विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शंकराचार्य:- भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत शंकराचार्याइतकें दुसर्या कोणत्याहि तत्त्वज्ञाचें नांव प्रसिध्द नाहीं. असें असूनहि त्यांच्याविषयीं जितकी माहिती उपलब्ध असावी तितकी उपलब्ध नाहीं. जी कांहीं माहिती त्यांच्या चरित्रकारांनीं दिली आहे तीत थोड्याशा सत्य गोष्टींबरोबर असंभाव्य अशा बर्याच गोष्टींचा उल्लेख आढळतो. शंकराचार्यांचा जन्म केरळ (मलबार) प्रांतांत कालाटी या गांवी झाला. यांच्या बापाचें नांव शिवगुरू व आजाचें नांव विद्याधिराज असें विद्यारण्यानें दिलें आहे पण आनंदगिरीनें शंकराचार्यांच्या आईबापांचीं नांवें विशिष्टा व विश्वजित् अशी दिलीं आहेत. शंकराच्या प्रसादामुळें मुलगा झाला म्हणून यांचें शंकर असें नांव त्यांच्या आईबापांनीं ठेवलें, वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनीं वेदवेदांगाचें अध्ययन करून त्यांत प्रावीण्य संपादन केलें. त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. नंतर गोविंद नामक आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार काशी येथें जाऊन तेथें त्यांनीं ब्रह्मसूत्रांवर आपलें सुप्रसिध्द भाष्य लिहिलें. प्रयागास त्यांची व कुमारिलभटटाची गांठ पडली, व त्या दोघांमध्यें बराच वादविवाद झाला. त्यानंतर माहिष्मती येथें मंडनमिश्राचा व त्यांचा बरेच दिवस वादविवाद होऊन मंडनमिश्राचा पराजय झाला. व त्यानें शंकराचार्यांचें शिष्यत्त्व पत्करिलें. नंतर शंकराचार्यांनीं हिंदुस्थानभर प्रवास करून निरनिराळ्या धर्मसंप्रदायांच्या आचार्यांशी वादविवाद करून आपल्या केवलद्वैतमताची स्थापना केली. या प्रवासांत हस्तामलक, तोटक पद्मपाद इत्यादि प्रसिध्द पंडितांनीं त्यांचें शिष्यत्व पत्करिलें. काश्मीर येथें जाऊन त्यांनीं शारदेच्या देवालयांतील सर्वज्ञपीठावर आरोहण केलें व अशा रीतीनें आपलें अलौकिकत्त्व सिध्द केलें. आपल्या वयाच्या ३२ व्या वर्षी ते समाधिस्थ झाले. शंकराचार्यांचा काळ ७८८-८२० हा असावा असें प्रो. पाठक यांनीं सिध्द केलें आहे. कै. तैलंगांच्या मतें शंकराचार्य हे सातव्या शतकांत होऊन गेले असावे, पण पाठकांनीं प्रतिपादन केलेला काळच हल्लीं बहुमान्य झाला आहे.
उपनिषदांत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची सर्व हिंदुस्थानभर स्थापना करणें हें शंकराचार्यांचें प्रमुख कार्य होय. यास्तव त्यांनीं सर्व हिंदुस्थानभर प्रवास करून उपनिषतत्त्वज्ञानविरोध मतांचा पाडाव केला; व आपलें केवलाद्वैत मत प्रस्थापित केलं. शृंगेरी, द्वारका, बद्रिकाश्रम व पुरी इत्यादि चार ठिकाणीं त्यांनीं चार स्वतंत्र मठांचीं स्थापना केली. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिध्द आहेत. त्यांपैकीं प्रमुख म्हणजे ब्रह्मसूत्रभाष्य, दशोपनिशद्भाष्य, गीताभाष्य, उपदेशसाहस्त्री, अपरोक्षानुभूति, विवेकचूडामणि इत्यादि होत. याशिवाय विष्णुसहस्त्रनाम, सनत्सुजातीय यावरील भाष्ये, आत्मबोध, दशष्लोकी, मोहमुन्दर इत्यादि ग्रंथहि त्यांच्या नांवावर मोडतात. शंकराचार्यांनीं प्रतिपादन केलेलें अद्वैत व त्याच्या जागतिक तत्त्वज्ञानावर झालेला परिणाम यासंबंधीं 'अद्वैत' लेख पहा. [माधवावार्य-शांकरदिग्विजय; कृष्णस्वामी-लाइफ ऑफ शंकराचार्य; डौसन-फिलॉसफी ऑफ दि उपनिशदाज]