विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शार्लमन चार्लस दि ग्रेट (इ.स. ७४२-८१४) एक रोमन बादशहा व फ्रँफ्रँक लोकांचा राजा, पिपिन (फ्रँफ्रँक लोकांचा राजा) व बर्था (राणी) यांचा मुलगा. याला शिक्षण फारसें मिळालेलें नव्हतें, परंतु तो शरीरानें बळकट व शस्त्रविद्येंत प्रवीण होता. सन ७६१ मध्यें तो बापाबरोबर ऍक्विटेनमध्यें स्वारीवर गेला व लवकरच कित्येक काउंटींचा कारभारहि पाहूं लागला. ७६८ मध्यें पिपिन राजा वारला त्यानें आपलें राज्य चार्लस व त्याचा भाऊ कार्लोमन या दोघांत वाटून दिलें. परंतु ७७१ मध्यें कार्लोमन मरण पावल्यानंतर त्याची बायको व मुलगे यांनां पकडून त्यांचा अंत करून सर्व राज्य चार्लसनें बळकावलें. यानें पहिली बायको सोडून दिल्यानंतर याला एक अनौरस पुत्रहि झाला होता. पुढें रोमला जाऊन पोपला बापाप्रमाणेंच देणगी देण्याचें सुरु करुन यानें त्याच्याशीं सख्य केलें, व लोंबार्ड लोकांच्या राजास ठार मारून स्वतः त्यांचा राजा व 'पॅट्रिशियन' असल्याचें जाहीर केलें. नंतर तो इटली जिंकण्यास गेला असतां तेथें दुष्काळामुळें गुलामगिरींत पडलेल्या लोकांस त्यानें मुक्त केलें; जकाती उठवून व्यापाराला उत्तेजन दिलें. सॅक्सन लोकांशीं त्यानें इसवी सन ७७२-८०४ पर्यंत मोठें युद्ध करुन सर्व सॅक्सनी आपल्या साम्राज्यांत सामील केला. एल्ब नदीकांठचा प्रदेश व बव्हेरिया येथील राजांनींहि सॅक्सनांस मदत केल्यामुळें त्यांचीं राज्यें यानें खालसा केलीं. ७९९ मध्यें पोप तिसरा लिओ याला रोम येथें लोकांनीं त्रास दिल्यामुळें तो चार्लसच्या आश्रयास पळून गेला व नंतर त्याच्याच मदतीनें परत रोमला येऊन त्यानें आपली गादी परत मिळविली. त्याबद्दल लिओनें चार्लसला बादशहा म्हणून मुकुट अर्पण केला. त्याचा मोठा शत्रु काँस्टाँटिनोपल येथील त्या वेळचा मिकेल बादशाहा यास व्हेनीस व डाल्मेशिया हे प्रांत देऊन चार्लसनें आपल्या पदवीस त्याचीहि मान्यता मिळविली. त्यानें आपलें साम्राज्य एडर ते एब्रोपर्यंत, व ऍटलँटिकपासून एल्बपर्यंतचा प्रदेश व इटली यांवर पसरविलें होतें. तें त्यानें ८०६ मध्यें आपल्या तीन औरस पुत्रांमध्यें वाटून दिलें. पुढें तो तापानें आजारी पडून मरण पावला. चार्लसच्या नीतिविषयक कल्पना मागासलेल्या होत्या. त्याला पुष्कळ उपस्त्रिया व अनौरस मुलें होतीं. धार्मिक आचार मात्र तो नीट पाळीत असे; तो मोठा उदार होता. त्याला विद्येची फार आवड होती. त्यानें लॅटिन भाषेचा प्रसार आपल्या प्रजेंत करविला. त्यानें बरींच चर्चें व राजवाडे बांधले. चर्चमध्यें प्रीस्टपासून पोपपर्यंत सर्वांच्या कामावर त्याचें लक्ष असे. लोकांवरील सामाजिक सत्तेपेक्षां धार्मिक सत्तेचें प्राबल्य वाढविण्यास तोच कारणीभूत झाला. त्यानें लष्करी नोकरीच्या सोईकरितां पुढें अस्तित्वांत आलेल्या प्रसिद्ध सरंजामीपद्धतीचें बीज पेरलें. नेपोलियन स्वतःस याचाच अवतार म्हणवीत असे.