प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
           
स्कॉटलंड— इंग्लंडच्या उत्तरेकडील ग्रेटब्रिटनचा एक भाग व देश. क्षेत्रफळ ३०४०५ चौ. मैल. यांत पश्चिमकिनार्याकडील हेब्रिडीज व इतर बेटें. व उत्तर किनार्याकडील ऑर्कनी आणि शेटलँडबेटें मोडतात. याची सर्वांत जास्त लांबी २७४ मैल आणि सर्वात जास्त रुंदी १५४ मैल आहे. समुद्रकिनार्याची रेषा २३०० मैल आहे व देशांतील कोणताहि भाग किनार्यापासून चाळीस मैलांहून दूर नाहीं. निव्वळ जमीनीचें क्षेत्रफळ २९७९६ चौरस मैल आहे. या प्रदेशाला स्कॉटलंड हें नांव ११ व्या शतकांत देण्यांत आलें. तेथपर्यंत याच्या कांहीं भागाला स्कॉटिआ म्हणत असत. स्वाभाविक रीतीनें याचे तीन भाग केले आहेत : (१) 'हायलँड' (२) सेंट्रलप्लेन किंवा 'लोलँड'; आणि (३) सदर्न अपलँड. हायलँड:- अवर्डीनशायरचा पूर्वभाग, व बन्फ, एल्जिन व नैर्न यांचे उत्तरभाग सोडून बाकीचा प्रदेश. यांतील टेंकड्यांच्या निरनिराळ्या रांगा ईशान्येकडून नैॠत्येकडे गेलेल्या असून त्यांच्या मधूनमधून उभ्या आणि आडव्या दर्या गेल्यामुळें त्या तुटक झालेल्या आहेत. ग्रेटप्लेन या खोर्यामुळें या टेंकड्यांचे दोन वेगळाले भाग झालेले आहेत: (१) वायव्य भागांतील अतिशय उंच प्रदेश (२ ते ३ हजार फूट) अटलांटिक महासागराच्या किनार्याला लागून आहे. (२) आग्नेयी भागांत (उंची ४ हजार फूट) जास्त वैचित्र्य दिसून येतें व यांतील बहुतेक दर्या आणि सरोवरे नैॠत्य व ईशान्य टापूंत आहेत. लोलँड-हा प्रदेश नैॠत्येकडून ईशान्येकडे पसरलेला आहे. याला 'सेंट्रल प्लेन' म्हणजे मधलें मैदान असेंहि दुसरें नांव आहे या प्रदेशांतील मुख्य तीन दर्यांपैकीं टे आणि फोर्थ या दोन हायलँडमधून निघाल्या आहेत आणि क्लाइड ही सदर्न अपलँडमधून निघाली आहे. सदर्न अपलँड-नार्थचॅनेलपासून तों सेंट अब्ज हेडपर्यंतचा प्रदेश. यांतील सर्व जमीन डोंगराळ आहे (उंची २७६४ फूट). स्कॉटलंड या प्रांतांत दर्या पुष्कळ आहेत. ईशान्येकडून नैॠत्येकडे पसरलेल्या दर्या तुटक आहेत. दर्यांच्या रूढ नांवांवरून त्यांचें विशिष्ट स्वरूप दिसून येतें, उदाहरणार्थ स्ट्राथ टे, स्ट्राथस्पे व स्ट्राथ कॉनोन स्ट्राथ याचा अर्थ दोन टेंकड्यामधील सखल जमीनीचा रुंद विस्ताराचा व ज्यांतून एक मुख्य नदी आडवी गेली आहे असा भाग. हें नांव पुष्कळ दर्या मिळून झालेल्या सखल प्रदेशाच्या रुंद भागालाहि लावण्यांत आलें आहे; उ. स्ट्राथमोर किंवा ग्रेथस्ट्राथ. ग्लेथ म्हणजे स्ट्राथपेक्षां कमी रुंदीची आणि कडा जास्त तुटलेली दरी. हायलँडमधील बहुतेक दर्यांचीं नांवें याच रूढ अर्थी आहेत. दक्षिणेस मोठाले ओढे रूंद व मोकळ्या दर्यांतून वहातात. या दर्यांनां डेल म्हणतात. उ. क्लाइड्सडेल. हायलँडमधून वाहात येणार्या नद्या जेथें तांबड्या रेताड दगडांनीं आडवलेल्या आहेत तेथें या खिंडी विशेष ठळक अशा आहेत. ज्या खिंडींत क्लाइडचे धबधबे पडतात ती खिंड लोलंडमध्यें प्रख्यात आहे. पूर्व ग्रँपिअनमध्यें समुद्रसपाटीपासून ३।४ हजार फुटांवरील डोंगरपठारावा पाणथळ जागा आहेत, त्याचप्रमाणें बेन मकटुइच्या शिखरावर व आणखी कांहीं पर्वतांवर पाणलोटाच्या जागा आहेत. रुंद डोंगरपठारें पूर्वभागांत मुख्यत्वेंकरून आढळतात. पश्चिमेकडील डोंगरांवर अटलांटिक कडून येणार्या पावसाचा तडाखा बसत असल्यामुळें, त्यांच्या कडा लवकर झरतात. ज्या ठिकाणी डोंगरावर हवेचा सर्व बाजूंनीं परिणाम होतो तेथें त्यांचे शंक्वाकार सुळके बनतात. उ. श्चिहेलिअन पर्वत. कधीं कधीं या सुळक्यांची रांग असून हे पायथ्याशीं सर्व मिळालेले असतात व कधी सुळक्यांचा समूह मुख्य डोंगरापासून वेगळा झालेला दिसून येतो. उ. पप्त आफ जुरा.

सरोवरें, (१) खोर्यांतील सरोवरें:— हीं खोर्यांतील अतिशय खोलगट भागांत असतात. दर्यांत बर्फ गोठून त्या क्रियेनें दरीच्या कडा ढांसळून ही सरोवरें बनत असावीत. ही सरोवरें अलीकडील भूस्तरकाळांतील असावीं. हीं सरोवरें बहुतेक हायलँडच्या पश्चिम भागांत आहेत. त्यांत लाकनेस हें सर्वांत मोठें आहे. दुसरी टे, आ, एरिच वगैरे. स्कॉटलंडांतील, लोमांड, कॅट्रिन, लबनैग, मरी आणि मोर ही सरोवरें रमणीय आहेत. (२) डोंगरातील सरोवरें:— ही लहान लहान असून सर्व ठिकाणीं आहेत. हायलँडच्या वायव्यभागांत यांची संख्या अतिशय आहे. (३) हिमनदी गाळामुळें झालेलीं सरोवरें:- या वर्गांतील लॉक स्केनी हें दक्षिणेकडील असून अतिशय प्रेक्षणीय आहे. हायलँडमध्यें यांची संख्या अगणित आहे. (४) मैदानांतील सरोवरें:- हीं अगदीं उथळ असतात व यांचा आकार लहान डबक्यापासून तों कित्येक चौरस मैल विस्ताराच्या मोठाल्या सरोवराएवढा असतो. पूर्व आणि पश्चिम समुद्र किनार्यांचे स्वरूप एकमेकांहून अगदीं भिन्न आहे. पूर्वकिनार्याकडे लहान लहान खाड्या बर्याच आहेत. किनार्याचा बहुतेक भाग सखल असून त्याच्या समोर बेटें नाहींत. लागवडीची जमीन अगदीं समुद्रसपाटीला लागून आहे. पश्चिमेस किनार्यावर ठिकाठिकाणी समुद्राच्या पाण्याचीं लांब आणि अरुंद सरोवरें असून समुद्रकांठाशीं जमीन एकदम तुटलेली आहे व समोर बेटांच्या रांगा आहेत. पश्चिमकिनार्याला जीं पुष्कळ सरोवरें दिसतात ती खोरीं होतीं. पूर्वी हेब्रिडीज बेटें आणि हायलँड हे दोन्ही भाग जमिनीनें जोडले होते. परंतु त्यामधली जमीन खाली गेल्यामुळें हे दोन्ही भाग वेगळे झाले. पश्चिमेकडील डोंगराळ भागीं पाऊस जास्त पडतो त्यामुळें ते डोंगर झरतात. देशाच्या कांहीं भागांत लोक शेतकरी व कांहीं भागांत धनगर आणि गुराखी आहेत. हायलँडमध्यें खनिज द्रव्यें नसल्यामुळें उद्योगधंद्यांचीं वाढ झालेली दिसत नाहीं. पूर्वेकडील प्रांतांत पाट्यां (स्लेटी) चे ठिसूळ दगड पुष्कळ आहेत. खेरीज जंबूर, वाळूमिश्रित, अचिअन् तांबडे चाकोलेट रंगाचें, जुरेसिक, पर्मिअन वगैरे जातींचे दगड आहेत.

