विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विजयानगर:- विजयानगरच्या राज्याचें मुख्य शहर, मद्रास इलाख्यांतील बलजरी जिल्ह्याच्या सांप्रतचया होसपेट तहशिलींत हें प्राचीन शहर होतें सध्यां त्या ठिकाणीं हंपी नांवाचें लहानसें खेडें वसलेलें आहे. तुंगभद्रा नदी याच्याजवळच वाहते. आसपासचा प्रदेश टेंकडयांनीं वेष्टिलेला असून कोणत्याहि ॠतूंत याची नैसर्गिक शोभा कमी होत नाहीं. विजयानगर १३३६ त स्थान झालें. सुमारें अडीचशें वर्षेपर्यंत मुसुलमान लोक यावर स्वार्‍या करीत होते परंतु बराच कालपर्यंत यानें त्यांनां दाद दिली नाहीं. विजयानगरचें राज्य कृष्णा नदी ओलांडून दक्षिण हिंदुस्थानभर होतें असें म्हणतां येईल.

आज विजयानगर राजघराण्यांतील वंशज अनागोंदीस राहतात. त्यांनां थोडी फार जमीन असून इंग्रज सरकार कांहीं पेन्शन देतें. राजवाडा व त्याच्या भोंवतालचें आंगण हा या शहरचा मुख्य भाग गणला जातो. राजवाडयाच्या जवळ परंतु तुंगभद्रेच्या कांठीं नरसिंहाची पाषाणाची मूर्ति खोदलेली असून तिची उंची २२ फूट आहे. नदीच्या कांठीं पंपावतीचें दुसरें एक देऊळ आहे. हीं कामें बहुतेक कृष्णदेवरायाच्या अंमलांत झालेलीं आहेत. रामायणांत जी किष्किंधा नगरी वर्णिलेली आहे ती हंपीजवळच असावी. तेव्हां या स्थानाला क्षेत्राचेंहि महत्व प्राप्त झालें आहे.