विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद     
   
सूर घराणें (१५४०-१५५५).— दिल्लीच्या तख्तावरील एक राजघराणें. सूर म्हणून घोर प्रांतांतील लोकांची एक जात आहे. या जातींत सूर घराण्याचा संस्थापक शेरखान याचा जन्म झाला. त्याचा आजा इब्राहीमखान सूर दिल्लीस बहलोल लोदीच्या कारकीर्दीत नोकरीसाठीं आला; परंतु तेथें त्याला नोकरी न मिळाल्यामुळे, जोनपूरच्या जमालखान नामक सरदाराच्या पदरीं त्यानें नोकरी धरिली. इब्राहीमचा पुत्र हसनखान हा जोनपूरच्या राज्यांत पांचशें स्वारांचा असामदार होता. हसनखानाचा वडील पुत्र फरीदखान याजकडे बापाचा सर्व कारभार आला. एके प्रसंगी शिकारीत फरीदखानानें तरवारीनें वाघ मारिला; यावरून त्याचें शेरखान असें नांव पडलें. त्याच्या भावांत तंटे लागल्यामुळें, त्यानें जोनपूरचें राज्य सोडून आग्र्यास दौलतखान लोदीच्या पदरीं नोकरी धरिली. पुढें महंमदशहा लोहानी नांवाच्या सरदारानें त्यास बहार प्रांतांत नोकरी दिली. परंतु मोंगलांनीं बादशाही पद बळकाविलेलें त्यास आवडलें नाहीं; मोंगलांस घालवून देऊन अफगाण वंशाकडें बादशाही चालू करावी अशी त्याची फार इच्छा होती. पुढें बहार प्रांत त्याच्या ताब्यांत आला. त्यानें चुनारगड आपल्याकडे घेऊन त्याचा उत्तम बंदोबस्त ठेविला; पुढें हुमायूननें त्यावर स्वारी केल्यामुळें तो त्यास शरण गेला; परंतु लवकरच तो किल्ला पुनः मिळवून बंगाल व बहार हे प्रांतहि जिंकिले. व अखेरीस हुमायूनचा पराभव करून बादशाही पद मिळविलें (१५४०). पुढें बंगालची नीट व्यवस्था करून मध्यहिंदुस्थानांतील ग्वाल्हेर, रतनभोर वगैरे किल्ले घेतले. रायसीनच्या किल्ल्यास त्यानें १५४३ त वेढा दिला; व तेथील लोकांची कत्तल केली (रायसीनचा किल्ला भोपाळजवळ आहे) पुढे चितोडगडावर स्वारी करून शेरशहा रतनभोरास गेला. नंतर त्यानें कालिंजरच्या किल्ल्यास वेढा दिला; किल्ला घेण्यासाठीं झटत असतां, तोफेचा गोळा लागून तो मरण पावला (१५४५). त्यानें ५ वर्षे राज्य केलें; त्याचा सर्व वेळ लढण्यांत गेला; तथापि प्रजाहिताच्या कामीं त्यानें दुर्लक्ष केलें नाहीं. त्यानें अनेक विहिरी, धर्मशाळा, मशिदी वगैरे बांधिल्या; लोकोपयोगासाठीं घोड्याचें टपाल ठेवून प्रवासी लोकांसाठीं अन्नछत्रें घातलीं. सर्व राज्यांत सारखीं वजनें व मापें सुरू केलीं. रुपया हें नाणें त्यानेंच चालू केलें. शेरशहानें बहुतेक हिंदुस्थान आपल्या ताब्यांत आणिलें होतें. तो उत्तम योद्ध व मुत्सद्दी होता.

शेरशहास आदिलखान व जलालखान असे दोन पुत्र होते. आदिलखान हा वडील असल्यामुळें ह्याचा तख्तावर हक्क होता, परंतु जलालखान लोकप्रिय असल्यामुळें त्यासच राज्य मिळालें. त्यानें टपालघरें बांधून रस्त्यांवरून पोलिसचा बंदोबस्त नीट ठेविला. तो मेहनती व निश्चयी होता. तो १५५३ त मरण पावला.

नंतर सलीमशहाचा पुतण्या मुबारिझखान यानें सलीमशहाच्या फिरोझ नामक मुलास ठार मारून महंमदशहा सूर आदिली या नांवानें तो राज्य करूं लागला. तो अत्यंत दुर्व्यसनी असल्यामुळें राज्य करण्यास अगदीं नालायक होता. हिमू नांवाच्या एका हिंदूस त्यानें आपला मुख्य प्रधान नेमिलें. त्यामुळें अफगाण लोकांस आपला अपमान झाला असें वाटून ते आपल्या धन्यावर उठले. हिंमूनें आपल्या धन्याची नोकरी नीट बजाविली. महंमदशहा सूरनें आपली सर्व संपत्ति हलकट व्यसनांत उधळून टाकिली. राज्यांत जिकडे तिकडे दगें सुरू झाले. इब्राहीमखान सूर या नांवाच्या महंमदशहाच्या मेहुण्यानें दिल्लीचें तख्त बळकाविलें; परंतु पुढें अहंमदखान नामक दुसर्या एका त्याच्या मेहुण्यानें इब्राहीमचा पराभव करून सिकंदरशहा हें नांव धारण करून दिल्लीचें राज्य मिळविलें. इकडे हिमूनें आपल्या धन्यासाठीं खटपट चालविलीच होती. हुमायूननें हिंदुस्थानांत येऊन सिकंदरशहा सूर याजपासून दिल्लीचें तख्त परत मिळविलें. त्याचा पाडाव करण्यासाठीं हिमू मोठी फौज घेऊन दिल्लीवर आला; पुढें हिमूचा पराभव होऊन बहरामनें त्यास देहान्त शिक्षा दिली.

सिकंदरशहा सूर (१५५४-१५५५) स्वतः शूर होता; पण राज्य करण्याचें चातुर्य त्याच्या अंगी नव्हतें. हुमायुनास अडविण्यासाठीं त्यानें फौज पाठविली; परंतु बहराम व अकबर यांनीं त्याचा पूर्ण पराभव केल्यामुळें तो डोंगराळ प्रदेशांत पळून गेला. तो अज्ञातवासांतच मरण पावला. अशा प्रकारें शूर घराण्याचा शेवट झाला. एकंदरीत अफगाणांचें वर्तन क्रूर असल्यामुळें लोकांस त्यांचा फारच कंटाळा आला होता. [एलियट; मु. रियासत].