पश्चिम आणि पूर्वकिनार्याचें हवामान सारखें आहे. परंतु उन्हाळ्यांतील आणि हिवाळ्यांतील हवामानांत दोन्ही ठिकाणी फार फरक दिसून येतो. पूर्वकिनार्याचें उष्णमान आंतील उष्णमानापेक्षां जास्त असतें. हिवाळ्यांत देशांतील उष्णमान समुद्रकिनार्याच्या उष्णमानापेक्षां जास्त असतें. नैॠत्य वारे जुलैपासून आक्टोबर आणि पुन्हां डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत जोरानें वाहतात. या महिन्यांत पाऊसहि अतिशय जोराचा पडतो. मार्चपासून जूनपर्यंत आणि नोव्हेंबर महिन्यांत ईशान्यवारे नेहमीं वाहतात व याच महिन्यांत हवेंत सर्व वर्षांत जास्त कोरडेपणा असतो. पश्चिमेकडील भागांत बहुतेक डोंगर असल्यानें येथील हवा नेहमीं सर्द असतें. पूर्वेकडे पावसाचें मान २६ इंच व पश्चिमेकडे १०० इंचांवर असतें.

स्कॉटलंडची लोकसंख्या (१९२४) ४८८१६३७. जननसंख्या मृत्युसंख्येच्या जवळ जवळ दीडपट आहे. सदर्नलँडमधील लोकवस्ती सर्वांत पातळ आणि लॅनार्कमधील सर्वांत दाट आहे.

या देशांत पुढील शहरें मोठी व व्यापाराचीं आहेत : ग्लासगो, एडिंबरो, डंडी, अबर्डीन, पेजले, लीथ, गोव्हन, ग्रीनॉक, पार्टिक, कोटब्रिज, किल्मार्नाक, किर्काल्डि, पर्थ, हॅमिल्टन व मदरवेल. या देशांत बँक ऑफ स्कॉटलंड नांवाची बँक ऑफ इंग्लंडसारखी एक मोठी बँक आहे आणि तिला सरकारी सनदहि मिळालेली आहे. गोरगरिबांनां मदत करण्याचें काम रिफार्मेशनपूर्वी चर्च करीत असें. ज्यांनां भिक्षा मागण्याशिवाय दुसरा उपायच राहिला नव्हता अशांनांच फक्त आपापल्या तालुक्यामध्यें भिक्षा मागण्याची परवानगी मिळे. जे धट्टेकट्टे असत त्यांच्यावर फार करडी नजर राही. त्यामुळें इंग्लंडसारखी येथें वर्कहाऊसेस न निघतां भिक्षागृहें निघाली. स. १५७९ च्या कायद्यान्वये वृद्ध आणि दुबळे यांची यादी करून त्यांच्या मदतीसाठीं प्रत्येक तालुक्यातून कर वसूल करण्यास प्रारंभ झाला. परंतु लोकांकडून पुरेशी मदत न मिळाल्यानें या पद्धतीचा चांगला उपयोग झाला नाहीं. म्हणून १८४५ सालीं दुसरा कायदा करण्यांत आला. या कायद्याप्रमाणें एक बोर्ड नेमून त्याचें एडिंबरो हें मुख्य ठाणें केलें. पुढें १८९४ मध्यें साध्या बोर्डच्या जागीं लोकल गव्हर्नमेंट बोर्ड स्थापन केलें. या बोर्डानें मदत करण्याच्या कामांत पूर्वीपेक्षां बरीच सुधारणा केली. आजारी लोकांसाठीं दवाखाने काढून कांहीं ठिकाणी त्यांच्या घरीं औषधें पोहोंचविण्याची व्यवस्था केली व बेड्यांच्यासाठीं वेगळे दवाखाने बांधले. सर्व गरिबांच्या मुलांनां त्यांच्यापासून वेगळे ठेवून त्यांची खाण्यापिण्याची, शिक्षणाची निराळी व्यवस्था केली. पुअर लॉ अन्वयें सांप्रत कांहीं गरिबांनां आपल्या स्वतःच्या घरांत राहूनहि सरकारी मदत मिळते. हा कायदा आरोग्यखात्याच्या दिवाणाच्या ताब्यांत आहे. त्याच्या हाताखालीं लोकनियुक्त बोर्ड ऑफ गार्डियन्स असतें. मोठी शहरें, गांवें व खेडीं यांचे गट करून प्रत्येक गटांत एक एक बोर्ड ऑफ गार्डियन्स नेमतात. १९२२ सालीं या बोर्डांनीं एकंदर ३॥। कोट रु. गरिबांच्या पोषणार्थ खर्च केले. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत येथें कायमचें पोलिसखातें नव्हतें. प्रत्येक जिल्ह्याला आपापली संरक्षणाची व्यवस्था करून घ्यावी लागे. स. १८५७ पासून येथें कायमचे पोलीस ठेवण्यास सुरवात झाली.

शि क्ष ण.— शिक्षणाच्या सोयींसाठीं दुय्यम व प्राथमिक शिक्षणाच्या शाळा बहुधां प्रत्येक गांवांतून आहेत. त्यांवरील शिक्षकांची नेमणूक तहाहयात असते. इ. स. १८७२ ते १९१८ पर्यंत झालेल्या शिक्षणकायद्यांनीं प्राथमिक शिक्षण सर्वस्वी स्थानिक अधिकार्यांच्या हातीं ठेवलें आहे. वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण हें सक्तीचें आहे. २ ते ५ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी बालवर्ग आहेत. सक्तीच्या शिक्षणाच्या खाजगी शाळांनां सरकारी ग्रँट मात्र मिळत नाहीं. १३ वर्षांच्या खालील मुलांनां मजुरी करण्यास बंदी आहे. सन १९२३ त २९०१ प्राथमिक शाळा व त्यांतून ८॥। लक्ष विद्यार्थी होते. त्याखेरीज १०१ माध्यमिक शाळा आहेत. तसेंच आंधळे, मुके वगैरे मुलांसाठीं १९२३ त १०८ प्राथमिक शाळा होत्या व त्यांत ८७६० विद्यार्थी होते. खेरीज याच दर्जाच्या रेफर्मेटरी व औद्योगिक अशा ३८ शाळा होत्या. ट्रेनिंग कॉलेजें ७ होतीं. स्थानिक शिक्षणअधिकारीमंडळांत सरकार, पालक व शिक्षक यांचा समावेश होतो. प्राथमिक, माध्यमिक व दुय्यम अशा शिक्षणास फी नाहीं, तें मोफत मिळतें. हुषार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कामीं मदत करण्यासाठीं, प्रवास, खाणेंपिणें वगैरेसाठीं देणग्या मिळतात. जिल्हाशिक्षणमंडळ तर विद्यार्थ्यांनां पुस्तकें विकत घेऊन देतें. लहान मुलांसाठी सकाळदुपारच्या शाळा आहेत. दुय्यमदर्जाच्या शाळा १९२३ सालीं २६६ होत्या. या शाळांनां सरकारी ग्रँट मिळते. यांत ९६ हजार मुलें होती. हल्लीं या देशांत सेंट अंड्रूज, ग्लासगो, अबर्डीन व एर्डिबरो अशीं चार विश्वविद्यालयें आहेत; सन १९०१ मध्यें कानेंजी या धनाढ्यानें २ कोटी रु. च्या फंडाचा एक ट्रस्ट करून त्याचें व्याज विश्वविद्यालयाच्या सुधारणेस व विद्यार्थ्यांच्या मदतीस निम्मेनिम्मे देण्याचें ठरविलें आहे. हल्लीं या देशांत शेंकडा ४ लोक गालिक भाषा बोलतात.

