विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शाहू थोरला- हा संभाजी वन येसूबाई यांचा पुत्र. जन्म १६८० चा दिसेंबर; मूळ नांव शिवाजी, स्वतःच्या मुद्रेंतहि हा आपणाला शिवाजींच म्हणवितो; औरंगजेबानें शाहू नांव ठेविलें अशी दंतकथा आहे. रायगड औरंगजेबाच्या हातीं लागला (१६९०) तेव्हां त्यांत शाहू व येसूबाई हीं त्याच्या ताब्यांत आलीं. यापुढें १७ वर्षें शाहूला मुसुलमानांच्या नजरकैदेंत रहावें लागलें. औरंगजेबानें शाहूला जिवंत टेवलें तें मराठयांत दुफळी पाडण्यासाठींच ठेवलें आणि तसा प्रयत्न त्यानें स्वतःच्या शेंवटच्या काळांत केलाहि. औरंगजेबाच्या एका मुलीनें शाहू व येसूबाई यांची अखेरपर्यंत उत्तम बरदास्त ठेविली होती. उद्धव योगदेव राजाज्ञा, जेत्याजी केसरकर यांनीं शाहूस लहानपणीं शिक्षण दिलें. राजारामानें त्याच्या सुटकेचा प्रयत्न दोन तीनदां केला पण तो निष्फळ झाला. जनान्यांत कोंडल्यामुळें शाहूचा स्वभाव थंड, शांत, आरामप्रिय, मुसुलमानी पातशाहीविषयीं थोडासा आदर धरणारा असा बनला. बादशाहीचा प्रत्यक्ष पाडाव करण्यास तो अनुकूल नसल्यानें असले आलेले एक दोन प्रसंग पेशव्यांनां सोडून द्यावें लागले. मात्र राजकारणाचें शिक्षण त्याला बरेंच मिळालें.
शाहूचें लग्न औरंगजेबानें १६९९ च्या सुमारास थाटानें करविलें व ५ परगणे जहागीर दिले. या वेळच्या त्याच्या दोन बायका अंबिकाबाई व सावित्रीबाई या होत; या प्रसंगींच विरुबाई नांवाची दासी शाहूस मिळाली. तिच्यावर त्याचा अखेरपर्यंत लोभ होता. औरंगजेब मेल्यावर अजीमशहा उत्तरेकडे जात असतां, त्याच्याकडून शाहू होता. तेव्हां मराठयांत भेद पडावा व आपल्या पिच्छावर असलेले मराठे मागें रहावेत यासाठीं, आपला अंकित असें शाहूकडून कबूल करवून, अजीमशहानें त्याला सोडलें (एप्रिल १७०७), प्रसंगवेळ जाणून शाहूनें ही अट कबूल केली. या वेळीं शिवाजीचा स्वराज्य म्हणून ठरविलेला प्रांत व गुजराथ, कर्नाटक, गोंडवण वगैरे थोडासा जास्त मुलूखहि त्यानें मिळविला. मार्गांत येतांनां हळू हळू त्यानें फौज वाढविली. शिवाजीबद्दल आदर असल्यानं त्याला सर्व लोकांनीं हरप्रकारें मदत केली. इकडे पूर्वीच ताराबाईनें आपल्या मुलाची मुंज करून व शाहूचा हक्क बुडवून धाकटया शिवाजीला गादीवर बसविलें होतें. प्रथम शाहू हा तोतया आहे, असें तिनें उठविलें. व मग त्याच्यावर परशुरामपंत प्रतिनिधि व धनाजी जाधव यांस बर्याच सैन्यानिशीं धाडलें. भीमथडींतील खेडकडूस येथें धनाजीची व शाहूची गांठ पडली. परंतु शाहू हा तोतया नाहीं अशी खात्री झाल्यावर धनाजी शाहूस एकदम मिळाला. प्रतिनिधीनें लढाई केली पण त्याचा मोड झाला. खेडहून निघून एकामागून एक किलले घेत शाहूनें सातार्याचा किल्ला अखेरीस घेतला व पुढें थोडयाच महिन्यांनीं स्वतःस राज्याभिषेक करविला (१७०८ जानेवारी). या वेळीं (१७०७-१०) शाहूची सत्ता सातारा किल्ल्याभोंवतीं ५०२५ मैलांपलीकडे नव्हती. दोन्ही राण्या दिल्लीस ओलीस राहिल्यानें शाहूनें या सुमारास आणखीं दोन लग्नें केलीं. या नवीन राण्यांचीं नांवें सगुणाबाई व सकवारबाई होतीं.
