विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंगलोर, तालुका- मद्रास. दक्षिण कानडा जिल्ह्याच्या मध्यभागीं असलेला तालुका. क्षेत्रफळ ४१५ चौरस मैल यांत २४३ खेडीं व मंगलोर हें मोठें गांव असून तेंच या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. तालुक्याची लोकसंख्या इ. स. १९२१ मध्यें ३०७७५८ होती. इ. स. १९२१-२२ त याचें एकंदर उत्पन्न सुमारें ६-१/४ लाख रु. होतें. यांत नारळ, ऊंस, तांदूळ, मिरची, हळद व भाजीपाले हीं पिकें होतात.
गांव.- दक्षिण कानडा जिल्ह्याचें हें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या (१९२१) ५३८७७. यांत हिंदु लोकांचा विशेष भरणा असून थोडे मुसुलमान व ख्रिस्ती लोकहि आहेत. हें गांव पूर्वी कांहीं कालपर्यंत स्वतंत्र होतें. इ. स. १५९६ त हें पोर्तुगीज लोकांनीं घेतलें, व पुढें दोन शतकेंपर्यंत त्यांच्याच ताब्यांत राहिलें. नंतर इ. स. १७६३ त हें हैदरअल्लीनें घेतलें व त्यानें येथें एक गोदी व एक शिलेखाना स्थापन केला. शेवटीं इ. स. १७९९ त हें इंग्रजांच्या ताब्यांत आलें. मंगलोरचा इराणच्या आखाताशीं व्यापार इ. स. १३४२ पासून सुरू झाला असें इब्नबतूता म्हणतो. सध्यां हें कानडा जिल्ह्यांतील व्यापाराचें व औद्योगिक केन्द्र आहे. यांत कौलें व सुती कापड तयार होतें. येथील निर्गत माल कौलें, कॉफी (कंद), सुपारी, मसाले, तांदूळ, मासे; व आयात माल कापड, मीठ, धान्यें, डाळिंबें, दारू हा आहे. येथें २ विद्यालयें आहेत. स. १८९६ मध्यें येथें म्युनिसिपालिटी स्थापण्यांत आली. येथें एक कॉलेज व बरींच हायस्कुलें आहेत.