शे त की.— येथें मोठमोठे जमीनदार असून त्यांच्या जमीनीहि मोठ्या आहेत. परंतु शेतकीच्या दृष्टीनें त्या फार महत्त्वाच्या नाहींत. सन १९२४ मध्यें या देशांतील एकंदर १९०७०००० एकर जमीनींपैकीं ३२७३००० एकर जमीन लागवडीखालीं होती. हा देश डोंगराळ असल्यामुळें जमीनदारीचे लहान लहान विभाग करतां येत नाहींत. पूर्वी प्रत्येक जमीनदार आपापल्या जमीनीचा पूर्णपणें मालक असल्यामुळें दुसरा कोणी त्याच्या शेतींत स्वतंत्रपणें सुधारणा करण्यास धजत नसें. ही परिस्थिति १७४८ त बदलली व पुढें या धंद्यांत सुधारणा होऊं लागलीं. जमीन एक वर्षांच्या ठेक्यानें देण्याची पद्धत रद्द करून २० वर्षांच्या ठेक्याने देण्याची पद्धत सुरू झाली. हल्लीं (१९२४) अशा पद्धतीच्या ७६२१० जमीनदार्या (लहानमोठ्या) आहेत. नुक्तेंच एक बोर्ड नेमलें आहे. त्यानें शेतकीचें शिक्षण व शोध लावण्यासाठीं बर्याच रकमा खर्ची घातल्या आहेत. तसेंच मच्छीमार, जंगल व शेती यांसाठीं डेव्हलपमेंटफंडांतून सरकारनें १५ लक्ष रु. मदत केली आहे. फक्त सन १९२४ या एकांच सालीं या देशानें मासळीच्या व्यापारावर ४६ कोटी रु. ची उलाढाल केली. पिकांत वालीं हें पीक मुख्य असून, ओट, गहूं, कडधान्यें व वाटाणें हीं पिकेंहि होतात, बटाटे, कोबी वगैरे भाजीपालाहि बराच पिकतो. फळबागा आणि जंगलहि बरेंच आहे. १९२४ सालीं ६९ लक्ष मेंढ्या व १२ लक्ष गाईबैल होते.

कालवें.— येथें कॅलेडोनियन, क्रिनन, फोर्थ आणि क्लाइड आणि युनियन असे प्रमुख कालवे आहेत. कॅलेडोनियन आणि क्रिनन हे दोन्ही कालवे सरकारनें बांधले आहते. १९०५ सालीं १८४ मैल लांबीचे कालवे होते. सन १८१२ त पार्लमेंटच्या परवानगीनें किलमारनाकपासून ट्रूनपर्यंत (१० मैल) पहिला आगगाडीचा रस्ता बांधला. या आगगाड्यांनां त्यावेळी घोडे जुंपीत. स. १८३१ त उतारूंची नेआण करण्यासाठीं दुसरा रस्ता बांधला. १९१० सालीं रेल्वे कंपन्यांचें भांडवल १८५०००००० पौंड होतें व आगगाडीच्या मार्गांची एकंदर लांबी ३८४४ मैल होती.

खाणी.— कोळसा आणि लोखंड हे येथील मुख्य खनिजपदार्थ असून यांच्या खाणी जवळ जवळ आहेत. लॅनार्क शायरमधील खाणी सर्वांत मोठ्या आहेत. सर्व देशांत उत्पन्न होणार्या कोळशापैकीं जवळ जवळ निमा कोळसा येथील खाणींतून निघतो, आणखी फाइफशायर, आयरशायर, स्टर्लिंगशायर आणि मिडलोथिअन, लिनलिथगो, हड्डिंगटन, डंबार्टन, फ्लॅकमन्नन फिन्नास, डंफ्रोन, रेनफ्र्यू, आर्गाइल आणि पिबल्स या भागांतहि कोळशाच्या खाणी आहेत. सन १९०५ मध्यें कोळशाच्या आणि लोखंडाच्या खाणींचीं संख्या ४९२ होती. स. १७६० मध्यें कॅरोन नांवाचें लोखंडाचे कारखाने निघाल्यापासून या धंद्याची चांगली वाढ होऊं लागली आणि आगगाड्या झाल्यापासून 'पिग आर्यन' तयार करण्याचे कारखाने भरभराटीस आले. सरासरी १/३ वर लोखंड कोळशाच्या खाणींत सांपडतें. आयर, लॅनार्क, रेनफ्र्यू, लिनलिथगो, डंबार्टन, फाइफ, मिडलोथिअन आणि स्टर्लिंग या कौंटीत लोखंडाच्या खाणी आहेत व यांपैकीं पहिल्या तीन खाणींत सर्वांत जास्त लोखंड निघतें. कोळसा आणि लोखंड यांशिवाय एक प्रकारचें खडकांतून निघणारें तेल, मुशीची माती, ग्रॅनाइट, चुनखडी, फरशीचे दगड, वाळूचे दगड, अशुद्ध शिसें, सोनें व जस्त हे खनिज पदार्थ या देशांत आढळतात.

कारखाने, लोंकर आणि लोकरीचें विणकाम:- १९व्या शतकांपर्यंत लोंकरीचें कापड हातांनींच विणीत असत. हें कापड गरीब लोक वापरीत. श्रीमंत लोकांनां लागणारें चांगलें कापड इंग्लंड आणि फ्रान्स या ठिकाणांहून येत असे. १९व्या शतकांत कापड विणण्याचीं यंत्रें निघाल्यापासून या धंद्याची वाढ होऊं लागली, तागाचें कापड विणण्याचें कारखाने फार जुनें असून येथील कापड १६व्या शतकाच्या अखेरपर्यंत इतर देशांत आणि इंग्लंडमध्येंहि पाठविण्यांत येत असे. या धंद्याला उत्तेजन देण्यासाठीं १६८६ सालीं, गरीब लोक खेरीजकरून बाकींच्या सर्व लोकांचीं प्रेतें देशांत तयार केलेल्या साध्या तागाच्या कपड्यांतच गुंडाळून पुरलीं पाहिजेत असा कायदा केला होता. सर्वांत मोठाले कारखाने फोरफार, पर्थ, फाइफ आणि अवर्डीन या कौटींमध्यें आहेत. सन १७७९ मध्यें एका इंग्लिश कंपनीनें रॉथसे येथें पहिली कापसाची गिरणी सुरू केली. हल्लीं हे कारखाने पुष्कळ निघाले आहेत. पेजली आणि ग्लासगो या ठिकाणीं रेशमाचें कापड विणण्याचे कारखाने आहेत. याखेरीज जाळीचे पडदे करण्याचे, आणि मोजे तयार करण्याचे कारखानेहि निघालेले आहेत. दारू गाळण्याची क्रिया इंग्लंडमधून येथें आली. १९ व्या शतकाच्या आरंभीं, दारू कमी तयार व्हावी म्हणून जास्त कर वाढविण्यांत आला होता, परंतु पुढें कर कमी झाल्याबरोबर ठेकेदारांची संख्या वाढली. युनायटेड किंगडममधील दारूच्या कारखान्यांपैकी ४/५ कारखाने स्कॉटलंडमध्यें आहेत.

