विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वेदांत:- वेदान्त म्हणजे वेदांचा अंत. ज्यामध्यें वेदांचें मुख्य तात्पर्य सांगितलें आहे त्याला वेदांत अशी संज्ञा आहे. वेदांच्या शेवटच्या भागांत उपनिषदें सांगितलीं आहेत म्हणून उपनिषदांतील तत्त्वज्ञानाला वेदान्त असें म्हणतात. तथापि वेदांत हा शब्द प्रचारांत एका विशिष्ट तत्त्वज्ञानालाच लावण्यांत येतो. संस्कृत वाड्.मयांत जीं सहा प्रसिध्द दर्शनें आहेत त्यांमध्यें वेदांत हें एक दर्शन आहे; व त्या दर्शनांतील तत्त्वज्ञानाला वेदान्ततत्त्वज्ञान असें म्हणतात. वेदान्त तत्त्वज्ञानाचा पहिला संस्थापक बादरायण होय. याला बादरायण व्यास असेंहि नांव आहे. उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचा सांगोपांग विचार करून त्या तत्त्वज्ञानाचें सार म्हणून बादरायणानें वेदान्तसूत्रें नांवाचा ग्रंथ लिहिला. या सूत्रांनां बादरायणसूत्रें, शारीरिक सूत्रें, ब्रह्मसूत्रें, वेदान्त मीमांसा वैयासिकी मींमांसा, उत्तरमींमांसा इ. नांवांनींहि संबोधण्यांत येतें. बादरायणाच्या या ग्रंथाची थोडक्याच काळांत एवढी मान्यता झाली कीं वेदान्त तत्त्वज्ञानाच्या उपनिषदें व गीत या आधारभूत ग्रंथांबरोबरच बादरायणाच्या वेदांतसूत्रांची मान्यता प्रस्थापित होऊन प्रस्थानत्रयीत वेदान्तसूत्रें जाऊन बसलीं. वेदान्तावर काहींहि लिहावयाचें झाल्यास अगर कोणतेंहि नवीन तत्त्व प्रस्थापित करावयाचें झाल्यास, उपनिषदें, गीता व वेदान्तसूत्रें यांनां तें तत्त्व संमत आहे असे दाखविल्याशिवाय त्या नवीन मताला प्रामाण्य मिळेनासें झालें. त्यामुळें अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत, इत्यादि मतांच्या आचार्यांनां, आपलें मत स्थापन करण्याला या प्रस्थानत्रयीवरच आपली भिस्त ठेवावी लागली. अशा रीतीनें वेदान्तसूत्रें हा ग्रंथ वेदान्तासाठीं अत्यंत आवश्यक ग्रंथ मानला गेला. पण उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचें सार सांगण्याकरतां म्हणून जरी ही वेदान्तसूत्रें बादरायणानें रचिलीं तरी त्यांतील सूत्रांचा अर्थहि निरनिराळ्या तर्‍हेनें लावण्यांत येऊ लागला. शंकराचार्यांनीं सूत्रांचा अद्वैतपर अर्थ लावला तर रामानुजाचार्यांनीं त्यांचा विशिष्टाद्वैतपर व मध्वाचार्यांनीं द्वैतपर अर्थ लावला. पण अद्वैतपर अर्थच सर्वांत अधिक पसंत पडला व हल्लीं वेदान्तदर्शन म्हणजे अद्वैतमतप्रतिपादव दर्शन असें समजण्यांत येतें.

वेदान्तसूत्रें उर्फ वेदान्तदर्शन याचे चार अध्याय असून एकंदर सूत्रें ५५५ आहेत. या सूत्रांचीं प्रत्येक आचार्याने आपल्याला सोयीप्रमाणें अधिकरणें पाडलेलीं आहेत. पहिला अध्याय समन्वयाध्याय या नांवानें प्रसिध्द असून त्यांत सर्वांचें तात्पर्य प्रत्यग् ब्रहमैक्यविषय आहे असें म्हटलें आहे. दुसर्‍या विरोध अध्यायांत सांख्यादि मतांचें निराकरण केलें आहे. तिसर्‍या अध्यायांत म्हणजे साधनाध्यायांत ब्रह्मविद्यासाधन सांगितलें आहे. व चौथ्या फलाध्यायांत विद्येचें फल सांगितलें आहे. प्रत्येक अध्यायाचे चार पाद आहेत. वेदांतसूत्रांच्या मतें ब्रह्म हें निर्गुण व चिद्रूप आहे. 'सत्यंज्ञानमनन्तं' असें ब्रह्म आहे. ब्रह्म हें जगताचें उपादानकारण व निमित्तकारण आहे. त्याच्या लीलेकरून हें जग निर्माण झालें. आत्मा हा शाश्वत व सर्वव्यापी असून परब्रह्माचा अंशभूत आहे. जीवात्मा व परमात्मा हे एकच होत. अशा ब्रह्माचें ज्ञान करून घेणें म्हणजेच मुक्त होणें होय.

वेदान्तसूत्रांवर निरनिराळ्या आचार्यांनीं भाष्ये लिहून आपापल्या मतांप्रमाणें त्यांतून भिन्नभिन्न अर्थ काढण्यास सुरूवात केली. व त्यामुळें अनेक संप्रदाय निर्माण झाले. या सर्व भाष्यकारांचीं मतें त्या त्या भाष्यकारांवरील लेखांत दिलीं आहेत.