विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सयाम- इंडो-चीन द्वीपकल्पांतील एक स्वतंत्र राष्ट्र. एतद्देशीय लोक यास म्वांगथई या नांवानें संबोधितात. या देशाची सांस्कृतिक माहिती. 'हिंदुस्थान आणि जग' या विभागांत (प्रकरण ५ वें) सविस्तर दिलेली आहे. हा देश उ. अ. ४०२०' आणि २००१५' व पूर्व रेखांश ९६०३०' व १०६० यांमध्यें वसला आहे. या देशाच्या उत्तरेस ब्रिटिश शानसंस्थानें आणि फ्रेंच लाऑस प्रदेश असून पूर्वेस फ्रेंच लाऑस व कॅम्बोडिया आहे. दक्षिणेस कॅम्बोडिया व सयामचें आखात असून पश्चिमेस तेनासेरीम व पेगु प्रान्त आहेत. या देशाचें एकंदर क्षेत्रफळ २००१४८ चौरस मैल आहे. भूगोलदृष्टया उत्तर, पूर्व, मध्य व दक्षिण असे चार भाग पडतात.
येथील हवा अतिशय उष्ण किंवा अतिशय थंड नाहीं. या प्रदेशांत ४२ पासून २८० इंचांपर्यंत पाऊस पडतो. किना-यावर पंडानुवेत वगैरे झाडें उगवतात. मध्यप्रदेशांत तांदूळ, नारळ वगैरे उष्ण प्रदेशांत उत्पन्न होणारे पदार्थ होतात. इमारती लांकूड बरेंच होतें. डामरांचें तेल, नौका तयार करण्यास लागणारें लांकूड, मिरें, ऊंस, नारळ वगैरे अनेक प्रकारचे पदार्थ येथें होतात.
वस्ती.- एकंदर लोकसंख्या (१९१९-२०) ९२०७३५५ आहे. पुरुषांपेक्षां बायका थोडया जास्त दिसतात. सुमारें ८०००००० थई लोक आहेत. सयामी वस्तींतील डोंगरांतून पुरातन मोनख्मेर वंशाचे कांहीं लोक आढळतात. लु, याआ, थिन वगैरे युनानी सदृश जातीचे लोक शान संस्थानांत आहेत. सयामी करेण लोकहि उत्तरसयामांत निरनिराळ्या समूहांतून आढळतात. हे लोक मध्यम उंचीचे, चांगल्या बांध्याचे, गौरवर्णी व पसरट नाकाचे आहेत.
सयामी लोकांत बहुपत्नीत्व रूढ आहे; तथापि प्रथम पत्नी ही घरांत श्रेष्ठ मानतात. हे लोक सात्त्विक, सहनशील, आतिभ्यशील आहेत. भांडणें व भयंकर गुन्हे या लोकांत फारच कमी होतात. हे लोक जरी हुशार आहेत तरी ते फक्त शेती करतात, त्यामुळें देशांतील बहुतेक सर्व उद्योगधंदे परकीय लोकांच्या आधीन आहेत. पानुंग नांवाचा या लोकांचा पोषाख आहे. पानुंग हें दोन हात रुंद व सहा हात लांब असें फडकें असून पुरुष व स्त्रिया तें नेसतात.
तांदूळ व मासे हें याचें मुख्य खाद्य आहे. इकडे मांस फारसें मिळत नाहीं. पुरुष तंबाखू ओढतात व सुपारी खातात. पूर्वी गुलामगिरी अस्तित्वांत होती पण सन १९०५ च्या कायद्यानें ती कायमची बंद झाली. येथें जातिभेद अस्तित्वांत नाहीं. तसेंच वंशपरंपरा चालणा-या पदव्याहि नाहींत. चिएंगमाई ही उत्तर सयामची राजधानी आहे. लाम्पंग, टर्न, नान, प्रे, पिकाई, पिचिट, पाचिम, पेट्रिओ, क्रॅट वगैरे प्रमुख शहरें आहेत.
द ळ ण व ळ ण- बहुतेक दळणवळण नद्यांनी व कालव्यांनीं होतें. १९२४ सालीं येथें २०८३ मैल लांबीचा सरकारी आगगाडीचा रस्ता होता. १८८५ सालीं सयाम टपालसंघांत सामील झालें.