कागद तयार करण्याचे, लेखनसाहित्याचे आणि मुद्रणाचेंहि कारखाने आहेत. पहिला कागदाचा कारखाना १६७५ मध्यें डालरी येथें निघाला. ग्लासगो आणि अबर्डीन येथील छापखाने मोठले आहेत. साखरेचे, मेणकापडाचे आणि 'लिनोलिअम' चे कारखाने आहेत. रासायनिक द्रव्यें करण्याचें मुख्य ठिकाण ग्लासगो हें आहे. १९०३ सालीं ४०३९६२८० पौंड किंमतीच्या मालाची आयात झाली आणि ३२३०११९८ पौंड किंमतीच्या मालाची निर्गत झाली. ग्लासगो, लीथ, ग्रेंगमौथ, डंडी, ग्रीनॉक, मेथिल, अबर्डीन, गँटन, बर्नटिसलँड, अर्ड्रोसन हीं मुख्य बंदरें आहेत.

धर्म.— बहुतेक लोक ख्रिस्ती धर्माच्या प्रेसबिटेरिअम पंथाचे आहेत. ह्या पंथाचें पहिलें चर्च १५६० सालीं स्थापन झालें. धार्मिक खटले निवडण्यासाठीं ७५० सभासदांची एक जनरल असेंब्ली आहे. पाद्य्रांनीं चालविलेल्या कांहीं शाळा व कॉलेजें आहेत.

पार्लमेंटचा राज्यकारभार.— इ. स. १७०७ च्या युनिअन अॅक्टोप्रमाणें स्कॉटलंडमधील पार्लमेंट मोडून हल्लीं इंग्लंडचा आणि स्कॉटलंडच राज्यकारभार एकत्र झालेला आहे. प्रथम स्कॉटलंडचे प्रतिनिधी म्हणून 'हौस आफ लार्ड' सभेंत १६ लार्ड आणि 'हौस आफ कॉमन्स' सभेंत ४५ सभासद पाठविण्यांत येत असत. १८३२ च्या सुधारणाकायद्यानें कॉमन्स सभासदांची संख्या ५३ करण्यांत आली. १८६७ च्या सुधारणांनीं ही संख्या साठ होऊन त्यांपैकीं दोन सभासद विश्वविद्यालयातर्फें निवडून येत असत. १८८५ मध्यें सभासदांची संख्या ७२ झाली. पार्लमेंटमधील कामकाजांची सर्व व्यवस्था १८८५ पासून स्कॉटलंडकरितां नेमलेला सेक्रेटरी पाहतो. 'युनिअन'पासून स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन्ही देशांचे कायदे बहुतेक एकच झालेले आहे. अम्मलबजावणी करण्याची पद्धति थोडी  बहुत वेगळी आहे एवढेंच. सेशन कोर्टाचे इतर आणि औटर हौस असे दोन पोटभाग आहेत व या दोन्ही भागांसाठीं तेरा न्यायाधीश आहेत. सर्व देशांत हें कोर्ट मुख्य आहे. या कोर्टावरील अपील 'हौस ऑफ लार्ड्स' कडे चालतें. प्रत्येक कौंटींतील खटले चालविण्याचें काम तेथील शेरीफकडे असतें. याच्या कोर्टांतील ज्युरीनें दिलेल्या निकालांत हायकोर्टास सहसा हात घालतां येत नाहीं. खेरीज बरो म्याजिस्ट्रेट व जस्टिस ऑफ धी पीस हेहि किरकोळ गुन्ह्यांची चौकशी करतात.

स्थानिक स्वराज्य.— यासाठीं १८८९ मध्यें लोकल गव्हर्मेंट अॅक्ट नांवाचा इंग्लंडच्या त्याच नांवाच्या कायद्याच्या धर्तीवर एक कायदा पास झाला. यामुळें ठिकठिकाणच्या कौंटींमध्यें कौन्सिलें निर्माण केलीं व त्यांच्या हातीं स्थानिक स्वराज्याचा अधिकार दिला. हें अधिकार बहुतेक पूर्वीच्या कमिशनर ऑफ सप्लाय अँड रोड ट्रस्टीज यांच्या हातातील अधिकारांसारखेच होते. नंतर (१८९४) एक लोकल गव्हर्मेंटचा कायदा झाला. त्यात एक सरकारी बोर्ड असून, सेक्रेटरी ऑफ स्कॉटलंड हा त्याचा अध्यक्ष व ५ सरकारनियुक्त अधिकारी होते. नंतर त्यांत सुधारणा होऊन दरेक पॅरिश (पेटा)ला एक एक बोर्ड दिलें व त्याच्या हातीं स्थानिक स्वराज्याचा हक्क दिला. १९२१ सालीं अशीं ८६९ पँरिश बोर्डे होती. या खेरीज देशांत म्युनिसिपालिट्या असून त्यांना इंग्लंडांतील म्युनिसिपल प्रमाणेंच हक्क आहेत. याशिवाय वर्ग (सनदी गांवें) म्हणून मोठी गांवें आहेत. सरदारांचीं, जहांगीरदारांचीं, खास राजाचीं, पार्लमेंटचीं व पोलिसांची बर्ग्ज असे यांचे पांच वर्ग केले असून त्यांनां स्थानिक स्वराज्याचे अधिकारी असून पार्लमेंटांत प्रतिनिधि निवडून देण्याचा अधिकार आहे. हीं बर्ग्ज एकंदर १६ आहेत. यांच्याखेरीज ३३ कौंटी (जिल्हा) आहेत. ५० हजार लोकवस्तीच्या वरील गांवांना बर्ग्ज गणण्यांत येतें. या देशाला पार्लमेंटांत स्त्रिया प्रतिनिधि म्हणून निवडण्याचा हक्क मिळाला आहे. मतदारीचा हक्क इंग्लंडप्रमाणेंच आहे. सन १९२४ मध्यें निरनिराळ्या करांचें उत्पन्न १७॥ कोटी रुपये झालें, त्याचा विनियोग शिक्षण, गरीबांच्या सोयी, पोलीस व इतर खाती यांकडे झाला. सरकारी खात्यांतील कांहीं खातीं व व्यापारी मंडळ्यांतील कांहीं मंडळ्या यांच्यामधील नोकरांनां सक्तीनें आयुष्याचा विमा उतरावा लागतो, ही एक फायद्याची गोष्ट आहे.

'कौंटी' हा राजकीय कारभाराचा सर्वांत मोठा घटक होय. या कौंटींचें क्षेत्रफळ सरकारी किंवा राजकीय सोईसाठीं कमी जास्त करतां येतें. कौटींचा सर्वांत मोठा अधिकारी लॉर्ड लेफ्टनंट असतो. ही जागा १७८२ पासून चालत आलेली आहे. ही नेमणूक राजा करतो. ही बहुतेक बिनपगारी असते.