धनाजी जाधव डोईजड झाल्यानें शाहूनें बाळाजी विश्वनाथास हाताशीं धरलें. शाहूला खेड येथें मिळणार्या मंडळींत बाळाजी असून शाहूला गादीवर बसविण्यांतहि त्याचें अंग बरेंच होतें. त्यामुळें संधि येतांच शाहूनें त्याला पेशवाई दिली. पुढें शंकराजी मल्हार यानें बादशहा व शाहु यांच्यामध्यें एक तह घडवून आणला. त्यामुळें शिवाजीचा स्वराज्याचा प्रांत, खेरीज खानदेश, गोंडवण, वर्हाड, हैद्राबाद, कर्नाटक हे प्रांतहि शाहूस मिळाले आणि मोंगलांईत (दक्षिणेंतील) सरदेशमुखी व चौथाई मिळूं लागली. या तहानें शाहूचें वजन महाराष्ट्रांत वाढलें. बाळाजीनें मराठयाचें लक्ष घरगुती भांडणांतून काढून या तहामुळें मुलखगिरीकडे वळविलें. त्यास शाहूचीहि संमति होती. चौथाईच्या निमित्तानें स्वराज्याचा विस्तार होऊं लागला. बाळाजी विश्वनाथाच्या पश्चात जुने सरदार व प्रधान हे दुर्बळ ठरल्यानें शाहूनें बाजीरावालाच हातीं धरलें. कोल्हापूचा संभाजी आपला वैरी आहे असें ओळखून त्यावर प्रत्यक्ष चढाई केली. तीत संभाजीचा मोड होऊन तो शाहूस शरण आला व वारणेचा तह होऊन स्वराज्यांतील एक मोठीशी जहागिरी संभाजीस तोडून दिली (१७३१). शाहूनें ब्रह्मोंद्रस्वामीच्या सांगण्यावरून पेशव्यांकडून जंजिर्याच्या शिद्दीवर मोहीम करवून त्याचा मोड केला व त्या भागांतील हिंदूंनां निर्भय केलें.
नानासाहेब पेशव्यावरहि शाहूचा लोभ नानाच्या लहानपणापासून बसला होता. रघूजीनें पेशवाई नानास न देतां बाबाजू बारामतीकरास देण्याचा आग्रह शाहूस चालविला, पण त्यानें तो मोडून नानासच पेशवाई दिली. उत्तरेकडे राज्यविस्तार करण्याची सल्ला त्यानेंच नानास दिली. परंतु शाहू जिवंत असेपर्यंत नानास स्वतंत्र मसलती पार पाडतां आल्या नाहींत. मात्र शाहूनें पेशवे-भोंसले यांचें सख्य करुन दिलें. त्यामुळें त्यांच्या मुलुखगिर्यांनीं शाहूच्या ऐश्वर्याचा कळस होऊन मराठयांचा वचक सर्वत्र बसविला. शाहूची करकीर्द पहिल्या तीन पेशव्यांच्या कारकीर्दीशीं समकालीन असल्यानें तींतील महत्वाच्या गोष्टी त्या त्या पेशव्यांच्या चरित्रांतून आढळतील. शाहूच्या कारकीर्दीत मराठी साम्राज्याची कशी वाढ झाली, त्याच्या आळशीपणाचा राज्यावर कसा परिणाम झाला वगैरे संबंधीचें विवेचन ज्ञानकोशाच्या ४ थ्या विभागांत 'हिंदूंची उचल' या प्रकरणांत (प. ४३६-४४०) केलेंच आहे. यासाठीं पुन्हां द्विरुक्ति टाळली आहे. वृद्धपणीं शाहू पेशव्यांवर जास्त अवलंबून राहूं लागला. त्याच्या दोन राण्यांत नेहमीं भांडणें होत त्यामुळें तो फार त्रासला होता. शिवाय पुत्र नसल्यानें तो उदासीन राही. ताराबाईनेंहि आपल्या खटपटी चालविल्या; त्यांत भर म्हणून विरुबाईहि वारली, व बरेच कर्ते पुरुषहि वारले. थोरल्या राणीनें रघूजीस दत्तक घेण्याचा शाहूस तगादा लावला; पेशव्यांच्या विरुद्ध पक्षानें त्याच्याबद्दल फार कागाळया केल्या, इत्यादि कारणांनीं शाहू फारच त्रासला. तेव्हां पेशव्याची परीक्षा घेण्यासाठीं कांहीं दिवस त्यानें नानास पेशवाईवरून काढलें परंतु विरुद्ध पक्षांत पेशवाई चालविण्याची धमक कोणांतच नसल्यानें अखेरीस पु्हां नानासच 'खरे एकनिष्ठ सेवक' म्हणून पेशवाई दिली. याच वेळीं पेशव्यानें शाहूचें सर्व कर्च वारलें. यापुढें दत्तकाबद्दल अनेक व्यक्तींनीं अनेक खटपटी केल्या त्या सर्व एकीकडे ठेवून शाहूनें आपल्या हातचा लेख करुन देऊन पेशव्यास मराठी राज्याचा सर्वाधिकार दिला व रामराजास आपल्यामागें गादीवर बसविण्यास सांगितलें. त्यानंतर थोडयाच दिवसांनं शाहुनगर (सातारा) येथें रंगमहाल राजवाडयांत शाहू छत्रपतीचा अंत झाला (ता. १५-१२-१७४९). त्याची अंत्यक्रिया संगममाहुलीस झाली. तेथें त्याची समाधि आहे. त्याची थोरली राणी त्याच्याबरोबर सती गेली. (शाहूमहाराज चरित्र; शाहूची रोजनिशी; नानासाहेब पेशवे यांची रोजनिशी; म.सा.छो. बखर; डफ; म.रियासत. म विभाग १-२.)