विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विष्णुदास नामा:- नाथकालीन एक मराठी कवि. यानें समग्र महाभारतावर रचना केलेली आहे. नामाशिंपी व नामाविष्णुदास अगदी निराळे होते पण पुष्कळांनीं ते एकच समजून बर्‍याच चुका केल्या आहेत. विष्णुदासाचे कांहीं अभंग नामदेवाच्या गाथेंत गैरसमजुतीमुळे पडले आहेत. उदा. शुकाख्यान. या आख्यानच्या शेवटच्या (३७०-७१) ओंव्यांमध्यें कवीचें नांव व काव्यसंपूर्णतेचा काल दिला आहे. ''मन्मथनामसंवत्सर पौष्यमासीं । सोमवार अमावास्येच्या दिवशी । पूर्णता आली ग्रंथासी.'' मन्मथनामसंवत्सराची पौष अमावस्या सोमवारीं शके १५१७ मध्यें पडते. विष्णुदासांचा उल्लेख महिपतीनें मुक्तेश्वराबरोबर केला आहे. याच्या ओंव्या फार गोड व रसाळ आहेत. याच्या भारताची ओंवीसंख्या १८-२० हजार असावी.