विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सहकारी संस्था- कोऑपरेशन (सहकार) याचा संकुचित अर्थ अनेक इसमांनीं कमी किंमतीनें माल मिळावा म्हणून एकत्र खरेदी करणें किंवा जास्त फायदा पडावा म्हणून एकत्र विक्री करणें असा आहे. याचाच व्यापक अर्थ असा कीं, मानवी आयुष्यक्रम उत्तम चालणें ही गोष्ट व्यक्तिमात्रांमध्यें स्पर्धा व चढाओढ लागल्यानें शक्य नसून एकमेकांस मदत केल्यानेंच शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीनें सर्व समाजाचें हित साधण्याचा प्रयत्न करावा आणि एकंदर समाजानें प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यावी. 'प्रत्येकजण सर्वांकरितां आणि सर्वजण प्रत्येकाकरितां' (ईच फार ऑल, अँड ऑल फॉर ईच) हे सर्वांचें ब्रीदवाक्य असावें अशा रीतीनें सहकार हा मानवसमाजांत 'जीवनार्थ कलह' (स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स) या तत्त्वाऐवजीं 'स्वखुषीची एकजूट' हें तत्त्व प्रस्थापित करूं पाहतो. याप्रमाणें कोऑपरेशन ही एका टोंकाला वैयक्तिक स्पर्धा व दुस-या टोंकाला राष्ट्रसत्ताक किंवा नगरसत्ताकपद्धति (स्टेट ऑर म्युनिसिपल सोशिआलिझम्) या दोहोंच्या मधली स्थिति आहे. प्रत्यक्ष व्यवहारांत हल्लीं हें सहकारितेचें तत्त्व मालाचें उत्पादन, विनिमय व पत या तिन्ही अर्थशास्त्रीय क्रियांमध्यें अंमलांत आणलें गेलें आहेः (१) विनिमय किंवा व्ययविषयक संस्था:-यामध्यें माल खरेदी करणारे इसम सभासद होऊन मालविक्रीचें दुकान काढतात व त्यांनां माल कमी किंमतींत मिळूं शकतो. अशा दुकानांनां 'कोऑपरेटिव्ह स्टोअर्स' अशा अर्थाची नांवें असतात (२) उत्पादक संस्था:-यांमध्यें स्वतःचें भांडवल आहे असे इसम एकत्र होऊन शेती, कारखाने आणि इतर उत्पादनाचे व्यवसाय करतात. (३) बँकिंगच्या किंवा पतपेढयासारख्या संस्था:-यांत सभासद ठेवी ठेवतात व तारणावर हलक्या व्याजानें कर्ज घेतात. कोऑपरेटिव्ह बँक्स, फ्रेंडली सोसायटीज, बेरियल (अंत्यकर्म) सोसायटीज, बिल्डिंग सोसायटीज (सभासदांनां घरें विकत घेण्याला किंवा बांधण्याला मदत करणा-या संस्था) वगैरे अनेक प्रकारच्या सहकारी संस्था असतात.
कोऑपरेशच्या कार्याला प्रथम आरंभ इंग्लंडांत राचडेल येथील विणकरी लोकांत झाला. १९ व्या शतकाच्या आरंभीं राबर्ट ओवेन या एकटयाच इंग्रज पुढा-यानें ही चळवळ हातीं घेतली व आज या चळवळीला जें स्वरूप प्राप्त झालें आहे त्याचें श्रेय त्याला आहे प्रथम रॉचडेल येथें व नंतर मँचेस्टर वगैरे ठिकाणी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स काढण्यांत आले. १८०५ सालीं सहकारी उत्पादक संस्था (कोऑपरेटिव्ह प्रॉडक्शन) म्हणून विणकामाचे कांही माग चालू करण्यांत आले व त्यांतूनच पुढें कोऑपरेटिव्ह कॉटन मिल्स स्थापण्यास सुरवात झाली. नंतर बिल्डिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी, कोआपरेटिव्ह बँक्स, कोऑपरेटिव्ह होलसेल सोसायटी वगैरे निरनिराळया कार्यांकरितां सहकारी संस्था निघाल्या. इतर देशांतहि अशा संस्थांची वाढ झपाटयानें झाली. तत्संबंधीं अनेक शाखा असलेल्या व फार प्रसिद्धि पावलेल्या सहकारी संस्था 'दि कोऑपरेटिव्ह असोसिएशन ऑफ अमेरिका (युनायटेड स्टेट्स)'. 'दि को ऑपरेटिव्ह बदरहुड (यु स्टॅटस्). दि वुइमेन्स कोऑपरेटिव्ह गिल्ड (ग्रेटब्रिटन), दि कोऑपरेटिव्ह यूनियन (ग्रेटब्रिटन) वगैरे आहेत.
हिं दु स्था न.- हिंदुस्थानांतील सहकारी संस्थांच्या उत्पत्तीचा इतिहास 'पेढया व पत' या लेखांत दिला आहे. अशा संस्थांबद्दल विस्तृत माहिती 'हिंदुस्थान' विभागांत येईल. सांप्रत निरनिराळया प्रांतांत झालेल्या प्रगतीची थोडक्यांत माहिती येथें देतों. पंजाबांत शेतक-यांकरितां सहकारी पतपेढया असून शिवाय त्यांनां अर्थशास्त्राचें शिक्षण देण्याकरितां शाळा आहेत आणि मोठया प्रमाणावर सहकारितेनें शेती करण्याचे प्रयत्न चालू आहेत. संयुक्त प्रांतांत पतपेढया लोकप्रिय करण्याचा प्रयत्न अद्याप चालू आहे. बिहार-ओरिसामध्यें पतपेढयांबरोबर मोठया प्रमाणावर शेती करण्याचे प्रयत्न चालू आहेत. बंगाल्यांत या चळवळीची स्थिति चांगली आहे. मध्यम वर्गांतील सुशिक्षित पण बेकार इसमांनां शेतीच्या धंद्यांत घालण्याचा प्रयत्न चालू असून कोऑपरेटिव्ह इरिगेशन (सहकारी तत्त्वानें शेताकरितां कालवे वगैरे बांधून पाणी घेणें) करितां सोसायटया निघत आहेत. मद्रासमध्यें सहकारी पतपेढयांबरोबर शेतक-याचे संघ स्थापन होऊन चांगला बाजारभाव येर्इपर्यंत धान्य विकण्याची अवश्यकता शेतक-यानां उत्पन्न होऊं नये म्हणून प्रयत्न चालू आहे. मुंबई इलाख्यांत सहकारी पतपेढया यशस्वी करण्याकडे विशेष प्रयत्न चालू असून कांहीं ठिकाणीं कापसाच्या खरेदीविक्रीकरितां सहकारी पद्धतींचीं दुकानें निघालीं आहेत. पण मध्यप्रांतांत सहकारी पतपेढया व कोऑपरेटिव्ह स्टोअर्स या दोन्ही प्रकारच्या संस्था चांगल्या स्थितींत नाहींत. ब्रह्मदेशांत सहकारी संस्था सुधारण्याची खटपट चालू आहे. आसाममध्यें शेतकीखातें व सहकारी संस्थाखातें हीं एकत्र केलीं असून त्यामुळें सहकारी संस्थांची प्रगति चांगली होत आहे; पण कोऑपरेटिव्ह स्टोअर्स यांची स्थिति चांगली नाहीं.