विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन 
 
समाजसत्तावाद (सोशिअॅलिझम)- याच्या अनेकांनीं अनेक व्याख्या सुचविल्या आहेत. त्या सर्वांमधून सारभूत व्याख्या येणेंप्रमाणें:- संपत्तीच्या उत्पादनाच्या साधनांची मालकी लोकशाहीच्या तत्त्वानुसार बनलेल्या सरकारच्या हातीं देऊन त्या साधनांचा सर्वांच्या न्याय्य फायद्याकरितां सहकारितेनें उपयोग करणें. प्राचीन काळीं व मध्ययुगांत सोशलिझम शब्दाचा जो अर्थ करीत असत त्याचा समावेश वरील व्याख्येंत होण्यासारखा नाहीं ('अराजकता' व 'संघसत्तावाद' हे लेख पहा). रॉबर्ट ओवेननें जी योजना सुचविली तिचाहि अंतर्भाव या व्याख्येंत होत नाहीं. तथापि ज्याप्रमाणें किमयेची विद्या व रसायनशास्त्र किंवा फलज्योतिष व फलज्योतिषशास्त्र हीं भिन्न आहेत त्याप्रमाणें समाजसत्ता वादासंबंधाच्या प्राचीन यूरोपीय कल्पना व हल्लींचीं व्याख्या यांत अंतर आहे. हा शब्द प्रथम ओवेनच्या वेळीं प्रचारात आला. पण ज्याप्रमाणें मिल्लनें उपयुक्ततावाद (युटिलिटेरियॅनिझम) हा शब्द प्रचारांत आणण्यापूर्वीहि उपयुक्तवादाचीं तत्त्वें प्रतिपादणारे तत्त्ववेत्ते होऊन गेले होते, त्याचप्रमाणें ओवेननें हा शब्द रूढ करण्यापूर्वी समाजसत्तावादाचे सिद्धांत प्रतिपादणारे विद्वान होऊन गेले. 'समाजसत्तावाद' हें तत्त्व शासनशास्त्र अस्तित्वांत आलें तेव्हांपासूनच अस्तित्वांत आहे. समाजाचें शासन करण्यास 'सरकार' म्हणून एक स्वतंत्र संस्था असावी असें वाटूं लागलें तेव्हांपासूनच उत्पादनाची साधनें सरकारच्या उर्फ सर्व समाजाच्या मालकीचीं असावीं हें मत अस्तित्वांत आलेलें आहे. सीरेनाईक पंथी व सीनिक पंथी लोक तर उघड अराजकतावादी होते. चाल्सेडनचा फालेयस हा संघसत्तावादी (कम्युनिस्ट) होता. प्लेटोनें आपलया 'रिपब्लिक' नामक ग्रंथांत स्टेट सोशिऍलिझमचें तत्त्व मांडलें आहे. रोमन कायद्यांत खाजगी व सार्वजनिक असे भेद होते; व व्यापार व उद्योगधंदे सरकारी मालकीचे नसावे असें मत होतें. मध्ययुगांतील फ्युडॅलिझम व गिल्ड पद्धति हीं, उद्योगधंद्यांची सामुदायिक मालकी सरकारकडे किंवा एखाद्या संघाकडे असावी या मताचीं निदर्शक आहेत. पण गिल्ड पद्धति मोडून नंतर व्यक्तिस्वातंत्र्यवाद (इंडिव्हिज्युअॅलिझम) प्रबळ झाला. पुढें १८ व्या शतकांत जेव्हां एकामागून एक असे अनेक यांत्रिक शोध लागत गेले तेव्हां उद्योगधंद्याचें स्वरूप एकदम पालटलें. मोठें भांडवल व मोठमोठे कारखाने काढल्याशिवाय गत्यंतर उरलें नाहीं. मजूर लोक हे धनिक भांडवलवाले व कारखानदार यांच्या तावडींत सांपडले व त्यांचा गैरवाजवी फायदा कारखानदार घेऊं लागतांच फॅक्टरीवरील सरकारी निययंत्रणाच्या युगास आरंभ झाला; व त्यांतूनच समाजसत्तावाद निर्माण झाला आहे आणि ''सिंडिकालिझम'' म्हणजे कामक-यांकडे धंद्याचें स्वामित्त्व असावें हा वाद त्या वादाचा अर्वाचीन परिणाम आहे; आणि तो व्यक्तिस्वातंत्र्यवादाच्या किंवा सरकारी तटस्थवृत्तीच्या (लेसे-फेअर) अगदीं उलट आहे.

समाजसत्तावादाचीं आधुनिक तत्त्वें प्रथम फ्रेंच एन्सायक्लोपीडियाकारांच्या लेखांत व विशेषतः रूसोच्या ग्रंथांत दिसूं लागलीं. रूसोनें १७५४ मध्यें खाजगी मालकीचें तत्त्व हें सर्व गुन्ह्यांचें मूळ कारण आहे असें म्हणून त्याचा निषेध केला. या तत्त्वाचें स्पष्ट व विस्तृत विवेचन मोरेली या फ्रेंच लेखकाच्या ''तरत्या द्वीपाचा स्फोट'' या अर्थाच्या नांवाच्या कादंबरींत व ''निसर्गनियमसूत्रें'' या अर्थाच्या नांवाच्या कादंबरींत आहे. मोरेली हा तीक्ष्ण बुद्धीचा व दूर दृष्टीचा टीकाकार होता. त्यानंतर गाब्रियल माबली, फ्रँकाँय बॉयसेल, फ्रँकाँय नोएल बेव्युफ, सेंट सायमन, चार्लस फेरियर, लुई ब्लँक, लॅमेना, प्रूढाँ इत्यादि विद्वानांनीं या विषयाला परिणत स्वरूपाप्रत नेलें.

इंग्लंडांतील रॉबर्ट ओवेन हा समाजसत्तावादाचा आद्य प्रवर्तक असून नंतर मिल्ल, हेनरी जॉर्ज, विल्यम मॉरिस, एच्. एम्. हिंडमन, फेबियन सोसायटीचे सभासद वगैरे इसमांनीं या मतांचा प्रसार केला. तथापि इंग्लंडांत समाजसत्तावाद प्रबळ झाला नाहीं. कारण लोकशाही पद्धतीचें सरकार इंग्लंडांत ब-याच दिवसांपूर्वी अस्तित्वांत येऊन स्थानिक स्वराज्याच्या संस्था म्हणजे म्युनिसिपालिटया व कौंटी कौन्सिलें यांच्या हातीं पाणीपुरवठयाच्या योजना, ट्रामवे, लाईट रेल्वे, मार्किटें, सार्वजनिक बगीचे, लायब्र-या वगैरे संस्था जाऊन सामुदायिक मालकीच्या बनलेल्या होत्या. इंग्लंडांत लिबरल पक्ष्याच्या मुत्सद्यांनीं रेल्वे, कालवे, जंगल, वगैरे मत्ता सरकारी मालकीची बनवून अप्रत्यक्षपणें समाजसत्तावाद्यांच्या मातांचा अंगिकार केला. तथापि हिंडमन, कीरहार्डी हे मजूरपक्षांतले सभासद समाजसत्तावादाचा उघड पुरस्कार करूं लागले.

