विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शान- ब्रह्मदेशाच्या पूर्व सरहद्दीवरील हा एक संस्थानांचा समूह आहे. एकंदर क्षेत्रफळ ५७,७१५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९०१) ११,३७,४४४ आहे. एकंदर छोटीं संस्थानें ४७ असून त्यांपैकीं उत्तर विभागांत ६ संस्थानें, दक्षिण विभागांत ३७ संस्थानें, मंडाले विभागांत २ संस्थानें व सगैंग विभागांत २ संस्थानें आहेत. यांखेरीज ब्रह्मदेशाच्या हद्दीबाहेर बरींच शान संस्थानें आहेत. पण तीं चीनचीं मांडलिक आहेत ब्रिटिश शान संस्थानें ब्रह्मदेश खालसा केला तेव्हां त्याबरोबर ब्रिटिशांकडे आलीं. १८९८ च्या कायद्यान्वयें प्रत्येक संस्थानाला दिवाणी, फौजदारी व मुलकी अधिकार देण्यांत आला. उत्तर विभागाकरितां एक सुपरिन्टेन्डन्ट व दक्षिण विभागाकरतां एक सुपरिन्टेन्डन्ट आहे. प्रत्येक संस्थानाचा कारभार वंशपरंपरागत तेथील राजाकडे चालतो. शान लोकांची भाषा ''थइ'' असून ती लेखनिविष्ट आहे. (ज्ञानकोश विभाग १ पृ. १८४ पहा) येथील मुख्य उत्पन्न तांदूळ आहे. गहू व बटाटे हीं फायद्याचीं पिकें आहेत.
शान जात- शान ही बौद्धधर्मानुयायी थईवंशाची चिनी जात आहे. यांची एकंदर संख्या (१९०१) ७,८७,०८७ आहे. ब्रह्मदेशांत व शान संस्थानांतून मुख्यत्वेंकरून यांचीच वस्ती आहे. हे लोक शांत स्वभावाचे व उद्योगी आहेत. तरुण तरुणीच्या परस्पर संमतीनें प्रथम गांधर्वविवाह होतो व मग मातापितरांनां सांगून लग्नविधि करण्यांत येतो.