इ ति हा स.— स्कॉटलंड हें इंग्लंच्या उत्तरेस असून सांप्रतच्या ग्रेटब्रिटनचा उत्तरार्धन आहे. तें सुमारें ३२५ वर्षांपूर्वी स्वतंत्र राज्य होतें. यांतील लोलँडर्स (सखल प्रदेशांतील रहिवासी) लोक व इंग्रज हे एकाच वंशांतील आहेत; मात्र उत्तरेकडील हायलँडर्स (पहाडी) हे आयरिश लोक ज्या वंशांतील आहेत त्यांच्या एका शाखेंतील असून गालिक भाषा बोलतात. प्राचीन काळीं जेव्हां रोमन लोकांनीं स्कॉटलंडवर स्वार्या केल्या तेव्हां (इ. स. ७८-८२ ) तेथें केल्टिक भाषेंपैकी गालिक, ब्रिटानिक इत्यादि पोटभाषा बोलणारे लोक रहात होते. तत्पूर्वीची या देशाची निर्णायक ऐतिहासिक माहिती आढळत नाहीं. स्कॉटलंडांत कांहीं प्राचीन शिलालेख आढळतात, पण त्यांचा या माहितीच्या कामीं कांहीं उपयोग नाहीं. पिक्ट नांवाची एक जात तेव्हां होती पण ती मूळ कोणत्या वंशांची तें समजत नाहीं, तिचीहि भाषा गालकि होती. दक्षिणेकडील कांहीं भागांत ख्रिस्ती धर्माची अंधुक कल्पना पसरविण्यापेक्षां रोमन स्वार्यांचा परिणाम या देशांवर विशेष व कायमचा असा कोणताच घडला नाही. त्या लोकांनीं किल्ले, सडका वगैरे बांधल्याचा उल्लेख आढळतो. पिक्ट व स्कॉट हे प्रथमतः आयर्लंडमधून या देशांत आले. त्यांच्या नांवावरून यास स्कॉटलंड हें नांव पडलें. ते रानटी पण शूर होते. रोमन लोकांनीं मजबूत तट वगैरे बांधून त्यांनां दूर ठेविलें होतें. पण पुढें रोमन लोक ब्रिटन सोडून जातांच हे पिक्ट व स्कॉट लोक रोमनांनीं बांधलेल्या भिंती फोडून ब्रिटनच्या लोकांस उपद्रव देऊं लागले. तेव्हां ब्रिटन लोकांनी रोमनांची मदत मागितली व त्यांनीं तात्पुरतें पिक्ट, स्कॉट यांनां हांकलून दिलें; पण पुढें स. ४१० त रोमनांनीं ब्रिटनांचा कायमचा त्याग केला, तेव्हां ब्रिटन लोकांनीं अँगल्सनां (म्हणजे आजच्या इंग्रजांच्या पूर्वजांनां) मदतीस बोलाविलें. या सुमारास स्कॉटलंडांत अराजकता माजून स्कॉट, पिक्ट, अँगल वगैरे रानटी टोळ्यांनीं धुडगूस घातला. त्यांत शेवटी अँगल्सनीं केल्टांनां उत्तरेकडे म्हणजे हायलँडकडे पिटाळून दक्षिणेकडील लोलँड नांवाचा प्रदेश आपल्या ताब्यांत ठेवला. चौथ्या शतकाच्या सुमारास पिक्ट लोकांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊं लागला. कोलंबा नांवाच्या एका आयरिश पाद्य्रानें (५६५) या देशांत पाद्य्रांसाठीं एक ठाणें बांधले, तेथूनच इंग्लंडमध्यें पाद्री लोक धर्मप्रसारास जात. लोलँडमधील अँगल्स उर्फ इंग्रजांच्या व स्कॉट लोकांच्या शरीरसंबंधानें त्या भागांत इंग्रज रक्ताचें व चालीरीतीचें मिश्रण विशेष वाढलें. या मिश्र रक्ताच्या लोकांनीं पश्चिम यूरोपीय संस्कृतीचा प्रसार स्कॉटलंडांत केला. लोलँडच्या आसपास पिक्ट, स्कॉट, वेल्श या लोकांची राज्यें होतीं. यावेळीं या देशांतील ख्रिस्ती धर्म रोमन धर्तीचा होता. सन ४३१ मध्यें रोमच्या पोपनें ''श्रद्धावान स्कॉट लोकांसाठी'' पहिला बिशप नेमून पाठविला होता. त्यानंतर वर सांगितलेल्या कोलंबानें पिक्ट राजालाच ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. याच्या वेळेपासून इ. स. ७१० पर्यंत स्कॉटलंडमधील ख्रिस्ती धर्म भाषी प्रॉटेस्टंट जळणावर होता; पोपला या काळांत फारसा मान मिळत नसे. पुढें मात्र त्याची सत्ता या देशांत सुरू झाली. इंग्रज व स्कॉट यांचा झगडा चालू असतांना इंग्रज राजा एडवर्ड धी एल्डर यानें आपली बरीच सत्ता स्कॅट लोकांवर बसविली व त्याला त्या लोकांनीं आपला-नाइलाजानें-मालक म्हणून कबूल केलें. तरी पण एडवर्डचा वंश व स्कॉट यांच्यांत सतत झगडे चालूच होते व त्यांत स्कॉट लोक वारंवार डेन लोकांची कुमक घेत असत. त्यामुळें एडमंड या इंग्रज राजानें (९४०) स्कॉट राजा पहिला मालकम याला कंबर्लंड प्रांत देऊन मित्र करून घेतलें. तसाच दुसरा एक स्कॉट राजा केनेथ याला नार्दांब्रिया प्रांत मिळाला. त्यामुळें केनेथनें आपल्याला इंग्रज राजाचा मांडलिक म्हणून कबूल केलें. या प्रांतांत एडिंबरो असल्यानें तेथें स्कॉट राजांनीं आपली राजधानी केली. या वेळीं स्कॉटलंडमधील बरो (सनदी गांव) मधील घरंदाज लोक आपला स्थानिक राज्यकारभार करण्याचा हक्त मागूं लागले. या सुमारास पिक्ट व स्कॉट यांच्यांतील तंट्याचा निकाल लागून केनेथनें पिक्ट राज्याचा नाश केला. मात्र या दोन राजघराण्यांत शरीरसंबंध होऊं लागल्यानें त्यांच्यातील वैराचा जोर थोडासा कमी झाला. वेल्श लोकांनींहि या दोन जातींच्या लोकांशीं या सुमारास शरीरसंबंध करण्याचे सुरू केलें. इंग्रज लोकांची या देशांतील राजकीय स्वतंत्र सत्ता जरी पुष्कळ कमी झाली होती, तरी त्यांचा जमीनदार वर्ग शिल्लक होता; तो व त्यांच्या जमीनदार्या पुढें दोन चार शतकें या देशांत शाबूत राहिल्या. त्यांच्या जमीनी स्कॉटिश लोक कसत असत आणि याच मुद्यावर पुढें स्कॉटलंड हा देश इंग्लंडचा मांडलिक देश आहे असें इंग्लंडचें म्हणणें पडे. परंतु स्कॉटलंडचे राजे ते नाकबूल करीत व प्रसंगीविशेषीं त्यासाठीं लढायाहि करीत. मध्यस्कॉटलंडमधील इंग्रजी मिश्र रक्ताची प्रजा मात्र आपल्या या स्कॉट आणि केल्ट राजांशीं राजनिष्ठ राहिली. केनेथनंतर दुसर्या मालकमपर्यंत (१०३४) स्कॉटिश गादीवर बरेच राजे बसले. परंतु त्यांची फारशी माहिती आढळत नाहीं. या मालकमच्या वंशांत गादीबद्दलचा तंटा पुढें एक शतकापर्यंत चालला होता. मालकमचा वंश पुढें इंग्लंडवर बराच अवलंबून राहू लागला. त्याच्या म्हणण्याप्रमाणें तिसर्या मालकम राजाची बायको ही इंग्लंडच्या जुन्या राजघराण्यांतील असल्यानें, स्कॉटलंडच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक बाबतींत थोडीशी इंग्रज समाजाची छाया पडली. नॉर्मन लोकांच्या इंग्लंडवरील स्वारीचा फायदा घेऊन मालकमनें आपला राज्यविस्तार बराच केला व इंग्लंडच्या उत्तरेकडील कांहीं प्रांत जिंकले. त्यामुळें इंग्रजांच्या व त्याच्या अनेक झटापटी झाल्या. याच्या बायकोनें धर्माच्या बाबतींत कांहीं सुधारणा केल्या. परंतु त्यांमुळें ती केल्ट लोकांनां फारच अप्रिय झाली. हिचा मुलगा एडगर हा पुढें गादीवर आला (१०६९) व त्याचा वंश बराच काळ टिकला. त्यामुळें स्कॉटलंडच्या या राजवंशांत इंग्रज रक्ताची भेसळ झाली व गालिक रक्त कमी होऊं लागलें. एवढेंच नाही तर पुढील कोणत्याहि स्कॉटिश राजाला गालिक भाषाहि येईनाशी झाली. तिसरा मालकम व एडगर यांनी इंग्रज राजा विल्यम रुफस याला आपला सार्वभौम कबूल केलें होतं. एडगरची बहीण ही इंग्लंडच्या पहिल्या हेनरीला दिली होती. एडगरनंतर त्याच्या अलेक्झांडर (पहिला) नांवाच्या भावाच्या राजवटींत केल्ट लोकांशी लढाया, व स्कॉटलंडांत इंग्रज बिशपांचें आगमन वगैरे गोष्टी घडल्या. अलेक्झांडरचा भाऊ डेव्हिड यानें इंग्लंडांत विद्याभ्यास केला (११२४). त्याच्या कारकीर्दीत अँग्लोनार्मन लोकांचें व आचारविचारांचें प्रस्थ स्कॉटलंडमध्यें फार माजलें. त्यांच्या साहाय्यानें त्यानें एक जुनें मोराई नांवाचें संस्थान खालसा करून त्यांत इंग्रज, नॉमर्न व स्कॉट लोकांनां जमीनी दिल्या. याचें व इग्लंडचें स. ११३५ त वांकडें येऊन यानें इंग्लंडवर स्वारी केली आणि नॉर्दंबरलंड, कंबर्लंड वगैरे परगणे जिंकले. पण इंग्रज राजा स्टीफन यानें त्याच्याशीं न लढतां तह केला. डेव्हिडच्या मरणानंतर (११५३) स्कॉटलंडांत पुन्हां अराजकता माजली. डेव्हिड हाच स्कॉटलंडचा निर्माणकर्ता होय. धर्म, शेतकी, स्थापत्य इत्यादि गोष्टींत त्यानें पुष्कळ सुधारणा केल्या. जमीनदारांचा वर्ग त्यानें भरभराटीस आणला. यावेळीं कुळें आपला खंड धान्याच्या स्वरूपांत भरीत व मालकासाठीं लढाईंत काम करीत. त्यामुळें शेतकर्यांचें (कुळांचे) दंगे वगैरे स्कॉटलंडांत फारसे उत्पन्न होत नसत. आपल्याकडील ग्रामपंचायतीप्रमाणें तेथें लोकनियुक्त पंचायती असून त्यांच्या हातात न्याय, बाजार, कायदे करणें, म्युनिसिपालिट्या चालविणें वगैरे गोष्टी असत. एकंदरीत या पंचायती म्हणजे सांप्रतच्या पार्लमेंटाचें सूक्ष्म बीज होतें. स्कॉटलंडच्या सनदशीर चळवळीचा इतिहास इंग्लंडप्रमाणें सुसंगत उपलब्ध होत नाहीं. त्या वेळीं प्रजेवर फारसे कर नव्हते नवीन राजा आला म्हणजे एकंदर सरकारी कामाच्या पद्धतींत थोडा फरक होई. रोमन कायदा व पंचा (ज्यूरी)ची पद्धत अंमलांत होती. प्रथम भिक्षुकांचे मठ म्हणजे शिक्षणाच्या शाळा होत्या. पुढें हायस्कुलें व गाण्याच्या शाळा निघाल्या. डेव्हिडपासून अलेक्झांडर (तिसरा) पर्यंत स्कॉटलंडची उत्तरोत्तर भरभराट होत होती. डेव्हिडचा मुलगा विल्यम बी लायन (११६५-१२१४) यानें फ्रान्सची दोस्ती संपादली. त्याच्या वेळीं सरकार (राजकारण) व भिक्षुक वर्ग (धर्म) यांच्यांत तंटा माजला. तसाच सरहद्दीवरून इंग्लंडशीहि तंटा माजला. त्यांत विल्यमचा पराभव होऊन त्यानें इंग्लंडच्या राजाचें मांडलिकत्व कबूल केलें. पण पुढें धर्मयुद्धाच्या खर्चासाठी इंग्रज राजानें (रिचर्ड) आपलें सार्वभौमत्व स्कॉट राजास विकून टाकलें. विल्यमचा नातूं तिसरा अलेक्झांडर अज्ञान असतां दरबारी लोकांनीं देशांत धुमाकूळ माजविला. त्याच्या मृत्युनंतर (१२८६) स्कॉटलंडचे चांगले दिवस संपले. साधारण १०० वर्षेपर्यंत स्कॉटलंड व इंग्लंड यांचें सख्य होतें, तें आतां बिघडलें. अलेक्झांडरला मुलगा नसल्यानें गादीच्या वारसाबद्दल तंटेबखेडे सुरू झाले. त्याचा निकाल इंग्रज राजा एडवर्ड यानें (आपण स्कॉटलंडचे सार्वभौम आहों या नात्यानें) करून जॉन बेलियल याला गादीवर बसविलें (१२९२). जॉननें लोकांच्या कांहीं हक्कांत हात घालून त्यांनां चिडविलें, त्यामुळें तो फ्रान्सशीं लढण्यास जात असता, लोकांनीं (इंग्लंडचें अधिराज्य उधळून देण्याच्या इच्छेनें) जॉनचें मित्र जें इंग्लंड त्यावर स्वारी केली. पुढें तीत जॉननेंहि भाग घेतला. त्यावेळीं एडवर्डनें जॉनचा पराभव करून स्कॉटलंडांतील एडिंबरो, पर्थ वगैरे शहरें काबीज केलीं व लूट करून लोकांची भयंकर कत्तल केली (१२९६); आणि स्कॉटलंडचा कारभार एका इंग्लिश कौन्सिलाच्या ताब्यांत दिला. पण त्यामुळें मानी स्कॉट लोक चिडले व त्यांनीं पुष्कळ वर्षेपर्यंत इंग्लंडशीं स्वातंत्र्यार्थ झगडा चालू ठेवला. त्यांत प्रथम विल्यम वालेस या शूर पुरुषानें भाग घेऊन इंग्लंडांत दंगल माजविली, पण शेवटीं त्याचा पराभव होऊन त्याला सात वर्षे अज्ञातवास पत्करावा लागला. त्यानंतर विश्वासघातानें तो पकडला जाऊन इंग्रजांनीं त्याला फांशीं दिलें (१३०५). तरीहि स्कॉट लोक एडवर्डला शरण जाईनात. त्यांनीं बंडखोरी चालविली होतीच. त्यांत रॉबर्ट ब्रूस हा मुख्य होता. त्यानें तर स. १३०६ त स्वतःस स्कॉटलंडच्या गादीवर राज्याभिषेकहि करून घेतला. तेव्हां एडवर्डनें त्याच्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला व स्कॉटलंडांत भयंकर जाळपोळ व लुटालूट केली; परंतु इतक्यांत एडवर्ड (पहिला) मेला. त्यामुळें ब्रुसनें पुन्हां इंग्लंडला त्रास देण्यास सुरूवात केली आणि तीन वर्षांत त्यानें सर्व स्कॉटलंड परत मिळविलें.

