विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

सत्नामी-
उत्तर हिंदुस्थानांतील एक धार्मिक पंथ. या पंथाची जसजशी प्रगति होत गेली तसतसे निरनिराळे वर्ग पडत चालले. आज सत्नामी या नांवानें ओळखिले जाणारे निदान तीन वर्ग आहेतः (१) साध लोकांच्या पंथांत एकमेकांला सत्नामी हें नांव लावण्यांत येतें. या साध सात्नामींनीं औरंगजेबाच्या कारकीर्दीत बंड केलें होतें. ते ब-याच सत्नामी सांधूची कत्तल करून मोडण्यांत आलें. साध लोक आपल्याला रामदासाचे शिष्य म्हणवीत असले तरी त्याच्या एकेश्वरी मताकडे पहातां ते खरे कबीराचे अनुयायी वाटतील. (२) दुसरा सत्नामीवर्ग जगजीवनदासानें (पहा) स्थापन केलेला (सुमारें इ.स. १७५० त) होय. हे सत्नामी तर कबीर पंथांतीलच एक शाखा असें बहुधां समजण्यांत येतें. संयुक्त संस्थानांत यांची संख्या सुमारें ७५००० आहे. हे आपल्याला एकेश्वरी म्हणवितात तरी राम, कृष्ण इत्यादी देवावतरांना भजातात. यांत अनेक जातींचे व धर्मांचे लोक येतात. या पंथाची दीक्षा घेण्यानें मूळची जात किंवा धर्म जात नाहीं. हे उजव्या मनगटाला काळ्या व पांढ-या रेशमाचा दोरा एकत्र वळून बांधातात; याला आदु म्हणतात. कपाळावर एक काळी उभी रेघ तिलक म्हणून ओढितात. मद्य, मांस व कांहीं डाळी खाणें निशिद्ध मानिलें जातें (३) तिसरा वर्ग मध्यप्रांताच्या पूर्व भागांत छत्तिसगंडांत आढळतो इ.स १९०१ सालीं सुमारें ४ लाख लोक या वर्गाचे होते; पैकी २००० वगळून बाकीचे सर्व चांभार होते. विलासपूर जिल्ह्यांत राहण्या-या घासीराम नांवाच्या चांभारानें १८२०-३० च्या दरम्यान हा पंथ निर्माण केला. जगजीवनदासाच्या अनुयांय्यांच्या उपदेशावरून घासीरामाला स्फूर्ति झाली होती तरी हा वर्ग त्याचें अनुयायित्व कबूल न करतां आपल्याला रायदासींचा एक पोटपंथ म्हणवितो. हे लोक आपणाला रोहदासी असेंहि म्हणवितात. यांच्यांत जातिभेद नाहीं. धर्मतत्त्वें बहुतेक   दुस-या वर्गांतल्याप्रमाणेंच आहेत. या वर्गांत पुष्कळशा रानटी चाली अद्याप द्दष्टीस पडतात. (औधगॅझेटीयर (लखनौ) १८७७; क्रूक; रसेल; ग्रीयर्सन (ए.रि.ए ११ पृ. २०)