विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन 
   
साग- हा वृक्ष मूळचा हिंदुस्थानांतील आहे. सागाचें लांकूड हेंच सर्वत्र मुख्य इमारतीलांकूड असून, मुख्यतः त्याचीच हिंदुस्थानांतून सर्व देशांस निर्गत होते. सागाचीं मोठमोठीं जंगलें मध्यप्रांत, उत्तरकर्नाटक, वायनाड, अनमलै डोंगर, व त्रावणकोर येथें आहेत. याशिवाय मुंबई, कर्नूळ आणि कडाप्पामधील नलमैल डोंगर, दक्षिण अर्काट व म्हैसूर आणि हिंदुस्थानच्या दुस-याहि भागांत सागाची झाडें आढळतात. ब्रह्मदेशांत आराकान-योमाची पूर्व उतरण, पेगूयोमा, व मार्ताबान डोंगर यांवर सागाचीं जंगलें आहेत. बागांतून व रस्त्यांच्या बाजूला सागाचीं झाडें लावलेलींहि असतात. मलबार, बंगाल व आसामखो-यात सागाची जंगलांत लागवड करण्याचेहि प्रयत्न झालेले आहेत. हवामान, जमीन, लागवड, बीं, संवर्धनगृहें, वाढ, तोडणें, रोग वगैरेसंबंधीं सविस्तर माहिती डॉ. वॉट यांच्या औद्योगिक कोशांत सांपडेल.

सागाच्या लांकडाची विशेष मातबरी असण्याला त्याचा टिकाऊपणा कारण आहे; या टिकाऊपणाचें कारण म्हणजे लांकडाच्या रंध्रांत असणारें एक राळेसारखें पातळ द्रव्य होय. त्यायोगानें लांकडावर पाण्याचा परिणाम होत नाहीं. कार्ल्याच्या प्रसिद्ध लेण्यांतील छत सागाच्या लांकडाचें असून ते कमींतकमी २००० वर्षांचें जुनें आहे; यावरून सागाचा टिकाऊपणा चांगला ध्यानांत येईल. सागाच्या लांकडाचें वजन दर घनफुटास सुमारें   शेर म्हणजे अर्ध्या मणापेक्षां जास्त असतें. अगदीं ताजें असतां तें पाण्यांत क्वचित तरंगतें; परंतु वाळल्यावर मात्र चांगलें तरंगूं लागतें. अंगच्या तेलामुळें त्यांत पाणी जाण्याची भीति नसते; व त्याच तेलामुळें लांकूड खाणा-या कीटकांपासून त्याचें संरक्षण होतें. याचा विशेष गुण म्हणजे याजमध्यें ठोकलेलें लोखंड गंजत नाहीं. जहाजें विशेषतः वरचा भाग म्हणजे डेक बांधण्याकरितां आणि आगगाडयांचे डबे, व घरगुती सुतारसामान वगैरे तयार करण्याकरितां सागाचें पुष्कळ लांकूड परदेशी जातें. हिंदुस्थानांतहि घरें, जहाजें, पूल व इतर लांकडी सामान करण्याकरितां त्याचा उपयोग केला जातो. सागावर खोदकाम फारच सहज व सुंदर होतें. यासंबंधीं विशेष माहिती इंडियन आर्ट अॅट दिल्ली (१९०३) या पुस्तकांत सांपडेल.