शे त की व्या पा र.- हे लोक साळीची लागवड करतात व त्यांत ते अत्यन्त हुशार आहेत. येथील तांदूळ उत्तम असतो; याशिवाय नारळ, मि-यें, तंबाखू हे जिन्नस येथें उत्पन्न होऊन परदेशीं रवाना होतात. येथें सोनें, चांदी, रत्नें, कथील, तांबे, लोखंड, जस्त व कोळसा सांपडतात. कथील काढण्याचे कारखाने येथें असून त्याची निर्गतहि मोठया प्रमाणावर होते. उत्तर ब्रह्मदेशांत दाट जंगल असून त्यांत इमारतीचें लांकूड फार आढळतें; सयामचें सागवान प्रसिद्ध आहे. पावसाळयांत नदींतून या लांकडाच्या तुळया वहात बँकाँक बंदरात जातात व तेथून त्यांची अंतर्बाह्य विक्री हातें. भात सडण्याचे, लाकूड कापण्याचे, दारू, विटा व कौलें तयार करण्याचे वगैरे कारखाने येथें आहेत. पण ते सर्व परकीयांच्या ताब्यांत आहेत. येथील निर्गत व्यापार जवळ जवळ २ कोटी पौंडाचा आहे. शेंकडा ८५ वर बाह्य व्यापार राजधानींतून होतो.
रा ज्य व्य व स्था.- येथें अनियंत्रित राजसत्ता आहे. गादीचा वारस राजा नेमतो. कित्येक वेळां त्याची नेमणूक लवकर होते तर कित्येक वेळा राजा मरेपर्यंत नाहीं; यामुळें सार्वजनिक शांततेस धक्का बसण्याचा बराच संभव असे. १९१० त हल्लींच्या राजानें आपल्याला मुलगा होईपर्यंत गादीचा वारसा राजमातेच्या मुलांच्या घराण्यांत जाईल असें जाहीर केलें. निरनिराळ्या खात्यांवरील अधिका-यांचें एक मंत्रिमंडळ असतें. याशिवाय राजानें नेमलेल्या चाळीस सभासदांचें एक कायदेमंडळ असतें. राजाला कोणताहि कायदा नामंजूर करण्याचा अधिकार असतो. या देशाचे १८ विभाग (मॉन्टॉन) पाडले आहेत. त्या प्रत्येकावर एक सुभेदार असतो. या प्रत्येक विभागाचे चंगवात, अंपुर व तंबॉन असे आणखी बारीक विभाग पाडले आहेत.
ज मा बं दी.- एकंदर उत्पन्न पाऊण कोटी पौंडांचें आहे; यांत अफूचें व रेल्वेचें उत्पन्न सर्वांत जास्त आहे. एक बिटिश अधिकारी मदतनीस फडणीस म्हणून असतो.
सै न्य व आ र मा र.- सक्तींचें लष्करी शिक्षण १९१७ च्या कायद्यानें सर्वत्र अमलांत आलें. सैन्याच्या १० तुकडया आहेत. वैमानिक शिक्षणाची एक शाळा १९१४ त सुरू केली असून एक वैमानिक दल तयार केलें आहे. एक लहानसें आरमारहि तयार असतें.
न्या य व ध र्म.- न्यायखात्यांत आतां बरीच सुधारणा झाली आहे. ब्रिटिश व फ्रेंच कायदेपंडित न्यायखात्यांत बरा व पुढाकार घेतात व परकीय लोकांचे हक्क शाबूद राखतात. १९०८ त पीनल कोड तयार होऊन अमलांत आलें. या देशांतील सामान्य धर्म बौद्ध आहे. मलायी लोक मुसुलमान आहेत.
शि क्ष ण.- अमेरिका व फ्रान्समधून आलेल्या मिशनरी लोकांनीं शिक्षणाचा कार्य हातीं घेऊन त्यांत बरीच प्रगति केली. येथें बौद्ध मठ सर्व देशभर पसरले आहेत. बहुतेक प्राथमिक शिक्षण या मठांच्या स्वाधीन आहे. १९२१-२२ सालीं सरकारी प्राथमिक शाळा ४५९ असून बिनसरकारी २७३२ होत्या. दुय्यम शिक्षणाच्या सरकारी १६८ व बिनसरकारी १० शाळा आहेत. विशिष्ट शिक्षणाच्या सरकारी शाळा ११ आहेत. बँकाँक येथें चुलालाँगकॉर्न विश्वविद्यालय १९१७ सालीं स्थापन झालें. त्यांत वैद्यक, राजशासन आणि वाङ्मय व स्थापत्य आणि सृष्टिशास्त्र या शाखा आहेत.
भा षा व वा ङ् म य.– सयामची थई भाषा व तींतील वाङ्मय यांचें विवेचन 'हिंदुस्थान आणि जग' या विभागांत १८४ -१८५ पृष्ठांवर दिलें आहे.
