विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विशिष्टाद्वैत:- वैदिक धर्मांतील एक संप्रदाय. या संप्रदायाचे प्रवर्तक रामानुजाचार्य हे होत. रामानुज यांच्याहि पूर्वी विशिष्टद्वैतमत प्रचलित होतें किंवा नाहीं हें नक्की सांगतां येत नाहीं. तथापि प्रचलित असलें तरी त्यास फारशी मान्यता मिळाली नव्हती एवढें खास म्हणतां येईल. रामानुजाचार्यांनीं हें विशिष्टाद्वैत मत प्रामुख्यानें प्रचलित करण्याला जें प्रमुख कारण झालें तें म्हणजे, शंकराचार्यांच्या अद्वैतसंप्रदायानें जो सर्व हिंदुस्थानभर आपला पगडा बसविला होता त्याला प्रतिबंध करणें हें होय. 'ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:' हें अद्वैतमताचें सूत्र होय. कर्मसन्यासपूर्वक ज्ञानानेंच मोक्ष मिळतो, त्याशिवाय अन्य तर्हनें मिळत नाहीं असें अद्वैतवाद्यांचें म्हणणें होतें. भक्ति अगर श्रध्दा यांनां या सिध्दांतांत कोटेंच स्थान नव्हतें त्यामुळें या अद्वैतमतानें वैष्णव धर्माच्या मुळावरच घाव घातल्यासारखें झालें ही आपत्ति नाहीशी करण्याकरितां व वैष्णव धर्माच्या पुनरूज्जीवनाकरतां रामानुजाचार्यांनीं आपल्या गुरूच्या सांगण्यावरून उपनिषदांचा आधार घेऊन शंकराचार्यांच्या मायावादाचें तत्त्व खोडून टाकण्यासाठीं विशिष्टाद्वैत मताची स्थापना केली. चित्, अचित् व ईश्वर हीं तीन तत्त्वें जरी भिन्न असलीं तरी चित् व अचित् हीं दोन्हीं एका ईश्वराचेंच शरीर असल्यामुळें चिदचिद्विशिष्ट ईश्वर एकच होय व ईश्वरशरीरांतील या सूक्ष्म चिदचिदांपासून पुढें स्थूल चित् व अचित् निर्माण होतात असें विशिष्टाद्वैत संप्रदायाचें मत आहे. हें मत प्रस्थानत्रयीला संमत आहे असें रामानुजाचार्यांनीं दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विशिष्टाद्वैत याचा अर्थ चिदचिद्रूपी शरीरानें विशिष्ट अशा परमात्म्याचें ऐक्य असा होय. अथवा विशिष्टाचें अद्वैत उर्फ ऐक्य असाहि याचा अर्थ लावतां येईल, म्हणजे सूक्ष्म शरीरानें विशिष्ट असा परमात्मा कारण असून स्थूल शरीरानें विशिष्ट परमात्मा हा कार्य आहे व कार्यकारण यांचें ऐक्य असल्यामुळें हें विशिष्टांचें ऐक्य होय. विशिष्टाद्वैतमतांचीं मुख्य तत्त्वें 'रामानुज' या लेखांत दिलीं आहेत ('रामानुज' ज्ञानकोश भाग १९ पहा.)
विशिष्टाद्वैतमताचा विचार केल्यास रामानुजानें आपलीं तत्त्वें उपनिषदांदि प्रस्थानत्रयीवरून प्रस्थापित केलीं आहेत व जगदुत्पत्तीचा सिध्दांत मात्र पुराणांमध्यें वर्णन केलेलाच मान्य केला आहे असें दिसून येतें. विशिष्टाद्वैत संप्रदाय प्रवृत्त करून त्यानें जुन्या पांचरात्र धर्मांतील वासुदेवभक्तीचे नव्या स्वरूपांत पुनरूज्जीवन केलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. विशिष्टाद्वैतमताचे अनुयायी उत्तरहिंदुस्थानांत फार थोडे आहेत पण दक्षिण हिंदुस्थानांत त्यांची संख्या मोठी आहे. या संप्रदायाचे वडकलइ व तेंकलई असे दोन पोटभेद आहेत.
विशिष्टाद्वैतमतावरील मुख्य ग्रंथ म्हणजे श्रीनिवास दासांचा 'यतीन्द्रमतदीपिका', वरदागुरूंचा 'तत्त्वत्रयुलुक', रामामुजाचार्यांचा 'वेदार्थसंग्रह', 'श्रीभाष्य', वेदान्तदीप', 'वेदान्तसार;' सुदर्शनपंडीताचा 'तात्पर्यदीपिका', लोकांचार्याचा 'तत्त्वशेखर', यामुन मुनिकृत 'सिध्दित्रय' इत्यादि होत.