विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूत्रावरोध (मूत्रकृच्छ्र)- जेव्हां लघवी आपोआप होऊं शकत नाहीं त्या स्थितीस हें नांव आहे. उरुस्तंभ, मेंदूचे रोग व पृष्ठरज्जूच्या इजेमुळें ह्या शक्तीचा नाश होतो.
उ पा य.- या बाबतींत इतकेंच शक्य आहे कीं दिवसांतून दोन तीन वेळां मूत्रशलाकेनें लघवी काढावी व मूत्राशय जंतुघ्न औषधांनीं धुवावें. चैतन्य उत्पन्न करण्यासाठीं पोटांत योग्य औषधें द्यावींत. मूत्रकृच्छ्र, मूतखडा, प्रोस्टेटवृद्धि या कारणांनीं मूत्रमार्गांत प्रतिबंध होतो. याचीं गर्भाशयोन्मादवायु, गर्भाशयाचा दाब, मलद्वाराचे व्याधी किंवा तेथील मूत्रमार्गावरील शस्त्रक्रिया हीं अन्य कारणें होत. त्यावरील योग्य ते उपाय करावेत.
न ष्ट मू त्र.- पटकीमध्यें व मूत्रपिंडाच्या कांहीं अवस्थांमध्यें मूत्रच मुळीं तयार होत नाहीं, त्या स्थितीस हें नांव आहे. याचें वरील व्याधीशीं लघवी फक्त न होण्यांत साम्य असते. पण पोट तपासलें असतां किंवा मूत्रशलाका मूत्राशयांत घातली असतां ते रिक्त असल्याचें आढळतें.
मुलास अंथरुणांत लघवी होते त्यास योग्य संवय लावून रात्रींतून दोन वेळां मुलांस उठवून लघवी करवून निजवावें म्हणजे ही खोड नाहींशीं होतें. पोटांत लोहयुक्त बेलाडोनाचा अर्क कांहीं आठवडे द्यावा. मुलांस उताणें निजवूं नये.