अशा रीतीनें जरी स्कॉटलंडन आपलें स्वातंत्र्य मिळविलें तथापि त्यासाठीं त्याला फारच नुकसान सोसावें लागलें. इंग्रज लोकांनीं स्कॉटलंडच्या सरहद्दीवर धुमाकूळ घातला. स्कॉटलंडच्या मध्यभागांत सरदारांमध्यें भयंकर कलह माजले. रॉबर्ट ब्रूस जर बरींच वर्षे वाचला असतां तर त्यानें ही बंडाळी मोडून शांतता प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असता. पण सन १३२९ मध्यें तो वारला व त्याच्या मागून त्याचा अल्पवयी मुलगा दुसरा डेव्हिड हा गादीवर बसला. हें पहातांच पुन्हां बेलियलप्रभृति सरदारांनीं बंडाळी आरंभली. डेव्हिड वयांत येतांच त्यानें आपल्या हातांत राज्यसूत्रें घेतलीं पण तो अगदींच नालायक ठरला. सन १३४६ त डेव्हिडनें इंग्लंडवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांत त्याला हार खावी लागली व तो बंदीवान झाला. त्याच्या गैरहजेरींत, स्टुअर्ट हा रीजंट म्हणून राज्यकारभार पहात असे. १३५० त डेव्हिडची सुटका झाली. नंतर त्यानें आपल्या मागें इंग्लंड व स्कॉटलंडचीं राज्यें एक व्हावीं अशा प्रकारची खटपट केली. पण स्कॉट लोकांनीं तिला तीव्र विरोध केला. १३७१ साली डेव्हिड मरण पावला. त्याच्यानंतर दुसरा रॉबर्ट स्टुअर्ड हा गादीवर बसला. त्यानें इंग्लंडशीं सामाचें धोरण १३८२ पर्यंत ठेवलें. पण पुढें फ्रेंचांच्या धाकदपटशाहीनें त्याला इंग्लंडशीं युद्धाकरतां सैन्य पाठवावें लागलें पण फ्रेंच व स्कॉट यांचा पराभव झाला. रॉबर्ट १३९० सालीं वारला, व त्याचा मुलगा तिसरा रॉबर्ट गादीवर आला. पण याच्या दुर्बल कारकीर्दीत बंडाळीशिवाय दुसरें कांहीं घडलें नाहीं. त्यानंतर १४११ सालीं मॅक्डोनल्ड सरदारांनीं इंग्लंडशीं संगनमत करून स्कॉटलंडवर स्वारी करण्याचा घाट घातला पण अर्ल ऑफ मारनें त्यांचा पराभव केल्यामुळें स्कॉटलंडवर आलेलें संकट टळलें.

