत्र मुलाचा मुलगा व नातू, याप्रमाणें वारस होतात.

बापाकडून मिळालेलें स्त्रीधन विवाहाच्या वेळीं अगर विवाहाखेरीज इतर प्रसंगी मिळालेलें असूं शकेल. विवाहाच्या वेळीं मिळालेलें यौतक या सदरांत येईल व त्यास येणारे वारस वर दिलेलेच आहेत. इतर प्रसंगीं बापाकडून मिळालेल्या स्त्रीधनाचा वारसा प्रथम अविवाहित मुलीकडे जातो. त्यानंतर दायभागांत विवाहित मुली दिल्या आहेत. परंतु तें बरोबर नसून अविवाहित मुलींकडे, नंतर मुलांकडे वारसा जातो असें कलकत्ता हायकोर्टानें धरलेलें आहे. [प्रसन्नकुमार वि. शरतशशी, ३६ क. ८६] मुलानंतर (अयौतकाप्रमाणेंच) मुलगा अगर मुलगी होण्याचा संभव असलेल्या विवाहित मुली, मुलांचे मुलगे, मुलीचें मुलगे, मुलांचे नातू, सावत्र मुलगा अगर त्याचा मुलगा व नातू, वंध्या सधवा मुली व विधवा या क्रमानें वारस होतात. स्त्रीधनाचा वारसा बंगाल संप्रदायाप्रमाणें मुलीच्या मुलीकडे जात नाहीं.

दायभागांत वर दिल्याप्रमाणें स्त्रीच्या संततींत वारसांचा क्रम दिला आहे. वर दिलेला क्रम हा बंगालमधील प्रचलित कायद्याप्रमाणें पाळला जातो. जेथें कलकत्ता हायकोर्टानें भिन्न क्रम दिलेला आहे तीं स्थळें वर दिलेलीं आहेत.

वर दिलेल्या वारसांच्या अभावीं स्त्रीधनाचा वारसा ठरतांना दायभागाप्रमाणें स्त्रीधनाचे पुन्हां निरनिराळे प्रकार करावे लागतात व प्रत्येकास निरनिराळे वारस दिलेले आहेत. स्त्रीच्या संततीनंतर वारसा ठरविण्याकरितां दायभागाप्रमाणें स्त्रीधनाचे पुढें दिलेले विभाग करतां येतील:- यौतक म्हणजे विवाहाच्या वेळीं मिळालेलें व अथौतक म्हणजे विवाहापूर्वी अगर नंतर आईबाप, नवरा इत्यादिकांकडून मिळालेलें. बानर्जी यांनीं आपल्या ग्रंथांत अयौतक असा एकच प्रकार न देतां आईबापाकडून कौमार्यात मिळालेलें अयौतक व अन्वाधेय असे दोन प्रकार दिले आहेत, परंतु लग्नापूर्वी आईबापांकडून मिळालेल्या धनास व अन्वाधेय म्हणजे लग्नानंतर आई, बाप व नवरा व त्यांच्या कुळांतील नातेवाईक यांच्याकडून मिळालेल्या धनास सारखेच वारस असल्यामुळें अयौतक असा एकच प्रकार देणें चूक होणार नाहीं. यौतकास वारस प्रथम नवरा, त्यानंतर भाऊ, आई व बाप असे येतात परंतु असंमत पद्धतीनें विवाह झालेल्या स्त्रीच्या यौतकाचा वारसा आई, बाप, भाऊ व नंतर नवरा या क्रमानें जातो.

अयौतकास वारस भाऊ, आई, बाप व नवरा या क्रमानें येतात. बापाकडून मिळालेल्या अन्वाधेय अयौतकासहि हाच क्रम लागू आहे. [रामगोपाळ वि. नारायण गोपाळ ३३ क. ३१५]. वर दिलेल्या वारसांत नवरा सर्वांच्या मागून येतो. [जदूनाथ वि. वसंतकुमार. १९ वु. रिपोर्टस २६४; हरीमोहन वि. शनातन, १ क. २७५; गोपाळचंद्र वि. रामचंद्र २८ क. ३११].

