विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सिक्कीम— पूवर्हिमालयांतील एक संस्थान. दक्षिणेस तिस्ता नदी, व पश्चिमेस आणि उत्तरेस हिमालयाच्या रांगा आहेत व त्यापलीकडे नेपाळ व भूतान आहे. संस्थानचा भूप्रदेशविस्तार जरी लहान असला तथापि या संस्थानांतील ठिकठिकाणच्या हवामानामध्यें बराच फरक आढळून येतो व बहुतेक सर्व प्रकारच्या हवेचे नमुने येथें पहावयास मिळतात. त्याचप्रमाणें सृष्टीतील सर्व प्रकारचे नैसर्गिक चमत्कार येथें पहावयास मिळतात. संस्थानचें क्षेत्रफळ २८१८ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) ८१,७२२ आहे. यांत नेपाळी लोकांचा विशेष भरणा आहे. बहुतेक लोक शेतकरी आहेत. बौद्धधर्म प्रचारांत आहे. संस्थानचें सरासरी उत्पन्न चार लाख रुपये आहे. संस्थानच्या राजाच्या ताब्यांतच सर्व व्यवस्था असते. सध्याचा राजा हिज हायनेस, महाराजा सर तशी नमग्यल, के. सी. आय. ई. हा १९१४ सालीं गादीवर बसला. १९१८ सालीं याच्या हातांत सर्व अधिकार देण्यांत आले. दळणवळणाचे मार्ग करणें हीच काय ती संस्थानांत मुख्य खर्चाची बाब होय. तिबेटला जाणारा रस्ता संस्थानच्या हद्दीतूनच गेला आहे. वहातूक जनावरांच्या पाठीवरूनच होते. संस्थानांतून इमारती लांकूड, कातडीं, फळें, या जिनसा हिंदुस्थानांत येतात.
इतिहास— प्राचीन काळीं येथें रानटी लोक रहात असत व त्यांस लेपचा असें संबोधीत असत. हे लोक इंडोचिनी मानववंशाचे असावेत. सध्याचें राजघराणें तिबेटी आहे. १६४१ सालीं पेनची नामिजी नांवाच्या इसमानें लेपच्यांच्या मुख्यास जिंकून आपण संस्थानचा ताबा मिळविला व बौद्धधर्माचा प्रचार केला. त्याच्या मुलानें आणखी राज्यविस्तार केला. स. १८३९ त ब्रिटिश लोकांनीं सिक्कीम संस्थानला आपलें मांडलिक बनविलें. स. १८४९ त कांहीं अपराधावरून सिक्कीम संस्थानचे सर्व हक्क काढून घेण्यांत आले होते. स. १८६१ त लष्कराच्या मदतीनें कांही अटी व तह संस्थानवर लादण्यांत आले परंतु तेथील राजानें त्या अटी व तह मान्य करण्याचें नाकारलें व तिबेटांत राहण्याचें ठरविलें. ब्रिटिशांनीं धाकधपटशा दाखवून पाहिलें पण कोणत्याहि प्रयत्नास यश येईना. तेव्हां स. १८९० मध्यें कांहीं तडजोड होऊन ब्रिटिश सरकारनें संस्थानची हद्द ठरवून दिली. राजानें सात प्रमुख प्रजाप्रतिनिधि-कौन्सिलच्या साहाय्यानें राज्यकारभार हांकावा असें ठरवून दिलें. राजधानींत ब्रिटिश सरकारचा रेसिडेंट असतो. १९०६ सालीं हें संस्थान प्रत्यक्ष हिंदुस्थानसरकारच्या देखरेखीखालीं ठेवण्यांत आलें. त्यापूर्वी बंगालसरकारची त्यावर देखरेख असे.