इतिहास- 'सयाम' ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधीं निरनिराळीं मतें आहेत. हा शब्द पोर्तुगीज किंवा मलाया भागांतून आला असावा असें कित्येकांचें मत होतें; पण सयाम हें नांव या देशास सुमारें १००० वर्षांपूर्वी लावीत असत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. लाओ ख्मेर लोकांनीं लांपुन हें राजधानीचें शहर ५७५ सालीं वसविलें. १२५० सालं कुब्लाईखान यानें लाओथई लोकांनां चीनच्या नैर्त्रन्त्य भागांतून हांकून लाविलें आणि ह्या गोष्टीचा या लोकांवर बराच परिणाम झाला. यानंतर उत्तर, पश्चिम, नैर्ऋत्य सयाममध्यें असलेल्या स्वांकालोकसुखोथई व सुफान वगैरे सर्व राज्यांतील लोक सयामी थई म्हणून मोडूं लागले. त्यांनीं आपली राजधानी सुखोथई येथून नाखोन, सवान वगैरे ठिकाणीं हलवून शेवटीं तीं सुवर्णभूमि येथें नेली. १२८४ च्या सुमाराच्या सुखोथई शिलालेखांत असा उल्लेख आहे कीं, राम कामहेंग राजाचा मुलूख मेकाँगपासून पेचाबुरीपर्यंत व लिगोरपर्यंत पसरला होता. त्याचप्रमाणें मलाया इतिहासांत असा उल्लेख आहे कीं, मेनंगकाबु येथील वसाहतवाल्यांनीं सन ११६० च्या सुमारास सिंगापूर येथें वसाहत करण्यापूर्वीच सयामी लोकांचें राज्य द्वीपकल्पाच्या टोंकापर्यंत गेलें होतें. १३५० सालीं अयुथिआ शहर सानो शहराच्या जागींच बसविण्यांत आलें. हेंच शहर पहिल्या ख-या सयामी राजाची राजधानी झालें. या राजाचें वर्चस्व मौलमीन, टाव्हाय, तेनासरीम व मलाक्काचें द्वीपकल्प इतक्या प्रदेशावर होतें. याच वेळीं सयामी लोकांनीं कॅम्बोडियावर स्वारी केली. त्यांनीं अंगरकोट घेतलें व ९०००० कैदी धरून नेले. यांच्या काम्बोडियाशीं जवळ जवळ ४०० वर्षें लढाया चालल्या होत्या; सरतेशेवटीं काम्बोडियाचे कित्येक प्रान्त काबीज केल्यानंतर काम्बोडियाचा राजा सयामी राजाच्या वर्चस्वाखालीं आला. ही गोष्ट कोचीन व चीन येथें असलेल्या फ्रेंच लोकांस सहन झाली नाहीं व शेवटीं सयामला काम्बोडिया हे फ्रेंचांचें संरक्षित संस्थान असल्याचें कबूल करावें लागलें. वायव्येकडील व ईशान्येकडील लाओ संस्थानावर सायामी लोकांनीं निकराचे हल्ले केले. यामुळें तेथील बरेच लोक परदेशी निघून गेले व अठराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सयामी लोकांची चींगमाई देशावर व इतर प्रान्तांवर सत्ता प्रस्थापित झाली. स. १८२८ च्या सुमारास ल्वांग प्रबंग व व्हीन चंग वगैरे पूर्वेकडील महात्वाच्या राजधान्यांवर यांचें वर्चस्व असे. पंधराव्या सोळाव्या शतकांत ब्रह्मदेशांतील लोकांनीं व पेग्वान लोकांनीं अयुथियाच्या संपत्तीस भुलून सयामवर स्वा-या केल्या. यावेळीं सयामी लोकांस पोर्तुगीज शिपाई मदत करीत होते. १६८० च्या सुमारास सयाम व फ्रान्स यांचा संबंध घडून आला. पुढें ख्रिस्ती लोकांचा साम्राज्यवर्धनाचा व धर्मांतराचा डाव ओळखून सयामनें फ्रान्सशीं असलेला संबंध तोडून टाकला. चीनच्या राजाचें वर्चस्व पूर्वी सयामा लोकांनां कबूल होतें. कारण नवीन राजा ज्यावेळीं गादीवर बसे त्या वेळीं त्याचा शिक्कामोर्तब चीनमधून आणण्यांत येत असे, पण सध्यां सयामी लोकांनां हें चीनचें वर्चस्व कबूल नसून चीननेंहि तें सयामला कबूल करावयास लावण्याची खटपट केली नाहीं.
