विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सेंद्रक— या घरण्याविषयीं पुढील माहिती उपलब्ध आहे; पश्चिमेकडील चालुक्य घराण्यांतील दुसर्या पुलिकेशीचा (इसवी सन ६०९-६४२) मामा श्रीवल्लभसेनानंदराव हा सेंद्रक घराण्यांतील होता. नवसरी जिल्ह्यांत बगुम्रा येथील दानपत्रांत सेंद्रक राजांची लहानशी वंशावळ आहे; तींत भानुशक्ति, त्याचा मुलगा आदित्यशक्ति, व त्याचा मुलगा पृथ्वीवल्लभनिकुंभल्लशक्ति यांचीं नांवें आहेत; व कल्चुरी किंवा चेदिशकाचें ४०६ वें वर्ष (म्हणजे इ. स. ६५५) त्यावर दिलें आहे. सेंद्रक महाराज पोगिल्ली हा पश्चिम चालुक्य घराण्यांतील विजयादित्याचा (इ. स. ६८०-६९७) मांडलिक होता, व त्याच्या राज्यांत वनवासी प्रांतांतील नागरखंड जिल्हा व जेदुगुर नांवाचें खेडें (हें म्हैसूरमधील शिमोगा जिल्ह्यांतील अर्वाचीन जेड्ड असावें) होतें असा म्हैसूरमधील वळगांबे येथील एका शिलालेखांत उल्लेख आहे. या राजांनां भुजगेंद्र अथवा नागवंशाचे राजे असें एका शिलालेखांत म्हटलें आहे. [फ्लीट; मुं. गॅ. पु. १ भा.२.].