विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सिंहगड— हा किल्ला पुण्याच्या नैॠत्येस १५ मैलांवर सह्याद्रि पर्वताच्या पूर्व बाजूला जेथून पुरंदरच्या डोंगरांच्या रांगेस आरंभ होऊन ती दक्षिणेंत आली आहे, त्या ठिकाणाजवळ बांधलेला आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून ४३२२ फूट आहे. या किल्ल्याचा खडक पूर्व व पश्चिम बाजूंनीं अतिशय उंच व अरुंद कड्यांनीं पुरंदरच्या डोंगराशीं जोडलेला आहे; परंतु उत्तरेकडून खालून किल्ल्याकडे पाहिलें असतां दीड मैलाची-कित्येक ठिकाणीं तर अगदीं सरळ-चढण असलेला एक महान् डोंगर आपल्या समोर दृष्टीस पडतो. दीड मैलाच्या उंचीवर चाळिसांहूनहि अधिक फूट उंचीचा एक काळाकभिन्न अक्राळविक्राळ खडक असून त्यावर बुरुज असलेला मजबूत दगडी कोट आहे; व त्यामुळें किल्ल्याच्या दरवाजांशिवाय इतर मार्गांनीं आंत प्रवेश करणें अगदीं अशक्य वाटतें. हा किल्ला त्रिकोणाकृति असून त्याचें क्षेत्रफळ सुमारें दोन चौरस मैल आहे. आकाश निरभ्र असलें म्हणजे या डोंगराच्या शिखरावरून पूर्वेकडे नीरा नदीची मनोहर अरुंद दरी दृष्टीस पडते. व उत्तरेच्या बाजूला अग्रभागीं पुणें असलेलें विस्तीर्ण मैदान दूरवर पसरलेलें दिसतें. परंतु पश्चिम व दक्षिण दिशांकडे नजर फेंकली असतां मात्र अवाढव्य व गगनचुंबित पर्वतांच्या समूहाशिवाय दुसरें कांहींच नयनगोचर होत नाहीं.
मुसुलमानांच्या अमदानींत या किल्ल्याचें नांव कोंडाणें असें होतें. चवदाव्या शतकाच्या पूर्वार्धांत हा किल्ला व त्याच्या आसमंतांतील प्रदेश कृष्णेच्या उगमाजवळील मुलखावर त्यावेळी राज्य करीत असलेल्या शिर्क्यांच्या कोणातरी नातेवाईकांकडे होता असें दिसतें. इ. स. १४६९ च्या सुमारास हा किल्ला ब्राह्मणी राज्याच्या सुलतानाकडे आला असावा. इ. स. १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक जो मलिक अहमद त्यानें हा किल्ला तेथील बंडखोर किल्लेदारापासून आपल्या ताब्यांत घेतला. मुसुलमानी अमलाखालीं हा किल्ला एखाद्या जहागिरदाराच्या ताब्यांत न देतां खास बादशहा तो आपल्याकडेच ठेवून घेत असे. हा अहमदनगरच्या सुलतानानें विजापूरकरांच्या स्वाधीन केला. इ. स. १६४७ त शिवाजीनें कोंडाण्याच्या मुसुलमान किल्लेदारास बरीच मोठी लांच देऊन तो किल्ला आपल्या ताब्यांत घेतला व त्याचें सिंहगड असें नांव ठेविलें. इ. स. १६६५ त शिवाजी व मोंगल यांत पुरंदर येथें जो तह झाला त्या तहान्वयें हा किल्ला मोंगलास देण्यांत आला. पण इ. स. १६७० च्या फेब्रुवारी महिन्यांत तानाजी मालुसर्यानें आपला प्राण खर्ची घालून हा किल्ला शिवाजीस घेऊन दिला ('तानाजी' पहा). राजाराम छत्रपति इ. स. १७०० त याच गडावर मृत्यू पावला.
अवरंगझेबाच्या दक्षिण हिंदुस्थानांतील स्वारींत इ. स. १७०१ व १७०६ यांच्या दरम्यान हा किल्ला दोन वेळां मोंगलांच्या हातीं पडून मराठ्यांनीं तो पुन्हां काबीज करून घेतला होता. १८१८ त पेशवाईबरोबरच हा किल्ला इंग्रजांकडे आला. गडावर सध्यां तानाजीची पुण्यतिथि साजरी करण्यांत येते. पुण्यापासून हा जवळ असल्यानें व पायथ्यापर्यंत मोटारी जाण्याची सोय असल्यानें उन्हाळ्यांत बरेच लोक या ठिकाणीं येतात.