जर्मनींत बेटलिंगनें फ्रेंच समाजसत्तावाद्यांच्या मतांचा प्रथम फैलाव केला. अलीकडील समाजसत्तावादाचे जनक कार्ल मार्क्स (१८१८-८३) (पहा) व फ्रेडरिक एन्बल्स (१८२०-९५) हे जर्मनच आहेत. अर्थशास्त्रीय पायावर समाजसत्तावाद उभारण्याचें श्रेय मार्क्स यास असून मार्क्सियन समाजसत्तावादी पंथ यूरोपांत अत्यंत प्रबल बनला; व त्याचा प्रसार ऑस्ट्रिया, इटली वगैरें देशांत झाला. मार्क्सपंथी लोकांचा भर आर्थिक बाबींवर विशेष होता. रशियांत ही चळवळ राजकीय व नैतिक बाजूंकडे अधिक वळली आणि तींत मुख्यतः सुखवस्तू व विद्वान घराण्यांतील पुरुष व स्त्रियांहि सामील झाल्या. रशिया हा शेतकीप्रधान देश असल्यामुळें कारखानदार विरुद्ध मजूर असा झगडा त्या देशांत नव्हता. पण झारची सत्ता अनियंत्रित व जुलमी असल्यामुळें समाजसत्तावादाचा पण निराळ्या हेतूनें पुरस्कार रशियांत होऊं लागला. या सोशिअॅलिझमला 'निहिलिझम' (सुधारणेच्छु विध्वंसक म्हणजे नव्या सुधारणा करण्याकरितां प्रथम सर्व पूर्वकालीन संस्थांचा सर्व नाश करणें) हें पुढलें स्वरूप प्राप्त झालें; परंतु हें स्वरूप राजकीय किंवा सामाजिक नसून केवळ बौद्धिक होतें. नव्या सुधारणांचें ज्ञान मिळविण्याकरितां म्हणून अनेक तरुण स्त्रीपुरुष रशियाबाहेरच्या यूरोपीय देशांत विशेषतः स्वित्झर्लंडांत विद्यार्जनाकरितां गेले व तेथें ते इतके समाजसत्तावादी बनत चालले कीं, सरकारनें त्या सर्वांनां स्वदेशीं परत येण्याचा १८३७ सालीं हुकूम केला. त्याप्रमाणें परत येऊन या तरुणांनीं खेडोखेडीं राहून शेतकरी वर्गांत शिक्षणाचा व समाजसत्तावादी तत्त्वांचा प्रसार सुरू केला. तेव्हां सरकारनें त्यांनां राजकीय गुन्हेगार ठरवून त्यांच्यापैकीं कांहीं फांशी दिले, कांहींनां बंदींत टाकलें व कांहींनां सैबेरियांत हद्दपार केलें. त्यामुळें चिडून जाऊन एका तरुण स्त्रीनें सेंटपीटर्सबर्गच्या मिलिटरी कमांडरवर गोळी झाडली. तेव्हांपासून समाजसत्तावाद्यांनीं अत्याचारीमार्गाचा अवलंब केला; आणि थोडयाशा तरुण स्त्रीपुरुषांनीं सरकारविरुद्ध मोठी दंगल माजवून दिली. त्यांतच झार दुसरा अलेक्झांडर याचा खून झाला. पण एकंदर जनता या राज्यक्रांतीला तयार नसल्यामुळें अधिकारी वर्गानें ही बंडाळीहि मोडून टाकली. तथापि आधुनिक रशियांत उद्योगधंद्यांची झपाटयानें वाढ होत होती व तिच्याबरोबर कारखान्यांतील कामकरी वर्ग ही एक नवी सामाजिक शक्ति निर्माण झाली. सोधल डेमोक्रॅटिक पार्टी १९०० च्या सुमारास गुप्तपणें स्थापन होऊन १९०६ सालीं या पार्टीनें रशियान राज्यक्रांतीच्या चळवळीचा उघडपणें पुढारीपणा पत्करला.

१९११ पूर्वी निरनिराळ्या देशांमध्यें जे समाजसत्तावादी पक्ष होते ते हळू हळू वाढतच चालले. महायुद्धामुळें तर समाजसत्तावादी पक्षाला चांगलेंच उत्तेजन मिळालें. तथापि महायुद्धामुळेंच समाजसत्तावादी पक्षामध्यें फूट होण्यालाहि प्रारंभ झाला. या फुटीचें प्रमुख कारण म्हणजे या पक्षांतील पुढा-यांची महायुद्धाकडे पहाण्याची दृष्टि होय. युध्यमान राष्ट्रांतील समाजसत्तावादी पक्षांमध्यें अंतस्थ मतभेद निर्माण झाले. त्यामुळें तट पडत चालले. विशेषतः १९१७ सालच्या रशियन बंडामुळें तर या मतभेदांनां तीव्र स्वरूप प्राप्त झालें. प्रथमतः या रशियन क्रांतीला सर्वच समाजसत्तावाद्यांनीं पाठिंबा दिला. कारण सर्वच समाजसत्तावाद्यांनीं या क्रांतीमुळें रशियांतील झारशाहीचा नायनाट झाल्याचें समाधान वाटत होतें. पण त्यानंतर १९१७ च्या नोव्हेंबरमध्यें जी दुसरी क्रांति घडून आली तीमुळें या समाजसत्तावादी पक्षांमध्यें मतभेद उत्पन्न होऊं लागले. ही क्रांति बोल्शेव्हिक पक्षानें घडवून आणिली होती व तिला सा-या बोल्शेव्हिकांचा पाठिंबा होता. पण बोल्शेव्हिकेतर समाजसत्तावादी पक्षांनां ही क्रांति बिलकुल पसंत नव्हती. पहिलया क्रांतीनें केरेन्स्कीनें जें लोकशाहीचें बीज रोंवलें होतें तें या दुस-या क्रांतीनें नष्ट केलें असें या पक्षांचे मत होतें; व त्यामुळें बोल्शेव्हिकांमध्यें व या इतर पक्षांमध्यें हळू हळू तीव्र मतभेदाला सुरवात झाली ('संघसत्तावाद' व 'रशिया' पहा.)

