विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संशयवाद- (स्केप्टिसिझम) परस्परविरोधी दोन मतांपैकीं सत्य कोणतें याचा निर्णय करतां येत नाहीं, या मनःस्थितीला संशयवाद म्हणतात. सोफिस्ट बहुतांशीं संशयवादी असत. साक्रेटीसनें संशयवादाची लाट अडवून धरलीं. पि-होच्या वेळीं ही लाट पुन्हां उसळली. पि-हो म्हणे कीं, वस्तूचें ज्ञान होणं अशक्य असल्यामुळें मनुष्यानें उदासीन रहावें. प्राचीन संशयवादी स्थिर वृत्तीचे असत पण अर्वाचीन चंचल वृत्तीचे असत. धार्मिक श्रद्धेचें पुनरुज्जीवन करण्यासाठीं एक प्रकारचा संशयवाद अलीकडे पुढें आला आहे. मध्ययुगाच्या अखेरीस बुद्धिप्रामाण्य व ईश्वरप्रणीतता यांच्यांतील लढा सार्वत्रिक संशयवादांत रूपांतर पावला. सत्याचीं दोन स्वरूपें पुढें आलीं: तत्त्वज्ञानविषयक सत्य व धार्मिक सत्य. हीं विरोधी असत. पास्कल हा नमुनेदार ख्रिस्ती संशयवादी होता. बुद्धीचा स्वतःशींच विरोध येत असल्यामुळें यथार्थज्ञानार्थ मानवी बुद्धीहून वरिष्ठ शक्तीची आवश्यकता तो प्रतिपादन करी. ह्यूम पूर्ण संशयवादी व अनुभववादी होता. त्यानें इंदियांच्या प्रामाण्याविषयीं संशय उत्पन्न केला. क्यांटच्या ''क्रिटिक ऑफ प्युअररीझन'' मधील संशयवाद अज्ञेयवादाच्या (पहा) स्वरूपाचा आहे. पण या अज्ञेयवादाचा पाया व कळस संशयवाद आहे. या मताप्रमाणें आपलें ज्ञान मर्यादित असतें येवढेंच नाहीं, तर त्या मर्यादेंतील ज्ञानाच्या सत्यतेबद्दलहि संशय असतों. हें मत आजपर्यंत पूर्णपणें कोणीहि अंगिकारिलें नाहीं.