पहिला जेम्स स्कॉटलंडच्या गादीवर बसल्यापासून स्कॉटलंडला बरे दिवस लाभण्यास सुरुवात झाली. जेम्सनें आपल्या धडाडीच्या धोरणानें स्कॉटलंडमध्यें कांहीं काळ शांततो प्रस्थापित केली. पण त्याचा खून होतांच पुन्हां देशांत बंडाळी सुरू झाली. पहिल्या जेम्सनंतर जे पांच सहा राजे स्कॉटलंडच्या गादीवर बसले त्या सर्वांनां कांहीं काळ तरी सज्ञान होईपावेतों-रीजंटच्या देखरेखीखाली काढावा लागला. स्वतः पहिल्या जेम्सलाहि बरींच वर्षे अज्ञानावस्थेंत व नजरकैदेंत काढावीं लागली. अशी स्थिति असल्यानें रीजंटांच्या हातून जो राज्याचा गैरवाजवी कारभार करण्यांत येई त्याचे परिणाम निस्तरण्यांतच स्टुअर्ट राजांचा काळ जात असे. तशांतच सरदार वर्गाची अधिकारलालसा व परस्परांतील कलह यांमुळें या राजांनां कांही करतां येत नसे. नाही म्हणावयाला तिसर्या जेम्सच्या कारकीर्दीत काय ती, स्कॉटलंडच्या राज्यांत, जेम्सला हुंड्यादाखल मिळालेल्या, आर्कनी व शेटलंड या देशांची भर पडली. स्टुअर्ट राजाच्या कारकीर्दीत बरेच चांगले कायदे करण्यांत आले पण ते कायदे अंमलांत आणण्यास लागणारी सत्ता मात्र त्यांच्यापाशीं नसल्यामुळें, चांगल्या कायद्यांचें इष्ट परिणाम घडून आले नाहींत. अशा उत्कृष्ट कायद्यांमध्यें युनिव्हर्सिट्यांच्या स्थापनेचा कायदा महत्त्वाचा होय. या कायद्यानें पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत, सेंट अँड्र्यूज युनिव्हर्सिटी स्थापन करण्यांत आली व पांचव्या जेम्सच्या कारकीर्दीत कॉलेज ऑफ जस्टिस उघढण्यांत आलें. पांचव्या जेम्सच्या कारकीर्दीत, अगोदरच बेदिल झालेल्या स्कॉटलंडच्या लोकांमध्यें आणखी एक दुहीचें कारण उत्पन्न झालें. तें म्हणजे, एपिस्कोपसी व प्रेसविटर धर्मपंथ यांच्यामधील झगडा हें होय. राजे लोकांचा कल एपीस्कोपसीकडे तर जनतेचा कल प्रेसबिटेरियन धर्माकडे व सरदार मात्र वेळ पडेल तसे-या नाहीं त्या पक्षाशीं संगनमत करीत. सहाव्या जेम्सनें चर्च व ऐहिक सत्ता, दोन्ही आपल्या ताब्यांत आणण्याचा प्रयत्न केला. विशेषतः तो ज्यावेळीं इंग्लंडचाहि राजा झाला त्यावेळीं निदान तात्पुरता तरी विजय त्यानें संपादन केला. पण त्याचा मुलगा पहिला चार्लस हा ज्यावेळीं गादीवर बसला त्यावेळीं पुन्हां या प्रश्नानें उचल खाल्ली, व राजसत्ता व जनता यांच्यामधील धर्मविषयक भांडणाला तीव्र स्वरूप प्राप्त झालें. त्यांतच सरदारवर्गानें जनतेला सहानुभूति दाखविली. स्कॉटलंडमधील जनतेनें राजाला विरोध करण्यासाठीं करारानें बांधून घेतलें व त्यामुळें त्यांना 'कॉव्हेनंटर्स उर्फ करार कराणारे लोक असें नांव पडलें. या काव्हेनंटर लोकांनीं इंग्लंडमधील प्युरिटन पक्षाशीं सहकार्य करून, राजसत्तेला चांगलाच हात दाखविला. त्याचा परिणाम असा झाला कीं, क्रामवेलनें तात्पुरता कां होईना अनियंत्रित राजशाहीला आळा घातला.

पुढें दुसरा चार्लस राजा गादीवर बसला. स्कॉटलंड व इंग्लंड, युद्धांमुळें व धर्मकलहामुळें बेजार झालें होतें, त्यामुळें चार्लस राजाच्या राज्यरोहणाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला. पण दुर्दैवानें चार्लस व सातवा जेम्स यांच्या हातून राज्यकारभार सुरळीत चालू शकला नाहीं. त्यांच्या कारकीर्दीत लांचलुचपतीच्या प्रकाराला ऊत आला, जुलुमाची परमावधी झाली. त्यामुळें १६८८ सालीं बंड  होऊन तिसरा विल्यम व मेरी इंग्लंडच्या राज्यपदावर आरूढ झालीं. सन १७०६ मध्यें स्कॉटलंडचें स्वतंत्र असें पार्लमेंट शेवटचें भरलें. त्यावेळीं धर्मगुरु, सरदार, मध्यमवर्ग या सर्वांचें प्रतिनिधी या पार्लमेंटमध्यें हजर होते. या पार्लमेंटमध्यें बर्याच वादविवादानंतर इंग्लंड व स्कॉटलंड यांच्या एकीकरणाचा ठराव झाला व अॅननें त्याला आपली संमति दिली. १७०७ सालीं हे ऐक्य घडून आलें. या ऐक्यघटनेनें स्कॉटलंडला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ४५ सभासद व १६ लोकनियुक्त पीयर घ्यावयाचें ठरविण्यांत आलें. स्कॉटलंडचें चर्च व कोर्ट यांचें हितसंबंध राखण्यांत आले. व्यापाराच्या बाबतींत इंग्लंडला असलेल्या सर्व सवलती देण्यांत आल्या. तथापि हा कायदा झाला तरी स्कॉटलंडमधील जनता या ऐक्याला विरुद्धच होती. फ्रान्स जाकोबाईट लोकांनां फूस देऊन या ऐक्याला अडथळे आणूं पहात होतें. तथापि त्यावेळची परिस्थितीच अशी होती कीं, स्कॉटलंडला इंग्लंडशीं ऐक्य करण्यावांचून गत्यंतरच नव्हतें. कारण, कांहीं झालें तरी स्कॉटलंडचे लोक कॅथोलिक धर्माचा राजा गादीवर बसण्याविरुद्ध होते. फ्रान्सशीं सख्य करून इंग्लंडचें वैर संपादन करणें स्कॉटलंडला अशक्य होतें. व्यापाराच्या दृष्टीनेंहि हेंच करणें इष्ट होतें. त्यामुळें जरी इंग्लंडविषयीं स्कॉटलंडच्या मनांत आदरभाव नव्हता तरी परिस्थितीच्या प्रभावानें स्कॉटलंडला इंग्लंडशीं ऐक्य करणें भागच पडलें.