कांहीं देशांतील समाजसत्तावादी पक्षांतील कांहीं लोकांनीं या मोठया पक्षांत राहूनच आपले स्वतंत्र कम्यूनिस्ट पक्ष स्थापन केले तर कांहीं देशांत समाजसत्तावादी पक्षांतून फुटून स्वतंत्रपणें कम्यूनिस्ट पक्ष स्थापण्यांत आले. अशा रीतीनें १९२१ सालीं यूरोपमधील समाजसत्तावादी पक्षांमध्यें अनेक पक्षोपपक्ष अस्तित्वांत आले होते. फ्रान्समध्यें फ्रेंच सोशालिस्ट पक्षामध्यें कम्यूनिस्ट पक्षानें आपलें प्राबल्य प्रस्थापित केलें होतें व त्यामुळें सोशालिस्ट पक्षानें फ्रेंच कम्यूनिस्ट पार्टी असें नवीन नांव धारण केलें. त्यामुळें त्यांतील अल्पसंख्याक लोकांनीं आपला नवीन संघ स्थापन केला. इटलीमधील सोशालिस्ट पक्ष, इटलीनें युद्धांत अजीबात भाग घेऊं नये या मताचा होता. तथापि पुढें या पक्षामध्यें मतभेद उत्पन्न होऊन जहाल कम्यूनिस्ट लोकांनीं आपल्या अल्पसंख्याकांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. जर्मनीमध्यें महायुद्धाच्या सुरवातीपासून सोशालिस्ट पक्षांत दोन तट पडले. या सोशलिस्ट पक्षांपैकीं बहुसंख्याकांनीं युद्ध चालविण्याविषयीच्या जर्मन सरकारच्या धोरणाला सक्रिय मदत केली पण युद्धवरोधी सोशालिस्टांनीं आपली स्वतंत्र 'इंडिपेंडंट सोशालिस्ट पार्टी' स्थापन केली. रशियांतील बोल्शेव्हिकांच्या क्रांतीनंतर जर्मनीमध्यें कम्यूनिस्टांचे दोन छोटे पक्ष स्थापन झाले. १९२० सालीं इंडिपेंडंट सोशालिस्ट पक्षांतील बहुसंख्याकांनीं, मास्को इंटर नॅशनलमध्यें आपला पक्ष सामील करून जर्मन कम्यूनिस्ट पक्ष स्थापन केला. पण इंडिपेंडंट सोशालिस्ट पक्षांतील अल्पसंख्याकांनीं आपलें पूर्वीचें पक्षनाम कायम ठेवलें. अशा रीतीनें जर्मनींत १९२१ सालीं, सोशल डेमोक्रॅटस, इंडिपेंडंट सोशालिस्ट व कम्यूनिस्ट असे तीन पक्ष होते. ग्रेटब्रिटनमध्यें ब्रिटिश सोशालिस्ट पार्टीनें मास्को इंटर नॅशनलचें धोरण पसंत केलें व अशा रीतीनें कम्यूनिस्ट पक्ष स्थापन केला. इंडिपेंडंट लेबर पार्टी ही जरी ब्रिटननें महायुद्धांत भाग घेण्याच्या विरुद्ध होती तरी सर्वसामान्य लेबरपार्टीतून ती फुटून निघाली नाहीं. त्यामुळें महायुद्धोत्तर ग्रेटब्रिटनमध्यें लेबर पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी धरून) व कम्यूनिस्ट पार्टी असे दोनच पक्ष अस्तित्वांत होते.

अशा रीतीनें १९१७ च्या रशियन क्रांतीनें सर्व यूरोप मधील समाज सत्तावाद्यांच्या चळवळींत एक प्रकारें फूट पाडली होती असें दिसून येतें. जी स्थिति प्रत्येक राष्ट्रांत झाली तीच स्थिति सार्वराष्ट्रीय समाजसत्तावादी संघामध्येंहि घडून आली. महायुद्धापूर्वी जगांतील सर्व सोशालिस्ट पक्ष सेकंड इंटर नॅशनलच्या काँग्रेसमध्यें सामील झाले होते. या इंटर नॅशनलच्या काँग्रेसमध्यें सामील झाले होते. या इंटर नॅशनल तर्फे पहिली काँग्रेस १८८९ त भरली होती. या काँग्रेसमधूनच इंटर नॅशनल सोशालिस्ट ब्यूरो ही संस्था १९२० सालीं उदयास आली. पण महायुद्धामध्यें या ब्यूरोला सर्व पक्ष आपल्या ताब्यांत ठेवण्याचें काम अनेक कारणांमुळें योग्य रीतीनें करतां आलें नाहीं. १९१८ सालीं स्टॉकहोममध्यें सार्वराष्ट्रीय सोशालिस्ट परिषद भरविण्याचा प्रयत्न करण्यांत आला पण तो साधला नाहीं. तरी पण दोस्त राष्ट्रांतील सोशालिस्ट पक्षांनीं पुष्कळदां आपल्या परिषदा भरवून आपलें युद्धविषयक धोरण वेळोंवेळीं जाहीर केलें व त्याचा परिणाम अगदींच झाला नाहीं असें नाहीं. महायुद्धोत्तर पुन्हां अशा प्रकारची सभा भरविण्यांत आली व तीमध्यें पहिल्या इंटरनॅशनलच्या घटनेंत फरक करण्यांत येऊन या सुधारलेल्या सोशालिस्ट परिषदेला द्वितीयइंटरनॅशनेल असें नांव पडलें. तथापि ही जी परिषद भरली होती तिला सर्व पक्षांचे प्रतिनिधी जमलेले नसल्यामुळें ती खरीखुरी प्रातिनिधिक नव्हती त्यामुळें द्वितीय इंटरनॅशनलचे हुकूम बरेच पक्ष जुमानितनासे झाले. तसेंच या इंटरनॅशनलमधून हळू हळू ब-याच पक्षांनीं आपली अंगें काढून घेण्यास सुरवात केली. या बाहेर पडलेल्या पक्षांनीं आपलें तात्पुरतें 'सार्वराष्ट्रीय वर्किंग यूनियन' स्थापन केलें. या यूनियनला ''व्हिएन्ना इंटरनॅशनल'' असेंहि नांव असून त्यामध्यें ब्रिटिश इंडिपेंडंट लेबर पार्टी, जर्मन इंडिपेंडंट सोशालिस्ट पार्टी, दि फ्रेंच व स्विस सोशालिस्ट पार्टी इत्यादि प्रमुख होत्या.

अशा रीतीनें यूरोपमध्यें मुख्यतः कम्यूनिस्ट व कम्यूनिस्टेतर समाजसत्तावादी असे दोन प्रमुख पक्ष दिसून येतात. कम्यूनिस्ट पक्ष प्रचलित राज्यपद्धति एकजात नामशेष व्हावी असें म्हणतो तर इतर समाजसत्तावादी पक्ष प्रचलित राज्यपद्धतीचें आहे त्यापेक्षां अधिक व्यापक रीतीनें राष्ट्रीकरण झालें पाहिजे, असें प्रतिपादन करतात.

सिंडिकॅलिझम व इंडस्ट्रियल यूनियनिझमः- या दोन पक्षांशिवाय आणखीहि कांहीं पक्ष समाजसत्तावादी पक्षांत स्थापन झाले होते पण ते वरील दोन पक्षांइतके प्रबल नव्हते.

