विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
साष्टी— मुंबई, ठाणें जिल्हा. साष्टी नांवाचें इतिहासप्रसिद्ध बेट याच तालुक्यांत आहे. क्षेत्रफळ २४६ चौ. मैल. लोकसख्या (१९२१) दीड लक्ष. यांत १४० गांवें आहेत. ठाणें हें तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. ठाणें, वांद्रें, कुर्ले ही गावें असून त्या ठिकाणीं म्यु. कमिट्या आहेत. कान्हेरी लेणीं याच तालुक्यांत आहेत. येथें मिठागरें असून मिठाचें उत्पन्न बरेंच होतें. भात सर्व ठिकाणीं पिकतें. जी. आय. पी. आणि बी. बी. सी. आय्. रेल्वे यातून जातात. साष्टी बेय मराठ्यांनीं पोर्तुगीज लोकांकडून स. १७३९ त घेतलें. १७७४ त इंग्रजांनीं मराठ्यांपासून घेतलें, व १७८२ त सालबाईच्या तहानें हे ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशास कायमचें जोडलें गेलें.