यानंतर सर्व प्रकारच्या स्त्रीधनास बंगाल संप्रदायांत सारखेच वारस येतात. दायभागांत यानंतर बृहस्पतीनें दिलेले वारस येतात असें सांगितलें आहे, परंतु बृहस्पतीच्या श्लोकांत जो क्रम दिला आहे त्या क्रमानें ते घेतलेले नाहींत. दायभागांत, नवर्याचा धाकटा भाऊ, पुतण्या (नवर्याचा धाकट्या अगर थोरल्या भावाचा मुलगा), बहिणीचा मुलगा, नवर्याच्या बहिणीचा मुलगा, भावाचा मुलगा, व जांवई या क्रमानें वारस दिलेले आहेत व यानंतर सासरा, नवर्याचा वडील भाऊ व नवर्याच्या कुळांतील इतर नातेवाईक सापिकांच्या सान्निध्याप्रमाणें येतात. वर दिलेला क्रम कलकत्ता हायकोर्ट ठरावांत मान्य केलेला आहे. सावत्र बहिणीच्या मुलाकडे नवर्याच्या वडील भावाच्या अगोदर वारसा येतो असें धरिलें आहे [दशरथी वि. बिपिन, ३२ क. २६१]. त्याचप्रमाणें नवर्याचा धाकटा भाऊ स्त्रीच्या सावत्र भावाच्या अगोदर येतो असें धरलेलें आहे [देवी प्रसन्नराय वि. हरेंद्रनाथ, ३७ क. ८६३ व स्त्रीच्या भावाचा मुलका तिच्या नवर्याचा सावत्र भावाच्या अगोदर येतो [लछमनी वि. तुलशी, ४ क. वुइक्ली नोट्स ७४३]. सपिंडांनंतर सकुल्य व समानोदक नातेवाईक, त्यांच्यानंतर बापाकडील इतर नातेवाईक व नंतर सरकारकडे याप्रमाणें स्त्रीधनाच्या वारसाची व्यवस्था आहे.

शुल्क:— शुल्काचा वारसा भाऊ, आई, बाप, नवरा व त्यानंतर, वर नवर्यानंतर जे वारस दिलेले आहेत ते या क्रमानें जातो. शुल्काचा दायभागांत ''नवर्यास आपल्या कामावर पाठवावें म्हणून कारागीर वगैरे इसमांनी स्त्रीला दिलेलें धन'' अथवा ''स्त्रीनें आनंदानें नवर्याच्या घरीं जावें म्हणून तिला नातेवाईकाकडून मिळालेलें धन'' असा अर्थ केला आहे.

कुमारीच्या धनास वारस:- कुमारीच्या धनास सर्व प्रांतांतून भाऊ, आई व बाप हे सारखेच वारस दिलेले आहेत; व त्याच्यानंतर बाणचे सपिंड नातेवाईक सान्निध्याप्रमाणें वारस होतील. कारण बापाचे सपिंड नातेवाईक तेच तिचे सपिंड नातेवाईक होतात [तुकाराम, वि. नारायण, ३६ मुं. ४०९]. सपिंड नातेवाईकांत वारसाकरितां अधिक जवळ कोण व अधिक दूर कोण हें अर्थातच प्रत्येक प्रांतांतील कायद्याप्रमाणें ठरविलें पाहिजें; उदाहरणार्थ मुंबई इलाख्यांत बापाची बहीण आजीनंतर येते. परंतु मद्रास इलाख्यांत बापाचे पुरुष सपिंड संपल्यानंतर बापाची बहीण येते. [सुंदरम् पिल्लय्ये, वि. रामसामी, ४३ म. ३२] व म्हणून सदर ठरावांत बापाच्या बहिणीच्या अगोदर बापाच्या चुलत्याच्या मुलाकडे कुमारीच्या धनाना वारसा जाईल असा निकाल दिला आहे.

