विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाशिंग्टन:- अमेरिका, संयुक्त संस्थानांची राजधानी. फिलाडेल्फियाच्या नैर्ॠत्येस १३५ मैल, व न्यूयॉर्कच्या नैर्ॠत्येस २२५ मैल हें शहर वसलें आहे. याचें क्षेत्रफळ ६० चौरस मैल व लोकसंख्या सुमारें ४ लाख आहे. मुख्य शहर एनाकोशिया नदी व रॉक क्रीक नांवाची खाडी यांत वसलें असून तें सुमारें १० चौरस मैल घेराचें आहे. येथील रस्त्यांची रुंदी सुमारें ८० ते १२० फूट आहे, व शहरांतील सुमारें अर्ध्याहून अधीक भाग रस्त्यात व बगीच्यांत गुंतलेला आहे. प्रत्येक चौकांत एखाद गोल बगीच्या व कोणातरी मोठया मनुष्याचा पुतळा असतोच. पोटात्रॅक पार्क, नॅशनल झू प्राणिसंग्रह व रॉकक्रीक हे बगीचे मोठे आहेत. येथील हवा उन्हाळयांत फार उष्ण व हिवाळयांत साधारण थंड असते. पाऊस सुमारें ४३ इंच पडतो. टेंकडीवर कॅपिटोल नांवाची मोठी इमारत आहे. ही इमारत फार भव्य असून सुंदर आहे. हिच्यावर स्वातंत्र्यदेवीचा पुतळा आहे. 'व्हाइट हाऊस' म्हणून दुसरी जी एक इमारत आहे तिच्यांत अमेरिकेचा प्रेसिडेंट राहतो. काँग्रेसचें विश्वविद्यालय, यूनियन रेल्वे स्टेशन व दुसर्या अनेक प्रेक्षणीय इमारती आहेत. शहरांतील मुख्य पुतळयांपैकीं जार्ज वॉशिंग्टनचा एक आहे. हा पुतळा संगमरवरी दगडाचा आहे. नॅशनल सिमेटरी यांत अमेरिकेंतील कांहीं मोठया लोकांच्या कबरी आहेत. याशिवाय काँग्रेशनल कबरस्तानांत काँग्रेसच्या सभासदांच्या कबरी आहेत. याशिवाय दुसरींहि कबरस्थानें आहेत. शिपायांकरितां नॅशनल सोल्जर्स होम, बायकांमुलांकरितां रुग्णालयें व वसतिगृहें आहेत. वाशिंग्टन शहरावरून ७ रेल्वे जातात. न्यूयॉर्क, व अलेक्झांड्रिया, व फिलाडेल्फिया, वाल्टीमूर वगैरे ठिकाणांशीं बोटींनीं व्यवहार चालतो. येथील लोकसंख्येच्या मानानें येथें उद्योगधंदे फार नाहींत. खाद्यपदार्थ बनविणें, सरकारी पुस्तकें छापणें व दुसरीं कामें करणें हेच येथील उद्योग आहेत.