१०० वर्षांपूर्वी लासेनला आढळून आलेली सयाम संस्थानची एकंदर स्थिति सविस्तर रीतीनें ज्ञानकोश प्रस्तावना खंडाच्या पहिल्या विभागांत (पृ. २०० पासून पुढें) दिली आहे. यूरोपियन राष्ट्रांपैकीं पोर्तुगीज लोकांचा सयामशीं अगोदर संबंध आला. १५११ सालीं डी अलबुकर्कनें मलाक्का घेतलें, तेव्हांपासून सयामी लोकांची पोर्तुगीजांशीं दोस्ती झाली. यांची दोस्ती जवळ जवळ शंभर वर्षें टिकली व शेवटीं पोर्तुगीजांची जागा डच लोकांनीं घेतली सतराव्या शतकांत प्रारंभीं इंग्लिश व्यापारी सयाममध्यें जाऊन राहिले, यावेळीं सयामचा राजा व इंग्लंडचा राजा पहिला जेम्स यांच्यामध्यें पत्रव्यवहार सुरू होता. ज्यावेळीं इंग्लंडचीं कांहीं जहाजें सयामला आलीं त्यावेळीं इंग्लिश लोकांचें चांगलें स्वागत करण्यांत आलें व त्यांनां व्यापारासंबंधी कांहीं सवलती मिळाल्या. ईस्ट इंडिया कंपनीला या लोकांची भरभराट सहन झालीं नाहीं व शेवटीं ईस्टइंडिया कंपनींतील लोकांनीं सयामवर स्वारी केली; या स्वारीमुळें १६८७ सालीं सयाममधील इंग्लिश लोकांची कत्तल झाली व १६८८ सालीं त्यांनां अयुथिया येथील आपली वखार उठवावी लागली. अशाच त-हेचा हल्ला १७१९ सालीं मद्रासच्या गव्हर्नरनें केला व तेव्हांपासून सयामशीं असलेल्या व्यापाराची हेळसांड झाली. सन १७८६ मध्यें सयामच्या आश्रित असलेल्या केदाच्या सुलतानानें कंपनीशीं तह केला व कंपनीला पुलो पेनांग नांवाचें बेट मिळालें. १८२४ सालीं डच लोकांशीं झालेल्या तहानें ब्रिटिश मलाया द्वीपकल्पांत व सयाममध्यें मुख्य झाले व शेवटीं कॅप्टन बर्न यानें सयामशीं तह केला. १८३३ सालीं याचप्रमाणें अमेरिकेशीं तह झाला. १८५५ सालीं सयामनें इंग्लंडचा व्यापारी वकील आपल्या देशांत ठेवण्याचें कबूल केलें. या तहानें इंग्लिश लोकांनां ब-याच सवलती मिळाल्या. त्याचप्रमाणें जपान (१८९८ सालीं) व रशिया (१८९९ सालीं) या देशांशीं सयामनें तह केला. सयामच्या पूर्व सरहद्दीसंबंधानें फ्रान्स व सयाम यांमध्यें भांडण सुरू होऊन १८९३ सालीं लढाईस सुरवात झाली व सयामी लोकांचा पराभव होऊन त्यांनां मेकांग नदीच्या उजव्या बाजूस पंचवीस किलोमीटर मागें हटावें लागलें.
सन १८९६ सालीं इंग्लिश व फ्रेंच लोकांमध्यें तह होऊन मध्यसयाममध्यें कोणी ढवळाढवळ करावयाची नाहीं असें ठरलें. १८९३ सालच्या तहानें सयामला मेकांगच्या उजव्या बाजूकडील बहुतेक सर्व प्रांत मिळाला. १९०७ सालीं सयामनें बट्टमबंग प्रान्त काम्बोडियाला दिला व सयामला क्राट प्रान्त व डन्साई जिल्हा मिळाला. १९०९ सालीं सयामनें केदा, केलांटन वगैरे प्रदेशांवरील आपले सर्व अधिकार ब्रिटिशांनां दिले. या कालांत सयामच्या व्यापाराची बरीच भरभराट झाली व जर्मनी, डेन्मार्क, इटली, जपान वगैरे देशांतील व्यापा-यांनीं सयामशीं व्यापार सुरू केला.
१९१० सालीं सयामचा राजा चूलालोंकर्न वारल्यामुळें त्याचा मुलगा महावजीरखुब हा सहावा राम या नांवानें गादीवर बसला. यानें आपल्या कारकीर्दीत ब-याच सुधारणा घडवून आणल्या. १९१७ सालीं सयामनें जर्मनी व ऑस्ट्रेलियाविरुद्ध युद्ध जाहीर केलें; व दोस्तराष्ट्रांनां मदत करण्याकरितां सैन्य व वैमानिक दल रणांगणावर पाठवून दिलें. शांततापरिषदेंत सयामचे तीन प्रतिनिधी हजर होते व त्यांनीं सयामतर्फे शांततापरिषदेंतील तहाच्या मसुद्यावर सह्या केल्या. या तहाच्या मसुद्यांतील १३५-३/-३७ हीं कलमें सयामबद्दल आहेत. या कलमान्वयें जर्मनीनें सयामशीं केलेले राजकीय अगर व्यापारी करार रद्द झाले असून जर्मनीची सयाममधील सत्ता सयामकडे आली. सयाम हें राष्ट्रसंघाचा सभासद आहे.