विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन    

सर्वेश्वरवाद (पंथइिझम)- विश्वांत सर्वत्र ईश्वर भरलेला आहे या मताला हें नांव आहे. या मताचा उगम अति प्राचीन काळांतच पौरस्त्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानांत झालेला आहे. अनेकेश्वरीवाद (पॉलीथीइझम) व दैवतवाद यांच्याविरुद्ध झालेल्या बौद्धिक बंडांतून हें मत उत्पन्न झालें आहे. हिंदु तत्त्ववेत्ते अनंत ब्रह्म किंवा ईश्वरी अंश सर्वत्र आहे असें मानूं लागले. झेनोफिनीस, फ्लेटो, वगैरे ग्रीक तत्त्ववेत्ते जड सृष्टीच्या किंवा नित्य बदलणा-या दृश्य चमत्कारांच्या मागें कांहीं एक मूल तत्त्व किंवा आदिरूप सत्य असलें पाहिजे असें मानीत. यहुदी व ख्रिस्ती धर्मग्रंथांत हेंच मत जरा निराळया शब्दांत दिलें आहे. सर्वेश्वरवादाचा पुरस्कार करणारा आधुनिक तत्त्ववेत्ता स्पिनेझा हा होय. ईश्वर सर्व विश्वांत भरलेला आहे असें तो म्हणतो. हेगेलनेंहि या मताचा पुरस्कार केला. पण त्याच्या पश्चात त्याच्या अनुयायांमध्येंच सर्वेश्वरवादी व निरीश्वरवादी असे दोन परस्पर अत्यंत विरुद्ध असे पंथ निघाले. ईश्वर या विश्वाच्या बाहेर कोठें व कसा राहणार? या आक्षेपाचें निरसन सर्वेश्वरी वाद मानण्यांत होतें पण ईश्वर सर्व जगांत तरी कोणत्या अर्थानें असूं शकेल? असा सर्वेश्वरवादावर आक्षेप आहे. प्रत्येक मनुष्यांतहि ईश्वर आहे असें मानल्यास ईश्वर व मनुष्य यांचा परस्परसंबंध कशा प्रकारचा असतो; तसेंच मनुष्य ईश्वराधीन किती असतो आणि मनुष्याला इच्छास्वातंत्र्य कितपत असतें, वगैरे प्रश्न उद्भवतात. त्यांनां समर्पक उत्तर न मिळाल्यामुळें सर्वेश्वरवादांतूनच निरीश्वरवाद उत्पन्न होतो.