विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूत्राशय व प्रोस्टेटपिंड यांचे रोग- मूत्राशयांत मूत्र कमी अगर जास्त वेळ कोंडून रहातें व त्यामुळें या इंद्रियास नाना प्रकारचे महत्त्वाचे रोग होतात. प्रोस्टेटपिंड याच्या खालीच चिकटून असल्यामुळें तो पिंड विकृत झाला असतां दोहोंच्या लक्षणांमध्यें पुष्कळ साम्य असतें. म्हणून दोन्ही प्रकारच्या रोगांचें एके ठिकाणी वर्णन करणें युक्त आहे.
मू त्रा श य दा ह.- इंद्रियाच्या आंत श्लेष्मावरण त्वचा असते, तींत दूषित जंतूंचा प्रवेश होऊन दाहक्रिया सुरू होते. हे जंतु मूत्रनलिकामार्गें अगर मूत्रपिंड किंवा रक्तातून तेथें शिरकाव करतात. स्त्रीरोगांत तर योनिद्वारमार्गें येथें जंतुप्रवेश होतो. हा जंतुप्रवेश होण्याच्या अगोदर प्रोस्टेटपिंडवृद्धि होऊन किंवा मूत्रकृच्छ्रसंकोचन, मूतखडा इत्यादि कारणांनीं त्याचा आंतील भाग विकृत होतो, किंवा क्षय किंवा टायफाइड ज्वराचे जंतु अथवा न धुतलेली शलाका रोग्याच्या मूत्राशयांत घालणें अगर मूत्रमार्गांत असलेला पू हींहि मूत्राशय दूषित करतात. वरचेवर लघवी व तीहि थोडथोडी होणें, आवरतां न येणें, आग होणें अगर रत्तच् पडणे अगर अति तांबडी लघवी होणें हीं याचीं लक्षणें होत. अमोनियाची घाण येणारा पूहि लघवींत थोडथोडा असतो.
उपचारः- उबदार अशा जागेंत रोग्यास बिछान्यावर निजून रहाण्यास सांगावें. त्यानें दिवसांतून शक्य असले त्यामानानें बरेच वेळां कंबरेपर्यंत कढत पाण्यांत एका पातेल्यांत अगर टबांत बसावें. त्यांतून बाहेर येऊन निजल्यावर ओटीपोट सौम्य तर्हेनें शेकावें.
पथ्य- खाण्यास फक्त थंड अगर गरम स्वच्छ पाणी घातलेलें दूध, भात व इतर पिष्टमय हलके पदार्थ व तूपलोण्यासारखे थोडे स्निग्ध पदार्थ द्यावे. मद्य अगदीं वर्ज्य करावें. लघवी अम्ल असल्यास पोटांत सोयाबायकार्बोनेट किंवा सायट्रेट हा क्षार द्यावा. ती जर अल्कयुक्त असेल तर यूरोट्रोपीन अगर दुसरीं जंतुघ्न औषधें पोटांत द्यावींत. लघवीच्या वेळीं कुंथण्यास लागून त्रास होत असेल तर १ ४ १ २ ग्रेन मार्फिया असलेली सोंगटीच्या आकाराची गोळी ३।४ तासांनीं मूत्रद्वारांत ठेवावी. शौचास साफ होत जाईल अशी व्यवस्था ठेवावी. लघवी अति दुर्गंधिमय असेल तर जंतुघ्न औषध रबरी शलाकेच्या मार्गानें मूत्राशयांत घालून तें इंद्रिय धुवावें. शलाकेस २।३ फूट २।३ फूट रबरी नळी जोडून तींत नरसाळयांतून जंतुघ्न औषध घालावें.