विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सायप्रस बेट— हें भूमध्यसमुद्रांतील मोठें बेट ब्रिटिशांच्याच हातीं आहे. त्याची सर्वातजास्त लांबी १४१ मैल असून सर्वांत जास्त रुंदी ६० मैल आहे. सायप्रस बेटांत पर्वताच्या दोन ओळी आहेत व त्यांत एक मेसेरिया नांवानें मैदान आहे. त्याची लांबी ६० मैल व रुंदी १० पासून २० मैलपर्यंत आहे. यांत कांहीं नद्याहि आहेत. लोकसंख्या सुमारें २७५०००. सायप्रसचे रहिवाशी मुख्यत: ग्रीक व तुर्क आहेत. त्यापैकीं शेंकडा २३ मुसुलमान व बाकीचे ख्रिस्ती आहेत. निकोसिआ हें राजधानीचें शहर आहे. शेती हा येथील मुख्य धंदा असून तींत दिवसानुदिवस सुधारणा होत आहे. परंतु अद्याप पुरेशा सुधारणा झाल्या नाहींत. गहूं, बार्ली, ओट, कापूस, हीं पिकें होतात. या बेटांत तांबे व चांदी या धातूंच्या खाणी होत्या. बंदरांच्या अभावामुळें येथील व्यापार मागसलेला आहे. गुरें दारू, रेशीम, शेतांत होणारा माल वगैरे माल परदेशीं जातो. येथें ब्रिटिश साव्हरिन हेंच सोन्याचें नाणें प्रचारांत आहे.
येथें प्रत्येक धर्माच्या लोकांच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. ७७४ प्राथमिक शाळांखेरीज १९२३ साली येथें ४ व्यायामशाळा, १ व्यापारी शाळा, ११ ग्रीक हायस्कुलें, एक प्रीस्ट्स ट्रेनिंग स्कूल आणि दोन मुस्लीम हायस्कुलें होतीं. सायप्रसमध्यें पांच तुर्की व ९ ग्रीक साप्ताहिकें आहेत. आधुनिक ग्रीक, ओस्मानली, तुर्की, फ्रेंच व इंग्रजी या भाषा चालतात.
या बेटावर एक हायकमिशनर असून त्याला वसाहती गव्हर्नराप्रमाणें अधिकार आहेत. एक कार्यकारी व एक कायदेमंडळ अशा दोन राज्यकारभाराच्या संस्था करण्यांत आल्या आहेत. कायदेमंडळांत ६ सरकारी व १२ लोकनियुक्त सभासद असतात. लोकनियुक्तांपैकीं ३ मुसुलमानांनीं निवडलेले व बाकीचे मुसुलमानेतरांनीं निवडलेले असतात.
इतिहास.— सायप्रस बेट रोमच्या साम्राज्यांत होतें. रोम साम्राज्याच्या लयानंतर तें पौरस्त्य राजांकडे गेलें. त्यांच्याजवळून घेऊन इंग्लंडच्या पहिल्या रिचर्डनें तें टेंप्लर सरदारांनां दिलें. त्यांनीं तें जेरुसलेमच्या राजाला दिलें (११९२), जेरुसलेमच्या राजाजवळून ते व्हेनिसकडे गेलें (१२८९). इ.स. १५७० मध्यें तुर्कांनीं या बेटावर हल्ला करून १५७१ सालीं घेतलें. या वेळेपासून इ. स. १८७८ पर्यंत तें तुर्कांच्याच ताब्यांत होतें. १८७८ सालीं कान्स्टांटिनोपलच्या तहान्वयें तें ब्रिटिशांच्या ताब्यांत गेलें आहे. गेल्या महायुद्धांत तें ब्रिटिशांनीं आपल्याकडे खालसा केलें (१९१४).