अशी स्थिति होती तरी ऐक्य घडून आल्यावर कांही दिवस लोटले नाहींत तोंच, व्यापाराच्या बाबतींत इंग्लंड व स्कॉटलंडमध्यें भांडण उपस्थित झालें. जाकोबाईट लाकोंनी दोनतीनदां बंडें केलीं पण शेवटी त्यांचा पराजय होऊन त्यांनां हार खावी लागली. ऐक्य करण्याचा प्रयत्न १७४५ सालीं शेवटचा झाला. पण इंग्लिश सैन्यानें कुल्लोडन येथें जाकोबाईट लोकांचा पराभव केल्यामुळें तो फसला. त्यानंतरचा स्कॉटलंडचा इतिहास इंग्लंडच्या इतिहासांत लुप्त झाला आहे.

स्कॉटिश वाङ्मय.— स्कॉटिश वाङ्मयाचें स्थूलमानानें अवलोकन केल्यास असें आढळून येतें की, स्कॉटिश वाङ्मयाची वाढ दोन दिशांनी झालेली आहे : एक दिशा म्हणजे ज्यांतील वाङ्मय शालेय पद्धतीनें झालें आहे ती व दुसरी म्हणजे ज्यांतील वाङ्मय बोली भाषेत आहे ती होय.

पंधराव्या शतकापर्यंतचें वाङ्मय:— या काळांतील वाङ्मयांत मुख्यतः अद्भुत काव्यें व इतिहास यांचा भरणा आहे. अद्भुत काव्यें लिहिणार्यांमध्यें थॉमस, हचोन, यांचीं काव्यें प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक काव्यें लिहिणार्यांमध्यें जॉन बारबोर, अँड्र्यू विटोन व हॅरी यांचीं नांवें प्रसिद्ध आहेत. जुन्या स्कॉटिश काव्याचा जनक या नात्यानें बारबोरचें नांव महशूर आहे.

मध्ययुगीन वाङ्मय:— मध्ययुगीन वाङ्मयावर इंग्लंडचा तत्कालीन प्रसिद्ध कवि चॉसर याची छाप पडलेली आढळते. या काळचें वाङ्मय 'मिडलस्कॉट' म्हणून प्रसिद्ध असणार्या भाषेंत असलेलें आढळतें. या काळांत चांगल्या प्रकारची कविता पुष्कळच निर्माण झाली व त्यामुळें या काळाला 'स्कॉटिश कवितांचा सुवर्णकाल' असेंहि संबोधण्यांत येतें. या काळांतील प्रसिद्ध राजकवि पहिला जेम्स राजा होय. त्याचें 'किंगिस क्वेयर' हें काव्य चॉसरच्या 'ट्रॉयलस' काव्याच्या छंदांत असून या काव्यावर चॉसरची छाप दिसून येते. डनवार, डग्लस, व डेव्हिड लिंडसे यांचीहि कविता स्वतंत्र असली तरी ती प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीनें चॉसरी वळणावर गेलेली आहे यांत शंका नाहीं. या काळांतील काव्याचें व वाङ्मयाचें दुसरें लक्षण म्हणजे तें राजदरबारांतील कवींचें असून राजदरबारच्या लोकांच्या चालीरीतीसंबंधी आहे. या काळांतला प्रख्यात कवि हेनरी-सन याचें 'फेबल्स', 'रेस्टामेंट ऑफ क्रेसीड', 'रोबेन अँड मेकीन' हे ग्रंथ नांवाजलेले आहेत. ज्यांच्या काव्यावर चॉसरची छाप पडली नाहीं अशांमध्यें हॉलंड कवीची गणना होते; बिन चॉसरी वळणाच्या कवितेचे 'अदभुत' व 'ग्रामिक' असे भाग पडतात. या कवितांतील विषय, सर्वसामान्य लोकांसंबंधींची कथानकें असून त्यांमध्यें कौटुंबिक जीवितक्रम, निसर्ग, श्री, इत्यादिकांचें वर्णन असतें. रुक्ष विनोदहि यांच्या काव्यांत आढळून येतो. अशा प्रकारच्या कवितांत पांचव्या जेम्सच्या 'पोलिस टु दि प्ले', 'ख्रिस्तिस कर्क ऑन दि ग्रीन' तसेंच 'सिम अँड हिज ब्रदर', 'दि वुइंग ऑफ जॅक अँड जिनी', बॅलड ऑफ काइंड किब्तृक, 'गायर कार्लिंग', 'किंग बॅर्डाक' इत्यादि कवितांचा समावेश होतो.

गद्य वाङ्मय:- स्कॉटिश भाषेंत गद्य ग्रंथ लिहिण्याला फार उशीरा सुरवात झाली. १५ व्या शतकापर्यंत जे थोडेंफार गद्य निर्माण झालें तें लॅटिनमधील भाषांतरें, कायदे अगदी कांहीं पत्रें एवढेंच होय. १६व्या शतकांत ऐतिहासिक व चर्चात्मक विषय गद्यभाषेंत लिहिण्यास सुरुवात झाली. १६ व्या शतकाच्या अखेरीस बायबलचें स्कॉटिश भाषेंत भाषांतर झालें.

अर्वाचीन काळ:— अर्वाचीन काळास १७ व्या शतकापासून सुरवात होते. या शतकांतील प्रसिद्ध ग्रंथकार, रॉबर्ट केर (सॉनेट इन प्रेज ऑफ सॉलिटरी लाईफ' चा कर्ता) डेव्हिड मरे (दि ट्रजिकल डेथ ऑफ सोफोनिस्बाचा कर्ता), सर विल्यम अलेक्झांडर, विल्यम ड्रमंड, सर रॉबर्ट ऐतून, जेम्स ग्रहाम, पॉट्रिकहने, थॉमस उर्कुहर्ट, स्पॉट्सवुड, केल्डरवुड इत्यादि मुख्य कवी, गद्यग्रंथ लेखक व इतिहासकार झाले. १८ व्या शतकांत उत्तर स्कॉटलंहची व दक्षिण स्कॉटलंडची वाङ्मयदृष्ट्या एकी झाली व त्यानंतरचे सर्व ग्रंथकार इंग्लिश भाषेंत आपलें ग्रंथ प्रसिद्ध करूं लागले. त्यामुळे, जेम्स थॉमसन, अॅडॅम स्मिथ, ह्यूम, वॉसवेल, वॉल्टर स्कॉट, रॅम्से, फर्ग्युसन, बर्न्स इत्यादि स्कॉटिश ग्रंथकारांची इंग्लंडच्या वाङ्मयेतिहासांतच गणना होऊं लागली आहे, व त्यांच्या ग्रंथांचा विचार इंग्लिश वाङ्मय या सदराखालीं करण्यांत आला आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .