विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
शेले, पर्सी बायशे (१७९२-१८२२)- एक प्रसिद्ध इंग्लिंश कवी. हा लहानपणापासूनच विकारवश, व स्वंतत्र मनोवृत्तीचा असल्याकारणानें त्याच्या हातून कोणताहि शिक्षणक्रम पूर्ण तडीस गेला नाहीं. तथापि रसायनशास्त्र, काव्य व तत्वज्ञान याची त्याला फार आवड असे, कॉलेजमध्यें असतांना 'दि नेसेसिटी ऑफ एथीइझम' हें पुस्तक लिहिल्यामुळें व त्याचें कर्तृत्व नाकारल्यामुळें त्याला कॉलेजांतून हांकून लावण्यांत आलें. त्यानंतरचें आयुष्यहि त्यानें मन मानेल तेथें घालवीलें. घरचें बेताबाताचें उत्पन्न त्याच्या वांटयाला आल्यामुळें पोटापाण्याची त्याच्या मागें विशेष दगदग नव्हती. १८१३ सालीं त्यानें 'क्वीन मॅब' ही कविता प्रसिद्ध केली. ८१५ सालीं त्याचें ' ऍलॅस्टॉर' किंवा 'दि स्पिरिट ऑफ सॉळिटयूड' हे काव्य प्रसिद्ध झालें. १८१८ सालीं त्यानें 'रिव्होल्ट ऑफ इस्लाम' ही कविता लिहिली. ग्रीसनें जीं स्वातंत्र्यार्थ खटपट चालविली होती तिचा शेलेवर अतिशय परिणाम झाला व त्याच्या बरांत त्यानें 'हेलास' हें उत्कृष्ट नाटक लिहिलें. याशिवाय 'रोझॅलिंड ऍंड हेलन' (१८१८), 'जूलियन ऍंड मॅडॅलो' (१८१८), 'सेन्सी', 'ऑमीथियस अनबाउंड' (१८१९) 'दि विच ऑफ ऍटलास' (१८२१) 'ऍडोनेस' (१८२१) 'दि ट्रॅम्स ऑफ लाइफ' इत्यादि त्याची प्रमुख काव्यें प्रसिद्ध आहेत. फ्रान्समधील राज्यक्रांतीपासून तों आतांपार्यंतच्या काळांत गोएटे वगळल्यास शेले हाच सर्वश्रेष्ठ कवि ठरतो. परमध्येयासक्ति, भावगीतलेखन, व परिणामकारक भाषाशैली या तिन्हींमध्यें तो सर्व कवींनां मागें टाकतो असें म्हटलें तरी चालेल. त्याची कविता उदात्त विचार व भाषासौंदर्य या दोन्हीं गुणांनीं मंडित असते. तथापि कांहीं वेळां असंदिग्ध भाषा, अस्फुटकल्पना यांचीहि त्यांत भेसळ झालेली आढळते. वयाच्या तिसाव्या वर्षी तो मरण पावला.