विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सिद्धपूर— बडोदें संस्थान. सिद्धपूर पोटविभागांतील राजपुताना-माळवा रेल्वेवरचें एक स्टेशन. हें ठिकाण मातृगया म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून सरस्वती नदी पूर्वाभिमुखी वहाते. येथील तिमजली रुद्रमाळा नांवाच्या भव्य व सुंदर देवस्थानाचें धरणीकंपानें बरेंच नुकसान झालें आहे. शिल्पशास्त्रदृष्ट्या या स्थानाचें बरेंच महत्त्व आहे. नदीपलीकडे इंदूरच्या अहल्याबाईनें बांधलेली एक धर्मशाळा आहे. येथील देवळांत महादेव सिद्धेश्वर, महादेव गोविंद, रणछोडजी, सहस्त्रकालमाता, गोवर्धन नाथजी वगैरे देवळें मुख्य असून बिंदुसरोवर, अल्पासरोवर व ज्ञानवापी ही कुंडें पवित्र तीर्थें मानिलीं जातात. हिंदुस्थानांतील एकंदर चार पवित्र सरोवरांपैकी बिंदुसरोवर येथें असल्यामुळें गुजराथच्या पवित्र स्थळांत हें दुसर्या नंबरचें ठरतें.
अफूच्या व्यापाराचें हें केंद्र आहे. येथें अफूच्या वखारी आहेत, व त्यांत सुमारें २० लाखांवर रुपये किंमतीची अफू असते. कापड रंगविणें, चिटें तयार करणें व साबण तयार करणें हें येथील लोकांचे मुख्य धंदे आहेत. सिद्धपूर हें तालुक्याचें मुख्य ठिकाण असल्यानें येथें वहिवाटदाराची कचेरी, प्रवाशांकरितां बंगला, धर्मशाळा, इस्पितळ, पोष्ट व शाळा वगैरे सरकारी इमारती आहेत.