विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   

सिसवी— छोटानागपूर, अयोध्या, मध्यप्रदेश, मध्य, पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थान या भागांतून हीं झाडें होतात. सिसवीच्या कांहीं जाती आहेत. सामान्यतः या झाडांची उंची सरासरी ८० फूट असून त्याच्या बुंध्याचा परीघ १२ फुटांपासून १५ फुटांपर्यंत असतो. याचें बीं पडून तें आपोआप रुजतें आणि त्याचा वृक्ष होतो. या झाडाच्या लांकडाच्या एक घनफुटाचें वजन ५० पासून ६० पौंडांपर्यंत असतें. हें लाकूड कमाविलें जातें. कमाविण्याच्या अगोदर हें जर पाण्यांत घातलें तर बुडतें. हें लांकूड कर्नाटक, मलबार, व त्रावणकोर येथील अरण्यांतून मुंबई, काठेवाड, कच्छ, कराची, लंडन, हार्वे, हॅम्बर्ग व चिनी बंदरांतहि नेण्यांत येतें.

हिंदुस्थानांत या लांकडाचें फळ्या, तजबिरीच्या चौकटी, पेट्या, खोदीव खुर्च्या, टेबलें वगैरे समान करतात. मद्रास इलाखा व म्हैसूर येथील द्रविडी अथवा चालुक्य खोदीव कामें याच लांकडावर केलेलीं आहेत. हें लांकूड जात्या काळ्या रंगाचें असतें आणि तें विशेष काळें करावयाचें असल्यास त्याला तेल लावून घासावें लागतें.