१९१० सालापासून फ्रान्स मध्यें सिंडिकॅलिझम हा उदयास येत होता तर त्याच सुमारास अमेरिकेमध्यें इंडस्ट्रियल यूनियनिझमचा उदय होत होता. या दोन मतांमध्यें बरेच भेद होते. फ्रेंच सिंडिकॅलिझम हा प्रूढांच्या अर्धवट - क्रांति कारक अशा मतांवर उभारलेला आहे. पुष्कळ लोक अनार्किझम आणि सोशलिझम हीं खरोखर परस्परविरुद्ध असतां एक समजतात याचें कारण प्रूढां हाच होय. याची मतें अनाकींची होतीं पण त्यांस तो सोशलिस्ट मतें म्हणे आणि या गोष्टीचा फ्रेंच विचारावर बराच अनिष्ट परिणाम झाला. इंडस्ट्रियल यूनियनिझमच्या तत्त्वाची उभारणी डॅनियल डे लिऑननें प्रतिपादन केलेल्या 'विस्तृत स्वरुपाची आणि विश्वासार्ह भांडवलशाही'च्या पद्धतीवर झाली आहे. तथापि या दोन्ही विरुद्ध टोंकाला असणा-या चळवळींमध्यें एक साम्य होतें व तें म्हणजे या दोन्ही चळवळींचा भर सामाजिक सत्तेच्या औद्योगिक स्वरूपावर होता. औद्योगिक क्षेत्रांतच मजूरवर्गानें क्रांति घडवून आणली पाहिजे असें या दोन्ही पक्षांचें मत होतें. या पक्षांचा यूरोप मधील समाजावर बराच परिणाम घडून आला व ग्रेटब्रिटन मध्यें या पक्षांच्या शिकवणीमधूनच 'गिल्ड सोशालिस्ट, चळवळ उदयास आली. पण या नूतन चळवळीनें समाजसत्तावादी पक्षाला त्याच्या राजकीय क्षेत्रांतील कामाबद्दल नांवे न ठेवतां, औद्योगिक क्षेत्रांत अधिक चळवळ करण्याची शिकवण देण्यास सुरवात केली; व या तिन्ही चळवळींचा उत्तरोत्तर समाजसत्तावाद्यांवर अधिकाधिक परिणाम होत चालला आहे; क्रांती करून इष्ट तो फरक घडून आणण्याऐवजी शक्य झाल्यास सनदशीर पद्धतीनें हा फरक घडवून आणण्याकडे त्याची प्रवृत्ति होत चालली आहे. प्रचलित राज्यपद्धति ही व्यंगपूर्ण आहे. सार्वत्रिक मतदानपद्धति अस्तित्वांत आली असली तरी लोकसत्ताक राज्यपद्धति स्थापन होण्याला तिची फारशी मदत होणार नाहीं; कारण जोपर्यंत धनोत्पन्न विषमता व सत्ता समाजांत कायम राहील तोंपर्यंत लोकसत्ताक राज्यपद्धति परिणामकारक होणार नाहीं अशा प्रकारचें मत सर्वच समाजसत्तावाद्यांमध्यें पसरत चाललें आहे.

या नवीन दृष्टिकोनाचा परिणाम म्हणजे समाजसत्तावादी पक्ष व व्यापारी संघ व सहकारी संघ यांच्यामध्यें वाढतें सहकार्य होय. औद्योगिक बाबतींत मजूरांनां अधिकाधिक ताबा मिळावा अशी खटपट करण्याकडे समाजसत्तावादी पक्षांची प्रवृत्ति बनत चालली आहे.

ग्रेटब्रिटनमध्यें जी सोशलिस्ट चळवळ अस्तित्वांत आहे तिचें पृथक्करण केल्यास आपल्याला वरील दृष्टिकोनाचें प्रतिबिंब आढळतें. सध्यां ग्रेटब्रिटनमध्यें जो मजुरांचा पक्ष आहे तो समाजसत्तावादी आहे, तथापि या पक्षाचे बल औद्योगिक संघांवर अवलंबून आहे. १९२० त पक्षाला १२६ औद्योगिक संघ जोडले असून त्यांची एकंदर सदस्यसंख्या ३५११००० होती. याशिवाय इंडिपेंडंट लेबर पार्टी, फेबियन सोसायटी इत्यादि संस्थाचे सभासद होते ते निराळेच. याशिवाय या पक्षाचें धोरण पसंत असणा-या व्यक्तींनांहि या पक्षाचे सभासद होतां येत असल्यानें वरील संख्या वास्तविक यांहीपेक्षां अधिक होती. या पक्षाचे ६६ प्रतिनिधी कामन्स सभेंत आहेत. या पक्षाशिवाय 'सोशालिस्ट' पक्षाच्याहि ब-याच संस्था आहेत. त्यापैकीं इंडिपेंडंट लेबर पार्टी ही प्रमुख होय. या पक्षाचे १९२० सालीं ३५००० सभासद होते व या पार्टीच्या पोट शाखा ब-याच ठिकाणीं होत्या १९२० सालीं स्थापन झालेल्या कम्यूनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेने १०००० सभासद होते. या शिवाय सोशल डेमोक्रॅटिक फेडरेशन, नांवाची एक संस्था असून तिचे सुमारें २००० सभासद आहेत. फेबियन सोसायटीचे तितकेच सभासद आहेत. ''सोशालिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन'' ही मार्क्सच्या तत्त्वाला अनुसरणारी संस्था आहे. दि सोशालिस्ट लेबर पार्टी, ही अमेरिकेंतील ''डे लेओनाईट सोशालिस्ट लेबर पार्टी'' ची शाखा आहे.

तात्पर्य समाजसत्तावादी पक्षांपैकीं बहुसंख्याकांचें मत 'समाजसत्तावाद' ही राजकीय चळवळीइतकीच औद्योगिक चळवळ आहे' इकडे झुकत चाललें आहे हें निर्विवाद आहे. या मताभोवतीं भिन्न भिन्न पक्ष एकत्र जमत चालले आहेत. उद्योगधंद्यावरील खासगी मालकी नाहींशी होऊन सामाजिक मालकी प्रस्थापित झाली पाहिजे या बद्दल सर्व सोशालिस्टांचें ऐकमत्य होत चाललें आहे.

सोशिअॅलिझमच्या शाखाः- समाजसत्तावादाचें साध्य काय या बाबतींत एकवाक्यता झाली असली तरी साध्य साधण्याकरितां साधनें कोणतीं उपयोगांत आणावीं याबद्दल बराच मतभेद आहे. हें साध्य सरकारमार्फत अस्तित्वांत आणलें पाहिजे याबद्दलहि हल्लीं सर्व समाजसत्तावाद्यांत एकमत आहे; त्यामुळें अराजकता (अनार्किझम) या चळवळींपासून समाजसत्तावादी पंथ अगदीं भिन्न आहे. पण या मुशाखेरीज बाकीच्या बाबतींत मतभेद आहेत व त्यामुळें समाजसत्तावाद्यांच्या निरनिराळ्य शाखा आहेत. त्यापैकीं एका मोठया शाखेचें मत असें आहे कीं, या पंथाचीं तत्त्वें कामकरी वर्गांच्या सुसंघटित राजकीय व आर्थिक प्रयत्नांनीं अमलांत आणावयाचीं, व त्याकरितां या वर्गाला समाजसत्तावादाची पूर्ण जाणीव करून देऊन त्या पाया (क्लास-कॉन्शन्स बेसिस) वर सर्व इमारत उभारावयाची; व त्यामुळें ही आर्थिक क्रांति उत्क्रांतीच्या मार्गानें हळूहळू सिद्ध झाली पाहिजे. या शाखेच्या दोन पोट शाखा आहेत. (१) ही जाणीव एकदम तीव्र राजकीय चळवळीनें उत्पन्न केली पाहिजे असें एक पोटशाखा म्हणते; व (२) कामकरी वर्गाच्या सुधारणेचे एकेक उपाय योजून ती जाणीव विकास पाववली पाहिजे असें दुसरी शाखा म्हणते. यांनां जर्मनींत 'रिव्हिजनिस्ट' म्हणतात. सोशिअॅलिझमच्या दुस-या मुख्य शाखेला क्लासकान्शस बेसिसच मान्य नाहीं; म्हणून यांनां सोशिअॅलिस्ट म्हणत नाहींत. तथापि या शाखेला समाजसत्तावादाचें ध्येय मान्य असून संधि-साधूपणानें (ऑपॅर्च्युनिझम) शक्य त्या राजकीय पक्षामार्फत व शक्य त्या साधनांनीं ध्येय साधण्याला ही शाखा तयार असते ग्रेटब्रिटन, युनायटेड स्टेट्स, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांत या शाखेचें बहुमत आहे. सरकार लोकशाही स्वरूपाचें बनत जाणें ही समाजसत्तावादाचीच प्रगति होय; व अनेक प्रकारचे धंदे पूर्वी खाजगी मालकीचे असत, ते हल्लीं सरकारनें किंवा म्यूनिसिपालिटीनें सुरू केले आहेत हें समाजसत्तावादाला धरूनच आहे; असें या शाखेचें मत आहे.

समाजसत्तावादाचें समर्थनः- या समाजसत्तेच्या तर्फेचें मुख्य समर्थन असें आहे कीं, हल्लीं आर्थिक स्पर्धेमुळें आणि खाजगी मालकीच्या विशेष हक्कामुळें (मोनॉपोली) वैयक्तिक स्वातंत्र्य जें अगदीं नष्ट झालें आहे तें पुन्हां प्राप्त होईल. ज्या माणसाला स्वतःची व स्वकुटुंबाची उपासमार होऊं नये म्हणून जेमतेम उदरनिर्वाह होईल येवढयाशा आर्थिक मोबदल्याकरितां पूर्वीच्या कालांतील प्रत्यक्ष गुलामापेक्षांहि अधिक कष्टानें हातकाम किंवा यंत्रावर काम करावें लागतें, व ज्या कामांत त्याच्या प्रवृत्तीप्रमाणें काम करण्याची मोकळीक नसल्यामुळें बुद्धि रमत नाहीं, त्या माणसाला तो स्वतंत्र आहे असें म्हणतां येत नाहीं. आणि वस्तुतः बहुतेक सुधारलेल्या देशांत बहुजनसमाजाची स्थिति हल्लीं या प्रकारची असते. सर्व प्रकारचे उद्योगधंदे हल्लीं लहानशा धनिक वर्गाच्या हातीं असल्यामुळें बौद्धिक श्रम करून द्रव्यार्जन करणारे लोकहि परतंत्र बनले आहेत. एखाद्या लक्षाधिशाच्या मालकीच्या वृत्तपत्राचा पगारी संपादक, धनिकांच्या देणग्यांवर चाललेल्या युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर, किंवा चर्चचा पगारी धर्मोपदेशक हे सर्व एक प्रकारचे गुलामच होत. हल्लीच्या अर्थशास्त्रीय स्पर्धेच्या पध्दतीमुळें आर्थिक सत्ता कांहीं थोडया धूर्त व कर्तृत्ववान व बहुधां सदसद्विचारहीन (अनस्कूपलस) इसमांच्या हातीं गेल्याशिवाय राहत नाहीं; आणि पैशाकडे पैसा जातो या म्हणीप्रमाणें हे थोडके इसम अत्यंत धनाढय बनून बाकीची जनता त्याच्या तंत्राखालीं जाऊन परतंत्र बनते. म्हणून सोशिअॅलिस्ट असें आग्रहानें प्रतिपादितात कीं, ज्याप्रमाणें सरकार, कायदा व पोलिस यांच्या योगें शारीरिकदृष्टया दुर्बल असलेल्या व्यक्तीचें प्रबळांच्या जुलुमापासून रक्षण होतें. आणि शारीरिक स्पर्धेऐवजीं उच्च प्रकारच्या स्पर्धेला संधि मिळते; त्याचप्रमाणें आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्यांचें धनिकांच्या जुलुमापासून रक्षण करून आर्थिक स्पर्धेपेक्षां उच्च स्पर्धेला वांव देणें हेंहि सरकारचें कर्तव्य आहे. अशा प्रकारचें संरक्षण देणारे कायदे पूर्वी अथेन्स शहरांत पेरीक्लिसनें केल्यामुळें आर्थिक स्पर्धेंतून मुक्त झालेल्या अथीनियन लोकांमध्यें कला, सौंदर्य, वाङ्मय, तत्त्वज्ञान, वगैरे कार्यक्षेत्रांत इतक्या उत्कृष्टोत्कृष्ट गुणवान व्यक्ती निर्माण झाल्या कीं, तशा पृथ्वीच्या पाठीवर इतरत्र कोठेंहि उत्पन्न झाल्या नाहींत. सुधारलेल्या जगांत युनायटेडस्टेटसमध्यें सोशिअॅलिझमची वाढ सर्वांहून कमी आहे, व त्याच देशांत लहानशा धनिक वर्गाची सत्ता इतर सर्व वर्गांवर सर्वांहून अधिक आहे ही गोष्ट समाजसत्तावादाविरुद्ध मांडली जाते. तसेंच सामाजिक मानसशास्त्रीय आक्षेपहि उत्पन्न झाले आहेत. समाजसत्ताक पद्धतीमुळें केवळ उदारनिर्वाहार्य सर्व शक्ती, वेंचण्याची आवश्यकता दूर होऊन प्रत्येक इसमाला स्वतंत्रपणें विचार करण्यास, स्वतंत्रपणें आयुष्य घालविण्यास, आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणें कामें करण्यास, मोकळीक मिळेल, हें समाजसत्तावादाचें सर्वांत जोरदार समर्थन होय, पण आर्थिक स्पर्धा नष्ट झाल्यास माणसाला झटून काम करण्यास लावणारा अंकूश नाहींसा होऊन मनुष्य ऐदी बनेल, असा एक आक्षेप वरील समर्थनाविरुद्ध आहे. पण ह्या आक्षेपांस उत्तरें आहेतच. युनाटेड स्टेट्समध्यें आर्थिक स्पर्धा फार आहे हें जितकें खरें आहे तितकेंच हें खरें आहे कीं, तो देश इतर सर्व देशांपेक्षां आर्थिक दृष्टया अधिक उत्पादक, संशोधक, आणि प्रगत आहे व त्याचें श्रेय आर्थिक स्पर्धेला आहे. पण समाजसत्तावादी लोक युनायटेड स्टेटसच्या या प्रगतीचें श्रेय आर्थिक स्पर्धेला न देतां नव्या खंढांतील नव्या वसाहतवाल्यांनां मिळालेल्या मुबलक नैसर्गिक साधनसामुग्रीला देतात. जर्मनींतहि औद्योगिक व आर्थिक वाढ युनैटेड स्टेट्सच्या खालोखाल झाली असून त्याचें कारण समाजसत्ताक पद्धतीचे सरकारनें केलेले कायदे हें आहे असें सांगतात. कित्येक देशांत खाजगी व सार्वजनिक दोन्ही मालकी पद्धतीच्या उद्योगधंद्यांचा अनुभव घेतला गेला आहे. रेल्वे, विजेचा पुरवठा वगैरे धंदे खाजगी मालकीपेक्षां सरकारी मालकीमुळें अधिक फायदेशीर अनेक देशांत ठरले आहेत. खाजगी शाळापेक्षां सार्वजनिक मालकीच्या शिक्षणसंस्थाच सर्व बाबतींत श्रेष्ठ ठरल्या आहेत.

