विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विंचूर:- मुंबई, नाशिक जिल्ह्यांतील एक सरंजामी जहागीर. प्रथमतः हींत नाशिक जिल्ह्यांतील ४५, नगर जिल्ह्यांतील ९ व पुणें जिल्ह्यांतील २ अशीं खेडीं होतीं. १८९२ सालीं अर्धा सरंजाम जप्त झाला. त्यांत येवलें इंग्रज सरकारकडे आलें. आतां फक्त नाशिक जिल्ह्यांतील २६ खेडीं बाकी आहेत. यांची लोकसंख्या १९०१ साली १०७०० होती. सरंजामी उत्पन्न ३७००० रुपये होतें. विंचूरकर घराण्याचा इतिहास 'विठ्ठल शिवदेव विंचूरकर' या लेखांत सांपडेल. विंचूरचे जहागीरदार दक्षिणेंतील पहिल्या दर्जाच्या सदरांत मोडतात. विंचूर परगण्याचे सर्व हक्क व दिवाणी फौजदारी अधिकार यांनां आहेत. विंचूर गांव लालसगांव (जी.आय्.पी.रेल्वे) स्टेशनपासून ४ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें ५००० आहे. गांवाभोंवतीं मातीचा तट आहे.