असंमत पद्धतीनें विवाह झालेल्या स्त्रीधनास संततीच्या अभावीं जे वारस येतात तेंच कुमारीच्या धनास वारस येतात. कारण सदर स्त्रीचा वारसा संततीच्या अभावीं बाप व त्याचे वारस यांच्याकडे जातो [जंगलुबाई, वि. जेठा, ३२ मुं. ४०९; द्वारकानाथ, वि. शरच्चंद्र ३९ क. ३१९; कमळाबाई वि. भागीरथीबाई, ३८ म. ४२; ३६ मुं. ३३९; ४३ म. ३२]. मद्रास इलाख्यांत पुरुष मयत होऊन त्याच्या धनास वारस ठरवितांना त्याच्या गोत्रांत लग्नामुळें आलेल्या स्त्रिया (भावाची बायको चुलत्याची बायको इ.) यांच्याकडे वारसा जात नाहीं. परंतु स्त्रीधनाचा वारसा ठरवितांना वरील स्त्रिया इतर वारसांपेक्षां जवळ येत असतील तर त्यांच्याकडे वारसा जातो [कमळाबाई वि. भागीरथीबाई. ३८ म. ४५.]

कुमारीच्या स्त्रीधनास, त्याचप्रमाणें असंमत पद्धतीनें विवाह झालेल्या स्त्रीच्या धनास बापानंतर वारस ठरवितांना बौधायननानें ''तत्प्रत्यासन्नानाम्'' असें म्हटलें आहे. प्रत्यासन्न (जवळचे) असलेल्या नातेवाईकांत सगोत्र सपिंड तेवढेच घ्यावयाचें किंवा सगोत्र नसून सपिंड असलेलाहि घ्यावयाचे या प्रश्नास समर्पक उत्तर देणें जरा कठिण आहे. ''पत्नी दुहितरश्चैव'' ह्या सांद्र वारस पंक्तींतील जोंपर्यंत एखादा वारस आहे तोंपर्यंत हा प्रश्न उद्भवतच नाही. कारण तो गोत्रजसपिंड असो वा नसो त्याच्याकडे वारसा आला पाहिजे. उदाहरणार्थ बापाच्या मुलीचा मुलगा म्हणजे स्त्रीच्या बहिणीचा मुलगा हा गोत्रच नसला तरी त्यास वरील सांद्र पंक्तींत निश्चित जागा दिलेली आहे. परंतु याखेरीज इतर वारसांच्या बाबतींत हा प्रश्न उद्भवू शकेल त्यावेळीं भिन्नगोत्रसपिंड हा गोत्रजसपिंडापेक्षां जवळ येत असल्यास स्त्रीधनास कोण वारस होणार ? स्त्रीधनाचा वारसा फक्त सापिण्ड्याच्या सान्निध्याप्रमाणें ठरविला तर अर्थातच जवळचा भिन्नगोत्रसपिण्ड दूरच्या गोत्रजसपिण्डापेक्षां अगोदर येईल. व सर गुरुदास यांनीं आपल्या ग्रंथात याप्रमाणेंच अर्थ केला आहे. [बानजींचे स्त्रीधन, पान ३७५/७६ पहा; व द्वारकानाथ वि. शरचंद्र, ३१९ पान ३३० पहा].

कुमारीच्या बापाच्या कुळांतील सपिण्ड वारस आईच्या कुळांतील वारसांच्या अगोदर येतात. कारण बापाचें गोत्र अगर कुल तेंच आईचेंहि तिच्या विवाहामुळें होतें [तुकाराम वि. नारायण, ३६ मुं. ३३९].

देवदासी, नायकिणी व व्यभिचारी स्त्रिया यांच्या धनास वारस:— देवदासी व नायकिणी यांच्या धनाचा वारसा त्याचें धन स्त्रीधन समजूनच ठरविला जातो. वास्तविक हिंदु शास्त्रांत स्त्रीधन ही संज्ञा विवाह झालेल्या स्त्रीच्या धनास दिलेली आहे. तथापि हल्लीं वरील स्त्रियांचें धन स्त्रीधन समजूनच कोर्टांनीं वारसा ठरविला पाहिजे [त्रिपुरचरण वि. हरिमती, ३८ क. ४९३ पान ४९७ पहा]. सदर स्त्रियांचा वारसा प्रथम त्यांच्या मुलीकडे जातो व नंतर मुलाकडे जातो [जया वि. मंजुनाथ, १९ मुं. लॉ रिपोर्टर ३२०; कामाक्षी वि. नागरंथम् ५ म. हा. रि. १६१; ३८ क. ४९३ यांत मुलगे व मुली एकाच वेळीं वारस होतात असा निकाल आहे].

