विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सरैकेला- बिहार-ओरिसा, छोटा नागपूर संस्थानांपैकीं एक संस्थान. क्षेत्र फळ ४४९ चौ. मै. त्यांतील पूर्वेकडील भाग विशेष डोंगराळ आहे व त्यांत इमारती लांकूड बरेंच आहे. पोराहत वंशांतील विक्रमसिंग यास हें जहागीर म्हणून प्रथम मिळालें होतें. येथील लोकसंख्या १९२१ सालीं ११५१९२ होती. ह्या संस्थानांत एकंदर ८१६ खेडीं आहेत; त्यांपैकीं सरैकेला (लोकसंख्या ३७११ मुख्य ठिकाण) व सिनी हीं मुख्य होत. येथील मुख्य धंदा शेतकीचा आहे. मुख्य पीक तांदुळाचें असून मका, कडधान्यें व गळीताचीं धान्येंहि होतात. उत्पन्न सुमारें एक लाख.