विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

सती- संस्कृत सत् या शब्दाचें सती हें स्त्रीलिंगी रूप आहे. सती म्हणजे मृत पतीच्या शवाबरोबर स्वतःला जिवंतपणीं दहन करून घेणारी अणि म्हणून धर्मानें पवित्र आणि सद्रुणी मानलेली स्त्री. विधवांनीं स्वतः जाळून घेण्याची चाल ब्रिटिश हिदुस्थानांत १८३९ सालीं बेकायदा ठरविण्यांत आली. इंडियन पिनल कोडामध्यें असें कलम आहे कीं, जे कोणी माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करील आणि आत्महत्त्येचा गुन्हा करण्याकरितां एकादें कृत्य करील त्याला एक वर्षपर्यंत कैदेची शिक्षा होईल. तसेंच जें कोणी माणूस सती जाण्याच्या कृत्याला उत्तेजन देईल किंवा त्याचा गौरव करील त्याला पीनल कोडाप्रमाणें आत्महत्त्येच्या गुन्ह्याचा साहाय्यक मानलें जाईल.

वैदिक काळची सतीची कल्पना काय होती ते तिस-या विभागांत (पृ. ३०३) स्पष्ट केलें आहे. श्रॉडरचें मत असें आहे कीं, नव-याबरोबर बायकोनें मरावें अशी इंडो जर्मानिक समाजामध्यें चाल होती. या चालीचें कारण जिवंतपणीं पुरुषाला प्रिय असलेल्या वस्तू मेल्यानंतरहि त्याला मिळाव्या हें आहे. अथर्ववेदामध्यें असें सांगितलें आहे कीं, नवरा मृत पावल्यावर बायकोनें सती जाणें हें प्राचीन काळीं तिचें कर्तव्य मानलें जात असे. तथापि ऋग्वेदाप्रमाणें अथर्ववेदांतहि असें वर्णन आहे कीं, मृतपतीच्या चितेवर स्वतःस जाळून घेण्यास सिद्ध झालेल्या विधवेला तिचा नवा नवरा चित्तेवरून खालीं उतरवून घेऊन जातो. ॠग्वेदांत व अथर्ववेदामध्यें पुढील मजकूर आहे. ''हे स्त्रिये, ऊठ, आणि मानवी प्राण्यांच्या जगामध्यें चल. तूं या मृत झालेल्या मनुष्याजवळ पडली आहेस. मी जो तुला दुसरा नवरा तुझें पाणिग्रहण करीत आहे; त्या माझ्याबरोबर चल. आता आपण नवरा व बायको हें नातें जोडलें आहे.'' (उदीर्व नार्यभि जीवलोकं गतासुमेतमुप शेष एहि। हस्तग्राभस्य दधिषोस्तवेदं पत्युर्जनित्वमभि संबभूथा। ॠग्वे १०.१८.८; अथर्व १८.३.२.) वरील उता-यावरून असें दिसतें कीं, वैदिक काळापूर्वी रूढ असलेली सती जाण्याची चाल वैदिक काळामध्यें बंद पडून पहिल्या नव-याच्या मृत्यूनंतर विधवेनें पुनर्विवाह करण्याची चाल सुरू झाली होती. तथापि वैदिक काळांतील ही पुनर्विवाहाची चाल पुढें ब्राह्मण वर्गाचें महत्त्व वाढल्यानंतर पुन्हा बंद करण्यांत आली, आणि सतीची चाल पुन्हां रूढ करण्याचें कारण विधवेची इस्टेट मिळावी हें होतें, असें आर. डब्ल्यू. फ्रेझर म्हणतो. सतीची चाल पुन्हां सुरू करण्याकरितां धर्मशास्त्राचा आधार मिळावा म्हणून ॠग्वेदांतील एतद्विषयक ॠचेमध्यें 'अग्रे' या शब्दाच्या ऐवजीं 'अग्रे' असा फरक करण्यांत आला (इमा नारीरविधवा: सुपत्नीरांजनेनसर्पिषा संविशन्तु। अनश्रवोनमीवा: सुरत्ना आराहन्तु जनयो योनिमग्रे॥ १०. १८, ७ व त्यामुळें 'चित्तेपासून पुढें चल' या अर्थाऐवजीं 'अग्नीमध्यें चल' असा अर्थ झाला. याचा परिणाम असा झाला कीं, जेथें जेथें ब्राह्मण वर्गाचें वर्चस्व प्रस्थापित झालें तेथें तेथें गंगेच्या कांठच्या प्रदेशांत म्हणजे बंगाल, अयोध्या आणि राजपुताना या प्रांतांमध्यें सतीची चाल सहाव्या शतकापासून वाढत गेली. परंतु पंजाबाच्या पलीकडील प्रदेशांत ही चाल फारशी प्रचारांत नव्हती आणि दक्षिण हिंदुस्थानांतील बहुतेक भागांत या चालीला पूर्ण मनाई होती.