आर्थिक स्पर्धेमुळेंच मोठमोठे शोध लागले आहेत हें म्हणणेंहि समाजसत्तावाद्यांनां मान्य नाहीं. मोठमोठे संशोधक द्रव्याच्या आशेपेक्षां मानाच्या आशेमुळें काम करीत असतात. समाजसत्तावादी लोक मुळींच स्पर्धा नसावी असें म्हणत नाहीं. त्यांचें म्हणणें असें कीं, द्रव्यार्जनाकरितां स्पर्धा नसावी तर सन्मानार्जनाकरितां असावी. ज्याप्रमाणें रणांगणावर पगारी सैनिकहि बहुमानाच्या लालसेनें अलौकिक शौर्याचीं कृत्यें करतात त्याप्रमाणें बौद्धिक क्षेत्रांतहि वेतनाची फिकीर दूर झाली तरी अलौकिक बुद्धीची कार्ये लोक सन्मानाच्या इच्छेनें करतील.

सोधिअॅलिझमच्या समर्थनार्थ दुसरा महत्त्वाचा मुद्दा सरकारी कारभाराची शुद्धता हा आहे. लोकसत्ताक राज्यांतहि निवडणुकीमध्यें धनिक लोकच यशस्वी होऊन सत्ताधीश बनतात व धनिक वर्गाला हितकर होईल असा राज्यकारभार लांचलुचपतीच्या जोरावर चालवितात. समाजसत्ताक पद्धतींत धनिक वर्गाच्या हातांतील आर्थिक सत्ता काढून घेतल्यानें लांचलुचपतीचे प्रकार बंद होऊन राज्यकारभार प्रामाणिक व सद्वर्तनी लोकांच्या हातीं जाईल. शहर म्युनिसिपालटीच्या कारभारांतहि हा अनुभव येतो. बर्मिंगहॅम शहराचा कारभार अत्यंत लांचलुचपतीचा असे, पण निरनिराळे कारखाने म्युनिसिपालिटांच्या मालकीचे होतांच तिचा कारभार उत्तम बनला.

सर्व कारखाने सरकारी मालकीचे बनविणें म्हणजे एक प्रकारें सर्व सत्ता नोकरशाहीच्या हातीं देऊन कारभारी वर्गाला तिचे गुलाम बनविणें आहे असा आक्षेप सोशिअॅलिझमविरुद्ध नेहमीं घेतात. पण सोशिअॅलिझम म्हणजे सर्व सत्ता नोकरशाहीच्या हातीं देणें असा नाहीं. समाजसत्तावादाचा विधायक कार्यक्रम ठरलेला आहे. पोस्टेज व वाहतुक स्वस्त करणें मजूरी वाढविणें, कामक-यांनां राहावयास घरें चांगलीं बांधून देणें वगैरे गोष्टी सरकार करणार. त्यांत नोकरशाहीच्या लहरीवर कांहीच अवलंबून नाहीं.

मनुष्यस्वभावाची सुधारणा समाजसत्ताक पद्धतीनें घडून येते हा या पद्धतीच्या समर्थनांतला तिसरा मुद्दा आहे. आर्थिक स्पर्धेला वाव दिल्यानें मनुष्याचा स्वभाव तद्रूप म्हणजे धूर्त व भौतिकविषयासक्त बनतो. आज ही स्थिति आहे. केवळ व्यापारी दृष्टीमुळें खरी कला आजकाल नष्ट होत आहे अशी कारागिरांची ओरड आहे. जनता केवळ जडवादी बनत आहे अशी धर्मोपदेशकांची तक्रार आहे; आणि मध्यम वर्ग भौतिक ऐश्वर्याच्या पाठीस लागलेला असून नैतिक बंधनें शिथिल होत आहेत अशीहि ओरड यूरोपांत आहे. औद्योगिक स्पर्धेचा हा सर्व स्वाभाविक परिणाम आहे. पूर्वी एकेकालीं मानवामानवांतील स्पर्धा मुख्यतः शारीरिक होतो. त्या वेळीं दांडगे व राक्षसी शरीरसामर्थ्य असलेले इसम निर्माण होत असत. नंतर वरील स्पर्धेला थोडीशी बौद्धिक स्पर्धेची जोड मिळाली, व त्यावेळीं अलेक्झांडर, इंग्लंडचा सिंहहृदयी रिचर्ड व नेपोलियन हीं माणसें निपजली. नंतर व्यापारी युग सुरू होऊन बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ खाजगी व्यक्तींत सुरू झाली. या युगांत गुल्ड व बॅरन रॉथचाइल्ड फोर्ड यांच्यासारखे व्यापारी निर्माण झाले. आतां समाजसत्तावाद पुढें आला असून त्याचें म्हणणें असें आहे कीं, सर्वांनीं सहकार्य करून सार्वजनिक हित सर्वांहून अधिक कोण साधतो अशी स्पर्धा करावी. या परिस्थितींत मनुष्याचा स्वभाव नैतिक दृष्टया उच्च प्रकरचा बनेल. जर्मनीमध्यें पुष्कळशा गोष्टी सरकार करितें पण त्याच देशांत अत्यंत निष्णात असे सार्वजनिक कार्यकर्ते इसम निर्माण झाले आहेत.

आ क्षे प.- असें असतांहि समाजसत्तावादी लोक भौतिक सुखवादी, अधार्मिक, अनिर्बंध, प्रणयाचे पुरस्कर्ते, खाजगी मालकी हक्काचे विध्वंसक, इत्यादि प्रकारचे अनिष्ट आहेत अशी हांकाटी वरचेवर ऐकूं येते. इंग्लंडांतील फेबियन सोसायटीनें असें जाहीर केलें आहे की, सर्व जमीनी व सर्व भांडवल चालकांनां कांहीं एक मोबदला न देतां सरकारी मालकीचें करावें, राष्ट्रीय कर्ज सोशिआलिस्ट सरकारनें मानूं नये, इत्यादि; तसेंच जर्मनींतील बेबेल नामक लेखक आपल्या ''स्त्री'' या पुस्तकांत म्णतो कीं हल्लीं विवाहाला एक प्रकारें मालमत्तेचें स्वरूप आहे; पण खाजगी मालकी हक्काचें तत्त्वच समाजसत्ताक पद्धतींत मान्य नसल्यामुळें विवाह ही संस्थाच अस्तित्वांत राहण्याचें कारण नाहीं. तरुण स्त्रीपुरुषांनीं आपल्या स्वाभाविक इच्छा व गरजा स्वेच्छेनुसार भागावाव्या, मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी जन्मदात्यांवर पडूं नये; तर ज्याप्रमाणें शिक्षणाची त्याप्रमाणेंच संगोपनाचीहि जबाबदारी सरकारवर असावी. अशा सामाजिक परिस्थितींत विवाह व वेश्यावृत्ति या दोन्ही संस्था असणार नाहींत, इत्यादि; असले उतारे अनेक समाजसत्तावादी लेखकांच्या ग्रंथांतून दाखवितां येतात. या आक्षेपाला समाजसत्तावाद्यांचें उत्तर असें आहे कीं, विवाह, अपत्योत्पादन, वगैरेंसारख्या खाजगी गोष्टींशीं समाजसत्तावादाचा कांहीं संबंध नाहीं. तथापि कुटुंब, विवाह वगैरेंबद्दल विचार केल्यास पुष्कळशीं कौटुंबिक भांडणें व घटस्फोट यांच्या मूळांशी पैसाच असतो. हें कलहाचें कारण समाजसत्ताक पद्धतीनें नष्ट होईल. कारण समाजसत्ताक राज्यांत सर्वांनां सारखी मिळकत किंवा त्यांच्या गरजानुसार द्रव्य मिळेल. हल्लीं आर्थिक अडचणींमुळें पुष्कळ कुटुंबें नाश पावतात. पण समाजसत्ताक पद्धतींत प्रत्येक पुरुषाला व प्रत्येक स्त्रीला घर करून राहतां येईल अशी योजना करण्यांत येईल. कोणत्याहि विवाहाच्या मार्गांत सांपत्तिक अडचणीचा प्रश्न येणार नाहीं; व त्यामुळें सर्व विवाहसंबंध प्रेमाच्या पायावर उभारले जातील.

प्रत्येकाच्या संगोपनाची जबाबदारी सरकारनें पत्करल्यास हल्लीं अपत्योत्पादनावर जें एक मोठें आर्थिक दडपण पडतें तें दूर होऊन लोकसंख्या बेसुमार वाढेल, असा एक आक्षेप समाजसत्ताक पद्धतीवर घेतात. त्याला उत्तर असें आहे कीं, समाजसत्ताक पद्धति हें स्वतःच मोठें दडपण प्रत्येक स्त्रीपुरुषाच्या मनावर राहील, कारण अशा समाजांत फाजील प्रजोत्पादन करणें म्हणजे आपल्या समाजबंधूंनां अधिक काम करावयास लावून त्यांचें सुख कमी करावयाचें पाप माथीं घेणें आहे. समाजसत्ताक पद्धतींत अपत्यपोषणाची जबाबदारी सरकारवर म्हणजे पर्यायानें समाजावर पडणार असल्यामुळें बहुप्रजाजनक दांपत्याला त्याचा प्रत्येक शेजारी दूषण दिल्याशिवाय राहणार नाहीं; आणि तेवढयानें न भागल्यास अनिर्बंध प्रजोत्पादनाविरुद्ध सरकार कायदेहि करील. तात्पर्य समाजसत्ताक पद्धतींत लोकसंख्येची फाजील वाढ होण्याची तर भीति नाहीं, पण उलट हल्लींच्या समाजव्यवस्थेपेक्षां समाजसत्ताक व्यवस्थेंतच लोकसंख्येच्या बेसुमार वाढीला अगदी योग्य आळा बसेल असें समर्थन करण्यांत येतें.

आणखी एक आक्षेप असा आहे कीं, जीविशास्त्रांतील 'योग्यतमातिजीवना' च्या म्हणजे अधिक योग्य जीवांनींच फक्त जगावें, दुर्बलांनीं मरून जावें हें तत्त्व प्रत्येक प्राणिजातीची सुधारणा होण्यास जरूर आहे; पण समाजसत्तावाद सर्वांच्या पोषणाची सोय करणार, म्हणजे दुर्बलानांहि जगविणार, व त्यामुळें मानवजातीचा -हास होत जाईल. या आक्षेपाचें निरसन असें करण्यांत येतें कीं, समाजसत्ताक पद्धतींतहि जगण्याची लायकी नालायकी ठरविली जाईल; पण ती सांपत्तिक दृष्टीनें न ठरवितां सार्वजनिक काम करण्याच्या शक्तीवर अवलंबून राहील. हल्लीं जीविशास्त्रदृष्टया जगण्यास किंवा अपत्योत्पादनास नालायक असलेले इसमहि गर्भश्रीमंतीमुळें जगूं शकतात; आणि शारीरिक व बौद्धिक दृष्टया खरे लायक इसम गरीबीमुळें अकाली मरण पावतात. एतावता समाजसत्ताक पद्धतींतच जीविशास्त्रानुसार मानवीजातीची खरी उच्च प्रगति होण्यास पूर्ण वाव मिळेल. उद्योगधंदे चालविण्याची हल्लींची पद्धतीच निरंतर कायम टिकेल असें म्हणणें मूर्खपणाचें होईल; तथापि त्या पद्धतींतील मुख्य तत्त्वें बराच दीर्घकाळ टिकतील असें म्हणण्यास हरकत नाहीं. सांप्रतच्या भांडवलपद्धतीचा जोर कमी होत असून ती लवकरच नष्ट होईल अशी सोशिआलिस्ट लोकांची समजूत आहे; ती भ्रामक असून वास्तविक तिचा जोर अगदीं कायम आहे. उद्योगधंदा चालविण्याचें मूळ तत्त्व माल व मजूरकाम यांची अदलाबदल हें असून त्यांत लबाडीला काहीं जागा असली तरी एकंदरीनें हें शुद्ध नैतिक तत्त्व आहे. या पद्धतीला कायदेशीर दरोडेखोरी व नफेबाजी म्हणणें चूक आहे. शिवाय भांडवलपद्धतीचा पाया स्वार्थ हा आहे. प्रत्येक मनुष्य स्वभावतःच स्वतःकरतां व स्वकुटुंबाकरितां राबत असतो; समाजहित हा हेतु दुय्यम असतो. स्वार्थ हा मनुष्याला कम करण्यास प्रवृत्त करणारा अत्यंत प्रबळ हेतु आहे, आणि स्वार्थसाधूपणानें काम करतांना अप्रत्यक्षपणें मनुष्य समाजहित साधीत असतो. शिवाय भांडवलपद्धतींत ख-या कर्तबगार माणसांनां स्वतःची अक्कलहुषारी दाखविण्यास भरपूर वाव मिळतो. स्वतःला सुस्थिति प्राप्त करून घेतां येते. तसेंच साध्या मजूरवर्गाला पूर्वीच्या मानानें काम करून पैसा मिळविण्यास अधिकाधिक संधि मिळत आहे. आणि औद्योगिक स्पर्धेमुळें खरे लायक इसम पुढें येऊन ऊर्जितावस्थेस चढतात आणि सामान्य कामकरी सुद्धां बडया भांडवलवाल्यांच्या देशांत इतर देशांपेक्षां अधिक सुस्थितींत आहेत. भांडवलवाले व मजूर या दोघांनांहि नफा व मजुरी या रूपानें ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणें आणि गणिती हिशोबानें फायदा मिळतो. सांप्रतची पद्धति ब-याच वर्षांच्या अनुभवानें पाश्चात्य देशांत चांगल्या पायावर प्रस्थापित झाली असून ती रशिया, जपान व चीन या देशांत प्रस्थापित होण्याचीं चिन्हें दिसत आहेत. अशी एकंदर स्थिति असल्यामुळें ही पद्धति मोडूं पाहाणारांवर, नवी समाजसत्ताकपद्धति खात्रीनें अधिक हिकत होईल, हें सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.

सर्व जग आज समाजसत्तावादाला तयार नाही व पुढील ब-याच वर्षांत तयार होईल असेंहि वाटत नाहीं. ज्या कामकरी वर्गावर समाजसत्तावाद्यांची मुख्य भिस्त आहे तो सर्व वर्गहि समाजसत्ताकपद्धतीला अद्याप अनुकूल बनलेला नाहीं. खुद्द जर्मनीतसुद्धा राजसत्ताकपद्धति, लष्करशाही आणि भांडवलपद्धतींतले कांहीं विशिष्ट दोष याविरुद्ध तक्रार आहे, पण लोकस्वामित्वाला ('डेमोक्रॅटिक कलेक्टिव्हिझयम' ला) थोडक्या सोशिअॅलिस्टाखेरीज इतर कोणी तयार नाहींत, सरकारी मालकी व व्यवस्था यांचे प्रयोग यशस्वी झालेले नाहींत; उलट खुद्द जर्मनींत सुद्धा सरकारी कामगारच चलाखी, कर्तृत्त्व व प्रगति या बाबतींत कम अस्सल प्रतीचे व ठराविक मार्गानें जाणारे ठरले आहेत. सरकारी मालकीमुळें खासगी, मालकीपेक्षां उत्पादनाला खर्च अधिक येईल, त्यामुळें बेल्जम सारख्या देशांचा परदेशाबरोबरचा व्यापार इंग्लंड, जर्मनी युनाटेड स्टेटस हे देश बळकावतील. आणि मोठाले यूरोपीय देशहि समाजसत्ताकपद्धती झाल्यास जपान व चीन देशाशीं व्यापारी चढाओढींत टिकणार नाहींत. शिवाय यूरोपांतील कित्येक भांडवलवाल्या देशांत धान्याचा व कच्च्या मालाचा भरपूर पुरवठा नसल्यामुळें समाजसत्तावादी लोक 'राष्ट्रीय कलेक्टिव्हिझम' ऐवजीं 'आंतरराष्ट्रीय कलेक्टिव्हिझम' पाहिजे असें म्हणूं लागले आहेत. पण ही गोष्ट केवळ अशक्य कोटींतील आहे. कारण     गो-या लोकांचें आणि आशियाटिक व आफ्रिकन लोकांचें सहकार्य होणें ही गोष्ट व्यवहार्य नाहीं.

एखाद्या देशांत समाजसत्ताकपद्धति सुरू झाल्यावर जर उत्पादन कमीं होऊं लागलें जर मजूरवर्ग मजूरी कमी मिळणार म्हणून रागावेल; आणि उत्पादन जास्त झालें तरी नफ्याची विभागणी करण्याबाबत भांडणतंटे होतील. नफ्याची वांटणी माणसाच्या कर्तृत्वानुसार करणें किंवा गरजानुसार करणें हा प्रश्न उत्पन्न होईल. कर्तृत्वाप्रमाणें करूं म्हटल्यास कर्तृत्वहीन अशा सामान्य दर्जाचेच इसम फार असल्यामुळें ख-या कर्तृत्ववान पण अल्प वर्गाला मोठा नफा घेऊं देणार नाहींत. गरजांप्रमाणें ठरवावयाचें म्हटल्यास अत्यंत कर्तृत्ववानांच्या गरजा हेच प्रमाण मानलें पाहिजे. सर्वांनां फायदा सारखा वांटावा असें ठरविण्यास विशेष कर्तृत्व दाखविण्यास उत्तेजन राहणार नाहीं. या अडचणींनां सोशिअॅलिस्ट विद्वान खात्री पडण्यासारखें उत्तर देऊं शकत नाहींत. शिवाय समाजसत्ताक पद्धतींत ज्याच्या त्याच्या योग्यतेनुरूप कामाची वांटणी आणि लायकीप्रमाणें बढती करण्याबाबत अनेक तंटे उद्भवतील कांहीं कंटाळवाणी कामें केल्याशिवाय भागत नाहीं; पण ती करण्यास कोणी तयार होणार नाहीं. कामाचे तास कमी असावे असें सर्वांनां वाटणार; व त्यामुळें उत्पादनाचें प्रमाण कमी होईल. पक्कया मालाची जलद निपज किंवा सुधारणा करण्यास कोणी झटणार नाहीं. त्यामुळें सर्व उत्पादन हलक्या दर्जाचें होईल. तात्पर्य उद्योगधंद्यांत श्रेष्ठत्व राखण्यास हल्लींची स्पर्धापद्धतीच योग्य आहे. कारखाने सरकारी मालकीचे करण्याचे व कोआपरेटिव्ह सोसायटयांचे प्रयोग हल्लीं चालू आहेत. ते यशस्वी ठरले तर हळू हळू समाजसत्ताकपद्धती आपोआपच अमलांत येईल.

(संदर्भग्रंथ - किरकुप-हिस्टरी ऑफ सोशालिझम १९१३, सोंबर्ट - सोशालिझम अँड सोशल भूव्हसेंट; एन्तर - मॉडर्न सोशालिझम; वीर - हिस्टरी ऑफ ब्रिटिश सोशालिझम; ग्लेसियर - दि मीनिंग ऑफ सोशालिझम; रॅम्से मॅकडोनल्ड - सोशालिझम क्रिटिकल अॅड कन्स्ट्रक्टिव्ह; बर्ट्रड रसेल - रोड्स टु फ्रीड; इंग्लंड - एव्होल्यूशनरी सोशालिझम)