ज्या स्त्रिया नायकिणीच्या कुळांत जन्मलेल्या नसून स्वतः ज्यांनी नायकिणीचा धंदा पत्करला आहे त्यांचा व त्यांच्या नातेवाईकांचा त्यांच्या पतनानंतर संबंध रहातो किंवा कसें या प्रश्नास निरनिराळ्या वेळीं निरनिराळीं उत्तरें हायकोर्टाच्या ठरावांतून मिळतात. कलकत्ता व मद्रास हायकोर्टांच्या कांहीं ठरावांप्रमाणें सदर स्त्रिया दुर्मार्गास लागल्यानंतर त्यांचा त्यांच्या कुळांशीं कांहीं संबंध रहात नाहीं व त्यांच्या धनास त्यांच्या पूर्वीच्या कुळांतील इसम वारस होऊं शकत नाहींत [इन् दी गुड्स ऑफ कामिनी मनी बेवा, २१ क. ६९७; शिवसंगू वि. मिनाल, १२ म २७७ व ३८ क ४९३ व ४० क. ६५० यांत या बाबत असलेले इतर ठराव दिले आहेत ते पहा]. इतकेंच नव्हे तर सदर स्त्रियांस त्यानंतर पतितावस्थेंत मुलगे व मुली झाल्या असतील तर त्यांपैकीं ज्यांनी विवाह करून सन्मार्ग पत्करिलेला असेल त्यांच्याकडे त्यांचा वारसा न जातां फक्त त्यांच्याप्रमाणें चालणार्यांकडे वारसा जाईल असे ठराव आहेत [१२ म. २७० पहा]. परंतु वरील दोन्ही हायकोर्टाचे अलीकडील ठराव या मतांविरुद्ध आहेत. त्रिपुरचरण वि. हरिमती, ३८ क ४९३ यांत पतितावस्थेंत झालेल्या संततींत वर दिल्याप्रमाणें भेद करणें बरोबर नाहीं असा निकाल दिला आहे. व हिरालाल वि. त्रिपुरचरण ४० क. ६५० यांत स्त्रीच्या पतनामुळें तिचा ज्या कुळांत जन्म झालेला असेल त्या कुळाशीं तिचा संबंध तुटला नाहीं व त्यांतील इसम तिचे वारस होऊं शकतात असा ठराव आहे. मद्रास हायकोर्टाचा मीनाक्षी वि. मुनीअंडी, ३८ म. ११४४ यातहिं असेंच मत दिलें आहे. मद्रास हायकोर्ट याच्याहि पुढें गेलें आहे व सुब्रय्या वि. रामसामी, २३ म. १७१ यांत स्त्रीच्या पतनामुळें तिचा नवर्याच्या कुळाशीं असलेला संबंध तुटत नाहीं. व नवर्याच्या कुळांतील इसमहि तिच्या मिळकतीस वारस होऊ शकतात असा ठराव आहे. अलाहाबाद हायकोर्टाचे ठरावहि ४० क. ६५० व २३ म. १७१ प्रमाणेंच आहेत. नारायणदास वि. तिरलोक तेवारी, २९ अ. ४ यांत तर पतित बायकोचा वारस म्हणून तिचा नवराच तिच्या मिळकतीवर हक्क दाखवीत होता व त्याचा हक्क हायकोर्टांत मान्य केला गेला. मुंबई हायकोर्टाचा या मुद्द्यावर ठराव दिसत नाहीं, परंतु जगन्नाथ वि. नारायण, ३४ मुं. ५१० या ठरावात बायको जरी पतित झालेली होती तरी तिची मिळकत तिच्या नवर्यासच मिळाली; ती व्यभिचारी असतांना तिला झालेल्या मुलास मिळाली नाहीं, यावरून नवर्याचा पतित स्त्रीशीं संबंध तुटतो असें म्हणतां येणार नाहीं. नागपूर चीफ कोर्टाच्या ठरावाप्रमाणें पतित स्त्रीचा नवर्याच्या कुळाशीं, ती कुमार्गास लागल्यानंतर संबंध रहात नाहीं [चंद्रभागा वि. विश्वनाथ, ९ ना लॉ रि. १०२ पहा]. (लेखक व्ही. वी. चंद्रचूड, वकील).

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .